* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: कविता जगली / poem lived

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२३/९/२४

कविता जगली / poem lived

तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता.निर्भय तिच्या पोटात वाढत होता.

माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता.मी कंत्राटी कामगार होतो.आणि वेळ अशी आली होती,घरातलं सगळं राशन संपलं होतं.गॅस संपून आठ दिवस झाले होते.स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती.टीव्ही चा रिचार्ज संपला होता.त्यामुळे टीव्ही ही बंद होता.रोजचं येणारं दूध बंद केलं होतं.घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता.तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते.तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता.गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे.तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे.

दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही.उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती.आणि माझ्यासोबत लढत होती.परंतु आजची परिस्थितीच भयंकर होती.घरात थोडेसे तांदूळ शिल्लक राहिले होते.बाकीचे सगळे डब्बे रिकामे झाले होते.एका वेळची सोय होणार होती.आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो.पण माझा फोन कुणीच उचलत नव्हतं.कारण,त्यांना माहीत होतं हा पैसे मागायलाच फोन करतोय.


सगळ्यांकडून उसने घेऊन झाले होते.त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती.एकाने फोन उचलला आणि मी बोलायच्या आधीच तो म्हणाला नितीन थोडेफार पैसे असले तर दे ना,मी काहीच उत्तर दिलं नाही फोन कट केला.आणि कुणालाच फोन करून काही होणार नाही.आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनात विचार करून मी खाली अंथरलेल्या चटईवर बसलो.


तिची अंघोळ झाली होती.आम्ही पुण्यात पिंपळे निलख मध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत होतो.टीव्ही बंद असल्यामुळे तिला करमत नव्हतं.तिचा मूड ठीक करण्यासाठी मी कधीतरी तिच्या आवडीचं सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे हे गाणं गुणगुणत असायचो.मी गाणं गायला सुरवात केली,पण ती एकटक खाली मान घालून चटईवर बोट फिरवत होती.तिने लक्षच दिलं नाही.माझ्या कवितेवर ती फार प्रेम करते म्हणून कवितेच्या ओळी म्हणायला सुरवात केली तेव्हा,तिने झटकन माझ्याकडे रागाने पाहिलं.मी मान खाली घातली.घराच्या उंबऱ्यावर भूक हंबरडा फोडायला लागली की घराच्या आत जगातलं कोणतंच संगीत आणि कोणतीच कविता मनाला आनंद देऊ शकत नाही.हे कळलं.


आम्ही बराच वेळ एकमेकांशी काहीच बोललो नाही.ती मान खाली घालून चटईवर बोटाने कोणती न उमटणारी अक्षरे गिरवत कुणास ठाऊक.सात महिन्याची गरोदर असणारी,एक नवा जन्म पोटात वाढवू पाहणारी,आई होण्याच्या उंबरठ्यावर असणारी दिपाली आमच्या बाळासाठी कदाचित एखादं नाव पुन्हा पुन्हा गिरवत असावी.मी तिच्या बोटाकडे एकटक पाहत होतो.ती स्व:ताला सावरत हळूहळू उठली.आणि दार उघडून बाहेर गेली.मी काहीच बोललो नाही.तिने शेजारच्या घरातून पेपर वाचण्यासाठी मागून आणला.कारण घरातली सगळी रद्दी या आठवड्यात तिने वाचून संपवली होती.

रविवार होता पेपरला पुरवण्या होत्या.तिचा चेहरा थोडासा खुलला आणि ती पुन्हा खाली बसली.


मी एकटक तिच्या डोळ्यात पाहत होतो.आणि ती पेपरची पाने चाळू लागली.आणि अचानक ती जोरात ओरडली.ओ चंदनशिवे हे बघा काय आलंय पेपरला.मी म्हणलं 'काय दिपाली? तर तिने मला विचारलं काय ओ चंदनशिवे तुम्ही कवी आहात ना? मी पार गळून गेलेल्या आवाजात म्हणलं,हो आहे पण काय करणार कवी असून आणि कविता तरी काय करणार आहे.माझी तिने हाताला गच्च धरून जवळ ओढलं आणि माझ्या समोर ते पेपरचं पान धरलं.आणि त्या पानावर असलेली जाहिरात मला आजही आठवतेय.!!अंशुल क्रियेशन प्रस्तुत,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली काव्यवाचन स्पर्धा.!! रोख रकमेची तीन बक्षिसे.खाली पत्ता होता चिंचवड,पुणे.आणि संपर्क साधा म्हणून मोबाईल नंबर दिलेला होता.मी ती जाहिरात बघितली.दिलेल्या नंबरवर फोन केला.नाव सांगितलं.नावनोंदणी केली.आणि मी दिपालीकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसायला लागली होती.ती म्हणाली,चंदनशिवे घरात शेवटचे सत्तर रुपये आहेत.ते मी तुम्हाला देतेय.या स्पर्धेत जा.आजच स्पर्धा आहे ही.तिथं कविता म्हणा,आणि त्यातलं सगळ्यात मोठी रक्कम असणारं बक्षिस घेऊनच घरी या.पण एक सांगते आज,जर तुम्ही बक्षिस नाही मिळवलं तर संध्याकाळी या घरात फक्त नितीन चंदनशिवे आत येईल.कवी नितीन चंदनशिवे पुन्हा या जगात कुठं दिसला नाही पाहिजे.तिच्या या वाक्याने माझ्या पोटातलं काळीजच कुणीतरी मुठीत गच्च आवळून धरल्यागत वाटायला लागलं.


 ती पुढे म्हणाली,जर माझ्या संसाराला तुमची कविता राशन मिळवून देऊ शकत नसेल तर ती कविता मला या घरात नकोयसात महिन्याची गरोदर असणारी,

सर्वसामान्य गृहिणीसारखी सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दिपालीचं त्यावेळी काही चुकलं असेल असं मला अजिबात वाटत नाही.मी ते तिचं आवाहन स्वीकारलं.तिने घरातले जपून ठेवलेले सत्तर रुपये माझ्या हातात देताना माझा हात घट्ट आवळून धरला आणि मला आतल्या आत हुंदका आला.मी अंगात कपडे घातले.तिच्या डोळ्यात बघितलं आणि निघालो.मी चिंचवडला आलो.बसच्या तिकीटला दहा रुपये गेले होते.तिथं प्रवेश फी पन्नास रुपये होती.ती भरली.ती भरत असताना माझ्या मनाच्या वेदना नाही मांडता येणार.परत जाण्यासाठी दहा रुपये शिल्लक राहिले होते.मी ते जपून ठेवले.बाजूला सर्वांसाठी नाष्ट्याची सोय केली होती.


मला खावंसं वाटलं नाही.कारण ती घरात उपाशी होती.मी मनातल्या मनात हादरून गेलो होतो.मी स्पर्धेला आलो होतो खरा पण,आतल्या आत माझ्या कवितेची माझ्या पत्नीशी स्पर्धा सुरू झालेली होती.

कारण इथं जिंकलो तरच माझ्या अंतरंगात कविता आयुष्यभर जिवंत राहणार होती.आणि हरलो तर,

फक्त शरीर घेऊन मेलेल्या मड्यागत जगणं समोर दिसत होतं.स्पर्धा सुरू झाली.बराच वेळ होत चालला होता.इतरांच्या कविता मला ऐकूच येत नव्हत्या.

कारण डोळ्यासमोर फक्त माझी गरोदर असणारी बायको दिसत होती.आणि उपाशी पोटाने तिने मला मारलेली ओ चंदनशिवे ही हाक ऐकू येत होती.


 माझं नाव पुकारलं गेलं.मी स्टेजवर जायला निघालो.तेव्हा,मी आयुष्यातला फार मोठा जुगार खेळायला चाललो होतो आणि डावावर कविता लावली होती.अन तेवढ्यात पायऱ्या चढून वर जाताना,स्टेजवर बाबासाहेबांचा आणि रमाईचा एकत्र असलेला फोटो दिसला.अंगावर काटा आला.

अंग थरथर कापलं.विज चमकावी तसं मेंदूत

काहीतरी झालं.रमाईला आणि बाबासाहेबांना डोळे भरून बघून घेताना अंगात बळ येत गेलं.इतकं बळ आलं की त्या क्षणाला मी जगातली कुठलीही स्पर्धा जिंकू शकत होतो.माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली.कविता संपली.

टाळ्या कानावर यायला लागल्या.त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला.


स्पर्धा संपली.पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाले.त्यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार होतं.मंचावर ते उपस्थित होते.सूत्रसंचालकाने विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी माईक हातात घेतला.आणि छातीत धडधड सुरू झाली.त्याने सर्वात आधी तृतीय क्रमांक पुकारला.टाळ्या सुरू झाल्या.तो तीन नंबरचा विजेता स्टेजवर गेला.त्याच्या हातात ट्रॉफी,गळ्यात शाल,पुष्पगुच्छ व ते पांढऱ्या रंगाचं पाकीट राजकुमार बडोले यांनी दिलं.त्याला तिथेच थांबवला.माझी नजर त्याच्या पांढऱ्या पाकिटावरून हटत नव्हती.


सूत्रसंचालकाने दुसरा नंबर घोषित केला.माझं नाव नव्हतं.पोटात अजून गोळा आला.तो विजेता ही तसाच जाऊन स्टेजवर थांबला.आणि आता सुत्रसंचालक प्रथम क्रमांक घोषित करणार होता.मी डोळे गच्च मिटून घेतले.पोटात कळ यायला लागली होती.छातीत धडधड वाढेलेली होती.दोन डोळ्यांच्या बंद पापणीच्या आड फक्त गरोदर असणारी माझी पत्नी माझी वाट बघत असलेली दिसत होती.आणि कानावर आवाज आला."आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता आहे,ज्याने तमाशा कविता सादर केली असा नितीन चंदनशिवे.टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता.बंद पापणीच्या आतून डोळ्यांनी बांध सोडला आणि गालावर पाणी घळघळ वाहायला लागलं. सगळ्या जगाला मोठ्याने ओरडून सांगावं वाटत होतं मी आयुष्यभर कविता लिहिणार आहे.

होय मी कवी म्हणून जिवंत राहणार आहे.


टाळ्या थांबत नव्हत्या.आतल्या आत हुंदके देत मी स्टेजवर गेलो.बाजूच्या विंगेतून साडी नेसलेली मुलगी हातात ट्रे घेऊन येताना दिसू लागली.मी प्रमुख पाहुण्यांच्या समोर अंतर राखून उभा राहिलो होतो.

फोटोवाला फोटो घेण्यासाठी कॅमेऱ्या डोळ्याला लावून तयार झाला होता.मी खिशातला मोबाईल काढला.आणि दिपालीला फोन केला.पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला आणि म्हणली,चंदनशिवे काय झालं सांगा ना लवकर,ती बिचारी वेड्यासारखं हातात फोन धरून माझ्या फोनची वाट बघत बसली होती.मी फोन कानाला दाबून गच्च धरला आणि म्हणलं,दिपाली पहिला नंबर आलाय.मला एक अपेक्षा होती तिने अभिनंदन वैगेरे म्हणावं अशी.पण ती तसलं काही बोलली नाही.ती पटकन म्हणाली,ते पहिला नंबर आलाय ठीक आहे पण रक्कम किती आहे ते सांगा आधी.आणि तेवढ्यात ती मुलगी ट्रे घेऊन जवळ आली.ती प्रमुख पाहुण्यांच्या हातात ट्रे देत होती.इकडं कानाजवळ दिपाली फोनवरून रक्कम विचारत होती.माझ्या डोळ्याला समोर फक्त पांढरं पाकीट दिसू लागलं.मी कसलाच विचार केला नाही.ते पाकीट मी हिसकावून हातात घेतलं.

सगळेजण तोंडाकडे बघत होते.


मला काहीच वाटत नव्हतं.मी स्टेजवर ते पाकीट फोडलं.दोन बोटं आता घालून त्या पाचशे रुपयाच्या नोट्या मोजल्या.दहा नोटा होत्या.आणि मी फोन कानाला लावून म्हणलं,दिपाली,पाच हजार रुपये आहेत.हे वाक्य बोलताना घळकन डोळ्यातून एक धार जोरात वाहिली.त्यावर दिपाली काहीच बोलली नाही.तिचा एक बारीक हुंदका मात्र ऐकू आला.आणि जवळ जवळ वीस पंचवीस सेकंद आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही.फक्त दोघांचे श्वास आम्ही अनुभवत होतो.मला वाटतं आम्ही दोघेजण किती जगू माहीत नाही.पण,आयुष्यातला तो पंचवीस  सेकंदाचा काळ हा सुवर्णकाळ वाटतो मला.आम्ही नवरा बायकोने त्या पंचवीस सेकंदाच्या काळात आमचं जन्मोजन्मीचं नातं मुक्याने समजून घेतलं.


नंतर हातात ती ट्रॉफी आली.गळ्यात शाल पडली.फुलांचा तो गुच्छ घेतला.आणि मी तिथून कसलाही विचार न करता निघालोसुद्धा त्या फोटोवाल्याला हवी तशी पोझ मिळालीच नाही.

आणि माझ्या त्या वागण्याने सगळेजण मला बावळट आहे की काय अशा नजरेने बघत होते.फोटोवाला ही रागानेच बघत होता.मी थेट गेटमधून पांढरं पाकीट खिशात कोंबून बाहेर पडलो.


घरी येताना तिच्यासाठी मिठाई घेतली.तिला समोसे आवडतात.म्हणून गरमागरम समोसे ही घेतले.

तिसऱ्या मजल्यावर आमचं घर होतं.मी अक्षरशा पायऱ्या तुडवत पळत पळत धापा टाकत दारात आलो.दार वाजवणार तेवढ्यात तिनेच दार उघडलं.आणि म्हणाली,कवी नितीन चंदनशिवे यांचं माझ्या संसारात स्वागत आहे.हुंदका दाटून आला.

मला स्पर्धा जिंकल्याचा,पाच हजार मिळाल्याचा,

आनंद नव्हताच.मी आयुष्यभर तिच्यासमोर ताठ मानेने कविता लिहिणार होतो कवी म्हणून तिच्या नजरेत जगणार होतो.कवी म्हणून जिवंत राहणार होतो.याचा आनंदच नाही तर मी हा महोत्सव माझ्या काळजाच्या गाभाऱ्यात आतल्या आत साजरा करत होतो.तिने माझे पाणावलेले डोळे पुसले.


तिच्यासाठी खायला आणलेलं तिच्या हातात दिलं.आम्ही दोघेही खायला बसलो.आणि ती म्हणाली,चंदनशिवे आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचं नाव निर्भय ठेवायचं.कारण आज पोटात तो सारखं लाथा मारून मला त्रास देत होता.तो सोबतीला होता म्हणून मनात भितीच नव्हती.तुमचा फोन येणार आणि तुम्हीच जिंकलाय असं सांगणार असंच वाटत होतं. 


 सगळी मिठाई दोघांनी खाल्ली.तिने कागद आणि पेन घेतलं.आणि किराणा मालाची यादी लिहायला सुरुवात केली.तिने ती यादी लिहून झाल्यावर माझ्या हातात दिली.आणि जा घेऊन या लवकर सामान अस म्हणून ती पिशवी घेण्यासाठी उठली.आणि त्याच कागदाच्या मागील बाजूस मी कविता लिहिली.ती अशी….


  " माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा,

    माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात

    किराणा मालाची यादी लिहिते,ती यादीच

    माझ्यासाठी जगातली 

    सर्वात सुंदर कविता असते…

    आणि यादीची समिक्षा

     फक्त आणि फक्त

     तो दुकानदारच करत असतो

     तो एक एक शब्द खोडत जातो

     पुढे आकडा वाढत जातो

     आणि कविता

     तुकड्या तुकड्याने 

     पिशवीत भरत जातो

     आयुष्यभर माहीत नाही

     पण,कविता आम्हाला

     महिनाभर पुरून उरते

     कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते."


मित्रहो,संघर्षाच्या सुगंधी वाटेला सुद्धा वेदनेचे फास असतात.बंद डोळ्यांनाच फक्त सुखाचे भास असतात.पण जोडीदारावर अमाप माया आणि विश्वास ठेवला की,संसाराच्या या गाडीत बसून प्रवास करताना येणाऱ्या वादळात ही गाडी कधी थांबत नाही.आणि म्हणूनच उंबरठ्यावर भूक वेदनेचे अभंग गात असली तरीही आतल्या घरात नवरा बायकोने कायम आनंदाच्या ओव्या गात जगलं पाहिजे.

यासाठी शब्दांचा लळा आणि आनंदाचा गळा हा असलाच पाहिजे.कारण,आयुष्य सुंदर आहेच आणि आयुष्याचं गाणं हे अशाच सुख दुःखाच्या सुरांनी नटलेलं असलंच पाहिजे.चालत राहा आयुष्याचे आनंदगाणे हसत हसत गात राहा.


आणि…कविता जिवंत राहिली.

लेखक नितीन चंदनशिवे मु.पो.कवठेमहांकाळ

जि सांगली.


'पाणी'अभ्यासक आदरणीय सतिश खाडे यांच्या व्हॉट्सअँप व्दारे माझ्यापर्यंत पोहचलेली,ही कवितेची जीवन कहाणी..!