* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: ज्ञानाचा खजिना A treasure trove of knowledge

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२/११/२४

ज्ञानाचा खजिना A treasure trove of knowledge

आपलं हुकलेलं श्रेय...!


नुकतीच वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली की,विविध प्रकारच्या घेण्यात आलेल्या चाचण्यांनुसार आपल्या पृथ्वीचे वय हे ४.५ बिलियन वर्ष आहे.थोडक्यात ४५४ कोटी वर्षे आहे.गंमत म्हणजे आपल्या 'पुराणांमध्ये' या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख आहे.पुराणांसाठी इंग्रजी प्रतिशद्ध Mythology हा आहे,Myth ह्या शब्दावरून बनलेला आहे.Myth चा अर्थ 'खऱ्यासारखे वाटणारे खोटे'. अर्थात Mythology म्हणजे,'जे खरे नाही ते..!' याचा दुसरा अर्थ असा की,पुराणात सांगितलेले खरे मानता येत नाही.ते आजी-आजोबांच्या भगवतभक्तीसाठी,भजन-कीर्तनासाठी ठीक असेलही.पण प्रत्यक्षात त्याला मोल नाही. पुराणातील गोष्टींना प्रमाण मानू शकत नाही.त्यांना काहीही ऐतिहासिक आधार नसतो.


मग आता विष्णुपुराणातील तिसऱ्या अध्यायातील हा श्लोक बघा -


'काष्ठा पञ्चदशाख्याता निमेषा मुनिसत्तम । काष्ठात्रिंशत्कला त्रिंशत्कला मौहूर्तिको विधिः।१, ३.८।

 तावत्संख्यैरहोरात्रं मुहूर्तेर्मानुषं स्मृतम् । 

अहोरात्राणि तावन्ति मासः पक्षद्वयात्मकः ।। १,३.९ ।। तैः षड्भिरयनं वर्ष द्वेऽयने दक्षिणोत्तरे । 

अयनं दक्षिणं रात्रिर्देवानामुत्तरं दिनम् ।। १,३.१० ।। दिव्यैर्वर्षसहस्त्रैस्तु कृतत्रेतादिसंज्ञितम् ।


चतुर्युगं द्वादशभिस्तद्विभागं निबोद मे ।।१,३.११।। चत्वारित्रीणि द्वे चैकं कृतादिषु यथाक्रमम् । 

द्विव्याब्दानां सहस्राणि युगोष्वाहुः पुराविदः।।१,३.१२ ।। तत्प्रमाणैः शतैः संध्या पूर्वा तत्राभिधीयते । 

सन्ध्यांशश्चैव तत्तुल्यो युगस्यानन्तरो हि सः ।।१, ३.१३ ।। सन्ध्यासंध्यांशयोरन्तर्यः कालो मुनिसत्तम । 

युगाख्यः स तु विज्ञेयः कृतत्रेतादिसंज्ञितः ।।१,३.१४ ।। कृतं त्रेता द्वापरश्च कलिश्चैव चतुर्युगम् । 

प्रोच्यते तत्सहस्रं ब्रह्मणां दिवसं मुने ।। १,३.१५ ।।


महाभारतातही या कालगणनेचे वर्णन आहे - 

काष्ठा निमेषा दशपञ्चचैव 

त्रिंशत्तु काष्ठा गणयेत्कलां ताम्।

 त्रिंशत्कलश्चापि भवेन्मुहूर्तो 

भागः कलाया दशमश्च यः स्यात् ।।

 त्रिंशन्मुहूर्तं तु भवेदहश्च 

रात्रिश्च सङ्ख्या मुनिभिः प्रणीता। 

मासः स्मृतो रात्र्यहनी च त्रिंशु 

त्संवत्सरो द्वादशमास उक्तः ।।


- महाभारत, १२ वा अध्याय (शांतिपर्व), २३८ वा सर्ग यामध्ये


१५ निमिष (पापण्या मिटण्या-उघडण्याचा काळ) १ कष्ट


३० कष्ट - १ कला


३० कला - १ मुहूर्त


३० मुहूर्त - १ दिवस / रात्र


३० दिवस / रात्री - १ महिना (मास)


६ महिने - १ अयन


२ अयन - १ मानवी वर्ष


३६० मानवी वर्ष - १ दैवी वर्ष


१२,००० दैवी वर्ष - ४ युगं ४३,२०,००० मानवी वर्ष १ चौकडी 


७२ चौकड्या (चतुर्युग) वर्ष - ३१ कोटी १० लाख ४० हजार,१ मन्वंतर 


अशी १४ मन्वंतरं झाली की तो ब्रम्हदेवाचा एक दिवस. १४ मन्वंतरं - ४३५.४५ कोटी मानवी वर्षे ब्रम्हदेवाचा १ दिवस


ब्रम्हदेवाचा दिवस आणि रात्र (सृष्टीचा आरंभ / अंत) ८७०.९१ कोटी मानवी वर्षे


सध्या चौदापैकी सातवे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. त्यातील अठ्ठाविसावे युग म्हणजे कलियुग आहे.


म्हणजे ४३५.४५ कोटी + २८ युगं (३ कोटी २ लाख वर्षे) = ४३८.६५ कोटी वर्षे. गंमत म्हणजे अथर्ववेदातही सृष्टीच्या आयुर्मानासंबंधी एक श्लोक आहे- शतं ते ऽ युतंहायनान्द्रे युगे त्रीणि चत्वारि ।। अथर्ववेद ८.२.२१।।


या श्लोकाच्या गणनेनुसार सृष्टीचे वय येतंय ४३२ कोटी वर्षे.) याचा अर्थ,आपल्या 'तथाकथित खऱ्या भासणाऱ्या,पण खोट्या असलेल्या' पुराणात सृष्टीचा निर्मितिकाळ हा ४३८.६५ कोटी वर्षे आहे असं लिहिलंय.आणि आधुनिक विज्ञान अगदी काटेकोरपणे केलेल्या निरीक्षणातून हे नोंदवतंय की सृष्टीचा उगम ४५४ कोटी वर्षांपूर्वी झाला असावा.


याचाच अर्थ,आपली पुराणं ही आधुनिक काळात नोंदलेल्या निरीक्षणांच्या बरीच जवळ आहेत.काही हजार वर्षांपूर्वी,आजच्यासारखी आधुनिक साधने नसताना, आपल्या पूर्वजांनी पृथ्वीच्या उगमाचं हे ज्ञान कुठून मिळवलं असेल..?


आजही आपल्या शाळेतली पोरं शिकतात की, 'निकोलस कोपर्निकस' (१४७३ - १५४३) ह्या पोलंडमधील खगोलशास्त्रज्ञाने,सर्वप्रथम 'सूर्य हा आपल्या ग्रहमालिकेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते' असे सांगितले..!


आपणही इतके करंटे की हीच माहिती पुढे देत राहिलो....ह्या कोपर्निकसच्या सुमारे अडीच,तीन हजार वर्षांपूर्वी पाराशर ऋषींनी विष्णुपुराणाची रचना केलेली आहे.त्या विष्णुपुराणातील आठव्या अध्यायातील पंधरावा श्लोक आहे. 


नैवास्तमनमर्कस्यनोदयः सर्वतासतः ।

उदयास्तमनाख्यंहि दर्शनादर्शनं रवेः।


अर्थात 'सत्य सांगायचं झालं तर सूर्याचा उदय आणि अस्त म्हणजे सूर्याचे अस्तित्व असणे आणि नसणे असे होत नाही.सूर्य नेहमीच तिथे आहे.'


अगदी अशाच स्पष्टपणे सूर्य,पृथ्वी,चंद्र,ग्रह-गोल-

तारे या सर्वांबाबत आपल्या पूर्वजांना माहिती होती. आणि ती सर्वांनाच होती.त्यात खूप काही थोर आपल्याला माहीत आहे,अशी भावना कुठेही नव्हती.म्हणजे ज्या काळात गाजलेला पाश्चात्त्य शास्त्रज्ञ टोलेमी (Ptolemy- AD 100 ते AD 170) हा 'पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य तिच्या भोवती फिरतो' हा सिद्धांत मांडत होता,आणि पाश्चात्त्य जग (अगदीच तुरळक अपवाद वगळता) त्याचं समर्थन करत होतं,त्या काळात भारतात आर्यभट्ट अत्यंत आत्मविश्वासाने आपले प्राचीन ज्ञान प्रतिपादन करत होते


अनुलोमगतिनरस्थः पश्यत्यचलं विलोमगं यद्वत् ।

अचलानि भानि तदवत्समपश्चिमगानि लड्कायाम् ।।

उदयास्तमयनिमित्तं नित्यं प्रवहेण वायुना क्षिप्तः ।

लङ्कासमपश्चिमगो भपञ्जरः सग्रहो भ्रमति 


(आर्यभटीय ४.९ ते ४.१० श्लोक)


अर्थात 'ज्याप्रमाणे अनुलोम (गतीने पुढे) जाणारा आणि नावेत बसलेला मनुष्य,अचल असा किनारा विलोम (मागे) जाताना पहातो,त्याचप्रमाणे लंकी मध्ये अचल असे असलेले तारे पश्चिम दिशेस जाताना दिसतात.(भारतीय ज्ञानाचा खजिना,प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन) 


राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…



खरे भिकारी... आणि आमचे दरिद्री नारायण !!! 


श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट पुणे चे ट्रस्टी आदरणीय श्री प्रताप भोसले सर, यांचा एके दिवशी मला फोन आला आणि म्हणाले, 'तुमच्या याचक मंडळींना प्रत्येकी दहा किलो साखर; दिवाळीच्या मुहूर्तावर द्यायची आम्हाला इच्छा आहे.'


मी हरखुन गेलो...! 


तरीही भोसले सरांना मी म्हणालो, 'सर आपण हे दान त्यांना मोफत नको देऊयात... त्यांच्याकडून काहीतरी छोटं मोठं काम करून घेऊया आणि मग त्यांना हि साखर देऊया... ! 


ते म्हणाले, 'तळजाई टेकडी साफ करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,आम्ही ते रोज करतो,यात तुमच्या खराटा पलटणचे लोक येतील का ? 


आणि मग आमच्या खराटा पलटण मधील वीस लोकांना आम्ही घेऊन गेलो... तळजाई टेकडी आम्हाला जमेल तशी आम्ही स्वच्छ केली... 


यानंतर ट्रस्टच्या मार्फत,श्री.प्रताप भोसले सर यांच्या हस्ते आम्हाला एक किलो ?  दोन किलो ?  नाही.... तर तब्बल ५०० किलो साखर मिळाली... ! 


यापैकी ज्यांनी स्वच्छतेचं काम केलं होतं,अशा वृद्ध याचकांमध्ये २६ ऑक्टोबर रोजी ३५० किलो साखर आम्ही श्री शंकर महाराज मठामध्येच वाटून टाकली... ! 


सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या समक्ष.... !!! 


यानंतर श्री प्रताप भोसले साहेब आणि त्यांच्या सेवेकर्‍यांनी आम्हाला आदराने बसवून जेवू घातले.... महाप्रसाद दिला... ! 


VIP कोट्या मधून आम्हाला सन्मानाने श्रीं चे दर्शन घडवले... ! 


तुम्ही भिकारी किंवा भिक्षेकरी किंवा याचक नसून माणसं आहात.... याची आम्हाला त्यांनी याप्रसंगी जाणीव करून दिली...!


यावेळी माझ्या डोळ्यात पाणी होतं...! 


भिक्षेकरी वर्गाचा कुटुंब प्रमुख म्हणून मी आदरणीय सद्गुरु श्री शंकर महाराज याच्या पायाशी नतमस्तक होत आहे.... ! 


ज्या भोसले सर आणि त्यांच्या सेवेकर्‍यांनी आम्हा सर्वांना मानाची वागणूक देऊन, माणुसकीचे दर्शन घडवले, अशा सर्वांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांना प्रणाम करतो... !!! 


भिकारी / भिक्षेकरी म्हणजे गलिच्छ लोक... घाण आणि कचरा करतात.... असा एक समज आहे ! 


आज माझ्या या याचक मंडळींनी; माझ्या एका शब्दावर, तथाकथित उच्च वर्गीय (??) लोकांनी" तळजाई टेकडीवर पिलेल्या दारूच्या बाटल्या उचलल्या... सोबत लेज,कुरकुरे आणि इतरही काही प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या उचलल्या आहेत.... ! मी लहान असताना,आमच्या घरात कचरा उचलायला एक मावशी आली होती... तिने घराची बेल वाजवली आणि मी आईला म्हणालो, 'कचरा दे... कचरेवाली मावशी आली आहे....' 


माझ्या आईने घरातला कचरा देत,त्या मावशीच्या हातात काही खायच्या वस्तू ठेवल्या आणि मला म्हणाली, 'कचरेवाली ती मावशी नाही...कचरेवाले आपण आहोत बाळा ..! या शब्दांचा अर्थ तेव्हा मला कळला नाही; परंतु आता कळतो आहे...! 


पवित्र स्थानांवर दारू पिऊन बाटल्या टाकणाऱ्या श्रीमंत लोकांना मला सांगायचं आहे...खऱ्या अर्थाने तुम्ही भिकारी आहात... !"


मी भिकारी हा शब्द वापरत नाही,भिक्षेकरी किंवा याचक हा शब्द वापरतो...


परंतु त्यांच्यासाठी भिकारी हाच शब्द योग्य आहे... !!! 


पवित्र स्थानांवर दारू पिऊन बाटल्या फेकणे, प्लास्टिकचे पिशव्या फेकणे,प्लास्टिक बाटल्या फेकणे आणि त्या न उचलणे... 


हे सर्व करणारे लोक,कदाचित सुशिक्षित असतील, परंतु सुसंस्कारित नाहीत.... ! 


आणि म्हणून बुद्धी,मन,अंत:करण पैशाला विकणारे... हे लोक खरे भिकारी आहेत... !!! 


इथे या लोकांसाठी मला भिकार हाच शब्द वापरायचा आहे... ! असो "या भिकाऱ्यांनी" केलेली घाण... माझ्या दरिद्रीनारायणाने आज साफ केली आहे... ! 


या बदल्यात सद्गुरु श्री शंकर महाराज यांनी मात्र प्रत्यक्ष आम्हाला आशीर्वाद देऊन,आज खऱ्या अर्थाने आम्हा दरिद्रीनारायणांना श्रीमंत केलं आहे.... !!! 


नतमस्तक !!! 


२७ ऑक्टोबर २०२४,डॉ.अभिजीत सोनवणे,

डॉक्टर फॉर बेगर्स