रशियन लेखक 'व्लादिमीर अर्सेनीव' यांनी 'देरसू उझाला' या प्रवासवर्णनात पक्ष्यांची निरिक्षणे आणि नोंदी टिपल्या आहेत.झाडं जशी दाट होतात तशी खोली वाढत जाते.त्यापुढं माणसं खुप खुजी वाटतात. तशा खोलीत पाखरं निर्धास्तपणे झाडावर आसरा घेतात. " सकाळी पक्षी भरभर खात होते.आता नाही.नाहीतर संध्याकाळी यावेळेला पक्ष्यांची नुसती गडबड उडालेली असते.पण आता जंगलात स्मशान शांतता पसरली होती.जणूकाही कोणाच्यातरी आज्ञेनुसार सर्व पक्षी लपून बसले होते.यामधून लेखकाला धोक्याची चाहूल लागली होती.त्यानंतर प्रचंड बर्फवृष्टी झाली.निसर्गातील संकटे अगोदर पक्ष्यांना कळतात त्यानंतर माणसाला.
माती झाडांना जीवनरस पुरविते म्हणून पानं,फुलं, फळं टवटवीत दिसतात.या झाडांवर पक्ष्यांचं गोकुळ नांदत असतं.झाडं आणि पाखरं ही निसर्गातील काव्यचित्र.पाखरं बियांचा प्रसार करून जंगल वाढवितात.हीच झाडं पाखरांना भरवतात.झाडं आकाशाकडे झेपावतात अन् पाखरं झाडाकडे.वडा- पिंपळाच्या हिरव्या गर्द झाडीत हारोळ्या लपून बसतात. त्यांना पिकलेली रसाळ फळं खूप आवडतात.पाखरांच्या येण्यानं झाडंही सुखावत असतात.पाखरांना झाडांचा लळा लागला की,ती फार दूर जात नाहीत.झाडं ही पक्ष्यांची निवासस्थानं आहेत.सुगरण पक्ष्यांची घरटी झाडाच्या फांदीवर झुलताना अनेकदा पाहिली.हळदीनं माखलेल्या सुगरण तिथं नांदायला येतात.कवयित्री 'बहिणाबाई चौधरी' त्यांच्या घरट्याला 'बंगला' म्हणतात.बंगल्यातून वावरणारी ही पाखरं कुणाला आवडणार नाहीत!झाडांचं आणि या पाखरांचं एक अतूट नातं असतं. जिव्हाळा ओतपोत भरलेला असतो. पावसाळ्यातील दिवस या पक्ष्यांच्या सहवासाने मंतरलेले असतात. सप्टेंबर महिन्यातील त्यांच्या हालचाली घरट्यासह कागदावर उतरवणं सोपं जातं.काटेरी झाडावर त्यांची घरटी झुलू लागतात.विहिरी,जलाशयाच्या काठावरची झाडं त्यांच्या आवाजानं जागी होतात.त्या झाडावरच्या फांद्या घरट्यासाठी जागा देतात. (पक्षी येती अंगणी या पुस्तकाचे लेखक माणिक पुरी यांच्या निरीक्षणा खालील नोंदी..)
एका झाडावर अनेक घरटी झुलताना दिसतात. 'सुगरणवस्ती' म्हणावी लागेल.पक्षीकुळातील घरट्यांचा एक उत्तम नमुना म्हणून या घरट्याचं बारकाईनं निरीक्षण केलं जातं.काही ठिकाणी या पक्ष्यांची दोन मजली घरटी पाहायला मिळतात.अवघड घरटं सोप्या पद्धतीने विणत जातात.इंद्रायणी माळावरील पळसाच्या झाडावरची घरटी सूर्यकिरणात स्वतःला न्याहाळतात.पावसाचं पाणी पिऊन गवताची पाती तरारून येतात.या गवतामुळे तिच्या पिलांना उब मिळते.झाडावरच्या झुलणाऱ्या पाळण्यात तिची लेकरं लहानाची मोठी होतात.पावसाळा आला की,या झुलणाऱ्या बंगल्याची आठवण येते.
चोरट्या रानवाटा घाणेरीच्या झाडांनी झाकून जातात.त्यांची उग्र वासाची फूलं कुणाला आवडत नाहीत.रंगीबेरंगी पाकळ्या डोकावत चित्रकाराला आकर्षित करतात.माळरानावरील या झाडाजवळ 'चंडोल' पक्ष्यांची घरटी दिसून येतात.तरोट्याचं पिक माजतं पण या पक्ष्याच्या पिलांना खेळवतं सुद्धा.निसर्गातील रंगसंगतीमुळे त्यांची वीण लवकर कळत नाही.
पोटाच्या साह्याने खोलगट भाग करून त्याभोवती रंगीत,मातकट खड्यांचा ढीग तयार करतात. उघड्यावरचं घरटं मोडून पडलेल्या संसारासारखं दिसतं.पण ती हिमतीनं संसार करते.त्या घरट्यात मऊ गवत आणते.बाळासाठी अस्तर बनविते.त्यात खड्याच्या रंगाची अंडी उबवते.घरट्याशेजारची झाडं हळूहळू मोठी होतात.त्यांची घरटी झाकोळून जातात. दोघेही अंडी उबवतात.पिलांना भरवतात.
काही चंडोल पक्ष्यांची घरटी उघड्या जागेवरही पाहायला मिळतात.ती गवताच्या आडोशानं वावरतात. रानवाटेवरची त्यांची छबी फारच मनमोहक असते.मी अनेक वेळा या पक्ष्यांना पाहिलय.त्यांच्या घरट्याचं निरिक्षण केलय.हे पक्षी सुगरण पक्ष्यासारखी साहित्याची जमवाजमव करत नसल्याचं दिसतं.
पक्षीनिरीक्षक 'किरण मोरे' यांनी 'माळरानावरील चंडोल' या पुस्तकात चंडोल पक्ष्यांच्या घरट्याच्या नोंदी अचूकपणे केल्या आहेत.त्या पक्ष्याविषयीचा माहितीपट सुद्धा बनविला आहे.
खुरटी गवताची रानं,माळरान,पडीक जमिनी या भागात पक्ष्यांची घरटी आणि वीण पाहायला मिळते.जनावरांच्या पायांनी ही घरटी उध्वस्त होतात.माळरान म्हटलं की जनावरांचं कुरण.पण तिथे या पक्ष्यांचा संसार असतो हे कुणाच्या ध्यानीमनीही नसतं.'चंडोल' पक्ष्यापेक्षाही 'टिटवी' घरटं तयार करण्यासाठी आळशी असते. 'माळटिटवी' तर खड्यांच्या आश्रयाने घरटं बनविते.उन्हाळ्यातील दिवसात तिची पिलं अंड्यातून बाहेर येतात.तिला घरट्यासाठी झाडपाणाची गरजच भासत नाही. 'डॉ. संदीप साखरे' यांनी माळटिटवीच्या घरट्याचं बारकाईनं निरीक्षण करून नोंदी घेतल्या आहेत.मागील पाच वर्षापासून त्यांनी माळटिटवीचा पाठलाग केलाय.नर-मादा संबंध.नर-पिलं संबंध.नर-शेजारील कुटुंब.नर- टिटवी कुटुंब.नर-इतर पक्षी सहसंबंध.नर -प्राणी सहसंबंध.
माळटिटवीच्या पक्षीकुळाचा मोठा आवाका घेऊन त्यांनी काम कलं आहे. माळटिटवी-जंगली प्राणी सहसंबंध.माळटिटवी-
पाळीव प्राणी सहसंबंध. माळटिटवी- माणूस सहसंबंध. माळटिटवी- यंत्र सहसंबंध.
टिटवी आपल्या घरट्यापासून दूर उभी राहते.तिचं परिसरातल्या घडामोडीवर बारकाईनं लक्ष असतं.कधी लंगडत चालते.कधी आरडा-ओरडा करते.कधी आक्रमक होते.घरट्याचं संरक्षण करते.या पक्ष्यांची घरटी पाहण्यासाठी एका जागेवर जास्त वेळ बसावं लागतं.एकदा घरटी सापडली की,पुढच्या नोंदी करणं सोपं जातं.
घाणेरीची झाडं मोठी झाली की,बुलबुल पक्ष्यांना घरटी करायला जागा देतात.काशिद,करंज,कडूलिंब,डाळिंब, काही झुडपातून बुलबुल पक्ष्यांची घरटी दिसून येतात. वाटीच्या आकाराचं घरटं बनवितात.कापसाच्या झाडावरही त्यांची घरटी पाहता येतात.
कापसावरील हिरव्या आळ्या पिलांना भरवताना पाहिलय.त्यांची घरटी फांदीच्या दुबुळक्यात पक्की बसलेली.वानराच्या पिलानं आईच्या कुशीत चिटकुन बसावं अगदी तशीच ही घरटी दिसत होती.इंद्रायणी माळावर या पक्ष्यांची वीण पाहायला मिळते.
माझे मित्र 'भारत ठोंबरे' आणि 'नितीन बाभळे' यांच्यासोबत लोणावळ्याला जाण्याचा योग आला. पहाटेच्या वेळी डोंगर उतारावरून उतरताना झाडांची विविधता अनुभवत होतो.तेवढ्यात घरट्यातून 'बुलबुल' खाली उतरला.त्याने एका फुलपाखराचा पाठलाग केला. चोचीत पकडून घरट्याकडे झेपावला.मला वाटायचं परभणीतील बुलबुल आणि लोणावळ्यातील बुलबुल मध्ये काही फरक असेल.परंतु तसा फरक काही आढळला नाही.पक्षीतज्ञ 'विद्याधर म्हैसकर' यांनी बुलबुल पक्ष्यावर 'एक बुलबुल म्हणाला' ही कादंबरी लिहिली आहे.एखाद्या पक्ष्यावर स्वतंत्र अशी कादंबरी लिहिणारे लेखक फारच कमी.
प्रसिद्ध लेखक 'धनगोपाल मुखर्जी' यांनी कबुतर पक्ष्याच्या जीवनाविषयी कादंबरी लिहिली आहे. त्याचा हिंदी अनुवाद 'तालेवर गिरि' यांनी 'चित्र-ग्रीव एक कबूतर की कहानी' या नावानं प्रसिद्ध केला आहे.ही वाचणीय कादंबरी.आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी पक्षी सुद्धा महत्त्वाचे आहेत.भौतिक सुविधा मिळवून माणसं श्रीमंत होत नसून पहाटेच्या किरणात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला की जीवन सार्थक झाल्याचं समाधान लाभतं.
गावातील वड,पिंपळ अशा झाडावर कावळे वास्तव्यास येतात.
काही गावालगतच्या झाडावरही त्यांची वस्ती पाहायला मिळते.त्यास 'काकागार' असे म्हणतात. परंतू त्या झाडावर त्यांची काही घरटी दिसतात. विणीच्या काळात वेगवेगळ्या झाडावर घरटी करताना दिसतात.काड्या ओबडधोबड रचून घरटं बनवितात.घरट्याला आकर्षितपणा नसतो.
जसं सुगरण पक्ष्यांच्या घरट्याला 'खोपा' म्हटलं जातं तसं कावळ्याच्या घरट्याला कोटरे म्हणतात.अनुभवी कावळ्यांची कोटरे लवकर होतात.घरटी तयार करताना एक कावळा घराभोवती पहारा देतो.
अनेक वेळा निरीक्षण करूनही 'कोकिळा' कावळ्याच्या घरट्यात अंडी कशी घालते हे पाहता आलं नाही.हुशार कावळ्याला ती फसवते.
आंब्याच्या झाडावरची कावळ्याची घरटी अनेकदा पाहिली.त्यांची भांडणं व्हायची.एकदा घरट्याची जागा निश्चित झाली की त्यांचा संसार सुखानं चालतो.दुरूनही ही घरटी सहज ओळखता येतात.
'चिमणी' आणि 'कावळा' हे पक्षी सर्वपरिचित.या पक्ष्यांभोवती बालपणीच्या रंगीत आठवणी गुंतलेल्या असतात.त्यांची घरटी पाहताना बालपण आठवतं.गावालगत त्यांची घरटी आढळतात तशी जंगलातही. त्यांच्या घरट्याच्या उंचीवरून पावसाचा अंदाज बांधला जातो.म्हणून कावळ्याला 'हवामानशास्त्रज्ञ' असं नाव पडलं असावं.जशी 'काकागार' तशी 'सारंगागार'.बगळ्यांच्या रातनिवार्याला सारंगागार म्हटलं जातं.उजळ आंबा परिसरातील झाडं,नांदेड रेल्वे स्थानकाबाहेरील झाडं, परभणी बसस्थानकाशेजारील झाडं बगळ्याच्या आवाजानं आनंदून गेलीली.तिथं त्यांची घरटी पाहायला मिळतात.दिवसभर त्यांच्या आवाजानं तेथील वातावरणात हिरवेपणा जाणवतो.पक्ष्यांची सीट पडल्यामुळे झाडांचे खोड कोलाज केल्यासारखे भासतात.त्या परिसरात या सीटमुळे नाकाला झोंबणारा वास येतो.वर्षानुवर्षे या झाडावर त्यांची वस्ती पाहायला मिळते.जनावरांच्या पाठीमागे तुरुतुरु चालणारे जमिनीवरचे पांढरे ढगच! हिरव्या झाडांवर बगळ्यांची रांग उतरते तेव्हा वर्गातल्या हिरव्या फळ्यावरची पांढरी अक्षरं वाटतात.घरट्यातली त्यांची पिलं माना वर उचलत तेव्हा मी बोटावर उभा असतो.आकाशातील पांढरी नक्षी पुढं सरकताना मी रस्त्याच्या कडेला एकटाच असतो.
लेखक 'आनंद विंगकर' यांच्या 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' या कादंबरीत कावळ्याचे वेगवेगळे संदर्भ आणि टिपणं वाचून भारावून जातं. कादंबरी वाचकाला कवेत घेऊन पुढं सरकते.पक्षीतज्ज्ञ 'मारुती चितमपल्ली' यांच्या 'आनंददायी बगळे' या पुस्तकातून बगळे डोकावतात.
मी एकदा 'शिंजीर' पक्ष्याचं घरटं बघितलं.बाभळीच्या झाडावर लटकलेलं.वाऱ्यासोबत हेलकावे खात. चिमणीपेक्षा लहान असणारा पक्षी. या पक्ष्याने पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात डोकावून पाहावं असं मला सारखं वाटतं.
'गिधाड' पक्ष्यांची घरटी उंच झाडावर असतात.परंतू वृक्षतोडीमुळे त्यांची निवासस्थाने नष्ट होत आहेत. परिसरातील काही झाडं या पक्ष्यांसाठी राखीव ठेवणे काळाची गरज झाली आहे.लहानपणी पाहिलेले गिधाड पक्षी आज शोधूनही सापडत नाहीत.
'शिंपी' पक्ष्याचं घरटं अनेकदा पाहिलय.वडाच्या पानात ती विसावतात.पानाला कापसासारख्या धाग्यापासून शिवतात.
आतील भागात मऊ अस्तर तयार करून त्यात अंडी उबवतात.एकदा वडाची फांदी तोडून शाळेच्या पाठीमागील बाजूस टाकली तेव्हा घरटं आढळलं.त्यात अंडी नव्हती.
नुकतच घरटं तयार केलं होतं.त्यानंतर शिंपीचा आवाज वडाभोवती घुटमळत राहिला.काही दिवसांनी तो आवाज कानावर आला.माझी नजर पानाकडं भिरभिरली.एक पान आतील बाजूस झुकलेलं दिसलं.त्यात शिंपी बसलेला होता.ते पाहून मला खूप आनंद झाला. एक घरटं पाहून आश्चर्य वाटलं. कापसाच्या झाडाचे ३ - ४ पानं एकत्रित शिवून घरटं तयार केलेलं.कापसाच्या आतील बाजूकडून प्रवेशद्वार होतं.पाखराची कारागिरी पाहून थक्क झालो. कापसाच्या पानाला ठराविक अंतरावर छिद्रे पाडून त्यांना धाग्यांनी एकत्रित केलं होतं.तो शिंपी आजही आठवतो.जशी काही पक्ष्यांची घरटी रानावनात पाहायला मिळतात तशी घरातही. घरात वावरणारी चिमणी आठवते.
फोटोच्या पाठीमागे,मातीच्या भिंती,परसातली झाडं चिमण्यांच्या आवाजानं जागी होतात. तिच्या पिलांचा चिवचिवाट घरभर पसरतो.तिचं घरटं करणं सुरू असतं तेव्हा घरभर कचरा पडलेला असतो. दुपारच्या वेळी घरातली चिमणी शाळेत असते तेव्हा या चिमण्यांची सोबत असते.घरातला फेकून दिलेला कचरा तिच्या घरट्याला सावरतो.सगळ्यांचं बालपण चिमणीच्या आवाजानं समृद्ध झालेलं.अशा चिमणीच्या विश्रामगृहाला शासकीय विश्रामग्रहासारखी घरघर लागलीय.मूठभर तांदळाच्या अनुदानावर तिचं जगणं सुसह्य होतं.सिमेंटच्या घरातही तिला राहायला आवडतं. डाळिंबाचं झाड घराच्या अंगणाची शोभा वाढवित होतं. त्या झाडावर सूर्यपक्ष्याचं घरटं झुलत होतं.नाव 'सूर्यपक्षी' पण घरट्यावर सूर्यकिरणं पडत नसत.
पिंपळ कुळातील काही झाडावर 'काळा शराटी' या पक्ष्याचं घरटं उठून दिसतं.मी वडाच्या झाडावर या पक्ष्यांची घरटी पाहिली आहेत.घरटी शेंड्यावर दिसायची.काड्यावर काड्या ओबडधोबड रचलेल्या. दरवर्षी त्याची डागडुजी करून तेच घरटं वापरत असत. बाभळीच्या झाडावरही एक घरटं आढळलं होतं.झाडं आणि पाखरं आयुष्यभराची सोबती असतात. आभाळातली नक्षी अलगदपणे झाडावर उतरते अन् झाडं प्रफुल्लित होतात.
सुतार,पोपट,पिंगळा,धनेश या पक्ष्यांच्या ढोली आकर्षित करतात.
तांबट वाळलेल्या फांदीला घरटं कोरतो.'रंगीत रायमुनिया' खुरट्या झाडाझुडपात घरटं विणते.'भिंगरी' चिखलाच्या गोळ्यापासून कपारीला घरटं बनविते.त्या चिखलात लाळ मिसळून मजबूत करते.'रोहित' पक्ष्यांची मातीची घरटी असतात.पण अजून बघितली नाहीत.मोर,तित्तिर,पक्ष्यांची घरटी गवतातून आढळतात. 'पारवा' इमारतीच्या आडोशानं घरटं तयार करतात. 'खंड्या' नदीच्या,ओढ्याच्या काठानं घरटं पोखरतो. 'ब्राह्मणी घार',
'कापशी घार','समुद्र गरुड','घार' अशा शिकारी पक्ष्यांची घरटी उंच झाडावर पाहायला मिळतात.टिबुकली,चांदवा,बदक यांची घरटी पाण्यातल्या वनस्पतीवर किंवा जलाशयाच्या काठानं पाहायला मिळतात. 'कोकिळा' घरटं तयार करतच नाही. कावळ्याच्या घरट्यात अंडी घालून मोकळी होते.पक्षीनिरीक्षकांना पाखरांची विश्रामगृह खुणावतात. पाखरं ही निसर्गातील विरामचिन्हे वाटतात.त्यांच्याजवळ थोडसं थांबल्याशिवाय पुढं जावसं वाटत नाही. पाखराशिवाय निसर्गचित्र पूर्ण होतच नाही.