इतका वेळ हायवेवरून सुसाट धावणाऱ्या कारनं उजवीकडं वळण घेतलं.जवळपास बावीस वर्षांनंतर माहेरी चाललेल्या सरलाच्या डोळ्यांतून आठवणी पाझरू लागल्या.गाडीत ड्रायव्हरशेजारी बसलेला दहा वर्षांचा चिरंजीव अविनाश हादऱ्यांमुळे जागा झाला.मधल्या सीटवर सरला,तिची आठ वर्षांची कन्या अंजली आणि नवरा आनंदराव शिंदे बसले होते. सरलाचं मन भूतकाळात घुसलं.बावीस वर्षांपूर्वी याच रस्त्याने एस.टी.च्या लाल डब्यातून सहावारी साडीत गुंडाळलेली नवी नवरी चव्हाणांची सरला शिंद्यांची सून बनून बाहेर पडली होती.
गावातील प्रतिष्ठित जमीनदार आबासाहेब चव्हाण-सरकार यांच्या नातीनं घरगड्याच्या पोराशी गुपचूप लग्न केलं म्हणून दोघांनाही घरातून हाकलून दिलं होतं.ज्यांच्या शेतात काम केलं,घरात धुनी-भांडी केली,ज्यांनी आजपर्यंत जगवलं त्यांच्या घरातील वयात आलेल्या पोरीला फूस लावून लग्न केलं याचा धसका घेतलेले आनंदरावांचे वडील या जगातून निघून गेले.ज्या ताटात खाल्लं त्या ताटात पोरानं घाण केली म्हणून आईनं गाव सोडलं.ती परत कधीच कोणालाही दिसली नाही.घरगड्याच्या पोराला घरचा समजून शिकवलं,
गावातील शाळेत मास्तर केलं,त्या आनंदरावानं जिच्यासोबत भातुकलीचा डाव खेळला तिच्यासोबत संसाराचा डाव मांडला म्हणून आबासाहेबांनी त्याच्यासह नातीला हाकलून लावलं. यापुढं तुमचं तोंडसुद्धा दाखवू नका म्हणून घराबाहेर काढलं.तेव्हा आनंदरावांची हातची नोकरी गेली आणि सरला जेमतेम दहावी पास झाली होती.दोन हातात वायरीच्या पिशवीत मावतील एवढी कापडं आणि चार-पाच
भांडी घेऊन याच रस्त्यानं एस.टी.नं दोघांनी पुण्याची वाट धरली होती.त्यावेळी कच्च्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीच्या मागं उडणारं धुरळ्याचं लोट आजही डोळ्यांसमोर तरळत होतं.त्या आठवणींच्या कणांनी डोळं बोचत होतं.दोन्ही गालांवरून घरंगळणाऱ्या अश्रूमध्ये ऐन उमेदीत उपसलेलं कष्ट धुवून निघालं.आनंदरावांनी पुण्यात त्यांच्या मित्रांच्या ओळखीनं एक दहा बाय दहाची खोली भाड्यानं घेतली.
दोनमजली चिरेबंदी वाड्यात राजेशाही थाटात जगलेल्या सरलाचा जीव एका खोलीत संसार मांडताना घुटमळत होता. नवऱ्याला एका खासगी शिकवणी वर्गात नोकरी मिळाली.तुटपुंज्या पगारातून घरभाडं दिल्यानंतर खर्चाला उरलेल्या पैशात रेशन दुकानात मिळणारं धान्य विनारेशनकार्ड घेताना महाग वाटत होतं.
लहानपणापासून ताटात जेवढं खरकटं टाकत होते, तेवढ्यात आता दिवस काढायला लागत होता.एका पाटीत मावेल एवढाच संसारसट. ड्रेनेजच्या काठावर असणाऱ्या खोलीत वासानं जीव नकोसा झाला होता. त्यात मोठाले उंदीर आणि डुकरांची झुंबड उडाली की अंगावर काटा यायचा.
पाणी आणायला आणि सार्वजनिक संडासला हातात बादली घेऊन लाईनमध्ये उभा राहिल्यावर सरलाला गावातील सरंजामी थाट आठवत होता.अल्लड वयात कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता भावनेच्या भरात लग्न केलं.ते प्रेम होतं की सहवासानं निर्माण झालेलं आकर्षण हे मात्र कळत नव्हतं. प्रेम,लग्न आणि संसार ह्या आयुष्याच्या वाटेतील फुलबागा आहेत. कोणाच्या वाट्याला किती मात्र सांगता येणार नाही. रंगीबेरंगी फुलांसोबत घुटमळताना चैत्राचं ऊन आणि आषाढातील पावसाच्या सरी झेलण्याची तयारी केली पाहिजे,अन्यथा पानगळीच्या काळात जगणं मुश्किल होईल.आई- वडिलांनी केलेल्या लाडात लहानाचं मोठं होत असताना ज्याचं आकर्षण वाटतं,त्याला सरलानं 'प्रेम' असं गोंडस नाव दिलं होतं.खडतर वाटेवरून प्रवास करीत असताना बोचणाऱ्या खड्यांची तमा न बाळगता मार्गक्रमण करीत राहिलं पाहिजे.पायांच्या वेदनेपेक्षा मनातील निश्चय दृढ असला की वेदना त्रास देत नाहीत.
गावाकडच्या आठवणीत सरला दिवस दिवसभर रडत बसायची.रडून रडून तिचं सुजलेलं डोळं बघून आनंदरावांना चिंता वाटू लागली.सरलाचं मन रमण्यासाठी काय करायचं यावर उपाय म्हणून सरला पुढं शिकत राहिली.शहरातील पोरींमध्ये मिसळणं सरलाला सुरुवातीला अवघड वाटत होतं.आकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींमध्ये मंगळसूत्र घालून साडीत येणारी सरला बाईपणाच्या जबाबदारीनं मनमुराद हसूपण शकत नव्हती.अभ्यासात हुशारीची चुणूक दाखविली तशी ती इतर मुलींना आपलीशी वाटू लागली.
वर्गातील मुलींना आयुष्याचा आनंद लुटताना बघितल्यावर आपण इतक्या कमी वयात लग्न करून चूक केली आहे,याची जाणीव झाली;पण आता परतीचा मार्ग बंद झाला होता.
नवऱ्यानं समजूतदारपणा दाखविला आणि शिक्षण चालू आहे तोपर्यंत मूल होऊ दिलं नाही.जिद्दीनं शिक्षण पूर्ण करत करतच तीपण नवऱ्यासोबत शिकवणी घ्यायला लागली.
महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असताना इतर मुलींच्या संगतीनं सहज म्हणून स्पर्धा परीक्षा दिली आणि सरला तहसीलदारपदाची परीक्षा पहिल्या फेरीत उत्तीर्ण झाली.
दुर्दैवाने मुलाखतीत बाहेर पडली.
सरलाच्या बुद्धिमत्तेची जाणीव झाली म्हणून नवऱ्यानं तिला नोकरी सोडून पूर्णवेळ अभ्यास करायला लावला. दोघांच्या पगारात संसाराची गाडी सुरात चालली होती; पण नोकरी सोडून अभ्यास केल्यामुळे मिळकत बंद आणि पुस्तकांचा खर्च सुरू झाला.आनंदरावांनी नोकरीव्यतिरिक्त घराशेजारी शिकवणी सुरू केली. बायकोला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून खानावळीतून डबा सुरू केला.पुढच्या दोन-तीन प्रयत्नांत सरलाला अपयश आलं.नवऱ्याचं हाल, जेवणाची परवड होत असल्याचं बघून सरला पुन्हा मिळंल ती नोकरी करते म्हणून हट्ट करायची. आनंदरावांनी मात्र आस सोडली नाही.पाचव्या प्रयत्नात मात्र सरलानं यशाचं शिखर पार केलं आणि तिची तहसीलदारपदी निवड झाली.इतक्या कष्टानं मिळवलेल्या उत्तुंग यशानं तिच्यासाठी आकाश ठेंगणं झालं.
सरलाचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि नागपूर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील तालुक्यात तिला पहिली नियुक्ती मिळाली.
तेव्हापासून नोकरी आणि संसाराची जबाबदारी यात ती गुरफटून गेली होती.नोकरीत स्थिरस्थावर झाली,तोवर चिमुकल्या अविनाशचा जन्म झाला.तहसीलदार म्हणून तालुक्यात मिळत असलेला मानमरातब सरलाला बालपणीच्या घरंदाज राहणीमानाची आठवण करून देत होता.गावी जाऊन आई-बाबांना भेटून आपली यशोगाथा सांगावी आणि आशीर्वाद घ्यावेत,असं तिला सारखं वाटू लागलं; पण अडचणीच्या काळात भावांनी केलेल्या अपमानाची सल तिच्या मनाला टोचत होती.एकदा नवऱ्याच्या आजारपणात वडिलांकडे पैशाची मागणी केली होती; पण भावानं यापुढं घराची पायरी चढू नकोस म्हणून बजावलं होतं. 'आमच्यासाठी तू मेली आहेस' हे शब्द कडवलेल्या तेलासारखं तिच्या कानात घुमत होतं. शेवटी त्यांचीपण तशी चूक नव्हती.बहीण घरगड्याच्या पोरासोबत पळून गेली म्हणून भावांच्या लग्नात अडचणी येत होत्या.
त्यांच्या मुलांनापण याचा त्रास होणार होता.सोयरिक जुळविताना मुलांची आत्या कुठे दिली आहे म्हणून विचारलं की कोणतं घराणं सांगणार? सरला शिकून तहसीलदार झाली तरी तालेवार घराण्यातील सून नव्हती.वाघीण,प्रतिक पाटील,स्वच्छद प्रकाशन,कोल्हापूर
दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अविनाश विचारायचा, 'आई तू कोणाला राखी बांधली नाहीस? तुझा भाऊ कुठे आहे? तुझे आई बाबा कधी आपल्या घरी आले नाहीत किंवा आम्हाला तिकडे कधी घेऊन जात नाही? सगळ्यांना आजी- आजोबा आहेत मग आमचे आजी-आजोबा कुठे आहेत?' या प्रश्नांनी सरलाच्या मनाची घालमेल व्हायची.सरलाचं आई-वडील तिला भेटायला येण्याचा प्रयत्न करीत होतं;पण सरलाचं आजोबा आणि भाऊ परवानगी देत नव्हतं.आता तर वयात आलेल्या पोरांनी तिचं नावसुद्धा तोंडातून काढायला आळा घातला होता.घरी नव्या सुना आल्या, नातवंडं झाली.त्यांच्या हसण्या-खिदळण्यानं वाडा बोलका झाला;पण त्यात एक आवाज गुदमरून गेला होता.उतरत्या वयात शांत होत गेलेल्या सरलाच्या आईला नेमकं काय हवं आहे,हे कोणालाच विचारायची उसंत नव्हती.नव्या सुनांनी स्वयंपाक घरासोबत संसाराचा ताबा घेतला.आईनं अंथरूण धरलं.करारी आबासाहेबांनी कारभार नातवंडांच्या हवाली केला. वाड्याची वाटणी झाली.मिळेल त्या खोलीत प्रत्येकानं चूल मांडली.
खाणारी तोंडं वाढली.महागाई वाढली;पण शेतातील उत्पन्न विभागलं गेलं.आता आबासाहेबांना तंबाखूला नातवांकडे पैसे मागायची पंचायत झाली. त्यांच्या कर्तबगारीच्या काळात गावावर असा दरारा होता की,आबासाहेब रस्त्यानं जाताना समोरून कोणी रस्ता ओलांडत नव्हतं.उतरत्या वयाबरोबर मिशांचा ताव उतरला.नातसुनांच्या भांडणाला वैतागून एक दिवस आबासाहेबांनी जगाचा निरोप घेतला.
आज आबासाहेब चव्हाण यांची पाचवी पुण्यतिथी होती. खरंच आबासाहेबांनी नातीचं पुन्हा तोंड बघितलं नाही. आबासाहेब गेले तरी त्यांच्या विधीसाठी येण्याची हिंमत सरला करू शकली नाही.आपल्यामुळं पैपाहुण्यांत छी.. थू व्हायला नको म्हणून जाणं टाळलं पुढं कामाची जबाबदारी वाढत गेली.ओढाताण झाली तरी पैसा मिळत गेला आणि प्रगतीच्या धांदलीत घराची आठवण विरळ होत गेली.आता मात्र आईच्या पदराची ओढ सरलाला गावाच्या वेशीजवळ घेऊन आली.
शिल्लक राहिलेली गोष्ट पुढील भागात..।