* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: समुद्राच्या लाटांवर एक वर्ष / A year on the waves of the sea

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१५/१२/२५

समुद्राच्या लाटांवर एक वर्ष / A year on the waves of the sea

जोनाथन फ्रैंकलिन या मध्य आणि दक्षिण अमेरिकेचा अभ्यास करणाऱ्या पत्रकाराने जोस सॅल्वडोर अल्वरेंगासोबत वर्षभर मुक्काम करून 'फोरथर्टीएट डेज' हे पुस्तक लिहिलं.सुरुवातीला जोनाथनचाही अल्वरेंगाच्या हकीगतीवर विश्वास बसत नव्हता;पण सर्व शक्यता तपासून पाहिल्यावर अल्वरेंगाने सांगितलेली प्रत्येक गोष्टी खरी आहे,असं त्याच्या लक्षात आलं आणि त्यातून एक उत्तम पुस्तक उभं राहिलं.


अल्वरेंगा त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो,की खात राहिलास तर तू मरणार नाहीस;पण त्याला ते पटत नाही.एकदा कोडोंबाच्या मनात येतं,मागील लेखावरून पुढे…हा आपला शेवटचा प्रवास भाग तिसरा व शेवटचा…


असं मरणाची वाट बघत राहण्यापेक्षा सरळ शार्कच्या झुंडीसमोर उडी मारलेली काय वाईट ! एकदा अल्वरेंगाचं लक्ष नाही हे बघून तो उडी मारायचा प्रयत्नही करतो;पण तेवढ्यात अल्वरेंगा त्याला सावरतो. पुढे काही दिवस कोडोंबा खाण्यासाठीही जागचा उठत नाही.अल्वरेंगाच त्याला खायला घालतो,पाणी पाजतो; पण त्याची जगण्याची इच्छा आणि टिकून राहण्याची ताकद कमी कमी होत चालल्याचं अल्वरेंगालाही जाणवू लागलेलं असतं.बोट भरकटून तीन महिने उलटून गेलेले असतात.एके दिवशी कोर्डोबा नेहमीपेक्षा जास्तच थकलेला वाटतो.बहुतेक त्याला आतून मरणाची चाहूल लागलेली असते.आता मी फार काळ जगत नाही,असं तो सतत पुटपुटत राहतो.अखेर अल्वरेंगाचाही धीर सुटतो.तो कोर्डोबावर ओरडतो,"तू मरू शकत नाहीस. तुला जगायला पाहिजेस.तू मेलास तर मी एकटा काय करू इथे?" पण हा उद्रेक ऐकायलाही कोर्डोबा जिवंत नसतो.त्याचे प्राण गेलेले असतात.


अल्वरेंगा धाय मोकलून रडतो.इतके दिवस दोघांच्या टीमचं नेतृत्व अल्वरेंगाकडे असलं तरी कोर्डोबाची त्याला सोबत असते.शिवाय,

आपल्यापेक्षा लहान आणि आपल्या जबाबदारीवर आलेला मुलगा म्हणून त्याची काळजी घेण्याचंही काम अल्वरेंगा पार पाडत असतो. आता अचानक ते काम संपून जातं.वर आकाश आणि खाली समुद्र यामध्ये आता अल्वरेंगा पूर्ण एकटा पडतो. आपल्या मृत सोबत्याचं शरीर समुद्रात फेकून देण्याचं धाडसही त्याला होत नाही.हा धक्का सहन करण्याचा सोपा मार्ग त्याला सापडतो,तो म्हणजे असं घडलंच नाही असं मानणं ! कोर्डोबा मेलाच नाहीये असं मानून तो त्याच्याकडे बघत बोलत राहतो.स्वतःच कोर्डोबाच्या वतीने उत्तरंही देतो.एक आठवडा उलटतो.कोर्डोबाचं शरीर तसंच पडून असतं.एके रात्री ताऱ्यांकडे पाहत अल्वरेंगा कोर्डोबाच्या शेजारी पहुडलेला असतो. त्याच्याशी बोलत असतो.अचानक झोपेतून जाग आल्याप्रमाणे त्याला जाणवतं की आपण एका मृतदेहाशी बोलतो आहोत.आपलं मानसिक संतुलन बिघडलं तर नाही ना अशी शंका त्याला येऊ लागते. शेवटी धीर गोळा करून तो कोर्डोबाचा मृतदेह पाण्यात ढकलतो.चार महिने उलटतात.

अल्वरेंगा जिवंत असतो, पण एकटेपणाचा धक्का त्याला अजून पचवता आलेला नसतो.कोर्डोबाच्या आठवणीने त्याला अनेकदा रडू फुटतं.आपण जगलो-वाचलोच तर कोर्डोबाच्या आईला कसं तोंड दाखवणार याची चिंताही त्याला सतत खात असते.आपला नेहमीचा उत्साह,खंबीरपणा,जिवावरच्या संकटातही जागी असणारी विनोदबुद्धी आपल्याला सोडून चालली की काय अशी शंका त्याला येऊ लागते.


पण तसं होत नाही.अल्वरेंगा लवकरच याही दुःखातून बाहेर पडतो,एकटेपणाला सरावतो;एवढंच नव्हे,तर त्याचा आनंदही घ्यायला लागतो.एकटं असण्याचे काही फायदे असल्याचंही त्याच्या लक्षात येऊ लागतं.मिळणाऱ्या अन्नपाण्याचे दोन भाग करण्याची आता गरज नसते.शिवाय कोर्डोबाला समजावत राहण्यात जी शक्ती खर्च होत असते तीही आता वाचते. त्या बोटीवर त्याचं त्याचं असं एक जग तयार होतं.


या प्रवासात समुद्रातलं एक वेगळंच जग त्याच्यासमोर उलगडत असतं.पट्टीचा मच्छीमार असूनही त्याला आजवर ते कधीही बघायला मिळालेलं नसतं.


आकाशातले ग्रह-तारे त्याला नव्याने दिसू लागतात. चंद्राच्या कलांसोबत त्याचं जगणं जोडलं जातं.कधी एखादा महाकाय देवमासा त्याला दिसतो,तर कधी एखादा अनोखा पक्षी.शार्कची फौज तर कायमच त्याच्या बोटीच्या चहुबाजूंनी घोंघावत असते.

एकदा त्याला बोटीपासून पंचवीस फुटांवर एक मोठ्या माशासारखा आकार वाहून जाताना दिसतो.त्याला लगडलेले मासे आणि वरून उडणारे पक्षी यामुळे तो मेलेला मासा असावा असं त्याला वाटतं.त्याची उत्सुकता एवढी वाढते की मागचा-पुढचा विचार न करता तो समुद्रात उडी टाकतो.पोहायला लागल्यावर त्याच्या लक्षात येतं,की आपल्या शरीरात समुद्रामध्ये पोहण्याची ताकद उरलेली नाही आणि स्नायूंना व्यायामही राहिलेला नाही.तो कसाबसा पोहत त्या गोष्टीपर्यंत जातो.जवळ गेल्यावर लक्षात येतं की तो मासा वगैरे नसून थर्माकोलचा मोठा तुकडा आहे.त्या तुकड्याचा उपयोग होईल,असा विचार करून तो तुकडा घेऊन परत बोटीकडे जायला निघतो,पण आपण बोटीपर्यंत पोहोचू की नाही याची त्याला खात्री वाटेनाशी होते.आपण अशी अविचारी उडी कशी काय घेतली याचं त्याला आश्चर्य वाटतं.वाटेत शार्कनी हल्ला केला तर काय,याचाही विचार त्याने उडी मारताना केलेला नसतो. अखेरीस कसाबसा तो बोटीत येऊन चढतो आणि सुटकेचा निःश्वास टाकतो.पाच महिने उलटून गेल्यावर पहिल्यांदा सुटकेची खरीखुरी आशा तयार होते. अल्वरेंगा आइसबॉक्समध्ये झोपलेला असताना त्याला मोठमोठ्यांदा संगीत वाजत असल्याचा आवाज ऐकू येतो.उठून बघतो तर एक भली मोठी क्रूझ शेजारून चाललेली असते.अल्वरेंगा खच्चून ओरडतो,दिसेल ती वस्तू बोटीवर आपटून आवाज करतो,वस्तू फेकून मारतो;पण कशाचाच उपयोग होत नाही.ते प्रचंड धूड अल्वरेंगाची दखलही न घेता तिथून निघून जातं.अल्वरेंगा त्याकडे अविश्वासाने बघतच राहतो.एखादी बोट जवळ आली की आपली सुटका नक्की,असं अल्वरेंगाला आतापर्यंत वाटत असतं,तो भ्रम आता दूर होतो.बोट जवळ आली तरी तिला आपण दिसूच असं नाही,हा नवाच हृदयात धडकी भरवणारा शोध त्याला लागतो.त्याची उरलीसुरली आशाही संपून जाते.आता किनाऱ्याला लागलो तरच आपण वाचणार,हे अल्वरेंगाला कळून चुकतं.थोडक्यात,याचा अर्थ असा की,आता बचावण्याची शक्यता फारच कमी आहे! आपण समुद्रात नेमके कुठे आहोत,इथून सगळ्यात जवळचा किनारा कुठे आहे, आपण त्याच दिशेने चाललो आहोत की नाही,कशाचाच त्याला पत्ता नसतो. अचानक त्याला जाणवतं की आपण मरणाचे दमलेलो आहोत.आपल्या मनातली ऊर्जाही संपत चालली आहे. किती तरी काळ तो निराशेच्या गर्तेत पडून राहतो.त्या खोल अंधारातून त्याला बाहेर काढते ती त्याची मुलगी. आता १३ वर्षांची झालेली त्याची मुलगी सतत त्याच्या डोळ्यांसमोर येत असते.आपण तिला सोडून पळून गेल्याबद्दल तिची माफी मागण्यासाठी तरी आपण जगलंच पाहिजे,असं तो स्वतःला सांगत राहतो.


सहा महिने उलटतात.तीच बोट,तेच रूटिन,तोच एकटा प्रवासी.अल्वरेंगाला आता केबिन फिवरचा त्रास होऊ लागलेला असतो बोटीवर अडकून पडल्यामुळे होणारा क्लॅस्ट्रोफोबिया.त्यावरही अल्वरेंगा उपाय शोधून काढतो.


आपल्या आसपासच्या समुद्राची त्याला आता नीट ओळख झालेली असते.शार्क कधी येतात,कधी लांब असतात हे त्याला कळू लागलेलं असतं.शार्क आसपास नाहीत असं पाहून थोड्या थोड्या दिवसांनी तो समुद्रात उतरायला सुरुवात करतो.त्या दोन-पाच मिनिटांच्या पोहण्यामुळे त्याला जो काही आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. सुटकेची इच्छा कितीही तीव्र असली तरी या एकान्तातल्या आयुष्याचीही वेगळी मजा आहे असं अल्वरेंगाला जाणवतं.  आसपास कोणीही माणसं नाहीत,त्यामुळे नातेसंबंधांची कटकट नाही,चुका नाहीत की आपल्या हातून काही पाप घडेल याची भीती नाही.फक्त आपण आणि आपण..एकदा अल्वरेंगा आइसबॉक्समध्ये झोपला असताना अचानक त्याच्या बोटीला धक्के बसू लागतात.त्याचं मन उसळी खातं.बोट किनाऱ्याला लागली की काय ?पण उठून पाहतो तर एक देवमासा त्याच्या बोटीला खेटून चाललेला असतो.नेहमीच्या माशांपेक्षा तो किती तरी मोठा असला तरी ते एक पिल्लू असतं.हे धूड आपली बोट उलटवणार तर नाही ना अशी त्याला शंका येते. पण तो मासा फक्त बोटीच्या आसपास फिरत राहतो.


तो अल्वरेंगाला त्रासही देत नाही आणि तिथून निघूनही जात नाही.दिवसरात्र तो त्याच्या बोटीसोबतच पोहू लागतो.थोड्या दिवसांतच अल्वरेंगाला त्याची सोबत आवडू लागते.तो त्या व्हेलच्या बच्च्याशी गप्पा मारू लागतो.मनात साचलेल्या गोष्टी त्याला सांगू लागतो. जमिनीवरचे-समुद्रावरचे स्वतःचे अनुभव ऐकवू लागतो. त्याच्यामुळे अल्वरेंगाचं एकटेपणाचं दुःख किती तरी कमी होतं.अशी सोबत असेल तर आपण कितीही दिवस समुद्रात काढू शकतो असं अल्वरेंगाला वाटतं. पण हा पाहुणा एक दिवस आला तसा निघून जातो आणि अल्वरेंगा पुन्हा एकटा पडतो.

कुणाशी तरी बोलायला हवं,या ऊर्मीतून तो खाण्यासाठी पकडलेल्या एका पक्ष्याशीच गप्पा मारू लागतो.त्याला न मारता त्याला पाळीव पक्षी बनवतो.


एक वर्ष उलटतं.अल्वरेंगा अजूनही जिवंत असतो. समुद्रातल्या या पर्यावरणात रोज होणारे बदल बघत राहणं हेच आता आपलं कायमचं आयुष्य आहे की काय,असं त्याला वाटू लागलेलं असतं.काही दिवसांनी अचानक समुद्रातले मासे कमी होऊ लागतात,पक्षी कमी होतात.त्याच्याकडचा अन्नसाठा झपाट्याने संपत जातो. त्याने खाण्यासाठी मारून ठेवलेले सगळे पक्षी संपतात, तेव्हा तो नाइलाजाने आपल्या पाळीव पक्ष्याला, पांचोला मारून खाण्याची वेळ त्याच्यावर येते.थोड्या दिवसांनी पिण्याचं पाणीही संपतं.काही दिवस पुन्हा एकदा उपासमार सहन करण्याची वेळ अल्वरेंगावर येते. पण तेही दिवस कसेबसे जातात.त्यातही अल्वरेंगा तग धरून राहतो.पुन्हा पाऊस पडतो.पुन्हा मासे दिसू लागतात.आधीपेक्षा मोठ्या आकाराचे पक्षी अल्वरेंगाच्या बोटीवर येऊन विसावतात.हा बदल म्हणजे जमीन जवळ आल्याची खूण की समुद्रात आणखी आत शिरल्याची ? अल्वरेंगाला ते कळण्याचा काही मार्गच नसतो.एके दिवशी अल्वरेंगाला एक जहाज आपल्याच दिशेने येताना दिसतं.एवढंच नव्हे,तर डेकवरची माणसं आपल्याकडेच बघत असल्याचंही त्याच्या लक्षात येतं. 


तो आनंदाने वेडापिसा होतो.आता आपली सुटका होणारच,आता काही अडथळा येऊ शकत नाही,असं म्हणत तो त्या माणसांच्या दिशेने हात करतो.ती माणसंही त्याला हात करतात.आता कोणत्याही क्षणी जीवरक्षक बोटी पाण्यात उतरतील,या आशेने अल्वरेंगा वाट बघत असतो;पण घडतं भलतंच.ती माणसं तशीच 'अच्छा' करत असताना बोट त्याच्यापासून दूर निघून जाते.बहुतेक अल्वरेंगा मासेमारीसाठी समुद्रात आला असावा असं त्यांना वाटत असावं.अल्वरेंगाला ही निराशा सहन करणं अशक्य होतं.इतके दिवस आपण काय काय म्हणून सहन केलं नाही! दरवेळी निराशा गिळून आपण पुढच्या संधीची वाट पाहत राहिलो. आणि आता संधी इतक्या जवळ येऊनही आपल्याला हुलकावणी का देते आहे हे त्याला कळत नाही.या घटनेने अचानक अल्वरेंगाचा जगण्यातला रस संपून जातो.खाण-पिणं सोडून तो नुसता पडून राहू लागतो. आपण कोर्डोबाला जसं हळूहळू संपत जाताना पाहिलं तसंच स्वतःलाही पाहण्याची वेळ आपल्यावर येणार असं त्याला वाटू लागतं.प्रत्येकाच्या मरणाची सुरुवात वेगळी अनोखी असणार असं अल्वरेंगाला वाटत असतं.स्वतःच्या मरणाबद्दल त्याला उत्सुकताही असते.कोर्डोबाच्या मरणाची सुरुवात त्याच्या पोटापासून झालेली असते


अल्वरेंगाला जाणवतं,आपले गुडघ्यापासून खालचे पाय बधिर होत चालले आहेत.वरून पाऊस कोसळत असतानाही उठून आडोशाला बसण्याची इच्छाही अल्वरेंगाला होत नाही.पक्षी बोटीवर त्याच्या शेजारी येऊन बसतात,तरीही तो त्यांना पकडायला जात नाही की त्याच्या अंगावर बसून त्याला चोची मारणाऱ्या पक्ष्यांना हाकलत नाही.आपण एक मृतदेहच आहोत असं त्याला वाटू लागतं.पण आता त्याला जाणवतं की आपण मृत्यूसाठी तयार आहोत.या समुद्रात एक वर्ष आपण टिकून राहिलो हेही कमी नाही.आपलं हे कर्तृत्व कुणाला कळलं नाही तरी बेहत्तर,पण त्यामुळे आपण स्वतःवर जाम खूष आहोत.आता कधीही मेलो तरी सुखाने मरू,असं म्हणत तो जीवनेच्छा सोडून देतो..


.. पण नशिबात काही वेगळंच लिहिलेलं असतं.एके संध्याकाळी त्याला जागा येते तर दूरवर प्रकाशच प्रकाश दिसतो.ते जहाज नक्कीच नसतं.एवढे दिवे म्हणजे हे नक्कीच एखादं गाव असणार.हा भास नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी तो पुन्हा काही वेळाने त्या दिशेला पाहतो.अजूनही दिवे चकाकतच असतात.तो किनारा असतो हे नक्की.पण बोट किनाऱ्यापर्यंत नेणार कशी ? आता नशीबच आपली बोट तिकडे नेऊ शकतं.. त्यामुळे त्याचा विचार न करता अल्वरेंगा पडून राहतो. आणखी काही दिवस जातात.एके सकाळी अल्वरेंगा डोकं वर काढतो,तर समोर नारळाच्या झाडांनी व्यापलेलं बेट असतं.अल्वरेंगाच्या छातीचे ठोके वाढू लागतात. नदी असती तर वडी मारून पोहत जाता आला असत इतका किनारा जवळ असतो;पण अल्वरेंगाकडे तेवढी शक्ती नसते आणि शार्कच्या हल्ल्याची भीतीही. पण आता मात्र केवळ वाट बघत राहणं त्याला असह्य होतं. या अवस्थेवर मात करण्यासाठी तो बोटीवर आहे- नाही ते सगळं खायला सुरुवात करतो. पोट तुडुंब भरल्यावरही न थांबता खात राहतो. अखेर बोट इतकी जवळ येते की आता तो त्या पाण्यात उभाही राहू शकत असतो.बोटीतून बाहेर पडून अल्वरेंगा चालत किनाऱ्यापर्यंत येतो.आपण चालू शकतो हेही त्याला विसरायला झालेलं असतं.आता आयुष्य म्हणजे बोटीच्या पंचवीस फुटांतली धडपड न राहता आपण मुक्त झालो आहोत, या आनंदाने तो तिथेच कोसळतो. त्याला जाग येते तेव्हा दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते.या बेटावर माणसं राहतात की ते निर्मनुष्य आहे की इथे नरभक्षक आदिमानव राहतात याची अल्वरेंगाला कल्पना नसते.पण इथे कुणीही राहत नसलं तरीही मी आनंदाने इथे जगेन,असा विचार त्याच्या मनात येतो.पण तशी वेळ येत नाही.थोड्याच वेळात बेटावर राहणाऱ्या एका आदिवासी कुटुंबाला तो सापडतो.तारीख असते ३० जानेवारी २०१४.एल सॅल्वडोरपासून तब्बल १०,००० किलोमीटर भरकटत अखेर ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला असलेल्या मार्शल आयलंड्स बेटसमूहामधल्या एका छोट्या बेटावर अल्वरेंगा येऊन पोहोचलेला असतो.तग धरून राहण्यासाठी समोर येणाऱ्या संकटांशी अन् बदलांशी जुळवून घेण्याची माणसाची शक्ती किती कमालीची असते हे दाखवून देणाऱ्या अल्वरेंगाचं नाव इतिहासात कायमचं नोंदवलं गेलेलं असतं.