* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: विवेकनिष्ठ मानसोपचार Discretionary psychotherapy

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/११/२४

विवेकनिष्ठ मानसोपचार Discretionary psychotherapy

माणसाच्या वर्तनात सुधारणा कशी होईल,याचा शोध घेताना आपल्या पूर्वानुभवांचा उपयोग करून एलिस यांनी पुढील निष्कर्ष काढले : 


१. स्वतः च्या विचारांत उचित बदल करून मनुष्य स्वतः चे अनिष्ट वर्तन बदलू शकतो.


२. विचारांत बदल केल्यावर नव्या विचारांनुसार कृती करण्यास त्यास प्रवृत्त केले तर हा बदल फलदायी ठरू शकतो. 


३. थोडक्यात वर्तनात बदल करावयाचा असेल तर मनुष्याने प्रथम त्याच्या विचारांत व त्यानुसार कृतीतही बदल करणे आवश्यक आहे. 


या निष्कर्षांनुसार सन १९५० पासून १९५३ च्या सुरुवातीपर्यंत एलिस हे आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तींना जास्त सक्रियपणे मार्गदर्शन करण्यावर भर देऊ लागले. तसेच आपल्या उपचार पद्धतीत एखादी विशिष्ट कृती करण्यावर भर देणारा गृहपाठ देण्याच्या पद्धतीचाही अंतर्भाव करण्यास त्यांनी प्रारंभ केला. गृहपाठ करणे म्हणजे कृतीजन्य सराव करणे होय.याचा परिणाम असा झाला,की या पद्धतीचा उपयोग केल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तींना केवळ बरे वाटू लागले नाही,तर त्यांच्या वागण्यात अपेक्षित परिवर्तनही घडून येऊ लागले.


फार काय पण ही अंत्यदृष्टी माणसाला याचीही जाणीव करून देत नाही.की आपल्या पूर्वायुष्यात आपण जेव्हा केव्हा अस्वस्थता,

चिंता,विषण्णता,व्देष इत्यादी भावनांच्या अधीन गेलो होतं.तेव्हा त्या भावनांच्या निर्मितीला आपण 'स्वतःही' हातभार लावला होता.


एखाद्या माणसाला चालू क्षणी बेजार करणाऱ्या मानसिक समस्येचे कारण त्याच्या मनात सद्यस्थितीत स्थान मांडून बसलेल्या दृष्टिकोनात शोधणे अधिक फलदायी असते.


गौतम बुद्ध,लाओत्से,एपिक्टेटस,एपिक्युरस इत्यादी तत्त्ववेत्त्यांनी सांगून ठेवल्याप्रमाणे माणूस त्याच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमुळेच नव्हे,तर त्या घटनांमुळे अस्वस्थ होण्यात व नंतर ती अस्वस्थता टिकवून ठेवण्यात त्याचे स्वतःचे विचारही बऱ्याच अंशी जबाबदार असतात.हा महत्त्वाचा सिद्धांत एपिक्टेटस या प्राचीन रोमन तत्त्ववेत्त्याच्या शब्दांत सांगावयाचा झाला, तर असे म्हणता येईल, की माणसे त्यांच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ होत नाहीत, तर त्या घटनांकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनांमुळे अस्वस्थ होतात.


विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राचा प्रमुख सिद्धांत असा आहे की,माणसाच्या समस्येची मूळ त्याच्या बालपणीच्या अनुभवात अथवा इतर कशातही असले तरी ती टिकून राहण्याचे कारण त्याच्या अशास्त्रीय,तर्कदुष्ट,अवास्तव विचारांत व जीवनाकडे व स्वतः कडे बघण्याच्या दृष्टिकोनात सापडू शकते.माणसाला जर स्पष्ट,तर्कशुद्ध,वास्तववादी व शास्त्रीय पद्धतीने विचार करावयास शिकविले,तर त्याच्या मानसिक समस्या जवळजवळ संपूर्ण नष्ट होतील व तो आपले जीवन जास्त समृद्ध व सुखी करू शकेल.

अर्थात याचा अर्थ असा नाही,की माणसाच्या मानसिक अस्वस्थतेच्या मुळाशी त्याचे काही विशिष्ट दृष्टिकोन असतात.


मी विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचा जनक आहे खरा, परंतु माझ्या या निर्मितीबद्दल लोक मला कधी कधी वाजवीपेक्षा अधिक श्रेय देतात, असे एलिस आवर्जून सांगतात. त्यांचे म्हणणे असे, की आपण विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्रातील मुख्य सिद्धांत एपिक्टेटस व मार्कस ऑरोलियस यांच्यासारख्या प्राचीन तत्त्ववेत्त्यांकडून चक्क चोरला आहे. ते पुढे असेही म्हणतात की, जर कोणी मानसोपचारशास्त्राची एखादी अगदी संपूर्ण नवी पद्धत शोधून काढण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या असे लक्षात येईल की त्याच्या मानसोपचारपद्धतीची मूलतत्त्वे इतिहासाच्या पानांमध्ये कोठे ना कोठे तरी आढळून येतातच !


अशा प्रकारे एलिस यांनी आपल्या चौर्यकर्माची कबुली दिली असली,तरी आपण हे  विसरता कामा नये, की त्या कबुलीमधून जसा त्यांचा प्रामाणिकपणा व्यक्त होतो, तशीच त्यांची नम्रताही दिसून येते, कारण वस्तुतः त्यांनी गेल्या अनेक वर्षांत मानसिक अस्वास्थ्याचे स्वरूप, त्या अस्वास्थ्याची चिकित्सा आणि त्या अस्वास्थ्यावर करावयाचे उपाय या विषयांमध्ये स्वतःच्या सर्जनशील परिश्रमांनी फार मोठी भर घालून, विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र समृद्ध केले. तसेच विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचा उपयोग जीवनाच्या जवळजवळ सर्व क्षेत्रांत कसा करता येईल हे दाखवून देऊन त्या शास्त्राची व्याप्तीही विस्तृत केली. ही व्याप्ती समजून घेण्यासाठी विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राची गेल्या सहा दशकांतील प्रगतीची स्थूल रूपरेषा प्रथम समजून घेऊ.


४. १ मानसिक दुःखाचे मूळ


सामान्यतः आपण असे समजतो की, आपली दुःखे अथवा मानसिक क्लेश आपल्या सभोवताली हरघडी घडणाऱ्या घटनांतून निर्माण होत असतात.समजा,एखाद्याने आपला अपमान केला तर आपण संतापतो.आपल्या हातून काही चूक झाली, तर आपल्याला अपराधी भावना ग्रासून टाकते.सामाजिक,आर्थिक अथवा कौटुंबिक परिस्थिती निराशाजनक असली म्हणजे आपण विषण्ण होतो.आपण एखाद्या कामात अयशस्वी झालो अथवा आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात राहता आले नाही,आपण दु:खीकष्टी होतो.ज्यांच्याकडून आपण प्रशंसेची वा सहानुभूतीची अपेक्षा करतो त्यांच्याकडून प्रेम वा सहानुभूती मिळाली नाही, तर आपण निराश होतो. सुरेल संगीताच्या श्रवणाने आपल्या चित्तवृत्ती बहरून येतात आणि हाती घेतलेले अवघड काम यशस्वीपणे पूर्ण केले की, आपल्याला हर्ष होतो.


हे सर्व खरे असले तरी बारकाईने विचार केला असता असे दिसून येते की, आपल्याला वाटणारे सुख अथवा दुःख, हर्ष वा खेद केवळ आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर अवलंबून नसतात. बाह्य जगातील घटनांकडे व इतरेजनांच्या वर्तनाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो व त्यांचा आपण काय अर्थ लावतो यावरच आपले हर्ष-खेद, सुख- दुःखे इत्यादी भावना प्रामुख्याने अवलंबून असतात.एक साधे उदाहरण दिले म्हणजे वरील मुद्दा स्पष्ट होईल. समजा, आपल्या जिवलग मित्राने आपल्याबद्दल काही अनुदार उद्गार काढल्याचे आपल्या कानांवर आले तर आपल्याला राग येतो. आता आपल्या मित्राने उच्चारलेल्या अनुदार वाक्यांना आपण 'अ' टप्पा असे मानू. आपल्याला जो राग येतो, त्याला आपण 'क' टप्पा असे म्हणू. सामान्यतः आपण असे समजतो की 'अ' ही घटना 'क' टप्प्याचे कारण असते; पण खरी गोष्ट अशी असते की 'क'चे कारण 'ब' असते. मग साहजिकच असा प्रश्न उद्भवतो की, 'ब' म्हणजे काय? त्याचे उत्तर असे की 'अ' या घटनेचा आपण जो अर्थ लावलेला असतो,जी फोड केलेली असते तिचे नाव 'ब' टप्पा.


आपल्या मित्राचे बोलणे आपल्या कानांवर आले की, आपण स्वत:शी म्हणतो, "काय म्हणावे या वागण्याला? शोभते का त्याला हे? आपल्याशी वरवर किती गोड बोलतो आणि मागे मात्र नावे ठेवते !... नीचपणाचा कळस झाला !... कमाल झाली याच्यापुढे... इत्यादी." क्षणार्धात आपल्या मनात हे विचार चालू होतात आणि आपल्या रागाचा पारा चढू लागतो. अपमान, तिरस्कार, द्वेष, खेद वगैरे भावना आपल्याला ग्रासून टाकतात. आपल्या मित्राची वागणूक अयोग्य, अनुदार, अवास्तव, कृतघ्न असल्याचे आपण ठरवितो व त्यामुळे आपल्याला राग येतो. म्हणजे आपल्या मित्राच्या वागण्याचा आपण जो अर्थ लावतो व जे मूल्यमापन करतो, तेच आपल्या भडकलेल्या भावनांचे खरे कारण असते.


४. २ विचार व भावना


भावनांचा उगम कसा होतो याचा अभ्यास केल्यास असे दिसते की, आपल्या मेंदूतील हायपोथॅलॅमसमधील नसपेशींच्या उद्दीपनाने किंवा आत्मनियंत्रित मज्जासंस्थेच्या 'Autonomic Nervous System'च्या उद्दीपनाने भावनांचा उद्भव होतो. या स्थळांचे उद्दीपन खालील तीन मार्गांनी होऊ शकते.


१. विद्युतशक्तीने उद्दीपित करून.

२. रासायनिक चेतकांचे सेवन करून. 

३. विचारप्रक्रियांत बदल करून.


म्हणून भावनांचा प्रक्षोभ शांत करण्यासाठी तत्त्वतः खालील उपाय योजणे शक्य आहे. 


१. विद्युतशक्तीने मेंदूला झटके देणे अथवा काही रासायनिक औषधांचे सेवन करणे.

२. शारीरिक विश्रमण 'Relaxation' करणे अथवा आराम वाटेल अशा तऱ्हेने स्नान घेणे.

३. आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास मिळवून त्या व्यक्तीखातर मन शांत करणे.

४. भावनांचा प्रक्षोभ कसा आत्मघातकी व निरुपयोगी असतो हे स्वतःस पटवून देऊन,


विचारपूर्वक प्रयत्न करून मनाचा समतोल परत प्रस्थापित करणे. हे सर्व मार्ग कमी-जास्त प्रमाणात यशस्वी ठरतात; तरी विवेकनिष्ठ मानसोपचारपद्धतीचा भर शेवटच्या मार्गावर आहे, कारण बऱ्याच वेळा आपल्या भावनांच्या मुळाशी अवास्तव, तर्कदुष्ट, अशास्त्रीय विचार असतात व हे विचारच बदलले नाहीत व इतर उपायांनी भावनांचा प्रक्षोभ शांत केला तर ते उपाय तात्पुरते ठरतात.


४. ३ विचार व भाषा


आपले विचार व भावना यांचे नाते किती नजीकचे आहे हे आपण पाहिलेच. आता आपण विचार कसा करतो, म्हणजे आपल्या विचारांचे माध्यम काय आहे, ते पाहू. सर्व प्राणिमात्रांच्यात मनुष्याचे वैशिष्ट्य असे की, मनुष्य फार मोठ्या प्रमाणावर प्रतीकांचा वापर करीत असतो. मनुष्य भाषा निर्माण करतो व वापरतो व त्याचे चिंतन भाषेच्या माध्यमातून चालू असते. किंबहुना मनुष्य विचार करतो अथवा चिंतन करतो म्हणजे तो स्वतःशी मनातल्या मनात बोलत असतो, असे म्हटले तर ती फार अतिशयोक्ती होणार नाही. माणसाचे हे सतत चालणारे स्वगत भाषण म्हणजेच त्याचे विचार आहेत.


आपल्या भावनांच्या मुळाशी विचार असतात.हे विचार म्हणजे स्वतःशी बोललेली काही वाक्ये असतात.म्हणजे आपण जी वाक्ये स्वतःशी बोलत असतो,तीच आपल्या मनात भावना उत्पन्न करतात.आपल्या दुःखाचे मूळ काहीही असो ते दुःख टिकून राहण्यासाठी त्या संदर्भात आपण सतत काहीतरी स्वतःशीच बोलत असतो खास.


तर्कदुष्ट व अवास्तव विचार करून त्यांच्या जागी तर्कशुद्ध व वास्तव विचारांची प्रतिष्ठापना केली तर आपले दुःख कमी होऊ शकते.आपण आपल्या स्वत:कडे, इतरांकडे व जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून लावत असतो. आपल्या भावनांच्या मुळाशी हे दृष्टिकोन असतात. या दृष्टिकोनांच्या जडणघडणीत आपण ज्या समाजात वाढतो तो समाज महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या समाजाकडून आपण कळत-नकळत काही विचार शिकत असतो. आपले सगळे दृष्टिकोन समाजाकडून जसेच्या तसे आलेले नसतात. काही वेळा आपण स्वत:ला आलेल्या अनुभवांवरून अर्थ लावून स्वतःचे वेगळे दृष्टिकोन तयार करतो, तर काही वेळा आपल्या जैविक प्रवृत्तीनुसार विशिष्ट दृष्टिकोनांतून विचार करण्याकडे आपला कल असू शकतो.


एखाद्या मनुष्याच्या मनात वरीलपैकी एक अथवा अनेक विवेकशून्य विचार थैमान घालत असतील तर तो सभोवतालच्या घटनांचे व परिस्थितीचे विवरण त्या विशिष्ट दृष्टिकोनांतून करतो, त्यानुसार स्वतःला सतत काहीतरी सांगतो व म्हणून दुःखी होतो.


माणूस स्वतः पुढील एखाद्या समस्येच्या संदर्भात जेव्हा स्वतः ला अनिष्ट भावनांच्या वादळात ढकलून देतो, तेव्हा तो आपल्या निसर्गदत्त बुद्धीला काही अंशी लुळी- पांगळी करून आपले समस्या सोडविण्याचे सामर्थ्य व कौशल्य निरुपयोगी करून टाकतो.पुरातन काळापासून काही विचारवंत असे सांगत आले आहेत, की माणूस स्वत: पुढील एखाद्या समस्येचे जर काळजीपूर्वक निरीक्षण करील, तर त्याला असे दिसून येईल, की तो त्या समस्येचा एक भागच होऊन बसला आहे. या मार्मिक उक्तीचा अर्थ असा, माणूस स्वतः पुढील समस्येच्या अनुषंगाने स्वतः च्या मनात कोणत्या भावना निर्माण कराव्यात की व कोणती कृती करावी हे स्वेच्छेने ठरवीत असतो. तो अशा वेळी आपल्या मनात ज्या भावना उत्पन्न करून जसा वागतो त्यानुसार तो एक तर आपल्यापुढील समस्या कार्यक्षमतेने सोडवितो व आपले जीवन शक्यतो आनंदाने व सर्जनशीलपणे जगतो नाही तर आपल्या

पुढील समस्या अकार्यक्षमतेनेच नव्हे, तर आत्मघातकीपणे हाताळून आपले जीवन कण्हत- कुंथत व स्वतःला अकारण दुःखीकष्टी करून घेऊन जगत राहतो.


माणूस स्वतःशी एका मिनिटात सुमारे ४०० ते ६०० शब्द बोलत असतो.


जाणीव व नेणीव पातळी


माणसाच्या स्वगत बोलण्याच्या प्रक्रियेतील गुंता एवढ्याने संपत नाही; कारण लघुलिपीतील एखादा छोटा शब्द किंवा शब्दसमूह यांच्यामार्फत स्वतःशी बातचीत करण्याची माणसाच्या मनातील प्रक्रिया कधी सुस्पष्टपणे जाणिवेच्या पातळीवर चालू असते, तर कधी ती अस्पष्टपणे वा जाणिवेच्या व नेणिवेच्या उंबरठ्यावरून साकारत असते. म्हणजे त्याचा स्वत:बरोबरचा संवाद केव्हा केव्हा प्रगट मनाद्वारे चालू असतो, तर केव्हा केव्हा मनातील प्रगट व अप्रगट प्रक्रियांच्या सीमारेषेवरून चालू असतो. थोडक्यात असे म्हणता येईल, की माणूस स्वतःशी कधीकधी समजून उमजून स्पष्टपणे, तर कधीकधी नकळत व अस्पष्टपणे बोलत असतो.


शब्द, मानसचित्रे व प्रतीके 


माणसाची स्वत:शी विचार करण्याची प्रक्रिया अतिशय वेगवान असते, हे काही त्या प्रक्रियेचे एकमेव लक्षण नव्हे. त्या प्रक्रियेचे दुसरे महत्त्वाचे लक्षण असे, की ती प्रक्रिया केवळ शब्दांच्या माध्यमातून चाललेली नसते. त्या प्रक्रियेत शब्दांप्रमाणेच इतरही काही प्रतीकांचा समावेश होत असतो. उदाहरणार्थ, हा मजकूर वाचताना तुम्हांला पूर्वी मानसशास्त्र या विषयावर वाचलेल्या पुस्तकातील माहितीचे किंवा त्या विषयावर ऐकलेल्या एखाद्या व्याख्यानातील संदर्भाचे स्मरण होऊन तुम्ही त्यासंबंधी विचार करीत असाल; परंतु त्याचबरोबर वाचलेले ते पुस्तक त्याच्या रंगरूपासहित तुमच्या मनःपटलावरही पाहत असाल. तसेच तुम्ही ज्या व्यक्तीचे व्याख्यान पूर्वी ऐकले असेल, ती व्यक्ती तुमच्या मनात पुन्हा सचेतन होणे व तिचे व्याख्यान तुम्ही ऐकणे याही प्रक्रिया तुमच्या मनात घडत असणे शक्य आहे. सारांश. माणसाच्या मनात प्रतिमांच्या किंवा मानसचित्रांच्या माध्यमातूनही विचारतरंग साकारू शकतात. 


प्रत्यक्षात माणसाच्या मनातील विचार करण्याची प्रक्रिया याहूनही थोडी अधिक गुंतागुंतीची असते, कारण काही माणसे आणखी एका प्रकारच्या प्रतीकांचा उपयोग करून विचार करण्यात पटाईत असतात. ती प्रतीके म्हणजे गणितातील किंवा विज्ञानातील काही सूत्रेही असू शकतात.माणसाच्या विचार करण्याच्या प्रक्रियेबद्दल तूर्त याहून अधिक खोलात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही इतके लक्षात घेतले म्हणजे पुरे, की माणूस सतत स्वतःशी विचार करीत असतो आणि त्यासाठी तो शब्दाचा व मानसचित्रांचा अथवा प्रतिमांचा उपयोग करीत असतो.


२. भावना अनुभवणे


आता आपण माणसाचे जीवन व्यापून टाकणाऱ्या दुसऱ्या प्रक्रियेकडे नजर टाकू. ती प्रक्रिया म्हणजे भावना अनुभवणे. आपल्याला हे माहीतच आहे, की माणसाला क्रोध, मत्सर, चिंता, विषण्णता, सूड, वैफल्य, दया, माया, प्रेम, अनुकंपा इत्यादी अनेक भावना हेलावून टाकीत असतात. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या हातातील हे पुस्तक जर सुरुवातीपासून वाचले असेल, तर तुम्हांला पुढील मजकुराबद्दल उत्कंठा वाटणे जसे शक्य आहे, तसेच कंटाळा किंवा तिटकारा वाटणेही शक्य आहे. अर्थात माणसाला जाणवणारी प्रत्येक भावना अगदी तीव्र स्वरूपाची असते असे नाही. कधीकधी त्याला एखादी भावना सौम्यपणे जाणवते, मध्यम प्रकारे जाणवते किंवा अगदी तीव्रपणे जाणवते; परंतु दैनंदिन व्यवहार करताना किंवा एकांतातही माणसाला वेगवेगळ्या भावनांचा अनुभव येत असतो.


५.७.३ भावनांचा उगम विचारांत


वरील विवेचनावरून तुमच्या ध्यानात आलेच असेल की, जर वरील तीन प्रक्रिया - विचार करणे, भावना अनुभवणे आणि वर्तन करणे - काळजीपूर्वक समजून घ्यायच्या असतील, तर माणसाच्या मनात 'ब' टप्यावर चालू असणाऱ्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करावयास हवे. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचा एक मूलभूत सिद्धांत असे सांगतो, की सामान्यतः माणसाच्या मनातील भावना त्याच्या मनातील विचारांमुळे निर्माण होत असतात. म्हणजे असे, की माणसाला जाणवणाऱ्या प्रिय अथवा अप्रिय भावना काही एकदम उद्भवत नसतात. या भावनांच्या मुळाशी कोणत्या

तरी विचाराचा प्रवाह वाहत असतो. एखादे गोंडस मूल पाहून आपल्याला आनंद वाटतो तेव्हाही आपण चटकन स्वतःला सांगत असतो, "अहाहा! किती गोजिरवाणे मूल आहे हे! असे वाटते, की या मुलाला उचलून घ्यावे व त्याचा गोड पापा घ्यावा..." अथवा एखादे ताजे, सुंदर गुलाबाचे फूल आपल्या दृष्टीस पडल्यावर आपल्या मनात ज्या आल्हाददायक भावना स्फुरतात त्यांच्या मुळाशीही, "किती टवटवीत सुंदर फूल आहे हे!... गुलाबाचे इतके ताजे फूल गेल्या कित्येक दिवसांत पाहण्यात आले नव्हते..." अशा तऱ्हेचे विचारतरंग क्षणार्धात उद्भवलेले असतात.म्हणून सामान्यतः असे म्हणता येईल, की जसे तुमचे विचार तशा तुमच्या भावना, तुमच्या मनात बऱ्या-वाईट भावना उद्दीपित करण्याचे व त्या भावना मनात टिकवून ठेवण्याचे काम सामान्यतः तुमच्या विचारांमार्फत होत असते.


माणसाच्या मनातील जे दृष्टिकोन त्याला स्वतःची उद्दिष्टे साध्य करून घेण्यास मदत करतात त्यांची गणना विवेकी दृष्टिकोनात होऊ शकते.परंतु माणूस समाजात राहतो आणि म्हणून त्याच्या मनातील विविध दृष्टिकोन त्याला सामाजिक जीवनात रस घेण्यास व समाजाचे हित साधण्यात उद्युक्त करतात,हे विसरता कामा नये.


विवेकी दृष्टिकोनामुळे मनुष्य स्वतःचे नुकसान टाळून,स्वतः हितकारक असे वर्तन करू शकतो.तसेच या दृष्टिकोनांमुळे त्याच्या मनात आत्मघातकी भावनांची वादळे निर्माण होत नाहीत व त्याचबरोबर तो समाजातील इतर माणसाशीही गुन्हा गोविंदाने पटवून घेऊ शकतो.


१. कुटुंब व समाज बालवयातील वैचारिक अपरिपक्वता


मनुष्य विवेकी आणि अविवेकी अशा दोन्ही प्रकारे विचार करू शकत असला तरी तो जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही तो स्वतः बरोबर कोणते तरी विशिष्ट व सुस्पष्ट विचार, दृष्टिकोन, मूल्ये अथवा जीवन-तत्त्वज्ञान या जगात आणत नसतो. मनुष्य जन्मल्यापासून ज्या कुटुंबाच्या वातावरणात व ज्या सामाजिक रूढींच्या चौकटीत वाढला जातो त्या कुटुंबाकडून व समाजाकडून त्याला चांगले काय,वाईट काय, योग्य काय,अयोग्य काय,नैतिक काय,अनैतिक काय, श्रेयस्कर काय,आत्मघातकी काय,ग्राह्य काय व त्याज्य काय याचे सतत शिक्षण मिळत असते.म्हणजे त्याच्या मनातील दृष्टिकोनाच्या जडणघडणीत सभोवतालच्या व्यक्तींचा वाटा मोठा असतो.याचा परिणाम असा होतो, की माणूस अनेक विचार व दृष्टिकोन पारखून न घेताच स्वीकारतो. त्यामुळे माणसाने स्वीकारलेले अनेक विचार व दृष्टिकोन अयोग्य, अशास्त्रीय व कधीकधी घातकही असतात. याची अनेक कारणे संभवतात. पहिले कारण असे, की एखादा विचार किंवा आचार योग्य आहे का अयोग्य आहे, इतरांनी पुरविलेली माहिती बरोबर आहे. का चूक अगर भ्रामक आहे इत्यादी निर्णय घेण्यासाठी लागणारी बुद्धी व ज्ञान माणसाला बालवयात नसते.त्यामुळे बालवयात माणसाला त्याच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून, गुरुजनांकडून व समाजातील इतर प्रौढ व आदरणीय लोकांकडून मिळालेले ज्ञान तपासून स्वीकारणे किंवा नाकारणे कठीण असते. त्याच्या सभोवतालच्या लोकांनी त्याला जे विचार, आचार, मूल्ये इत्यादी योग्य असा शिक्का मारून त्याला पढविलेले असतात, ते अनेकदा जसेच्या तसे स्वीकारण्याशिवाय त्याला गत्यंतर नसते. म्हणूनच La Barre' नावाचे समाजशास्त्रज्ञ मोठ्या मार्मिकपणे म्हणतात, की एखादे मूल विचार करावयास शिकण्यापूर्वीच नाइलाजाने 'योग्य' विचार करू लागते. याचा अर्थ असा की, मुलामधील स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत उदयाला येण्यापूर्वीच त्याच्या मनात सभोवतालची मंडळी 'योग्य' किंवा 'मान्यताप्राप्त' विचार त्याच्या मनात भरवून देत असतात.


इतरांवरचे अवलंबन


माणसाने इतरांकडून स्वीकारलेले अनेक विचार व दृष्टिकोन अयोग्य, अविवेकी व कधीकधी अशास्त्रीय असतात. याचे दुसरे कारण असे, की माणूस बालवयात त्याच्या सभोवतालच्या माणसांवर भावनिक, आर्थिक व इतर गरजांसाठी अवलंबून असतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील व इतर काही व्यक्तींचे दृष्टिकोन स्वीकारणे त्याला उपयुक्त ठरत असते, कारण आपल्या आप्तेष्टांचे दृष्टिकोन खळखळ न करता मान्य करण्यामुळे त्याला आपली 'क्ष' टप्यावरील हरएक उद्दिष्टे साध्य करून घेणे सुलभ जात असते.


जन्मजात भोळसटपणा

 

माणूस आपल्याभोवतीच्या समाजातील प्रचलित व रूढ विचारांचा अचिकित्सकपणे स्वीकार करतो याला तिसरेही एक कारण संभवते आणि ते म्हणजे माणसाचा जन्मजात भोळसटपणा! चटकन कशावरही विश्वास ठेवणे हे माणसाला सहज शक्य होते, कारण मूर्खासारखे वागणे त्याला निसर्गतःच अगदी सहज जमते! त्याच्यामधील हा निसर्गदत्त भोळसटपणा त्याच्या केवळ बालवयातील वागण्यातूनच दृग्गोचर होत असतो असे नाही, तर त्याच्या अगदी प्रौढ वयातील वागण्यातूनही सहज दृष्टोत्पत्तीस येतो.


२. स्वनिर्मित दृष्टिकोन


बहुसंख्य समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि मनोविश्लेषणतज्ज्ञ असे प्रतिपादतात, की माणसाच्या मनात पूर्वग्रह, अडाणी समजुती, अंधश्रद्धा व अविवेकी कल्पना त्याच्या सभोवतालच्या समाजाने भरवून दिलेल्या असतात. याउलट एलिस म्हणतात की, वरील उपपत्ती जरी सत्य असली, तरी आपण माणसाच्या मनातील अविवेकी दृष्टिकोनांचा अभ्यास करताना आणखी एका मुद्द्याचा विचार करावयास हवा. तो असा, की माणसाला सर्वच विचार त्याच्या सभोवतालच्या समाजाकडून मिळत नसतात किंवा तो समाजाकडून मिळणारे सर्वच विचार स्वीकारीत नसतो. तो स्वतः च्या बुद्धीचा उपयोग करून इतरांच्या मदतीशिवाय, अगदी स्वतंत्रपणे आपल्या मनात विवेकी किंवा अविवेकी दृष्टिकोन सहज निर्माण करतो. इतकेच नव्हे, तर स्वत:च्या दृष्टिकोनांची मनातल्या मनात कळत किंवा नकळत वारंवार उजळणी करून ते आपल्या मनात टिकवून ठेवतो अथवा जिवंत ठेवतो. म्हणजे दृष्टिकोनांच्या जडणघडणीला तो समाजाप्रमाणे स्वतः ही हातभार लावत असतो. उदाहरणार्थ,जरी 'एखाद्या मुलावर त्याने परीक्षेत पहिला क्रमांक मिळविण्याबाबत कोणतेही दडपण पालकांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी आणले नाही, तरी तो मुलगा स्वतःच विचार करून ठरवितो की, मी काही करून पहिला क्रमांक मिळविलाच पाहिजे. म्हणजेच स्वतः च्या मनात दृष्टिकोन उत्पन्न करून, मूळ धरून फोफावण्याच्या प्रक्रियेला मनुष्य स्वतः ही सक्रियपणे व सर्जनशीलपणे चालना देत असतो.


३. निसर्गदत्त कल


सतराव्या शतकातील आंग्ल तत्त्वज्ञ John Locke" म्हणजे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील अनुभववादाचे जनक मानले जातात. त्यांचे म्हणणे असे, की माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचे मन कोऱ्या करकरीत कागदासारखे असते. त्यानंतर त्याला या जगात राहून वावरून जे विविध अनुभव येतात, त्यानुसार त्याच्या मनरूपी कोऱ्या कागदावर विचारांचा व ज्ञानाचा संचय जमा होऊ लागतो. थोडक्यात म्हणजे जॉन लॉक यांचे म्हणणे असे, की माणसाचे सर्व विचार, त्याला आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत प्राप्त होत असतात. त्यामुळे त्याच्या मनातील विचारांमध्ये किंवा ज्ञानामध्ये अशी कोणतीही गोष्ट नसते, की जी प्रथम त्याने आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे ग्रहण केलेली नसते.अर्थात एलिसही प्रात्यक्षिक, अनुभवजन्य विचारांचे व ज्ञानाचे महत्त्व अजिबात कमी लेखीत नाहीत; तथापि त्यांच्या मते माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचे मन म्हणजे काही अगदी कोऱ्या करकरीत कागदासारखे नसते. अर्थात माणूस जन्माला आल्यानंतरच हळूहळू भाषा आत्मसात करू लागतो; परंतु तो जन्माला येतो तेव्हाच त्याला विवेकीपणे विचार करण्याच्या निसर्गदत्त प्रवृत्तीबरोबरच अविवेकीपणे विचार करण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीचाही वारसा लाभलेला असतो. म्हणजेच माणसाच्या मनातील अविवेकी दृष्टिकोनाच्या व जीवन- तत्त्वज्ञानाच्या मुळाशी कोणती तरी जैविक बैठक असते. याचाच अर्थ असा की, त्याला अविवेकी दृष्टिकोन आपल्या मनात सहज रुजवून घेण्याचा आणि त्यानुसार आत्मघातकीपणे वागून आपले नुकसान करून घेण्याचा जणू काही जन्मजात वारसाच मिळालेला आहे. थोडक्यात अविवेकी वागण्याकडे मनुष्याचा जन्मजात कल असतो. हा मुद्दा आपण आठव्या प्रकरणात विस्ताराने चर्चिणार आहोत.


पुनर्विचाराची क्षमता


अर्थात माणूस नेहमीच फक्त अविवेकीपणे वागत नसतो. उलट आपल्या क्षमतेला वाट मोकळी करून देण्यासाठी, आपल्या वाटेतील अडचणींवर मात करण्यासाठी व आपले हेतू सफल करून घेण्यासाठी तो आपली बुद्धी वापरून विवेकी विचारसरणीची कास धरू शकतो. शिवाय विवेकीपणे विचार करण्यासाठी उपयोगी पडेल अशी आणखी एक क्षमता त्याला निसर्गतःच लाभलेली आहे. ती म्हणजे, आपल्या मनातील विचार, दृष्टिकोन, मूल्ये अथवा जीवन-तत्त्वज्ञान इत्यादीविषयी पुनर्विचार करण्याचे त्याचे सामर्थ्य! इतकेच नाही, तर आपल्या पुनर्विचाराच्या प्रक्रियेतून हाती आलेल्या निष्कर्षांचीही पुन्हा पुन्हा छाननी करण्याचे सामर्थ्यही त्याला निसर्गतःच प्राप्त झालेले असते


माणसाला निसर्गत:च लाभलेल्या अविवेकीपणे व आत्मघातकी

पणे विचार करण्याच्या प्रवृत्तीबरोबरच, विवेकीपणे व आत्महितकारकपणे विचार करण्याची प्रवृत्तीही लाभलेली असल्यामुळे तो आपले जीवन अर्थपूर्ण, समृद्ध व सुखी करू शकतो, तथापि तो या उद्दिष्टांच्या दिशेने प्रवास करताना, केव्हा केव्हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊन आपल्या प्रगतीचा मार्ग असतो त्याहून अधिक खडतर व क्लेशदायक करून ठेवतो व आधीच्या अस्वस्थतेत अजूनच भर घालतो. या अस्वस्थतेच्या मुळाशी अविवेकी दृष्टिकोन असतात.


अविवेकी जीवन-तत्त्वज्ञानाचे तीन प्रकार आहेत. असे म्हणावयास हरकत नाही. अविवेकी जीवन-तत्त्वज्ञानाच्या त्या तिन्ही प्रकारांचे काळजीपूर्वक अवलोकन केले,तर असे दिसून येते की त्यांपैकी प्रत्येक जीवन-तत्त्वज्ञानाची मुख्यतः एका विशिष्ट लक्षणामुळे विवेकाशी फारकत झाली आहे आणि ते विशिष्ट लक्षण म्हणजे त्या जीवन-तत्त्वज्ञानातून व्यक्त होणारी एक हट्टी, दुराग्रही किंवा अवास्तव मागणीआपल्या इच्छा-आकांक्षाचे रूपांतर हट्टी, दुराग्रही व अवास्तव मागण्यांमध्ये करण्याची सवय माणसे त्यांच्या सभोवतालच्या व्यक्तीकडूनही आत्मसात करीत असतात.म्हणजे माणसाच्या मनातील अविवेकी जीवन-तत्त्वज्ञानाला जे 'च' हे अव्यय चिकटलेले असते.त्यासाठी लागणारा डिक त्याला जसा जन्मतःच लाभलेला असतो.


जवळजवळ सर्व माणसांच्या मनात तिन्ही अविवेकी दृष्टिकोन वेगवेगळ्या प्रमाणात व वेगवेगळ्या प्रकारे संचार करीत असतात व म्हणून बहुदा सर्वच माणसे थोडीबहुत चक्रम असतात.


६.२.२ हट्टी दुराग्रहांचे प्रताप


माणसाचे जीवन-तत्त्वज्ञान विवेकी असू शकते तसेच अविवेकीही असू शकते. तसेच थोडे विवेकी व थोडे अविवेकी असू शकते किंवा शब्दबद्ध झालेले व जाणिवेच्या पातळीवर स्थिरावलेले असू शकते. तसेच अगदी स्पष्टपणे शब्दबद्ध न झालेले व जाणीव आणि नेणीव यांच्या उंबरठ्यावर घोटाळणारेही असू शकते.


मानसोपचाराच्या दृष्टीने पाहता माणसाला त्याचे जीवन-तत्त्वज्ञान त्याच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचे मूल्यमापन करण्यास प्रवृत्त करते. माणसाचे जीवन-तत्त्वज्ञान आपले हे मुख्य कर्तव्य कसे बजावते ते पहा.


सध्या तुम्ही जे लेखन वाचत आहात ते सोपे आहे किवा क्लिष्ट आहे, यापैकी कुठलाही निष्कर्ष तुम्ही काढू शकाल, कारण सोपे व सुबोध लेखन कसे असते आणि क्लिष्ट व दुर्बोध लेखन कसे असते, याविषयी तुमच्या मनात काही स्पष्ट संकल्पना असतील व त्यांच्या आधारे तुम्ही निष्कर्ष काढू शकाल, परंतु समजा तुमच्या मनात असा व्यापक दृष्टिकोन अथवा जीवन तत्वज्ञान मूळ धरून आहे की, "कोणतेही क्लिष्ट किवा दुर्योध पुस्तक वाचत बसणे म्हणजे जीवनातील अमूल्य वेळेचा चक्क अपव्यय करणे होय. "मग तुम्ही काय कराल? तुमच्या मनातील वरील जीवन तत्त्वज्ञानामुळे या लेखनाविषयी स्वतः च्या मनात अप्रीती निर्माण करून हातातील पुस्तकाची पाने भराभर उलटू लागाल अथवा हातातील पुस्तक बाजूला ठेवून काहीतरी उद्योग करू लागाल.


परंतु हेच लेखन समजा शंभर लोकांनी वाचले तर बहुधा काय होईल? त्यांपैकी अनेक जण आपल्या मनातील सोपे व सुबोध म्हणजे काय आणि क्लिष्ट व दुर्बोध लेखन म्हणजे काय, याबद्दलच्या आपापल्या संकल्पनेनुसार या लेखनाचे वर्णन सुबोध, दुर्बोध, काहीसे सुबोध, पण काहीसे दुर्योध, क्लिष्ट पण उद्बोधक इत्यादी अनेक प्रकारे करतील. नंतर तेच लोक आपापल्या मनातील विशिष्ट मूल्यमापनानुसार उत्साहाने हेच लेखन पुढे वाचत राहतील, लेखनातील काही भाग शाईने अधोरेखित करतील, काही भाग आपल्या वहीत लिहून ठेवतील किंवा या पुस्तकाची प्रत बाजारातून विकतही आणतील! येथे एका मुध्याचे विवरण आवर्जून करावयास हवे. तो म्हणजे शंभर वाचकांपैकी अनेक जण है लेखन क्लिष्ट आहे. असे म्हणतील आणि तरीही त्यांच्यापैकी काही हे लेखन नेटाने पुढे वाचत राहतील. कारण 'उपयुक्त ज्ञान क्लिष्ट भाषेत लिहिले असले तरी ते पदरात पाडून घेण्यासाठी थोडे कष्ट न घेणे म्हणजे आळशीपणाचे लक्षण आहे, असे किया असेच दुसरे एखादे जीवन-तत्त्वज्ञान त्यांच्या मनात पक्के रुजलेले असू शकेल. याचा अर्थ असा, की क्लिष्ट लेखन माणूस पुढे वाचेल की वाचणे बंद करील हे माणूस त्या क्लिष्ट लेखनाचे मूल्यमापन कसे करील यानुसार ठरेल. त्याचे क्लिष्ट लेखनाबद्दलचे मूल्यमापन त्याच्या जीवन-तत्त्वज्ञानाचा परिणाम असेल,


प्रत्यक्षात माणसाच्या मनात, 'हातात घेतलेल्या पुस्तकातील लेखन सोपे व सुबोध असेल, तर बरे, या दृष्टिकोनापासून ते 'हातात घेतलेल्या पुस्तकातील लेखन किचितही क्लिष्ट अथवा दुर्योध असताच कामा नये, ' या टोकापर्यंतच्या अनेक प्रकारच्या दृष्टिकोनांपैकी जो विशिष्ट दृष्टिकोन प्रबळ असेल त्यानुसार त्याच्या भावनांना व परिणामी त्याच्या वर्तनाला चालना मिळेल. समजा, एखाद्या माणसाच्या मनात असा दृष्टिकोन आहे की, 'हातात घेतलेल्या पुस्तकातील लेखन किचितही क्लिष्ट अथवा दुर्बोध असताच कामा नये व त्याच्या हाती लागलेल्या पुस्तकातील लेखन त्याच्या मताप्रमाणे क्लिष्ट व दुर्बोध आहे. अशा वेळी त्याच्या मनात तिटकाऱ्याची अत्यंत तीव्र भावना उत्पन्न होऊन तो आपल्या हातातील पुस्तक सर्व शक्ती एकवटून फेकून देईल, हे उघडच आहे, कारण त्याच्या मनातील भावनेची तीव्रता व वागण्यातील जोम त्याच्या मनातील वरील व्यापक दृष्टिकोनाला किवा जीवन-तत्त्वज्ञानाला चिकटलेल्या 'च' या अव्ययातून उद्भवलेला असेल. यावरून असे म्हणता येईल, की माणसाच्या मनातील अविवेकी जीवन-तत्त्वज्ञान जेव्हा 'च' अव्ययाने गुरफटलेले असते, तेव्हा ते अतिरेकी हट्टाच्या, दुराग्रहाच्या व अवास्तवतेच्या पातळीवर पोहोचलेले असते, याचा जणू काय पुरावाच त्याच्या मनातील वरील तऱ्हेच्या तीव्र भावनांमधून व जोशपूर्ण वर्तनातून ओसंडू लागतो..!


माणसाच्या मनातील क' टप्यावरील मानसिक अस्वास्थ्याची मीमांसा करताना एलिस त्याच्या जीवनातील 'अ' टण्यावर घडणाऱ्या घटनांना अधिक महत्त्व देण्याऐवजी त्याच्या मनातील 'ब' टप्यावर रुजलेल्या अविवेकी जीवन-तत्त्वज्ञानाला विशेष महत्त्व का देतात, हे एव्हाना तुम्हांला निःसंदिग्धपणे समजले असेल. अगदी सूत्रबद्धपणे सांगावयाचे झाले, तर असे म्हणता येईल, की जसे माणसाचे विचार, दृष्टिकोन अथवा जीवन-तत्त्वज्ञान, तशा त्याच्या भावना व त्या भावनांनुसार घडणारे वर्तन आणि हाच मुद्दा आकृती क्र. १च्या मदतीने अगोदर स्पष्ट करण्यात आला होता, हे तुम्हांला आठवत असेल.


६. ३ अविवेकी जीवन-तत्त्वज्ञानाचे उपसिद्धांत


आता आपण मानसिक अस्वस्थतेच्या एलिसप्रणीत मीमांसेच्या अजून खोलात शिरणार आहोत. आपण प्रतिभा, संजय व नम्रता यांच्या मानसिक अस्वास्थ्याची चिकित्सा करून यापूर्वी असा निष्कर्ष काढला आहे, की या तिघांच्या मनातील अविवेकी जीवन-तत्त्वज्ञान मुख्यतः 'च' या अव्ययाने जखडलेले आहे; किंबहुना मुख्यतः याच कारणामुळे त्या प्रत्येकाच्या मनातील जीवन-तत्त्वज्ञान 'अविवेकी' या सदरात मोडते. माणसाच्या मनातील जीवन-तत्त्वज्ञानाला 'च' या अव्ययाने मगरमिठी मारली, की तो स्वतःच्या मनात कळत-नकळत कोणत्या उपसिद्धान्तांना जन्म देऊन स्वतः चे मानसिक अस्वास्थ्य अधिक बिघडवतो.


वस्तुस्थिती अशी असते की मनुष्याने अगदी सर्वस्व पणाला लावले तरी तो जीवनात काही उद्दिष्ट साध्य करू शकतो,तर काही नाही.माणसाच्या ज्या भावना व जे वर्तन विवेकी जीवन-तत्वज्ञानातून निपजलेले असते.ते हितकारक समजावे अविवेकी जीवन-तत्त्वज्ञानातून जन्मलेल्या भावना व वर्तन अहितकारक समजावे,म्हणजे झाले


काही सकारात्मक भावना या मनुष्याच्या उद्दिष्टपूर्तीत अडथळाही आणतात. उदाहरणार्थ, समजा प्रतिभाने मुलाखतीबाबत 'फाजील आत्मविश्वास' ही भावना मनात बाळगली, तर ती सकारात्मक आहे; परंतु ती वास्तवावर आधारलेली नसल्याने तिच्या उद्दिष्टपूर्तीत अडथळा आणू शकते. याउलट संजयने जर वरिष्ठांच्या जाचक कामाच्या पद्धतींबाबत आनंद वाटून घेतला, तर तो त्याच्यावरचा अन्याय कुठलाच प्रतिकार न करता मुकाट्याने सहन करत राहील व परिणामी मनःस्वास्थ्य बिघडवून बसेल. त्यामुळे या परिस्थितीत त्याला क्रोधाऐवजी कटकट वाटली तर ती नकारात्मक भावना असेल, पण प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यास त्याला ती मदत करू शकेल.


याचा थोडक्यात मथितार्थ असा की, सगळ्या सकारात्मक भावना या वास्तववादी असतातच असे नाही. तसेच काही नकारात्मक भावना वास्तववादी असू शकतात. म्हणून भावनांचे वर्गीकरण हे सकारात्मक व नकारात्मक असे न करता ते वास्तवाचा निकष लावून करणे उचित ठरेल, असे प्रतिपादन एलिस करतात.


म्हणजे विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र असे सांगते, की माणसाच्या मनातील विवेकी दृष्टिकोनही नेहमीच आनंददायक व सकारात्मक किंवा होकारार्थीच असतो असे नाही; तो काहीसा क्लेशदायक व नकारार्थी असू शकतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून उत्पन्न होणारी भावना ही नेहमीच प्रिय व आनंददायक व सकारात्मक किंवा होकारार्थीच असते असे नाही; ती भावना अप्रिय, क्लेशदायक व नकारार्थी, परंतु तरीदेखील हितकारक असू शकते व स्वतःपुढील समस्या सोडविण्यास मनुष्याला मदत करू शकते..


६. ९ स्वास्थ्यकारक आणि अस्वास्थ्यकारक भावना


माणूस 'क' टप्प्यावर ज्या भावना अनुभवतो, त्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे करावे? या प्रश्नाचे उत्तर एलिस देतात ते असे, की ज्या भावना माणसाला स्वतः पुढील समस्या सोडविण्याच्या कामात मदत करतात, त्यांना स्वास्थ्यकारक भावना असे म्हणावे आणि ज्या भावना माणसाला स्वत:पुढील समस्या सोडविण्याच्या कामात मदत करीत नाहीत (किंवा उलट त्या कामात विघातक अडथळा उत्पन्न करतात) त्यांना अस्वास्थ्यकारक भावना असे म्हणावे.


काही भावना क्लेशदायक व नकारात्मक असूनही स्वास्थ्यकारक असतात, याबद्दल आपल्या मनात शंका उरत नाही. त्याचप्रमाणे अवाजवी आत्मविश्वास, पोकळ गर्व इत्यादी काही भावना आनंददायक व सकारात्मक असूनही अस्वास्थ्यकारक असू शकतात.याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटण्याचे कारण उरणार नाही..!


गुणात्मक फरक


भावनांच्या या वर्गीकरणाचे वैशिष्ट्य असे की, त्यांच्यामधील फरक गुणात्मक (Qualitative) असतो. याचा अर्थ असा की, प्रतिभा, संजय आणि नम्रता यांनी स्वतःपुढील समस्यांच्या संदर्भात स्वतःच्या मनात चिंता, क्रोध व आत्मकरूणा या अस्वास्थ्यकारक भावना निर्माण करण्याऐवजी काळजी, कटकट व वैफल्य या स्वास्थ्यकारक भावना निर्माण केल्या, तर त्या भावना त्यांना हितकारक ठरू शकतील, हे तर खरेच; परंतु या स्वास्थ्यकारक भावना म्हणजे त्यांच्या मनातील अस्वास्थ्यकारक भावनांची केवळ सौम्य स्वरूपे नव्हेत. उलट या स्वास्थ्यकारक भावना अस्वास्थ्यकारक भावनांहून गुणात्मकदृष्ट्या भिन्न असतात.


गुणात्मक फरकाबाबतचे स्पष्टीकरण देताना एलिस म्हणतात की, एखादी अस्वास्थ्यकारक भावना म्हणजे स्वास्थ्यकारक असलेल्या तशाच एखाद्या भावनेचे केवळ तीव्र स्वरूप नसते. म्हणजेच माणसाच्या मनातील चिंता (Anxiety) ही भावना म्हणजे काही त्याच्या मनातील काळजी (Concern) या भावनेचे तीव्र स्वरूप नसते. तसेच त्याच्या मनातील विषण्णता (Depression), क्रोध (Anger), अपराधी भावना (Guilt), लाज (Shame) व आत्मकरूणा (Self-pity) या अस्वास्थ्यकारक भावना म्हणजे काही त्याच्या मनातील दुःख (Sadness), कटकट (Irritation), खंत (Regret ), निराशा(Disappointment) व वैफल्य (Frustration) या भावनांची केवळ तीव्र रूपे नव्हेत. उलट Concern, Sadness, Irritation, Regret, Disappointment, Frustration' या भावना Anxiety, Depression, Anger, Guilt, Shame, Self- pity` या भावनांहून गुणात्मकदृष्ट्या वेगळ्या स्वरूपाच्या असतात.


अस्वास्थ्यकारक भावनांचे निर्दालन


भावनांविषयीच्या येथवरच्या विवेचनावरून तुम्ही एक गोष्ट सहज ताडली असेल, ती म्हणजे विवेकनिष्ठ मानसोपचाराचा रोख माणसाच्या मनातील सर्वच भावनांचे उच्चाटन करण्यावर नसून त्याच्या मनातील केवळ अस्वास्थ्यकारक भावनांचे निर्दालन करण्यावर असणार. तुमचा हा निष्कर्ष योग्य आहे. माणसाला नकारात्मक पण स्वास्थ्यकारक भावना जाणविणे उपयुक्त असते. नाही तर माणूस स्वतःला नको असलेल्या परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न कसा करणार आणि स्वतःच्या जीविताला अपायकारक असणाऱ्या गोष्टीपासून स्वतःचा बचाव तरी कसा करणार? तसेच सकारात्मक स्वास्थ्यकारक भावनाही माणसाला जिवंत व निर्मितिक्षम राहण्यास प्रवृत्त करतात तेव्हा त्यांचा त्याग करण्याचे कारणच नाही. साहजिकच विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र माणसाला थंड, निरस व भावनारहित जीवन जगण्याचे उद्दिष्ट ठेवण्यास सांगत नाही. उलट ते त्याला स्वास्थ्यकारक सकारात्मक भावनांबरोबरच स्वास्थ्यकारक नकारात्मक भावना - होय, अगदी तीव्र स्वास्थ्यकारक नकारात्मक भावना अनुभवण्यासही - उत्तेजन देते. त्यासाठी भावनांचे अजून एक परिमाण समजून घेण्याची गरज आहे.


सौम्य व तीव्र भावना


मानवी भावनांच्या संदर्भात एलिस आणखी एक मुद्दा आवर्जून मांडतात. तो म्हणजे भावनांचे वर्गीकरण सौम्य व तीव्र या दोन परिमाणांच्या आधारेही करता येते. म्हणजेच एखादी भावना केवळ क्लेशदायक किंवा आनंददायक असते असे नाही, तर ती भावना सौम्य व अगदी तीव्रही असू शकते; किंबहुना स्वास्थ्यकारक भावना अत्यंत तीव्र असेल, तर ती माणसाला स्वतः चे उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी अधिक नेटाने प्रयत्न करण्यास उत्तेजन देईल.

लोकमान्य टिळकांना भारतातील नागरिकांच्या मनातील असंतोषाचे जनक म्हणण्यात येते, या गोष्टीचे आपण स्मरण ठेवले, तर स्वास्थ्यकारक भावना म्हणजे काय, हे अधिक स्पष्ट होईल. भारतातील नागरिक जर नेहमी शांतचित्त राहिले असते, तर त्यांच्यामध्ये स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचा विचार कसा फोफावला असता? परंतु त्याच नागरिकांच्या मनातील पारतंत्र्याबद्दलचा असंतोष व चीड या भावनांनी जेव्हा तीव्र स्वरूप धारण केले, तेव्हा ते स्वातंत्र्यासाठी वाटेल तो स्वार्थत्याग करावयास आतुर झाले. म्हणजे त्यांच्या मनातील पारतंत्र्याबद्दल वाटणारा असंतोष व चीड़ या भावनांनी जितके तीव्र स्वरूप धारण केले, तितके त्यांचे वर्तन आपल्या देशाला हितकारक झाले.


चिंतेपेक्षा भिन्न वाटणाऱ्या क्रोध, आत्मकरूणा किवा तत्सम भावनांच्या मुळाशीही खरे तर चिंताच असते.


०६.११.२४ मानवी संस्कार या लेखातील शेवटचा दुसरा भाग..!!