* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: चिरेबंदी वाडा - Chirebandi Palace

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१२/११/२४

चिरेबंदी वाडा - Chirebandi Palace

वाडा जवळ येऊ लागला तशी तिच्या मनात कालवाकालव वाढली.आई- बाबा कसे असतील ? भाऊ ओरडतील का? वहिन्या मोकळेपणानं बोलतील का ? त्यांची मुलं ओळखतील का,की परत अपमानास्पद वागणूक दिली जाईल ? आज सरकारदरबारी आपल्याला एवढा मान आहे;

पण घरात आपण ताठ मानेनं जाऊ शकतो का ? अशा एकापेक्षा एक प्रश्नांची सरबत्ती तिच्या मनाची अस्वस्थता आणखीनच वाढवत होती.


नजरेसमोर गावाचं बदलेलं रूप दिसू लागलं. बालपणीच्या मैत्रिणींची जुनी कौलारू घरं पाडून बंगले बांधले गेले होते.

कोवळ्या वयातील शेळपटलेले वर्गमित्र ढेरी सुटलेले,

ओबडधोबड आडदांड पुरुष झाले होते.गावात घुसणाऱ्या पांढऱ्याशुभ्र इनोव्हा गाडीकडं वळून वळून बघत होते.त्यांच्या बायका दारात बसून भांडी घासत घासत गाडीतनं कोण आलंय ते बघत होत्या. गावातली लहान पोरं गाडीच्या मागून धावत येत होती.आपल्यासारखीच असणारी माणसं अशी आपल्याकडं प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना बघितल्यागत का बघत आहेत,हे अविनाश आणि अंजलीला कळत नव्हतं.


गाडी वाड्यासमोर थांबली तशी पोरांनी गाडीला गराडा घातला.दबक्या पावलांनी सरला आणि आनंदराव गाडीतून खाली उतरले.अविनाशनं गाडीतून खाली पाय टाकताच तो थेट शेणात पडला.वासानं त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.त्यानं नाकाला हात लावून पाय झाडलेलं बघून जमलेली पोरं हसायला लागली.


"ओह नो शिट. काय आहे हे पप्पा..!" असं म्हणत त्यानं वडिलांकडं रागानं बघितलं.


"काही नाही रे,ज्या म्हशीचं आपण दूध पितो तिचं शेण आहे."


"शी.. किती घाण वास येतोय... हॉरिबल."


"घाण कसला,आम्ही लहानपणी हे हातानं गोळा करून याच्या गोवऱ्या थापत होतो."


बाप-लेकामधला संवाद गावकरी गमतीनं ऐकत होते.

अंजलीचा हात धरून सरला वाड्याकडं वळली.सुरकुत्या पडलेल्या म्हाताऱ्यासारखी वाड्याची पडझड झाली होती. वळचणीला कौलातून झुडुपं उगवली होती.कट्ट्यावर शेजारचं लुत भरलेलं कुत्रं बसलं होतं.जो वाडा आपण सोडून गेलो होतो ती काया आता राहिली नाही, याची सरलाला जाणीव झाली.


गावातील घरं पाडून बंगले बांधले गेले;पण वाडा तसाच होता.साडी सावरत सरला वाड्यात पाऊल टाकताना ठेचकळली.अंगणात म्हशी बांधल्या होत्या.सोप्यात भिंती बांधून खोल्या पाडल्या होत्या. माडीवरून खाली सुकत टाकलेली साडी लोंबकळत होती.खराट्यानं म्हशीचं शेण मागं सारणाऱ्या चिमुकल्या पोरीनं विचारलं,


"कोण पाहिजे?"


"तुझे बाबा..." सरलानं गालातल्या गालात हसत अंदाज बांधला की ही भाची असणार !


"ते रानात गेल्यात..."


"मग तुझी आजी कुठाय?"


कुठली आजी म्हणत तिनं चौकटीच्या वर टांगलेल्या हार घातलेल्या फोटोकडं बघत विचारलं आणि सरलाच्या डोळ्यांत टचकन् पाणी आलं.


तोंडाला पदर लाऊन तिनं हुंदका आवरला आणि मागं वळली.आनंदरावांनी पुढं येऊन तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून सावरलं आणि त्या पोरीला सांगितलं,


"तुझ्या आईला बोलव.."


"आये,कोण आलंय बघ." लेकीच्या आवाजानं सहावारी साडीतली एक गोरीगोमटी बाई कमरंला खोचलेला पदर सावरत आली आणि "या की आत. कोण पाहिजे?" असं म्हणाली.


तिच्या प्रश्नाचं उत्तर आनंदराव देणार तोवर माडीवरून वाकून बघणाऱ्या काकीनं हाक मारली, "आगं सरू तू... कवा आलीस.थांब मी आलेच..." असं म्हणत ती मध्यम वयाची माऊली जिन्यावरून खाली पळतच आली.तिच्या जोडव्यांच्या आवाजानं वाड्यात धांदल सुरू झाली.पळत येत तिनं थेट सरलाला मिठी मारली.


"अगं सूनबाई,ही तुझी थोरली सख्खी नणंद हाय, सरला." काकीनं सांगितलं.


"याआधी कवा बघितलं नाय ह्यासनी."


"लांब शेरात नोकरीला आसती.तुझ्या सासऱ्याला हाक मार.." असं म्हणत काकीनं सरलाचा हात धरून तिला आत नेलं.

फोटोवर खिळलेली सरलाची नजर आणि पाण्यानं डबडबलेलं डोळं बघून काकीच्या ध्यानात आलं.लगेच सरलाच्या खांद्यावर हात ठेवत तिनं सावरलं.


"लय उशीर केलास पोरी परत यायला.किती दिवस हाका मारत होती तुझी आय.राती-अपराती बडबडत तुला हाक मारत उठायची;पण ती हाक कुणालाच ऐकायला गेली नाय.शेवटी शेवटी तीनं बोलणं सोडून दिलं.या चिरेबंदी वाड्यात एक आवाज घुसमटून गेला.शेवटी कावळ्यानं निवद शिवला नाय.तरीबी तुला बोलवायची कुणाला हिम्मत झाली नाय बघ..." काकीचं बोल सरलाच्या काळजात घुसत होतं.

टांगलेला फोटो ओढून घेत छातीला कवटाळून धरला आणि सरलानं "आई..." म्हणून हंबरडा फोडला आणि मटकन ती उंबऱ्यावर बसली.आईला रडताना बघून मुलं भेदरली. 


अंजली तिच्या कुशीत शिरून मुसमुसायला लागली.

अविनाशला आनंदरावांनी जवळ घेतलं. काकी सरलाची समजूत घालू लागली.तिचा हुंदका शांत होईपर्यंत रानात गेलेल्या भावांना सांगावा पाठविला.थोरल्या भावजयीनं पाण्याचा तांब्या दिला.धाकटीनं चहाला आदण ठेवलं.

आनंदराव सोप्यात बसलं होतं.सरलाचं वडील अविनाशसोबत बोलत बसलं.चूळ भरून सरलानं चहाची बशी तोंडाला लावली,तोवर सकाळी घरात भांडण करून गेलेला थोरला भाऊ मागच्या दारानं आत आला.


"इतक्या वर्षांनी आज बरी आठवण झाली?" त्यानं खोचक प्रश्न विचारला तशी काकी खेकसली, "शिदुरी घेऊन तू कवा गेला हुतास तिला बोलवायला?"


"मुराळी पाठवायला तिनं कुणाला तोंड दावायला जागा ठेवलीया का?"


"येवढ्या वर्षांनी पोरगी घरात आलीय तर जरा गप बसतूस का?" काकी रागातच बोलली.


"आता ती पैसेवाली झालीया,आमास्नी गप बसायलाच पायजे."


"आरं ती तुमच्याकडं आलीच नाय.ती जिच्यासाठी आलीय तिची गाठभेट होऊच दिली नाय तुम्ही..." बाहेर सोप्यात बसलेले वडील बोलले.


"एवढी लाडकी हुती तर लावून द्याची हुती गाडी तिला आणायला..." भावानं उलट उत्तर दिलं.


"पर त्यावेळी तर तुमचा तोरा आडवा आला हुता."


"तो तोरा तर आजबी तसाच हाय."


"वाड्यावरची कौलं शेकरायला झेपत नाय;पण रुबाब दांडगा..." वडील


काही केल्या माघार घेत नव्हतं.


"आता तुमी भांडायचं बंद करताय का?पोरगी घरात हाय तवर तरी उसंत घ्या.नायतर रोज सकाळ-संध्याकाळ हायच सुरू.

दारू पिऊन बापाचा पाणउतारा करताना तुमचा घरंदाजपणा कुठं जातूया.दारूचं पैसं मागताना रामोश्याची पोरं तुमची गळपट्टी धरत्यात तवा घराणं आठवत नाय. बायकोला साडी नाय,पोरगी शेण काढतीया, पोराच्या नाकातली धार आटली नाय.ते रातदिस खोकतंय.त्येला दवापाणी करायला झेपत नाय;पण गावातल्या उंडग्या पोरांनी तुमास्नी चव्हाण सरकार म्हटलं की धाब्यावर जेवायला घेऊन जाताय आणि उधारीवर खातायसा,तवा कमीपणा वाटत नाय काय ?" काकीनं त्याला चांगलाच फैलावर घेतला.


सरला चहाची बशी बाजूला ठेवून उठत म्हणाली, "काकी मी येते आता." "ये पोरी. तुझं दुःख या घरंदाजांच्या गोधडीत मावणार नाय."


लेकीला थांब म्हणायचं धाडस वडील करू शकले नाहीत.


"वन्सं,आजच्या रात्री थांबा..." असं म्हणत भावजय पुढं येणार तोवर भावानं तिच्यावर डोळं वटारलं.


"आजोबा,तुम्ही चला आमच्यासोबत,"असं अविनाश म्हणाला.त्याला जवळ घेऊन कुरवाळत वडील म्हणालं, "नाही पोरा.आता आमची राख याच मातीत मिसळायची.

तुझी आजी वाट बघतीया. आता म्या ज्यास्त दिस कड काढू शकत नाय.जाया पायजे.तुम्ही सुखात हवा..." वडिलांच्या बोलण्यानं सरलाचं काळीज तुटलं.झटकन् ती वाड्यातनं बाहेर पडली.गाडी गावाबाहेर पडताना उडणारं धुरळ्याचं लोट बघणं सरलाला असह्य झालं.तिनं डोळं मिटून घेत अश्रूना वाट मोकळी करून दिली.