मुंबईतील फ्रेंच ब्रिजजवळ चित्रकार आलमेलकरांचं 'नूतन कलामंदिर' आहे.त्या कलामंदिराचे ते गेली तीस वर्षे प्राचार्य होते.उपजीविकेचं साधन म्हणून ते वर्षभर मुला-मुलींना व श्रीमंत प्रौढांना चित्रकलेचे पाठ देत. तिथंच त्यांच्या अभ्यासिकेत बसून ते एकांती कलेची साधना करीत.कला एक प्रकारची पूजा असते,अशीच त्यांची भावना होती.कुणा अज्ञात आध्यात्मिक जीवनप्रवाहातून त्यांना कलेची प्रेरणा मिळाली होती.नाहीतर तिला एवढी विश्वमान्यता मिळाली नसती.परंतु त्या चित्रातील रेषा व रंगरूपाचं सौंदर्य मात्र त्यांचं म्हणून विशेष आहे.ते संत कलाकार होते.
वर्षभर मुंबईत राहिल्यावर आलमेलकरांना वाटे की, जीवनातलं सत्य आपल्यात कमी कमी होत आहे. कारण मुंबईच्या जीवनात त्यांना सत्य कुठंच दिसत नसे. तिथलं सारं जीवन कृत्रिम.म्हणून खरं सत्याचं जीवन कुठं असेल,तर ते भारतात फक्त त्यांना आदिवासींच्या जीवनात दिसून येई.ते सत्य शोधण्यासाठी एखादी नेसत्या शुभ्र कापडाची जोडी आणि स्केचिंगसाठी लागणारे भरपूर कागद घेऊन दरवर्षी हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात आदिवासींच्या टोळ्याटोळ्यांत जाऊन तिथं ते राहत असत.कधी जीप मिळे तर कधी ट्रक.कधी मोटारसायकल,तर कधी खेचर.नाहीतर पदयात्रा. एखाद्या भाविक यात्रेकरूसारखे ते आदिवासींत राहत असत.ही स्थळं त्यांची धर्मस्थळं होती.
तिथं ते त्यांच्यातील एक होऊन जात.ते त्यांचं जवळून निरीक्षण करीत.रेखाटनं करीत.त्यांना बहुतेक आदिवासींच्या बोलीभाषा अवगत होत्या.त्या त्या भाषेत त्यांच्याशी ते बोलत असत.त्यांचे कपडे ते अंगात घालत असत.त्यांची लोकगीतंही ते गात असत.
त्यांचा आवाज चांगला होता.गीतं गात गात त्यांच्याबरोबर ते नृत्यही करू लागत.त्यामुळं त्यांच्यातील परकेपणा निघून जाई.
रात्री आगटीभोवती गप्पा मारीत बसले की ते नकला करीत.
आणि असा आपला झालेला पाहुणा काही दिवस राहून निघून जाताना आदिवासी स्त्री-पुरुषांच्या डोळ्यांत विरहाची आसवं येताना मी पाहिली आहेत.अन् आलमेलकरही साश्रुनयनांनी त्यांचा निरोप घेत.
तणमोराच्या शोधात फासपारध्यांशी माझे तीन महिन्यांचे संबंध आले.ते अननुभूत होते.त्या पार्श्वभूमीवर मला वाटलं की,
आलमेलकरांना पारधी व त्यांच्या बेड्यांची रेखाटनं काढायला बोलवावे.नेहमीप्रमाणं ते दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये नागपूरला आले होते. वाटलं, एक दिवस त्यांना पारध्यांच्या बेड्यावर घेऊन जावं.नागपूर-अमरावती रस्त्यावर ७०-७५ किलोमीटरवर कारंजा आहे.तेथून सारवाडीचा बेडा ७-८ किलोमीटर आत माळरानावर आहे.नागपूरचे सहायक वनसंरक्षक भूपेंद्र नागपुरे यांच्या जीपमधून निघालो.बरोबर कोंढाळीचे फॉरेस्ट रेंजर रत्नाकर जाधवही होते. निघायला उशीर झालेला.रस्ता कच्चा, दगड- गोट्यांनी भरलेला.वाटेतल्या पुलियाचे पाईप फुटलेले.आता पावसाळा संपल्यामुळं धूळही झालेली.हिवाळ्याचे दिवस.
धानकटाईचा हंगाम चालू होता.शेतांतून पेरलेला गहू-हरभरा वाढत होता.आल्हाददायक वातावरण होतं. आम्ही सरळ सारवाडी गाठली अन् भर दुपारच्या वेळी जीप बेड्याजवळ उभी राहिली.
आलमेलकर पुढं चालले होते.आम्ही त्यांच्या मागोमाग. आमच्या अपेक्षेप्रमाणं सुरवातीला त्या बेड्यातील स्त्रियांनी कावा-बावा केले.पारधी स्त्रिया मोठ्या धैर्याच्या असतात.मध्यम उंची,सावळा रंग,सरळ नासिका, तेजःपुंज डोळे,साठी उलटली तरी डोक्यावर काळेभोर केस,केसांचा उलटा भांग चोपून काढलेला,रुंद कपाळ, मोत्यासारखी शुभ्र दंतपंक्ती,अंगात पांढरा शुभ्र पोशाख-पायजामा,
पैरण.पायांत कोल्हापुरी चप्पल. निरागसपणे स्मित करीत आलमेलकरांनी जेव्हा स्केचिंगला सुरवात केली तेव्हा म्हातारा मुखिया आमच्याजवळ आला.नेहमीप्रमाणं पुरुषांनी देखील आपसात झगडे केले नाहीत.त्यानं सर्वांना शांत राहण्यास सांगितलं.विलक्षण शांत वातावरण झालं. आलमेलकरांच्या व्यक्तिमत्त्वानं ते प्रभावित झाल्यासारखे वाटले.
स्केचिंग करताना त्यांना एका झोपडीच्या दारासमोर भुईमुगाच्या आणि तुरीच्या शेंगा वाळत घातलेल्या दिसल्या.मूठभर शेंगा त्यांनी पारध्याकडून मागून घेतल्या अन् खिशात घालून ते त्या खाऊ लागले.खाताखाता स्केचिंग करू लागले.अन् एकदम तिथं खेळीमेळीचं व आत्मीयतेचं वातावरण निर्माण झालं.आपण होऊन मुखियानं स्त्रियांना रेखाटनासाठी समोर उभं राहण्यास सांगितलं.
मुखियानं बिनदुधाचा चहा दिला.आलमेलकर दोन दोन कप भरभरून तो प्याले.आम्ही मात्र संकोचानं अर्धाअधिक कप प्यालो.मुखियानं शिकारीच्या पद्धतीविषयी माहिती सांगितली.
जाळे,फासे,वाघुरे व भाले ही शिकारीची आयुधं दाखविली.मी मनात म्हणालो,हे सारं कसं घडतंय,मनासारखं.कसं शक्य आहे? ससे कसे पकडायचे,मोर-तणमोर जाळ्यात कसे धरायचे,डुकरांना भाल्यांनी कसं लोळवायचं,मुखिया व तिथल्या तरुणांनी सर्व प्रकारच्या शिकारींचं प्रात्यक्षिक करून दाखविलं.आलमेलकर रेखाटनामागून रेखाटनं काढीत होते.रेषा मोठ्या सफाईदार,एकेरी व बारीक. चार-पाच उभ्या-आडव्या रेषा मारल्या की,त्या रेषेतून माणसं जिवंत होत.मध्येच ते मुखियाकडं पाहून म्हणाले,
मुखियाजी,सकाळी आम्ही थोडा नास्ता केला होता.आता मात्र कडकडीत भूक लागलीय आम्हाला जेवण पाहिजे.
अशी विनंती अनपेक्षित होती.तो म्हणाला,आम्ही केलेलं जेवण तुम्ही खाणार?
का नाही? तुम्ही माणसं नाहीत का?
मुखियानं फर्मान सोडलं.तशा तीन दगडांच्या चुली पेटल्या.उडदाची डाळ मडक्यातून शिजायला टाकली. दुसऱ्या चुलीवर तवा ठेवला गेला.अल्युमिनियमच्या परातीत जोंधळ्याचं पांढरं पीठ लाजवंती मळू लागली. भाकऱ्या भाजू लागली.आलमेलकर हातात थाळी घेऊन पलंगावर बसले.उडदाची डाळ,भाकरी,हिरव्या मिरच्या ताटात घेतल्या अन् ते जेवू लागले.आमचा गुरुवार आहे म्हणून आम्ही सर्वांनी जेवायचं टाळलं.पारध्याच्या घरी जेवण करण्याची कल्पनाच आम्हाला करवत नव्हती, पण आलमेलकर अगदी मनःपूर्वक जेवले.दिवस मावळतीला ढळला.सकाळपासून शिकारीला गेलेले तरुण बाप्ये शिकार घेऊन परतले.खांद्याला लावलेल्या झोळीत लावा,बटेर,तितर व भट तितर होते. त्या बाप्यांत एक चैतूपारधी होता.असेल २५-३० वर्षांचा.उंच,सावळा.
डोक्यावरचे काळेभोर केस मानेवर रुळत असलेले.अंगात शर्ट नाही.पिळदार घोटदार शरीर. गुडघ्यापर्यंत धोतर.अनवाणी.तो एखाद्या आदिमानवासारखा वाटला.इतका तेजस्वी पारधी माझ्या पाहण्यात नव्हता.त्याचे डोळे तर खूप सुंदर होते.
आलमेलकर त्याच्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत म्हणाले, ✓ "चितमपल्लीजी,अजिंठ्याच्या चित्रातील एखादा पुरुष पुन्हा इथं जिवंत होऊन आला असावा,असं वाटतं.अन् स्वगत म्हणाले,युगानुयुगं मी तुलाच चितारतोय.अजिंठ्यातील
चित्रं काढताना मीच तर होतो.
त्यांचं ध्यान लागलं होतं.
आलमेलकरांच्या चित्रांतील व्यक्तींच्या डोळ्यांत खास वैशिष्ट्य असतं.चैतूच्या हातात झापा होता.झापा कापडाचा असतो.तो ढालीसारखा एका हातानं पुढं धरायचा.त्यातून पाहायला डोळ्यांच्या आकाराची दोन छिद्रं असतात.चैतू चालू लागला की,झापातून दिसतात फक्त दोन डोळे अन् खाली दोन अनवाणी पावलं. पायांचा आवाज न करता चालायचं.चालता चालता गुरं हाकावीत तसं लावा- तितरांना फाशाकडं खेदायचं. मोठ्या कौशल्याचं असतं हे सारं.आलमेलकरांनी ध्यानमग्न होऊन चैतूचं चित्र रेखाटलं.अनेक कोनांतून त्याला साकार केलं.समोरून,
पाठीमागून,आजूबाजूनं. त्या चित्राकडं पाहून तिथल्या तरुण मुलींना प्रथमच वाटलं की,चैतू खरोखरीच किती रुबाबदार वाटतो!
पारध्यांच्या किशोरी आणि तरुण मुलींच्या चेहऱ्यावर केवढं तेज असतं.त्या रूपवान असतात.रेखीव अवयव, रापलेला गोरा रंग,हसरा चेहरा,गिजरे डोळे.जणू कुणी शापित यक्षकन्याच उभ्या असाव्यात असं वाटतं.
रेखाटनं काढताना त्या किती हसायच्या.मला हिमालयातील 'लाफिंग थ्रश' च्या थव्याच्या आवाजाची आठवण झाली.किती विभ्रमविलास.अवर्णनीय असा आनंद आलमेलकरांच्या चेहऱ्यावर होता.ते माझ्याकडे पाहत म्हणाले,साहेब,गेल्या तीस वर्षांतील हा एक नवीन विषय.तणमोराच्या शोधात असताना पारधी स्त्रियांचं आज दिसलेलं सौंदर्य यापूर्वी कधी माझ्या लक्षात आलं नव्हतं.मी मंत्रमुग्ध झालो.नेहमी रणरागिणीचं रूप धारण करणाऱ्या या तरुणींमधलं सुकुमार मार्दव मला आलमेलकर चित्र काढत असताना दिसलं.अन् मला खरोखरच त्या राजपूत कुलातील असल्याची खात्री पटली.पारधी म्हणजे मला मृगया,मदिरा आणि मृगनयनांचं मूर्तिमंत प्रतीक वाटलं.
तिन्हीसांजा झाल्या.आम्हाला परतायला हवं होतं.आम्ही निघायच्या तयारीला लागलो.आलमेलकरांनी शंभरावर रेखाटनं काढली होती.रेखाटनं पाहताना पारध्यांना आपण चित्रासारखे सुंदर असल्याची भावना झाली अन् त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व चैतन्य दिसू लागलं.जाताना आलमेलकरांनी दहा दहाच्या पाच नोटा मुखियाच्या हाती ठेवल्या भेट म्हणून.पण मुखिया घ्यायला तयार नव्हता.मोठ्या मिनतवारीनं त्यानं त्या जवळ ठेवल्या.
स्त्रियांनी मात्र नापसंती व्यक्त केली.
जीपकडं जाताना पाहिलं,दोन्ही बाजूंनी स्त्री-पुरुषांनी फेर धरला होता.मुखिया आलमेलकरांच्या मागं मागं चालतोय,हे दृश्य मला अपरिचित होतं.आलमेलकर बेड्यातील साऱ्या स्त्री-पुरुषांना राम राम करीत चालले होते.मुखिया चेहऱ्यावर स्मित आणून आलमेलकरांना म्हणाला,ज्याला ईश्वराचं दर्शन झालेलं असतं,तोच माणूस बेड्यात येऊन आमचं स्वागत स्वीकारतो.हे ऐकताच आलमेलकर म्हणाले,माझा ईश्वर मी आज यांच्यात पाहिला.
नागपूरला परतताना आलमेलकर चित्रप्रदर्शनाचे संकल्प सांगत होते.बरं का साहेब,इथून परत गेलो की,जहांगीर आर्ट गॅलरीतील पुढच्या प्रदर्शनाच्या तयारीला लागीन. गतवर्षी 'नवेगावबांधचे पक्षी' हा विषय होता. यंदा 'पारधी' हा विषय अन् त्यातील एक कलाकृती श्रेष्ठ असेल!"
"कुठली?" मी.
चैतू पारध्याची.झापामागचे दोन डोळे.केवढे तेजस्वी व चैतन्यमय.खरं म्हणजे देवानं चैतूला दोनच गोष्टी बहाल केल्या आहेत."
"त्या कुठल्या?"
"दोन डोळे- पाखरांना पाहायला.दोन पावलं - भटकायला."
घरी परतायला रात्र झाली.दुसऱ्या दिवशी सकाळीच आलमेलकर भामरागडकडे निघून गेले.
आलमेलकरांची मुंबईहून पत्रं येत.त्यांत ते चित्रांची प्रगती कुठवर आली ते लिहीत. 'तणमोराच्या शोधात' या माझ्या ग्रंथासाठी ते चित्रं काढणार होते.डिसेंबरची ती काळरात्र.शब्दांचं धन,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सिताबर्डी नागपूर
देवदूताची वेळ.बाहेर कुत्री ओ ओ ओ असं ओरडून सांगत होती.तो पाहा आला.तो पाहा आला. आभाळातून देवदूत खाली उतरून लोकांची दारं ठोठावीत आहे,तर बाहेर कुणीच नाही.
रोज पहाटे उठून दार उघडं ठेवून लिहीत बसण्याची माझी सवय,पण त्या रात्री जी उचकी लागली,ती पार पहाटे पहाटेपर्यंत.त्यानंतर ती थांबली.अन् माझा क्षणभर डोळा लागला,तर दार वाजलं.
आलमेलकर नेहमी म्हणायचे,जो जागा सो पाया। सोया सो खोया.'अन् सकाळच्या बातम्या सुधा नरवणे सांगत होत्या - काल रात्री प्रसिद्ध चित्रकार आलमेलकरांचं हृदयविकारानं निधन झालं." ही अनपेक्षित बातमी ऐकून मला धक्काच बसला.मी मनात म्हणालो,आज पहाटे देवदूतांच्या वेळी आलमेलकर आले होते तर ! त्यांनी दार वाजविलं.हाक मारली अन् आपलं दार मात्र उघडं नव्हतं.
चैतूची श्रेष्ठ कलाकृती पूर्ण करायच्या आतच आलमेलकरांनी आपले डोळे कायमचे मिटले होते.त्यांची भटकी पावलं विसावली होती.मला मुखियाच्या तोंडचं वाक्य पुन्हा आठवलं.
"ज्याला ईश्वराचं दर्शन झालेलं असतं, तोच माणूस बेड्यात येऊन आमचं स्वागत स्वीकारतो."
नोंदणीय प्रतिक्रिया….।।
प्रिय मित्र विजयजी,
तुमचे लेख म्हणजे एक चैतन्यदायी अनुभव आहे. तुमच्या ब्लॉगच्या प्रवासाचा आढावा घेताना तुम्ही मांडलेले विचार प्रत्येक लेखकाला प्रेरणा देतील. "स्वतःसाठी लिहिण्याची" तुमची भावना लेखनाच्या प्रामाणिकतेचे खरे प्रतीक आहे.लेखकासाठी वाचकांचा प्रतिसाद हा महत्त्वाचा असतोच,पण वाचनाच्या माध्यमातून स्वतःच्या विचारांना अधिक ठाम करण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप प्रेरक आहे.www.vijaygaikawad.com या ब्लॉगसाठी तुम्ही दाखवलेली निष्ठा आणि त्याला मिळालेला प्रतिसाद हेच तुमच्या मेहनतीचे फळ आहे.कॅलिफोर्नियासारख्या आंतरराष्ट्रीय स्थळांवरून सातत्याने मिळणारे वाचक आणि ब्लॉगच्या इंग्रजी वाचनासाठी असलेला ४८% चा मोठा टक्का हे तुम्ही उभे केलेल्या संवादाच्या व्यासपीठाचे वैशिष्ट्य आहे.
तुमच्या ब्लॉगने वाचकांना केवळ माहिती दिली नाही, तर त्यांना विचारप्रवृत्त केले आहे.ब्लॉग हे केवळ शब्दांचे माध्यम नसून ते वाचक आणि लेखक यांच्यातील अदृश्य बंध आहे,हे तुम्ही सिद्ध केले आहे.तुमचा लेख वाचून अभिमान वाटतो की मी तुमच्या या यशाचा एक छोटासा भाग आहे.
www.vijaygaikawad.com हा ब्लॉग डिझाईन करताना माझ्यासाठीही हा अनुभव खूप खास होता. ब्लॉग सुरू करण्यापासून तो ३२,०००+ वाचकांपर्यंत पोहोचला,ही जिद्द आणि जडणघडण तुमच्या मेहनतीचा आणि दृढ संकल्पाचा उत्तम नमुना आहे.
तुमचे भविष्य आणखी यशस्वी होवो,तुमची लेखणी अधिकाधिक वाचकांना प्रेरणा देत राहो, आणि तुमचा ब्लॉग नवनवीन उंची गाठत राहो,अशी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत.
तुमचा मित्र, - विष्णू गाडेकर
प्रिय मित्र विजयजी,
तुमचा लेख वाचताना मन अगदी भारावून गेले.१३३ भाषांमध्ये उपलब्ध असलेला आणि ३२,०००+ वाचकांचा टप्पा ओलांडलेला तुमचा ब्लॉग म्हणजे लेखन क्षेत्रातील एक अद्वितीय यश आहे.
तुम्ही मांडलेले विचार आणि त्यामागचा दृष्टिकोन खरोखरच प्रेरणादायी आहेत.जरी एक वाचक असला तरी त्याच्यासाठी लिहीन,आणि कोणीही नसल्यास स्वतःसाठी लिहीन,या तुमच्या विचारांनी तुमच्या लेखनाविषयीची निष्ठा आणि प्रामाणिकता अधोरेखित केली आहे.
तुमच्या ब्लॉगच्या यशाचा प्रवास हा एका लेखकाने आपल्या मेहनतीने आणि दृढ विश्वासाने साध्य केलेल्या यशाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.कॅलिफोर्निया सारख्या ठिकाणांहून सातत्याने वाचक मिळत असल्याची गोष्ट तुमच्या लेखणीच्या जागतिक प्रभावाची साक्ष देते. इंग्रजी भाषेतून ४८% वाचला जाणारा हा ब्लॉग आणि १,९८५ नियमित वाचक हे तुमच्या मेहनतीचे आणि वाचकांशी असलेल्या नात्याचे फलित आहे.
तुम्ही माझ्या योगदानाचा उल्लेख करून जो दिलखुलास आभारप्रदर्शन केले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. www.vijaygaikawad.com हा ब्लॉग तयार करताना तुमच्यासाठी काहीतरी खास करायची संधी मिळाली,याचा मला खूप आनंद आहे.आज तो ब्लॉग इतक्या उंचीवर पोहोचला आहे, हे पाहून समाधान वाटते.तुमच्या लेखनातून निर्माण होणारे विचार आणि प्रेरणा वाचकांच्या मनात दीर्घकाळ टिकून राहणार,यात शंका नाही.तुमच्या ब्लॉगने केवळ माहिती दिली नाही, तर विचारांची एक नवीन दिशा दिली आहे.वाचक आणि लेखक यांच्यातील एक भावनिक बंध तुमच्या लेखणीने साधला आहे.तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. तुमची लेखणी असाच प्रभाव कायम राखो, तुमचा ब्लॉग अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचो,आणि तुम्ही नवनवीन उंची गाठत राहा, अशी मनापासून इच्छा आहे.
तुमचा स्नेही - विष्णू गाडेकर