मी जवळपास त्याचा प्रत्येक मुद्दा मान्य केला.त्याला सहानुभूती दाखवली.असे वागणारा आमच्या कंपनीचा कोणताच प्रतिनिधी त्याला भेटला नव्हता.त्यामुळे आमची चांगली मैत्री झाली.मी ज्या कारणासाठी त्या माणसाला भेटायला गेलो होतो तो विषय मी पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या भेटीतही निघाला नाही आणि अखेरीस चौथ्या भेटीनंतर मात्र त्याने पूर्ण टेलिफोन बिल भरले आणि टेलिफोन कंपनीच्या इतिहासात प्रथमच असे घडले की,त्या नाठाळ ग्राहकाने पब्लिक सर्व्हिस कमिशनमधून आमच्या विरुद्ध केलेल्या सगळ्या केसेस मागे घेतल्या.तो स्वतःला शूरवीर समजत होता याबद्दल शंका नाही.संस्थेविरुद्ध तो त्याचे सार्वजनिक हक्क मागत होता,असे त्याला वाटत होते; पण प्रत्यक्षात त्याला मान्यता,मोठेपणा व महत्त्व हवे होते.कंपनीविरुद्ध तक्रार करून त्याला त्याचे महत्त्व ठसवायचे आहे,पण जेव्हा टेलिफोन कंपनीच्या प्रतिनिधीनेच त्याला खूप महत्त्व दिले,त्याच्या मतांची कदर केली,त्याच्या तक्रारींकडे सहानुभूतीपूर्वक पाहिले, तेव्हा त्याच्याकडून त्याला महत्त्व प्राप्त झाले आणि त्याच्या तक्रारींचे बुडबुडे हवेत विरून गेले.
फार वर्षापूर्वी एके सकाळी ज्युलियन डेटमरच्या ऑफिसमध्ये एक रागावलेला ग्राहक एखाद्या वादळाप्रमाणे शिरला.ज्युलिअन डेटमन हे डेटमर वुलन कंपनीचे संस्थापक होते.संपूर्ण जगाला टेलरिंग व्यवसायात वुलन पुरवणारी सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे ही कंपनी.मि.डेटमर त्या ग्राहकाविषयी सांगत होते,या ग्राहकाकडे आमची काही बाकी होती,पण त्याने ती नाकारली.तो खोटे बोलत होता.म्हणून आमच्या क्रेडिट विभागाने त्याने पैसे दिलेच पाहिजे असा आग्रह धरला.अशा अर्थाची बरीच पत्रे त्याला पाठवल्यानंतर एक दिवस तो घाईघाईने माझ्या ऑफिसमध्ये आला.आणि म्हणाला की,तो पैसे परत करणार नाही आणि इथून पुढे तो डेटमर वुलन कंपनीकडून एका पैशाचेही सामान विकत घेणार नाही.कित्येकदा मध्ये बोलण्याचा मोह होऊनही,तो आवरुन, आम्ही शांतपणे त्याचे म्हणणे ऐकून घेतले.कारण त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता होती. शेवटी त्याचे बोलणे संपल्यावर जेव्हा तो काही ऐकण्याच्या मनःस्थितीत आला तेव्हा मी शांतपणे म्हणालो,मी तुमचा आभारी आहे की,शिकागोला येऊन तुम्ही आमच्यावर उपकार केले आहेत.कारण,आमच्या क्रेडिट विभागावर तुम्ही रागावले असाल,तर इतरही चांगले ग्राहक रागावू शकतात आणि हे आमच्यासाठी हिताचे नाही.कदाचित नेमके हेच त्याला हवे होते. कुठल्यातरी लहानशा कारणावरून तो नाराज झाला होता आणि त्याबद्दलच मला सांगण्यासाठी खास शिकागोपर्यंत आला होता.मी त्याचे सर्व ऐकून घेऊन वर त्याचीच माफी मागत होतो.मला असे वाटत होते की त्याचे म्हणणे खरे असावे.कारण,त्याला फक्त स्वतःचेच अकाउंट बघायचे होते.आमचे क्लार्क्स हजारो ग्राहकांची अकाउंट्स सांभाळतात.पण तरीही त्याला हवा असलेला प्रतिसाद आणि त्याच्या भावना खऱ्या होत्या हे मी मान्य केले.मी त्याला इतर काही दुकानांची नावे त्याला आता आमच्याकडून काही घ्यायचे नसल्यास सुचवली.पूर्वी आम्ही दुपारचे जेवण एकत्र घेत असू म्हणून त्या दिवशीसुद्धा मी त्याला जेवायला बोलावले. त्याने ते आमंत्रण काहीसे नाराजीनेच स्वीकारले,पण जेवणानंतर त्याने मला पूर्वीपेक्षाही मोठी ऑर्डर दिली. तो अतिशय चांगल्या मनःस्थितीत परत गेला आणि त्याने आमचे संबंध पूर्वीसारखेच राहावेत अशी इच्छा व्यक्त केली.त्याने पुन्हा एकदा बिले व चेक्स तपासल्यानंतर एका बिलाबद्दल चूक झाल्याचे मान्य करून क्षमा मागून त्याचा चेक आम्हाला पाठवला.
त्याच्या मुलाला डेटमरचे मधले नाव दिले आणि त्यानंतर बावीस वर्षे म्हणजे आमरण तो मित्र आणि ग्राहक म्हणून कायम डेटमरच्या संबंधात राहिला.
एडवर्ड बॉक नावाचा एक गरीब परदेशी मुलगा काही वर्षापूर्वी बेकरीच्या काचा पुसत असे.रोज आपल्या बास्केटमध्ये कोळशाच्या थांबलेल्या वॅगन्स जिथे कोळसे उतरवतात तेथील गटारांमध्ये पडलेले तुकडे वेचून आणून तो आपल्या घरातील इंधनाची गरज भागवत असे.तो शाळेत सहाव्या इयत्तेपर्यंतही शिकू शकला नव्हता.पण हाच मुलगा पुढे अमेरिकन वृत्तपत्राच्या इतिहासात गौरवल्या गेलेल्या काही यशस्वी संपादकांपैकी एक म्हणून प्रसिद्ध झाला.त्याच्या या करिअरची सुरुवात या प्रकरणात सांगितलेली तत्त्वे वापरून त्याने कशी केली? ती एक मोठी कथा आहे.तेरा वर्षांचा असताना त्याने शाळा सोडली आणि तो वेस्टर्न युनियनमध्ये शिपायाची नोकरी करू लागला; पण तरीही तो शिक्षणाला क्षणभरही विसरला नाही. उलट स्वतःच्या मनाने अभ्यासाला सुरुवात केली.त्याने मोठमोठ्या अमेरिकन माणसांच्या चरित्रांचा ज्ञानकोश विकत घेण्याइतके पैसे जमवले.त्यासाठी कधी भाड्याचे पैसे वाचवले,तर कधी अर्धपोटी राहिला,आणि नंतर त्याने अत्यंत अभिनव अशा काही गोष्टी केल्या.त्याने त्यात मोठ्या माणसांच्या जीवनाविषयी वाचले व त्यांना पत्रे लिहून पुस्तकाव्यतिरिक्त अधिक माहिती जाणून घेतली.तो एक उत्तम श्रोता बनला.त्याने त्याकाळचे प्रेसिडेंट जनरल जेम्स गारफिल्डना पत्र लिहून विचारले, आपण लहानपणी कॅनॉलवर टो-बॉय म्हणून काम केले, असे मी जे वाचले हे खरे का ? गारफिल्डनी त्या
पत्राचे उत्तर दिले.त्यानंतर त्याने जनरल ग्रांटना काही विशिष्ट लढायांबद्दल विचारले आणि ग्रांटनी स्वतः नकाशे काढून त्याला सगळे समजावले आणि या अवघ्या चौदा वर्षांच्या मुलाला जेवायला बोलावून सबंध संध्याकाळ एकत्र व्यतीत केली.थोड्याच दिवसांत या शिपायाने अनेक प्रसिद्ध व्यक्तींशी संपर्क साधला - राल्फ वॉल्डो इमर्सन,ऑलिव्हर वेंनडेल होम्स,लाँग फेलो,मिसेस अब्राहम लिंकन,लुईसा मे अलकॉट, जनरल शर्मन आणि जेफरसन डेव्हिस.दर सुट्टीत तो त्यांना भेटायला जात असे व त्याचे तेथे यथेच्छ स्वागत होत असे.पत्रव्यवहारापलीकडे जाऊन मिळवलेल्या त्याच्या या अनुभवांमुळे त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला.त्याचीसुद्धा समाजात काहीतरी किंमत आहे,याची त्याला जाणीव झाली.ह्या सर्वांमुळे त्याच्यात जिद्द जागी झाली,
महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आणि त्याच्या आयुष्याला आकार आला.या प्रकरणातील तत्त्वांमुळेच,ती आचरणात आणल्यामुळेच एडवर्ड बॉकला हे यश मिळाले होते.
पत्रकार आयझेंक मॅरेकोसनने शेकडो ख्यातनाम व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या.त्याच्या मते,अनेक लोक आपली चांगली छाप पाडू शकत नाहीत.कारण,ते नीट लक्ष देऊन ऐकण्यात कमी पडतात.आपल्याला आपले मत मांडायचे आहे,या सततच्या विचारामुळे त्यांचे लक्ष ऐकण्यावर केंद्रित होऊ शकत नाही.चांगले बोलणाऱ्या लोकांपेक्षा चांगले ऐकणारे लोकच जास्त लोकप्रिय असतात;पण ऐकण्याची क्षमता असणे इतर चांगल्या गुणांप्रमाणेच दुर्मीळ आहे.फक्त महत्त्वाच्या मोठ्या लोकांनाच उत्तम श्रोते आवडतात असे नाही,तर सामान्य लोकांनासुद्धा श्रोतेच आवडतात.रीडर्स डायजेस्टमध्येही एकदा म्हटले होते की,जेव्हा लोकांना श्रोते हवे असतात,तेव्हा ते डॉक्टरांना बोलावतात.
सिव्हिल वॉरच्या सर्वात कठीण दिवसांमध्ये लिंकननी स्प्रिंगफिल्ड (इलिऑनिस) मधील आपल्या जुन्या मित्राला पत्र लिहिले की,
वॉशिंग्टनला काही दिवसांसाठी येऊन मला भेट,कारण मला माझ्या काही समस्यांवर चर्चा करायची आहे.लिंकनच्या या जुन्या शेजाऱ्याला व्हाईट हाउसमध्ये बोलावले गेले आणि लिंकन कित्येक तास त्याच्याशी बोलत राहिले.गुलामांच्या मुक्ततेच्या जाहीरनाम्याविषयी चालू असणाऱ्या या चर्चेत लिंकन स्वतःच या जाहीरनाम्याचे समर्थन करणारे व विरुद्ध बाजूचे असे दोन्ही प्रकारचे मुद्दे मांडून एकटेच वादविवाद करत होते.नंतर त्यांनी त्यांची निंदा करणारी काही पत्रे व वर्तमानपत्रातील कात्रणे वाचून दाखवली. काहींना गुलामांच्या मुक्ततेबद्दल भीती वाटत होती,तर काहींचे मत असे होते की लिंकन यांनी गुलामांना मुक्त करायला हवे.खूप वेळ बोलून झाल्यानंतर लिंकननी त्या आपल्या जुन्या शेजाऱ्याचा गुड नाइट म्हणून निरोप घेतला.त्याचे मतसुद्धा विचारले नाही.इतका वेळ लिंकन स्वतःएकटेच बोलत होते,जणू काही ते त्याच्या मनाला त्याच्या वागण्याची सफाई देत होते.तो जुना मित्र म्हणाला,या बोलण्यानंतर त्याला खूप बरे वाटले. लिंकनला कोणाचाही सल्ला नको होता.तर फक्त सहानभूतीने व मित्रत्वाच्या नात्याने त्याचे ऐकणारा, त्याचे मन हलके होईल असा एक श्रोता हवा होता. एखाद्या संकटात असणाऱ्या कोणालाही हेच हवे असते. त्रस्त ग्राहकांनासुद्धा,असमाधानी मालकाला आणि दुखावलेल्या मित्रालासुद्धा याचीच गरज असते.
आधुनिक काळातील सर्वात उत्तम श्रोता म्हणजे सिग्मंड फ्रॉईड.फ्रॉईडच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलेला एक माणूस म्हणतो,माझी व त्याची भेट अत्यंत संस्मरणीय होती.इतर कोणातही नसलेले काही सद्गुण मला त्याच्यात दिसले.
समोरच्याचे ऐकताना तो चित्त एकाग्र करून ऐकतो.त्याचे डोळे अगदी शांत असतात. आवाज अत्यंत हळू व प्रेमळ असतो.चेहऱ्यावर फारसे भाव नसतात;त्याने संपूर्ण लक्ष देऊन मी जे बोललो ते ऐकले.ते विशेष चांगले नव्हते,
तरीसुद्धा त्याचे त्याने कौतुक केले.लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे काय याचे हे अतिशय उत्तम उदाहरण आहे.स्वतःबद्दल अव्याहतपणे बडबडत राहून कोणाचेच काहीही न ऐकणाऱ्या माणसाची लोक टिंगल करतात किंवा त्याला टाळतात किंवा त्याचा तिरस्कार करतात.समोरचा माणूस काही बोलत असतानाच तुमच्या डोक्यात एखादी कल्पना आलीच,तर त्याचे बोलणे संपायची वाटही न पाहणारी,त्याचे वाक्य मध्येच तोडून सरळ बोलत सुटणारी काही ख्यातनाम माणसेही या जगात आहेत.दुर्दैवाने,अशी माणसे आहेत.अशी माणसे खूपच कंटाळवाणी असतात.त्यांचा अहंकार आणि मीपणा यामुळे ते समोरच्याला नकोसे होतात.फक्त स्वतःचा विचार करणारे लोक स्वतःबद्दलच जास्त बोलतात.
प्रदीर्घ काळापर्यंत कोलंबिया विद्यापीठाचे प्रेसिडेंट असणारे डॉ.निकोलस म्हणतात,स्वतःचा विचार करणारे लोक मूर्ख व अशिक्षित असतात.त्यांना थांबवायचा कितीही प्रयत्न केला,तरी त्यांचे मी-मी करणं काही संपतच नाही.
एक उत्तम श्रोता नक्कीच उत्तम संभाषण करू शकतो. लोकांच्या बोलण्यामध्ये तुम्ही रस घेतलात तर ते तुमच्या बोलण्यात रस घेतीलच.ज्यांची उत्तरे देणे आवडेल, असेच प्रश्न लोकांना विचारा.त्यांना त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या यशाबद्दल बोलण्यास प्रोत्साहन द्या.
तुमच्याशी बोलणाऱ्या माणसांना तुमच्यामध्ये किंवा तुमच्या समस्यांमध्ये फारसा रस नसतो,तर त्यांना स्वतःमध्ये व स्वतःच्या समस्यांमध्ये अधिक रस असतो, हे कधीच विसरू नका.अस्मानी संकटात कुणाचे किती नुकसान झाले;कोणावर कुठले दुःख ओढवले यापेक्षा कुठल्याही माणसाला स्वतःची दातदुखी अधिक महत्त्वाची वाटत असते.आफ्रिकेतील चाळीस भूकंपांच्या धक्यांपेक्षा एखाद्याच्या मानेवरचे गळू हे त्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असते.कोणाशीही संवाद साधताना ही गोष्ट विसरू नका.
उत्तम श्रोता बना.इतरांना स्वतःबद्दल बोलण्यास प्रोत्साहन द्या. २४.११.२४ या लेखातील शेवटचा भाग..