अल्वरेंगा मात्र अजून हिंमत हरलेला नसतो. लवकरच एखादं बचाव दल आपली सुटका करेल किंवा एखादं मोठं जहाज आपल्याला पाहील.मागील लेखापासून पुढे…
अशी त्याला आशा असते.अखेर आठवड्याभराने वादळ शांत होतं.त्यानंतर दोन टोकांच्या भावना अल्वरेंगा आणि कोर्डोबाला व्यापून असतात. एकीकडे वादळापासून सुटका झाल्याचा आनंद आणि दुसरीकडे अथांग समुद्रात एकटेच अडकून पडल्याची भीती.आता जे समोर येईल त्याला धीराने तोंड देणं एवढंच हातात असतं.जवळून एखादं मोठं जहाज गेलं तर त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी काय करायचं याचा अल्वरेंगा विचार करून ठेवतो.दिवसभरात एखादं तरी जहाज जवळून जाईल अशी त्याला खात्री असते.दोन दिवस वाट पाहिल्यावर आणि अनेकदा चुकीचे इशारे मिळून निराशा झाल्यावर अखेर लांबवर एक जहाज त्यांच्या नजरेच्या टप्प्यात येतं,पण दुर्दैवाने ते बोटीच्या दिशेने येत नसतं.
कितीही प्रयत्न करूनही त्या जहाजावरच्या लोकांचं लक्ष वेधून घेणं या दोघांना शक्य होत नाही.पहिल्यांदाच अल्वरेंगाच्या पोटात भीतीने गोळा येतो.आता पुढे काय ? जीपीएस-रेडिओ-मोटार आणि खाण्या-पिण्याचा साठा यातलं काहीच साथीला नसताना समुद्राच्या मध्यात भिरकावलं जाण्याचा अर्थ काय हे त्याला चांगलं माहिती असतं.बोट उलटी होण्याचा अवकाश,शार्क्सच्या झुंडी एका क्षणात आपला चट्टामट्टा करून टाकतील याची त्याला खात्री असते.आणि बोटीत असूनही उपयोग काय ?
वादळ थांबल्यावर दुसरे धोके समोर उभे ठाकतात. उन्हाचा जबर तडाखा या दोघांना भाजून काढायला सुरुवात करतो.त्यापासून वाचण्यासाठी शक्य तितका वेळ आइसबॉक्समध्ये घालवायचा असं हे दोघं ठरवतात.पाण्याने वेढलेल्या बोटीमध्ये पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही शिल्लक नसतो. दोघांच्याही घशाला शोष पडलेला असतो.आवंढा गिळणंही अशक्य झालेलं असतं.पण तरीही अल्वरेंगा कोर्डोबाची समजूत काढतो,की थोडा धीर धर.लवकरच पाऊस पडेल आणि आपली तहान भागेल.तोपर्यंत अल्वरेंगा मासे पकडण्याच्या प्रयत्नाला लागतो.समुद्रात टाकून द्याव्या लागलेल्या प्रचंड मासळीच्या विचाराने त्याचा जीव हळहळतो. खायला मिळालं नाही तर शरीर चरबी जाळायला सुरुवात करतं आणि तग धरून राहतं असा अल्वरेंगाचा आजवरचा अनुभव असतो,पण त्यासाठी शरीराला पुरेसं पाणी मिळण्याची गरज असते.पाऊस त्यांना सतत हुलकावणी देत असतो. अनेकदा आकाशात ढग जमा होतात,अंधारून येतं; पण पाऊस पडत नाही.तहान-भूक दोघांनाही असह्य होते.कोर्डोबा निपचित पडून राहतो,तर अल्वरेंगा स्वतःची नखं कुरतडत नखाचा कणन् कण पोटात ढकलतो.एकदा नखं कुरतडताना त्याच्या मनात येतं,
स्वतःचंच बोट कापून खाल्लं तर? नाही तरी करंगळीचा उपयोग काय असतो ? भुकेने त्याच्या मनाचा ताबा घेतलेला असतो;पण सुदैवाने वेळीच तो भानावर येतो.करंगळी कापून पोट तर भरणार नाहीच,उलट रक्तस्रावाने आपण मरून जाऊ,हे त्याच्या लक्षात येतं.पण हा विचार डोक्यात आल्यामुळे त्याला पुढच्या धोक्यांची जाणीव होते.आपलं मन स्थिर ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे हे त्याला जाणवतं.
अल्वरेंगा हातावर हात धरून बसून राहणारा माणूस नसतो.थोड्याच वेळात त्याला मासे पकडण्याची एक युक्ती सापडते.बोटीच्या जवळून सतत शार्क फिरत असतात.
त्यामुळे समुद्रात उतरणं तर लांबच, हातही जास्त काळ समुद्रात ठेवणं शक्य नसतं.पण अल्वरेंगा बोटीला चिकटून बोटीचं एखादं उपकरण असल्यासारखाच हात स्थिर ठेवून थांबून राहतो. त्याच्या हाताला घासून मासे पोहत असतात. आपल्या मुठीच्या टप्प्यात आले की मूठ बंद करायची आणि मासे पकडायचे,अशी पद्धत तो शोधून काढतो.मासे मिळू लागतात.जवळ आग पेटवायला काहीही साधन नसल्यामुळे दोघंही कच्चे मासे खाऊ लागतात.अजूनही पावसाचा पत्ता नसतो.त्यामुळे शेवटी अल्वरेंगा स्वतःची लघवी प्यायला सुरुवात करतो.कोर्डोबालाही तो त्यासाठी राजी करतो.
हळूहळू दोघांचं एक रूटिन बसतं. सकाळी लवकर मासे पकडायचे,दिवसभर उन्हापासून वाचण्यासाठी आइसबॉक्समध्ये बसून राहायचं आणि संध्याकाळी पुन्हा बॉक्सबाहेर पडून मासे पकडायचे.बोटीच्या आसपास अनेकदा कचरा टाकलेली प्लास्टिकची पुडकीही वाहत येत असतात.कधी कधी त्यात खाण्याचे उरलेसुरले पदार्थ असतात,तर कधी सॉफ्टड्रिंकच्या संपलेल्या बाटल्या.अशा बाटल्यांमध्ये उरलेला सॉफ्टड्रिंकचा एखादा थेंब जिभेवर टाकणं हेही दोघांसाठी स्वर्गसुख ठरतं.दहा दिवस उलटून जातात तरीही पाऊस येत नाही.पाण्याच्या कमतरतेमुळे दोघंही कासावीस झालेले असतात.
डीहायड्रेशनचे भलभलते परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ लागतात.श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. घशाला जखमा होतात.अल्वरेंगाला त्यावर एक उपाय सापडतो.समुद्राच्या या भागात प्रचंड कासवं असतात.मध्य अमेरिकेत सगळीकडे कासवाचं मांस आवडीने खाल्लं जातं.पण,अल्वरेंगा विचार करतो, की कासवाचं रक्त पिऊन तहान भागवली तर ? थोडा वेळ प्रयत्न केल्यावर एक कासव त्याच्या हाताला लागतं.
त्याच्या मासांचे तुकडे वाळवत टाकून अल्वरेंगा खरोखरच त्याचं रक्त पितो. कोर्डोबाला ते दृश्य बघूनही चांगलाच धक्का बसतो. रक्त पिणं म्हणजे पाप,असं त्याला वाटत असतं.
अल्वरेंगाने परिस्थितीचं गांभीर्य समजावूनही तो काही केल्या रक्त प्यायला तयार होत नाही. अल्वरेंगाच्या आग्रहावरून तो कसाबसा मांस खाऊ लागतो,पण पाणी न प्यायल्यामुळे त्याची तब्येत खालावत जाते ती जातेच.
.. आणि अखेर पंधरा दिवसांनी अचानक पाऊस कोसळतो.दोघंही आनंदाने नाचू लागतात. बोटीवरच्या सगळ्या बाटल्या कॅन-भांडी ते पाण्याने भरून ठेवतात.
पावसाचं पाणी थेट तोंडात घेऊन मनसोक्त तहान भागवल्यावर मात्र अल्वरेंगा एक नियम तयार करतो-पाऊस थांबल्यावर दिवसातून फक्त तीन कप पाणी प्यायचं.पाऊस पुन्हा कधी पडेल याची शाश्वती नसल्यामुळे काटसकर करणं आवश्यक असतं.एक महिना उलटायला येतो. समुद्रावर एकट्याने काढलेला एवढा काळ कोणत्याही माणसाला वेड लावायला पुरेसा असतो. कोर्डोबालाही सतत नैराश्याचे झटके येत असतात. कधी तो घरच्या आठवणींनी व्याकूळ होत असतो, तर कधी ही असहाय अवस्था सहन न होऊन बोटीतून उडी मारण्याची इच्छा त्याच्यात उचंबळून येत असते.आपल्या तरुण सोबत्याची मनःस्थिती सांभाळणं हेही अल्वरेंगासाठी एक मुख्य काम होऊन बसतं.त्यासाठी तो अनेक क्लृप्त्या शोधून काढतो.कधी कधी कोर्डोबा पडल्या पडल्या ओरडतो,"मला संत्री खावीशी वाटताहेत." अल्वरेंगा म्हणतो,"मी दुकानात चाललोच आहे. येताना घेऊन येतो.
"तेव्हापासून दुकानातल्या अशा फेऱ्या रोजच्याच होऊन जातात.त्यांच्या काल्पनिक विश्वात हळूहळू दुकानंच नव्हे,तर इतरही अनेक गोष्टी दाखल होतात.प्रत्यक्ष आयुष्यात त्यांच्याकडे जे नसतं ते या जगात अवतरतं.लवकरच अल्वरेंगाच्या लक्षात येतं,की कोर्डोबाच्याच नव्हे,तर आपल्याही मानसिक स्वास्थ्यासाठी ते गरजेचं आहे.अर्थात काल्पनिक जगात वावरताना अल्वरेंगाला वास्तवाचा विसर पडत नाही. आपल्याकडे भरपूर खाणं असायला पाहिजे,या इच्छेने तो झपाटलेला असतो.त्यातूनच त्याला आणखी एका खाद्याचा शोध लागतो.त्यांच्या बोटीवरून अनेक पक्षी उडत असतात.बोटीवरचं उघडं पाणी या पक्ष्यांच्या विष्ठेने खराब होऊ नये म्हणून त्यांना हाकलत राहणं हे अल्वरेंगाचं एक कामच असतं.पण,एकदा एक पक्षी बोटीच्या काठावर येऊन बसतो तेव्हा त्याला सुचतं,की या पक्ष्यांना पकडण्याचा प्रयत्न का करू नये? बरेच टक्केटोणपे खाल्ल्यावर अखेर एक पक्षी अल्वरेंगाच्या हाताला लागतो.लवकरच तो पक्षी पकडण्यातच नव्हे,तर आइसबॉक्समध्ये बसल्या बसल्या केवळ आवाजावरून पक्षी कोणता आहे, तो केवढा आहे हे ओळखण्यात तो तरबेज होऊन जातो.दिवस उलटत असतात.बोटीवर ना घड्याळ असतं ना फोन,नेमके किती दिवस उलटले हे अल्वरेंगा चंद्राच्या कलेवरून मोजत असतो.त्या दिवशी त्याच्या हिशोबानुसार ख्रिसमसच्या आदली संध्याकाळ असते.त्यानिमित्त दोघंही एक वेगळा पक्षी मारून खास जेवण करत असतात.पण जेवता जेवता अचानक कोडोंबा कळवळतो.त्याच्या पोटातून कळ येते.
तोंडातून फेस यायला लागतो. पोट बिघडतं.ते कोडोंबा खात असलेल्या पक्ष्याची आतडी तपासतात,तर त्यात त्यांना एक साप सापडतो.कोर्डोबा मनाने घेतो, की 'सापाचं विष माझ्या शरीरात पसरायला सुरुवात झाली असणार. आता मी मरणार.'अल्वरेंगाही थोडा घाबरतोच; पण नशिबाने तसं काही घडत नाही.दोन दिवस उलट्या-जुलाब झाल्यावर कोडोंबाच्या तब्येतीला आराम पडतो,पण त्यानंतर पक्ष्यांचं मांस खायचं कोर्डोबा साफ नाकारतो.दीड महिना उलटतो.पुन्हा एकदा त्यांची बोट एका छोट्या वादळात सापडते, पण वादळासोबतच पाऊसही आल्याने दोघांना तक्रार करायला जागा नसते.बोटीवरचा कमी झालेला पाणीसाठा पुन्हा भरून निघतो.पाणी प्यायल्यामुळे डीहायड्रेशन कमी झालं की त्या दोघांचं बोलणंही वाढत असतं.या गप्पांमध्ये जशा काल्पनिक विश्वातल्या सफरी असतात तशाच गतायुष्यातल्या चुकांची उपरतीही असते.गेली सात-आठ वर्षं घरापासून लांब असलेल्या अल्वरेंगाच्या मनात आई-वडिलांना अंतर दिल्याचा, मुलीला सोडून आल्याचा अपराध भाव असतो. एरवी देवाबिवाला फारसा न मानणारा अल्वरेंगा कोर्डोबामुळे किमान प्रार्थना म्हणताना डोळे मिटू लागलेला असतो;पण तरीही कोर्डोबाचा मुख्य भर जसा प्रार्थनेवर असतो, तसा अल्वरेंगाचा भर स्वतःच्या सकारात्मकतेवर आणि यातून बाहेर पडण्याचे किंवा आहे तो काळ अधिक सुकर करण्याचे उपाय शोधण्यावर असतो.जशी परिस्थिती बदलेल तसा तो त्यात स्वतःला जुळवून घेत असतो.कोर्डोबा मात्र पुढे पुढे खचतच जातो.पक्षी खाणं त्याने सोडलेलंच असतं,पण हळूहळू मासे खाणंही तो कमी करून टाकतो.एके दिवशी अचानक तो अल्वरेंगाला विचारतो,"मी मेल्यावर तू मला खाशील का?"अल्वरेंगा त्याची चेष्टा करतो, "तुझ्या अंगात आता मांस कुठे राहिलंय ? तुला खाऊन मला काय मिळणार?" अल्वरेंगा त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो,की खात राहिलास तर तू मरणार नाहीस;पण त्याला ते पटत नाही.एकदा कोडोंबाच्या मनात येतं,
राहिलेला भाग शेवटच्या तिसऱ्या भागामध्ये..