स्वातंत्र्य मिळाले.विकासाची दिशा काय असावी याची चर्चा सुरू झाली.सोव्हिएट रशियाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून नियोजनबद्ध औद्योगिक विकासाची कास धरावी अशी जवाहरलाल नेहरूंची भूमिका होती.ह्या साऱ्या प्रक्रियेत महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्याच्या,आजूबाजूच्या निसर्गाशी संतुलन सांभाळणाऱ्या, स्वयंपूर्ण शेतीप्रधान समाजाच्या कल्पना बाजूला सारल्या गेल्या.मानवाने आपल्या गरजा अवास्तव भडकू देऊ नयेत,निसर्गाचे दोहन काळजीपूर्वक करावे,हे महात्मा गांर्धीचे जीवनविषयक तत्त्वज्ञानही अमान्य करण्यात आले. १९४९ साली आरंभी ह्या प्रक्रियेत महात्मा गांधींचे सहकारी अर्थतज्ज्ञ जे सी कुमारप्पा ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
पहिल्या बैठकीसाठी ते एका टांग्यात बसून सभास्थानी पोचले. इथे फक्त मोटार गाड्या सोडतो,टांग्यांना प्रवेश नाही म्हणून खाली उतरवण्यात आले.ते नेहरूंना म्हणाले,हे काय चालले आहे? नक्कीच ह्या देशात बैलगाड्या, टांग्यांना रस्ते वापरण्याचा मोटार गाड्यांइतकाच अधिकार नाही का? नेहरू उत्तरले,आहे हो,पण मोटारगाड्यांपासून अपघात होण्याचा धोका आहे, म्हणून कुठे कुठे बैलगाड्या,टांग्यांवर निर्बंध आणावे लागतात.कुमारप्पा उत्तरले,जर मोटार गाड्या हे खतरनाक वाहन असेल,तर त्यांच्यावर निर्बंध आणावे, ज्यांना धोक्यात पाडले जाते त्या बैलगाड्या,टांग्यांवर नाही.कुमारप्पांचा गांधींसारखा विज्ञान - तंत्रज्ञान यांत्रिकीकरणाला विरोध नव्हता. परंतु,त्यांचे म्हणणे होते की,भारतात भांडवलही मुबलक नाही,आणि लोकसंख्येच्या मानाने नैसर्गिक संसाधनेही तुटपुंजी आहेत.तेव्हा आपल्या विकासाचा भर आपली मुबलक मानवी संसाधने काळजीपूर्वक वापरण्यावर असावा.ह्यासाठी आपल्या जनसंपत्तीला विकासनीतीचा केन्द्रबिंदू बनवावे.त्यांचा आधार असलेली स्थानिक नैसर्गिक संसाधने कार्यक्षमतेने वापरत त्यांना समाधानकारक रोजगार निर्माण करणारा आर्थिक विकास हाच खरा अहिंसक आर्थिक विकास ठरेल.त्या दिशेने स्वतंत्र भारतात काहीतरी नावीन्यपूर्ण करून दाखवावे.पण त्यांची भूमिका पूर्णपणे नाकारली गेली, आणि अखेर कुमारप्पा नियोजन प्रक्रियेतून बाहेर पडले.
हे साहजिक होते,कारण कुमारप्पांनी सुचविलेल्या दिशेने जाण्यात देशातील प्रभावी आर्थिक हितसंबंधांना काहीच लाभांश नव्हता.
त्या जागी तथाकथित समाजवादी समाजरचनेतून झपाट्याने औद्योगिक प्रगतिपथावर वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरू झाला.
पण ह्या समाजवादात खऱ्याखुऱ्या सामाजिक,आर्थिक समतेचा पाठपुरावा करण्याचा इरादा बिलकूलच नव्हता.ह्या बेगडी समाजवादाचा अर्थ होता,लोकांच्या पैशाने, लोकांच्या जमिनी बळकावून,लोकांना निसर्गापासून आणखीनच दूर ढकलून ही सारी संसाधने सत्तेवर आता कब्जा केलेल्या वर्गांना अगदी स्वस्तात उपलब्ध करून देणे.कुमारप्पांच्या भाषेत हिंसक अर्थव्यवस्थेची घडी बसवणे.यातून नैसर्गिक संसाधनांच्या वापराची जी एक पद्धत बसवली गेली तिला राज्यशास्त्रात नाव दिले आहे,आयर्न ट्रायँगल.आपण मराठीत म्हणू शकू दुष्ट त्रिकूट.ह्या त्रिकूटाचे तीन घटक आहेत :पहिले म्हणजे लाभ लुटणारे : उद्योगपती,सधन शेतकरी,आणि संघटित क्षेत्रातील नोकरदार;दुसरे म्हणजे ह्या सर्व व्यवस्थेबद्दल निर्णय घेणारे राजकारणी,आणि तिसरे म्हणजे ही व्यवस्था अंमलात आणणारी नोकरशाही.ह्यांच्या हातमिळवणीतून नैसर्गिक संसाधने सत्ताधारी वर्गाच्या वेगवेगळ्या घटकांना प्रचंड सवलती देऊन पुरवण्याची व्यवस्था केली गेली.ह्या गैरव्यवस्थेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे निसर्गसंपत्तीची नासाडी.ह्याचे दुष्परिणाम शेवटी सगळ्यांनाच भोगावे लागणार,पण सत्ताधारी वर्ग बऱ्याच प्रमाणात आपला बचाव करून घेतात.दुष्परिणाम ताबडतोब भोगायला लागतात बहुजनांना;ग्रामीण भागातील भूमिहीनांना व अल्पभूधारकांना,मच्छिमारांना,पशुपालकांना,
बुरुडकाम करणाऱ्यांना,आदिवासींना व यातूनच उठून शहरांत येऊन झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या जनतेला.
ह्या त्रिकूटाच्या कार्यनीतीचे एक उदाहरण आहे पुण्याजवळच्या मुळशी खोऱ्याच्या दक्षिणेच्या अंबी खोऱ्यातल्या पानशेत धरणाची कहाणी.स्वातंत्र्यानंतर शहरांना,शेतीला पाणी पुरवण्यासाठी,
वीजनिर्मितीसाठी धरणे बांधण्याचा सपाटा सुरू झाला.या धरणांना पंडित नेहरूंनी आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे मानले.ही देवळे बांधली जात होती - डोंगराळ,वृक्षाच्छादित प्रदेशात.या धरणांच्या निमित्ताने तेथे पहिले रस्ते बांधले गेले. अशातले हे पानशेत धरण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारे भरपूर पावसाचे पाणी गोळा करून पुणे शहराला व शहराच्या पूर्वेला पर्जन्यछायेच्या प्रदेशात उसाच्या मळेवाल्यांना,सहकारी साखर कारखाने पळवणाऱ्या राजकारण्यांना पुरवते.त्याअगोदर पानशेत धरणात बुडालेल्या अंबी खोऱ्यात आणि त्याचे पाणलोट क्षेत्र असलेल्या डोंगर उतारांवर स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या.
नदीच्या चिंचोळ्या खोऱ्यात ते भातशेती करायचे,आणि डोंगर उतारावर फिरती शेती.दोन-तीन वर्षे नाचणी,सावा,तीळ पिकवून मग दहा-पंधरा वर्षे पडीत टाकायची अशी पद्धत होती.पण शेती करताना ते आंबा,हिरडा सांभाळून ठेवायचे. डोंगराच्या अगदी वरच्या चढांवर सरकारी राखीव जंगल होते.ज्यांची जमीन बुडली,त्यांचे पुनर्वसन पूर्वेच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात होणार होते.धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली.रस्ते झाले,गाड्या फिरू लागल्या आणि आतापर्यंत कधीही जास्त रोख पैसा न पाहिलेल्या शेतकऱ्यांना एक नवे जग सामोरे आले. १९५५-६० च्या दरम्यान पुण्यात लाकडी कोळशाला प्रचंड मागणी होती.हे वखारवाले,धरण बांधणारे इंजिनिअर,वनविभागाचे कर्मचारी एकदिलाने अंबी खोऱ्यातली वनसंपत्ती लुटायला तुटून पडले.धरण पुरे झाल्या- झाल्या १९७१ साली मी त्या भागात अनेक दिवस गावा-गावांत मुक्काम केला,लोकांशी बोललो. तोवर काही देवराया सोडल्या तर सारे डोंगर उघडे बोडके झाले होते.लोक सांगायचे की धरणाचे इंजिनिअर वखारवाल्यांबरोबर गावोगाव फिरले.तुम्ही आता हालणारच असे लोकांना सांगत पिढ्यान् पिढ्या जतन केलेली हिरडाआंब्याची मोठ-मोठी झाडे विकायला प्रोत्साहन देत.एक एक झाड आठ आण्याला अशा दरांनी विकून त्यांचा कोळसा केला गेला.वरच्या राखीव जंगलातही,लोकांच्या सांगण्याप्रमाणे प्रचंड भ्रष्टाचार होऊन जंगल साफ झाले.शेवटी विस्थापितांचे नीट पुनर्वसन झालेच नाही.त्यातले बहुतांश लोक आता उघड्या- बोडक्या झालेल्या,माती धुपून गेलेल्या डोंगरांवर सरकून उपजीविका करत आहेत.एकसष्ट साली घाईघाईने पाणी साठवल्यावर एकदा फुटून पुण्याचे भरपूर नुकसान केलेल्या ह्या धरणातून भरपूर सवलतीने पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा उपभोग पुण्याचे उद्योग,संघटित क्षेत्रातील नोकरदार,पुण्याच्या पूर्वेच्या मुलखातील सधन शेतकरी घेत आहेत.अर्थात याचे फायदे लुटणाऱ्या वर्गातून आजचे शासकीय अधिकारी, राजकीय पुढारी आले आहेत.आणखी अशाच अनेक प्रकल्पांना राबवत आहेत.ह्या सगळ्यांनी पाण्याबरोबरच स्वस्त लाकडी कोळसा आपल्या चुलीत जाळला.त्या व्यापारात आपले खिसे भरून घेतले.ह्यातून स्थानिक लोकांचे तर नुकसान झालेच,पण वन संपत्तीची, जल संपत्तीची प्रचंड हानी झाली.
डोंगर उतारांवर मातीची मोठी धूप होऊन धरण झपाट्याने गाळाने भरले.
ह्या पानशेतच्या धरणफुटीचा किस्साही बघण्याजोगा आहे.हे धरण फुटले तेव्हा मी पण पुण्यात होतो. काहीही पूर्वसूचनेशिवाय पुण्यात पोचलेला ह्या धरणातल्या पाण्याचा लोंढा पाहिला होता.
ह्या लोंढ्याने अधिकृत आकड्यांप्रमाणे निदान एकोणतीस जण मृत्यू पावले,सव्वीस हजार कुटुंबांचे सामानसुमान वाहून गेले,
छत्तीसशे दुकानांतील मालाची नासधूस झाली, बेचाळीस हजार पोती धान्य कुजून गेले.सर्वांना माहिती होते की पानशेतच्या धरणाला धोका होता.एकसष्ट सालच्या बारा जुलैला उजाडता-उजाडता धरणाला भगदाड पडले.हा पाण्याचा लोंढा पुण्यात पोचायला अडीच-तीन तास लागले.मग दुपारी खडकवासल्याचेही धरण फुटले;लोंढा आणखीच वाढला.आता पानशेतच्या, खडकवासल्याच्या इंजिनिअरांजवळ टेलिफोन होता, लष्कराच्या लोकांपाशी बिनतारी संदेश देण्याचीही सुविधा होती.तरी लोकांना ह्या दोनही धरणफुटीची धोक्याची सूचना कशी दिली गेली नाही? तेव्हाही गूढ होते.मी अलीकडे माझ्या चांगल्या परिवयाच्या, हा प्रसंग अनुभवलेल्या मुरब्बी अधिकाऱ्यांशी, इंजिनिअरांशी बोललो.कुणापाशीच काही उत्तर नाही.
मला वाटते याचे उत्तर पंचवीसशे वर्षांपूर्वीच दिले गेले आहे - ताओ-ते-चिंग ह्या राज्यकर्त्यास मार्गदर्शन करणाऱ्या चिनी ग्रंथात : सत्ताधीशा याचि मार्गे तु जावे । जनांना न काही कधी जाणु द्यावे ।। सुजाण प्रजा पार उधळे नि बाधे। अजाण प्रजा हाकणे काम साधे ।। म्हणोनी सदा वास्तवा छपवावे । खोटेपणाने नटावे, थटावे ।। जगभर आजपावेतो सगळेच राज्यकर्ते आपापल्या परीने ह्या उपदेशाचे पालन करताहेत. आपल्याकडून प्रजेला अंधारात ठेवून, खोटी नाटी आश्वासने देत,गलथानपणा,भ्रष्टाचार पचवताहेत.
पाश्चात्त्यांच्या परिसर चळवळी
मध्ययुगीन युरोपावर एकीकडून नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर,त्यातून झालेला वनांचा,वन्य जीवांचा विध्वंस,तर दुसरीकडून प्लेगच्या भीषण साथी आणि वाढती थंडी अशी संकटे येत असताना विज्ञान आणि विज्ञानाधारित तंत्रज्ञानाच्या बळावर त्यांनी जगावर घट्ट पकड बसवली.अमेरिका - ऑस्ट्रेलियात मूलवासीयांना खच्ची करून नवयुरोप वसवले.तिथली मुबलक सुपीक जमीन,वन व खनिज संपत्ती आपल्या काबूत आणली, ती आफ्रिकेतील गुलामांच्या श्रमांवर वाढवली.पण जोडीला युरोपाच्या परिसराचा नाश रोखून तो पुनश्च सुस्थितीत आणण्यास सुरुवात केली.
स्वित्झर्लंडसारख्या डोंगराळ देशात १८६० पर्यंत जंगल जवळजवळ पूर्ण नष्ट झाले होते.यामुळे प्रचंड दरडी कोसळून हाहाकार होऊ लागला,तेव्हा लोकजागृती होऊन त्यांनी पुनश्च अरण्य वाढवायला सुरुवात केली. आज स्वित्झर्लंडची वनश्री विशेष सुस्थितीत आहे.पण ही संपूर्णतः गावसमाजांच्या मालकीची आहे.सरकारी वनखात्याच्या नाही.
अमेरिकेत गोऱ्या लोकांनी प्रथम पाऊल ठेवले,तेव्हा तेथे सायबेरियातून आलेले रेड इंडियन मूलवासी निदान दहा हजार वर्षे राहात होते.त्यांची मोठ-मोठी माया-इन्कांसारखी राज्ये होती.
साहित्य,कला,संस्कृती होती.याच्या जोडीलाच वन्य पशुपक्ष्यांचे वैपुल्य होते.अनेक निसर्गरम्य स्थळे त्यांनी सांस्कृतिक-धार्मिक श्रद्धेतून जतन करून ठेवली होती.गोऱ्यांनी बंदुकीच्या बळावर या साऱ्या संस्कृतीचा,समाजाचा,जीवसृष्टीचा नायनाट केला.माया समाजातील विद्वानांचे पुस्तक न् पुस्तक हुडकून नष्ट केले,हरेक पंडिताची हत्या केली.तसेच उत्तर अमेरिकेतील कुरणांवर बागडणारे लक्षावधी बायसन-गोवंशातील पशू नष्टप्राय केले. ह्या बायसनची बेफाम शिकार करताना इतके मांस मिळायचे की त्यातली सर्वात स्वादिष्ट म्हणून केवळ जीभ खाऊन बाकीचे कलेवर तसेच कुजत टाकून दिले जायचे.हे निसर्ग व मानवी जीवनाच्या विनाशाचे युगकर्म पूर्ण होत आल्यावर,संपूर्ण अमेरिकी खंडावर गोऱ्यांची वस्ती पसरल्यावर,म्हणजेच आरंभानंतर तब्बल अडीच-तीनशे वर्षांनी अमेरिकी वसाहतवद्यांना निसर्ग रक्षणाच्या कल्पना सुचायला लागल्या.त्यातून यलोस्टोनसारखी राष्ट्रीय उद्याने निर्माण झाली.ही राष्ट्रीय उद्याने पाश्चात्त्य जगतातल्या परिसर चळवळींतले एक महत्त्वाचे पाऊल मानली जातात.यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान हे मूळ रेड इन्डियनांनी जतन केलेले निसर्गरम्य स्थळ होते. जेव्हा ते राष्ट्रीय उद्यान बनवले,तेव्हा तिथल्या जिवंत राहिलेल्या उरल्यासुरल्या मूलवासीयांना हाकलून देऊन ते गोऱ्या हौशी पर्यटकांच्या मनोरंजनाचे स्थळ बनवण्याची त्यांची इच्छा होती.तेव्हा त्यांनी मांडणी केली की राष्ट्रीय उद्यानात मानवाचा हस्तक्षेप मुळीच नको.मूलवासी रेड इन्डियनांच्या शतकानुशतकांच्या हस्तक्षेपातूनच यलोस्टोन समूर्त झाले होते हे सोईस्करपणे डोळ्याआड करून.ही अगदी चुकीची चौकट भारतातील आपल्या लोकांना शत्रू ठरवणाऱ्या वनविभागाच्या शासनाने व त्यांच्याबरोबर वन्यजीव संरक्षणाच्या कामात सहभागी झालेल्या राजे-महाराजांनीही स्वीकारली.इंग्लंड- अमेरिकेकडे डोळे लावून बसलेल्या भारतीय सुशिक्षित,शहरी, मध्यमवर्गानही हाच आदर्श मानला.हे आहे भारतात आज प्रभावी असलेल्या लोकविन्मुख पर्यावरणवादाचे मूळ.युरोपीयांची,व नव्याने विज्ञान व विज्ञानाधारित तंत्रज्ञान आत्मसात करून घेतलेल्या जपान सारख्या देशांतील आशिया आफ्रिकेचे शोषण कोणी,किती करायचे ह्या स्पर्धेतून पहिली व दुसरी महायुद्धे झाली. ह्यातल्या दुसऱ्या महायुद्धात आशियाच्या घनदाट,दमट जंगलात लढताना हिवतापाशी आणि विषमज्वराशी मुकाबला करण्यासाठी डी डी टी हे कीटकनाशक फारच प्रभावी आहे,हे १९३९ साली पॉल म्युलर ह्या स्विस रसायनशास्त्रज्ञाने दाखवून दिले.त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला,आणि ह्या शोधाबद्दल म्युलरला १९४८ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला.दुसऱ्या महायुद्धानंतर शेतीसाठीही उपयुक्त असे एक कीटकनाशक म्हणून डी डी टीचा जगभर वापर होऊ लागला.पण डी डी टी हे फार चिवट रसायन आहे.ते पर्यावरणात खूप काळ टिकून राहते. त्याने प्रभावित किडे खाल्लेल्या पक्ष्यांच्या शरीरात साठत राहते.ह्याचे एकूणच जीवसृष्टीवर खूप दुष्परिणाम होतात. हे लक्षात येऊन राशेल कार्सन ह्या जीवशास्त्रज्ञाने 'सायलन्ट स्प्रिन्ग' अथवा पक्ष्यांचा गळा आवळलेला वसंत ऋतू ह्या नावाचे सुप्रसिद्ध पुस्तक लिहिले.ह्या पुस्तकामुळे पाश्चात्त्य जगतात पर्यावरणाच्या समस्यांबद्दल लोकांच्यात खूप जाणीव निर्माण झाली व ह्या जाणिवेतून १९७२ साली डी डी टी वर बंदी आणण्यात आली, दुसरेही अनेक कायदे करण्यात आले.अगदी ह्याच कालावधीत १९५५ ते १९७५ अशी तब्बल वीस वर्षे आशियावर पाश्चात्त्यांची पकड ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून व्हिएटनामचे युद्ध झाले.एका बाजूने अमेरिकेत जीवसृष्टीला धोकादायक अशा रसायनांविरोधी पावले उचलली जात होती,तर दुसरीकडे व्हिएटनामच्या युद्धात व्हिएटनामच्या घनदाट वर्षावनांवर पानगळ करणाऱ्या रसायनांचे फवारे उडवले जात होते.म्हणजे मग ह्या निष्पर्ण,सुकू लागलेल्या,जगातल्या जैवविविधतेचे एक सर्वात महत्त्वाचे साठे आटू लागलेल्या,जंगलाच्या मुलखात व्हिएटकाँगचे सैन्य लवकर नजरेस येईल. (वारुळ पुराण,माधव गाडगीळ,
ई.ओ.विल्सन,संक्षिप्त अनुवाद नंदा खरे,मनोविकास प्रकाशन,)
व्हिएटनाममधले जैविक युद्ध लपून छपून चालले होते, आणि हार्वर्डचे एक वनस्पतिशास्त्रज्ञ अमेरिकी सैन्याबरोबर जैविक युद्धासाठी चुपचाप संशोधन करत होते.हार्वर्डचे बहुतांश विद्यार्थी युद्धाच्या विरोधात होते. त्यांच्यातल्या चळवळ्यांनी हे उपद्व्याप उघड्यावर आणून हार्वर्डच्या बेगडी उदारमतवादावर टीकेची झोड उठवली होती.आणि विल्सन ? एका बाजूने ते साऱ्या जैवविविधतेला जपा म्हणून जोरात प्रतिपादन करत होते,तर दुसऱ्या बाजूने ते अमेरिकेच्या आक्रमणाचे समर्थक होते.
अमेरिकेतल्या डी डी टी वरच्या बंदीचे उदाहरण वापरत अनेकदा आर्थिक समृद्धी आणि पर्यावरणाची जपणूक ह्यांबद्दल एक समीकरण मांडले जाते.जशी अमेरिकेची आर्थिक भरभराट झाली,तशी तिथे पर्यावरणाची जपणूक सुरू झाली.भारतासारख्या देशातही भरपूर आर्थिक विकास झाला की यथाकाल पर्यावरणाची जपणूक सुरू होईल.तोवर पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत आर्थिक विकास साधणे श्रेयस्कर आहे अशी ही विचारसरणी आहे.पण हे विवेचन अमेरिकेचा प्रभाव सर्व जगभर आहे हा महत्त्वाचा मुद्दा सोईस्करपणे डोळ्याआड करत आहे.
कदाचित अमेरिका आपल्या परिसरातले पर्यावरण जपत असेल, पण ह्या आर्थिक भरभराटीनंतरही तो देश बेमुर्वतखोरपणे जगात इतरत्र पर्यावरणाचा विध्वंस करत आहे.अगदी ह्या शतकातही इराकवर तिथल्या तेल साठ्यांवरची आपली पकड कायम ठेवण्यासाठी खोटा-नाटा प्रचार करत युद्ध लादले.त्या युद्धात तेल जळून,समुद्रात पसरून पर्यावरणाची जबरदस्त नासाडी केली. तेव्हा आर्थिक समृद्धी आणि पर्यावरणाची जपणूक ह्या दोहोंत काहीही साधे समीकरण मांडणे फसवे आहे.