* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जून 2024

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२९/६/२४

गब्बरसिंगची जोडीदार - Spouse of Gabbar Singh

▶ राजा बिबट्या नव्या पिंजऱ्यात स्थिरावल्यावर त्याचा जुना पिंजरा रिकामा होता.गब्बरसिंगला छानसं घर मिळालं. पकडताना आम्हाला हुलकावणी देणारा गब्बरसिंग पार्कमध्ये आल्यावरही थोड्या नाखुषीनेच रुळला.गब्बर बुद्धिमान तर होताच,पण रुबाबदारही होता.एखाद्या कसलेल्या व्यायामपटूसारखे त्याचे स्नायू मजबूत होते.नजर शोधक आणि भेदक होती.त्याचा सगळा थाट एखाद्या राजपुत्राला शोभेल असा होता.त्याच्या आवडीही अगदी उच्चभ्रू होत्या.काजू,बदाम,

केळी,सफरचंदं आणि उकडलेलं अंडं असा त्याचा रोजचा खुराक होता.आमच्याकडे हिसस जातीचं दुसरं माकड नसल्यामुळे त्याला एकट्यालाच ठेवणं भाग होतं.हे माकड मंकी हिलवर इतर भाईबंदांसोबत राहू शकेल अशी शक्यता नव्हती.त्यामुळे एक तर त्याला त्याच्या अधिवासात सोडणं आवश्यक होतं,किंवा त्याला जोडीदार शोधणं तरी.('सोयरे वनचरे',अनिल खैर,प्रकाशक-समकालीन प्रकाशन पुणे)


त्यानंतर थोड्याच दिवसांतली गोष्ट.हिंजवडी परिसरात सॉफ्टवेअर कंपन्यांच्या बांधकामं सुरू होती.तिथल्या एका बांधकामावर कासारवाडीच्या झोपडपट्टीतील एक बाई काम करत होती.एके दिवशी दुपारी झाडाखाली बसून जेवण करत असताना त्या झाडावरून लाल तोंडाचं एक माकड तिच्या पुढ्यात येऊन उभं राहिलं.बहुतेक उपाशी असावं.बाईने त्याला थोडी भाकरी दिली. त्याने ती अधाशासारखी खाल्ली.थोडं बेसनही चाखलं.पाणी प्यायलं आणि मुकाट झाडावर जाऊन बसलं.दिवस संपल्यावर त्या मावशी इतर बायकांसोबत लगबगीने बसस्टॉपकडे निघाल्या.हे माकड झाडावरून उतरून त्यांच्यासोबत चालू लागलं.बाई आणि त्यांच्या मैत्रिणीने त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला;पण ते अगदी केविलवाणा चेहरा करून त्या बाईंकडे पाहत राहिलं. बाईंनाही दया आली.त्यांनी माकडाला कडेवर घेतलं आणि त्या चालू लागल्या.पण बस कंडक्टरने मात्र त्या माकडाला आत घ्यायला साफ नकार दिला.हे माकड काही बाईच्या खांद्यावरून उतरेना.

शेवटी बाई चालतच निघाल्या,वाटेत एका सिक्स सीटरवाल्याला त्यांची दया आली.त्याने या बाईंना माकडासहित घरी पोहोचवलं. बाईंच्या कुटुंबाबरोबर या माकडालाही जेवण मिळालं,सारेजण झोपल्यावर हे माकड छताच्या पत्र्यावर जाऊन झोपून गेलं.


दुसऱ्या दिवशी सकाळी वस्तीतल्या कुणी तरी आम्हाला कॉल केला,गाडी घेऊन आम्ही कासारवाडी गाठली,तेव्हाही ते माकड पत्र्यावरच बसून होतं.

सुंदर,गुबगुबीत देखणी हिसस मादी होती ती.बाईंच्या मदतीने तिला खाणं दाखवून घरात घेतली.दार लावून मोठ्या रिंग स्टिकमध्ये पकडली,तिला पकडलं आणि गाडीत टाकून निघालो,तर बाईंचे डोळे पाण्याने डबडबलेले.एवढ्याशा काळात त्यांना या माकडिणीचा केवढा लळा लागला होता! मी त्यांना समजावलं.म्हटलं, "अजिबात काळजी करू नका.आम्ही छान बडदास्त राखू तुमच्या गंगूबाईची." तोंडात एक नाव आलं,ते मी म्हणून गेलो.पुढे तेच तिचं नाव पडलं.असा रीतीने आमच्या गब्बरला जोडीदार मिळाली.


गंगूबाईला पहिल्या दिवशी गब्बरसिंगच्या पिंजऱ्यातल्या ट्रॅपिंग सेक्शनमध्ये ठेवलं. दोघांना एकत्र ठेवता येईल का याचा मला अंदाज घ्यायचा होता.दोघांची प्रतिक्रिया काय होते ते बघायचं होतं.दोघांनीही एकमेकांना काही विरोध दर्शवला नाही. उलट,त्यांच्यात काही मूकसंवाद झाला असावा.कारण दोन दिवसांनी मी गंगूबाईला गब्बरच्या पिंजऱ्यात सोडलं तेव्हा वाट बघत असल्यासारखे ते एकमेकांशी खेळू लागले. रात्री नऊ वाजता मी राऊंडला आलो,तेव्हा बॅटरीचा झोत टाकून हे दोघं कुठे आहेत ते पाहू लागलो,तर दोघं एकमेकांच्या मिठीत विसावलेले! मी झटकन बॅटरी बंद केली आणि सॉरी म्हणून तिथून पसार झालो.


गंगूबाईसुद्धा तरुण आणि देखणी माकडीण होती.तिचे डोळे खूपच बोलके होते.तिला काय हवं-काय नको ते आम्हाला तिच्या डोळ्यांमधले भावच सांगायचे.स्वभावाने ती चांगलीच अल्लड होती.

आम्ही तिला मोठ्या प्रेमाने खायला दिलेला एखादा नवा पदार्थ आवडला नाही तर ती सरळ पिंजऱ्याबाहेर फेकून द्यायची.


एकदा गंमत झाली.अधूनमधून पार्कमध्ये चक्कर टाकणारं मांजराचं एक पिल्लू कुठून भरकटत त्यांच्या पिंजऱ्याजवळ गेलं.म्याव म्याव करत थेट आतच शिरलं.बाहेरच्या लोकांना वाटलं,आता मांजराचं काही खरं नाही;पण झालं उलटंच,गंगूबाई हलकेच पुढे सरकली.मोठ्या मायेने तिने मांजराचं पिल्लू छातीशी धरलं,कुरवाळलं,पापे घेतले.या अति प्रेमाने पिल्लू गांगरलं.थोडा वेळ प्रेक्षकांची करमणूक झाली;

पण बराच वेळ झाला तरी गंगूबाई त्या पिल्लाला सोडेना तेव्हा मात्र आम्हाला काळजी वाटू लागली.

पिल्लू अस्वस्थ झालं,सुटायचा प्रयत्न करू लागलं. गुदमरतं की काय असं वाटू लागलं तरी हिची 'माया माया' चालूच ! शेवटी आम्ही चुचकारून,खाण्याचं आमिष दाखवून तिच्या हातून ते पिल्लू काढून घेतलं.दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याची एकदाची सुटका केली.ते पिल्लू नंतर त्या पिंजऱ्याच्या जवळपासही कधी फिरकलं नाही.


वर्षभरामध्ये गंगूबाईला स्वतःचंच पिल्लू मिळालं.तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.इवलेसे डोळे आणि अंगावरची सोनेरी लव यामुळे आम्ही त्याचं नाव ठेवलं - सोन्या. पार्कमधल्या आम्हा सगळ्यांना तर आनंद झालात,पण पार्कमध्ये नेहमी येणारे प्रेक्षकही अतिशय खूष होते.एका काकांनी तर आनंदाने सगळ्यांना लाडू वाटले.अगदी थोड्या दिवसांत गब्बरसिंग आणि गंगूबाईंनी लोकांची मनं जिंकली होती,त्याचाच हा पुरावा होता.


काही नोंदी वाचताना वेचलेल्या..


एखादा पदार्थ किंवा धान्य /भाजी खाण्याजोगे करण्यासाठी आपण किती प्रकारच्या प्रक्रिया त्यावर करतो ? बघुया किती आठवतात ते .....


१) खुडून २) निवडून ३) पाखडून ४) चाळून ५) वेचून ६) दळून ७) कांडून ८) मळून ९) भिजवून १०) शिजवून ११) भाजून १२) परतून १३) गाळून १४) धुवून १५) वाळवून १६) आटवून १७) मुरवून १८) तळून १९) लाटून २०) पसरुन २१) वाफवून २२) कुटून २३) वाटून २४) कालवून २५) साठवून २६) खारवून २७) पाकवून २८) ठेचून २९) सोलून ३०) चिरुन ३१) कापून ३२) नासवून ३३) फेटून ३४) ढवळून ३५) उकळून ३६) वळून ३७) थापून ३८) उकडून ३९) उलथवून ४०) तिंबून ४१) मिसळून ४२) घुसळून ४३) चोचवून ४४) कातरून ४५) फोडून ४६) पाडून ४७) ओतून ४८) काढून ४९) झाकून ५०) खरवडून ५१) विरजून ५२) गुंडाळून ५३) बांधून ५४) टांगून ५५) रांधून ५६) कुस्करुन ५७) चापून ५८ ) पेरून ५९) कोचून ६०) उगाळून ६१) आंबवून ६२) उकडवून ६३) फुंकून ६४) वाफवून ६५) आधण आणून ६६) खोवून ६७) घोळून ६८) रोळून ६९) चेचून ७०) परतून ७१) चुरून ७२) चुरडून ७३) निथळून ७४) हलवून ७५)सारखं करून ७६) भुरभुरून ७७) लावून ७८) भरून ७९) किसून ८०) चिकटवून ८१) मुरडून ८२) फेसून ८३)चिंबवून ८४) बरबटून ८५) पसरून ८६) वेळून ८७) बुडवून ८८) कुस्करून


फक्त मराठी 'भाषे'त मिळणारे खाद्यपदार्थ. 

चापटपोळी,धम्मकलाडू,बोलाची कढी

उतू आणलेली शिळी कढी,बोलाचा भात 

तिंबलेली कणीक,नाकाने सोललेले कांदे 

नाकाला झोंबणाऱ्या मिरच्या

भ्रमाचा भोपळा,पाठीचे धिरडे 

कानामागून येऊन झालेले तिखट 

डोक्यातील कांदे-बटाटे,मनातील मांडे 

डोक्यावर वाटलेल्या मिऱ्या 

हास्याची खसखस,इज्जतीचा फालुदा, 

अक्षतांच्या वाटाण्याची उसळ 

पुराणातील (भरलेली) वांगी

न  शिजणारी डाळ

अंगाचा होणारा तिळपापड 

नावडतीचे अळणी मीठ,

चर्चेचं कडबोळे,अमिषाचं गाजर

पुंगी बनवायचे गाजर

लपवलेल्या भांड्यातील ताक

बाजारातील तुरी

हातावर दिलेल्या तुरी

ताकास लावलेली तूर,पचका वडा

लाडीगोडी लावायचा मस्का (लोणी) 

कोल्ह्याला आंबट असणारी द्राक्षे

कोल्हा राजी असणारी काकडी

स्वतः च्याच पोळीवर वाढलेले तूप

आवळा देऊन काढलेला कोहळा

गोरी होण्यासाठी प्यायची हळद

अकलेचा कांदा,डोक्याचं भजं

डोक्याच दही,रगील दोडका

भ्रमाचा भोपळा... 


एक मजेशीर घटना..


१९०१ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रुझवेल्ट यांनी आपले अधिकृत सल्लागार असणा-या बुकर टी वॉशिंग्टन यांना 'व्हाइट हाउस'वर डिनरला बोलावले. वॉशिंग्टन हे प्रख्यात विचारवंत आणि अभ्यासक.

पण,ते कृष्णवर्णीय.मग काय! 'व्हाइट हाउस'मध्ये 'ब्लॅक' माणूस गेलाच कसा,असा प्रश्न विचारत अमेरिकेतले कडवे गोरे आक्रमक झाले आणि त्यांनी 'व्हाइट हाऊस' धुऊन काढले. त्यानंतर पुढची तीस वर्षे 'व्हाइट हाऊस'कडे कोणी 'ब्लॅक' फिरकू शकला नाही.कोण्या अध्यक्षाची तशी हिंमतही झाली नाही.आणि,हाच तो काळ होता,ज्या काळात

राजर्षी शाहू महाराज आपल्याकडे कोल्हापूर म्युनिसिपालिटीचे चेअरमनपद तत्कालीन 'अस्पृश्य' माणसाकडे देत होते.अस्पृश्यांचे अवघे शिक्षण मोफत करत होते.त्यांच्यासाठी वसतिगृहे उभी करत होते. आंतरजातीय लग्नं लावत होते. महिलांसाठी वेगवेगळे कायदे करत, त्यांना माणूसपणाचे सगळे हक्क देत होते. विरोधाची तमा न बाळगता, धर्मसत्तेला आव्हान देत होते. 


एखादा माणूस काळाच्या किती पुढे असावा! 


- संजय आवटे

   

२७/६/२४

घुंगरू एक गोष्ट - A bell thing

मेळघाटच्या जंगलात ठिकठिकाणी वनविश्रामगृहं आहेत.जंगलात दौरा करणाऱ्या वनअधिकाऱ्यांसाठी ती बांधली आहेत.कोलकाझ,तारुबांदा,ढाकणा,

कोकटू,बेलकुंड,रंगूबेली,जारिदा,हातरू,रायपूर आणि माखला अशी त्यांची नावं.बहुतेक विश्रामगृहं नदीकाठी आहेत,तर काही उंच डोंगरावर बांधली आहेत.तिथून आजूबाजूचं सृष्टिसौंदर्य पाहता येतं. 


ही सारी वनविश्रामगृहं गावापासून दूर आहेत.बऱ्याच विश्रामगृहांशी भुताटकी आणि अदृष्टांच्या अ‌द्भुत कथा गुंफल्या आहेत.त्यामुळे एकटा अधिकारी तिथे रात्रीच्या मुक्कामाला राहण्याचं धाडस करत नाही.

तिथे राहिला तरी रात्री त्याला झोप येत नाही.अशाच एका विश्रामगृहातील गोष्ट. 


तिथल्या माझ्या मुक्कामात चौकीदारानं मला सांगितलं,"साब,मध्यरात्रीनंतर इथे नर्तकीच्या पायांतील घुंगरांचा आवाज येऊ लागतो."


मी त्याला विचारलं, "ही नर्तकी कोण?"


तो म्हणाला,"होती एक अशीच.तिचा इथे खून झाला होता.तेव्हापासून रोज मध्यरात्रीनंतर विश्रामगृहात घुंगरांचा आवाज येतो.त्यामुळे रात्री कोणी अधिकारी इथे मुक्कामासाठी थांबत नाहीत.दिवसभराची कामं उरकून ते सायंकाळी इथून दुसरीकडे निघून जातात." ब्रिटिशांच्या काळात बांधलेलं ते विश्रामगृह घनदाट जंगल असलेल्या एका टेकडीवर उभं होतं.उंच जोत्यावर शहाबादी फरशीचा चौफेर रुंद व्हरांडा होता.त्यावर लाल कौलाचं छप्पर. मध्यभागी मोठी खोली.त्या खोलीत मच्छरदाणी लावलेले दोन पलंग.

भिंतीला लागून कमी उंचीची दोन टेबलं.त्याला जोडून असलेल्या एका चौकोनी खोलीत स्नानगृह. समोर पाहिलं की दीडदोनशे एकराचं खुलं रान.त्यात उंच गवत वाढलेलं.त्यातून पसरलेली बोरीची विरळ झाडं.

मध्यभागी कोरकू आदिवासींचा देव.बुजलेली विहीर. विहिरीजवळ एरंडाची दोनतीन झाडं.


ही सारी वैशिष्ट्यं पाहिल्यावर इथे फार वर्षांपूर्वी वसलेलं,नांदतं असलेलं गाव आता ओसाड झालं,याची कल्पना येई. 


विश्रामगृहापासून थोड्या अंतरावर बारमाही वाहणारा ओढा.तिथून घनदाट जंगलाला सुरुवात झालेली.


(निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसारण केंद्र,सीताबर्डी, नागपूर)


माझी संशोधक वृत्ती मला स्वस्थ बसू देत नाही.वाटलं,या अदृष्टाचा अनुभव घ्यावा.


मी चौकीदाराला म्हणालो,"माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही.मी आज रात्री इथेच थांबणार आहे.

माझ्या जेवणाची काळजी करू नकोस.मी बरोबर शिधापेटी आणली आहे.त्याचा उपयोग करून माझं रात्रीचं जेवण कर."सायंकाळ झाली.चौकीदारानं शमादानीवर पितळेचा लॅप ठेवला. 


व्हरांड्यात कंदील ठेवला.त्या अंधुक प्रकाशात बसून मी समोरच्या जंगलाकडे पाहत होतो.इतक्यात रानगव्यांचा एक मोठा कळप जंगलातून ओढ्याकडे जाताना दिसला.तीन-चार सांबरं दोन पायांवर उभी राहून बोरीचा पाला खाताना दिसत होती. गवतात चरता चरता एक भेकर तोंडात चारा घेऊन विश्रामगृहाकडे पाहात होतं.ते ओरडलं तसं कुत्र्याच्या भुंकण्यासारखा आवाज झाल्याचा भास झाला,

म्हणून मी इकडेतिकडे पाहू लागलो.अतिशय वेगानं उड्या मारीत ते जंगलात दिसेनासं झालं.


अंधार वाढू लागला तसा 'चूकऽचूकऽऽचूकऽऽऽ' असा रातवा पक्ष्याचा आवाज ऐकू येऊ लागला.निळ्या आभाळात चांदण्या लुकलुकताना दिसू लागल्या. जिकडेतिकडे विलक्षण शांतता होती.


रात्रीचं जेवण आटोपून मी पलंगावर आडवा झालो.

अजून हिवाळा संपला नव्हता,म्हणून मी चौकीदाराला दारं आणि खिडक्या लावून घेण्यास सांगितलं.उशाजवळच्या टेबलावर एका तांब्यात पाणी ठेवून चौकीदार घरी गेला.त्याचं घर हाकेच्या अंतरावर होतं.घरी तो एकटाच राही.त्याची मुलंबाळं जवळच्या खेड्यात राहत.त्याच्या घरासमोर कंदील अडकवलेला होता.कंदिलाच्या उजेडात त्याचं कुत्रं बसलेलं होतं.मी पलंगावर आडवा झालो खरा;परंतु झोप येत नव्हती.पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला,

परंतु त्यात लक्ष लागत नव्हतं.दिव्याच्या उजेडात मी वर छपराकडे पाहिलं.छपराला लाकडाचं आडं लावलं होतं.छप्पर तसं उंचावर होतं.


बिबट आणि तरस चौकीच्या आजूबाजूला वावरत असल्याची सूचना कुत्रं मधूनमधून भुंकून देई.


मी सूटकेसमधून कमांडर टॉर्च काढला. त्याच्या उजेडात दूरवरचं सहज दिसतं. कित्येकदा त्याचा उपयोग सर्च लाइट म्हणूनही होई.टॉर्च माझ्या उशाजवळच ठेवला.पुन्हा अंथरुणावर पडलो.

वाटलं,ही काळरात्र कधी संपेल?कधी झोप लागे आणि कधी जाग येई,हे माझं मलाच कळेनासं झालं.कित्येकदा मी कुठे आहे,याचाच विसर पडे.मग अंधुक प्रकाशात खोलीभर नजर फिरवल्यावर साऱ्या घटनांची आठवण होई. मी मनात विचार करीत होतो,की ती नर्तिका कशी दिसत असेल? ती सुंदर असणार.अशा अदृष्ट व्यक्ती कधी वृद्ध होत नसतील काय? मला केव्हातरी डोळा लागला.झोपेच्या तंद्रीतच मला घुंगरांचा आवाज ऐकू येत होता.हे सत्य की केवळ आभास? मी अंथरुणात उठून बसलो,तो आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता.त्यात पदलालित्य नव्हतं. म्हणजे नर्तिका धावत जावी आणि एकदम थांबावी,असा तो आवाज होता.


मी घुंगरांच्या आवाजाचा वेध घेत होतो.आवाज जवळजवळ येत होता.नंतर तो व्हरांड्यातून येऊ लागला.उठून दारं आणि खिडक्या नीट लावल्याची खात्री केली.ती येईल तर दारातूनच येईल ना!


आता छपरावरून घुंगरांचा आवाज येत होता.मी टॉर्चचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेने पाडला.एक मुंगूस आढ्यावरून उड्या घेत छपरात दडून बसलेल्या उंदरांचा पाठलाग करीत होतं.त्याच्या गळ्यात घुंगरांचा पट्टा होता.त्याच्या प्रत्येक हालचालींबरोबर घुंगरू वाजत.नंतर मुंगूस उंच असलेल्या व्हेंटिलेटरमधून बाहेर पडलं अन् खरी गोष्ट माझ्या लक्षात आली.


दुसऱ्या दिवशी त्या मुंगसाविषयी चौकशी केल्यानंतर बरीच माहिती कळली.ते मुंगूस चौकीदारानं पाळलं होतं.त्याच्या अस्तित्वाचा सुगावा लागण्याकरिता त्यानं मुंगसाच्या गळ्यात घुंगरांचा पट्टा बांधला होता. विश्रामगृहात माणसांची वर्दळ नसल्यामुळे तिथे रानउंदरांचा सुळसुळाट झाला होता. त्यांना खाण्यासाठी चौकीदार त्या मुंगसाला मध्यरात्रीनंतर सोडून देई.कोणी अधिकारी रात्री मुक्कामाला राहू नये,म्हणून त्यानंच नर्तकीची कथा रचली.मला त्याच्या कल्पनेचं कौतुक वाटलं.


भिकूसाशेट…


साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल.सकाळी साडेसहाची वेळ.मित्राचं पेठेत दुकान आहे.बाबा गावाला जायचे होते म्हणून त्यांना सोडायला, स्टॅन्डवर गेलो होतो.येता येता त्याच्याकडे डोकावलो.आमचा हा मित्र सकाळी सव्वासहाला दुकान उघडतो.दुकान चालतंय कसलं... पळतय.


नीचे दुकान ऊपर मकान.जनरल कम किराणा.

दूध,ब्रेड,बटर,अंडी,केक,बिस्कीटं,घडीच्या पोळ्या घेणारी गिऱ्हाईकं सकाळ पासून गर्दी करायची.


दुकानापाशी पोचलो.दुकानासमोरचा डांबरी रस्ता.तेवढा तुकडा छान झाडून घेतलेला.पायरीपाशी कोपऱ्यात एक स्टीलची रिकामी बादली.मित्रानं पाण्याचा छान सडा घातला होता.पाण्याचा छान ओलेता वास येत होता.

पायरीसमोर वहिनी छान रांगोळी काढत होती.


मी दुकानात शिरलो.पाठोपाठ वहिनी सुद्धा घरात शिरली.पाच दहा मिनटं गप्पा झाल्या.मग बेल वाजली.

दुकानातला पोरगा वर जाऊन चहाचा ट्रे घेऊन आला.बेल वाजणं म्हणजे चहा तयार आहे.घुटक घुटक चहा घेत होतो.एवढ्यात एक माणूस दुकानात शिरला.पांढरा शुभ्र पायजमा.पांढरा बंडीसारखा शर्ट.डोक्यावर गांधी टोपी.


"नमस्कार मालक.कसे आहात ?"

मित्र लगेच उठला.काऊंटरची फळी उघडून त्यांना आत घेतलं.बसायला खुर्ची दिली.पटकन वरची बेल वाजवली.


पाच मिनटात पुन्हा चहा आला.एकंदर बडी आसामी असावी.


"मालक एक विनंती आहे.वहिनी रोज पायरीपुढे रांगोळी काढते.तू देवाला हारफुलं वाहतोस.उदबत्ती लावतोस.प्रसन्न वाटतं.पन तू रोज बादलीभर पाणी मारतो ना रस्त्यावर.ते नको करत जाऊस बाबा.पाणी वाया जाते अशान्.पाण्यामदी जीव असतो.पाणी देव हाये आमच्यासाठी.देवाचा अनमान करू नका माऊली..."


पाच दहा मिनटं गप्पा मारून पाहुणे गेले.

" कोण हे ?" मी विचारलं.

'तू ओळखलं नाहीस ?'

'नाही बुवा.

'भिकूसाशेट चोपडा ज्वेलर्सचे मालक.एकदम सज्जन माणूस.सचोटीनं धंदा करतोय गेली अनेक वर्ष.शून्यातून उभं केलंय सगळं.एम जी रोडवरची मोठी पेढी.

उपनगरातही मोठं दुकान चालू केलंय नुकतंच.घनो चोखो धंदो.पण म्हाताऱ्याला वेड लागलंय.सकाळी सकाळी गावभर हिंडत असतो.कुणी दुकानापुढं सडा घालताना दिसला,की हात जोडून उभा राहतो.पाणी वाया घालवू नका म्हणतो.लोकं तेवढ्यापुरतं ऐकतात..तो पुढं गेला की रस्ते पुन्हा ओले.आपला गाव कसाय तुला माहित्येय.

बहुतेक नळांना तोट्याच नाहीत.पाणी भरून झालं तरी नळ तसेच वाहत असतात.शेकडो लीटर पाणी वाया जातं.


भिकूसाशेठच्या चुलतभावाचं हार्डवेअर शाॅप आहे.शेटच्या हातात एक पिशवी असते.पिशवीत पान्हा आणि तोट्या.वाहतं पाणी दिसलं की हा तिथं जातो.तोटी लावून देतो.स्वखर्चानं.!!मान्य की पाणी वाया जातं.पण दुकानापुढं पाणी मारलं की धूळ खाली बसते.जरा गारवा वाटतो. हे याला कोण सांगणार? बरं,इथं पाणी वाचलं तरी ते तिकडे दुष्काळी भागात कसं पोचेल?

म्हाताऱ्याची सटकलीय,झालं."


मला हे माहितच नव्हतं.मला यात स्टोरीचा वास आला.दुसऱ्या दिवशी सकाळी म्हाताऱ्याला गाठला.तो आणखीन एका दुकानात शिरला होता." सकाळी दुकानापुढे पाणी मारू नका हो."

 

त्याची आर्जवं,त्याची विनवणी.त्याच्या हातातली पिशवी,तोट्या.सगळं रेकाॅर्ड केलं.न्यूज चॅनलला पाठवून दिलं.पेपरमधे छापून आलं.म्हातारा एका रात्रीत फेमस झाला.तरीही बदलला नाही.त्याची रोजची प्रभातफेरी चालूच राहिली.


आताशा दुकानदारांना लाज वाटायला लागली. डांबरी रस्त्यांवरचे ओले सडे जवळजवळ बंद झाले.उघड्या नळाचं वाहतं पाणी बंद झालं.


न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं.त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला.


ढसाढसा रडला म्हातारा.म्हणाला, 

"'मारवाडातलं गाव होतं माझं....पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी.आणि आईबरोबर मीही.एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा.पाण्यात देव दिसायचा.इथली उधळमाधळ बघितली की जीव तुटतो माझा.मला पता आहे, लोक माघारी माझी टिंगल करतात.पन धापैकी एक मानस तरी ऐकतो.माझा काम झाला की मग....!! त्याचा इंटरव्ह्यू ऐकला आणि मला, त्या म्हाताऱ्यातच देव दिसू लागला.


मागच्या महिन्यात गावी गेलो होतो.बऱ्याच वर्षांनी.

पेठेतल्या मित्राच्या दुकानी पोचलो सकाळी सकाळी.


एकदम आठवण झाली.

"त्या भिकूसाशेटचं काय झालं ?"

"पेठेतलं दुकान बंद झालं त्यांचं."

"का बरं?"

"झालं म्हणजे त्यानंच बंद केलं.रिटायरमेंट म्हण ना!! उपनगरातलं चाललंय जोरात.ते दुकान पोरं सांभाळतात.कोटी कोटींची उड्डाणं.म्हाताऱ्यानं त्यातल्या एका पैशालाही हात लावला नाही.डोंगरगावला मोठी टाकी बांधून दिली आईच्या नावानं.बायाबापड्यांचे ऊन्हाळ्यात फार हाल व्हायचे.तिकडं नळाला पाणी आलं,आणि इकडं म्हाताऱ्यानं डोळे मिटले.."


दोन मिनटं कुणीच कुणाशी बोललं नाही.


ग्रेट होता भिकूसाशेट.


मी मनातल्या मनात त्याला हात जोडले...आणि निघालो.


कालचीच गोष्ट.


सोसायटीत एक जण रोज गाडी धूतो.

त्याला गाठला. हात जोडून विनंती केली," रोज नको,आठवड्यातून एकदा धूत जा "


त्यानं ऐकलं.मी खूष.एकदम भिकूसा आठवला.

डोंगरगावचा नळ माझ्या डोळ्यातून ठिबकू लागला.


अनामिक..


२५/६/२४

तो वेगळा दिवस / It's a different day

आज सकाळी विजय गायकवाड सरचा फोन आला.

माझे पप्पा फोन मध्ये बोलू लागले.विजय गायकवाड सर म्हणाले,"पाऊस आहे का?" पप्पा म्हणाले," सकाळपासून सुरू आहे शेतकऱ्यांचे तर नुकसान आहे आता." गायकवाड सर म्हणाले,"शेतकरी देव माणूस आहे. काम करतो सगळे. शेतकऱ्यां इतके कोणीच सहन करत नाही." पप्पा म्हणाले," शेतकऱ्यांचे किती मरण आहे विचार करा.

आजवर सोयाबीन अकरा हजार रुपये विकत होती,

आता पाच हजारावर आली." गायकवाड सर म्हणाले,"हो आज तुम्हाला सर फोन लावतील.नवोदय परीक्षेच्या निकालाबद्दल.आपल्या मुलांचे निकाल आले नाही.

आपली मुलं त्या परीक्षेला बसली हे खूप महत्त्वाचे आहे.

श्री गव्हाणे सरांनी व मॅडमनी खूप कष्ट घेतले."पप्पा म्हणाले,"त्यांनीं यांना ज्ञान जे दिलेले आहे ते कधीही त्यांच्या लक्षात राहणार आहे.आता पास व्हावा की न व्हावा.ते थोडेच आपल्या हातात आहे.इच्छा,आशा सगळ्यांना असते पण तिथं भरपूर मार्क लागतात."

गायकवाड सर म्हणाले," हो बरोबर आहे तुमचं म्हणणं.

दुसरी गोष्ट सर आणि मॅडमने भरपूर कष्ट घेतले आपल्या मुलांनी सुद्धा कष्ट केलेले आहेत.अभ्यास केलेला आहे.

आता काय आहे पहिल्यापेक्षा जास्त अभ्यास करावा लागेल.या परीक्षेला का बसलो होतो कारण आपण  किती अभ्यास करू शकतो,आपल्याला किती अभ्यास करायचा आहे,आपण त्या परीक्षेतून शिकलो.त्याचा आपल्याला परिणाम मिळालाच आहे." पप्पा हो म्हणाले.सर म्हणाले,

"काय नाही यासाठीच फोन लावला होता,काळजी घ्या." सरने फोन ठेवला.


आज आमच्या इथे पित्र होते.थोड्या वेळाने गव्हाणे सरचा फोन आला.सर म्हणाले," ताण घ्यायचा नाही. फ्रेश राहायचं.निकाल केव्हा पाहिलास आता का रात्री?" मी म्हणाले," रात्री" सर म्हणाले," झोपली होती का नव्हती मग?" मी म्हणाले," नाही" .सर म्हणाले," झोपलीच नाही रात्रभर?" मी म्हणाले," नंतर झोपले होते." सर म्हणाले,

"काही ताण घ्यायचा नाही ,मस्तपैकी राहायचं.पप्पाकडं दे." मग मी माझ्या पप्पाकडे फोन दिला.आणि मी 'बाकी वीस रुपयांचं काय' या धड्याचे प्रश्न उत्तर लिहू लागले.

थोड्या वेळाने दुपार झाली.आम्ही दुपारचे जेवण केले.

थोड्या वेळाने मला झोप येऊ लागली.माझ्या पप्पाने माझ्या कपाळाला हात लावला तर मला खूप ताप आली होती.पप्पा ने मला औषध दिली. मी थोड्या वेळ झोपले.

थोड्यावेळाने संध्याकाळ झाली. गव्हाणे सरचा फोन आला.माझे पप्पा थोडा वेळ फोनवर बोलले.थोड्यावेळाने पप्पाने माझ्याकडे फोन दिला गव्हाणे सर म्हणाले," जे झालं ते होऊन गेलं वैशू.मी तुला दोन गोष्टी सांगणार आहे.आपल्या देशाचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचं नाव घेतलं जातं.त्यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो.हे असे माणूस आहेत की जे काम करता करता म्हणजे शेवटपर्यंत देशासाठी झटले,देशासाठीच जगले.शिलॉंग मध्ये एका संशोधनाविषयी लेक्चर देत असताना ते पडले.त्यांना अटॅक आला आणि ते आपल्या सर्वांना सोडून गेले.ए.पी.जे अब्दुल कलाम साहेबांची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत.आता एक गोष्ट तुला सांगतो.ते अतिशय गरीब होते की त्यांच्या गरिबीला अंत नाही.

आपण लय श्रीमंत आहे त्यांच्या पेक्षा.शिक्षणासाठी रोज घरोघरी पेपर टाकायचे.त्यांचं स्वप्न होतं मी पायलट व्हावं.

पायलट म्हणजे वैमानिक.ते परीक्षा पास झाले.वैमानिक होण्याच्या मुलाखतीला ते गेले.पण त्यांना तिथे नोकरी देण्यात आली नाही.तुमची उंची नाही किंवा इतर काही गोष्टींमुळे आम्ही तुम्हाला वैमानिक म्हणून घेऊ शकत नाही.असे त्यांना सांगण्यात गेले.ते म्हणाले "ठीक आहे,तुम्ही माझ्यातील कमतरता सांगितल्या.यासाठी मी तुमचा आभारी आहे." असे ते त्या मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याला म्हणाले.तिथून परत आल्यानंतर पुन्हा मोठ्या जोमाने अभ्यासाला लागले.एवढा अभ्यास केला की,रडार यंत्रणा तयार केली.रडार यंत्रणा काय असते तुला माहिती आहे का?विमान किती उंचावरुन चालवायचं,

कुठून चालवायचं कुठून उडवायचं, कुठे उतरायचं,

विमान कोणत्या ठिकाणी आहे,विमान पुढे जाण्यासाठी इथलं वातावरण योग्य आहे का याचा काही त्रास होईल का.?, काही पक्षी समोर आहेत का…? म्हणजे विमान कसे चालवले पाहिजे.त्याची संपूर्ण माहिती देणारी रडार यंत्रणा देत असते.रडार निर्माण करण्यात अब्दुल कलाम यांचे कष्ट मोलाचे होते...आता मला सांग ते पायलेट झाले असते तर ते किती विमान चालू शकले असते?" मी म्हणाले," एक"  सर म्हणाले," एक विमान चालवलं असतं.पण आता सगळे विमान रडारमुळे चलायलेत.

कारण रडार जर बंद पडलं तर विमानाला काहीच कळत नाही.कुठे उतरायचं कुठे चढायचं,समोर ढग आहेत का...पाखरं आहे का...अजून काय आहे.त्याला काहीच कळत नाही.हेच अब्दुल कलाम होते ज्यांना वैमानिक म्हणून नाकारलं होतं.म्हणजे एक संधी गेली.अरे मी एक विमान चालू शकलो नाही.पण आज माझ्या मुळे हजारो विमान उडत आहेत.असं त्यांना वाटलंच असेल ना…! दुसरी गोष्ट.तुला अभिनेते अमिताभ बच्चन माहिती असतील.अमिताभ बच्चनचे ध्येय होतं की, मी आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो त्या ऑल इंडिया रेडिओ केंद्रात निवेदक म्हणून नोकरी लागावी.ते रेडिओच्या मुलाखतीला गेले.तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ,"सॉरी आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही कारण तुमचा आवाज व्यवस्थित वाटत नाही.." या कारणावरून त्यांना डावलण्यात आले आणि मग ते चित्रपट अभिनयात काम करू लागले.आज तेच अमिताभ बच्चन आहेत की ज्या रेडिओने त्यांना नाकारलं होते त्या रेडिओ व त्यांचे घंटा घंटा कार्यक्रम लागतात." 


आता मॅडम सोबत बोल." मी हो म्हणाले.मॅडम म्हणाल्या," नाराज झाली काय?" मी हो म्हणाले.मॅडम म्हणाल्या," नाराज नाही व्हायचं ,पुन्हा जोमाने तयारीला लागायचं.

तुला माहितीये ना ही परीक्षा आणखीन कधी असते बरं?" मी म्हणाले," आठवीला" मॅडम म्हणाल्या," ही आपली पहिलीच परीक्षा होती.ती परीक्षा इयत्ता पाचवीमध्ये दिली आहे.ती पण पहिली. तुम्ही चांगल्या गुणांनी ऑलरेडी पास आहात बाळांनो.फक्त गुणानुक्रमात आपण इतरांपेक्षा थोडं कमी पडलोत म्हणून काय झालं…? आपण थोडंच त्याच्यामध्ये नापास झालो आहोत.


मी तुम्हाला त्या दिवशी पोलीस भरतीचा पेपर सोडविण्यासाठी पाठवला होता.तो पोलीस भरतीचा पेपर ग्रॅज्युएशन म्हणजे पंधरावीची मुलं देतात.तुमचं वय तरी आहे का १५ वर्ष…? बघा बरं …. तुम्हाला बी. ए .झालेले असतात किंवा एम. ए. झालेले असतात अशा लेकरांचा पेपर सुटलाय.त्या लेकरांना जे येत नाही ते आज तुम्हाला येते. यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही,


आपल्याला आणखीन परीक्षा द्यायच्या आहेत.

काल आम्ही दोघं पण खूप वेळ पर्यंत जागेच होतो.चर्चा करू लागलो. फोन नाही केला.म्हणलं झोपले असतील सगळे" .मी म्हणाले," झोपलोच नाही मॅडम." मॅडम म्हणाल्या," थोडीसी चांगली बातमी असती तर लावला असता.एवढ्या उशिरा पण टेन्शन घ्यायचं नाही.आणखीन अभ्यास करायचा." मी हो म्हणाले.

    

 गव्हाणे सर म्हणाले," प्रिय बाळा, तुझ्या पायात वाळा.मोकळं वाटलं ना.आता एक करायचं. जे येत नाही त्याचा जास्त अभ्यास करायचा.तुम्हाला जे गणित आलं नाही ते सांगत जा.आणि आता एक लक्षात घे तुझा पाचवीपासूनचा प्रत्येक विषय अत्यंत महत्त्वाचा आहे." मॅडम म्हणाल्या," वैष्णवी माहिती आहे का ९० ला पासिंग होतं.आणि मला ८९ मार्क होते.मला कसं वाटलं असेल.तुझ्या सारखंच झालं मला." सर म्हणाले," तू नवोदयला लागली असती तर चांगलंच होतं.पण तशाच दर्जाचे शिक्षण आपण इथे घेऊ.तुला लागेल ती पुस्तके आणून देत जाईल.तुझ्या माहितीसाठी मीही नापास झालो होतो नवोदयला.नवोदयला जर मी पास झालो असतो तर आपली भेट झाली असती का?मला तुझ्यासारखी प्रेमळ,हुशार,अभ्यास करणारी,आज्ञाधारक, विद्यार्थिनी भेटली असती का?तुझी कविता किशोर मासिकात आली तेव्हा तुझं वय नऊ वर्ष होतं.आणि माझी कविता किशोरमध्ये ३५ व्या वर्षी आली.मग तू ग्रेट झाली ना." मग थोडावेळ सर पप्पाला बोलले.थोड्यावेळाने फोन ठेवला.आणि आम्ही झोपलो.सरला बोलून मला मोकळं वाटलं.

            

 ◇वैष्णवी सिद्धार्थ मस्के,वर्ग सहावा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,रायपुर,तालुका सेलू जिल्हा परभणी


माझी अविस्मरणीय डायरी

२८/०९/२०१९ रोजीची..


अशी पाखरे येती..It's like this..


(श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित) 


पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं,तिथे चॉईस नावाचं पुस्तकाचे दुकान आहे.

दुकानाच्या मालकांचे नाव आहे.श्री अजय कटारिया.

बरोबर सहा वर्षांपूर्वी एका स्नेह्यांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली. 


बोलता बोलता ते म्हणाले, 'माझे पुस्तकाचे दुकान आहे, कधी काही लागलं तर या...!'


भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन,त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतेच. 


कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो;तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचे साहित्य मिळेल,हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार-पाच वर्षांपूर्वी प्रथमच,सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली. 


त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आले.


बॉक्स उघडून पाहिला,आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षाही सामान जास्त होते. 


आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या,एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होती, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे २५ होत्या...


मी त्यांना फोन करून म्हणालो, 'कटारिया साहेब,बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे... हि आमची लिस्ट नव्हे ! 


ते हसून म्हणाले, 'असू द्या हो डॉक्टर,अनाथ पोरांना शिकवताय... थोडं इकडे तिकडे चालणारच...  पोरं आहेत... 


घ्या आमच्याकडून डोनेशन समजून...' 


एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली,त्यांनी ती हसत खिशात ठेवली. 


पुढच्या वर्षी म्हणजे साधारण २०२१ ला त्यांना पुन्हा लिस्ट दिली... पुन्हा पाचपट सामान जास्त होते... मी पुन्हा तोच फोन केला... पुन्हा त्यांचे तेच उत्तर आले... एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना पुन्हा पावती दिली... ही पावती हसत त्यांनी पुन्हा खिशात ठेवली...! 


एकावर एक फ्री... हि बिझनेस स्ट्रॅटेजी मी समजू शकतो,पण एकावर पाच फ्री... ??? 


मग २०२२ साल उजाडले... 


यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो.दुकानात भरपूर कर्मचारी आहेत, परंतु माझ्याकडची लिस्ट घेऊन त्यांनी स्वतः सामान बांधायला सुरुवात केली. 


मी बारकाईने पाहत होतो,माझ्या लिस्ट पेक्षा पाचपटीने जास्त गोष्टी ते स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरत होते. 


मी त्यांना म्हणालो साहेब,आपण आपले नुकसान का करून घेता ? माझ्या लिस्ट प्रमाणेच मला सामान द्या...


यावर ते माझ्याकडे न बघता,स्टूल घेऊन, वरच्या कप्प्यातले सामान काढता काढता म्हणाले, 'डॉक्टर भरगच्च भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यांना टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो ...! 


ए त्या चौथा कप्प्यातला,नवीन माल काढ... त्यांचं सगळं लक्ष बॉक्स भरण्याकडे....


तरीही मी माझं बोलणं रेटत म्हणालो, पण हा आपला व्यवसाय आहे साहेब,मला साहित्य देणे म्हणजे आपला तोटा आहे ...! मी आवंढा गिळत म्हणालो. 


तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत ते म्हणाले, 'साहेब धंदा म्हणा,व्यवसाय म्हणा, कारभार म्हणा,कारोबार म्हणा.... जे काही करायचं ते नफ्यासाठी... मी पक्का व्यापारी आहे, तोट्यामध्ये कधीच व्यापार नाही केला मी ... 


'आत्ता बी मी तोट्यामंदी नाहीच,नफ्यामंदीच आहे...' चष्म्या मागून डोळे मिचकावत ते बोलले.मागितलेल्या गोष्टीपेक्षा,पाचपटीने भरलेल्या बॉक्स कडे बघत,'हे कसं काय बुवा ? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता...


माझ्या बावळट चेहऱ्यावर त्यांना तो दिसला असावा... ! 


'छोटू,आपल्याकडच्या दुरेघी वह्या संपल्या का रे?शेजारच्या दुकानातून दहा डझन मागव आणि घाल या बॉक्समध्ये.... !' हात झटकत ते बोलले. 


माझा बावळट चेहरा अजून तसाच असावा. 


नफा तोट्याचा त्यांनी मग उलगडा केला... 


'डॉक्टर तुमी कितीबी नाय म्हणले तरी जास्तीचा सामान पाहून तुम्हाला आनंद होतो का नाही ? तो माझा नफा.... 


दहा पोरं नाही,आता तुम्ही ५० पोरांना सामान देऊ शकता,त्या पोरांना आनंद होतो की नाही...? तो माझा नफा...कटारिया काका कोण ? हे पोरांना कधीच कळणार नाही... पण ५०  पोरं शिकत आहेत,  याचा मला आनंद होणार का नाही ? तोच माझा नफा... 


जलमाला येऊन आपण कोणाच्या उपयोगी नाही पडलो,हा खरा तोटा... ! 


"तोटा" या शब्दावर जोर देत , डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली...! 


आपून तोट्यात धंदाच करत नाही सायेब,पक्का व्यापारी आहे मी ...' काउंटर वरच्या टेबलावर बोटांनी तबला वाजवत ते म्हणाले, 'ए चाय सांगा रे डॉक्टरला...!'  


तोट्याची शेती करून,आनंदाची बाग फुलवत; नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढे मी मनोमन नतमस्तक झालो ! चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो,'सर पण हे नुकसान किती आहे तुमचं, यात विनाकारण खर्च खूप आहे...' ते पुन्हा हसत म्हणाले, 'डॉक्टर पोरगं तुमचं असो,माझं असो किंवा आणखी कोणाचं असो, पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही,पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते.गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा... मंग खर्च झालाच कुठे ? 


आलतू फालतू स्कीम मध्ये अपुन पैसा गुतवतच नाही... सांगितलं ना ? पक्का व्यापारी आहे मी... ! मी खर्च केला नाही सायबा... फक्त गुंतवणूक केली... माझ्या पोरांवर गुंतवणूक केली... बघा भरभक्कम परतावा येणारच... 


"येणारच" म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली...! 


मी भारावून म्हणालो या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात... ? अनाथ कशानं हो... पालक म्हणून तुम्ही आहे...  मी आहे.... काय डॉक्टर तुम्ही सुद्धा...! 


'चहा संपवा तो...' म्हणत, टेबलावर पुन्हा त्यांनी हसत तबला वाजवला... तो तबला होता ? की माझ्या हृदयाची धडधड ? माझं मलाच कळलं नाही...!


शर्टाच्या बाहीला डोळे पुसत कटारिया साहेबांची नजर चुकवत मी बाहेर पडलो !  


सर्व साहित्य घेऊन मी आलो... दहा ऐवजी ५० मुलांना ते वाटले... तरीही कुठेतरी अपराधीपणाची भावना होती. 


भावनेच्या भरात हा "वेडा माणूस" स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे,याची मला मनोमन जाणीव होती. 


याच प्रेमाच्या भावनेतून, २०२३ साली मी यांच्याकडे ऑर्डर दिली नाही,आप्पा बळवंत चौकातील दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली. 


लिस्ट नीट लिहून आणायची,अक्षर तुमचं तुम्हाला तरी कळतंय का ? बाजूला थांबा जरा, बाकीची गिऱ्हाईकं बघू देत ... वेळ किती लागेल म्हणून काय विचारता ?  इतकं एकच काम आहे का ? सामान काय आहे ते आत्ताच मोजून घ्या, पुन्हा कटकट करायची नाही... ए यांना मराठी भाषा कळत नाही, दुसऱ्या भाषेत सांग रे यांना जरा....  असा स्वतःचा पाणउतारा करून घेतला...यानंतर कॅरीबॅगचे सुट्टे पैसे देईपर्यंत आमच्या वस्तूंना त्यांनी आम्हाला हात सुद्धा लावू दिला नाही... ! हरकत नाही... जगात सगळेच कटारिया साहेब जन्माला आले तर मग अनुभव कसा मिळणार ? असो... हा प्रकार पुढे कटारिया साहेबांना कसा कोण जाणे पण कळला. 


एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना ते तावातावाने आले. 


चेहऱ्यावरचा मृदुभाव आणि ओठांवरची मृदू वाणी यावेळी लुप्त झाली होती. 


'डॉक्टर तुम्ही स्वतःला समजता काय ?  सेवा करण्याचा मक्ता काय तुम्हीच घेतला आहात का ?थोडीफार सेवा आम्ही करत होतो,आमच्या हातून हि सेवा काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?' 


सेवा करणे हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.


मी तुम्हाला माफ नाही करणार...


ते रागानं थरथर कापत बोलत होते... 


या जमदग्नीपुढे मी नतमस्तक झालो... पायावर डोकं टेकवलं... आणि त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या झोळीत मनसोक्त भरून घेतला ! 


तुम्हाला ऑर्डर न देण्यामागे माझी पण काय भावना आहे,हे सर्व मी त्यांना उलगडून सांगितले,क्षणात या जमदग्नीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले... ! 


स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलन,

उपोषण,रास्ता रोको करतात... सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी हा माणूस आज माझ्याशी..माझ्याशी  भांडला.!


यानंतर पुढे दोन-तीन वेळा मोघम भेटी झाल्या. 


आता साल उजाडले २०२४. 


यावर्षीची शैक्षणिक ऑर्डर "चॉईस" मध्ये देण्याशिवाय मला दुसरा कोणताही "चॉईस" नव्हता...! 


मी १३ जून २०२४ला कटारिया साहेबांच्या फोनवर फोन केला.पलीकडून आवाज आला हॅलो मी चिराग बोलतोय... ! 


चिराग हे कटारिया साहेबांचे सुपुत्र,चार्टर्ड अकाउंटंट आहेत !  हॅलो चिराग सर,कटारिया साहेब कुठे गेले त्यांना फोन द्या ना..' 


'सर बाबा गेले' पलीकडून मंद आवाज आला. 


आमचा हा माणूस कोणालातरी मदत करण्यासाठी,कोणाच्यातरी पाठी धावतच असतो,सतत फिरत असतो,हे मला माहित होतं. त्याच भावनेने मी बोललो... 


'अच्छा गेले का ?  बरं पुन्हा कधी येतील ?' मी हसत बोललो.


'बाबा गेले सर... परत ते पुन्हा कधीही येणार नाहीत ... तुम्हाला माहित नाही ?'  


माझ्या पायाखालची जमीन सरकली... मी सुन्न झालो... मी काय ऐकतोय यावर माझा विश्वास बसेना...भानावर आलो,तेव्हा मात्र या माणसाची मला भयंकर चीड आली... पलीकडच्या चौकात जाताना सुद्धा घरात आपण सांगून जातो... मग इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साधं आम्हाला सांगण्याची,निरोप घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही ? 


भांडून सेवेचे अधिकार मागता आणि असं बेजबाबदारपणे सोडून जाता ? 


आमच्या पोरांना पोरकं करून जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? 


हे...हे... असं... काउंटरवर तबला वाजवत आम्हाला आशा का दाखवलीत ? 


कटारिया साहेब,आता मी सुध्दा तुम्हाला माफ नाही करणार...! 


'सर काही काम होतं का ?' फोन अजून चालूच होता,पलीकडून चिराग सरांचा आवाज आला. 


'शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती...' मी शांतपणे बोललो. 


'ठीक आहे सर,दोन दिवसात पाठवतो.' तितक्याच शांतपणे उत्तर आले. 


दोन दिवसांनी सामान आले,मी बॉक्स खोलले. 


आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होते, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे २५ होत्या...


मी चिराग सरांना फोन केला,म्हणालो, 'चिराग सर,बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे... हि आमची लिस्ट नव्हे,काहीतरी चूक झाली असावी ! 


चिराग सर म्हणाले, 'सर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे,

आकड्यांच्या खेळात मी चुकत नाही, तुम्ही दिलेले सामान मी अत्यंत काटेकोरपणे मोजून मापून स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरलं आहे, चूक होणार नाही माझी...!' 


'अहो पण, चिराग सर... एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत आम्हाला...' 


'अच्छा... हां... हां.... त्या एक्स्ट्रा वस्तू का ?  त्या मी नाही... बाबांनी पाठवल्या असतील कदाचित सर ...'


फोन कट झाला ...!!! 


इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटून गेला... ! 


कटारिया साहेब चिरंतन प्रवासाला निघून गेले... पण जाताना आपल्या विचारांची एक पणती मागे ठेवून गेले. या पणतीला नाव सुद्धा काय दिलं आहे... ?  चिराग... व्वा...!!! 


यानंतर १५ जून २०२४ ला सर्व चिल्ल्या -

पिल्लांना बोलावून शैक्षणिक साहित्य दिले. 


नवीन वही,नवीन पुस्तक,नवीन दप्तर,नवीन कंपास पेटी पाहून या सर्व चिमण्या आनंदाने चिवचिवल्या... ! या चिवचिवणाऱ्या चिमण्यांना आता कोणत्या तोंडाने सांगू ..!


बाळांनो,आज खऱ्या अर्थानं तुम्ही पोरके झालात रे.... आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा... !!! 


२१ जून २०२४


डॉ.अभिजीत सोनवणे-डॉक्टर फॉर बेगर्स,

सोहम ट्रस्ट पुणे