२८.११.२४ या लेखातील हा शेवटचा भाग..।
तो पेरिक्लीसला भर बाजारात शिव्या देऊ लागला. पेरिक्लीसने त्याला उत्तर दिले नाही.उत्तर देणे त्याला कमीपणाचे वाटले.पुढे न जाता तो परत माघारी वळला, घरी जायला निघाला.परंतु तो शिवराळ प्रतिपक्षी पाठोपाठ शिव्याची लाखोली देत येतच होता.अत्यंत कटू व नीच अशी ती वाग्बाणवृष्टी होती.घरी पोहोचेपर्यंत पेरिक्लीस शांत होता.जणू त्या शिव्यांकडे त्याचे लक्षच नव्हते! घरी पोहोचला तो बाहेर चांगलाच अंधार पडला. पेरिक्लीस आपल्या गुलामाला म्हणाला,मशाल पेटवून त्या सद्गृहस्थांना घरी पोचव,बाहेर अंधार आहे.
खासगी आचरणात पेरिक्लीस जरा अहंमन्य होता,जरा शिष्ट व फाजील प्रतिष्ठित होता.तो फारसे कधी कोणाचे आमंत्रण स्वीकारत नसे.क्वचित प्रसंगीच तो सार्वजनिक सभासंमेलनांस,
मेजवान्यांस उपस्थित राही.आपल्या आप्तेष्टांच्या घरीही तो क्वचितच जाई.त्याच्या स्वभावात अशी ही दूर राहण्याची वृत्ती होती.परंतु ही उणीव भरून काढण्यासाठीच की काय,तो हाताचा उदार होता.त्याची पिशवी दुसऱ्यासाठी सदैव मोकळी असे.
नागरिकांचे जीवन अधिक सुखमय व्हावे म्हणून सार्वजनिक फंडांना तो सढळ हाताने वर्गणी देई.नागरिकांचे जीवन म्हणजे जणू त्याचे खेळणे ! तो त्यांच्यासाठी प्रदर्शने भरावी,खाने देई,
कवायती व खेळ करवी.जगातील उत्तमोत्तम कलावंतांना तो अथेन्सला बोलावी आणि अथीनियन जनतेला कलात्मक आनंद देई.सर्व प्रकाराच्या खेळांना व कसरतींना त्याने उत्तेजन दिले. त्याने साऱ्या ग्रीस देशाचे जणू अखंड क्रीडांगण केले. त्यामुळे लोकांची भरपूर करमणूक होई.सर्वांना मजा वाटे.उधळेपणाचा आरोप त्याचे शत्रू त्याच्यावर करीत. लष्करी सामर्थ्य वाढावे म्हणून योग्य खर्च न करता हा या खेळांवर व कलांवरच भरमसाठ खर्च करीत बसतो, असे ते म्हणत.विरोधी पक्षाचे लोक म्हणत,"आमची ही अथेन्स
नगरी अलंकारांनी व सुंदर वस्त्रांनी नटलेल्या एखाद्या स्त्रीप्रमाणे दिसावी हे आम्हांस लज्जास्पद आहे.आमच्या आत्म्याच्या शौयांचा हा अपमान आहे."
परंतु पेरिक्लीस म्हणे,"अथेन्स युद्धार्थही सदैव सिद्ध आहे.शहराला सुंदर करण्यात पैसा खर्च होतो ती उधळपट्टी नसते.हजारो लोकांना त्यामुळे उद्योगधंदा मिळतो,काम मिळते.या लोकांना उद्योग न मिळाला,तर ते निरुपयोगी होतील,नाना प्रकारची वाईट कृत्ये करू लागतील."
अथेन्समधील साऱ्या जनतेत सृजनशक्तीचा दिव्य प्रवाहच जणू वाहू लागला.सारे कलात्मक निर्मितीत रंगले.जगातील शिल्पकारांचा मुकुटमणी फिडियस हा अथेन्समधील शिल्पकामावरचा मुख्य अधिकारी होता. त्याच्या योजनेप्रमाणे सारे होत होते.सर्वत्र फिडियसची देखरेख असे.फिडियस म्हणाला,सर्वत्र सौंदर्य फुलू दे.आणि शहरभर ठायी ठायी अप्रतिम पुतळे उभे राहिले, रमणीय व भव्य मंदिरे बांधली गेली.
ग्रीक लोक आपली मंदिरे,आपली शिल्पकलेची कामे रंगवीतही असत.पार्थवॉन येथील पडके अवशेष आज पाहून पूर्वीच्या सौंदर्याची खरी कल्पना आपणांस येणार नाही.ते अस्थिपंजराचे सौंदर्य राहिले आहे.पूर्वीची सौंदर्याचा नुसता हाडांचा सांगाडा जणू राहिले आहे. प्रोपिलिआचे भव्य चित्र कल्पनेने डोळ्यांसमोर आणा. तेथील ते हिरिरीने वरपर्यंत जाणारे रमणीय स्तंभ,ते क्रॉपॉलिसचे स्थान आणि तो संगीताचा सुदंर दिवाणखाना ! टेकडीवर असलेला ॲथीनी देवतेचा स्वर्गीय पुतळा ! जमिनीवरून व समुद्रावरून लांबून तो पुतळा दिसे.आणि सौंदर्याचे माहेरघर असे ते पार्थेनान ! पर्वतशिखरावर एखाद्या नक्षीदार हिऱ्याप्रमाणे ते चमकत असे.निळ्या अथीनियन आकाशाखाली ही सर्व शिल्पकामे अत्यंत सुंदर रंगांत शोभत असत,चमकत असत.
चुनखडी,पितळ,आरसपानी दगड यांच्या पाकळ्या आहेत अशी जणू खरोखरची फुले तेथील शिल्पांत दिसत.फिडियसच्या हाताचा जादूचा स्पर्श होताच दगडधोंड्यांतून फुले फुलताना पाहून ग्रीक लोकांचे हृदय उचंबळून येत असेल,यात काय शंका? या शिल्पनिर्मितीनंतर कित्येक शतकांनी झालेल्या प्लुटार्कने जेव्हा हे कलेचे अप्रतिम प्रदर्शन पाहिले,तेव्हा तो चकित झाला.रंग व रेषा यांचे ते निर्दोष मिश्रण पाहून त्याची जणू समाधी लागली! तो सांगतो,या शिल्पकृतींना अद्यापही एक प्रकारचा ताजेपणा आहे.काळाच्या स्पर्शापासून हा ताजेपणा या शिल्पाकृती सांभाळीत आहे.जणू या सौंदर्यमय कृतीत अमर असा आत्मा वास करीत आहे.या शिल्पाकृती निर्माण करीत असताना, यांचे मिश्रण तयार करताना,जणू अमर अशी स्फूर्ती व सजीवताच तिथे मिसळली जात होती !
अशा रीतीने,पेरिक्लीस अथेन्सला सौंदर्यखनी करीत असता त्याचे शत्रू त्याच्या आसनाखाली सुरुंग लावीत होते.खुद्द पेरिक्लिसवरच हल्ला करण्याचे धैर्य त्यांना नव्हते,तेव्हा त्याच्या मित्रांवरच त्यांनी हल्ला चढविला. ॲथीनी देवतेचा पुतळा अलंकृत करण्यासाठी एकाने सोने दिले होते.त्या सोन्यातील काही भाग फिडियसने चोरला असा त्याच्यावर आरोप करण्यात आला.परंतु फिडियसने त्या आरोपाला उत्तर दिले.स्वतःवरचा आरोप त्याने खोडून काढला;
मात्र फिडियसला पुन्हा अटक करण्यात आली.त्याच्यावर धर्माची विटंबना कण्याचा, नास्तिकतेचा आरोप करण्यात आला.देवतेच्या ढालीवर त्याने स्वतःची व पेरिक्लीसची प्रतिकृती काढण्याचा मूर्खपणा केला होता.अथीनियनांच्या दृष्टीने तो अक्षम्य अपराध होता.त्यांनी त्याला तुरुंगात टाकले.तिथे तो आजारी पडला.त्याला एक रोग जडला व तो मेला. कोणी म्हणतात,त्याला विष देण्यात आले.फिडियसने अथेन्सची जी अमोल सेवा केली,तिचे बक्षीस या यथार्थ अथीनियन पद्धतीने अथीनियन जनतेने त्याला दिले.
फिडियसला दूर करून पेरिक्लिसचे शत्रू आता अनॅक्झेगोरसकडे वळले.हा पेरिक्लिसचा आवडता आचार्य होता आणि आता त्याचा उत्कृष्ट मित्रही होता.त्याच्यावर अज्ञेयवादाचा आरोप लादण्यात आला.धार्मिक बाबतींतील मतस्वातंत्र्य नवीन कायदा करून नष्ट करण्यात आले.हा नवा कायदा म्हणजे जणू पेरिक्लिसलाही आव्हानच होते.कारण धार्मिक बाबतींत देवादिकांविषयीची त्यांची मते सनातनी पद्धतीची नव्हती.परंतु सार्वजनिक धार्मिक मतांची चर्चा तो टाळी. अशा रीतीने तो काळाजी घेऊ लागला.कारण किती झाले तरी तो मुत्सद्दी होता,तत्त्वज्ञानी नव्हता.
परंतु त्याची वारांगना अस्पाशिया हिला अटक करण्यात आली.त्याच्यावर हा सर्वांत प्रखर असा प्रहार होता,हा फार मोठा आघात होता.अस्पाशिया ही मूळची एजियन समुद्रावरच्या मिलेट्स शहरची राहणारी. अथेन्समध्ये अर्थातच ती परदेशी होती.कायदेशीररीत्या तिचा व पेरिक्लिसचा विवाह होऊ शकत नव्हता.परंतु तरीही पतिपत्नी म्हणून दोघे एकत्र राहात होती. पेरिक्लिसने आपल्या पहिल्या पत्नीशी काडीमोड केला होता.
अस्पाशिया व पेरिक्लीस यांचे एकमेकांवर फार प्रेम होते.
अस्पाशिया ही क्षुद्र वारांगना नव्हती.सुसंस्कृत, सुशिक्षित व सुंदर अशा वारांगनांचा एक विशिष्ट वर्ग अथेन्समध्ये होता,त्यात शोभणारी ती होती, अथेन्समधले लोक स्वतःच्या मातीच्या झोपड्यांपेक्षा सार्वजनिक इमारतींवर ज्याप्रमाणे अधिक प्रेम करीत. त्याप्रमाणे स्वतःच्या पत्नीपेक्षा ते या वारयोषितांवर अधिक प्रेम करीत.अथेन्समधील स्वतंत्र नारी मग त्या विवाहित असोत वा अविवाहित असोत,कमी मानल्या जात.कारण त्या अशिक्षित असत.त्यांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती.घरातील गुलामांबरोबर व गुरांढोरांबरोबर त्यांनी राहावे.एखाद्या प्रतिष्ठित अधीनियन पुरुषाला बुद्धीने आपल्या बरोबरीची अशी एखादी स्त्री सार्वजनिक संगतीसाठी हवी असली तर तो थेट त्या वारयोषितांकडे जाई.या विशिष्ट वर्गातील वारयोषितांना बौद्धिक शिक्षण मिळालेले असे.जो सुप्रसिद्ध पुरुष त्यांच्याकडे येई,त्याला शारीरिक व बौद्धिक आनंद द्यायला त्या समर्थ असत.
या ज्या धंदेवाईक सहचारी नारी असत,त्यांच्यामध्ये अस्पाशिया ही अत्यंत सुंदर व अती बुद्धिमती अशी होती.अथेन्समधील बुद्धिमंतांच्या मंडळांतील ती तेजस्वी तारका होती.ती जणू त्या मंडळाची अभिजात नेत्री होती! तिच्या मंदिरात तत्त्वज्ञानी,
मुत्सद्दी,संगीतज्ज्ञ, कवी,कलावान सारे जमत.इतरही सुसंस्कृत अशा विलासिनी वारांगना तिथे गोळा होत असत.
अस्पाशिया जमलेल्या लोकांना बौद्धिक मेजवानी देई.ती तात्त्विक वादविवाद करी आणि मोठमोठे तत्त्वज्ञानीही माथा डोलवीत. तिथे जमा होणाऱ्या इतर विलासिनीही आलेल्या प्रतिष्ठितांची करमणूक करीत.सॉक्रेटिस अस्पाशियाकडे वरचेवर जाणारांपैकी एक होता.कितीतरी पुरुषमंडळी आपल्या बायकांना घेऊन अस्पाशियाकडे येत. अस्पाशियाबरोबरच्या सुंदर व मार्मिक अशा चर्चा कानी पडून आपल्या बायका जरा शहाण्या व सुसंस्कृत व्हाव्यात,असे त्यांच्या पतींना वाटे.सर्वोच्च अशा जीवनकलेत अस्पाशिया पारंगत होती.
परंतु दुर्दैव,की धार्मिक बाबतीत ती स्वतंत्र मताची होती.
अनॅक्झेगोरसची अज्ञेयवादी मते तिनेही स्वीकारली होती.
पेरिक्लिसच्या शत्रूना प्रेमाच्या बाबतीत ती बंधनातीत आहे.
प्रेमाच्या बाबतीत तिचे स्वतंत्र विचार आहेत,याचे काही वाटले नाही.परंतु देवांवर अविश्वास दाखविणे हे फार वाईट असे त्यांना वाटले.अथेन्समध्ये अशा अपराधाला मरणाची शिक्षा असे.
अस्पाशिया गिरफदार केली गेली.तिच्या बचावाचे काम स्वतः पेरिक्लिसने आपल्या शिरावर घेतले.न्यायाधीशांसमोर भाषण करता करता तो भावनाविव्हळ होऊन रडू लागला.त्या निर्मळ व उत्कट अश्रूनी न्यायाधीशांवर परिणाम झाला.अस्पाशिया मुक्त केली गेली. अस्पाशियाचा खटला ज्युरींसमोर चालला होता.ही ज्युरीपद्धती पेरिक्लिसनेच सुरू केली होती.लोकशाहीच्या विकासातील ती एक नवीन गोष्ट होती. पूर्वी वरिष्ठ वर्गातील न्यायाधीशांचे ओरिओपागस नावाचे न्यायमंदिर असे.परंतु त्यांची सत्ता काढून घेऊन लोकनियुक्त न्यायाधिशांच्या ज्युरींकडे ती सत्ता देण्यात आली.हे जे लोकनियुक्त न्यायमंदिर त्याला दिकास्टरीस या नावाने संबोधण्यात येत असे.ही लोकशाही ज्युरीची पद्धत पेरिक्लिसने सुरू केलेली नसून ती सोलोनने सुरू केली असे काहींचे म्हणणे आहे.परंतु या सर्व ज्युरर्सना सरकारी तिजोरीतून पगार मिळावा असा कायदा पेरिक्लिसनेच केला.
या बाबतीत मात्र सर्व इतिहासकारांचे एकमत आहे. म्हणून ज्युरीपद्धतीचा पिता असे मानण्यात येते.
पेरिक्लिसलाच आजकालच्या आपल्या ज्युरीपेक्षा अथीनियन ज्युरी निवडीची पद्धत निराळ्या प्रकारची होती.ज्युरीतील सभासद चिठ्ठया टाकून निवडण्यात येत. परंतु खटला चालविण्यासाठी बाराच ज्युरर्स नसत,तर शेकडो असत.एखाद्या महत्त्वाच्या खटल्याच्या वेळेस कधी कधी एक हजारपर्यंत ज्युरर्स बसत.ज्युरर्स जास्त नेमण्यात लाचलुचपतीच्या प्रकारास आळा बसावा असा हेतू असे.शेकडो ज्युरर्स असले म्हणजे किती जणांस लाचलुचपत देणार ? अथीनियन ज्युरी पद्धतीतील गुणदोष काहीही असोत.ती मुळे पेरिक्लिसला ज्युरर्सच्या भावना उचंबळून अस्पाशियाला वाचवता आले हे खरे ! ज्युरर्सच्या मनोवृत्ती त्याने आपल्या वक्तृत्वाने व अश्रृंनी विरघळविल्या तुरुंगापासून व मृत्यूपासून अस्पाशिया सुटली.पूर्वीचे ते प्रतिष्ठित वर्गातील भावनाशून्य न्यायाधीश तिथे असते तर पेरिक्लिसला आपल्या प्रियकरणीचे प्राण वाचविणे कठीण गेले असते.पेरिक्लिसने जे नवीन न्यायदानतंत्र निर्माण केले,त्यांच्या योगाने अस्पाशियाचे प्राण वाचावेत,यांत एक प्रकारे काव्यमय न्याय आहे.त्या मिळालेल्या न्यायात जणू नवरसांचे मिश्रण आहे !
स्थानिक कारभार चालविण्यात पेरिक्लिसचा हात धरणारा कोणी नव्हता.तो अद्वितीय मुत्सद्दी होता,परंतु त्याची दृष्टी मर्यादित होती.अथेन्सच्या भिंतीपलीकडे त्याला पाहाता येत नसे.
विनवुडरीड आपल्या 'मनुष्याचे हौतात्म्य' या उत्कृष्ट पुस्तकात लिहितो,पेरिक्लीस हा चांगला अथीनियन होता,परंतु वाईट ग्रीक होता.तो अथेन्सचे कल्याण पाही.परंतु सर्व ग्रीकांचे हित,मंगल पाहणारी उदार व विशाल दृष्टी त्याला नव्हती.आपले अथेन्स शहर पहिले असले पाहिजे.अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती.परंतु दुसऱ्या एका ग्रीक शहराला अशीच महत्त्वाकांक्षा होती.स्पार्टालाही पहिले स्थान मिळविण्याची उत्कट इच्छा होती.स्पार्टातील सारे लोक युद्धकर्माला पूजीत.प्रत्येकजण शिपाई होता,शूर लढवय्या होता.
स्पार्टन लोक प्रामाणिकपणापेक्षा धैर्याला महत्त्व देत.लढाईतील शौर्य म्हणजे परमोच्च सद्गुण असे मानले जाई.या स्पार्टन लोकांत पहिल्या नंबरचे कलावान नव्हते; पहिल्या दर्जाचे कवी, तत्त्वज्ञानी त्यांच्यात नव्हते.परंतु ते पहिल्या दर्जाचे उत्कृष्ट लढवय्ये होते.
त्यांनी ग्रीसचे लष्करी नेतृत्व आपणाकडे पाहिजे अशी घोषणा केली आणि अथेन्सने मूर्खपणाने ते आव्हान स्वीकारले.दोन्ही शहरे निकरावर आली,हातघाईवर आली.आणि एक ग्रीक दुसऱ्या ग्रीकशी भिडल्यावर रक्त वाहिल्याशिवाय कसे राहील?
हे युद्ध टळावे म्हणून पेरिक्लिसने काहीही खटपट केली नाही.उलट ते युद्ध पेटावे म्हणून त्याने वाराच घातला. त्याची लोकप्रियता कमी होत होती म्हणून युद्ध पेटले तर बरे असे कदाचित त्याला वाटले असेल.जे युद्ध धुमसत होते,रेंगाळत होते,त्याचा भडका उडावा, सोक्षमोक्ष व्हावा असे त्याला वाटले असेल.एकदा युद्ध पेटले म्हणजे अथेन्स शहर पुन्हा त्यालाच शरण जाणार. त्याच्याशिवाय अथेन्सला कोण वाचवणार? 'तुम्हीच आमचे नेते,तुम्हीच तारक',असे मला अथीनियन म्हणतील.
मावळणारी लोकप्रियता पेटत्या युद्धाबरोबर पुन्हा वाढेल असे का त्याला वाटले? त्याने शेवटी स्वतःची महत्त्वाकांक्षाच जनतेच्या कल्याणापेक्षा श्रेष्ठ मानली.स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी युद्धाचा वणवा पेटवायला तो उभा राहिला.इतिहासातील हे नेहमीचेच प्रकार.पेरिक्लीसही त्याच मार्गाने गेला आणि शेवटी व्हायचे ते झाले.लोकांचा सर्वनाश झाला.पेरिक्लीस एका सार्वजनिक सभेत म्हणाला,तुम्ही युद्ध न कराल तर ती दुबळेपणांची कबुली दिल्याप्रमाणे होईल.स्पार्टावर अथेन्सचे प्रभुत्व स्थापावयाचेच असा त्याने निर्धार केला.परंतु स्पार्टाहून अथेन्स श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी का रक्तपाताचीच जरूर होती? युद्ध पुकारले गेले आणि त्याचबरोबर दुष्काळ आला. रोगांच्या साथी आल्या.अथेन्समधील निम्मी जनता रोगांना बळी पडली.स्पार्टन लोक आक्रमण करीत, हाणामाऱ्या करीत पुढे येत होते,म्हणून आसपासचे सारे लोक रक्षणार्थ अथेन्स शहरात शिरले.अथेन्समधील आरोग्याची व्यवस्था नीट नव्हती.सर्वत्र घाण झाली.जणू दुसरा नरक झाला ! पेरिक्लिसची बहीण प्लेगने मेली,त्याचे दोन मुलगेही मेले शेवटी पेरिक्लिसलाही प्लेगची गाठ आली आणि त्यानेही राम म्हटला !
पुन्हा ही काव्यमय न्याय त्याला मिळाला? परंतु मूर्खपणाच्या गोष्टीसाठी केवढी किंमत द्यावी लागली! हे युद्ध जवळजवळ एक पिढीपर्यंत चालले.ख्रि.पू.४३१ ते ४०४पर्यंत हे युद्ध सुरू होते.
आणि शेवटी अथेन्स हरले. अथेन्सने जगाला एक गोष्ट दाखविली,की अथेन्स चांगल्या लोकांची भूमी असेल;परंतु स्पार्टापुढे अथेन्सचे शिपाई रद्दीच ! …समाप्त