* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: पर्यावरणरक्षक - फार्टी मोवॅट Environmentalist-Farty Mowat

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२५/३/२४

पर्यावरणरक्षक - फार्टी मोवॅट Environmentalist-Farty Mowat

एखाद्या लेखकाने निसर्गप्रेमापोटी केलेल्या लेखनामुळे राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये बदल केले जाण्याचं उदाहरण विरळाच. कॅनडाच्या फार्ली मोवॅट या अवलियाने ते केलं. अमेरिकेसारख्या महासत्तेलाही अंगावर घेणाऱ्या या भटक्या लेखकाचा हा प्रवास.


काही वर्षांपूर्वी,म्हणजे १९७५-७६ च्या सुमारास जगदीश गोडबोले या माझ्या मित्राने मला विचारलं,"तू एवढं वाचतोस,फार्ली मोवॅटचं काही वाचलंयस का?"


"नेव्हर क्राय वुल्फ." मी पटकन सांगितलं.


"दे टाळी ! मीही ते नुकतंच वाचलं.काय लेखक आहे रे!" जगदीश म्हणाला.


पुढे मी नागपूरला असताना मला बर्डीच्या पदपथावरच्या पुस्तकांच्या बाजारात मोवॅटची आणखी पुस्तकं मिळत गेली.त्यामुळे माझं मोवॅट प्रेम आणि जगदीशशी मैत्री अधिक पक्की होत गेली.पुढे जगदीशने 'नेव्हर क्राय वुल्फ'

चा अनुवाद केला-'लांडगा आला रे आला'.हा अनुवाद खूपच चांगला आहे.मात्र,मोवॅटच्या असंख्य पुस्तकांपैकी फक्त दोनच पुस्तकं मराठीत आली.दुसरं पुस्तक म्हणजे 'हरिण पारधी' (पीपल ऑफ द डिअर) आता तर तीही उपलब्ध नाहीत.फार्ली मोवॅट हा माझ्या आवडत्या तीन भटक्यांपैकी एक.सर रिचर्ड बर्टन आणि सर टी. एच. लॉरेन्स ऊर्फ लॉरेन्स ऑफ अरेबिया हे उरलेले दोघं.या सर्व मंडळींचं आयुष्य अफलातूनच होतं.या तिघांच्या भटक्या वृत्तीचं मूळ त्यांच्या बालपणात सापडतं.त्यांच्यात आणखी एक गुणसाधर्म्य होतं,ते म्हणजे त्यांचा पारदर्शी प्रामाणिकपणा.काही लोकांच्या पायावर चक्र असतं,असं म्हणायची आपल्याकडे जुनी पद्धत आहे.ही माणसं आयुष्यात कधीच एका ठिकाणी स्थिरावत नाहीत.सतत भ्रमंती हेच त्यांच्या आयुष्याचं सूत्र असतं.मोवॅटचं तसंच असावं. मात्र,ही भटकंती त्याने सत्कारणी लावली. लांडगे,देवमासे,इन्युइट (एस्किमो लोक), रेनडिअर,घुबडं,

सील अशा अनेकांच्यावर सतत होणाऱ्या अन्यायाला त्याने वाचा फोडली. कॅनडात इन्युइट जमातीला स्वायत्तता मिळाली त्यामागे मोवॅटच्या लिखाणाचा हातभार होता.अमेरिकेत लांडग्यांच्या शिकारीवर बंदी आली आणि काही राज्यांत लांडग्यांचं पुनर्वसन करण्याच्या योजना आखल्या गेल्या त्यालाही मोवॅटचं लेखन कारणीभूत होतं.इतकं,की रोनाल्ड रीगन यांनी त्याला अमेरिकेचा शत्रू असं संबोधून त्याच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घातली.निसर्गविषयक अनेक प्रश्नांवर आणि अनेक भटक्या जमातींवर त्याने लिहिलं होतं.हे पुस्तकी ज्ञान नव्हतं.'नेव्हर क्राय वुल्फ' लिहिण्याआधी तो लांडग्यांच्या टोळीचा मागोवा घेत काही वर्षं लांडगे-अभ्यासकांबरोबर फिरला होता.'ए व्हेल फॉर द किलिंग' लिहिण्यापूर्वी दोन-तीन वर्ष देवमाशांच्या शिकारी ताफ्याबरोबर त्या-त्या मोसमात राहून त्याने त्या शिकारीतलं क्रौर्य शब्दबद्ध केलं होतं.'इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन'ने त्याचा शब्द प्रमाण मानला आणि पुराव्यात त्याची दखल घेतली. त्यानंतर बऱ्याच देशांनी देवमाशांच्या शिकारीवर बंदी घालण्याच्या करारावर सह्या केल्या.केसाळ कातड्यासाठी सीलची आणि सुळ्यांसाठी वॉलरसची जी हत्या केली जाते त्यातली अमानुषता मोवॅटने 'सी ऑफ स्लॉटर'मधून जगापुढे आणली.


त्यानंतर निसर्गसंरक्षक संस्थांनी या क्रूर कत्तलीची दखल घेतली.'पीपल ऑफ द डिअर'मधून टुंड्रामधल्या रेनडिअर पालन करणाऱ्यांचं जीवन त्याने जगापुढे आणलं. त्यासाठी दोन-तीन वर्षं तो त्यांच्यासह त्यांच्या आयुष्याशी एकजीव झाला.प्रत्येक पुस्तक लिहिण्यापूर्वी त्याने त्या-त्या विषयाचा आणि प्रश्नांचा सखोल अभ्यास केला होता.त्याचं सर्व आयुष्य असं भटकण्यातच गेलं.

त्याच्या सर्वच पुस्तकांतून त्याच्या या भटक्या वृत्तीचं दर्शन आपल्याला घडतं.फार्ली मोवॅटची खुसखुशीत लेखनशैली,

स्वतःची फजिती सांगतानाचा मोकळेपणा आणि सर्वसाधारण माणूस जायला धजणार नाही अशा ठिकाणी जाऊन तिथल्या जनसामान्यांमध्ये मिसळण्याची हातोटी,

या गोष्टींमुळे खरं तर मी त्याच्या लेखनाच्या प्रेमात पडलो.

त्याच्या सर्वच पुस्तकांचा आणि सर्व भटकंतीचा एका लेखात आढावा घेणं शक्य नाही.मुख्य म्हणजे प्रयत्न करूनही त्याची बरीच पुस्तकं मिळू शकली नाहीत.पण त्याच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांतून त्याच्या बालपणाचा वेध घेण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे.'बॉर्न नेकेड' आणि 'माय फादर्स सन' ही ती दोन पुस्तकं.ज्यांना शक्य असेल त्यांनी फार्ली मोवॅटची मूळ पुस्तकं मिळवून वाचावीत. माझ्याप्रमाणेच तेही मोवॅटच्या प्रेमात पडतील याची मला खात्री वाटते.आपण 'बॉर्न नेकेड' पासून सुरुवात करू.या पुस्तकाची सुरुवात त्याच्या वडिलांच्या (अँगस मोवॅट) पहिल्या विमानप्रवासाने होते.१९५० सालचा ऑगस्ट महिना.स्वच्छ,निरभ्र,निळं आकाश.अँगस टोरंटोहून माँट्रिअलला निघाला आहे.


विमान लेक ऑटारिओच्या उत्तर किनाऱ्यावरून चाललंय,

ते काही फार उंचावरून चाललेलं नाही.अँगस हा उत्साहाने खदखदणारा गृहस्थ.तो अगदी छोट्याशा कारणानेही झटकन उत्तेजित होत असे.हा तर त्याचा पहिला विमानप्रवास.विमान त्या सरोवराच्या ज्या भागावरून उडत होतं,तो अंगसच्या परिचयाचा भूभाग होता.एका छोट्या पडावातून त्या पाण्यावर भटकत त्याचं सारं आयुष्य खर्च झालं होतं.विमानाच्या गोल खिडकीतून आपली कर्मभूमी बघताना त्याच्या उत्साहाला अनावर भरती आलेली होती;आपलं तरुणपण त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहत होतं.एका क्षणी मरे कालव्याच्या मुखाशी विमान आलं.अँगसला विमानाच्या खिडकीतून हे दृश्य पाहताना भावना अनावर झाल्या.त्याला काय झालं,

हे पाहायला आलेल्या एअर होस्टेसला त्याने मनगटाला धरून जवळ खेचली आणि खिडकीजवळ ढकललं.त्या हवाईसुंदरीला वाटलं,हा कुणी बहकलेला प्रवासी आहे."मी आत्ता ड्यूटीवर आहे.माँट्रिअलला माझी ड्यूटी संपते." तिने अँगसला सांगितलं."खाली बघ ! डॅम इट! त्या खाडीत ते एक छोटं बेट दिसतंय ना,त्याचं नाव इंडियन आयलंड.

तीस वर्षांपूर्वी माझ्या मुलाचा,फार्लीचा जन्म व्हायला या बेटाच्या आडोशाला झालेली घटना कारणीभूत ठरली.

एका छोट्या हिरव्या सुंदर कॅनोत ते घडलं बरं!" ते ऐकून त्या हवाईसुंदरीने आपला हात अँगसच्या पकडीतून सोडवून घेतला.श्वास घेत ती स्थिरावली आणि म्हणाली, 'अभिनंदन ! तुमचं कृत्य असामान्यच म्हणावं लागेल, मग त्या कॅनोचा रंग कुठला का असेना!" अशा बापाच्या पोटी फार्लीचा जन्म झाला.ते १९२१ हे वर्ष होतं.पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं.युरोपचा फार मोठा भूभाग उद्ध्वस्त झाला होता.कोटी दीड कोटी लोक मृत्युमुखी पडले होते;तेवढेच जखमी आणि अपंग झाले होते.त्यात ऐंशी हजार कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता.हे विषारी वायूने तरी मारले गेले होते किंवा यातले बरेच अटलांटिकमध्ये बुडून मेले होते.दोन लक्ष कॅनेडियन अपंग बनले होते.या जखमींमध्ये अँगस मोवॅटचाही समावेश होता.या युद्धाच्या मानसिक आणि शारीरिक परिणामांचा अँगसच्या आणि मोवॅट कुटुंबाच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झाला होता.हे मोवॅट कुटुंब मालदार होतं.त्यातले पुरुष महत्त्वाकांक्षी होते.फार्लीचे पणजोबा त्या काळातले धर्मशास्त्राचे नामवंत प्राध्यापक होते. त्यांचे बंधू नामवंत वकील होते.सर ऑलिव्हर मोवॅट ऑटारिओचे पुढे पंतप्रधान झालेच,पण त्यांनी कॅनडातील सर्व घटकराज्यं एकत्रित करून कॅनेडियन संघराज्य स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता.त्यामुळे फार्लीच्या आजोबांकडून बऱ्याच अपेक्षा ठेवण्यात आल्या होत्या.त्यांना गिल म्हणत.मोवॅट कुटुंबात गिल ही व्यक्ती काहीशी वेगळी आणि मोवॅट कुटुंबाच्या दृष्टीने अकर्तृत्ववान ठरली होती.


गिल कवी होता.त्याला भटकंतीची आवड होती. छोटा पडाव वल्हवत निवांत,निर्मनुष्य ठिकाणी जावं,निसर्गात रममाण व्हावं आणि कविता कराव्यात,या गोष्टी त्याला आवडत होत्या. घरंदाज श्रीमंतीमुळे आपण उपजीविके-

साठी काही करावं असं त्याला बहुधा वाटत नसावं.गिल देखणा होता.घराणं मोठं होतं.त्यामुळे त्याचं लग्न मेरी जोन्सशी सहजच झालं.आधीच अबोल असलेली मेरी लग्नानंतर नवऱ्याच्य वागण्याने अधिकच अबोल बनली.

मोवॅट घराण्याच्या वेगवेगळ्या व्यवसायांत अपयशी ठरल्यानंतर जोन्स मंडळींनी या जावयाला सुधारायचा प्रयत्न केला.तिथेही गिलचा जम बसला नाही.तेव्हा साधारण हजार लोकवस्तीच्या ट्रॅटन या खेड्यात घर बांधून तिथे या जोडप्याची रवानगी करण्यात आली.तिथे गिलला 'ट्रेंटन हार्डवेअर स्टोअर' काढून देण्यात आलं.

तेही त्याला नीट चालवता आलं नाही.हा वारसा पुढे अँगसने चालवला. कॅनो आणि लेक ओंटारिओचा उत्तर किनारा हे त्याचे आवडते होते.तसंच तो उत्तर ओंटारिओच्या जंगल भागात 'फायर रेंजर' म्हणून हिंडत असे.१९१४ साली तो सैन्यात भरती झाला.जखमी झाला.१९१८ साली सैन्यातून मुक्ती मिळाल्यावर तो त्याच्या मनात भरलेल्या एका मुलीला आपलीशी करण्याची धडपड करू लागला.तिचं नाव हेलन थॉम्सन.गिल मोवॅटच्या मुलाला मुलगी देणं म्हणजे तिच्या गळ्यात धोंडा बांधून विहिरीत ढकलणं.थॉम्सन मंडळी त्याला तयार नव्हती.अँगसच्या सुदैवाने या काळातच थॉम्सन मंडळी आर्थिक संकटात सापडली.तर युद्धात अनेक शौर्यपदकं मिळवलेला अँगस तेव्हा 'वॉर हीरो' बनून हिंडत होता.तेव्हा थॉम्सननी 'मुलगी खपतेय ना' असा विचार करून अँगसला होकार दिला.युद्धात हात निकामी झाल्यामुळे अँगसची वनखात्यातली नोकरी पुढे चालू राहणं शक्यच नव्हतं.त्याचा हात फक्त देखाव्यापुरताच उरला होता.त्याने तो कुठलंही काम करू शकत नसे. पुढे काही वर्षांनी त्यात थोडासा जीव आला. त्याने काही काळ आईच्या माहेरच्या व्यवसायात कारकून म्हणून नोकरी केली;पण त्यात मन रमलं नाही तेव्हा तो ट्रॅटनला परतला.त्या वेळी फार्ली जन्माला आला. १२ मे १९२१ हा तो दिवस.अँगसजवळ पैसे मिळवण्याचं कौशल्यही नव्हतं आणि कोणतं साधनही नव्हतं,मात्र त्याला खूप मित्र होते.लिली फ्रेझर हा अब्जाधीश त्या मित्रांपैकी एक.त्याने त्याचं गावाबाहेरचं एक ओसाड पडकं घर 'हवे तितके दिवस राहा' म्हणून अंगसला दिलं.इथे हेलनला तिचा संसार थाटता आला.फार्लीचं बालपणही इथेच गेलं. 


अँगसने आपल्या मुलाच्या जन्माचं वर्णन लिहून ठेवलंय -'हा मुलगा कायम अस्वस्थ असे. आईच्या पोटात राहणंही त्याला फारसं मान्य नसावं.

हॉस्पिटलच्या वाटेवर टॅक्सीतच त्याने जग पाहायचं ठरवलं.हेलनने त्याला थोपवलं. रूग्णालयात जेमतेम पोहोचलो.डॉक्टर येईपर्यंत काही त्याला धीर धरवला नाही.डॉक्टर आले. त्यांनी बाळ बघितलं आणि 'चांगला आहे' असं म्हणून नर्सला मुलाची काळजी घ्यायला सांगून ते गेले.' फार्ली आईच्या वळणावर गेला होता.शाळेतली दांडगी मुलं त्याला त्रास देत.त्याला 'फार्टली' (पाद्रा) अशी हाक मारली जात असे.यामुळे तो फारसा कुणात मिसळत नसे.नदीच्या काठी जाऊन पाणपक्षी बघत बसणं किंवा बीव्हर झाडं कुरतडून कशी पाडतात हे बघण्यात त्याला जास्त आनंद मिळत असे.

वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजावरून तो पक्षी ओळखू शकत होता. लौकरच शाळेत 'प्राण्यांची भाषा जाणणारा मुलगा' अशी त्याची कीर्ती पसरली.त्याचा प्राणिसंग्रहही वाढू लागला.'मट' हा त्याचा कुत्रा (यावर 'द डॉग देंट वुड नॉट बी' हे पुस्तकच त्याने लिहिलं),'कोल' नावाचं श्रुंगी घुबड,अनेक पांढरे उंदीर,काही साप,एक काळी खार,एक सागरी पाणमांजर आणि इतरही काही प्राणी त्याच्याबरोबर बागडत असत.तो जिवंत प्राणीच गोळा करायचा असंही नाही.


जंगलात मृतावस्थेत सापडलेले काही प्राणीही तो गोळा करून आणत असे.एकदा त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना त्याने एका सुतार पक्ष्याचं शवविच्छेदन करून त्यातून खाण्यायोग्य अवयव जेवताजेवताच काढून दिले.पाहुण्यांनी ते खाल्ले नाहीत,पण 'अँगसच्या पोराचा एक स्क्रू ढिला आहे' अशी कीर्ती त्यामुळे पसरली,हे निश्चित.


बऱ्याच जलाशयांच्या किनारी,जिथे ओढे-नाले येऊन जलाशयांना मिळतात तिथे,तसंच काही ठिकाणी जलाशयाचं पाणी जमिनीत आत घुसतं अशा ठिकाणी बऱ्यापैकी आडोसा असतो,दाट झाडी असते.याला 'कोव्ह' असं म्हणतात.पूर्वी चाचे अशा ठिकाणी लपत.पुढे जेव्हा अमेरिकेत दारूबंदी झाली तेव्हा अशा ठिकाणी हातभट्ट्या लावल्या गेल्या.कॅनडातून अमेरिकेत चोरट्या मार्गाने दारू पाठवून अनेकजण श्रीमंत झाले.ती झाली पुढची गोष्ट.पण फार्ली त्याच्या कॅनोतून अशा अनेक ठिकाणी एकांत शोधायचा,तिथले पशुपक्षी न्याहाळत बसायचा आणि कल्पनेच्या राज्यात रममाण व्हायचा.गुप्त खजिना शोधणं, चाचे जमवून साहसं करणं किंवा शूरवीर बनून चाच्यांच्या तावडीतून ओलीस ठेवलेल्या निरपराध नागरिकांची सुटका करणं यात त्याचा वेळ बरा जायचा.

शिवाय खेकडे,बेडूक, पाणपक्ष्यांची अंडी,साप अशा नानाविध वस्तूंचा खजिनाही त्याला गोळा करता यायचा.

यात मट त्याला साथ द्यायचा.मट स्वतःला कुत्रा न समजता माणूस समजतो याबद्दल फार्लीची खात्री पटलेली होती.वयाच्या पाचव्या वर्षी फार्ली 'स्किफ' प्रकारच्या छोट्या होड्या एकट्यानेच वल्हवत जलप्रवास करू लागला.त्यामुळे त्याला हळूहळू 'इंडियन आयलँड' च्या किनाऱ्यावरील सर्व छोट्या-मोठ्या लपण्याच्या जागांची माहिती झाली.या इंडियन आयलंडचा फार्टीचा प्रवास सुरू झाला,की त्याच्या आईचा जीव कासावीस व्हायचा;तर अंँगस आपल्या मुलाचं कौतुक करत किनाऱ्यावरून त्याला प्रोत्साहन द्यायचा,या बेटावर अठराव्या शतकात इरॉक्वा इंडियनांनी गोऱ्या व्यापाऱ्यांच्या तांड्याची कत्तल केलेली होती.त्यामुळे त्या बेटाला 'मॅसॅकर आयलंड' हे नाव मिळालं होतं. इथे बऱ्याचदा किनाऱ्यावर हाडं,जुनी हत्यारं आणि इतरही वस्तू मिळत.शिवाय एखादा मोठा दगड पायाने उलथला की त्याखाली शेवंडं (लॉब्स्टर),खेकडे नाहीतर पाणसर्प नक्कीच असायचे.फार्लीने इथे अनेक वेळा कल्पनेतले इंडियन हल्ले परतवून लावले होते.त्याची एक आवडती काठी आणि वल्ही कधी तलवार तर कधी बंदुका बनत असत.या इंडियन (हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन )आयलंडवरील साहसांचा दारूबंदीदरम्यान ऐकलेल्या आणि बघितलेल्या कहाण्यांशी मेळ घालून फार्लीने पुढे 'द ब्लॅक जोक' नावाची कादंबरी लिहिली.ती अमाप लोकप्रिय झाली. फ्रेंच नौदलातील जोनाथन स्पेन्स या नौसैनिकाची ही साहसपूर्ण गाथा खूप झपाट्याने खपली.या कादंबरीचं इंग्रजी बालवाङ्‌मयात एक अनोखं स्थान आहे.युरोपातील अनेक भाषांत या कादंबरीची भाषांतरं झाली;पण ही खूप पुढची गोष्ट.

लहानपणाच्या भटकंतीप्रमाणेच फार्लीच्या लेखनावर परिणाम करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे दुसऱ्या महायुद्धातील त्याची लष्करी सेवा.'माय फादर्स सन- मेमॉयर्स ऑफ वॉर अँड पीस' हे त्याच्या युद्धातील अनुभवांचं पुस्तक.काहीशा विनोदी आणि बऱ्याच गांभीर्याने लिहिलेलं एका संवेदनशील तरुणाच्या अनुभवांचं हे पुस्तक आहे.वयाच्या अठराव्या वर्षी फार्ली रॉयल कॅनेडियन आर्मीत भरती झाला.दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं.अमेरिका अजून युद्धात उतरली नव्हती.

ब्रिटिशांनी फ्रान्ससह दुसऱ्या महायुद्धात भाग घेताना सर्व वसाहतींनाही युद्धात खेचलं होतं.फार्लीला ही देशोदेशी भटकायची संधी वाटत होती.त्याचं कारण युद्धातील शौर्यकथाच त्याने ऐकल्या होत्या.अँगस अशा कथा रंगवून सांगण्यात कसलीही कसर सोडत नसे.त्यामुळे फार्लीला आपणही युद्धात जाऊन पराक्रम गाजवावा असं वाटणं साहजिकच होतं.पहिल्या महायुद्धात लढलेल्या अँगसच्या दृष्टीने त्याच्या मुलासाठी ही एक फार मोठी संधी होती.

आपल्या मुलाने युद्धात खूप पराक्रम करून नाव कमवावं असं त्याला वाटत होतं.म्हणून त्याने फार्लीला सैन्यात भरती व्हायला प्रोत्साहित केलं होतं.युद्धातील अनेक घटनांची वर्णनं वेगवेगळ्या सैन्याधिकाऱ्यांनी वेळोवेळी लिहून ठेवली आहेत; पण युद्धात होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबद्दल लिहिणारा,मला वाटतं,

फार्ली मोवॅट हा एकमेव सैनिक असावा.


राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..!