* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: घातक..Fatal..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/६/२४

घातक..Fatal..

हा प्रसंग आहे जवळपास सात वर्षांपूर्वीचा...! 


भिक्षेकर्‍यांच्या या कामांमध्ये मी नवखा होतो कोणताही अनुभव पाठीशी नव्हता. 


भीक मागणाऱ्या लोकांमध्ये असाच एके दिवशी एका ठिकाणी गेलो असता,तिथे एक पाय नसलेली दिव्यांग ताई बसलेली होती.


माझ्याकडची मोठी बॅग बघून तिला वाटले, मी काहीतरी वाटायला आलोय,कुबड्यांचा आधार घेत धडपडत ती माझ्या जवळ आली आणि माझ्यासमोर तिने हात पसरले. मी डॉक्टर आहे... गोळ्या औषधे देतो... वगैरे वगैरे काहीतरी बोललो.... पण, यानंतर हा आपल्या काही कामाचा नाही असं समजून ती भ्रमनिरास होऊन तिथून निघाली. 


नवखा होतो... ! 


आधी छान नातं तयार करायचं आणि नंतर मगच कुणालातरी सल्ले द्यायचे,हे नंतर अनुभवातून शिकलो; परंतु त्यावेळी हे माहीत नव्हतं.... ! 


याच नवखेपणामधून म्हणालो,'बाई भीक काय मागतेस काम कर की...


व्हायचं तेच झालं... नवशिक्या ड्रायव्हर कडे गाडी दिली की तो कुठेतरी धडकवणारच....


यानंतर भयंकर रागाने ती गर्रकन वळली आणि म्हणाली ए बडे बाप की अवलाद , इधर आके शानपत्ती मत झाड...भरे पेट से किसी को सलाह देना बहुत आसान बात होती है... तेरे घर मे मा होगी,बाप होगा,सब लोग होंगे... तेरेको पाल पोसके बडा किया तो तू डॉक्टर बना... 


मेरे को ना बाप...  ना मा ... दो बच्चे और एक कुबडी मेरी.... इत्ते सहारेसे रस्ते पे औरत होके तु इज्जत संभालके जी के दिखा...!


मी ना कुणी बडा होतो किंवा ना माझा बाप कुणी बडा होता... मी अतिशय सामान्य कुटुंबातला...

अत्यंत मुश्किलीने कसाबसा झालेला डॉक्टर होतो

मी ...! तीला यातलं आता काय काय सांगू  ? 


परंतु ती जे बोलली ते सुद्धा खरं होतं...!


भरल्या पोटानं दिलेला सल्ला उपाशी पोटाला कधीच पचत नाही...! यानंतर ती दिसत राहिली... तिने काम करावं अशी माझी आंतरिक इच्छा होती. 


दरवेळी मी तिला याविषयी सुचवायचो आणि दरवेळी ती माझा पाणउतारा करायची. 


तिच्याशी बोलताना मला जाणवलं,की तिला Artificial Jewellery मध्ये रस आहे, त्याच्या खरेदी विक्री बद्दल ती बरंच काही जाणून होती,हाच धागा पकडून मी तिला म्हणालो,की तू हा व्यवसाय कर,हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मी तुला लागेल ती मदत करतो. डोळ्यात भीती... चेहऱ्यावर साशंकता... नाकावर राग.... ओठांवर शिवी.... 


अशा संमिश्र भावना घेऊन,शेजारी असलेल्या कुबडीला घट्ट पकडून ती मला म्हणाली, 'इसके बदले मे तेरको क्या चाहिये रे ...?' 


मी सहज म्हणालो,'इसके बदले में चाहिये एक राखी...!' अनेक जणांकडून गोड बोलून, फसवली गेलेली ती ताई ... माझ्या इतक्या मोघम बोललेल्या शब्दांवर ती आता बरी विश्वास ठेवेल ?? 


चल रे... आया बडा... तेरी मा का... xxx 

( तिच्या या "तीन फुल्यांमध्ये" माझी अख्खी आई सामावली होती)


आपलं पद काय ?  प्रतिष्ठा काय ? आपला पगार किती ? आपली इस्टेट किती ? याला काहीही महत्त्व नसतं .... दुसऱ्याच्या मनातल्या "तीन फुल्यांमध्ये " आपण कोण आहोत ? तीच आपली औकात...!  बाकी सर्व मृगजळ...!!!


तर,यानंतर मला तिने चप्पल दाखवली होती,  मला चांगलं आठवतं आणि त्या तीन फुल्या सुद्धा.... मी विसरलो नाही,अजून इतक्या वर्षानंतर सुद्धा...!!!


असो....


या सर्व घटनाक्रमामध्ये ओघाओघानं तीची दोन्ही मुलं मात्र निरागसपणे माझ्याशी जुळली गेली.नकळतपणे मला ती मामा म्हणू लागली... मला हि दोन्ही मुलं खुप आवडायची.... दोघांशी बोलताना जाणवायचं, या मुलांमध्ये काहीतरी "स्पार्क" आहे... 


एक मुलगा कॉम्प्युटर विषयी बोलायचा.... 

एक मुलगा फुटबॉल विषयी बोलायचा... 


हि मुलं कुठून हि माहिती मिळवत असतील? 

हे ज्ञान यांना कुठून येत असेल...??? 


मी खेड्यातला आहे....  

मला जाणवलं,रानफुलांना मशागत लागत नाही,पाणी लागत नाही,खत लागत नाही, ती जगतात निसर्गाच्या किमयेवर... ! 


हि मुलं अगोदर पासून शाळेत जातच होती, परंतु पैशाअभावी कधी शाळा सुटेल हे सांगता येत नव्हतं...आता मला वाटायला लागलं,या बाईचं जाऊ दे... परंतु किमान मुलांचं आयुष्य नको बरबाद व्हायला,यांची शाळा नको सुटायला... 


नुसत्या निसर्गाच्या भरवशावर सोडून उपयोग नाही.... मुलांना योग्य तो मार्ग दाखवायला हवा.... इतकीच माझी ओढ होती.परंतु या ताईच्या परवानगीशिवाय ते शक्य नव्हतं आणि म्हणून मी कायम तिची हांजी हांजी करायचो...!


एके दिवशी तिला म्हणालो 'मुलं,मला मामा म्हणतात,त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो,तू शेवटपर्यंत त्यांना शिकवशील याचा मला भरवसा नाही.'आता मला आठवत नाही कसं ते... परंतु यावर बराच वेळ विचार करून शेवटी तीने परवानगी दिली होती.या दोन पोरांची तेव्हापासून सर्व शैक्षणिक जबाबदारी आपण घेतली. 


मग,दोन्ही मुलांना माझा फोन नंबर दिला होता,काही अडचण आली तर, कुठून तरी मला संपर्क करा,असं सांगितलं होतं...  यानंतर मी जिथे असेन, तिथे मला मुलं भेटून जात असत,दोन्ही मुलं माझ्या संपर्कात होती...पोरांच्या फिया,युनिफॉर्म,वह्या पुस्तकं आणि लागेल ते सर्व मी देत होतो.... आता पावेतो या ताईचा माझ्यावर विश्वास बसला असावा. 


एके दिवशी,तिने मला घरचा पत्ता दिला आणि म्हणाली, 'दादा घरी ये....!' 


"दादा घरी ये" हि वाक्यें आहेत साधीच परंतु माझ्यासाठी... सुवर्ण मोलाची ..! 


जी बाई रस्त्यात चप्पल दाखवते ... माझ्या आईचा उद्धार करते... तीच परत मला जेव्हा "दादा" म्हणत घरी बोलावते तेव्हा,तेच माझ्यासाठी सीमोल्लंघन असतं.... ! भले भले मोठे लोक मला घरी बोलावतात; पण मी कोणाच्या घरी जात नाही... 


हिचा मात्र;दिलेला पत्ता शोधत;खूप मोठ्या मुश्किलीने मी तिच्या "घरी" पोहोचलो.... 


घर म्हणजे कोणाच्याही नजरेसमोर काय येतं? घराला चार भिंती असतात आणि एक छप्पर असतं...


या घराला ना छप्पर होतं... ना भिंती... पण तरीही ती त्याला घर म्हणत होती...! तिच्या या "घरात" गेल्यानंतर,मला जाणवलं, विटांच्या चार भिंती म्हणजे घर नसतं ....  जी माणसं एकत्र राहत आहेत,अशांनी एकमेकांच्या हातात हात गुंफले की आपोआप नात्यांच्या भक्कम भिंती उभ्या राहतात... दुसरा भिजू नये म्हणून पहिल्याने जे काही मनापासून केलं त्याला छप्पर म्हणतात... ! 


या कुटुंबात येऊन,घराविषयी डोक्यात असलेल्या अनेक संकल्पना बदलल्या...! तिथे जे काही फळकुट ठेवलं होतं,त्या फळकुटावर मी बसलो... 


दोन्ही पोरं येऊन मामा मामा म्हणत मला बिलगली....यानंतर ती ताई आली... तिने मला पेढा भरवला... दोन्ही मुलं खूप छान मार्कांनी पास झाली होती. या दिवशी तीनं मला राखी बांधली.राखीच्या  एका धाग्यानं ती माझ्या आईची मुलगी झाली... ! 


कधीतरी पूर्वी तीनं माझ्या आईचा फुल्याफुल्यांमध्ये उद्धार केला होता... आज या फुल्याफुल्यांची "फुलं" झाली...! यानंतर,मी तीला पुन्हा काम करण्याविषयी सुचवलं. आणि याच दिवसापासून ती आर्टिफिशियल ज्वेलरी चा व्यवसाय करू लागली.आता तिचं भीक मागणं पूर्ण थांबलं. हा माझ्या विजयाचा दिवस होता...! विश्वास बसणार नाही इतकी तिची करुण कहाणी होती... यावर अख्खी एक कादंबरी होईल... असो, तिच्याविषयी पुन्हा कधीतरी...! 


बरोबर तीन वर्षांपूर्वी तीचा मोठा मुलगा अतिशय उत्तम मार्कांनी बारावी पास झाला. त्याच्या आवडीनुसार त्याला कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेऊन दिले.आज तो कॉम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.पहिल्या दोन्ही वर्षात तो फर्स्ट क्लासने पास झाला.याच्या संघर्षाविषयी बरंच काही मांडायचं आहे... परंतु याच्या विषयी सुद्धा पुन्हा कधीतरी...! आज मला सांगायचं आहे ते धाकट्या विषयी...! शाळेत असताना "तो" अतिशय उत्तम फुटबॉल खेळायचा.शाळेतल्या प्रत्येक मुलाकडे फुटबॉलचे उत्तम क्वालिटीचे शूज (स्टड) होते,हा मात्र अनवाणी पायांना खेळायचा.तरीही फुटबॉल या खेळातला तो हिरो होता,नव्हे हिरा होता.


यानंतर जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा भरल्या... निवड चाचणी झाली... अर्थातच याने अनवाणी पायाने का असेना, पण अप्रतिम खेळ करून दाखवला... 


खरंतर टीमचा कप्तान होण्याची पात्रता याची... तरीही स्पर्धेमध्ये याची निवड झाली नाही... कारण होते -  तुझ्याकडे फुटबॉलचे स्टड नाहीत... स्पर्धेमध्ये नियमानुसार तुला अनवाणी खेळता येणार नाही...! 


तिथल्या स्पोर्ट्स टीचरच्या त्याने विनवण्या केल्या,परंतु त्यांनी नियमावर बोट ठेवले.मग पात्रता असूनही स्पर्धेत तो खेळू शकला नाही. 


यानंतर मला तो भेटायला आला,या चिमुकल्याच्या डोळ्यात अंगार होता, हाताच्या मुठी तो बाजूच्या भिंतीवर आपटत होता... एकूणच सिस्टीम विषयी तो भयंकर रागानं बोलत होता... बोलता बोलता तो हमसून रडायला लागला...


आपल्याच शाळेचा एक खेळाडू पुढे जाऊन आपल्याच शाळेचे नाव उज्वल करणार असेल तर शाळेने एक स्टड आपल्याच खेळाडूला घेऊन द्यायला काय हरकत होती ? 


पण नाही,नियम म्हणजे नियम...व्वा !!! 


मलाही या सर्व प्रकाराची चीड आली.पण या मुलाला सावरणं आवश्यक होतं...! 


"घातक" या चित्रपटामध्ये,अमरीश पुरी आणि सनी देओल यांच्यात एक अत्यंत भावुक प्रसंग आहे.त्यात बाप आपल्या मुलाला सांगतो,'अपने क्रोध को पालना सीखो काशी,इसे जाया मत करो.'


आपल्याला आलेला राग आदळ आपट करून त्यावेळी वाया जाऊ द्यायचा नाही, त्याला जपून ठेवायचं,याच रागाला एक हत्यार बनवायचं,पण या हत्यारानं कुणाला इजा करायची नाही,स्वतःला  आकार देण्यासाठी या हत्याराचा योग्य वेळी उपयोग करायचा.रागाचं हे हत्यार वापरायचं,  काहितरी चांगलं "घडवण्यासाठी"... काही "बिघडवण्यासाठी" नव्हे... !!! मोबाईलवर शोधून हा प्रसंग त्याला पाहायला दिला. त्याला ते कितपत पटलं,किती रुचलं,मला माहित नाही,पण तिथून तो शांतपणे निघून गेला. मला खूप वाईट वाटलं...! 


"लायक" असतानाही "नालायक" ठरवलं; की त्याच्या वेदना किती होतात याची मला जाणीव आहे.


अमेरिकेत स्थायिक असलेले माझे एक मित्र, ते स्वतःस्पोर्ट्स मॅन आहेत.व्हॉट्स ॲपवर असाच त्यांच्याशी काहीतरी संवाद साधत असताना त्यांच्याशी मी हा प्रसंग शेअर केला. 


यानंतर माझ्या काहीही ध्यानी मनी नसताना, मला एक पार्सल मिळाले,त्यात अतिशय उच्च क्वालिटीचे स्टड होते,बिलावरची किंमत डॉलर मध्ये होती... भारतीय रुपया नुसार त्याची किंमत 35 हजार रुपये इतकी असावी. 


मी भारावून गेलो. 


दुसऱ्याची वेदना कळली,की मगच संवेदना जन्माला येते... दुसऱ्याची वेदना आपण जगायला सुरुवात करतो,त्यावेळी ती समवेदना होते...! 


अमेरिकेत बसून एका चिमुकल्याची वेदना तिकडे ते जगत होते...अमेरिकेतील त्या स्नेह्यांना मी मनोमन नमस्कार केला. 


यानंतर त्या मुलाला बोलावून त्याच्या हातात स्टड दिले... स्टड पाहून त्याचे डोळे चमकले.. त्याच्या डोळ्यात मग एकाच वेळी मला चंद्र आणि सूर्य शेजारी शेजारी बसलेले भासले...! 


संपूर्ण शाळेत आता त्याच्या इतके भारी स्टड कोणाकडेही नव्हते. 


अर्थातच पुढे या मुलाची निवड झाली... गुणवत्तेपेक्षा इतर बाबींवर फोकस केल्यामुळे याची निवड होण्यास वेळ लागला पण हरकत नाही... देर सही - दुरुस्त सही...!  या एका पायताणानं त्याला मात्र कुठल्या कुठं पोहोचवलं...!  फक्त जिल्हास्तरीय नव्हे,तर राज्यस्तरीय पातळीवर फुटबॉल मध्ये हा चमकू लागला. मला याचा अभिमान होता.योग्य वेळी योग्य मुलावर समाजाच्या माध्यमातून आपण याला मदत करू शकलो याचा आत्मिक आनंद होता. 


यानंतर दहावी उत्तम मार्काने पास करून याला अकरावीत ऍडमिशन घेऊन दिले... पुढे हा बारावीत गेला... अभ्यासाबरोबर फुटबॉल ची घोडदौड जोरात सुरू होतीच.८ जून २०२४, वार शनिवार,एका मारुती मंदिराच्या बाहेर भिक्षेकऱ्यांना मी तपासात असताना कोणीतरी पाठीमागून आले आणि माझ्या तोंडात पेढा भरवला. मी वळून पाहिलं तर हा मुलगा होता... सोबत त्याची आई म्हणजे आमची ताई...! 


ती एका पायावर उभी होती,हातात कुबडी नव्हती...

तिचा हात तिच्या मुलाच्या खांद्यावर होता... त्याच्या आधाराने ती उभी होती... जणू मुलगाच तिचा दुसरा पाय झाला होता...!  हा प्रसंग मी नजरेने टिपला आणि मनात जपून ठेवला. तोंडात पेढा असल्यामुळे मुलाला मी खुणेनं विचारलं,पेढे कसले ? 


तो अत्यंत आनंदानं बोलला ; सर,मी बारावी पास झालो,६७ टक्के मार्क पडले. मी झटक्यात उठून उभा राहीलो... माझ्या त्या पोराला मी मिठी मारली... सर्व भूतकाळ मला चित्रपटातल्या प्रसंगाप्रमाणे आठवला.

या एका मिठीमध्ये आमच्या अश्रूंची अदलाबदल झाली... माझे अश्रू त्याच्या खांद्यावर आणि त्याचे अश्रू माझ्या खांद्यावर... इकडे अश्रू आमच्या डोळ्यात होते आणि तिकडे पदर त्या माऊलीने डोळ्याला लावला...


एका मिठी ने काय जादू केली...!!! 


आनंदाचा हा भर ओसरल्यावर मी त्याला म्हणालो,'चला आता पुढे काय करायचं...?' 


तो मला म्हणाला सर आता मला,भारती विद्यापीठ मध्ये BPES ला ऍडमिशन घ्यायचे आहे... 


BPES म्हणजे काय मला नेमकं कळलं नाही... पण माझीही कामं खोळंबली होती... मी गडबडीत त्याला म्हणालो,'ठीक आहे... ठीक आहे... तुला जे काही करायचं आहे, त्याबद्दल मला लिहून एक अर्ज दे... तोपर्यंत मी माझी कामं उरकून घेतो...' माझी काम होईपर्यंत तो अर्ज घेऊन आला. अर्ज पाहून मी चमकलो... अर्ज अस्खलित इंग्लिश मध्ये होता...


My dear Dr. Sonawane sir, 

SOHAM Trust,Pune


अशी सुरुवात होती... इंग्लिश मध्येच त्याने पहिल्या पॅरेग्राफ मध्ये स्वतःची परिस्थिती, शिकायची इच्छा वगैरे याविषयी लिहिलं होतं. 


दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलं होतं


I wish to continue my further education with your kind support. 


I want to take admission for the *BPES course (Bachelor of Physical Education and Sports)*


My ultimate goal is to become a Sports Teacher... I will apply all my abilities to uplift poor children to make them good sports man and....


पुढचं मी वाचूच शकलो नाही... डोळ्यातल्या पाण्याने अक्षर धुसर केली...! एकतर अर्ज इंग्लिश मध्ये...तो ही इतका मुद्देसूद... बारावी काठावर पास झालेला मी मला आठवलो...तेव्हा आपल्याला इतकी अक्कल होती का ??? हे पोरगं खरंच मोठं झालं होतं...किंवा परिस्थितीने केलं होतं...! 


सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा,की त्याला स्पोर्ट्स टीचर व्हायचं होतं...! मी त्याला म्हणालो,'स्पोर्ट्स टीचर का रे ? इतर कितीतरी अनेक ऑप्शन आहेत तुला.'


तो भूतकाळात हरवला... इतका वेळ उभा असलेला तो आता माझ्या शेजारी बसला... आणि डोळ्यातलं पाणी लपवत तो म्हणाला, 'सर तुम्हाला आठवते का ?  काही वर्षांपूर्वी घातक पिक्चर मधला प्रसंग तुम्ही मला मोबाईलवर दाखवला होता.त्यात बाप आपल्या मुलाला सांगतो,'अपने क्रोध को पालना सीखो काशी,इसे जाया मत करो.'


मी तोच काशी होण्याचा प्रयत्न केला सर...!  


म्हणजे ? मला कळलं नाही...! 


सर,'भीक मागणारी अपंग आई,अंगात पात्रता असून सुद्धा केवळ गरिबीमुळे सर्व गोष्टींपासून वंचित राहिलेला मी,कोणाच्या घरात कोणी जन्म घ्यावा हे कोणाच्याही हातात नसतं... केवळ भीक मागणाऱ्या कुटुंबामध्ये झालेल्या माझा जन्म आणि यामुळे कायम वाट्याला आलेली अवहेलना... या सर्व बाबींमुळे मला भयंकर राग यायचा... राग कसा व्यक्त करायचा हे मात्र कळायचं नाही... वाटायचं या जगात जे जे काही चांगलं आहे ते मला कधीच मिळालं नाही...मला नाही तर कोणालाच नाही... आणि म्हणून या सर्व गोष्टी तोडून फोडून टाकाव्यात असं खूप वेळा मनात यायचं.'


'पण तुम्ही त्यावेळी मला सांगितलं, आपल्याला आलेला राग आदळ आपट करून वाया जाऊ द्यायचा नाही,त्याला जपून ठेवायचा,याच रागाला एक हत्यार बनवायचं, पण या हत्यारानं कुणाला इजा करायची नाही,स्वतःला आकार देण्यासाठी या हत्याराचा योग्य वेळी उपयोग करायचा. रागाचं हे हत्यार वापरायचं काहितरी चांगलं "घडवण्यासाठी"... काही "बिघडवण्यासाठी" नव्हे... !!!'


'या वाक्यांनी मला मार्ग मिळाला आणि मी काशी होण्याचा प्रयत्न करू लागलो...!'


'म्हणजे,त्यावेळी मी जे काही बोललो होतो, ते तुला कळलं होतं...? मी हुंदका आवरत बोललो.'


त्यावेळी तुम्ही जे काही बोलला होता सर,ते त्यावेळी "फक्त ऐकायला" आलं होतं... त्याचा "अर्थ कळायला" पुढे काही दिवस गेले... जेव्हा "अर्थ समजला", त्यावेळी जगण्याची सर्वच कोडी सुटत गेली...! मी त्याचा हात घट्ट पकडला...आज माझे शब्द मुके झाले होते... हुंदक्यांनाच आज जास्त बोलायचं होतं...! तुम्ही म्हणालात ना सर ? स्पोर्टस टीचर का व्हायचे आहे ? खूप ऑप्शन आहेत... 


सर माझा गेम चांगला असूनही शाळेमधील स्पोर्ट्स टीचरनी मला डावललं होतं...याचा राग मी मनात धरून होतो... याच रागाला मी जपलं... आता मला स्वतःला स्पोर्ट्स टीचर व्हायचं आहे... 


स्पोर्ट्स टीचर होऊन तळागाळातल्या गोरगरीब मुलांना शिकवायचं आहे...संधी द्यायची आहे...स्टड नाहीत म्हणून कोणी वंचित राहणार असेल,तर अशाला मी माझ्या पैशाने स्टड विकत घेऊन देईन,

इतकी पात्रता स्वतःच्या अंगात भिनवायची आहे... आणि हो परिस्थितीच्या विळख्यात अडकून चुकीच्या मार्गाने राग व्यक्त करणाऱ्या मुलांना *"घातक"* होण्यापासून वाचवायचं आहे...!


भविष्यात मला स्पोर्ट्स अकॅडमी उघडायची आहे,परिस्थिती वाट चुकायला लावते,अशा वाट चुकलेल्यांना,माझ्या अकॅडमी मधून, फक्त "खेळ" नाही,तर;आयुष्यात "खिलाडू वृत्ती" शिकवायची आहे.आम्ही दोघे सुद्धा रस्त्यावर बसलो होतो, आता तो उठत, निघू का सर ? म्हणाला...


बसूनच मी त्याच्या हळूहळू उभ्या राहणाऱ्या मूर्तीकडे पाहू लागलो...हळूहळू त्याचं डोकं आभाळाला टेकलं...पाय मात्र जमिनीवरच राहिले ! 


मी खुजा होऊन त्याच्याकडे डोळे भरून पाहत राहिलो.... जणु पायथ्याशी उभं राहून कुणी हिमालयाची उंची न्याहाळावी...!!! 


१५ जुलै नंतर फी भरायची आहे सर,जमेल ना आपल्याला ? 


त्याच्या या वाक्याने माझी तंद्री भंगली...


माझ्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकाची वर्षभर विक्री करून तो पैसा मी जून जुलै च्या दरम्यान दत्तक घेतलेल्या मुलांच्या शिक्षणाकरता वापरतो. 


अनेक मुलांच्या फिया भरून आणि शैक्षणिक साहित्य देऊन सुद्धा यातले काही पैसे उरले होते...फी भरायला अजून एक महिना शिल्लक आहे,तेवढ्यात बाकीची पुस्तकं नक्कीच विकली जातील,आणि याची संपूर्ण फी जमा होईल. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून फक्त हसलो...! 


येतो सर,म्हणत माझ्या पायाशी तो वाकला...


यावेळी मात्र रागवत मी त्याला उठवलं आणि म्हणालो,'का रे ? बारावीची परीक्षा पास झालास म्हणजे शिंगं फुटली का तुला ? 


तो घाबरला... बावरून माझ्या चेहऱ्याकडे पाहायला लागला...त्याचा हात हातात घेत म्हटलं,'कालपर्यंत मामा होतो मी तुझा,आज एकदम सर कसा झालो रे ? 


यानंतर मामा... मामा म्हणत तो झपदिशी कुशीत शिरला...यानंतर आभाळ भरलं...


जोर जोरात पाऊस कोसळायला लागला...आम्ही सर्वजण भिजून गेलो... 


हा पाऊस त्याच्या डोळ्यातला ? 

माझ्या डोळ्यातला ?? 

की त्याच्या आईच्या डोळ्यातला ??? 


ते मायलेक निघाले,मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्या पाहत होतो...त्याने आईचा हात हाती घेतला होता,आईने मुलाच्या खांद्यावर हात ठेवला होता... आईला आधार देत तो पुढे निघाला होता... 


भविष्यातल्या पिढीला,मार्ग दाखवण्यासाठी.. *घातक" बनण्यापासून रोखण्यासाठी... त्यावेळी रस्त्यातून डौलदार चालीने चाललेला मला तो "दीपस्तंभ" भासला...! 


या दीपस्तंभाला मी सॅल्यूट केला...!!! 


त्याचवेळी आकाशातून विजांचा चमचमाट झाला... कडकडाट झाला...निसर्गाने आत्ताच त्याच्यासाठी टाळ्या तर वाजवल्या नसतील...??? 


मी आभाळाकडं पाहिलं आणि वेडा पाऊस पुन्हा सुरू झाला...!!!


दिनांक : ११ जून २०२४


डॉ अभिजीत सोनवणे,डॉक्टर फॉर बेगर्स

सोहम ट्रस्ट पुणे..