"राग कोणालाही येऊ शकतो - रागावणे फार सोपे आहे;परंतु योग्य व्यक्तीवर,योग्य प्रमाणात, योग्य वेळी,योग्य कारणासाठी आणि योग्य रीतीने रागावणे हे मात्र सोपे नाही." ॲरिस्टॉटल - द निकोमॅकिअन एथिक्स
त्या दिवशी दुपारी न्यूयॉर्कच्या हवेत ऑगस्ट महिन्याची असह्य घामट उष्णता दाटलेली होती. लोकांचा जीव घाम आणि उकाड्याने बेजार झाला होता.मला हॉटेलला जायचे होते म्हणून मी बसची वाट पाहत मॅडिसन ॲव्हेन्यूवर उभा होतो.बसमध्ये चढताना बसच्या ड्रायव्हरने उत्साहपूर्ण स्मित करीत 'हाय,कसं चाललंय?' असे म्हणत माझे ज्या थाटात स्वागत केले,ते पाहून मला धक्काच बसला.तो मध्यमवयीन कृष्णवर्णीय माणूस होता.शहराच्या रहदारीतून बस मुंगीच्या पावलांनी पुढे जात असताना तो बसमध्ये चढणाऱ्या प्रत्येकाचे असेच जोशपूर्ण स्वागत करीत होता.प्रत्येक प्रवासी माझ्यासारखाच आश्चर्याने थक्क होत होता. हैराण करणाऱ्या उष्णतेने दुर्मुखलेल्या प्रवाशांपैकी फक्त काही जणांनी त्याच्या स्वागताला प्रत्युत्तर दिले.
पण जसजशी बस रेंगाळत पुढे जाऊ लागली तसतसा बसमध्ये हळूहळू का होईना;पण काहीसा जादुई बदल घडून आला.बस जिथून जात होती तिथल्या आजूबाजूच्या परिसराबद्दल ड्रायव्हर प्रवाशांना माहिती देऊ लागला.
त्याच्या चैतन्यमय धावत्या समालोचनात तो सांगत होता, अमक्या दुकानात भव्य 'सेल' लागला आहे, हे संग्रहालय खूप पाहण्यासारखे आहे बरं का आणि हो,त्या चित्रपटगृहात नुकत्याच लागलेल्या चित्रपटाबद्दल तुम्ही काही ऐकले आहे का? त्या शहरात काय काय विलोभनीय गोष्टी आहेत. याचा 'संसर्ग' त्याच्या खेळकर सुरातून इतरांनाही झाला.लोकांनी बसमध्ये चढताना धारण केलेले खिन्नपणाचे कवच कधी गळून पडले हे कोणालाच कळाले नाही.प्रत्येकजण आपल्या स्टॉपवर उतरत असताना हा आपला मोठ्याने ओरडून म्हणायचा,
"बरंय, या मजेत दिवस घालवा!" आणि प्रत्येकजण त्याला सस्मित प्रतिसाद देत बसमधून उतरू लागला.
या घटनेला वीस वर्षे होत आली तरी माझ्या मनाने तिची आठवण कायम ताजी ठेवली. त्यादिवशी बसमध्ये चढलो तेव्हा मी नुकताच मानसशास्त्रातील माझा प्रबंध पूर्ण केला होता; परंतु असे परिवर्तन कसे घडू शकते याविषयी त्या काळी मानसशास्त्र फार त्रोटक लक्ष घालायचे.भावनांच्या कार्याविषयी मानसशास्त्राला अजिबात माहिती नव्हती किंवा फार थोडी माहिती होती.तरीही हा बस ड्रायव्हर त्याच्या बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांमध्ये चांगल्या भावनेचा 'किटाणू' पसरवण्याचा विचार करीत होता,बहुधा या चांगल्या भावनेचे तरंग सगळ्या शहरात पसरले असतील.आपल्या बसमधील उतारूंच्या हृदयाची दारे उघडून त्यात खदखदणारी चिडचिड,अस्वस्थपणा दूर करून त्यांचे हृदय मृदू बनवण्याची जादू करणारा हा माणूस मला एखादा शहरी शांतिदूत वाटला.
आता वर्तमानपत्रातील या आठवड्याच्या काही घटना पहा ज्या वरील घटनेच्या टोकाच्या विरोधात आहेत :
● एका स्थानिक शाळेतील नऊ वर्षांच्या मुलाने रागाने बेभान होत शाळेतला डेस्क,संगणक आणि प्रिंटर यांच्यावर रंग ओतला,शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या गाडीला विद्रूप केले; कारण काय तर त्याच्या तिसरीतील काही वर्गबांधवांनी त्याला 'बाळ' म्हणून चिडवले होते आणि याला त्यांना दाखवून द्यायचे होते की, तो 'बाळ' नाही.
● मॅनहटन रॅप क्लबच्या बाहेर गोळा झालेल्या काही किशोरांच्या गर्दीत अनवधानाने लागलेल्या धक्क्याची परिणती ढकलाढकली व रेटारेटीत झाली.परिणामी अपमानित झालेल्या एका किशोराने ३८ कॅलिबरची स्वयंचलित बंदूक काढून गर्दीवर गोळ्या झाडल्यामुळे आठ किशोर जखमी झाले.अहवाल असे सांगतो की,अशा किरकोळ घटनांना आपला अपमान समजून केलेल्या अशा गोळीबाराच्या घटना अलीकडच्या काही वर्षात देशभरात सर्वसामान्य झाल्या आहेत.एका अहवालात हादरवून सोडणारे तथ्य असे दिसून आले की,
बारावर्षांखालील बालकांच्या खुनाच्या प्रकरणात खुद्द त्यांचे पालक किंवा सावत्र पालक दोषी असतात. पालकांच्या म्हणण्यानुसार,ते फक्त "त्यांच्या मुलांना शिस्त,वळण,लावायचा प्रयत्न करीत होते." ते टी.व्ही.पाहत असताना मूल टी.व्ही. समोर उभे राहिले,रडले किंवा त्याने अंथरूण खराब केली म्हणून त्याला इतकी मारझोड केली गेली की,त्यात हे मूल मरण पावले.
● पाच तुर्की मुली आणि स्त्रिया त्यांच्या घरात झोपलेल्या असताना घराला आग लावून त्यांना ठार मारल्याबद्दल एका जर्मन तरुणावर खटला चालवला जात आहे.नव-नाझीवादी गटाचा एक हिस्सा असलेला हा तरुण त्याची नोकरी न टिकणे,दारू पिणे आणि दुर्दैव यासाठी परकीयांना दोष देत त्यांचा बदला घेतला असे सांगतो.
कुजबुजल्या स्वरात तो विनवतो,"मी जे केले त्याबद्दल मला वाईट वाटते आणि त्याबद्दल मी अपार शर्मिंदा आहे."
प्रत्येक नवीन दिवस भरगच्च बातम्या आणतो की,सभ्यता आणि सुरक्षितता कशी विस्कळीत झाली आहे,माथेफिरूपणाने प्राणघातक हल्ला करण्याची क्षुद्र अनावर ऊर्मी कशी लोकांना कंठस्नान घालत हैदोस घालीत आहे;पण या प्रकारच्या बातम्या केवळ या गोष्टीला प्रतिबिंबित करतात की,आपल्या आणि आपल्या भोवतालच्या लोकांच्या जीवनात भावना नियंत्रणाबाहेर जाण्याचा आवेश मोठ्या प्रमाणात डोके वर काढू लागला आहे.प्रक्षोभ आणि पश्चात्तापाच्या या अनियंत्रित लाटेपासून कोणीच वाचू शकलेले नाही.या ना त्या मार्गाने ती आपल्या जीवनात येतेच येते.
गेल्या दशकात अशा वाढत्या अहवालांचे ढीग हीच बाब स्पष्ट करतात की,आपल्या कुटुंबात, समुदायात,आपल्या सामूहिक जीवनात भावना हाताळण्याची कौशल्यहीनता,
कमालीची निराशा आणि बेपर्वाईचा आलेख वरवर झेपावत आहे. या काही वर्षांत सळसळणारा राग आणि निराशा हा एक जुनाट रोग बनला आहे.बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीअभावी घराच्या एकांतात टी. व्ही.सोबत एकाकी पडलेली बालके असोत किंवा उपेक्षित,
अस्वीकृत,दुर्लक्षित किंवा वाईट वागवली गेलेली दुःखी मुले असोत किंवा वैवाहिक हिंसेच्या गलिच्छ जवळिकीला बळी पडलेली जोडपी असोत,सगळे या आजाराने पीडित आहेत.जगात सगळीकडे नैराश्याच्या वेगाने वाढत जाणाऱ्या आकड्यांतून पसरलेली भावनिक अस्वस्थता आणि धुसफूस दिसून येते आणि हिंसेची वाढती लाटही याच भावनिक अस्वस्थतेची आठवण देते.खिशात बंदूक बाळगणारे शालेय,किशोर,बंदुकीच्या स्कोटांनी संपणारी रस्त्यावरील भांडणे,दुर्घटना,आपल्याच सहकाऱ्यांना मारून टाकणारे,असंतुष्ट माजी कामगार हे सगळे याच आजाराचे पुरावे आहेत. भावनिक अत्याचार गाडी चालवताना बंदूक चालवणे,धक्कादायक घटनांनंतर येणारा ताण अशा संज्ञा गेल्या दशकात सर्वसामान्य शब्दकोशात स्थान घेऊ लागल्या आहेत. जेव्हापासून परस्परांन "दिवस चांगला जावो' अशा सदिच्छा देण्याच्या जागी 'दिवस पार पडू दे' अशा सुरक्षा केवच देणाऱ्या शब्दात झाल्यापासून वरील बदल घडले आहेत.हे पुस्तक अर्थशून्यतेतून अर्थ शोधण्याचे मार्गदर्शन करीत आहे.एक मानसशाखा म्हणून आणि गेली दहा वर्ष द न्यूयॉर्क टाइम्स'साठी वृत्तपत्र लेखक म्हणून काम करताना अतार्किकतेच्या क्षेत्राला समजून घेण्यात आपल्या शास्त्रांनी केलेल्या प्रगतीचा मी मागोवा घेत आलो आहे.(इमोशनल इंटेलिजन्स,भावनिक बुद्धिमत्ता,
डॅनिअल गोलमन,अनुवाद-पुष्पा ठक्कर साकेत प्रकाशन) मला दोन परस्परविरोधी मतप्रवाह दिसून आले.आपल्या सामूहिक भावनिक जीवनावर दुर्दैवाने घातलेला घाला एक प्रवाह रंगवत आहे,तर दुसरा त्याका काही आशादायक उपाय सुचवत आहे.
हा शोध आताच का घ्यायचा?
गेल्या शतकात वाईट बातम्यांचे जितके भरघोस पीक आले त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात भावनेवर शास्त्रशुद्ध अभ्यास केले गेले.त्यापैकी सर्वांत अधिक प्रभावशाली आहे मेंदू कसा कार्य करतो याचा उलगडा.मेंदू प्रतिमा
सारख्या नूतन तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले.आतापर्यंतच्या इतिहासात जे गूढतेच्या आवरणाआड दडले होते ते त्यावरील आवरण दूर होऊन ते दृष्टीला पडले. आपण भावना अनुभवतो,विचार आणि कल्पना करतो,स्वप्न पाहतो तेव्हा समजायला अवघड असलेला हा मेंदू नावाचा मज्जापेशींचा गोळा नेमके कसे कार्य करतो हे कळू लागले.मेंदूबद्दल या जैवमज्जाविषयक ज्ञानाच्या महापुरामुळे आपल्यात्ता कधी नव्हे इतके स्पष्टपणे समजून घेता आले की,मेंदूतील भावनेशी निगडित केंद्र रागाला कशी चालना देतात किंवा अश्रू कसे निर्माण करतात.मेंदूतील अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले भाग आपल्याला युद्ध किंवा प्रेम करायला कसे उद्दीपित करतात आणि हे सगळे भाग चांगल्या वा वाईट परिणामांसाठी परस्परांशी कसे जोडलेले आहेत.भावनांचे कार्य आणि त्यांच्या अपयशाविषयी मिळालेला या अभूतपूर्व स्पष्टतेमुळे आपत्त्या सामूहिक-भावनिक आणीबाणीवर नवनवे उपाय नजरेच्या टप्प्यात येऊ लागते आहेत. हे पुस्तक लिहिण्यासाठी मला शास्त्रीय माहितीच्या साठ्याच्या या पिकाची पूर्णपणे कापणी होईपर्यंत वाट पाहावी लागली.या पुस्तकातील मर्म इतक्या उशिराने प्राप्त होण्याचे कारण म्हणजे मानसिक जीवनातील भावनेच्या स्थानाकडे लक्ष देण्यात संशोधकांनी आश्चर्य वाटावे इतके दुर्लक्ष केले.
उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..