पायवाट संपून जंगल सुरू होतं तिथे एक वारूळ होतं. त्यातली राणी मुंगी मेली,वारुळातल्या सगळ्या मुंग्यांची आई.राणी मुंगी मेली, हे बरेच दिवस कुणाला कळलंच नाही. तिला ना ताप आला,ना तिनं आचके दिले. आसपासच्या आपल्या कामकरी मुलींचा "जाते गं!" असा निरोपही तिनं घेतला नाही.नेहमीसारखी ती राणी-दालनाच्या जमिनीवर पहुडली होती.पाय,शिंगं सैलावून पडली होती.आणि तशीच मेली.काही वेगळं दिसलं,जाणवलं नाही.जिवंत राणी मुंगीची आता हुबेहूब मूर्ती झाली होती.कामकरी मुंग्यांना काहीतरी भयंकर घडलं आहे,हे कळलं नाही.सारं काही आलबेल आहे, असा भ्रम होत राहिला.
हा भ्रम झाला,कारण कीटकांचा सांगाडा त्यांच्या शरीराच्या बाहेर असतो.माणसांमध्ये किंवा कणा असलेल्या इतर प्राण्यांमध्ये हाडांचा कडक सांगाडा शरीरात असतो,आणि स्नायू, मज्जा, रक्तवाहिन्या वगैरे मऊ भाग सांगाड्याभोवती बाहेरच्या भागाला असतो.कीटकांमध्ये मात्र सांगाडा बाहेर,इतर मऊ भाग आत,
असं असतं.कणा असलेले प्राणी मेले,की मऊ भाग सडायला लागतो.सगळ्यांना सडणं दिसत असतं.कीटकांचे मऊ भाग सडून तंतू आणि गुठळ्यांचा गुंताच उरतो;पण तो सांगाड्याच्या आत असतो.बाहेरून सांगाडाच दिसत राहतो,जशाच्या तसा.एखादा सरदार मरूनही बाहेरचा चिलखती पोशाख दिसावा,तसं होतं.
राणी मुंगीच्या शरीराचा वासही बदलला नाही.नेहमीचेच गंध येत राहिले,जणू काही राणी मुगी म्हणत होती,"मी तुमच्यातच आहे!" राणी मुंगी शांत,स्तब्ध होती खरी, पण ती नेहमीच तशी असायची.
ती ना स्वतः काही काम करायची,ना इतरांना "हे करा,ते करा" असे हुकूम सोडायची.तिच्यात सगळी कामकरी मुंग्याची काम करायला लागणारी बुद्धी होती.प्रत्यक्षात मात्र ती नुसती अन्न खात, अंडी देत बसलेली असायची.
दहाएक कोटी वर्षांपूर्वी राणी-मुंगीच्या प्रजातीच्या मुंग्या नसायच्या.'प्रजाती' म्हणजे प्रकार म्हणू या.माणसं ही एक प्रजाती,कुत्रे ही एक प्रजाती,वडाची झाडं एक प्रजाती,अशा लक्षावधी प्रजाती आहेत.पण दहाएक कोटी वर्षांपूर्वी आपल्या पायवाट-वारुळातल्यासारख्या मुंग्या नसायच्या.त्या वेळी गांधीलमाश्या असायच्या; आजही असतात तशा.मग यातल्या काही गांधीलमाश्यांमध्ये काही बदल झाले,आणि आजच्या सामाजिक मुंग्यांचे वंश सुरू झाले.त्या प्राचीन मुंग्या-माश्यांच्या
मज्जासंस्थेत आणि ज्ञानेंद्रियांमध्ये त्यांनी कसं वागावं ते नोंदलेलं असायचं.त्या मुंग्या माश्या नेमक्या त्या नोंदींप्रमाणे वागायच्या.
नोंदलेल्या क्रमानं कामं करायच्या.आजच्या मुंग्या-माश्याही हुबेहूब तशाच नोंदींप्रमाणे वागतात.अशा वागणुकीला 'मूळ प्रवृत्ती' म्हणतात.तर पूर्वजांसारखंच वागणं,म्हणजे मूळ प्रवृत्तीनुसार वागणं.तर आपण पायवाट-वारूळ कसं घडलं,त्यात कोण कोण कसं कसं वागलं, हे पाहू.
नवं वारूळ घडायला सुरुवात होते ते काही मुंग्यांनी जुनं वारूळ,
जन्म-वारूळ सोडण्यापासूनं.तर आपली राणी मुंगी अशी 'माहेर' सोडून बाहेर पडली.तिनं आपले चार नाजूक,पारदर्शक पंख पसरले आणि हवेत झेप घेतली. त्या वेळी खरं तर तिला 'राणी मुंगी' म्हणणं बरोबर नाही.ती होती 'राजकुमारी'.ती एकटीच हवेत झेपावली नाही,तर इतर अनेक राजकुमारीही झेपावल्या.आणि सोबत होते अनेक नर,राजपुत्र.
एका नरानं आपल्या राजकुमारीला दोन पायांनी पकडलं,आणि दोघेही गिरक्या मारत जमिनीवर उतरले. आता नरानं राजकुमारीला मागच्या पायांनीही धरलं, आणि तिच्याशी संभोग केला.जेमतेम पाचच मिनिटांमध्ये संभोग पूर्ण झाला.नराचं सगळं वीर्य राजकुमारीत शिरलं. तिनं ते एका पोटातल्या पिशवीत भरून घेतलं,आणि धडपडून स्वतःला नराच्या मिठीतून सोडवून घेतलं.
तिच्या वीर्य-पिशवीतला प्रत्येक शुक्राणू तिच्याइतकाच जगू शकत होता.आयुष्यभर ती पिशवीतले शुक्राणू वापरून अंडी देत राहणार होती.नराचं आयुष्य मात्र संपत आलं होत.काही मिनिटांत तो मरणार होता.नराचं सगळंच आयुष्य परावलंबी राहिलेलं,
झाडांवरच्या बांडगुळांसारखं.नाजूक जीव.राणी मुगीन नर-अंडं दिल, की कामकरी मुंग्या ते दुसरीकडे नेऊन ठेवणार.अंडं उबल,की तांदळाच्या दाण्याच्या आकाराची अळी निघणार.सगळ्या कामकरी मुंग्या त्या अळीच्या बहिणी. त्या तोडातून अन्न आणून अळीच्या तोंडात ओतायच्या. असं होत होत अळीची पूर्ण वाढ झाली,की शरीराभोवती एक पातळ,मेणचट कोष तयार व्हायचा. या कोषात मऊ सांगाडा घडायचा,पूर्ण कीटकाचा.पुढे डोकं,
डोक्याला दोन डोळे,दोन शिंगं,एक नीटसा न घडलेला जबडा,फक्त बहिणींनी दिलेलं अन्नच खाऊ शकणारा.डोक्यामागे धड आणि धडामागे पोट.सगळ्या कीटकाला मिळून चार पंख आणि सहा पाय,शरीराच्या दोन्ही बाजूंना तीन-तीन.आतल्या भागात सारे अवयव. मुख्य म्हणजे एक मोठं लिंग.मेंदू मात्र कणभरच. मेंदूतल्या सूचनाही थोड्याशाच.योग्य वेळी उडायचं. राजकुमारीला गाठायचं.
पकडायचं.संभोग करायचा,की नराचं काम संपलं.तर कोषात पूर्ण वाढ झाली,की कामकरी माश्या कोष खाऊन टाकून नराला मोकळं करायच्या.नंतर नुसतं वाट पाहणं.
बहिणींनी आणलेलं खाणं,आणि संभोग-उड्डाणाची सूचना येण्याची वाट पाहणं.नर म्हणजे एक शुक्राणू राजकुमारींपर्यंत पोचवणारा अग्निबाण.सूचना मिळाली रे मिळाली,की उडायचं आणि संभोगातून शुक्राणू पोचवायचे.मग मेंदूकडून संदेश येतो,"झालं काम ! पण परत वारुळाकडे मात्र मुळीच जायचं नाही आहे!"
ना अन्न शोधायचं कौशल्य,ना अन्न खाण्याचं.जरा उकाडा वाढला की शरीरातलं पाणी सुकून मरायचं.इतर कोणती मुंगी भेटली,
कोणता कीटक भेटला,तर तो तुकडे करून नराला खाऊन टाकणार.कीडमुंगीच कशाला,पक्षी,सरडे,सापसुरळ्या सारे काम संपवून जमिनीवर रांगणाऱ्या नराला खाण्याला तयारच असतात.
हा धोका राजकुमारीलाही असतोच.ती नरांइतकी हतबल नसते.
मेंदू मोठा असतो आणि शरीर बळकट.पण तिलाही वीर्यसाठा घेतल्यानंतर उघड्यावर वावरणं धोक्याचं असतं.तिला जमिनीखाली जायची, आडोसा गाठायची घाई असते.
पण आता पंखांची अडचण व्हायला लागते. मग ती मधले दोन पाय उचलते,आणि पंख जिथे शरीराला जोडलेले असतात तिथे रेटा देऊन पंख मोडून टाकते.हे करण्यानं तिला ना दुःख होत,ना शरीराला इजा होत. छत्रीधारी सैनिकानं उडी मारून जमिनीवर पोचल्यानंतर पॅराशूट सोडून द्यावा;तसं हे राजकुमारीच पंख मोडणं. नाहीतरी पंखांमध्ये मज्जा आणि रक्तवाहिन्या नसतातच. ते केवळ 'चायटिन' नावाच्या पदार्थांचे पडदे असतात, अधूनमधून चायटिनच्याच काड्यांनी मजबूत केलेले. तर राजकुमारी आता निरुपयोगी असलेले हे पंख टाकून देते.आपल्या राणी-मुंगीनंही पंख मोडले,आणि वारुळाकरता जागा शोधायला सुरुवात केली.
('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )
लवकरच तिला चांगली जागा सापडली.गवताच्या पुंजक्यांमध्ये एक मोकळी जागा होती.आपल्याला ती टीचभर वाटली असती,
पण मुंग्यांच्या दृष्टीनं ती एका मोठ्या मैदानासारखी होती.तिथे वारूळ घडवलं,तर वीसेक वर्ष ती त्यात राहू शकणार होती.जागा मिळाल्याबरोबर राजकुमारीनं तिथल्या मातीत उभं बीळ खोदायला सुरुवात केली.झपाट्यानं आणि नेमकेपणानं खोदकाम सुरू झालं.लवकरच बीळ राजकुमारीच्या लांबीइतकं खोल झालं.आता ती थेट उघड्यावर नव्हती, पण धोका संपला नव्हता.
आणखी खोल जाणं आवश्यक होतं.बीळ किती खोल झालं याचा अंदाज राजकुमारीला जायला यायला लागणाऱ्या वेळेवरून यायचा.पुरेसं खोल गेल्यावर तिनं एक मोठं दालन घडवायला सुरुवात केली.मूळ बिळाच्या तिप्पट व्यासाचं होतं,हे दालन.
अजूनही इतर मुंग्या आणि कीटक यांनी बिळात यायचा धोका होता,पण आता त्यांना राजकुमारीच्या दंशाला आणि चावण्याला तोंड द्यावं लागणार होतं.मोठं काम झालं होतं.
जन्म-वारूळ सोडून उड्डाण करणाऱ्या राजकुमारींपैकी फार तर एखादा टक्का राजकुमारी दिवसाअखेरीला बीळ-दालनात पोचतात इतर नव्याण्णव टक्के कोणत्या ना कोणत्या भक्षकाला बळी पडतात,किंवा त्यांना नरच भेटत नाही.पण येवढ्यानंही राजकुमारी वारूळ घडवेल याची खात्री देता येत नव्हती.बीळ-दालन घडवणाऱ्या राजकुमारींपैकीही साधारणपणे एखादा टक्काच पुढे वारूळ घडवण्यात यशस्वी होतात,तर नव्याण्णव टक्क्यांना ते जमत नाही.म्हणजे शेवटी जन्म-वारूळ सोडणाऱ्या दहा हजार राजकुमारींपैकी एखादीच नवं वारूळ घडवू शकते दहा हजारांपैकी शंभरांनाच बीळ-दालन घडवता येत,आणि त्यांच्यातली एखादीच नवं वारूळ घडवते !
बीळ-दालन घडल्यावर पहिल्यांदा राजकुमारी बारीक अंड्यांचा एक लहानसा गुच्छ जनते.ही अंडी सतत स्वच्छ करावी लागतात,
नाहीतर मातीतले जिवाणू आणि बुरश्या यांची त्यांना लागण होऊन अंडी मरतात. राजकुमारी सतत अंडी चाटत राहते.यामुळे तिच्या लाळेचा एक पातळ थर सर्व अंड्यांवर चढवला जातो.
राजकुमारीची लाळ औषधी असते.जिवाणू,बुरशी यांना ती मारक असते.एखाद्या जिवाणूला जरी अंड्यांमध्ये शिरता आलं,तरी वेगानं प्रजनन होऊन लाखो जिवाणू तयार होऊन अंडी संपवून टाकू शकतात;म्हणजे आता राजकुमारीला इतर मुंग्या,कीटक,पक्षी,सरडे यांच्यापासून स्वतःला वाचवायचं असतं;आणि सोबतच जिवाणू,
बुरशीपासून अंडीही वाचवायची असतात. मूळ उड्डाण करणाऱ्यां
पैकी काही राजकुमारी बीळ-दालनं घडवतात;पण प्रत्येक राजकुमारी सुटी, एकटी असते.त्या एकमेकींना मुळीच मदत करत नाहीत.अंड्यांमधून घडलेल्या कामकरी मुंग्याही मदतीला नसतात.
मूळच्या जन्म-वारुळातल्या मुंग्या राजकुमारींना मदत करत नाहीत.एकदा का जन्म-वारूळ सुटलं,की स्वतःचं वारूळ घडू लागेपर्यंत प्रत्येक राजकुमारी संपूर्णपणे एकटी,एकाकी असते.
अंडी तर दिली;पण ती नीटपणे शुक्राणूंनी फळली असतातच असं नाही.आणि न फळलेल्या अंड्यांमधून मुंग्या घडत नाहीत.
बरं,शुक्राणूही चांगले,निर्दोष हवेत. सदोष शुक्राणूंनी फळलेल्या अंड्यांमधून निरोगी,सशक्त मुंग्या घडत नाहीत.पण पायवाट संपते तिथल्या वारुळाच्या राजकुमारीच्या बाबतीत सगळं काही नीट घडून आलं,आणि पहिल्या अंड्यातून पहिली बारीक अळी बाहेर पडली.राजकुमारीच्या डोक्याच्या भागात एक मोठी ग्रंथी होती.या ग्रंथीतून खूप पोषक अन्न राजकुमारीच्या तोंडात यायचं.
राजकुमारीच्या मागच्या, पोटाच्या भागातल्या चरबीपासून हे अन्न घडायचं. त्यासाठी पंख हलवणारे स्नायू उपयोगी पडायचे.तर हे अन्न राजकुमारी अळीला भरवू लागली.
असं करत,केवळ स्वतःच्या अंगातली द्रव्यं वापरत राजकुमारीनं दहाबारा मुंग्या घडवल्या.त्या सगळ्या माद्या होत्या.लहानखुऱ्या होत्या.दुबळ्या होत्या.त्या तशा असणंच गरजेचं होतं.मोठ्या,सशक्त मुंग्या केवळ राजकुमारीच्या शरीरातून घडवल्या असत्या,तर त्यांची संख्या अगदीच थोडी राहिली असती.इतक्या कमी मुंग्यांना नवजात वारूळ घडवताच आलं नसतं.
लहान होत्या, दुबळ्या होत्या,कमी होत्या,पण सगळ्या कामकरी होत्या.त्यांच्या मेंदूंमध्ये अन्न शोधायची,अन्न वारुळात आणायची,
राजकुमारीची काळजी घेण्याची कौशल्यं होती.या सगळ्या कौशल्यांची मूळ-प्रवृत्ती होती.आणि या सुरुवातीच्या मुंग्यांनी वारूळ घडू लागलं.आता राजकुमारी,राजकन्या या नावाऐवजी 'राणी' हे नाव आपल्या मूळ मुंगीसाठी योग्य ठरलं असतं,कारण तिनं वारूळ घडवायला सुरुवात केली होती.प्रजा घडवायला सुरुवात केली होती.काही मुंग्या अन्न शोधून आणू लागल्या होत्या.काही वारूळ वाढवत होत्या.काही राणीची सेवा करत होत्या. त्यांनी ही सगळी कामं नीटनेटकी करण्यावरच वारूळ घडणं अवलंबून होतं.या पुढच्या कामांमध्ये त्यांना राणीची मदत नव्हती.उलट राणीलाच मदतीची नितांत गरज होती.तिनं बीळ-दालन खोदलं होतं.. स्वतःचं शरीर वापरत कामकरी मुलींना कामाला लावलं होतं.आता ती थकून,भागून,भुकेली होऊन बसली होती.तिचं शरीर म्हणजे एक चायटिनचं कवच,आणि त्यात जेमतेम जगणारी अवयवांची व्यवस्था,येवढंच उरलं होतं.
पण पहिल्या पिढीच्या कामकरी मुंग्या वारुळाबाहेर पडून अन्न शोधत होत्या.त्यांना एक मेलेला डास सापडला.एका सुरवंटानं टाकलेली कात मिळाली.एक नुकताच जन्मलेला कोळी हाती लागला.हे सगळं अन्न त्या स्वतः खात होत्या,आणि राणीला भरवत होत्या. राणीचं वजन वाढायला लागलं.ती जराशी सशक्त झाली.
नंतरच्या पिढ्यांच्या मुंग्याही मोठ्या आणि दमदार होत्या,कारण त्या नुसतं राणीच्या शरीरातलं अन्न खात नव्हत्या.बाहेरच्या अन्नानं जोमदार झालेल्या मुंग्या उभ्या बिळापासून अनेक आडवे बोगदे खणू लागल्या.हळूहळू बोगद्यांचं आणि दालनांचं एक जंजाळ घडलं,ज्यात अनेक मुंग्या नेहमी वावरत असायच्या.वर जमिनीवर खोदलेल्या मातीचा ढिगारा झाल्यानं जंजाळाचं छतही मजबूत झालं,आणि सूर्याची ऊबही वारुळाला मिळू लागली.आता वारूळ शत्रूपासून सुरक्षित किल्ल्यासारखं झालं होतं.जसजसा काळ जात गेला,तसतशी राणी बिळाच्या नवनवीन,खोलात खोल भागाकडे सरकत गेली.बाहेरच्या धोकादायक जगापासून दूर राहणं तिच्या दृष्टीनं गरजेचं होतं,कारण आता ती एकच काम करत होती - पिल्लं देण्याचं.सगळ्या वारुळाची जननी तीच.
वारुळाचं वर्धमान,वाढणारं टोकही तीच.पिल्लं वाढवायची जबाबदारी आधी जन्मलेल्या कामकरी मुंग्यांनी घेतली होती.नवी पिल्लं म्हणजे कामकरी मुंग्यांच्या बहिणीच.आता कामकरी मुंग्याच राणीचे हातपाय झाल्या,जबडा झाल्या.हळूहळू तर तिचा मेंदूही झाल्या,तिची बुद्धीही झाल्या.त्या छान,एकजुटीनं, एकत्रपणे सगळी कामं करायच्या.आपापल्या स्वार्थाची पर्वा न करता वारुळाची कामं वारुळाचं हित पाहात करायच्या.वारुळाचा सुट्या कीटकांमध्ये विखुरलेला एक 'महाप्राणी' झाला.
वारुळाची वाढ पूर्ण व्हायला दोन वर्ष लागली.आता वारुळात दहा हजारांपेक्षा जास्त कामकरी मुंग्या होत्या. त्यानंतरच्या वर्षी वारुळानं राणीमार्फत नरांना आणि राजकुमारींना जन्माला घातलं.या नरांनी,राजकुमारींनी संभोग -उड्डाणं केली.काही नवी वारुळं जन्माला आली. आता राणी सरासरीनं दर पंधरा मिनिटांनी एक अंडं देत होती.वारुळाच्या तळाशी,सर्वांत खोल दालनात राणी जडशीळ,सुस्त पडलेली असायची;जमिनीत पाच फूट खोलीवर.
माणसांच्या मापानं वारूळ दोनशे मजले भूमिगत होतं,चारशे मुंग्यांइतकं खोल.आणि जमिनीवर आणखी पन्नास मजले उंचीचा मातीचा ढीग होता.
राणी या लहानशा संस्कृतीचं नेतृत्व सांभाळत नव्हती; पण संस्कृतीची वाढ,त्या वाढीचा जोम,हे मात्र राणीच पुरवत होती.
वारूळ टिकेल की नाही टिकणार,यशस्वी होईल की पराभूत,
या प्रश्नांची उत्तरं मात्र राणीप्रमाणेच ठरू शकत होती.आपल्या वीस गर्भाशयांमधून घड्याळाच्या नियमितपणे तिनं अंडी घालत राहणं,हे वारुळाच्या हृदयाचं स्पंदन होतं.सगळे कामकरी ते स्पंदन चालू राहावं म्हणूनच झटत होते.अंडी देणारं स्पंदन जोमानं,
सातत्यानं चालू राहणं,म्हणजे वारूळ टिकणं.वारूळ नीट घडवणं,
स्वच्छ ठेवणं,जीव धोक्यात घालून बाहेरून अन्न कमावून आणणं,
वारुळाच्या महाद्वाराच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी मरणही पत्करणं, सगळं काही राणी आणि तिच्या स्वार्थत्यागी प्रजेसाठीच ती प्रजा करत असते. अपुर्ण…