* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: हसा आणि हसा / smile and smile..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५/९/२४

हसा आणि हसा / smile and smile..

०३.०९.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग..


तुम्ही स्वतःला आनंदी मानू लागलात तर नेमकी हीच गोष्ट तुम्हाला अधिक आनंदी करेल.प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व तत्त्ववेत्ता विल्यम जेम्स म्हणतो…। 


वरवर पाहता आपल्याला असे दिसते की, भावनेच्या मागोमाग कृती जाते; पण वास्तवात तसे नाही.कृती आणि भावना या एकमेकींच्या हातात हात घालून जातात. म्हणूनच आपल्या कृतीला आपण नियंत्रणात आणून भावनांवर सुद्धा नियंत्रण ठेवू शकतो. कारण कृती ही प्रत्यक्षपणे करणे-न करणे आपल्या मर्जीवर अवलंबून असते,पण भावनांवर आपले नियंत्रण नसते.म्हणजेच आनंद मिळवणे हे सर्वस्वी आपल्याच हाती असते.आपल्या दुःखाला आपल्याइतके जबाबदार दुसरे कोणीच नसते.आनंदी वागून, आनंदी बोलून,सर्वत्र आनंदच आनंद पसरतो!


तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवून तुम्ही आनंदी होऊ शकता.आनंद हा बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही तर तो तुमच्या अंतरंगातच दडलेला असतो.


तुम्ही कोण आहात? काय आहात? कोठे आहात? किंवा तुम्ही काय करता हे आनंद मिळवण्यासाठी महत्त्वाचे नसते.तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटते ते सगळ्यात महत्त्वाचे असते ! एकाच ठिकाणी,एकाच प्रकारचे काम करणाऱ्या दोन माणसांना त्याचा मोबदला,मानमरातब सारखाच मिळत असतो. तरी एकजण सुखी आणि दुसरा दुःखी असतो, असे का होते? यामागे आहे दोघांची वेगवेगळी मानसिकता.शहरापासून अगदी दूरवर,शेतामध्ये जुनीच अवजारे घेऊन घाम गाळत आनंदाने राबणारे शेतकरी आणि न्यूयॉर्क,शिकागो आणि लॉस एंजलिस

सारख्या मोठ्या शहरांत अद्ययावत एअरकंडिशन्ड ऑफिसमध्ये दुर्मुखलेल्या चेहऱ्याने काम करणारी माणसे अशी टोकाच्या मनोवृत्तीची माणसे जगात एकाच वेळी अस्तित्वात असू शकतात.


 शेक्सपिअरही असेच म्हणाला होता.जगात चांगले आणि वाईट असे काहीच नाही.आपले विचारच त्यांना चांगले वा वाईट ठरवत असतात.'


तसेच लिंकननेसुद्धा एकदा सांगितले जर माणसाने मनाचा निश्चय केला की,मी आनंदी राहीन,तरच तो आनंदी राहू शकतो.ॲबीच्या मते, हे खरे आहे,मी स्वतः अशा सत्याला सामोरे गेलो आहे.लाँग आयलंड,न्यू यॉर्क येथील रेल्वेस्टेशनच्या कडेने चालत असताना माझ्या पुढ्यात एकदम तीस ते चाळीस अपंग मुले कुबड्या आणि काठ्या घेऊन आली.जिना चढण्याचा अशक्यप्राय प्रयत्न करूनही त्यांना ते शक्य नव्हते.मग त्यांना उचलून वर ठेवावे लागले;पण त्या मुलांच्या हसण्याने आणि उत्साहाने मी आश्चर्यचकित झालो.त्या मुलांबरोबर असणाऱ्या गृहस्थांशी याबद्दल मी बोललो तेव्हा ते म्हणाले, होय ! तुम्ही म्हणता ते खरे आहे.जेव्हा मुलाला सुरुवातीला समजते की, त्याला आता अपंग होऊन जगावे लागणार आहे, तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो;पण कालांतराने हळूहळू तो त्यातून बाहेर येतो आणि हे आपले नशीब आहे असे मानून त्याचा स्वीकार करतो आणि मग इतर सर्वसाधारण मुलाइतकाच तोही आनंदी राहतो.


खरोखरच त्या मुलांना सलाम ! त्यांच्यामुळे मी आयुष्यातला एक मोठा धडा शिकलो की,जो मी कधीच विसरणार नाही.


स्वतःला बंद करून घेऊन कामाचे ढिगारे उपसत बसल्याने एकाकी तर वाटतेच,पण त्यामुळे इतरांशी मैत्री करण्याची संधीही हातातून निसटून जाते.मेक्सिकोमध्ये राहणारी सिनोरा मारीया ही तरुणी नोकरी करत होती त्या ठिकाणी ती एकटी,एकाकी बसत असे.त्या ऑफिसमध्ये तिचे इतर सहकारी जवळ-जवळच्या टेबलवर बसत. ते हसत-खेळत,गप्पा मारत काम करत.

याचा तिला खूप हेवा वाटे.सुरुवातीच्या दिवसांत ती संकोचाने त्यांच्याशी बोलणे टाळत असे.पण काही आठवड्यांनंतर तिला वाटले,की या बायका बोलायला येतील अशी अपेक्षा धरण्यापेक्षा आपणच आपल्या जागेवरून उठून त्यांना भेटायला जाऊ.पुढच्या वेळेस ती जेव्हा बॉटरकूलरकडे पाणी प्यायला गेली तेव्हा तिने त्यांना विचारले,हाय ! कशा आहात तुम्ही सगळ्या ? मग ती प्रत्येकाशीच असे बोलू लागली.त्याचा चांगला परिणाम ताबडतोब दिसायला लागलालू सगळे तिच्याकडे पाहून हसले.सगळ्यांनी तिला उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे ऑफिसमधले वातावरण हलके-फुलके झाले व तिचे काम ती अधिक आनंदाने करू लागली.हळूहळू त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊ लागले.तिचे काम आणि तिचे आयुष्य अधिक सुंदर झाले.


संतसाहित्यामधील हा एक निवडक परिच्छेद आणि त्यामधील उपदेश अत्यंत काळजीपूर्वक वाचा,पण फक्त वाचून उपयोग नाही.जर तुम्ही असे वागलात,तर मात्र तुमचे भले नक्कीच होईल. (निबंधकार अल्बर्ट हुबार्ड)


घराबाहेर पडल्यावर चेहऱ्यावर प्रसन्नता आणा. तुमच्या फुफ्फुसात जास्तीत जास्त ताजी हवा भरून घ्या.

सूर्यप्रकाशाला सामोरे जा आणि तो डोळ्यांत साठवून घ्या.तुमच्या मित्रमैत्रिणींशी हसत खिदळत बोला.चांगल्या गोष्टीचे मनापासून टाळ्या वाजवून स्वागत करा.

तुमच्याबद्दल कोणी काही गैरसमज करून घेईल म्हणून भिऊ नका. तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टींचा,तुमच्या शत्रूचा एक मिनिटही विचार करू नका.आत्ता,या क्षणी तुम्हाला काय करायला आवडेल याचे पक्के नियोजन करा.म्हणजे मग कोणत्याही प्रलोभनाला तुम्ही बळी पडणार नाही.

तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही येऊन पोहोचाल.ज्या उदात्त आणि महान गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यावर तुमचे लक्ष केंद्रित करा आणि काही दिवसांनंतर तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या नकळत तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत.तुमची तुमच्याबद्दलची तुमच्या मनातली प्रतिमा साकार होत आहे असे तुम्हाला जाणवेल,तुम्ही परोपकारी,उत्साही,अनेक क्षमता असणारे झालेले असाल.विचार हेच सर्वश्रेष्ठ असतात. धाडसी वृत्ती,मनमोकळेपणा,आनंदीवृत्ती हे सगळे असणारा योग्य मानसिक दृष्टिकोन जपा. योग्य दिशेने विचार करणे म्हणजे नवनिर्मिती. प्रबळ आंतरिक इच्छेने काहीच असाध्य राहात नाही आणि प्रत्येक प्रामाणिक प्रार्थना देव ऐकतोच.आपल्या हृदयात जपलेल्या प्रतिमेप्रमाणेच आपण बनतो.प्राचीन चायनीज लोक खरोखर खूप शहाणे होते.जगरहाटी त्यांना चांगली समजत होती.एक जुनी म्हण सांगते की,जी तुम्ही आणि मी सतत समोर ठेवली पाहिजे - ज्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू येत नाही,त्याने कधीच दुकान उघडू नये.तुमच्या हसण्यामधून तुमच्या सदिच्छा (मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी, मंजुल प्रकाशन) लोकांपर्यंत पोहोचतात.तुमचे हसू पाहणाऱ्यांची आयुष्ये उजळून निघतात.जगाच्या तिरस्काराला कंटाळलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी तुमचे हसू एखाद्या काळोख्या ढगाआडून प्रकटलेल्या सूर्यकिरणांसारखे असते.बॉसचा तणाव असणारी एखादी व्यक्ती किंवा एखाद्या दुकानदाराचा त्याच्या गिऱ्हाइकामुळे असणारा तणाव किंवा शिक्षकांच्या किंवा पालकांच्या तणावाखाली असणारे विद्यार्थी,एखाद्या हास्याच्या लकेरीमुळेही सुखावतात.त्यांना नवा हुरुप येतो. जगात अजूनही शिल्लक असणारा आनंद नव्याने सापडतो.


नाताळमधील गर्दीच्या तणावामुळे विक्रेत्यांना आलेली मरगळ झटकण्यासाठी काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्क शहरातील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये खालील तत्त्वज्ञान लिहून ठेवले होते.


नाताळातील मौल्यवान हसू…!!


यासाठी पैसे पडत नाहीत.पण ते खूप काही देऊन जाते.ज्याला हे मिळते तो अधिक समृद्ध होतो,पण तो जे देतो त्याचे काहीच कमी होत नाही.हे एका क्षणात घडते,पण त्याच्या गोड आठवणी आयुष्यभर दरवळत राहतात. कोणाचीही श्रीमंती हास्यावाचून पुरी होत नाही आणि कोणत्याही गरिबाला याचा थोडा जरी फायदा मिळाला तरी तो गरीब राहत नाही.हास्यामुळे घरात आनंदी आनंद पसरतो. व्यवसाय - धंद्यात बंधुभाव निर्माण होतो आणि मित्रांमध्ये घट्ट मैत्री होते.

थकलेल्याला हास्यामुळे विश्रांती मिळते.निरुत्साही झालेल्यांसाठी ते टॉनिक असते. दुःखी असणाऱ्यांना हास्यामुळे नवीन पहाट उगवल्यासारखे वाटते.हास्य हा कोणत्याही संकटावर निसर्गाने निर्माण केलेला उतारा आहे.ते विकले जात नाही. त्यासाठी याचना करावी लागत नाही.ते उसने मिळत नाही किंवा ते कोणी चोरूही शकत नाही.उलट,दुसऱ्याला ते देण्याने आपल्यालाही काहीतरी मिळते.आणि आता नाताळच्या या तोबा गर्दीत आमचे विक्रेते इतके थकले आहेत की,त्यांनी तुम्हाला हसू दिले नाही,तर आम्हीच तुम्हाला तुमचे हसू त्यांच्यासाठी सोडून जाण्याची विनंती करतो.ज्यांच्याकडे आता हसू उरले नाही,त्यांनाच हसू देण्याची जास्त गरज आहे,नाही का?


हसा,हसा,आणि फक्त हसा…