* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: आद्य पक्षी चित्रकार proto-bird painter

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२३/६/२४

आद्य पक्षी चित्रकार proto-bird painter

२१.०६.२४ या लेखातील शेवटचा भाग..


ऑद्युबाँचं काहीसं आगाऊपणाचं वागणं, स्वतःच्या कामाबद्दलचा अभिमान आणि वागण्यातला गावंढळपणा यामुळे फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्कमधल्या उच्चभ्रू समाजाने तसंच वैज्ञानिक संस्थांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं.शिवाय त्याच काळात चार्ल्स विल्सन पील हा ख्यातनाम निसर्गचित्रकार आणि त्याची मुलं 'अमेरिकन ऑर्निथॉलॉजी' पुनरुज्जीवित करण्याचं काम करत होती. त्यांच्या स्पर्धेत ऑद्युबाँचा टिकाव लागणं अवघडच होतं.

त्यातच जॉर्ज ऑर्ड या विल्सनच्या जवळच्या कलाकार

मित्राने ऑद्युबाँवर कलाचौर्याचा आणि विल्सनच्या कामाचं श्रेय ढापण्याचा आरोप केला होता.तसंच ऑद्युबाँच्या चित्रात वैज्ञानिक गफलती असतात,असंही त्याने जाहीर करून टाकलं.एवढंच नव्हे,तर फिलाडेल्फियातील कुणीही त्याला कसलीही मदत करू नये, यासाठीही त्याने कसून मेहनत घेतली.


पण ऑद्युबाँला याच काळात काही पाठीराखेही भेटले.

त्यांत नेपोलियनचा पुतण्या चार्ल्स ल्युझियन बोनापार्ट होता.त्याने ऑद्युबॉला बरीच मदत केली.या चार्ल्सने 'बर्ड्स इन अमेरिका' नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध केलं होतं.त्यात विल्सनच्या ग्रंथात नसलेल्या पक्ष्यांचा समावेश होता.त्याच्या पाठिंब्यावर ऑद्युबाँन इंग्लंडच्या बोटीत पाय ठेवला तेव्हा त्याच्या डोक्यात इंग्लंडला जाऊन काय करायचं याबद्दल कसलीही योजना नव्हती.या दीर्घ प्रवासात त्याने वर्गणीदार मिळवून हप्त्याहप्त्याने आपलं पुस्तक छापण्याची एक योजना आखली.त्याच्या पहिल्या माहितीपत्रकानुसार सुरुवातीला ऑद्युबाँ नर,मादी आणि पिल्लं अशा प्रकारची पक्ष्यांची ४०० चित्रं चित्रं सादर करणार होता.या प्रत्येकी तीन ते चार चित्रांशिवाय या पक्ष्यांचा रहिवास, त्यांच्या अन्नाचं वैशिष्ट्य आणि घरटी यांची माहितीही त्या पुस्तकामध्ये असणार होती.कला आणि विज्ञान यांचा अशा त-हेने या पुस्तकामध्ये अनोखा संगम पाहायला मिळेल,असं त्याने या परिपत्रकात म्हटलेलं होतं.या पुस्तकाच्या निर्मितीत त्या काळात सर्वोत्कृष्ट मानला जाणारा 'व्हॉटमन' कागद वापरण्यात येणार होता.त्या कागदाची निर्मिती ताग आणि कापसाच्या लगद्यापासून केली जात असे.त्यावर ही पक्ष्यांची जलरंगामधील चित्रं खुलून दिसतील याची ऑद्युबाँने खात्री दिली होती.प्रत्येक चित्र 'डबल एलफंट शीट'वर असणार होतं;म्हणजे त्याचा आकार ७० सें.मी. बाय ४५ सें.मी. एवढा असणार होता. हा कागद त्या काळात फक्त इंग्लंडमध्ये एकाच कागद कारखान्यात बनत होता.हे पुस्तक हप्त्याहप्त्याने वाचकांना घरपोच मिळणार होतं.प्रत्येक हप्त्यात तीन पक्ष्यांची चित्रं असणार होती.एक आकाराने मोठा पक्षी,एक मध्यम आकाराचा पक्षी आणि एक छोटा पक्षी.उदा.बाज, कोकीळा आणि चिमणी.या पक्ष्यांची पार्श्वभूमी ऑद्युबाँचा शिष्य जोसेफ मेसन चितारणार होता.अमेरिकेतील काही प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारस पत्रं घेऊन २१ जुलै १८६१ या दिवशी ऑद्युबाँचे पाय इंग्लंडला लागले.लिव्हरपूल इथला एक श्रीमंत व्यापारी रिचर्ड रॅथबोन आणि त्याच्या कुटुंबियांनी ऑद्युबाँच्या या दीर्घ प्रकल्पाची सर्व आर्थिक जबाबदारी उचलली होती.रॅथबोनमुळे इंग्लंडमधील नामवंत शास्त्रज्ञ,

कलेचे चाहते आणि सर्वोत्कृष्ट मानले जाणारे मुद्रक यांना ऑद्युबाँ सहजतेने भेटू शकला.लिव्हरपूल बंदरात पाय ठेवल्यापासून बरोबर अकरा दिवसांनी तिथल्या शाही कला-विज्ञान आश्रय संस्थेत ऑद्युबाँच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.इंग्लंड आणि युरोपमधल्या अनेक सरदार जहागिरदारांना या धाडसी चित्रकाराचं आकर्षण वाटू लागलं.त्याच्या नवनव्या मोहीमांना त्यांनी सढळ हाताने पैसा पुरवला.इंग्लंड आणि फ्रान्समध्ये त्याचं मानाने स्वागत होत असे. त्याच्या साहसाच्या हकीकती त्याच्याच तोंडून ऐकायला राजदरबारी लोकांची गर्दी जमत असे. खानदानी स्त्रियांच्या गराड्यात वावरताना त्याच्या वाणीला आणखी धार चढत असे.


या काळात इंग्लंडमध्ये खरं तर अनेक चित्रकारांशी ऑद्युबाँला स्पर्धा करावी लागली होती.जॉर्ज स्टब्ज,

एडविन लँडसीअर,जोसेफ मॅलार्ड टर्नर,एडवर्ड लीअर या साऱ्या आघाडीच्या चित्रकारांच्या चित्रांचे छापील नमुने बाजारात उपलब्ध होते.लीअरसारख्या काही तरुण चित्रकारांना हाताशी धरून जॉन गुल्ड 'बर्ट्स ऑफ युरोप' हा प्रकल्पही राबवत होते. असं असूनही ऑद्युबाँने ब्रिटिशांची मनं जिंकून घेतली.नोव्हेंबर १८२६ मध्ये एडिंबरातील विल्यम होम लाझार्सशी ऑद्युबाँने छपाईचा करार केला.लाझार्स हा त्या काळातला एक प्रसिद्ध एनग्रेव्हर होता.त्याच्यासाठी ऑद्युबाँने दहा चित्रं काढली.

१८२७ मध्ये लाझार्सच्या छापखान्यातील चित्रं रंगवणारे कलाकार संपावर गेले आणि लाझार्सने हे काम नाईलाजाने थांबवलं.पण त्यामुळे ऑद्युबाँला एक नवी संधी उपलब्ध झाली.लाझार्सचं काम पुढं चालू ठेवण्यासाठी रॉबर्ट हॉवेल्स पिता-पुत्र पुढे आले. हे त्यावेळच्या सर्वोत्कृष्ट एनग्रेव्हर्समध्ये गणले जात.त्यांनी लाझार्सच्या दहा एनग्रेव्हिंगमध्ये सुधारणा केल्याच;शिवाय ऑद्युबाँचा प्रकल्प पूर्णत्वास जाईपर्यंत त्याला पुढची अकरा वर्षं साथ दिली.या प्रकल्पाचं महत्त्व ओळखून त्यांनी लाझार्सपेक्षा कमी दरात हे काम केलं. शिवाय त्यांचं केंद्र लंडनमध्ये असल्यामुळे व्हॅटमन कागद लंडनहून एडिंबरोला नेण्याचा खर्चही वाचला.त्यामुळे या प्रकल्पाचा फायदा वाढण्याची शक्यता दिसू लागली.


१८२६ ते १८३८ दरम्यान ऑद्युबाँ पछाडल्यासारखा प्रवास करत होता.त्याने चार वेळा अमेरिका ते इंग्लंड आणि परत असा प्रवास केला.अमेरिकेत पोहोचल्यावर त्याची भटकंती फ्लोरिडाच्या दलदलीच्या प्रदेशापासून ते कॅनडाच्या लॅब्रेडोर प्रदेशापर्यंत सुरू असे. एखाद्या नव्या पक्षीजातीचा शोध लागल्याची बातमी कानावर पडली,की ऑद्युबाँ लगेच त्या भूभागात हजर होत असे.त्याने त्या काव्ळात चित्रबद्ध करून ठेवलेल्या अनेक जातींचे पक्षी आता नामशेष झाले आहेत.याच भटकंतीच्या काळात त्याने 'ऑर्निथॉलॉजिकल बायॉग्राफी' हा पंचखंडात्मक पक्ष्यांची वैज्ञानिक माहिती देणारा ग्रंथ पुरा केला.त्याच्या चित्रांच्या सोबत हा ग्रंथ पुरवला जाणार होता.


ऑद्युबाँने अमेरिकेतील पक्षीशास्त्राला खरोखरच शास्त्रशुद्ध पाया दिला.त्याच्यामुळे केवळ पक्षीच नव्हे तर प्राणी आणि वनस्पतींच्या अभ्यासाला एक नवी शिस्त लाभली. 'द बर्ड्स ऑफ अमेरिका' १८२७ ते १८३८ या काळात प्रकाशित होत गेलं.दरवर्षी मूळ योजनेनुसार २५ चित्रांचे प्रिंट्स ग्राहकांना टिनच्या पेट्यांतून घरपोच मिळणार होते.दरवर्षीच्या संचाची किंमत हजार डॉलर एवढी होती.त्या काळच्या धनिकांनासुद्धा ही जरा जास्तच वाटत होती. तरीही ऑद्युबाँला बऱ्याच श्रीमंतांनी सहाय्य केलं होतं.या योजनेत भाग घेणाऱ्या व्यक्ती आधीचा संच मिळाला की नव्या संचाचे पैसे देत असत. त्यातून पुढच्या संचाचा खर्च भागवण्यात येत असे.त्या काळात हा प्रकल्प यशस्वी झाला याचं श्रेय ऑद्युबाँच्या अथक परिश्रमांस जातं.ऑद्युबाँ हे सर्व करू शकला याचं कारण त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी असलेली त्याची पत्नी ल्युसी. ऑद्युबाँचं त्याच्या कार्यावर असलेलं प्रेम तिला मान्य होतं;त्या कार्याचं महत्त्वंही तिला कळत होतं.ऑद्युबाँची दोन्ही मुलंही चांगली चित्रकार होती.त्यांनी छपाईकलेचंही ज्ञान मिळवलं होतं. मोठेपणी ती वडिलांच्या व्यवसायात त्यांच्या चित्रांची पार्श्वभूमी चित्रीत करणं,चित्रांच्या छपाईवर लक्ष ठेवणं,अशी मदत करू लागली.


१८३१ मध्ये मारिया मार्टिन ऑद्युबाँच्या संपर्कात आली.

ती जलरंगात वनस्पती चित्रित करत असे; तिचा वनस्पतीशास्त्राचा अभ्यासही होता. ऑद्युबाँला ज्या अनेक चित्रकारांनी पार्श्वभूमीची चित्रं काढून मदत केली त्यात मारियाचं स्थान खूप वरचं आहे.उत्तरायुष्यात हळू हळू ऑद्युबाँला स्मरणशक्तीचा ऱ्हास आदी वृद्धत्वाची लक्षणं त्रास देऊ लागली;तसतसा तो त्याच्या आवडत्या उद्योगाच्या बाबतीत इतरांवर अवलंबून राहू लागला.त्या काळात त्याच्या दोन्हीही मुलांबरोबरच मारियाने त्याला साथ दिली.ऑद्युबाँचं एक वैशिष्ट्यं होतं.तो लोकांनी केलेल्या वर्णनावरून आणि पक्ष्याचा मृतदेह पाहून तो पक्षी जिवंतपणी पाहावा,तसं त्याचं चित्र काढत असे.

त्यामुळे त्याने पक्ष्यांच्या हत्येला उत्तेजन दिलं,असा त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. 


तो काही अंशी खरा आहे;पण त्या काळात कॅमेरे नव्हते आणि ऑधुबाँच्या तो काही पर्वतांवर पोहोचणं,

कडेकपारीत राहणारे पक्षी पाहणं हे त्याला शक्य नव्हतं.ऑद्युबाँने ८७ भागात चित्रांच्या एकूण ४३५ प्लेट्स तयार केल्या. ४५७ जातींच्या पक्ष्यांच्या १०६५ चित्रांचा या महाकार्यात समावेश आहे. पक्ष्यांना त्यांच्या विविध अवस्थांत चित्रबद्ध करून पहिल्या महापक्षी ज्ञानकोशाचा निर्माता म्हणून त्याला त्याचं श्रेय देणं भाग आहे.त्याच्या ३०० छापील चित्रांचे पहिले तीन खंड प्रकाशित झाले.तोपर्यंत पक्ष्यांच्या अनेक नवीन जाती उघडकीस आल्या होत्या.त्याला या नव्या संशोधनाचा समावेश करून आणखी एक खंड काढायचा होता.पण १८३६- ३७ मधल्या आर्थिक मंदीमुळे त्याच्या वर्गणीदारांनी या नव्या खंडाला विरोध केला.


मग त्याने चौथ्या खंडात आणखी ३५ छापील पृष्ठं समाविष्ट केली.एका पानावर  एका गणातले सर्व पक्षी एकत्रित करून त्याने नव्याने सापडलेल्या पक्षीजाती लोकांपर्यंत पोहोचवल्या. याचं एक उदाहरण म्हणजे सुतार पक्ष्याच्या सहा जाती त्याने एका पानावर चित्रित केल्या. हा चौथा खंड प्रकाशित झाला तेव्हा तोपर्यंतच्या

उत्तर अमेरिकी भागातील जवळ जवळ सर्व जातींचा त्याच्या एकूण संग्रहात समावेश झालेला होता.

अचूकतेबाबत कुठलीही तडजोड ऑद्युबाँला मान्य नव्हती.चौथ्या खंडातल्या पक्ष्यांची शास्त्रीय माहिती अगदी बिनचूक असावी,यासाठी त्याने विल्यम मॅक् गिलीव्हर या स्कॉटिश पक्षीतज्ज्ञाला नोकरीवर ठेवलं. 'बर्ड्स ऑफ अमेरिका' बरोबरच्या 'ऑर्निथॉलॉजिकल बायॉग्राफी' या सहग्रंथामध्ये असलेला मजकूर तपासून ठाकठीक करण्याचं काम मॅक् गिलीव्हरने मन लावून केलं.पक्ष्यांची शास्त्रीय माहिती,वर्गीकरण,जगण्या -

संदर्भातील सवयी यांची अचूक माहिती या ग्रंथात सापडते.या खंडाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या खंडात पक्ष्यांच्या शोधात हिंडताना त्याला आणि इतरांना आलेले अनुभव आणि त्या पक्ष्यांसंबंधीच्या दंतकथा यांचाही समावेश आहे.


या सर्व कार्याचा एकूण खर्च किती याचा खरा अंदाज करणं अगदी अवघड काम आहे.ऑद्युबाँने त्याच्या सहाय्यकांना,मदतनीसांना ठरलेला पगार वेळच्या वेळी देण्याची काळजी घेतली होती.त्याचा प्रवास,त्याचे वाटाडे,

त्या प्रवासात त्याने केलेली साहसं,अंडी नीट पाहता यावी म्हणून पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये डोकावताना पक्ष्यांनी केलेली हल्ले,प्रवासात धडपडून झालेल्या जखमा आणि कुटुंबीयांचा विरह यांचं मोल करणं अवघड आहे.पुढच्या काळात, तांब्याच्या पत्र्यांवर चित्र कोरणारे,टॅक्सीडर्मिस्ट, वनस्पतीशास्त्रज्ञ इत्यादींना मोबदला आणि बक्षिसं देण्यात त्यानेकधीच हयगय केली नव्हती. 


याशिवाय त्याचे ग्रंथ खपवण्याचा उद्योगही त्यालाच करावा लागत होता.चित्रात अचूकता असावी यावर त्याचा कटाक्ष असल्यामुळे एकाच पक्ष्याची अनेक चित्रं तो काढत असे;मग त्यातून सर्वोत्कृष्ट छपाईयोग्य चित्र निवडलं जाई.या अमाप कष्टांमुळे साठीनंतर त्याला स्मृतीभ्रंश झाला.१८५१ मध्ये वयाच्या ६५व्या वर्षी त्याचं निधन झालं.त्यानंतर काही काळातच त्याच्या दोन्ही मुलांचं निधन झालं.त्यामुळे नातवंडांना वाढवण्याची जबाबदारी ल्युसीवर आली.आयुष्यभर ती फक्त कठीण प्रसंगांना तोंड देतच जगली होती.नवऱ्याच्या अनोख्या उद्योगाला तिने होता होईतो मदत केली होती;

त्याच्या अखेरच्या काळात त्याची शुश्रुषाही मन लावून केली होती. त्याच्या गैरहजेरीत त्याचा पत्रव्यवहार ल्युसीच सांभाळत असे.अनेक हस्तलिखित नोंदींच्या नकला करताना त्यातलं इंग्रजी सुधारण्याचं कामही तिने केलं होतं.ऑद्युबाँ इंग्लंड आणि युरोपमध्ये असताना त्याच्या गैरहजेरीत त्याचे ग्रंथ खपवायचा उद्योगही तिने स्वेच्छेने केला होता.त्यांचं मूळ घर तिने भाड्याने दिलं.


नातवंडांच्या संगोपनाला पैसे हवेत म्हणून तिने ऑद्युबाँची मूळ जलरंगातील चित्रं विक्रीस काढण्याचं ठरवलं.त्या वेळी अमेरिकेत यादवी युद्ध जोरात सुरू होतं.तेव्हा ही चित्रं कुणीच खरेदी करेनात.केवळ ब्रिटिश म्युझियमकडून 'बघू' एवढं तरी उत्तर मिळालं होतं.मात्र ल्यूसी आशावादी होती.१८६२ मध्ये तिने पुन्हा प्रयत्न सुरू केले.प्रथम 'द न्यूयॉर्क हिस्टॉरिकल सोसायटी'साठी तिने या चित्रांचं प्रदर्शन मांडलं. संस्थेच्या सदस्यांना तिने सर्व चित्रांचा परिचय करून दिला.चित्रं काढण्यात ऑद्युबाँला पडलेल्या कष्टांचा पाढा तिने त्यांच्यासमोर वाचला.रोज कित्येक तास ती हा उद्योग करत होती.सोसायटीच्या कार्यकारी समितीने अखेर हा ठेवा विकत घ्यायचं ठरवलं.


ऑद्युबाँची चित्रं कोरलेले तांब्याचे पत्रे एका तांबं वितळवणाऱ्याने तांब्याच्या भावाने विकत घेतले. ते पत्रे वितळवले गेले.पत्रे वितळवणाऱ्या कारखान्याच्या मालकाच्या मुलाने त्यांचं मोल ओळखलं; तोपर्यंत बरेच पत्रे वितळवून झाले होते.पण त्याने उरलेले ७८ पत्रे वाचवले. ल्यूसी ब्लेकवेल ऑद्युबाँ १८७४ साली ख्रिस्तवासी झाली.


मृत्यूपूर्वी तिने पतीचं चरित्र लिहून ठेवलं होतं.त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर तिने लहान मुलांसाठी एक खासगी शाळा सुरू केली होती. त्या उत्पन्नातून ती नातवंडांना वाढवत होती.या शाळेत जॉर्ज बर्ड ग्रिनेल नावाचा मुलगा शिकून मोठा झाला.त्या शाळेत शिकताना जॉर्जला शिक्षणाबरोबरच ऑद्युबाँच्या घरात असलेल्या बऱ्याच गोष्टींचं आकर्षण वाटे.पेंढा भरलेले प्राणी,

फांद्यांवर बसवलेले मृत पक्षी,आणि ऑद्युबाँचं प्रचंड मोठं पोर्ट्रेट,हे त्याच्या आकर्षणाचे विषय होते. १८८६ मध्ये जॉर्ज ग्रिनेलने 'फॉरेस्ट अँड स्ट्रीम' मासिकाचं संपादकपद स्वीकारलं.त्याने उत्तर अमेरिकेत पक्ष्यांची होणारी बेसुमार हत्या थांबवण्याची चळवळ सुरू केली.या चळवळीच्या सदस्यांच्या मदतीने त्याने 'द ऑद्युबाँ सोसायटी'ची स्थापना केली.या संस्थेला हजारो सदस्य मिळाले.एवढंच नव्हे,तर अमेरिकेच्या घटक राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी ऑद्युबाँ संस्था स्वतंत्रपणे प्रस्थापित करण्यात आल्या.

१९०५ साली त्या सर्व संस्थांची मिळून 'नॅशनल असोसिएशन ऑफ ऑद्युबाँ सोसायटीज फॉर द प्रोटेक्शन ऑफ वाइल्ड बर्ड्स अँड ॲनिमल्स' ही संघटना स्थापन झाली.या संस्थेने केलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांमुळे जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये प्राणी आणि निसर्ग संरक्षणविषयक अनेक कायदे निर्माण झाले.आज जे काही निसर्गधन आपल्याला पाहायला मिळतंय ते ऑद्युबाँ आणि त्या संस्थेकडून स्फूर्ती घेऊन स्थापन झालेल्या संघटनांमुळेच पाहायला मिळतं.या संस्थांनी ऑद्युबाँला खऱ्या अर्थाने अमर केलं,असंच म्हणावं लागतं...!