त्यांची मोहीम सुरू झाली.हिमालयात एका डोंगरावरून समोरच्या डोंगरावर दिसणारं आश्रयस्थान अगदी जवळ दिसत असलं,तरी त्या दरीत उतरून परत दुसऱ्या डोंगरावर जाणं ही सोपी गोष्ट नसते.रॉड आणि डार्ला यांना या वेळी एक गोष्ट जाणवली,त्यांनी गिर्यारोहणाचं पद्धतशीर प्रशिक्षण घेतलं नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांच्याकडे गिर्यारोहणाची कसलीच साधनं नव्हती.
दोन एप्रिललाच त्यांनी आपला पहिला तळ प्रस्थापित केला.हिमालयात दिवस तसा छोटा वाटतो.एका डोंगराआडून सूर्य वर येतो आणि दुसऱ्या डोंगराआड दडतो,त्या मधल्या काळात मिळेल तो सूर्यप्रकाश.
तीन एप्रिलला सूर्य उगवण्याच्या आधीच रॉड उद्योगाला लागला.तो डोंगरमाथ्यावर पोहोचला.त्याने दुर्बीण डोळ्याला लावली.त्यांनी जिथे सापळा लावला होता त्या कड्यावर त्याला हालचाल दिसली.
तो सापळ्यात अडकलेला बिबळ्या होता.त्या दोघांचा स्वतःच्या नशिबावर विश्वास बसेना.गेले काही महिने हिमवादळात फसलेल्या आणि अनेक अडचणींना तोंड देऊन इथपर्यंत पोहोचलेल्या रॉड आणि डार्लाच्या दृष्टीने तो क्षण अतिशय महत्त्वाचा होता.
पण त्यांच्या मोहिमेचा हेतू फक्त हिमबिबट्या पाहणं एवढाच नव्हता.रॉडने कॅलिफोर्नियात जंगलातील मुक्त प्राण्यांना कसं हाताळावं,त्यांना बेशुद्ध कसं करावं याचं प्रशिक्षण घेतलं होतं.ते कृतीत आणायची वेळ येऊन ठेपली होती.इथे एका रान हिमबिबळ्याला बेशुद्ध करायचं,त्याच्या गळ्यात रेडिओप्रक्षेपक बसवलेली गळपट्टी बांधायची आणि नंतर त्या हिमबिबळ्याला सुखरूप परत सोडायचं,ही त्या प्रशिक्षणाची खरी कसोटी होती.त्यातच याआधी कुणीही, कधीही हिमबिबळ्या पकडलेला नव्हता. त्यामुळे त्यात येणाऱ्या अडचणींबद्दल कुठलीही मार्गदर्शक सूत्रं उपलब्ध नव्हती.त्या हिमबिबळ्याला बेशुद्ध करताना रॉड खूपच नर्व्हस झाला होता.डार्ला त्याला 'मन शांत ठेव' असं वारंवार बजावत होती.एक डोंगर उतरून ते खाली आले तेव्हा रॉडने रायफलच्या साहाय्याने दुरून इंजेक्शन मारण्यापेक्षा जवळ जाऊन खास काठीच्या साहाय्याने इंजेक्शन टोचणं योग्य ठरेल,हा आपला निर्णय जाहीर केला.आता ते चढ चढू लागले होते.मार्ग काटेरी झुडुपांमधून जात होता.त्या पायवाटेवर खूप दगडगोटेही होते.थोड्याच वेळात ते हिमबिबळ्या अडकलेल्या सापळ्याजवळ पोहोचले. हिमबिबळ्या आक्रसलेल्या डोळ्यांनी एकटक त्यांच्याकडे नजर रोखून पाहत होता. त्याने रॉडवर झेप घेतली.त्याची शेपूट जोरात फिरली,पण तो सापळ्यात जेरबंद असल्यामुळे त्याची ही झेप अयशस्वी ठरली. रॉडची अस्वस्थता वाढली होती.तो झपाट्याने त्या हिमबिबळ्याजवळ पोहोचला. त्याने पुढे होऊन ती इंजेक्शनची काठी बिबळ्याच्या खांद्याच्या दिशेने झपकन ढकलली.बिबळ्याने बाजूला झेप घेता घेता पंज्याने ती काठी बाजूला ढकलली. इंजेक्शनमधलं सर्व औषध जमिनीवर सांडलं.रॉड चडफडतला.ते दोघंही थोडं अंतर मागे सरकले,एका आडोशाआड दडले.रॉडने फुंकनळी आपल्या पाठीवरच्या पिशवीतून बाहेर काढली.त्याला आता नवा प्रयत्न करायला हवा होता.झालेल्या घटनेमुळे असेल,तो घामाने डबडबला होता.
त्याने प्रयत्नपूर्वक हात स्थिर राखला.पाण्याची बाटली उघडली.केटामाइन हायड्रोक्लोराइडची पूड पाण्यात विरघळवली.ती इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये भरली.ते परत त्या हिमबिबळ्या जवळ गेले.त्या बिबळ्याने सुटायची धडपड केली.रॉडने दीर्घ श्वास घेतला,नळी तोंडात धरली आणि जोरात फुंकली.
इंजेक्शनची सुई बिबळ्याच्या दाट,केसाळ कातडीवर आदळली आणि खाली पडली.त्यातलं सर्वच्या सर्व औषध जमिनीवर सांडून वाया गेलं.रॉडने कपाळावर हात मारून घेतला. त्याने परत एकदा इंजेक्शनमध्ये औषध भरलं.या वेळेस त्याने डार्लाऐवजी लोबसांगला बरोबर घेतलं होतं.तिघं त्या हिमबिबळ्याजवळ पोहोचले.रॉड अतिशय संथगतीने गुडघ्यात वाकून एक-एक पाऊल उचलून पुढे पुढे सरकू लागला.
दुसऱ्या बाजूने लोबसांग पुढे सरकला.त्याच्या हालचालीमुळे बिबळ्या फसला.त्याने लोबसांगच्या दिशेने चाल केली.रॉड याच संधीची वाट पाहत होता.
अखेरीस इंजेक्शनची सुई बिबळ्याच्या शरीरात घुसली.रॉडने सुटकेचा निःश्वास टाकला.पहिल्या प्रयत्नाला ४५ मिनिटं होऊन गेली होती.मग बिबळ्या बेशुद्ध व्हायची वाट बघत ते तिघंही बसून विश्रांती घेऊ लागले.अखेरीस बिबळ्या बेशुद्ध झाला.
लोबसांग आणि रॉडने त्या बिबळ्याला उचलून त्यातल्या त्यात सपाट जागेवर ठेवलं.मग त्याच्या गळ्यात रेडिओ लहरी प्रक्षेपक बसवलेली गळपट्टी बांधली.या प्रक्षेपकाला ऊर्जा पुरवणारी बॅटरी दोन वर्ष चालणार होती.तेवढ्यात बिबळ्या शुद्धीवर येण्याची चिन्हं दिसू लागली.रॉडने दिलेला औषधाचा डोस कमी पडला असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी झपाट्याने बिबळ्याची त्या सापळ्यातून सुटका केली.
रॉडने त्याला प्रतिजैविक टोचलं.त्याच्या अंगावरच्या गोचिडी आणि त्याच्या केसांचे नमुने घेतल्यावर ते तिघंही झपाट्याने तिथून दूर झाले.सर्व नमुने गोळा करणं,त्यांच्यावर चिठ्ठ्या चिकटवणं आणि ते जपून ठेवणं,हे काम डार्लाचं होतं.त्याकरिता छोट्या छोट्या काचेच्या कुप्या आपल्याजवळ ती सतत बाळगत असे.त्या बिबळ्याला त्यांनी 'एक' असं नाव लोबसांगच्या सांगण्यावरून दिलं. त्यांनी मग 'एक'च्या कानावर चाकूने खूण केली खरं तर अशा प्राण्यांच्या कानावर गोंदवलं जातं;पण त्यांनी काठमांडू सोडेपर्यंत अमेरिकेतून येणारी गोंदवण्याची सामग्री त्यांना मिळालेली नव्हती.तिथून निघण्यापूर्वी त्या हिमबिबळ्याच्या अंगावरून डार्लाने आपुलकीने
हात फिरवला होता.ते तिथून दूर झाले आणि दहा मिनिटांतच बिबळ्याला हुशारी आली.थोड्याच वेळात पूर्ण शुद्धीवर येऊन तो धडपडत दिसेनासा झाला.मग थोडा वेळ त्याचा माग काढून हेही आपल्या तळावर परतले.जे काही घडलं त्यामुळे रॉड असमाधानी होता.त्याचे फसलेले प्रयत्न,औषधाचं
कमी प्रमाण,फुंकनळी फुंकताना झालेली गफलत यामुळे तो स्वतःवरच चिडला होता.मग ते परत बिबळ्याच्या मागावर निघाले.जिथे बिबळ्याला बेशुद्ध केलं होतं त्या जागेपासून थोड्याच अंतरावर बिबळ्या बहुधा विश्रांती घेत असावा;कारण त्याच्या रेडिओ प्रक्षेपकातून येणारा बिप, बिप असा ध्वनी एकाच ठिकाणाहून येत होता.बिबळ्या ज्या घळीत होता तिथपर्यंत जाऊन खात्री करून घेणं शक्य नव्हतं,तशी अवघड जागा त्याने विश्रांतीसाठी निवडली होती.तो विश्रांती घेतोय की जखमी झालाय,या काळजीने रॉड आणखीनच अस्वस्थ झाला होता.डार्ला त्याला समजवायचा प्रयत्न करून थकली.अखेरीस रात्री उशिरा गळपट्टीतून येणारे इशारे हलू लागले. त्यांच्यापासून बिबळ्या झपाट्याने दूर चाललाय हे लक्षात आलं तेव्हा कुठे रॉड नीटसा भानावर आला.याच सुमारास काही निसर्ग संवर्धकांनी मिळून एक संस्था स्थापन केली होती.
'इंटरनॅशनल ट्रस्ट फॉर नेचर काँझर्वेशन' ही त्यांची संस्था आता रॉडच्या प्रकल्पाच्या मदतीला पुढे आली.
त्यांच्या नेपाळमधील कार्यानुभवाचा रॉड आणि डार्लाच्या हिमबिबळ्या मोहिमेस खूप फायदा झाला. शिवाय त्यांनी या दोघांच्या मोहिमेला आवश्यक ती साधनसामग्री पुरवली आणि आर्थिक मदतही दिली.आयटीएनसीच्या चक मॅक् डुगलने रॉडला दूरछायाचित्रणाबरोबरच वन्यप्राण्यांना बेशुद्ध कसं करावं याचे धडे दिले;त्याबरोबरच एक घडी करून ठेवता येईल आणि हवी तेव्हा फुगवून वापरता येईल अशी एक रबरी होडी दिली.त्या होडीत दोन माणसं बसू शकत होती. या होडीच्या साहाय्याने आता रॉड आणि डार्ला लंगू नदी केव्हाही ओलांडू शकणार होते.याशिवाय आयटीएनसीमुळे त्यांना आता 'स्काय व्हॅन'ची सेवा उपलब्ध होती,ही सर्वांत आनंदाची गोष्ट ठरली.'स्काय व्हॅन' मोटारीला पंख लावावेत तशी दिसते.या विमानाची मागची खालची बाजू पूर्ण उघडून जमिनीला टेकते.त्या उतारावरून एक जीप आरामात विमानाच्या पोटात शिरू शकते.ही जीप आणि माणसांसकट हे विमान पर्वतांवरून उडत जाऊन कुठल्याही सपाट जागी उतरवता येतं.
नेपाळमध्ये तेव्हा सर्व विमानसेवा नेपाळी शाही लष्कराच्या ताब्यात होती.त्यांच्या सहकार्यामुळे यांच्या मोहिमेचा पुढचा मार्ग मोकळा झाला.
'एक'ला रेडिओ गळपट्टी बसवली खरी,पण तरीही त्याचा माग काढणं सोपं नव्हतं.हे एखाद्या दरीत आणि 'एक' दुसऱ्या दरीत असेल तर त्याच्या गळपट्टीतून निघणारे संदेश यांना मिळतच नसत.
सातत्याने उंच डोंगरांवरून चाललं तरच मग 'एक'चा मागोवा घेता येत होता.हे वाटतं तितकं सोपं नाही,
याचा त्यांना लवकरच प्रत्यय आला; पण त्यामुळे त्यांना जास्त काळ 'एक'कडून येणारे संदेश ग्रहण करणं शक्य होऊ लागलं.
त्यांनी नंतर आपली प्रगती 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'ला कळवली.त्यांना त्या संस्थेकडूनही निधी उपलब्ध झाला.त्या दोघांनी आणखी काही हिमबिबळ्यांना रेडिओ गळपट्ट्या बसवल्या.१९८३ चा मोसम त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. पण डार्लाच्या मते पहिल्या मोहिमेतल्या अनुभवांमुळे पुढचे थरार फारसे गंभीर वाटले नव्हते.त्यांच्या या यशस्वी मोहिमांमुळे निसर्ग संवर्धक म्हणून या जोडीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.
त्यांचे सर्व चित्तथरारक अनुभव जाणून घ्यायचे असतील तर हे पुस्तक वाचायलाच हवं.एक कारकून स्त्री एक दिवस नोकरी सोडते काय आणि काही दिवसांत हिमालयात येते काय;तिथे यापूर्वी कुणालाही न जमलेल्या प्रयत्नात हे जोडपं यशस्वी होतं काय सगळंच अद्भुत ! •
जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे खरे चरित्र शोधायचे असेल,तर तुम्हाला फक्त त्याला कशाची आवड आहे,याचे निरीक्षण करावे लागेल.- शॅनन एल.अल्डर
२५.०९.२४ या लेखातील शेवटचा भाग..।।