हार्वेनं रक्ताभिसरणाचं कोडं सोडवायचा प्रयत्न केला असला तरी धमन्या आणि शिरा एकमेकींना कुठेतरी जोडलेल्या असाव्यात का, या प्रश्नाची उकल काही तो करू शकला नव्हता. त्यांच्यामध्ये काहीतरी जोडणी किंवा मध्यस्थी असावी असं त्याला वाटत होतं,पण ती नेमकी काय आहे हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं.हार्वेचा मृत्यू झाला तरी हे कोडं मात्र अजून सुटलेलं नव्हतं.याच वेळी मायक्रोस्कोपचा शोध लागला आणि माणसाला आपल्या दृष्टीच्या क्षमतेच्या कित्येक पटींनी लहान असलेल्या गोष्टी पाहता यायला लागल्या.
पहिली सूक्ष्मदर्शक यंत्रं नेमकी केव्हा तयार झाली हे आज निश्चित माहीत नाही,पण सूक्ष्मदर्शकाच्या या शोधानं माणसाला सगळ्या पृथ्वीवरच्याच अनेक सूक्ष्मजीव,
सूक्ष्मकण, वेगवेगळ्या रेणूंची रचना यांच्या अस्तित्वाचा आणि त्यांच्या महतीचा शोध लागणार होता.या आधीच्या हजारो वर्षांपासून माणसांना आणि जनावरांना प्रचंड विध्वंसक ठरणाऱ्या अनेक रोगांवर यामुळेच उपचार किंवा प्रतिबंधाचे उपाय सापडणार होते.यातूनच पुढे सजीवांच्या शरीरात असलेल्या सूक्ष्म गोष्टींचा पत्ता लागणार होता. पण यासाठी अक्षरशःअनेक वैज्ञानिकांचं योगदान मोलाचं ठरणार होतं.
चार हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये चाऊ फू राजाच्या काळात एका नळीमध्ये पाणी भरून त्यातून पलीकडचं पाहिलं की वस्तू मोठ्या दिसत होत्या असा उल्लेख आहे. आता त्याला 'पाण्याचे मायक्रोस्कोप' म्हणतात.ख्रिस्तपूर्व आठव्या शतकातही कोणीतरी असली भिंगं वापरल्याचे पुरावे ॲसिरियामधल्या उत्खननात मिळाले होते!
यानंतर मग बऱ्याच लोकांनी सूक्ष्मदर्शकाच्या प्रगतीत हातभार लावला. इ.स. ६५ मध्ये 'ल्युशियस ॲनेएस सेनेका' यानं पाण्याच्या स्तंभाखाली धरल्यास कुठलीही गोष्ट मोठी दिसते हे ताडलं होतं.टॉलेमीनंही (इ.स. १२७ ते १५१) त्याच्याविषयी लिहून ठेवलंय.त्यानंही काचेचा वापर केला होता.ॲलहॅझेन या अरबी लेखकानंही त्यांच्याविषयी चर्चा केली होती. कुठल्याही गोष्टीची प्रतिमा मोठी करण्यासाठी भिंगं उपयोगी पडतात हे पूर्वी ग्रीकांना आणि अरबांनाही माहीत होतं.युक्लिडनं परिवर्तन करणाऱ्या सपाट आणि वक्र पृष्ठभागांविषयी आपल्या 'ऑप्टिक्स' या ग्रंथातही लिहून ठेवलं होतं.सर्का या तत्त्वज्ञानं सर्वप्रथम भिंगं म्हणजेच लेन्स हा शब्द वापरला असावा असं म्हटलं जातं. गंमत म्हणजे भिंग डाळीसारखं दिसतं म्हणून लेन्स हा शब्द लेंटिल म्हणजे डाळ या शब्दावरून आला आहे!यानंतर बरीच शतकं या संदर्भात काहीच घडलं नाही.१३ व्या शतकात अल्केमिस्ट आणि लेखक रॉजर बेकन यानं भिंगांच्या गुणधर्मांविषयी लिहून ठेवलं होतं. त्यानंच पहिल्यांदा चश्मे तयार केले.पूर्वी चश्मा करताना पातळ पत्र्याच्या चौकटीत भिंगं बसवून त्यांना दोरीनं बांधून ती दोरी कानामागे बांधायची पद्धत होती.त्यात हळूहळू सुधारणा होत होत आता चश्मे हलके आणि प्लॅस्टिकच्या फ्रेमचे तयार होतात.याच्या पुढची पायरी म्हणजे डायरेक्ट लेन्सच डोळ्यांत बसवायचे.म्हणजे पातळ रबराचं किंवा सिलिकॉनचं भिंग कॉन्टॅक्ट लेन्स म्हणून डोळ्यांत बसवलं जातं.त्यामुळे या माणसाच्या डोळ्याला नंबर आहे याची कल्पनाही कुणाला येत नाही.पण काही शतकांपूर्वी हे शक्यच नव्हतं.यातूनच पुढे ऑप्टिक्स ही अप्लाइड सायन्सची शाखा निर्माण झाली.भिंग तयार करायच्या या सगळ्या कामात डच मंडळी खूपच आघाडीवर होती.यानंतर दुर्बिणीचा शोध लागला.दुर्बिणीनं लांबचं दृश्य आणि तारे आपण स्पष्टपणे पाहू शकतो हे गॅलिलिओच्या निरीक्षणांनी सगळ्या जगाला समजलं होतं.त्याचप्रमाणे मग जवळच्या वस्तू अजून मोठ्या आणि स्पष्ट दिसण्यासाठी टेलिस्कोपच्याच धर्तीवर मायक्रोस्कोप म्हणजेच सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार करण्याची कल्पना निर्माण झाली असावी असं मानलं जातं.काही वेळा तर टेलिस्कोप आणि तो उलटा करून तयार झालेलं उपकरण म्हणजेच 'मायक्रोस्कोप', या दोन्हींच्या शोधाचं श्रेय गॅलिलिओला दिलं जातं. पण ही दोन्ही उपकरणं साधारणपणे एकाच काळात पण वेगवेगळ्या ठिकाणी तयार झाली असल्यामुळे नक्की कोणी कोणतं उपकरण आधी तयार केलं हे तंतोतंत बरोबर सांगता येत नाही.या सगळ्यातून सूक्ष्मदर्शकाच्या शोधाकडे वेगानं आगेकूच सुरू झाली.विशेष म्हणजे या मोहिमेत १५ व्या आणि १६ व्या शतकात लिओनादों दा विंची आणि कोपर्निकस यांचाही समावेश होता.सूक्ष्मदर्शकाचा शोध हा गेल्या चारशे वर्षांतला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा शोध होता. त्याशिवाय बायॉलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र,पॅथॉलॉजी,
ऑप्टिक्स आणि आणखीही अनेक विज्ञानाच्या शाखांची पुढे प्रगतीच झाली नसती.मायक्रोस्कोपच्या अभ्यासाशिवाय आपण या विज्ञान शाखांचा अभ्यासच करू शकत नाही.१७ व्या शतकात युरोपात सिलिका कुटून काचा तयार करणं हा अनेक लोकांचा व्यवसाय होता. त्या काळी या व्यवसायात खूपच स्पर्धा होती. त्यातच नेदरलँडमध्ये जकॅरिअस जॅन्सन नावाचा चश्मे तयार करणारा एक माणूस राहत होता.या व्यवसायात येण्याआधी तो रस्त्यावरच लहानसहान वस्तू विकून आपली गुजराण करायचा.त्यानं कॅथरिना नावाच्या मुलीशी लग्न केलं.नंतर त्यांना एक मुलगाही झाला.त्याचं नाव त्यांनी जोहानेज झकॅरिअनेस असं ठेवलं. १६१५ साली त्याला लॉइज लॉयसीन नावाच्या एका काचा तयार करणाऱ्या माणसाची दोन मुलं सांभाळण्याचं काम मिळालं.तिथंच झकॅरिअसनं चश्मे तयार करायचं तंत्र शिकून घेतलं आणि लॉयसीनचीच उपकरणं वापरून तो बेकायदेशीरपणे लोकांना चश्मे तयार करून द्यायला लागला.त्यामुळे तिथून त्याची हकालपट्टी झाली आणि तो अर्नेम्युदेन नावाच्या गावाला गेला.तिथेही त्यानं असेच बेकायदा चश्मे तयार करून विकल्यामुळे त्याला शिक्षा झाली आणि तो परत मिडेलबर्गला आला.
त्यातच १६२४ साली त्याची बायको वारली. त्यानंतर त्यानं नात्यातल्याच ॲना नावाच्या विधवा बाईशी लग्न केलं आणि त्याच वर्षी तो ॲमस्टरडॅमला राहायला गेला.तिथेही त्यानं पुन्हा चश्मे तयार करायला सुरुवात केली,पण त्याचा हाही धंदा बुडाला.चश्मे तयार करता करता त्यानं सूक्ष्मदर्शकही तयार केला होता.त्याचदरम्यान मिडेलबर्गमध्ये राहत असताना तो टांकसाळीच्या जवळच राहत होता.त्याचा मेहुणा तिथे काम करत होता.तेव्हा त्याच्यासोबत त्या टांकसाळीत जाऊन त्यानं नाणी कशी पाडतात ते पाहिलं आणि आपल्या घरीच अशी खोटी नाणी पाडायचा उद्योग सुरू केला.या गुन्ह्याला खरं तर त्या काळी मृत्युदंडाची शिक्षा होती,पण याही वेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाला.१६३२ साली झकॅरिअसचा मृत्यू झाला.या सगळ्या उद्योगांमध्ये १५९० ते १६१८ च्या दरम्यान कधीतरी त्यानं सूक्ष्मदर्शक तयार केल्याचे उल्लेख आहेत.आणि खुद्द त्याच्याच मुलानं म्हणजे जोहानेज झकॅरिअनेस यानं १५९० साली सूक्ष्मदर्शी तयार केल्याचा दावा केला होता.पण हे जर खरं असेल तर त्याच्या जन्माच्या तारखेपासूनच काहीतरी घोळ असल्याचं लक्षात येतं आणि गंमत म्हणजे मिडेलबर्गमध्ये झकॅरिअनेस जिथे राहत होता तिथे त्याच्याच शेजारी मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप तयार करणारा हान्स लिपरशे हासुद्धा राहत होता!
निरीक्षणात्मक विज्ञानाचा पाया घालणाऱ्या गॅलिलिओ गॅलिली याचा जन्म १५६४ साली झाला होता.त्यानं टेलिस्कोपबरोबरच मायक्रोस्कोपही तयार केल्याचे उल्लेख आहेत. मायक्रोस्कोप तयार करण्यात त्यानं जवळपास पंधरा वर्ष घातली होती.याच कल्पनेत सुधारणा करून गॅलिलिओनं दुर्बीण बनवली होती.डच लोक इटलीला आपली दुर्बीण दाखवायला घेऊन येताहेत हे समजल्यावर गॅलिलिओनं वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छाप पाडण्यासाठी डचांपेक्षा तिप्पट शक्तिशाली दोन भिंगांची दुर्बीणही अक्षरशःरातोरात बनवली तेव्हा डचमंडळी थक्कच झाली होती!
वैज्ञानिक निरीक्षणासाठी पहिला कंपाऊंड मायक्रोस्कोपही गॅलिलिओनंच बनवला आणि इ.स. १६१०च्या सुमारास त्यातून अनेक कीटकांच्या अवयवांचं निरीक्षणही केलं.त्यातून पाहिल्यावर उडणाऱ्या माश्या त्याला मोठ्या जनावरांसारख्या दिसल्या होत्या! पण सूक्ष्मदर्शकाची खरी प्रगती झाली ती १७ व्या शतकात पाच महत्त्वाच्या वैज्ञानिकांमुळे. म्हणूनच त्यांना मायक्रोस्कोपिस्ट्स असंच म्हणतात.
माल्पिघी,ग्र्यू,स्वामेरडॅम,रॉबर्ट हुक आणि लेव्हेनक ही ती पाच मंडळी होती.या मंडळींशिवाय आपल्या आयुष्याचा बराचसा भाग हॉलंडमध्ये घालवणारा मूळचा फ्रेंच तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि वैज्ञानिक रेने देकार्त (१५९६-१६५०) यालासुद्धा सूक्ष्मदर्शीमध्ये विशेष रस होता.त्यानंही जीवशास्त्रामध्ये बरंच संशोधन केलं आहे.यातला मार्सेलो माल्पिघी (१६२८ ते १६९४) हा इटलीतल्या बोलोना विद्यापीठातून वैद्यकशास्त्र शिकला होता.बोलोनामधलं वातावरण त्या काळी खूपच धार्मिक आणि कोंदट होतं.इतकं की जो मनुष्य कट्टर कॅथॉलिक नसेल अशा माणसाला साधा औषधोपचार जरी केला तर त्या डॉक्टरची चक्क पदवी रद्द करण्यात येई ! माल्पिघीला हे सगळं आवडत नसे.त्यानं बोलोना सोडलं आणि पिसा विद्यापीठात तो प्राध्यापक म्हणून रुजू झाला.तिथेच १६५६ मध्ये त्याची गिओव्हानी बोरेली याच्याबरोबर दोस्ती झाली. बोरेली हा एक प्रगतिशील विचारांचा गणितज्ञ आणि शरीरशास्त्रज्ञ होता.ते दोघं मग अनेक प्राण्यांची विच्छेदनं करत बसत आणि त्यावर तासन्तास चर्चा करत बसत.गॅलिलिओ आणि देकार्त यांच्यामुळे दोघंही भारावलेले होते.
यादोघांनी मिळून 'डेलसिमेंटो' नावाची विज्ञानाला वाहिलेली ॲकॅडमी ही काढली होती.पण ती फार काळ चालली नाही.बोरेलीनं प्राण्यांच्या हालचाली कशा होतात यावर खूपच अभ्यास केला होता.त्यावर त्यानं 'दि मोटू अनिमेलियम' (द मुव्हमेंट्स ऑफ ॲनिमल्स) या नावाचं पुस्तकही लिहिलं होतं.पण त्याच्या हयातीत हे पुस्तक प्रकाशित होऊ शकलं नाही.त्यानं वनस्पतींच्या हालचालींचाही बराचसा अभ्यास केला होता,त्यातूनच त्यानं 'बायोमेकॅनिक्स' या बायॉलॉजीच्या शाखेचा पाया रचला.त्यामुळे त्याला आयोमेकॅनिक्सचा प्रणेता' म्हटलं जातं. बायोमेकॅनिक्समध्ये केलेल्या कामगिरीबद्दल सर्वोच्च पुरस्कारही बोरेलीच्याच नावाचा आहे.
या काळात माल्पिघीनं प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र या दोन्हींमध्ये खूप मोलाचं संशोधन केलं.त्याचे बरेचशे शोध हे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्यानं केलेल्या अभ्यासातून लावले होते.त्या वेळच्या वैद्यकीय समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तो कायम प्रयत्नशील होता.कौटुंबिक जबाबदारी आणि आपली ढासळती तब्येत यांच्यामुळे माल्पिघीला बोलोनाला परतावं लागलं असलं तरी त्यानं सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं आपलं संशोधनाचं काम मात्र चालूच ठेवलं.संशोधनाच्या व्यतिरिक्त त्याला शिकवण्यात प्रचंड रस होता आणि त्यात त्याचा हातखंडाही होता.
विल्यम हार्वेनं रक्ताभिसरणाविषयी सिद्धान्त आधीच मांडून ठेवले होते.माल्पिघी त्यामुळे भारावून गेला होता.
पण हार्वेच्या थिअरीमध्ये एक मोठी उणीव अजून राहिली होती. धमन्यातून (आर्टरी) शुद्ध रक्त वाहतं,नंतर ते रक्त अशुद्ध होतं आणि मग ते शिरांतून (व्हेन) वाहायला लागतं,हे त्यानं सांगितलं होतं.पण हे रक्त धमन्यांतून शिरांमध्ये कसं जातं ? थोडक्यात,धमन्या आणि शिरा यांना कोण जोडतं? हा प्रश्न अजून सुटायचाच होता. इ. स. १६६० ते १६६१ च्या दरम्यान माल्पिघीनं सूक्ष्मदर्शकांखाली निरीक्षणं करून हे कोडं सोडवलं.
यासाठी त्यानं अक्षरशः शेकडो,हजारो बेडकं आणि वटवाघुळं यांची विच्छेदनं केली. फुफ्फुसांच्या वरून जाणाऱ्या गुंतागुंतीच्या रक्तवाहिन्या,आपली श्वसनप्रक्रिया आणि रक्ताच्या शुद्ध/अशुद्ध होण्याच्या प्रक्रिया यामध्ये काहीतरी संबंध आहे हे त्याला सूक्ष्मदर्शीनं केलेल्या निरीक्षणांवरून कळून आलं.यानंतर त्यानं सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं एका जिवंत बेडकाच्या फुफ्फुसाचं निरीक्षण करत असताना अगदी लहान धमन्यांना आणि अगदी लहान शिरांना जोडणाऱ्या त्याहीपेक्षा लहान रक्तनलिकांमधून (कॅपिलरीज) रक्त वाहताना बघितलं आणि हार्वेचं कोडं सोडवलं ! यातूनच रक्ताभिसरण कसं होतं याचं कोडं सुटलं होतं. माल्पिधीनं कॅपिलरीजचा शोध १६६० साली हार्वेच्या मृत्यूनंतर ३ वर्षांनी लावला आणि रक्ताभिसरण पूर्ण झालं..!!
पुढे माल्पिघीनं अनेक वनस्पतींची सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षणं केली.त्याचं एक मात्र चुकलं.त्याला पुनरुत्पादनाची प्रक्रिया नीटशी कळलीच नाही.कोंबडीच्या अगदी सुरुवातीच्या एका पेशीच्या अंड्यातही चक्क कोंबडीचं पूर्ण तयार झालेलं पण लहान असं पिल्लू असतं.ते तिथेच वाढतं आणि शेवटी अंड फोडून बाहेर येत अशी त्याची कल्पना होती.पुरुषाच्याही विर्यात अशीच अतिसूक्ष्म पण संपूर्ण तयार माणसं तरंगत असतात असे त्याला वाट!पण हेही त्याकाळी खूपच प्रगतशील म्हणावे लागेल त्यामुळेच मल्पिघीला गर्भशास्त्राचा प्रणेता मानले गेलं आहे.(उर्वरित भाग १९.०९.२४ या दिवशीच्या पुढील भागात..)