पाईनच्या झाडावरच्या या थरारक अनुभवानंतर कित्येक दिवस माझा नरभक्षकाशी संपर्क तुटला.त्या भागात परत तोही फिरकला नाही आणि ज्या मादीमुळे तो थोडक्यात वाचला होता तीही फिरकली नाही.मला हा सर्व भाग चांगलाच परिचित झाला होता.मी तो पूर्ण विंचरून काढला;जर त्या भागात तो कुठेही असता तरी मला सुगावा लागला असता कारण माझ्या मदतीला तिथले प्राणी-पक्षी होतेच ! जोडीदाराच्या शोधात अत्यंत अस्वस्थ अवस्थेत भटकत असतानाच ती तिथे आली असणार व नेमक्या माझ्या कॉलमुळे ती गंमत घडली असणार.आता तिला जोडीदार मिळाल्यावर ती त्याला तिच्या इलाक्यात नक्की घेऊन गेली असावी.पण लवकरच तो परत येणार होता आणि मधल्या काळात डाव्या तीरावरच्या माणसांनी खबरदारी घेतल्याने तो सावजाच्या शोधात अलकनंदा नदी ओलांडायचा प्रयत्न करणार याची खात्री असल्याने पुढच्या काही रात्री मी रुद्रप्रयागच्या ब्रिजवर पहारा देत घालवल्या.या ब्रिजकडे यायला तीन वाटा होत्या; त्यातली उत्तरेकडून येणारी वाट चौकीदाराच्या घराजवळूनच जायची.मी ब्रिजवर येताजाताना नेहमी या चौकीदाराचा कुत्रा धावत येऊन माझं स्वागत करत असे.चौथ्या रात्री मला बिबळ्या त्या कुत्र्याला मारतानाचा आवाज ऐकायला आला.हा कुत्रा क्वचितच भुंकत असे,पण त्या रात्री मात्र सतत पाच मिनिटं भुंकल्यानंतर अचानक आचका दिल्यासारखा थांबला.
त्यानंतर एकदा त्या चौकीदाराची हाक त्याच्या घरातून ऐकायला आली... नंतर मात्र सर्व काही शांत झालं.त्या ब्रिजच्या कमानीतून काटेरी झुडुपं काढली गेली होती व जरी मी ट्रीगरवर बोट ठेवून सावधपणे रात्रभर बसलो तरी तो काही ब्रिजवर आला नाही.
दुसऱ्या दिवशी त्याच्या पगमार्क् सवरून कळलं की कुत्र्याला मारल्यानंतर त्याला तसंच टाकून तो खरोखरच ब्रिजच्या टॉवरकडे निघाला होता.त्या दिशेला त्याने फक्त पाच पावलं जरी टाकली असती तरी तो माझ्यासमोर ब्रिजवर आला असता पण ती पाच पावलं काही त्याने टाकली नाहीत.उलट तो उजवीकडे वळला,
बाजाराकडे जाणाऱ्या पायवाटेवर काही अंतर जाऊन परत फिरला व उत्तरेला यात्रामार्गाकडे निघून गेला.या मार्गावर मैलभरानंतर मात्र त्याचे माग दिसेनासे झाले.
दुसऱ्या दिवशी मला खबर मिळाली की यात्रामार्गावर सात मैल पुढे एक गाय मारली गेली होती.तो कुत्रा मारला गेल्याच्या म्हणजे आदल्या रात्री बिबळ्याने तिथल्या जवळच्याच एका घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता व तिथून जवळच ही गाय मारल्याने ते नरभक्षकाचंच काम असावं असा तिथल्या माणसांना संशय होता.मला रस्त्यावरच माझ्यासाठी थांबलेली काही माणसं दिसली.रुद्रप्रयागहून आम्ही भर उन्हात चालत येणार हे माहिती असल्याने त्यांनी आमच्यासाठी गरमागरम चहा तयार ठेवला होता.एका आंब्याच्या झाडाखाली बसून चहा सिगरेट पित असताना त्यांनी मला सांगितलं की ती गाय त्यांना आदल्या रात्री अलकनंदा नदी आणि यात्रामार्ग याच्यामध्ये सापडली होती.गेल्या आठ वर्षात नरभक्षकाच्या तावडीतून त्यांची थोडक्यात सुटका झाल्याच्या काही घटनाही त्यांनी सांगितल्या.गप्पांच्या ओघात मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट कळली की घराचे दरवाजे फोडून आत घुसण्याची या बिबळ्याची सवय अगदी अलीकडची आहे;
म्हणजे गेल्या तीन वर्षातली.त्या आधी तो फक्त घराबाहेर असलेल्या किंवा दरवाजा लावून घ्यायला विसरलेल्या माणसांचीच शिकार करण्यात समाधान मानायचा.ते म्हणाले,आता तर हा सैतान इतका धीट झालाय की जर घराचा दरवाजा फोडता आला नाही तर तो चिखल मातीच्या भिंतीना भगदाड पाडून आत यायलाही कमी करत नाही.
ज्यांना आमच्या पहाडी लोकांचे अंतरंग माहीत नाहीत किंवा त्यांच्या अंतरंग भूताखेतांबद्दलच्या अंधश्रद्धा माहीत नाही त्यांना आश्चर्य वाटेल की शौर्यासाठी जगप्रसिद्ध असलेली आणि युद्धात सर्वात जास्त शौर्यपदकं मिळवलेली ही गढवाली माणसं एखाद्या बिबळ्याला दरवाजा फोडून किंवा भिंतीला भगदाड पाडून आपल्या घरात घुसू कशी देतात ? त्यात परत त्यांच्या प्रत्येक घरात कुऱ्हाडी,कुकरी आणि काही घरात तर बंदूकीसुद्धा असतात ! या आठ वर्षात माझ्या माहितीप्रमाणे नरभक्षकाशी लढण्याची हिंमत दाखवल्याची फक्त एक घटना घडली होती आणि ते धैर्य एका स्त्रीने दाखवलं होतं.ती घरात एकटी झोपली होती. पण दरवाजा बंद करायला विसरून गेली होती.इतर दरवाजाप्रमाणेच हा दरवाजादेखील आत उघडणारा होता.खोलीत शिरल्यावर बिबळ्याने तिचा डावा पाय पकडला आणि तो तिला ओढून नेत असताना तिच्या हाताला 'गंडेसा' (वैरण कापायचं हत्यार) लागला.या गंडेसाने त्या बाईने बिबळ्यावर जीव खाऊन वार केला. या वारामुळे बिबळ्याने पक्कड सोडली नाही पण माघार घेत दरवाजाबाहेर मात्र आला.त्याबरोबर ठरवून म्हणा किंवा योगायोगाने म्हणा पण त्या बाईने त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला.आता दरवाजाच्या आतल्या बाजूला ती व बाहेरच्या बाजूला बिबळ्या अशा परिस्थितीत बिबळ्याने त्याची सर्व ताकद लावली आणि तिचा पाय धडावेगळा झाला.त्यावेळेला मध्यप्रांताचे विधानसभा सदस्य श्री मुकंडीलाल त्या गावात निवडणूक दौऱ्यावर आले होते.त्यांनी दुसरा संपूर्ण दिवस व रात्र त्या खोलीत घालवली पण बिबळ्या तिथे परत आला नाही.त्याने जो अहवाल सादर केला त्यात असं लिहिलं होतं की त्या एका वर्षात बिबळ्याने ७५ माणसांचे बळी त्याच्या मतदारसंघात घेतले आहेत आणि शासनाने नरभक्षकाविरुद्ध जंगी मोहीम उघडावी !
जागा दाखवण्यासाठी एक गावकऱ्याला आणि आमच्या माधोसिंगला घेऊन मी भक्ष्याकडे निघालो. रस्त्यापासून पाव मैलांवर व नदीपासून शंभर यार्डावरच्या एका खोल घळीत ती गाय पडली होती. त्या घळीच्या एका बाजूला मोठमोठ्या शिळा होत्या व त्यांच्यामध्ये झुडुपं माजली होती. घळीच्या दुसऱ्या बाजूला काही छोटी झाडं वाढली होती पण त्यातलं एकही बसण्यासाठी सोयीचं नव्हतं. झाडांखाली पण भक्ष्यापासून तीस यार्डावर एक मोठी शिळा होती व तिच्या तळाशी छोटासा खळगा होता.त्यातच बसायचं मी ठरवलं.माधोसिंग व तो गावकरी दोघांनीही माझ्या तशा जमीनीवर बसण्याला जोरदार विरोध केला पण रुद्रप्रयागमध्ये आल्यापासनं एखाद्या जनावरांच्या भक्ष्यावर बसण्याची ही पहिलीच संधी मला मिळाली होती त्यामुळे व बिबळ्या त्याठिकाणी सूर्यास्ताच्या आसपास येण्याची दाट शक्यता असल्याने मी त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांना परत पाठवून दिलं.
माझी बैठक कोरडी व आरामशीर होती आणि पाठीला शिळा व समोर गुडघ्यापर्यंत येईल असं झुडुप असल्याने बिबळ्याला मी दिसू शकणार नव्हतो.त्यामुळे मला यावेळी चांगला मोका होता.
हालचाल न करता समोर नजर लावून मी संध्याकाळ होईपर्यंत बसून राह्यलो.अजिबात संशय न आल्याने बेसावधपणे बिबळ्या तिथे येण्याची वेळ जवळ आली होती.ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो जवळ येत होता व निसटत चालला होता.जवळपासच्या वस्तू अस्पष्ट दिसायला लागल्या होत्या.माझ्या अपेक्षेपेक्षा बिबळ्याला यायला उशीर होत होता पण मला त्याची फार काळजी वाटत नव्हती.कारण माझ्याकडे टॉर्च होता,माझ्यापासून माझं लक्ष्य फक्त तीस यार्डावर होतं व मला जखमी जनावराशी सामना करावा लागणार नाही अशी काळजी घेऊन मी शॉट घेणार होतो ! त्या खोल अंधाऱ्या घळीत संपूर्ण शांतता होती.मागच्या काही दिवसांच्या उन्हाळ्याने घळीच्या काठावरची पानं कडकडीत वाळली होती.आता अंधार पडल्याने स्वसंरक्षणासाठी डोळ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी कानांवर विसंबण्याची वेळ येणार होती.
टॉर्चच्या बटनवर अंगठा व ट्रीगरवर बोट ठेवून कोणताही आवाज न करता कोणत्याही दिशेला शूट करण्यासाठी मी तयार होतो.
अजूनही बिबळ्याचा पत्ता न आल्याने आता मी अस्वस्थ होऊ लागलो.कुठेतरी खडकांमध्ये लपून बसून माझ्या सर्व हालचाली तो बघत होता काय ? कारण बराच काळ त्याला माणसाचं मांस मिळालं नव्हतं ! मला तर दुसरं कोणतंच कारण दिसत नव्हतं.
आता अंधार दाटून आला होता आणि जर या घळीतून स्वतःच्या पायांनी बाहेर पडायचं असेल तर आज मला माझ्या कानांनी कधी नव्हे तेवढी साथ द्यायला पाहिजे होती.बराच वेळ - मला तर तो युगांसारखा वाटला - मी कानात जीव ओतून बसलो होतो.पण आता मात्र अंधार जरा जास्तच पडायला लागला असं वाटल्याने मी वर आभाळाकडे बघितलं तसं मला दिसलं की काळ्याकुट्ट ढगांची पलटणच्या पलटण एक एक चांदणी गिळत पुढे सरकते आहे.लगेचच पाण्याचे टपोरे थेंब पडू लागले आणि ज्या ठिकाणी काही वेळापूर्वी निरव शांतता होती त्या ठिकाणी चहूबाजूंनी आवाज येऊ लागले.आता बाजी पलटली होती,ज्या संधीची 'बिबळ्या' वाट पाहत होता ती आली होती ! घाईघाईने मी माझा कोट काढला आणि बाह्यांच्या साहाय्याने गळ्याला बांधला.
रायफलचा आता प्रत्यक्षात तसा काही उपयोग नव्हता पण बिबळ्याचं लक्ष्य विचलित करण्यासाठी मात्र तिचा वापर करता येणार होता.त्यामुळे रायफल डाव्या हातात घेऊन मी माझा खंजीर काढला आणि उजव्या हातात घट्ट पकडला.या खंजीराला 'आफ्रीदी स्टॅबिंग नाईफ' म्हटलं जायचं आणि मला आज आशा होती की या खंजीराने त्याच्या पहिल्या मालकाला जशी साथ दिली होती तशी तो मलाही देईल.वायव्य सरहद्दीवरच्या 'हंगू' इथल्या सरकारी दुकानातून तो खंजीर विकत घेताना तिथल्या डेप्युटी कमिशनरने त्याच्यावर लावलेल्या लेबलांकडे आणि हँडलवरच्या तीन खाचांकडे माझं लक्ष वेधलं होतं आणि तो खंजीर तीन खुनांमध्ये वापरला गेल्याचं सांगितलं होतं.
म्हणजे तसं हे भयानकच हत्यार होतं,पण याक्षणी मला त्याचा चांगलाच आधार वाटत होता.
बिबळ्यांला - म्हणजे सर्वसाधारण बिबळ्याला पावसाचा तिटकारा असतो व तो नेहमीच पावसापासून आडोसा शोधायचाच प्रयत्न करतो पण हा आपला बिबळ्या अपवादात्मक जनावर होतं त्यामुळे त्याच्या आवडी- निवडी काय असतील याचा अंदाज बांधणं शक्य नव्हतं.
निघताना माधोसिंगने विचारलं होतं की किती वेळ बसण्याचा माझा विचार आहे आणि मी म्हणालो होती की 'बिबळ्याला मारेपर्यंत'! त्यामुळे त्यांच्याकडनं आता तरी मला काहीच मदत मिळण्याची शक्यता नव्हती आणि मला तर याक्षणी मदतीची नितांत गरज होती.परत जावं का थांबावं हा गंभीर प्रश्न मला भेडसावत होता आणि प्रत्येक उत्तर हे पहिल्यापेक्षा निराशाजनक जास्त होतं.या क्षणापर्यंत बिबळ्याने मला पाहिलं नसेल तर आता हालचाल करून त्याचं लक्ष वेधून घेणं मूर्खपणाचं होतं.कारण असं करताना अवघड,निसरड्या वाटेवरून जाणे म्हणजे त्याच्या घशात जाण्यासारखं होतं.याउलट आहे तिथे थांबून अजून अंधाराचे सहा-सात तास काढणे व कोणत्याही क्षणी जीव वाचवण्यासाठी सवयीच्या नसलेल्या हत्यारावर अवलंबून राहणे यामुळे माझ्यावर जो ताण येणार होता तो घेण्याची माझी अजिबात क्षमता नव्हती. म्हणून मी उठलो व रायफल खांद्यावर टाकून निघालो.
मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन
मला काही फार लांब जायचं नव्हतं.फार तर पाचशे यार्ड पण त्यातली अर्धी वाट निसरडी झाली होती आणि अर्धी वाट अनवाणी पायांनी आणि गुरांच्या खुरांनी बुळबुळीत झालेल्या दगडधोंड्यांवरून जात होती. बिबळ्याचं लक्ष वेधून घेतलं जाऊ नये म्हणून टॉर्च पेटवायलाही मी घाबरत होतो.माझा एक हात रायफलवर व दुसरा हात चाकू पकडण्यात गुंतला असल्याने मी त्या वाटेवर हजार वेळा तरी घसरून धडपडलो असेन;सरतेशेवटी जेव्हा रस्त्यावर पोचलो तेव्हा मी बेंबीच्या देठापासून हाक मारली तसा दूरवर डोंगरावरच्या एका घराचा दरवाजा उघडला गेला आणि माधोसिंग व तो बरोबरचा माणूस कंदील घेऊन बाहेर पडले.मला येऊन मिळाल्यानंतर माधोसिंग म्हणाला की पाऊस सुरू होईपर्यंत त्याला फार काळजी वाटत नव्हती पण नंतर मात्र तो कंदील पेटवून दरवाजाला कान लावून बसला होता.दोघांचीही माझ्याबरोबर बंगल्यापर्यंत सोबत करायची इच्छा दिसली तेव्हा आम्ही हा सात मैलांचा रस्ता तुडवत निघालो.बाचिसिंग सर्वात पुढे,माधोसिंग कंदील घेऊन त्याच्या मागे व मी सर्वांत पाठीमागे.
दुसऱ्या दिवशी तिथे परत आल्यावर मला दिसलं की भक्ष्याला स्पर्शही केला गेला नव्हता पण रस्त्यावर बिबळ्याच्या पावलांचे ठसे होते.आम्ही रस्त्यावरून चालत गेलो ती वेळ व बिबळ्याने पाठलाग केला ती वेळ यामध्ये किती फरक होता ते मात्र मी सांगू शकत नाही.मला जेव्हा म्हणून त्या रात्रीची आठवण येते त्या वेळी आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो. मला आतापर्यंत हजारो वेळा भीती वाटलेली आहे,पण अचानक आलेला पाऊस आणि संरक्षणासाठी हाताशी तो 'खुनी खंजीर' असलेल्या अवस्थेतली ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही !