* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सप्टेंबर 2024

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२९/९/२४

पाखरांचे प्रेम / love of birds

पक्ष्यांच्या घरट्यांची रचना त्यांच्या कुळाप्रमाणं बदलत असते.रातवा पक्षी अजिबात घरटं बांधीत नाही.मादी जमिनीवर अंडी घालते.जमिनीवर घरटं बांधणारे दुसरे पक्षी बहुतेक बशीच्या आकाराचं घरटं तयार करतात. त्यांपैकी कुररी (टर्न) आणि जलचर पक्षी घरट्याच्या अस्तराशिवाय शंख-शिंपल्यांचे तुकडे, खडे किंवा गवतासारख्या वस्तू यांचा उपयोग करतात.ज्या पक्ष्यांची झाडावर वीण होते,असे पक्षी काटक्या,मुळ्या,

गवत,शेवाळ,इत्यादी वस्तूंचा उपयोग करून घरटी बांधतात.देवकन्हई मात्र चिखलाचं घरटं बांधते.होल्याचं घरटं म्हणजे आडव्या-तिडव्या ठेवलेल्या चार काटक्या,

नारंग पक्ष्याचं घरटं चेंडूसारखं गोलाकार आणि सुबक असतं.शिंपी पक्षी आपलं घरटं पानांनी शिवून तयार करतो. सुगरण पक्षी तर सुंदर आणि कलापूर्ण घरटी विणण्याकरिता प्रसिद्ध आहे.यजुर्वेदात तिच्या घरट्याचा उल्लेख आढळतो.



'सोमाय लवनालभते त्वष्ट्रे कौलीकान्'


अर्थात सौम्य स्वभावासाठी लवा नावाच्या पक्ष्याकडं व कलाकुसरीसाठी सुगरण पक्ष्याकडं पाहावं.


पक्ष्यांविषयीच्या ग्रंथांतून पाखरांच्या घरट्यांविषयी सविस्तर वर्णनं दिलेली असतात; परंतु पाखरं प्रत्यक्षात घरटी कशी बांधतात याविषयीचं निरीक्षण क्वचितच नोंदलेलं असतं.


 जिज्ञासू पक्षिनिरीक्षकांकरिता ही एक चित्ताकर्षक कामगिरीच आहे.पक्षी पिलांना भरविताना पाहणं जितकं सोपं आहे,तितकं घरटी बांधताना त्याचं निरीक्षण करणं सोपं नाही. याचं कारण असं की,

काही पक्षी आपली घरटी मोठ्या गूढपणे बांधीत असतात.घरटी बांधताना त्यांना कोणी पाहिलं,तर ते घरटं अपुरं सोडून ते निघून जातात.पुन्हा तिकडं फिरकतदेखील नाहीत.


याचा प्रत्यय आपणाला ऋग्वेदात केलेल्या वर्णनावरून येतो.पक्ष्याच्या पिलाप्रमाणं गूढस्थळी ठेवलेला,निधीप्रमाणं मौल्यवान, स्वर्गाहून आणलेला आणि दगडात झाकलेला सोम इंद्रानं प्राप्त केला. (१. १३०. ३). एका ठिकाणी पक्ष्यांची घरटी मृदू असतात असा उल्लेख आहे,तर अन्यत्र ती घरटी उबदार असल्याचा निर्देश आहे. (९. २०. ५)


सुरुवातीला घरट्याची जागा पक्षी जोडीनं शोधतात.अडई नावाची रानबदकं घरट्याची जागा भुईताडाच्या हिरव्या झुडपात निवडतात. झुडपात प्रवेश करण्यासाठी भुयार करतात. भुयार करताना पानं एकमेकांत गुंतवितात.काही चोचीनं छाटून टाकतात.आतल्या भागात बशीच्या आकाराची गादी करतात.त्यासाठी ताडाची पानं आणि पिसं उपयोगात आणतात. बहिरी ससाणा मात्र झाडाच्या शेंड्यावरील मजबूत फांदीच्या दुबेळक्यात घरटं करतो. सर्पगरुड आपलं घरटं उंच वृक्षाच्या शेंड्यावर करतो.

तेथून सारा टापू त्याच्या दृष्टिक्षेपात येतो. 


केम कुकडी आपलं तरंगतं घरटं पाणवनस्पतीच्या साहाय्यानं उंच वाढलेल्या देवधानात करते.परंतु हे घरटं पाण्यापासून फार दूर नसतं.कारण जेवढं घरट्यात प्रवेश करणं सोपं जावं,तेवढंच घरट्यातून निसटून पाण्यात जायलादेखील सहज शक्य व्हावं,असा त्यांचा हेतू असतो.सारस पक्ष्यांची जोडी एका ठरावीक क्षेत्रात,उथळ पाण्यात पाणवनस्पतीचा उंचवटा करून,त्यावर खोलगट आकाराचं घरटं बांधते, तेव्हा ते एखाद्या बेटासारखं दिसू लागतं.


बरेच पक्षी आपलं घरटं साध्या रीतीनं बांधतात. मत्स्य गरुडाची जोडी नवेगावबांध सरोवरातील बेटावर घरटं बांधताना मी अनेक वेळा पाहिली आहे.दर वर्षी त्यांना घरट्यासाठी नवीन जागा शोधावी लागत नाही.झाडावरील जुन्याच घरट्याची ते डागडुजी करतात.त्याकरिता चोचीत काटक्या घेऊन जुन्या घरट्यावर त्या रचतात. 


कित्येकदा हिरव्या पानांची एखादी फांदी तोडून नेतात.

त्यावरून समजतं,की या गरुडानं घरटं बांधण्यास सुरुवात केली आहे.घरट्याचं तक्तपोस तयार होताच त्यावर बसून हे गरुड काटक्या नीट रचून घेतात.ज्या वेळी तक्तपोस उंच होतं,त्या वेळी ते पायांनी तुडवितात.काड्या खाली-वर करून मध्य भागाला खोलगट आकार देतात.


जमिनीवर,तसेच झाडावर घरटी तयार करणारे पक्षी घरटी बांधण्याचं काम ठरावीक एका जागेवर बसून करतात.

घरटं बांधण्याची सामग्री चोचीनं रचीत असतात.त्यानंतर पायांनी तुडवून त्यास मध्यभागी खोलगट आकार देतात.


झाडावर कावळे घरटी बांधताना पाहणं मोठं मनोरंजक असतं.कावळ्यांच्या जोड्या आपापल्या जुन्या घरट्याचा ताबा घेऊन,त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करतात.

घरट्यात जोडीपैकी एक थांबतो.दुसरा घरट्यासाठी काड्या जमा करू लागतो.अनुभवी कावळे घरटं सोडून कधीही जाणार नाहीत.


तरुण कावळ्यांच्या जोड्या घरट्याचं साहित्य गोळा करून ते बांधायला सुरुवात करतात. मोठ्या प्रयत्नानं त्या घरटं रचीत असतात.पुन्हा पुन्हा जोडीनं काड्या गोळा करायला जातात; परंतु एवढ्या प्रयासानं बांधीत असलेल्या घरट्याची प्रगती होत नाही,याचं त्यांना आश्चर्य वाटतं.एकदा मला याचं कारण पाहण्याची संधी मिळाली.

तरुण कावळे घरट्याची सामग्री आणायला गेले,की शेजारच्या घरट्यातील कावळा हळूच त्यांच्या घरट्यातील काड्या चोरून स्वतःच्या घरट्यात आणून ठेवीत होता. तरुण कावळे घरट्याचं साहित्य घेऊन परतले, की तो शेजारचा कावळा,आपण त्या गावचे नाही,असा भाव आणून दुसरीकडं पाहात राही.


पंकोळीसारखे पक्षी आपली घरटी चिखलानं बांधतात.ते बांधताना पाहणं मोठं चित्तवेधक असतं.पक्ष्यांच्या अंड्यांतील जीवांचा विकास ती पाखरांच्या शरीराच्या तापमानाइतकी उबदार ठेवल्यानं होतो.अगदी कमी अथवा जास्त तापमानामुळं अंड्यातील जीव मरून जातो. पक्षी अंड्यांवर बसून त्यांचं योग्य ते तापमान ठेवतात.

पक्ष्याची मादी सर्वच अंडी एका वेळी घालू शकत नाही.

ठरावीक दिवसांच्या अंतरानं ती अंडी घालते.बरेचसे पक्षी रोज एक किंवा एक दिवसा आड एक अंडं देतात.

रानबदकानं घातलेल्या अंड्यांची संख्या मोठी असते.ही संख्या पुरी करायला रानबदकांना एखादा पंधरवडा तरी लागतो.अंडी उबविण्यास मात्र एकाच दिवशी सुरुवात करतात,याचं कारण असं,की शेवटचं अंडं घातल्याशिवाय ती उबविण्यास सुरुवात करीत नाहीत.


 घुबड मात्र एक-दोन अंडी घालताच ती उबविण्यास सुरुवात करीत असल्यानं सगळी अंडी उबविण्यास त्याला दीर्घ काळ लागतो.इतर पक्षी मात्र सुरुवातीच्या काळात अंडी उबवीत नाहीत,तर ती नुसतीच झाकून ठेवतात...


पोट आणि छाती यांच्या मध्ये कातड्याचा भाग असतो.

त्याचा उपयोग पक्षी अंडी उबविण्यासाठी करतात. या कातडीभोवतीची पिसं फुलवून हे पक्षी अंड्यावर त्याचं आवरण घालीत नाहीत, तोपर्यंत ती थंडच असतात.


अंडी उबविण्याचं काम फक्त मादीचं नसतं.लावा आणि पाणपिपुली या पक्ष्यांत फक्त नरच अंडी उबवितो; परंतु बऱ्याच पक्षिकुळांत नर आणि मादी आळीपाळीनं अंडी उबविण्याचं कार्य करतात. अशा वेळी ते एकमेकांपासून घरट्याचा ताबा कसा घेतात, हे पाहणं मोठं मनोरंजक असतं. 


पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सिताबर्डी-नागपूर


पाखरांच्या बाबतीत अंडी उबविणं हे कार्य म्हणजे त्यांचा आनंदसोहळा असतो.ते त्यांच्या बाबतीत नुसतं उबविणं राहात नाही,तर ते 'जाणिजे यज्ञकर्म' असतं.असंही दिसून येतं,की अनेक तासांनंतरही अंडी उबविणारा जोडीदार घरटं सोडायला तयार नसतो.घरट्यातून, अल्पकाळ का होईना,नर-मादींना जी मुक्तता लाभते,ती शांततापूर्वक असते.अशा प्रयत्नात एक प्रकारचं आश्वासन असतं.त्यामुळं त्यांचे संबंध दृढ होतात.जोडीदाराला मुक्त करण्यासाठी येणारा पक्षी अंड्यांवर बसण्याचा हेतू अनेक प्रकारांनी व्यक्त करतो.तो पोटावरची पिसं फुलवितो.

हळूवार कूजन करतो.बसलेल्या पक्ष्याला डोक्यानं दुशी मारतो.शक्य असल्यास घरटं बांधण्याचं साहित्य घेऊन येतो.साहजिकच अंड्यांवर बसलेल्या जोडीदाराला नाइलाजानं उठावं लागतं.तो घरट्याचं प्रथम निरीक्षण करतो.अंडी पाहून त्यांवर पुनश्च बसण्याचा मोह त्याला टाळता येत नाही;परंतु जोडीदार ही संधी साधून अंड्यांवर बसतो.पक्षी अंड्यांवर बसला,की तो चोचीच्या टोकानं अंडी घुसळतो.अंड्यांवर बसला असताना हे कार्य तो सतत करीत असतो.अंड्यांवर निरीक्षणासाठी चिन्हं केली,तर असं दिसून येईल की,ही अंडी गोल गोल फिरत असतात.जेणेकरून साऱ्यांना समान ऊब मिळते.जमिनीवर घरटी करणारे पक्षी घरट्याबाहेर चुकून गेलेलं अंडं पुन्हा लोटून आत घेतात.तुम्ही एखादं अंडं घरट्याच्या किनाऱ्यावर ठेवल्यास,पक्षी जेव्हा तिथं येईल,

तेव्हा हा प्रकार त्याच्या लवकर लक्षात येणार नाही.पण जेव्हा तो घरट्यातील अंड्यांवर स्थानापन्न होईल,तेव्हा त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटून घरट्याच्या काठावर पडलेलं अंडं तो चोचीनं पुन्हा आत घेईल.अंडं जर त्याच्या आवाक्याबाहेर असेल, तर तो उठून अंड्यापर्यंत जाऊन ते ढकलीत घरट्यात लोटील.


अंड्यातून जीव बाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा आतील पिलू शरीराचं प्रसरण करीत गोलगोल फिरत असतं.या जीवनचक्रातून जात असताना अंडं तडकतं.तीक्ष्ण अशा चोचीतील दातऱ्यानं पिलू आपल्या भोवतीच्या कवचाला बारीक छिद्र पाडतं.छिद्र उत्तरोत्तर मोठं होत असतं.अशा त-हेनं कवच फोडून द्विज बाहेर येतो.


माता-पिता या जन्मसोहळ्याकडं अनिमिष नेत्रांनी पाहात असताना,त्यांचं निरीक्षण करण्याचा आपण एक अपूर्व अनुभव घेत असतो.अंड्याला छिद्र पाडण्यापूर्वी अंतर्नाद येत असतो.माता-पिता वारंवार घरट्यातील अंड्यांकडं पाहात असतात.पूर्वीप्रमाणे अंड्यांवर बसण्यापेक्षा किंचित पंख पसरून मादी उभी राहाते.हे अभूतपूर्व दृश्य पाहून मला केशिराज संकलित कुकडीयेच्या दृष्टांताची आठवण झाली.


'कुकडी असे : ते आंडी घाली : पीलीं होति : तेयांसि पाखवा दे : अमृतकळा असे ते संचरे : तयातवं तीयें वाढति ।।' यातील अमृतकळेची कल्पना अभूतपूर्व आहे. कोंबडी अमृतकळेचा संचार पिलांना 'पाखवा' देऊन म्हणजे स्पर्शानं करते.


ज्या वेळी अंड्यांतून पिलं बाहेर पडतात,तेव्हा त्यांचे माता-पिता अंड्यांची कवचं उचलून बाहेर फेकतात.


पानगळीनंतर  पाने-फुले सोडून गेली म्हणून झाड त्यांचा द्वेष करत बसत नाही.ते वठत नाही. आपल्या जीवनावरचे प्रेमही सोडत नाही. आपल्या अंगची पुन्हा बहरण्याची आशा सोडत नाही.अनुकूल ऋतू आला की पुन्हा ते बहरून उठते.निसर्गात अशी अनेक दृश्ये आपण बघत असतो.पण त्यातून आपण आवश्यक तो बोध घेत नाही.कुणी सोबत सोडली,नाती तुटली, प्रेमभंग झाला

की माणूस लागलीच वठायला लागतो.जीवनातून उठतो.किंवा इतरांना जीवनातून उठवतो.फुलण्याची शक्यता असूनही तो फुलणे सोडतो.म्हणून हे असे होतो.झाडाला जसा नवा ऋतू भेटतो,तसेच माणसांनाही नवे कुणीतरी भेटत असते.नवे काही तरी घडण्याची शक्यता असतेच.त्यासाठी माणसांनी अवेळी वठून जाणे सोडले पाहिजे.!


डॉ.रवींद्र श्रावस्ती








२७/९/२४

हिमबिबळ्यासोबत / With snowball

त्यांची मोहीम सुरू झाली.हिमालयात एका डोंगरावरून समोरच्या डोंगरावर दिसणारं आश्रयस्थान अगदी जवळ दिसत असलं,तरी त्या दरीत उतरून परत दुसऱ्या डोंगरावर जाणं ही सोपी गोष्ट नसते.रॉड आणि डार्ला यांना या वेळी एक गोष्ट जाणवली,त्यांनी गिर्यारोहणाचं पद्धतशीर प्रशिक्षण घेतलं नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांच्याकडे गिर्यारोहणाची कसलीच साधनं नव्हती.

दोन एप्रिललाच त्यांनी आपला पहिला तळ प्रस्थापित केला.हिमालयात दिवस तसा छोटा वाटतो.एका डोंगराआडून सूर्य वर येतो आणि दुसऱ्या डोंगराआड दडतो,त्या मधल्या काळात मिळेल तो सूर्यप्रकाश.

तीन एप्रिलला सूर्य उगवण्याच्या आधीच रॉड उद्योगाला लागला.तो डोंगरमाथ्यावर पोहोचला.त्याने दुर्बीण डोळ्याला लावली.त्यांनी जिथे सापळा लावला होता त्या कड्यावर त्याला हालचाल दिसली.


तो सापळ्यात अडकलेला बिबळ्या होता.त्या दोघांचा स्वतःच्या नशिबावर विश्वास बसेना.गेले काही महिने हिमवादळात फसलेल्या आणि अनेक अडचणींना तोंड देऊन इथपर्यंत पोहोचलेल्या रॉड आणि डार्लाच्या दृष्टीने तो क्षण अतिशय महत्त्वाचा होता.

पण त्यांच्या मोहिमेचा हेतू फक्त हिमबिबट्या पाहणं एवढाच नव्हता.रॉडने कॅलिफोर्नियात जंगलातील मुक्त प्राण्यांना कसं हाताळावं,त्यांना बेशुद्ध कसं करावं याचं प्रशिक्षण घेतलं होतं.ते कृतीत आणायची वेळ येऊन ठेपली होती.इथे एका रान हिमबिबळ्याला बेशुद्ध करायचं,त्याच्या गळ्यात रेडिओप्रक्षेपक बसवलेली गळपट्टी बांधायची आणि नंतर त्या हिमबिबळ्याला सुखरूप परत सोडायचं,ही त्या प्रशिक्षणाची खरी कसोटी होती.त्यातच याआधी कुणीही, कधीही हिमबिबळ्या पकडलेला नव्हता. त्यामुळे त्यात येणाऱ्या अडचणींबद्दल कुठलीही मार्गदर्शक सूत्रं उपलब्ध नव्हती.त्या हिमबिबळ्याला बेशुद्ध करताना रॉड खूपच नर्व्हस झाला होता.डार्ला त्याला 'मन शांत ठेव' असं वारंवार बजावत होती.एक डोंगर उतरून ते खाली आले तेव्हा रॉडने रायफलच्या साहाय्याने दुरून इंजेक्शन मारण्यापेक्षा जवळ जाऊन खास काठीच्या साहाय्याने इंजेक्शन टोचणं योग्य ठरेल,हा आपला निर्णय जाहीर केला.आता ते चढ चढू लागले होते.मार्ग काटेरी झुडुपांमधून जात होता.त्या पायवाटेवर खूप दगडगोटेही होते.थोड्याच वेळात ते हिमबिबळ्या अडकलेल्या सापळ्याजवळ पोहोचले. हिमबिबळ्या आक्रसलेल्या डोळ्यांनी एकटक त्यांच्याकडे नजर रोखून पाहत होता. त्याने रॉडवर झेप घेतली.त्याची शेपूट जोरात फिरली,पण तो सापळ्यात जेरबंद असल्यामुळे त्याची ही झेप अयशस्वी ठरली. रॉडची अस्वस्थता वाढली होती.तो झपाट्याने त्या हिमबिबळ्याजवळ पोहोचला. त्याने पुढे होऊन ती इंजेक्शनची काठी बिबळ्याच्या खांद्याच्या दिशेने झपकन ढकलली.बिबळ्याने बाजूला झेप घेता घेता पंज्याने ती काठी बाजूला ढकलली. इंजेक्शनमधलं सर्व औषध जमिनीवर सांडलं.रॉड चडफडतला.ते दोघंही थोडं अंतर मागे सरकले,एका आडोशाआड दडले.रॉडने फुंकनळी आपल्या पाठीवरच्या पिशवीतून बाहेर काढली.त्याला आता नवा प्रयत्न करायला हवा होता.झालेल्या घटनेमुळे असेल,तो घामाने डबडबला होता.


त्याने प्रयत्नपूर्वक हात स्थिर राखला.पाण्याची बाटली उघडली.केटामाइन हायड्रोक्लोराइडची पूड पाण्यात विरघळवली.ती इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये भरली.ते परत त्या हिमबिबळ्या जवळ गेले.त्या बिबळ्याने सुटायची धडपड केली.रॉडने दीर्घ श्वास घेतला,नळी तोंडात धरली आणि जोरात फुंकली.

इंजेक्शनची सुई बिबळ्याच्या दाट,केसाळ कातडीवर आदळली आणि खाली पडली.त्यातलं सर्वच्या सर्व औषध जमिनीवर सांडून वाया गेलं.रॉडने कपाळावर हात मारून घेतला. त्याने परत एकदा इंजेक्शनमध्ये औषध भरलं.या वेळेस त्याने डार्लाऐवजी लोबसांगला बरोबर घेतलं होतं.तिघं त्या हिमबिबळ्याजवळ पोहोचले.रॉड अतिशय संथगतीने गुडघ्यात वाकून एक-एक पाऊल उचलून पुढे पुढे सरकू लागला.

दुसऱ्या बाजूने लोबसांग पुढे सरकला.त्याच्या हालचालीमुळे बिबळ्या फसला.त्याने लोबसांगच्या दिशेने चाल केली.रॉड याच संधीची वाट पाहत होता.

अखेरीस इंजेक्शनची सुई बिबळ्याच्या शरीरात घुसली.रॉडने सुटकेचा निःश्वास टाकला.पहिल्या प्रयत्नाला ४५ मिनिटं होऊन गेली होती.मग बिबळ्या बेशुद्ध व्हायची वाट बघत ते तिघंही बसून विश्रांती घेऊ लागले.अखेरीस बिबळ्या बेशुद्ध झाला.


लोबसांग आणि रॉडने त्या बिबळ्याला उचलून त्यातल्या त्यात सपाट जागेवर ठेवलं.मग त्याच्या गळ्यात रेडिओ लहरी प्रक्षेपक बसवलेली गळपट्टी बांधली.या प्रक्षेपकाला ऊर्जा पुरवणारी बॅटरी दोन वर्ष चालणार होती.तेवढ्यात बिबळ्या शुद्धीवर येण्याची चिन्हं दिसू लागली.रॉडने दिलेला औषधाचा डोस कमी पडला असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी झपाट्याने बिबळ्याची त्या सापळ्यातून सुटका केली.

रॉडने त्याला प्रतिजैविक टोचलं.त्याच्या अंगावरच्या गोचिडी आणि त्याच्या केसांचे नमुने घेतल्यावर ते तिघंही झपाट्याने तिथून दूर झाले.सर्व नमुने गोळा करणं,त्यांच्यावर चिठ्ठ्या चिकटवणं आणि ते जपून ठेवणं,हे काम डार्लाचं होतं.त्याकरिता छोट्या छोट्या काचेच्या कुप्या आपल्याजवळ ती सतत बाळगत असे.त्या बिबळ्याला त्यांनी 'एक' असं नाव लोबसांगच्या सांगण्यावरून दिलं. त्यांनी मग 'एक'च्या कानावर चाकूने खूण केली खरं तर अशा प्राण्यांच्या कानावर गोंदवलं जातं;पण त्यांनी काठमांडू सोडेपर्यंत अमेरिकेतून येणारी गोंदवण्याची सामग्री त्यांना मिळालेली नव्हती.तिथून निघण्यापूर्वी त्या हिमबिबळ्याच्या अंगावरून डार्लाने आपुलकीने

हात फिरवला होता.ते तिथून दूर झाले आणि दहा मिनिटांतच बिबळ्याला हुशारी आली.थोड्याच वेळात पूर्ण शुद्धीवर येऊन तो धडपडत दिसेनासा झाला.मग थोडा वेळ त्याचा माग काढून हेही आपल्या तळावर परतले.जे काही घडलं त्यामुळे रॉड असमाधानी होता.त्याचे फसलेले प्रयत्न,औषधाचं

कमी प्रमाण,फुंकनळी फुंकताना झालेली गफलत यामुळे तो स्वतःवरच चिडला होता.मग ते परत बिबळ्याच्या मागावर निघाले.जिथे बिबळ्याला बेशुद्ध केलं होतं त्या जागेपासून थोड्याच अंतरावर बिबळ्या बहुधा विश्रांती घेत असावा;कारण त्याच्या रेडिओ प्रक्षेपकातून येणारा बिप, बिप असा ध्वनी एकाच ठिकाणाहून येत होता.बिबळ्या ज्या घळीत होता तिथपर्यंत जाऊन खात्री करून घेणं शक्य नव्हतं,तशी अवघड जागा त्याने विश्रांतीसाठी निवडली होती.तो विश्रांती घेतोय की जखमी झालाय,या काळजीने रॉड आणखीनच अस्वस्थ झाला होता.डार्ला त्याला समजवायचा प्रयत्न करून थकली.अखेरीस रात्री उशिरा गळपट्टीतून येणारे इशारे हलू लागले. त्यांच्यापासून बिबळ्या झपाट्याने दूर चाललाय हे लक्षात आलं तेव्हा कुठे रॉड नीटसा भानावर आला.याच सुमारास काही निसर्ग संवर्धकांनी मिळून एक संस्था स्थापन केली होती.


'इंटरनॅशनल ट्रस्ट फॉर नेचर काँझर्वेशन' ही त्यांची संस्था आता रॉडच्या प्रकल्पाच्या मदतीला पुढे आली.

त्यांच्या नेपाळमधील कार्यानुभवाचा रॉड आणि डार्लाच्या हिमबिबळ्या मोहिमेस खूप फायदा झाला. शिवाय त्यांनी या दोघांच्या मोहिमेला आवश्यक ती साधनसामग्री पुरवली आणि आर्थिक मदतही दिली.आयटीएनसीच्या चक मॅक् डुगलने रॉडला दूरछायाचित्रणाबरोबरच वन्यप्राण्यांना बेशुद्ध कसं करावं याचे धडे दिले;त्याबरोबरच एक घडी करून ठेवता येईल आणि हवी तेव्हा फुगवून वापरता येईल अशी एक रबरी होडी दिली.त्या होडीत दोन माणसं बसू शकत होती. या होडीच्या साहाय्याने आता रॉड आणि डार्ला लंगू नदी केव्हाही ओलांडू शकणार होते.याशिवाय आयटीएनसीमुळे त्यांना आता 'स्काय व्हॅन'ची सेवा उपलब्ध होती,ही सर्वांत आनंदाची गोष्ट ठरली.'स्काय व्हॅन' मोटारीला पंख लावावेत तशी दिसते.या विमानाची मागची खालची बाजू पूर्ण उघडून जमिनीला टेकते.त्या उतारावरून एक जीप आरामात विमानाच्या पोटात शिरू शकते.ही जीप आणि माणसांसकट हे विमान पर्वतांवरून उडत जाऊन कुठल्याही सपाट जागी उतरवता येतं.

नेपाळमध्ये तेव्हा सर्व विमानसेवा नेपाळी शाही लष्कराच्या ताब्यात होती.त्यांच्या सहकार्यामुळे यांच्या मोहिमेचा पुढचा मार्ग मोकळा झाला.


'एक'ला रेडिओ गळपट्टी बसवली खरी,पण तरीही त्याचा माग काढणं सोपं नव्हतं.हे एखाद्या दरीत आणि 'एक' दुसऱ्या दरीत असेल तर त्याच्या गळपट्टीतून निघणारे संदेश यांना मिळतच नसत.

सातत्याने उंच डोंगरांवरून चाललं तरच मग 'एक'चा मागोवा घेता येत होता.हे वाटतं तितकं सोपं नाही,

याचा त्यांना लवकरच प्रत्यय आला; पण त्यामुळे त्यांना जास्त काळ 'एक'कडून येणारे संदेश ग्रहण करणं शक्य होऊ लागलं.


त्यांनी नंतर आपली प्रगती 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'ला कळवली.त्यांना त्या संस्थेकडूनही निधी उपलब्ध झाला.त्या दोघांनी आणखी काही हिमबिबळ्यांना रेडिओ गळपट्ट्या बसवल्या.१९८३ चा मोसम त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. पण डार्लाच्या मते पहिल्या मोहिमेतल्या अनुभवांमुळे पुढचे थरार फारसे गंभीर वाटले नव्हते.त्यांच्या या यशस्वी मोहिमांमुळे निसर्ग संवर्धक म्हणून या जोडीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.


त्यांचे सर्व चित्तथरारक अनुभव जाणून घ्यायचे असतील तर हे पुस्तक वाचायलाच हवं.एक कारकून स्त्री एक दिवस नोकरी सोडते काय आणि काही दिवसांत हिमालयात येते काय;तिथे यापूर्वी कुणालाही न जमलेल्या प्रयत्नात हे जोडपं यशस्वी होतं काय सगळंच अद्भुत ! •


जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे खरे चरित्र शोधायचे असेल,तर तुम्हाला फक्त त्याला कशाची आवड आहे,याचे निरीक्षण करावे लागेल.- शॅनन एल.अल्डर


२५.०९.२४ या लेखातील शेवटचा भाग..।।




२५/९/२४

कारकुन ते संशोधक/Clerk to researcher

विज्ञान,संशोधन यांच्याशी अजिबात संबंध नसलेली डार्ला हिलार्ड काहीतरी वेगळं करायचं म्हणून हिमबिबळ्याच्या शोधमोहिमेत सहभागी झाली.

नेपाळच्या सीमेवरच्या अतिदुर्गम भागातल्या त्या मोहिमेने तिचं आयुष्य बदललं. मनात आणलं तर चारचौघांसारखं जगणारी माणसंही चाकोरी मोडू शकतात,याची जाणीव करून देणारी ही गोष्ट.


 स्नो लेपर्ड (हिमबिबळ्या) हा एक अत्यंत दर्शनदुर्लभ प्राणी आहे.हिमबिबळ्याच्या शोधाचे आणि त्याच्या शास्त्रीय अभ्यासाचे वेळोवेळी अनेक प्रयत्न झाले.

दिवसेंदिवस हा प्राणी नष्टप्राय होत चालला आहे,त्याचं प्रमुख कारण जसं त्याच्या अधिवासावर होणारं मानवी आक्रमण हे आहे;तसंच दिवसेंदिवस अधिक उंचीवर सरकणारी हिमरेषा हेही आहे. नावाप्रमाणेच हिमबिबळ्या हा हिमाच्छादित प्रदेशात आणि त्याखालच्या वनांमध्ये वावरत असतो.डार्ला हिलार्डच्या 'व्हॅनिशिंग ट्रॅक्स फोर इयर्स अमंग द स्नो लेपर्ट्स ऑफ नेपाळ' या पुस्तकात हिमबिबळ्यावरच्या एका विशेष प्रकल्पाचं वर्णन आहे.


हिमबिबळ्यावरचं एक पुस्तक यापूर्वी मी वाचलेलं होतं-पीटर मॅथीसनचं 'स्नो- लेपर्ड'.हे पुस्तक अतिशय वाचनीय होतं.मॅथीसनने हिमबिबळ्याच्या शोधासाठी १९७८ च्या सुमारास काढलेल्या मोहिमेवरचं हे पुस्तक खूप खपलं.मॅथीसन,जॉर्ज शाल्लर ही मंडळी आंतरराष्ट्रीय भटक्या जमातीचं प्रतिनिधित्व करतात.ते खरे निसर्गपूजक आहेत.त्या दोघांवर स्वतंत्र लेख लिहायला हवेत,हे खरं.तरीसुद्धा मी डार्ला हिलार्डवर लिहायचं ठरवलं याला एक खास कारण आहे.डार्लाचा विज्ञानाशी दूरान्वयानेही संबंध नव्हता.ती चौदा-पंधरा वर्षं टायपिस्ट आणि सेक्रेटरी म्हणून काम करत होती.स्नो लेपर्ड प्रकल्पात सामील होण्यासाठी तिच्यापाशी कुठलंही खास कौशल्य किंवा वैज्ञानिक ज्ञान नव्हतं;पण तिचा दृढनिश्चय,जिद्द आणि या प्रकल्पाचा संचालक रॉड जॅक्सन याच्यावरील विश्वास या तीन गोष्टींमुळे वयाच्या बत्तिसाव्या वर्षी ती या मोहिमेत सामील झाली.


(कारकुनीतून संशोधनाकडे - डार्ला हिलार्ड,हटके - भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन..)


रॉड जॅक्सन हा वन्यप्राणी शास्त्रज्ञ (वाइल्ड लाइफ बायॉलॉजिस्ट).हिमालयातील हिमबिबळ्यांचा अभ्यास करण्याची कल्पना १९७६ मध्ये त्याच्या डोक्यात जन्माला आली. मोहिमेचा हेतूच खूप महत्त्वाकांक्षी होता- हिमबिबळ्याला रेडिओ प्रक्षेपक असलेली गळपट्टी (रेडिओ कॉलर) बांधणं.ही मोहीम चक्क यशस्वी झाली.

त्यामुळे हिमबिबळ्याबद्दलची बरीच वैज्ञानिक माहिती वन्यप्राणिशास्त्राच्या अभ्यासकांना उपलब्ध होऊ शकली. 


हिमालयाच्या उतारांवर नेपाळ-तिबेट सीमेजवळच्या लांगूदरीच्या परिसरात त्यांचा हा प्रकल्प पार पडला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना काम करावं लागलं.या मोहिमेत काढलेल्या टिपणांच्या आधाराने डार्लाने हे पुस्तक लिहिलं.सान फ्रान्सिस्कोत कारकुनी करणाऱ्या डार्लाने रॉडबरोबर हिमालयात १६०० कि.मी.पायपीट करावी,ही तिच्या आयुष्यातील सर्वांत अद्भुत घटना म्हणावी लागेल.१९६९ मध्ये जॉर्ज बी.शाल्लरने हिमबिबळ्यांची शोधमोहीम सुरू केली.पाच- सहा वर्षं त्याला या बिबळ्याने चकवा दिला.एकदाच पाकव्याप्त चिथळ खोऱ्यात एका हिमबिबळ्याची मादी आणि तिचं पिल्लू तो पाहू शकला.त्यांच्यासाठी मांस ठेवून त्याने त्यांची पाच छायाचित्रं मिळवली.दरम्यानच्या काळात स्थानिक शिकाऱ्यांनी सात हिमबिबळ्यांची शिकार केली होती.त्यामुळे त्या भागात हिमबिबळ्याचं दर्शन अवघड होऊन बसलं होतं.नेपाळमधली परिस्थिती फारशी वेगळी नव्हती.आता पृथ्वीवर किती हिमबिबळे शिल्लक आहेत याची कुणालाच कल्पना नाही. ते शेळ्या- मेंढ्यांची शिकार करतात म्हणून अजूनही त्यांची सापळ्यात पकडून किंवा विष घालून हत्या केली जाते.यापेक्षाही एक मोठी आपत्ती या प्राण्यांवर आणि इथल्या जनसामान्यांवर कोसळू पाहते आहे.ती म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास.या हिमबिबळ्यांवरचं दुसरं मोठं संकट राजकीय आहे.त्यांचा अधिवास असलेले बहुतेक प्रदेश हे एकमेकांना शत्रू मानणाऱ्या किंवा फारसे मित्रत्वाचे संबंध नसलेल्या शेजारी देशांच्या सीमेवर आहेत.


रॉड जॅक्सनचा जन्म तेव्हाच्या होडेशियात १९ जानेवारी १९४४ ला झाला.प्राण्यांचं वेड त्याच्या रक्तातच होतं.पुढे उच्च शिक्षणासाठी तो कॅलिफोर्नियाला राहायला गेला.

त्याने प्राणिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं.त्याचं आयुष्य बदलून टाकणारी एक घटना अचानक घडली.नेपाळच्या पश्चिम सीमावर्ती भागात १९६१ आणि १९६४ मध्ये दोन ब्रिटिश मोहिमा गेल्या होत्या.त्यांचं नेतृत्व जॉन टायसनने केलं होतं.तो १९७०च्या सुमारास कॅलिफोर्नियात आला असताना त्याने या मोहिमांसंबंधी व्याख्यानं दिली.

मोहिमेशी संबंधित चित्रफीत पाहून रॉड खूप प्रभावित झाला. त्या भागात भरलचे मोठमोठाले कळप वावरत होते.भरल ही पहाडी बकऱ्यांची जात. ती हिमालयात खूप उंचावर आढळते.हे भरल हिमबिबळ्यांचं प्रमुख खाद्य आहे.त्यामुळे या भागात हिमबिबळे आढळण्याची शक्यता अधिक आहे,असं टायसनने जॅक्सनला सांगितलं.हिमबिबळ्याच्या ओढीने १९७६ मध्ये रॉड जॅक्सन पहिल्यांदा या भागात पोहोचला.


त्याला हिमबिबळ्याच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे मिळाले खरे,पण प्रत्यक्ष हिमबिबळ्याचं दर्शन मात्र घडलं नव्हतं.

१९७७ मध्ये संशोधन अनुदान मिळवता यावं म्हणून रॉड आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून 'कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल स्टडीज' ही संस्था (सीआयईएस) स्थापन केली.हिमबिबळ्याच्या संशोधनासाठी अनुदान मिळवणं हे त्याच्या दर्शनाएवढंच दुर्लभ असल्याचं रॉडच्या लवकरच लक्षात आलं. त्याच्या अनुदानाच्या अर्जावर आणि प्रकल्पाच्या मसुद्यावर चर्चा करताना त्याला एक प्रश्न हमखास विचारला जात असे,तो म्हणजे जे जॉर्ज शाल्लरला जमलं नाही ते तुला कसं जमेल? पुस्तकात डार्ला म्हणते,'त्यांना रॉडसारखा प्राणिशास्त्रज्ञ जर या कामासाठी अननुभवी वाटत होता,

तर रॉडची प्रमुख सहायक असलेल्या डार्ला हिलार्डचा प्राणिशास्त्राशी काहीच संबंध नाही,हे कळलं असतं तर काय वाटलं असतं ?' डार्ला छोटी असताना तिचे वडील तिला आणि तिच्या भावंडांना घेऊन उन्हाळ्याच्या सुटीत सिएरा नेवाडा पर्वतराजीत जात.ही दोन आठवड्यांची सुट्टी डार्लाला खूप आवडत असे. रात्री शेकोटीभोवती गप्पा,झऱ्याच्या पाण्यात स्नान हे तिच्या दृष्टीने खरोखरच स्वर्गसुखासमान होतं.पुढे तिने चार वर्षं टायपिस्ट म्हणून काम केलं.त्यानंतर सेक्रेटरी म्हणून एका आर्किटेक्चरल फर्ममध्ये काम करण्यासाठी ती इंग्लंडला पोहोचली. त्या चार वर्षांत ती युरोपभर भटकली.त्या वेळी एकदा ग्रीसमधल्या एका खेड्यातल्या घरात राहताना तिला खेड्यातलं जीवन आपल्याला अधिक भावतं हे लक्षात आलं.तेरा वर्षं कारकुनी काम केल्यानंतर १९७८ मध्ये तिला आपण काही तरी वेगळं करायला हवं असं वाटू लागलं.बरं,ती पदवीधर नव्हती. अशी अर्धशिक्षित,बत्तीस वर्षांची बाई वेगळं तरी काय करणार? त्याच वेळी नेमकी रॉडच्या संस्थेची एक जाहिरात तिच्या पाहण्यात आली. शनिवार-रविवार निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गेतिहासाचे प्राथमिक धडे गिरवायचे,हा उद्योग तिला नेहमीपेक्षा वेगळा वाटला.तिने त्वरित संस्थेचा दरवाजा ठोठावला.पहिल्या भेटीतच डार्लाची रॉडशी मैत्री झाली.ही मैत्री पुढे वाढत गेली.डार्लाला त्याचं निसर्गप्रेम खूप भावलं.नेपाळच्या लांगू खोऱ्यातून तेव्हा तो परतला होता,पण मनाने अजून त्या भागातच वावरत होता.

जसजसे दिवस लोटत होते तसतसा तोअस्वस्थ होत होता;पण आर्थिक प्रश्न कसा सोडवायचा,हे काही त्याला सुचत नव्हतं. हिमबिबळ्याचा माग काढणं म्हणजे यशाची खात्री नसलेला प्रकल्प;त्यासाठी त्याला कुणीच त्राता भेटत नव्हता.अशा परिस्थितीमध्ये त्याला एका नियतकालिकात एक जाहिरात दिसली 'द रोलेक्स ॲवॉर्ड'ची.'रोलेक्स पारितोषिक' दर दोन वर्षांनी जगावेगळ्या पण महत्त्वाच्या कार्यात गुंतलेल्या व्यक्तींना दिलं जातं.दर वेळेस त्यासाठी पाच व्यक्तींची निवड केली जाते.या व्यक्तींना ५० हजार स्विस फ्रैंक्स या कार्यासाठी मिळतात. (साधारणपणे २५ हजार अमेरिकी डॉलर) एखाद्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात काही तरी नवा मार्ग चोखाळणाऱ्या व्यक्तीला,तसेच विज्ञान आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात चाकोरीबाहेर पडून कार्य करणाऱ्या व्यक्तीला हे पारितोषिक मिळतं.


रॉडला डार्ला स्वीय सचिव म्हणून एका मोठ्या कंपनीत काम करते हे ठाऊक होतं.त्यामुळे त्यानं 'रोलेक्स पारितोषिकासाठी प्रकल्प सादर करायचाय,तू तो टाईप करशील का,तसंच त्यात व्याकरणशुद्ध मजकूर आणि त्याचं संपादन करणं यासाठी मदत करशील का?'असं विचारलं.प्रकल्पाचं नाव होतं, 'अ रेडियो ट्रॅकिंग स्टडी ऑफ स्नो लेपर्ड्स इन नेपाल'.डार्लाने होकार दिला.या अभ्यासाबरोबरच 'भरल आणि हिमालयन तहर' या दोन पर्वती बकऱ्यांचाही अभ्यास करायचा होता.

रॉडचा हा प्रकल्प मान्य झाल्याची तार त्याला नोव्हेंबर,८० मध्ये मिळाली.तो या दोघांनाही आश्चर्याचा सुखद धक्काच होता.या पारितोषिक वितरण समारंभासाठी त्यांना जिनिव्हाला बोलावण्यात आल्याचं पत्र या तारेमागोमाग येऊन थडकलं.हा समारंभ एक आठवडाभर चालतो.तो मे १९८१ मध्ये साजरा होणार होता. दरम्यानच्या काळात हे दोघं इतर प्रकल्पांवर काम करत होते.त्या निमित्ताने त्यांची जवळीकही वाढत होती.जिनिव्हाला दोघं एकत्र जाणार हे निश्चित होतं,पण पुढे काय हा प्रश्न होता.डार्लाने लग्न करून दोघांनी हिमालयात जावं असं सुचवलं.रॉडने तिला अशा मोहिमांत येणाऱ्या अडचणी अगदी रंगवून रंगवून सांगायला सुरुवात केली.डार्लाला तर तिच्या कारकुनी आयुष्यातून सुटका हवी होती.त्यामुळे तिचा त्या मोहिमेवर जाण्याचा निश्चय अधिकाधिक दृढ होत होता.


हिमबिबळ्या मध्य आशिया,अफगाणिस्तान,पाकिस्तान,

भारत,नेपाळ आणि तिबेटमधील हिमाच्छादित पर्वतरागांमध्ये आढळतो.या सव्वा कोटी चौरस कि.मी. भूप्रदेशात मिळून जेमतेम पाच-सहा हजार हिमबिबळे अस्तित्वात असावेत असा एक अंदाज व्यक्त केला जातो.गेल्या चाळीस वर्षांत या बिबळ्यांच्या अधिवासा -

पैकी फक्त दोन ते चार टक्के भागाचा जेमतेम अभ्यास झाला आहे.'इंटरनॅशनल युनियन फॉर काँझर्वेशन ऑफ नेचर' या संस्थेच्या नाहीशा होत चाललेल्या प्राण्यांचा यादीत नऊ प्रकार आहेत.त्यातल्या लवकरच नष्ट होऊ शकतील अशा प्रकारात हिमबिबळ्याचा समावेश केलेला आहे. त्यामुळेच हिमबिबळ्याच्या अभ्यासासंदर्भात रॉडनी जॅक्सनची मोहीम फार महत्त्वपूर्ण मानली जाते.नोव्हेंबर १९८१ मध्ये रॉड आणि डार्ला काठमांडूत दाखल झाले.या शहरामध्ये या मोहिमेचा मुख्य तळ असणार होता.


मोहिमेत एकूण सहाजण असणार होते.त्यातला कुर्ट स्टोल्झेनबर्ग हा अमेरिकी सहाध्यायी डार्लाच्या या मोहिमेतील सहभागाबद्दल काहीसा साशंक होता.

मोहिमेतले उरलेले तीन सदस्य स्थानिक नेपाळी होते.या तिघांना नेपाळी भाषेतला एकही शब्द माहीत नव्हता.डार्ला आणि कुर्ट यांच्यावर खरेदीची जबाबदारी सोपवून रॉड सरकारी कारकूनशाहीशी झगडत होता.

त्यांच्या नेपाळी सदस्यांतला जमुना हा जीवशास्त्रज्ञ अनुदान देणाऱ्या संस्थेनेच पुरवला होता.जमुनावर हिमबिबळ्याचं मुख्य भक्ष्य असणाऱ्या भरल या प्राण्याच्या अभ्यासाची प्रमुख जबाबदारी होती.त्याशिवाय तहर म्हणजे हिमालयात उंचीवर आढळणाऱ्या शेळीचाही त्याने अभ्यास करावा,अशी सूचना करण्यात आली होती. याशिवाय कर्केन अणि लोपसांग हे दोन शेर्पा त्यांच्या मदतीस होते. त्यांचा दुसरा मुक्काम डोल्फू इथे होता.

इथलं खाणं आणि राहण्याची व्यवस्था बघून कुर्टला धक्का बसला.दरम्यानच्या काळात त्याची आणि जमुनाची मैत्री झाली होती.कुर्टने यापुढे याहून कष्टांत राहावं लागेल हे कळल्यावर मोहीम सोडून अमेरिकेत परतायचं म्हणून तिथून रॉडचा निरोप घेतला.जाताना तो जमुनालाही बरोबर घेऊन गेला.आता रॉड,डार्ला आणि मिळेल ती स्थानिक मदत यावरच मोहीम पार पाडावी लागणार होती.त्या वर्षी यापूर्वी कधी नव्हे एवढी थंडी डोलफूने अनुभवली.डार्ला लिहिते,'हे आधीच कळतं तर आम्हीही काही दिवसांसाठी काठमंडूला परतलो असतो.'


हिमवर्षाव संपायला एप्रिल उजाडला.तोपर्यंत अन्नाची वानवा निर्माण झाली होती.मधल्या काळात त्यांनी सामान वाहून नेण्यासाठी एक याक आणि बिबळ्याला आमीष म्हणून एक शेळी घेतली होती.शिधासामुग्री आणायला रॉडला परत काठमांडूला जावं लागणार होतं. जाऊन परत यायला सहा ते सात आठवडे लागणार होते.त्यांना छोटं विमान भाड्याने मिळालं तर हवं होतं.पण नेपाळमध्ये तेव्हा सर्व विमानं सरकारी मालकीची होती.ती मिळवायची तर बरेच कागदी घोडे नाचवावे लागणार होते. जुलैच्या मध्यास मोसमी पावसाला सुरुवात होते. त्यामुळे आता रॉड काठमांडूहून परतल्यानंतर त्यांना हिमबिबळ्याच्या अभ्यासाकरिता फक्त एक महिनाच जेमतेम मिळणार होता.


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखमालेत..।

२३/९/२४

कविता जगली / poem lived

तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता.निर्भय तिच्या पोटात वाढत होता.

माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता.मी कंत्राटी कामगार होतो.आणि वेळ अशी आली होती,घरातलं सगळं राशन संपलं होतं.गॅस संपून आठ दिवस झाले होते.स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती.टीव्ही चा रिचार्ज संपला होता.त्यामुळे टीव्ही ही बंद होता.रोजचं येणारं दूध बंद केलं होतं.घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता.तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते.तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता.गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे.तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे.

दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही.उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती.आणि माझ्यासोबत लढत होती.परंतु आजची परिस्थितीच भयंकर होती.घरात थोडेसे तांदूळ शिल्लक राहिले होते.बाकीचे सगळे डब्बे रिकामे झाले होते.एका वेळची सोय होणार होती.आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो.पण माझा फोन कुणीच उचलत नव्हतं.कारण,त्यांना माहीत होतं हा पैसे मागायलाच फोन करतोय.


सगळ्यांकडून उसने घेऊन झाले होते.त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती.एकाने फोन उचलला आणि मी बोलायच्या आधीच तो म्हणाला नितीन थोडेफार पैसे असले तर दे ना,मी काहीच उत्तर दिलं नाही फोन कट केला.आणि कुणालाच फोन करून काही होणार नाही.आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनात विचार करून मी खाली अंथरलेल्या चटईवर बसलो.


तिची अंघोळ झाली होती.आम्ही पुण्यात पिंपळे निलख मध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत होतो.टीव्ही बंद असल्यामुळे तिला करमत नव्हतं.तिचा मूड ठीक करण्यासाठी मी कधीतरी तिच्या आवडीचं सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे हे गाणं गुणगुणत असायचो.मी गाणं गायला सुरवात केली,पण ती एकटक खाली मान घालून चटईवर बोट फिरवत होती.तिने लक्षच दिलं नाही.माझ्या कवितेवर ती फार प्रेम करते म्हणून कवितेच्या ओळी म्हणायला सुरवात केली तेव्हा,तिने झटकन माझ्याकडे रागाने पाहिलं.मी मान खाली घातली.घराच्या उंबऱ्यावर भूक हंबरडा फोडायला लागली की घराच्या आत जगातलं कोणतंच संगीत आणि कोणतीच कविता मनाला आनंद देऊ शकत नाही.हे कळलं.


आम्ही बराच वेळ एकमेकांशी काहीच बोललो नाही.ती मान खाली घालून चटईवर बोटाने कोणती न उमटणारी अक्षरे गिरवत कुणास ठाऊक.सात महिन्याची गरोदर असणारी,एक नवा जन्म पोटात वाढवू पाहणारी,आई होण्याच्या उंबरठ्यावर असणारी दिपाली आमच्या बाळासाठी कदाचित एखादं नाव पुन्हा पुन्हा गिरवत असावी.मी तिच्या बोटाकडे एकटक पाहत होतो.ती स्व:ताला सावरत हळूहळू उठली.आणि दार उघडून बाहेर गेली.मी काहीच बोललो नाही.तिने शेजारच्या घरातून पेपर वाचण्यासाठी मागून आणला.कारण घरातली सगळी रद्दी या आठवड्यात तिने वाचून संपवली होती.

रविवार होता पेपरला पुरवण्या होत्या.तिचा चेहरा थोडासा खुलला आणि ती पुन्हा खाली बसली.


मी एकटक तिच्या डोळ्यात पाहत होतो.आणि ती पेपरची पाने चाळू लागली.आणि अचानक ती जोरात ओरडली.ओ चंदनशिवे हे बघा काय आलंय पेपरला.मी म्हणलं 'काय दिपाली? तर तिने मला विचारलं काय ओ चंदनशिवे तुम्ही कवी आहात ना? मी पार गळून गेलेल्या आवाजात म्हणलं,हो आहे पण काय करणार कवी असून आणि कविता तरी काय करणार आहे.माझी तिने हाताला गच्च धरून जवळ ओढलं आणि माझ्या समोर ते पेपरचं पान धरलं.आणि त्या पानावर असलेली जाहिरात मला आजही आठवतेय.!!अंशुल क्रियेशन प्रस्तुत,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली काव्यवाचन स्पर्धा.!! रोख रकमेची तीन बक्षिसे.खाली पत्ता होता चिंचवड,पुणे.आणि संपर्क साधा म्हणून मोबाईल नंबर दिलेला होता.मी ती जाहिरात बघितली.दिलेल्या नंबरवर फोन केला.नाव सांगितलं.नावनोंदणी केली.आणि मी दिपालीकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसायला लागली होती.ती म्हणाली,चंदनशिवे घरात शेवटचे सत्तर रुपये आहेत.ते मी तुम्हाला देतेय.या स्पर्धेत जा.आजच स्पर्धा आहे ही.तिथं कविता म्हणा,आणि त्यातलं सगळ्यात मोठी रक्कम असणारं बक्षिस घेऊनच घरी या.पण एक सांगते आज,जर तुम्ही बक्षिस नाही मिळवलं तर संध्याकाळी या घरात फक्त नितीन चंदनशिवे आत येईल.कवी नितीन चंदनशिवे पुन्हा या जगात कुठं दिसला नाही पाहिजे.तिच्या या वाक्याने माझ्या पोटातलं काळीजच कुणीतरी मुठीत गच्च आवळून धरल्यागत वाटायला लागलं.


 ती पुढे म्हणाली,जर माझ्या संसाराला तुमची कविता राशन मिळवून देऊ शकत नसेल तर ती कविता मला या घरात नकोयसात महिन्याची गरोदर असणारी,

सर्वसामान्य गृहिणीसारखी सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दिपालीचं त्यावेळी काही चुकलं असेल असं मला अजिबात वाटत नाही.मी ते तिचं आवाहन स्वीकारलं.तिने घरातले जपून ठेवलेले सत्तर रुपये माझ्या हातात देताना माझा हात घट्ट आवळून धरला आणि मला आतल्या आत हुंदका आला.मी अंगात कपडे घातले.तिच्या डोळ्यात बघितलं आणि निघालो.मी चिंचवडला आलो.बसच्या तिकीटला दहा रुपये गेले होते.तिथं प्रवेश फी पन्नास रुपये होती.ती भरली.ती भरत असताना माझ्या मनाच्या वेदना नाही मांडता येणार.परत जाण्यासाठी दहा रुपये शिल्लक राहिले होते.मी ते जपून ठेवले.बाजूला सर्वांसाठी नाष्ट्याची सोय केली होती.


मला खावंसं वाटलं नाही.कारण ती घरात उपाशी होती.मी मनातल्या मनात हादरून गेलो होतो.मी स्पर्धेला आलो होतो खरा पण,आतल्या आत माझ्या कवितेची माझ्या पत्नीशी स्पर्धा सुरू झालेली होती.

कारण इथं जिंकलो तरच माझ्या अंतरंगात कविता आयुष्यभर जिवंत राहणार होती.आणि हरलो तर,

फक्त शरीर घेऊन मेलेल्या मड्यागत जगणं समोर दिसत होतं.स्पर्धा सुरू झाली.बराच वेळ होत चालला होता.इतरांच्या कविता मला ऐकूच येत नव्हत्या.

कारण डोळ्यासमोर फक्त माझी गरोदर असणारी बायको दिसत होती.आणि उपाशी पोटाने तिने मला मारलेली ओ चंदनशिवे ही हाक ऐकू येत होती.


 माझं नाव पुकारलं गेलं.मी स्टेजवर जायला निघालो.तेव्हा,मी आयुष्यातला फार मोठा जुगार खेळायला चाललो होतो आणि डावावर कविता लावली होती.अन तेवढ्यात पायऱ्या चढून वर जाताना,स्टेजवर बाबासाहेबांचा आणि रमाईचा एकत्र असलेला फोटो दिसला.अंगावर काटा आला.

अंग थरथर कापलं.विज चमकावी तसं मेंदूत

काहीतरी झालं.रमाईला आणि बाबासाहेबांना डोळे भरून बघून घेताना अंगात बळ येत गेलं.इतकं बळ आलं की त्या क्षणाला मी जगातली कुठलीही स्पर्धा जिंकू शकत होतो.माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली.कविता संपली.

टाळ्या कानावर यायला लागल्या.त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला.


स्पर्धा संपली.पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाले.त्यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार होतं.मंचावर ते उपस्थित होते.सूत्रसंचालकाने विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी माईक हातात घेतला.आणि छातीत धडधड सुरू झाली.त्याने सर्वात आधी तृतीय क्रमांक पुकारला.टाळ्या सुरू झाल्या.तो तीन नंबरचा विजेता स्टेजवर गेला.त्याच्या हातात ट्रॉफी,गळ्यात शाल,पुष्पगुच्छ व ते पांढऱ्या रंगाचं पाकीट राजकुमार बडोले यांनी दिलं.त्याला तिथेच थांबवला.माझी नजर त्याच्या पांढऱ्या पाकिटावरून हटत नव्हती.


सूत्रसंचालकाने दुसरा नंबर घोषित केला.माझं नाव नव्हतं.पोटात अजून गोळा आला.तो विजेता ही तसाच जाऊन स्टेजवर थांबला.आणि आता सुत्रसंचालक प्रथम क्रमांक घोषित करणार होता.मी डोळे गच्च मिटून घेतले.पोटात कळ यायला लागली होती.छातीत धडधड वाढेलेली होती.दोन डोळ्यांच्या बंद पापणीच्या आड फक्त गरोदर असणारी माझी पत्नी माझी वाट बघत असलेली दिसत होती.आणि कानावर आवाज आला."आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता आहे,ज्याने तमाशा कविता सादर केली असा नितीन चंदनशिवे.टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता.बंद पापणीच्या आतून डोळ्यांनी बांध सोडला आणि गालावर पाणी घळघळ वाहायला लागलं. सगळ्या जगाला मोठ्याने ओरडून सांगावं वाटत होतं मी आयुष्यभर कविता लिहिणार आहे.

होय मी कवी म्हणून जिवंत राहणार आहे.


टाळ्या थांबत नव्हत्या.आतल्या आत हुंदके देत मी स्टेजवर गेलो.बाजूच्या विंगेतून साडी नेसलेली मुलगी हातात ट्रे घेऊन येताना दिसू लागली.मी प्रमुख पाहुण्यांच्या समोर अंतर राखून उभा राहिलो होतो.

फोटोवाला फोटो घेण्यासाठी कॅमेऱ्या डोळ्याला लावून तयार झाला होता.मी खिशातला मोबाईल काढला.आणि दिपालीला फोन केला.पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला आणि म्हणली,चंदनशिवे काय झालं सांगा ना लवकर,ती बिचारी वेड्यासारखं हातात फोन धरून माझ्या फोनची वाट बघत बसली होती.मी फोन कानाला दाबून गच्च धरला आणि म्हणलं,दिपाली पहिला नंबर आलाय.मला एक अपेक्षा होती तिने अभिनंदन वैगेरे म्हणावं अशी.पण ती तसलं काही बोलली नाही.ती पटकन म्हणाली,ते पहिला नंबर आलाय ठीक आहे पण रक्कम किती आहे ते सांगा आधी.आणि तेवढ्यात ती मुलगी ट्रे घेऊन जवळ आली.ती प्रमुख पाहुण्यांच्या हातात ट्रे देत होती.इकडं कानाजवळ दिपाली फोनवरून रक्कम विचारत होती.माझ्या डोळ्याला समोर फक्त पांढरं पाकीट दिसू लागलं.मी कसलाच विचार केला नाही.ते पाकीट मी हिसकावून हातात घेतलं.

सगळेजण तोंडाकडे बघत होते.


मला काहीच वाटत नव्हतं.मी स्टेजवर ते पाकीट फोडलं.दोन बोटं आता घालून त्या पाचशे रुपयाच्या नोट्या मोजल्या.दहा नोटा होत्या.आणि मी फोन कानाला लावून म्हणलं,दिपाली,पाच हजार रुपये आहेत.हे वाक्य बोलताना घळकन डोळ्यातून एक धार जोरात वाहिली.त्यावर दिपाली काहीच बोलली नाही.तिचा एक बारीक हुंदका मात्र ऐकू आला.आणि जवळ जवळ वीस पंचवीस सेकंद आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही.फक्त दोघांचे श्वास आम्ही अनुभवत होतो.मला वाटतं आम्ही दोघेजण किती जगू माहीत नाही.पण,आयुष्यातला तो पंचवीस  सेकंदाचा काळ हा सुवर्णकाळ वाटतो मला.आम्ही नवरा बायकोने त्या पंचवीस सेकंदाच्या काळात आमचं जन्मोजन्मीचं नातं मुक्याने समजून घेतलं.


नंतर हातात ती ट्रॉफी आली.गळ्यात शाल पडली.फुलांचा तो गुच्छ घेतला.आणि मी तिथून कसलाही विचार न करता निघालोसुद्धा त्या फोटोवाल्याला हवी तशी पोझ मिळालीच नाही.

आणि माझ्या त्या वागण्याने सगळेजण मला बावळट आहे की काय अशा नजरेने बघत होते.फोटोवाला ही रागानेच बघत होता.मी थेट गेटमधून पांढरं पाकीट खिशात कोंबून बाहेर पडलो.


घरी येताना तिच्यासाठी मिठाई घेतली.तिला समोसे आवडतात.म्हणून गरमागरम समोसे ही घेतले.

तिसऱ्या मजल्यावर आमचं घर होतं.मी अक्षरशा पायऱ्या तुडवत पळत पळत धापा टाकत दारात आलो.दार वाजवणार तेवढ्यात तिनेच दार उघडलं.आणि म्हणाली,कवी नितीन चंदनशिवे यांचं माझ्या संसारात स्वागत आहे.हुंदका दाटून आला.

मला स्पर्धा जिंकल्याचा,पाच हजार मिळाल्याचा,

आनंद नव्हताच.मी आयुष्यभर तिच्यासमोर ताठ मानेने कविता लिहिणार होतो कवी म्हणून तिच्या नजरेत जगणार होतो.कवी म्हणून जिवंत राहणार होतो.याचा आनंदच नाही तर मी हा महोत्सव माझ्या काळजाच्या गाभाऱ्यात आतल्या आत साजरा करत होतो.तिने माझे पाणावलेले डोळे पुसले.


तिच्यासाठी खायला आणलेलं तिच्या हातात दिलं.आम्ही दोघेही खायला बसलो.आणि ती म्हणाली,चंदनशिवे आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचं नाव निर्भय ठेवायचं.कारण आज पोटात तो सारखं लाथा मारून मला त्रास देत होता.तो सोबतीला होता म्हणून मनात भितीच नव्हती.तुमचा फोन येणार आणि तुम्हीच जिंकलाय असं सांगणार असंच वाटत होतं. 


 सगळी मिठाई दोघांनी खाल्ली.तिने कागद आणि पेन घेतलं.आणि किराणा मालाची यादी लिहायला सुरुवात केली.तिने ती यादी लिहून झाल्यावर माझ्या हातात दिली.आणि जा घेऊन या लवकर सामान अस म्हणून ती पिशवी घेण्यासाठी उठली.आणि त्याच कागदाच्या मागील बाजूस मी कविता लिहिली.ती अशी….


  " माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा,

    माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात

    किराणा मालाची यादी लिहिते,ती यादीच

    माझ्यासाठी जगातली 

    सर्वात सुंदर कविता असते…

    आणि यादीची समिक्षा

     फक्त आणि फक्त

     तो दुकानदारच करत असतो

     तो एक एक शब्द खोडत जातो

     पुढे आकडा वाढत जातो

     आणि कविता

     तुकड्या तुकड्याने 

     पिशवीत भरत जातो

     आयुष्यभर माहीत नाही

     पण,कविता आम्हाला

     महिनाभर पुरून उरते

     कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते."


मित्रहो,संघर्षाच्या सुगंधी वाटेला सुद्धा वेदनेचे फास असतात.बंद डोळ्यांनाच फक्त सुखाचे भास असतात.पण जोडीदारावर अमाप माया आणि विश्वास ठेवला की,संसाराच्या या गाडीत बसून प्रवास करताना येणाऱ्या वादळात ही गाडी कधी थांबत नाही.आणि म्हणूनच उंबरठ्यावर भूक वेदनेचे अभंग गात असली तरीही आतल्या घरात नवरा बायकोने कायम आनंदाच्या ओव्या गात जगलं पाहिजे.

यासाठी शब्दांचा लळा आणि आनंदाचा गळा हा असलाच पाहिजे.कारण,आयुष्य सुंदर आहेच आणि आयुष्याचं गाणं हे अशाच सुख दुःखाच्या सुरांनी नटलेलं असलंच पाहिजे.चालत राहा आयुष्याचे आनंदगाणे हसत हसत गात राहा.


आणि…कविता जिवंत राहिली.

लेखक नितीन चंदनशिवे मु.पो.कवठेमहांकाळ

जि सांगली.


'पाणी'अभ्यासक आदरणीय सतिश खाडे यांच्या व्हॉट्सअँप व्दारे माझ्यापर्यंत पोहचलेली,ही कवितेची जीवन कहाणी..!