मेळघाटच्या जंगलात ठिकठिकाणी वनविश्रामगृहं आहेत.जंगलात दौरा करणाऱ्या वनअधिकाऱ्यांसाठी ती बांधली आहेत.कोलकाझ,तारुबांदा,ढाकणा,
कोकटू,बेलकुंड,रंगूबेली,जारिदा,हातरू,रायपूर आणि माखला अशी त्यांची नावं.बहुतेक विश्रामगृहं नदीकाठी आहेत,तर काही उंच डोंगरावर बांधली आहेत.तिथून आजूबाजूचं सृष्टिसौंदर्य पाहता येतं.
ही सारी वनविश्रामगृहं गावापासून दूर आहेत.बऱ्याच विश्रामगृहांशी भुताटकी आणि अदृष्टांच्या अद्भुत कथा गुंफल्या आहेत.त्यामुळे एकटा अधिकारी तिथे रात्रीच्या मुक्कामाला राहण्याचं धाडस करत नाही.
तिथे राहिला तरी रात्री त्याला झोप येत नाही.अशाच एका विश्रामगृहातील गोष्ट.
तिथल्या माझ्या मुक्कामात चौकीदारानं मला सांगितलं,"साब,मध्यरात्रीनंतर इथे नर्तकीच्या पायांतील घुंगरांचा आवाज येऊ लागतो."
मी त्याला विचारलं, "ही नर्तकी कोण?"
तो म्हणाला,"होती एक अशीच.तिचा इथे खून झाला होता.तेव्हापासून रोज मध्यरात्रीनंतर विश्रामगृहात घुंगरांचा आवाज येतो.त्यामुळे रात्री कोणी अधिकारी इथे मुक्कामासाठी थांबत नाहीत.दिवसभराची कामं उरकून ते सायंकाळी इथून दुसरीकडे निघून जातात." ब्रिटिशांच्या काळात बांधलेलं ते विश्रामगृह घनदाट जंगल असलेल्या एका टेकडीवर उभं होतं.उंच जोत्यावर शहाबादी फरशीचा चौफेर रुंद व्हरांडा होता.त्यावर लाल कौलाचं छप्पर. मध्यभागी मोठी खोली.त्या खोलीत मच्छरदाणी लावलेले दोन पलंग.
भिंतीला लागून कमी उंचीची दोन टेबलं.त्याला जोडून असलेल्या एका चौकोनी खोलीत स्नानगृह. समोर पाहिलं की दीडदोनशे एकराचं खुलं रान.त्यात उंच गवत वाढलेलं.त्यातून पसरलेली बोरीची विरळ झाडं.
मध्यभागी कोरकू आदिवासींचा देव.बुजलेली विहीर. विहिरीजवळ एरंडाची दोनतीन झाडं.
ही सारी वैशिष्ट्यं पाहिल्यावर इथे फार वर्षांपूर्वी वसलेलं,नांदतं असलेलं गाव आता ओसाड झालं,याची कल्पना येई.
विश्रामगृहापासून थोड्या अंतरावर बारमाही वाहणारा ओढा.तिथून घनदाट जंगलाला सुरुवात झालेली.
(निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसारण केंद्र,सीताबर्डी, नागपूर)
माझी संशोधक वृत्ती मला स्वस्थ बसू देत नाही.वाटलं,या अदृष्टाचा अनुभव घ्यावा.
मी चौकीदाराला म्हणालो,"माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही.मी आज रात्री इथेच थांबणार आहे.
माझ्या जेवणाची काळजी करू नकोस.मी बरोबर शिधापेटी आणली आहे.त्याचा उपयोग करून माझं रात्रीचं जेवण कर."सायंकाळ झाली.चौकीदारानं शमादानीवर पितळेचा लॅप ठेवला.
व्हरांड्यात कंदील ठेवला.त्या अंधुक प्रकाशात बसून मी समोरच्या जंगलाकडे पाहत होतो.इतक्यात रानगव्यांचा एक मोठा कळप जंगलातून ओढ्याकडे जाताना दिसला.तीन-चार सांबरं दोन पायांवर उभी राहून बोरीचा पाला खाताना दिसत होती. गवतात चरता चरता एक भेकर तोंडात चारा घेऊन विश्रामगृहाकडे पाहात होतं.ते ओरडलं तसं कुत्र्याच्या भुंकण्यासारखा आवाज झाल्याचा भास झाला,
म्हणून मी इकडेतिकडे पाहू लागलो.अतिशय वेगानं उड्या मारीत ते जंगलात दिसेनासं झालं.
अंधार वाढू लागला तसा 'चूकऽचूकऽऽचूकऽऽऽ' असा रातवा पक्ष्याचा आवाज ऐकू येऊ लागला.निळ्या आभाळात चांदण्या लुकलुकताना दिसू लागल्या. जिकडेतिकडे विलक्षण शांतता होती.
रात्रीचं जेवण आटोपून मी पलंगावर आडवा झालो.
अजून हिवाळा संपला नव्हता,म्हणून मी चौकीदाराला दारं आणि खिडक्या लावून घेण्यास सांगितलं.उशाजवळच्या टेबलावर एका तांब्यात पाणी ठेवून चौकीदार घरी गेला.त्याचं घर हाकेच्या अंतरावर होतं.घरी तो एकटाच राही.त्याची मुलंबाळं जवळच्या खेड्यात राहत.त्याच्या घरासमोर कंदील अडकवलेला होता.कंदिलाच्या उजेडात त्याचं कुत्रं बसलेलं होतं.मी पलंगावर आडवा झालो खरा;परंतु झोप येत नव्हती.पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला,
परंतु त्यात लक्ष लागत नव्हतं.दिव्याच्या उजेडात मी वर छपराकडे पाहिलं.छपराला लाकडाचं आडं लावलं होतं.छप्पर तसं उंचावर होतं.
बिबट आणि तरस चौकीच्या आजूबाजूला वावरत असल्याची सूचना कुत्रं मधूनमधून भुंकून देई.
मी सूटकेसमधून कमांडर टॉर्च काढला. त्याच्या उजेडात दूरवरचं सहज दिसतं. कित्येकदा त्याचा उपयोग सर्च लाइट म्हणूनही होई.टॉर्च माझ्या उशाजवळच ठेवला.पुन्हा अंथरुणावर पडलो.
वाटलं,ही काळरात्र कधी संपेल?कधी झोप लागे आणि कधी जाग येई,हे माझं मलाच कळेनासं झालं.कित्येकदा मी कुठे आहे,याचाच विसर पडे.मग अंधुक प्रकाशात खोलीभर नजर फिरवल्यावर साऱ्या घटनांची आठवण होई. मी मनात विचार करीत होतो,की ती नर्तिका कशी दिसत असेल? ती सुंदर असणार.अशा अदृष्ट व्यक्ती कधी वृद्ध होत नसतील काय? मला केव्हातरी डोळा लागला.झोपेच्या तंद्रीतच मला घुंगरांचा आवाज ऐकू येत होता.हे सत्य की केवळ आभास? मी अंथरुणात उठून बसलो,तो आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता.त्यात पदलालित्य नव्हतं. म्हणजे नर्तिका धावत जावी आणि एकदम थांबावी,असा तो आवाज होता.
मी घुंगरांच्या आवाजाचा वेध घेत होतो.आवाज जवळजवळ येत होता.नंतर तो व्हरांड्यातून येऊ लागला.उठून दारं आणि खिडक्या नीट लावल्याची खात्री केली.ती येईल तर दारातूनच येईल ना!
आता छपरावरून घुंगरांचा आवाज येत होता.मी टॉर्चचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेने पाडला.एक मुंगूस आढ्यावरून उड्या घेत छपरात दडून बसलेल्या उंदरांचा पाठलाग करीत होतं.त्याच्या गळ्यात घुंगरांचा पट्टा होता.त्याच्या प्रत्येक हालचालींबरोबर घुंगरू वाजत.नंतर मुंगूस उंच असलेल्या व्हेंटिलेटरमधून बाहेर पडलं अन् खरी गोष्ट माझ्या लक्षात आली.
दुसऱ्या दिवशी त्या मुंगसाविषयी चौकशी केल्यानंतर बरीच माहिती कळली.ते मुंगूस चौकीदारानं पाळलं होतं.त्याच्या अस्तित्वाचा सुगावा लागण्याकरिता त्यानं मुंगसाच्या गळ्यात घुंगरांचा पट्टा बांधला होता. विश्रामगृहात माणसांची वर्दळ नसल्यामुळे तिथे रानउंदरांचा सुळसुळाट झाला होता. त्यांना खाण्यासाठी चौकीदार त्या मुंगसाला मध्यरात्रीनंतर सोडून देई.कोणी अधिकारी रात्री मुक्कामाला राहू नये,म्हणून त्यानंच नर्तकीची कथा रचली.मला त्याच्या कल्पनेचं कौतुक वाटलं.
भिकूसाशेट…
साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल.सकाळी साडेसहाची वेळ.मित्राचं पेठेत दुकान आहे.बाबा गावाला जायचे होते म्हणून त्यांना सोडायला, स्टॅन्डवर गेलो होतो.येता येता त्याच्याकडे डोकावलो.आमचा हा मित्र सकाळी सव्वासहाला दुकान उघडतो.दुकान चालतंय कसलं... पळतय.
नीचे दुकान ऊपर मकान.जनरल कम किराणा.
दूध,ब्रेड,बटर,अंडी,केक,बिस्कीटं,घडीच्या पोळ्या घेणारी गिऱ्हाईकं सकाळ पासून गर्दी करायची.
दुकानापाशी पोचलो.दुकानासमोरचा डांबरी रस्ता.तेवढा तुकडा छान झाडून घेतलेला.पायरीपाशी कोपऱ्यात एक स्टीलची रिकामी बादली.मित्रानं पाण्याचा छान सडा घातला होता.पाण्याचा छान ओलेता वास येत होता.
पायरीसमोर वहिनी छान रांगोळी काढत होती.
मी दुकानात शिरलो.पाठोपाठ वहिनी सुद्धा घरात शिरली.पाच दहा मिनटं गप्पा झाल्या.मग बेल वाजली.
दुकानातला पोरगा वर जाऊन चहाचा ट्रे घेऊन आला.बेल वाजणं म्हणजे चहा तयार आहे.घुटक घुटक चहा घेत होतो.एवढ्यात एक माणूस दुकानात शिरला.पांढरा शुभ्र पायजमा.पांढरा बंडीसारखा शर्ट.डोक्यावर गांधी टोपी.
"नमस्कार मालक.कसे आहात ?"
मित्र लगेच उठला.काऊंटरची फळी उघडून त्यांना आत घेतलं.बसायला खुर्ची दिली.पटकन वरची बेल वाजवली.
पाच मिनटात पुन्हा चहा आला.एकंदर बडी आसामी असावी.
"मालक एक विनंती आहे.वहिनी रोज पायरीपुढे रांगोळी काढते.तू देवाला हारफुलं वाहतोस.उदबत्ती लावतोस.प्रसन्न वाटतं.पन तू रोज बादलीभर पाणी मारतो ना रस्त्यावर.ते नको करत जाऊस बाबा.पाणी वाया जाते अशान्.पाण्यामदी जीव असतो.पाणी देव हाये आमच्यासाठी.देवाचा अनमान करू नका माऊली..."
पाच दहा मिनटं गप्पा मारून पाहुणे गेले.
" कोण हे ?" मी विचारलं.
'तू ओळखलं नाहीस ?'
'नाही बुवा.
'भिकूसाशेट चोपडा ज्वेलर्सचे मालक.एकदम सज्जन माणूस.सचोटीनं धंदा करतोय गेली अनेक वर्ष.शून्यातून उभं केलंय सगळं.एम जी रोडवरची मोठी पेढी.
उपनगरातही मोठं दुकान चालू केलंय नुकतंच.घनो चोखो धंदो.पण म्हाताऱ्याला वेड लागलंय.सकाळी सकाळी गावभर हिंडत असतो.कुणी दुकानापुढं सडा घालताना दिसला,की हात जोडून उभा राहतो.पाणी वाया घालवू नका म्हणतो.लोकं तेवढ्यापुरतं ऐकतात..तो पुढं गेला की रस्ते पुन्हा ओले.आपला गाव कसाय तुला माहित्येय.
बहुतेक नळांना तोट्याच नाहीत.पाणी भरून झालं तरी नळ तसेच वाहत असतात.शेकडो लीटर पाणी वाया जातं.
भिकूसाशेठच्या चुलतभावाचं हार्डवेअर शाॅप आहे.शेटच्या हातात एक पिशवी असते.पिशवीत पान्हा आणि तोट्या.वाहतं पाणी दिसलं की हा तिथं जातो.तोटी लावून देतो.स्वखर्चानं.!!मान्य की पाणी वाया जातं.पण दुकानापुढं पाणी मारलं की धूळ खाली बसते.जरा गारवा वाटतो. हे याला कोण सांगणार? बरं,इथं पाणी वाचलं तरी ते तिकडे दुष्काळी भागात कसं पोचेल?
म्हाताऱ्याची सटकलीय,झालं."
मला हे माहितच नव्हतं.मला यात स्टोरीचा वास आला.दुसऱ्या दिवशी सकाळी म्हाताऱ्याला गाठला.तो आणखीन एका दुकानात शिरला होता." सकाळी दुकानापुढे पाणी मारू नका हो."
त्याची आर्जवं,त्याची विनवणी.त्याच्या हातातली पिशवी,तोट्या.सगळं रेकाॅर्ड केलं.न्यूज चॅनलला पाठवून दिलं.पेपरमधे छापून आलं.म्हातारा एका रात्रीत फेमस झाला.तरीही बदलला नाही.त्याची रोजची प्रभातफेरी चालूच राहिली.
आताशा दुकानदारांना लाज वाटायला लागली. डांबरी रस्त्यांवरचे ओले सडे जवळजवळ बंद झाले.उघड्या नळाचं वाहतं पाणी बंद झालं.
न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं.त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला.
ढसाढसा रडला म्हातारा.म्हणाला,
"'मारवाडातलं गाव होतं माझं....पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी.आणि आईबरोबर मीही.एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा.पाण्यात देव दिसायचा.इथली उधळमाधळ बघितली की जीव तुटतो माझा.मला पता आहे, लोक माघारी माझी टिंगल करतात.पन धापैकी एक मानस तरी ऐकतो.माझा काम झाला की मग....!! त्याचा इंटरव्ह्यू ऐकला आणि मला, त्या म्हाताऱ्यातच देव दिसू लागला.
मागच्या महिन्यात गावी गेलो होतो.बऱ्याच वर्षांनी.
पेठेतल्या मित्राच्या दुकानी पोचलो सकाळी सकाळी.
एकदम आठवण झाली.
"त्या भिकूसाशेटचं काय झालं ?"
"पेठेतलं दुकान बंद झालं त्यांचं."
"का बरं?"
"झालं म्हणजे त्यानंच बंद केलं.रिटायरमेंट म्हण ना!! उपनगरातलं चाललंय जोरात.ते दुकान पोरं सांभाळतात.कोटी कोटींची उड्डाणं.म्हाताऱ्यानं त्यातल्या एका पैशालाही हात लावला नाही.डोंगरगावला मोठी टाकी बांधून दिली आईच्या नावानं.बायाबापड्यांचे ऊन्हाळ्यात फार हाल व्हायचे.तिकडं नळाला पाणी आलं,आणि इकडं म्हाताऱ्यानं डोळे मिटले.."
दोन मिनटं कुणीच कुणाशी बोललं नाही.
ग्रेट होता भिकूसाशेट.
मी मनातल्या मनात त्याला हात जोडले...आणि निघालो.
कालचीच गोष्ट.
सोसायटीत एक जण रोज गाडी धूतो.
त्याला गाठला. हात जोडून विनंती केली," रोज नको,आठवड्यातून एकदा धूत जा "
त्यानं ऐकलं.मी खूष.एकदम भिकूसा आठवला.
डोंगरगावचा नळ माझ्या डोळ्यातून ठिबकू लागला.
अनामिक..