पर्शियनांनी आशिया जिंकून घेतला आणि आता त्यांनी आपली गिधाडी दृष्टी युरोपाकडे वळविली.एजियन समुद्राच्या पलीकडे ग्रीस देश होता,भूमध्यसमुद्रात आपले दात खोल रूतवीत ग्रीस उभा होता. पर्शियातल्याप्रमाणे ग्रीस देशांतही आर्यन शाखेचेच लोक होते.आर्यांच्या त्या सर्वत्र पसरण्याच्या वेळीच हे आर्य इकडे येऊन ग्रीस देशात घुसले.तेथील मूळच्या रहिवाश्यांची त्यांनी हकालपट्टी केली आणि नंतर स्वतःच्या संस्कृतीचा आरंभ केला.
फोनिशियनांपासून ते नौकानयन शिकले.एजियन समुद्र ओलांडून आशियामायनरच्या किनाऱ्यावर त्यांनी अनेक वसाहती वसविल्या.नकाशात तुम्ही पाहाल तर तुमच्या तत्काळ ध्यानात येईल,की एजियन समुद्र हा एक अरुंद जलमार्ग आहे.अनेक बेटे या रस्त्यावर वाटोवाट उभी आहेत.जणू त्यांनी सेतूच बांधला आहे. दंतकथा रचणाऱ्या ग्रीकांनी ही बेटे ईश्वराने तिथे का रोवली,याची दोन कारणे दिली आहेत;ग्रीकांनी यांच्यावरून पावले टाकीत जावे म्हणून देवाने ही बेटे ठायी ठायी उभी केली,हे एक कारण; दुसरे कारण म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडात जाणाऱ्या प्रवाशांनी वाटेत विसावा घ्यावा म्हणून ही बेटे प्रभूने उभी केली होती,या बेटांमुळे फार प्राचीन काळापासून ग्रीकांनी आशियाशी संबंध ठेवला होता.आणि त्यामुळे ते पाश्चिमात्यांस पौर्वात्यांचा परिचय करून देणारे बनले. पौर्वात्त्यांसाठी ते पाश्चिमात्यांचे दुभाष्ये बनले.ते पूर्वेचा अर्थ पश्चिमेस विशद करणारे आचार्य झाले.
ग्रीक लोक व आशियातील लोक यांच्यात व्यापार चाले. तदनुषंगाने लढायाही होत.त्या शेकडो युद्धांचा भीषण इतिहास आपणास नको आहे.परंतु त्यातील ट्रोजन वॉर हे महायुद्ध,हे होमरने आपल्या काव्यामुळे अमर करून ठेवले आहे.आंधळा महाकवी होमर ! दोन रानटी जातींतील क्षुद्र भांडणांचा विषय घेऊन अमर सौंदर्याचे महाकाव्य त्याने जगाला दिले.
या ग्रीक लोकांचे खरोखर एक अपूर्व वैशिष्ट्य होते.ज्या ज्या वस्तूला ते स्पर्श करीत,तिचे ते शुद्ध शंभर नंबरी सोने करीत.साध्या वस्तूला स्पर्श करून तिचे काव्याच्या शुद्ध सुवर्णात ते परिवर्तन करीत.ही दैवी देणगी,ही अद्भुत कला त्यांच्या ठायी कशी आली,ते सांगणे कठीण.त्यांच्या देशाच्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे हा गुण त्यांच्या अंगी आला,असे अर्वाचीन इतिहासकार सांगतात.ग्रीस हे द्वीपकल्प आहे.हा देश शेकडो लहानलहान दऱ्याखोऱ्यांमुळे विभागला गेला आहे. प्रत्येक खोरे दुसऱ्या खोऱ्यापासून सभोवतालच्या डोंगरपहाडांनी सुरक्षित असे आहे.कधीकधी समुद्राचा बाहूही रक्षणार्थ आला आहे.याप्रमाणे पृथक् पृथक् अशा त्यांच्या शाखा झाल्या.त्या त्या खोऱ्यांत जीवनाचा विकास करीत ते राहिले.लहान वस्तूंतही पूर्णता ओतायची कला ते शिकले.निर्दोष भावगीते,निर्दोष नाटके,निर्दोष भांडी,निर्दोष शिल्प,निर्दोष मंदिरे सर्वत्र परिपूर्णता आहे.परंतु ग्रीक लोकांप्रमाणेच इतर ठिकाणीही असणाऱ्या लोकांना अशी भौगोलिक रचना मिळालेली का नाही? मिळालेली आहे,परंतु ग्रीक लोकांप्रमाणे पूर्णता,हा ज्ञान-विज्ञान-कलांचा अभिनव विलास व विकास त्यांना दाखविता आलेला नाही. प्रामाणिकपणाने म्हणावयाचे झाले तर आपणास असेच म्हणावे लागेल,की ग्रीक हे सौंदर्योपासक का झाले,ज्यू हे शांतीचे उपासक का झाले,याचे कारण सांगता येणार नाही.ग्रीकांची मनोरचना अपूर्व होती.त्यांची मनोरचना वैशिष्ट्यपूर्ण होती.त्यांना निर्मितीत जेवढा आंनद वाटे तेवढाच विध्वंसातही वाटे.त्यांना मेळ,सुसंवादित्व आवडे;परंतु त्यांच्या राजकीय जीवनात मात्र कधीच मेळ नसे.तिथे नेहमीच विसंवाद व भांडणे.ते संयमाचा नि नेमस्तपणाचा उपदेश करीत,परंतु भांडणे शोधण्यात नेहमी वेळ दवडीत.ते देवांशी बोलत,संवाद करीत आणि इकडे शेजाऱ्यांना फसवीत व लुबडीत.ग्रीक लोक उदात्तता व मूर्खपणा यांचे मिश्रण होते.एस्पायलॅस हा त्यांचा सर्वांत मोठा नाटककार.परंतु स्वतः
जवळच्या दैवी नाट्यकलेचा त्याला अभिमान वाटत नसे.आपण एक शिपाईगडी आहोत,यातच त्याला सारा पुरुषार्थ वाटे. ग्रीक लोकांना युद्धासाठी म्हणून युद्ध आवडे.जणू तो त्यांचा एक आनंद होता! विध्वंसनाचा,मारणमरणाचा आनंद ! सौंदर्यासाठी ज्याप्रमाणे ते सौंदर्याची पूजा करीत,त्याप्रमाणेच लढण्यासाठी म्हणून लढत.ते प्रतिभावंत;परंतु जंगली असे लोक होते.कलेमध्ये अद्वितीय होते,
दैवी होते.परंतु परस्परांशी वागताना जंगलीपणाने वागत.एखाद्या पुतळ्याचे बोट जरा बिघडले,तर ते त्यांना अक्षम्य पाप वाटे.परंतु युद्धकैद्यांची बोटे तोडणे त्यांना थोर कर्म वाटे,देशभक्तीचे कर्म वाटे.
ग्रीस देशात अनेक नगरराज्ये होती.अशा या नगर राज्यात तो देश विभागला गेला होता.प्रत्येक राज्य स्वतंत्र होते.प्रत्येक दुसऱ्याचा नाश करू पाहात होते. परंतु त्यांचे द्वेषमत्सर कितीही असले,तरी ओबडधोबड स्वरूपाची व स्थूल प्राथमिक पद्धतीची अशी लोकशाही त्यांनी निर्माण केली यात शंका नाही.प्रथम त्यांनी राजांना नष्ट केले.नंतर मूठभर प्रतिष्ठितांची सरदार वर्गाची सत्ता त्यांनी नष्ट केली.ख्रि.पू.सातव्या शतकातच अथेन्समध्ये पूर्ण लोकसत्ता होती.ती लोकसत्ता सर्वसामान्य जनतेची नव्हती,तर असामान्य जनतेची वरिष्ठ वर्गाची होती.
अथेन्समधील फक्त एकपंचमांश लोकांनाच तेथील लोकसभेत वाव होता.ज्यांचे आईबाप अथीनियन असत,त्यांनाच त्या लोकसभेत प्रवेश असे. उरलेल्या चारपंचमांश लोकांत परके असत,गुलाम असत,गुन्हेगार असत;आणि स्त्रियांना तर सार्वजनिक व राजकीय कामांत संपूर्णपणे प्रतिबंधच होता.या सर्वांना सर्वसाधारणपणे शूद्र असे संबोधण्यात येई,असंस्कृत रानटी लोक असे समजण्यात येई.ग्रीस देशातील ही लोकशाही अशा प्रकारे जरी प्राथमिक स्थितीतील असली तरी,तिच्यामुळे पर्शियनांच्या उरात धडकी भरली.ग्रीक लोक या लोकशाहीमुळे वाईट उदाहरण घालून देत आहेत;उद्या आपल्या अंगलट येणारा नवीन पायंडा पाडीत आहेत असे त्यांना वाटले. ग्रीकांचा लोकशाहीचा प्रयोग यशस्वी झाला,तर अनियंत्रित सत्तेचा पायाच उखडला जाईल अशी भीती पर्शियन साम्राज्यवाद्यांस वाटू लागली.लोकशाहीचे पुरस्कर्ते ग्रीक लोक म्हणजे प्राचीन काळचे बोल्शेव्हिक होते.त्या ग्रीकांना जिंकून घेण्याचे पर्शियनांनी निश्चित केले.लोकशाहीचा हा धोका नष्ट करण्याचे त्यांनी ठरवले.ग्रीस देशावर स्वारी करायला त्यांना चांगले कारणही सापडले.आशिया मायनरमध्ये ज्या ग्रीक वसाहती होत्या.त्यांनी क्रोशियसच्या पुढारीपणाखाली मागे एकदा पर्शियनांवर हल्ला चढविला होता.म्हणून त्या ग्रीक वसाहतींचा मायदेश असलेल्या ग्रीस देशावर हल्ला करून सूड घेणे अत्यंत न्याय्य आहे,असे पर्शियनांनी ठरवले.ग्रीस देशावरील डरायसाची स्वारी,माराथॉनची लढाई,इर्सिसची दहा सैन्ये बरोबर घेऊन आलेली टोळधाड,थर्मापिली येथील लिओनिदास यांचा शौर्यधैर्यात्मक प्रतिकार,या खिंडीतील त्याने मांडलेले अभंग ठाण,सालमिसाच्या सामुद्रधुनीमध्ये थेमिस्टक्लिसने लढविलेले डावपेच,प्लाटिआ येथील लढाईत पर्शियनांचा झालेला पराभव,
इत्यादी गोष्टी इतक्या वेळा सर्वत्र सांगितल्या गेल्या आहेत,की त्या पुन्हा सांगण्यात फारसे स्वारस्य नाही.लष्करी डावपेचांची ज्यांना आवड आहे,आपल्या मानवबंधूंना मारण्यासाठी लष्करी हालचाली कशा कराव्यात,शत्रूस कसे कोंडीत धरावे हे समजून घेण्याची ज्यांना आवड आहे,माणसे मारण्याची सुंदर कला ज्यांना शिकायची आहे,त्यांनी समर चमत्कारांचे ते रक्ताळलेले व क्रूर इतिहास वाचावेत.कोणत्याही ग्रीस देशाच्या इतिहासात या गोष्टींची इत्थंभूत वर्णने आढळतील.एक गोष्ट समजली म्हणजे पुरे,की या युद्धात अखेरीस ग्रीकांनी इराण्यांचा पूर्ण पाडावा केला.
पूर्वेकडून आलेले ते प्राणघातकी संकट नष्ट केल्यावर पुन्हा ग्रीक लोक आपापसांत कुरबुरी करू लागले. लहान शहरे अथेन्सचा द्वेष करीत,अथेन्स स्पार्टाला पाण्यात पाही आणि स्पार्टा सर्वांचाच हेवादावा करी. पर्शियनांनी जर कदाचित पुढे पुन्हा हल्ला केला तर त्यांना नीट तोंड देता यावे म्हणून सर्व ग्रीक नगरराज्यांनी एक संरक्षणसमिती नेमली होती.या समितीचे प्रमुखपण अथेन्सकडे होते.या संरक्षण समितीचे काम नीट चालावे म्हणून प्रत्येक नगरराज्याने आरमारी गलबते तरी द्यावी किंवा पैसा तरी पुरवावा असे ठरले होते.येणारा सारा पैसा डेलॉस येथील ॲपॉलोच्या मंदिरात ठेव म्हणून ठेवण्यात येई.डेलॉस हे एजियन समुद्रातील एक बेट होते.या संरक्षण समितीला 'डेलॉससंघ' असेही संबोधिले जाई.जसजसे दिवस जाऊ लागले,तसतसे संरक्षण समितीच्या कामात मंदत्व येऊ लागले,कोणी फारसे लक्ष देईना,कोणी आरमारी गलबते पाठविना,तर कोणी पैसे देईना.अथीनियन हे प्रमुख असल्यामुळे जमलेल्या पैशातून ते स्वतःसाठीच गलबते बांधू लागले. तोंडाने अर्थात ते म्हणत,की या आरमाराचा उपयोग सर्व ग्रीस देशाच्या रक्षणार्थच होईल.
जमा झालेल्या पैशाचा अधिकच मुक्तहस्ते उपयोग करता यावा म्हणून डेलॉस येथील तिजोरी आता त्यांनी अथेन्स येथेच आणिली आणि अशा रीतीने अथेन्स जणू साम्राज्यच बनले.
काही सभासद नगरराज्यांनी आता उघडपणेच पैसा देण्याचे नाकारले.परंतु अथेन्सने त्यांच्याविरुद्ध आपले आरमार पाठविले आणि त्यांना शरण आणले.अशा रीतीने स्वेच्छेने दिलेल्या किंवा सक्तीने उकळेल्या वार्षिक पैशांची जवळजवळ वीस लक्ष रुपये रक्कम जमा होई.त्या काळात वीस लक्ष रुपये म्हणजे लहान रक्कम नव्हती.या पैशाचा अथेन्सने फार चांगला उपयोग केला.
जगातील नामांकित कलावंतांना अथेन्सने आमंत्रण दिले,त्यांना उदार आश्रय दिला.अथेन्स मातीच्या झोपड्यांचे एक गाव होते.परंतु आता ते संगमरवरी पाषाणांचे व सोन्या-चांदीचे अमरनगर झाले. मातीचे जणू महाकाव्य झाले! हे सारे योजनापूर्वक घडवून आणारा लोकशाही पक्षाचा लोकप्रिय पुढारी पेरिक्लीस हा होय.
पेरिक्लीस हा अथेन्समधील एका सरदाराचा मुलगा होता.
पेरिक्लीसचा बाप पर्शियनांशी झालेल्या लढायात लढला होता.
आईकडून तो क्लेस्थेनीस घराण्यातील होता.अथेन्समध्ये लोकशाही स्थापण्याऱ्यांपैकी क्लेस्थेनीस हा एक होता.ग्रीक लोकांचा जो शिक्षणक्रम असे,तो सारा पेरिक्लीसने पुरा केला.
व्यायाम,संगीत,काव्य,अलंकारशास्त्र,तत्त्वज्ञान,सारे विषय त्याने अभ्यासले.लहान वयातच राजकारणाची आवड त्याला लागली.
त्या विषयात तो रमे.त्याच्या अनेक आचार्यांपैकी सुप्रसिद्ध तत्त्वज्ञानी झेनो हा एक होता.झेनोची वाणी दुधारी तरवारीप्रमाणे होती.तो कोणत्याही विषयावर दोन्ही बाजूंनी तितक्याच समर्पकतेने व परिणामकारकपणे बोलू शके.पुढे यशस्वी मुत्सद्दी होण्याची महत्त्वाकांक्षा धरणाऱ्या तरुण पेरिक्लीसला अशा वादविवादपटू बुद्धिमान गुरूंजवळ शिकायला सापडले ही चांगलीच गोष्ट झाली.परंतु पेरिक्लीसचा सर्वांत आवडता आचार्य म्हणजे अनॅक्झेगोरस हा होता.अनॅक्झेगोरस हाही मोठा तत्त्वज्ञानी होता. तो थोडासा अज्ञेयवादी होता.या जगाचा कारभार भांडखोर व क्षुद्र वृत्तीचे देव चालवीत नाहीत;
होमरच्या महाकाव्यातील देवताही चालवीत नाहीत;तर परमश्रेष्ठ अशी चिन्मयता जगाचा कारभार चालवीत आहे.असे तो म्हणे.अनॅक्झेगोरस विज्ञानातही फार पुढे गेलेला होता.मनुष्यांच्या डोळ्यांना सूर्य जरी बचकेएवढा दिसत असला,
तरी तो खरोखर फारच प्रचंड आहे.असे तो म्हणे.सूर्याचा आकार निदान पेलापॉनेसच्याइतका म्हणजे शंभर चौरस मैलांचा
तरी असला पाहिजे,असा त्याने अंदाज केला होता.ज्या प्रदेशात ग्रीक राहात होते,तो प्रदेश खरोखरच फार लहान होता.
पेरिक्लीस अशा गुरुजनांजवळ शिकला.जेव्हा त्याचे शिक्षण संपले त्या वेळेस विश्वाच्या पसाऱ्याचे जरी त्याला फारच थोडे ज्ञान असले तरी त्याच्या स्वतःच्या शहरातील राजकारणाचे मात्र भरपूर ज्ञान होते.तो उत्कृष्ट वक्ता होता.प्रतिपक्षीयांची मते तो जोराने खोडून टाकी.विरुद्ध बाजूने मांडलेल्या मुद्यांची तो राळ उडवी.
त्याचे अशा वेळचे वक्तृत्व म्हणजे मेघांचा गडगडाट असे,विजांचा कडकडाट असे.अशा वेळेस कोणीही त्याच्यासमोर टिकत नसे.
परंतु पेरिक्लीस एकदम राजकारणात शिरला असे नाही.प्रथम त्याने लष्करात नोकरी धरली.ज्याला जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल,त्याने लष्करी पेशाची पायरी चढणे आवश्यक असते.आणि पुढे त्याचे सार्वजनिक आयुष्य सुरू झाले.गरिबांचा पुरस्कर्ता म्हणून तो पुढे आला. स्वभावाने तो भावनाशून्य व जरा कठोर होता.तो अलग राहणारा,दूर राहणारा,जरा अंहकारी असा वाटे.तो विसाव्या शतकातील जणू वुड्रो वुइल्सन होता.प्रथम प्रथम लोकांचा विश्वास संपादणे त्याला जड गेले. पुराणमतवादी पक्षाचा किर्मान हा त्याचा प्रतिस्पर्धी होता.किर्मान अधिक चळवळ्या व गुंडवृत्तीचा होता.हा किर्मान गरिबांना मेजवानीस बोलावी.स्वतःच्या फळबागांतील फळे गोळा करायला,त्या बागांतून खेळायला तो गरिबांना परवानगी देई.रस्त्यांतून जाताना त्याचे गुलाम वस्त्राचे गड्ढे घेऊन त्याच्या पाठोपाठ येत असत.आणि रस्त्यात जे जे कोणी वस्त्रहीन दिसत, ज्यांच्या अंगावर फाटक्या चिंध्या असत,त्यांना किर्मान वस्त्रे वाटीत जाई.पेरिक्लीसने हे सारे पाहिले.(मानव जातीची कथा हेन्री थॉमस,अनुवाद- साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन) लोकप्रियता मिळविण्याच्या युक्त्या त्याने ओळखल्या.तोही तसेच करू लागला.अत्यंत विपन्न व निराधार लोकांना तो पैशांच्या देणग्या पाठवू लागला.
लोकसभेला जे हजर राहतील,त्यांनाही तो पैसे देई. राज्यकारभारात जे प्रत्यक्ष भाग घेतील त्यांनाही तो बक्षिसी देई.लोकप्रियतेचा काटा लवकरच पेरिक्लीसच्या बाजूला झुकला आणि जवळजवळ चाळीस वर्षांपर्यंत, मरेपर्यंत... त्याने लोकांवरील आपले प्रभुत्व व वजन राखले.पेरिक्लीसशी कसे वागावे ते त्याच्या विरोधकांस समजत नसे.प्रक्षुब्ध अशा वादविवादाच्या प्रसंगी सारे हमरीतुमरीवर आले असतानाही तो मनाचा तोल सांभाळू शके,विनोदी वृत्ती राखू शके.तो कधी प्रक्षुब्ध होत नसे.स्वतःच्या मनावर त्याचा अपूर्व ताबा होता.प्लुटार्कने पेरिक्लीसविषयीची एक आख्यायिका दिली आहे.त्या आख्यायिकेने पेरिक्लीसच्या स्वभावावर चांगलाच प्रकाश पडतो. एकदा तो मुख्य बाजारपेठेतून-फोरममधून जात होता. रस्त्यात विरुद्ध पक्षाचा एक राजकारणी पुरुष त्याला भेटला…!
उर्वरित भाग पुढील भागात..!
अथेन्सचा लोकप्रिय लोकशाही पक्षनेता पेरिक्लीस..!