सांगण्याची आता आवश्यकता नाही की मी या गोष्टीवर अत्यंत खुश होतो.पुढच्या रविवारी चर्चमध्ये इतर स्त्रियांना तिने ही घटना सांगितली आणि अनेक स्त्रियांनी मला येऊन सांगितले,की इतकी शहाणपणाची गोष्ट आम्ही या आधी कधीच ऐकली नव्हती.तेव्हा कुठे मला स्तुती करण्याच्या शक्तीचा प्रत्यय आला."
लॉरेंस जिगफेल्ड ऑडवेअर धूम माजवणारा सुप्रसिध्द निर्माता होता.तो एक असा निर्माता होता,ज्याच्यात 'अमेरिकन तरुणींना ग्लॅमरस' बनवण्याची विलक्षण प्रतिभा होती.प्रत्येक वेळी ते अशा एखाद्या सामान्य तरुणीला निवडत असे,जिच्याकडे कुणी पुन्हा वळूनसुध्दा पाहणार नाही.मग ते तिच्यात कायापालट करीत.
प्रशंसा व आत्मविश्वासाचे महत्त्व जाणवल्यामुळे त्यांना माहिती होते की केवळ प्रशंसा व महत्त्व दिल्याने सामान्य स्त्रीसुद्धा स्वतःला सुंदर मानू लागते.ते व्यवहारी होते.त्यांनी कोरसमध्ये गाणाऱ्या मुलींचा पगार आठवड्याला तीस डॉलरपासून वाढवून ७५ डॉलर्स केला.ते विशाल अंतःकरणाचे होते.फॅडलीजच्या सादरीकरणाच्या पहिल्या रात्री त्यांनी सर्व कलाकारांना तार पाठवली आणि यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक मुलीला अमेरिकन ब्युटी गुलाब दिले.
एकदा माझ्यावर डाएटिंगचे भूत सवार झाले अन् मी सहा दिवस उपास केला.सहाव्या दिवशी मला तेवढी भूक लागत नव्हती,जेवढी दुसऱ्या दिवशी लागली होती. आम्ही सगळेच हे जाणतो की जर एखाद्याच्या परिवाराला किंवा कर्मचाऱ्यांना सहा दिवस खायला मिळाले नाही तर तो स्वतःला अपराधी मानेल.पण जर ही व्यक्ती परिवार किंवा कर्मचाऱ्यांची स्तुती सहा दिवस, सहा आठवडे किंवा साठ वर्षापर्यंत करणार नाही,तेव्हा त्याला जरासुध्दा अपराधी वाटणार नाही.आम्ही हे विसरतो की स्तुतीसुद्धा भोजनासारखीच आमची अनिवार्य गरज आहे.
जेव्हा महान अभिनेता अल्फ्रेड लुटने 'रियुनियन इन व्हिएन्ना'
मध्ये प्रमुख भूमिका केली,तेव्हा त्यांनी म्हटले होते, "मला ज्या गोष्टीची सर्वाधिक गरज आहे ती आहे - आत्मसन्मानासाठीचं पोषण." आम्ही आपली मुले,मित्र आणि कर्मचाऱ्यांच्या शरीराचं पोषण करतो;पण आम्ही त्यांच्या आत्मसन्मानाचं किती पोषण करतो? आम्ही त्यांना उर्जेसाठी मांस व बटाटे उपलब्ध करून देतो,पण आम्ही त्यांना प्रशंसेचे दयाळू शब्द द्यायला विसरुन जातो,जे वर्षानुवर्ष त्यांच्या आठवणीत पहाटेच्या ताऱ्यांच्या संगीतासारखे गुंजेल.
पॉल हार्वेने आपल्या 'द रेस्ट ऑफ द स्टोरी' या रेडियो कार्यक्रमात सांगितले,की कशा त-हेने खरी प्रशंसा एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते.त्यांनी एक घटना ऐकवली.अनेक वर्षांपूर्वी डेट्रॉइटच्या एका शिक्षिकेने स्टेव्ही मॉरिसला म्हटले की वर्गात हरवलेल्या एका उंदराचा शोध घ्यायला त्याने मदत करावी.
निसर्गाने स्टेव्हीला डोळे दिले नसतील.पण त्या ऐवजी स्टेव्हीची श्रवणशक्ती अतिशय तेज होती.स्टेव्हीमध्ये असे काही होते,जे त्या पूर्ण वर्गात कुणापाशीच नव्हते.पण हे असे प्रथमच घडले होते की त्याच्या श्रवणशक्तीसाठी कुणी त्याची प्रशंसा केली होती.अनेक वर्षांनंतर स्टेव्हीचे म्हणणे आहे की ती प्रशंसा त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात होती.त्या घटनेनंतर त्यांनी आपल्या ऐकण्याच्या क्षमतेचा विकास केला आणि स्टेव्ही वंडरच्या रंगमंचीय नावाला स्विकारून ते सत्तरच्या दशकाचे महान पॉप सिंगर व गीतकार झाले.अनेक वाचक या शब्दांना वाचताना मनात म्हणतील 'अच्छा! लबाडी ! लांगूलचालन ! मी याचा उपयोग करून पाहिला आहे समजदार लोकांसमोर.पण हे प्रकार चालत नाहीत.'
अगदी बरोबर आहे! लबाडी शहाण्या लोकांसमोर चालत नाही.ती उथळ,स्वार्थी आणि खोटी असते.तिला असफल व्हायलाच हवे आणि ती असफल होतेच.तसे तर अनेक लोक प्रशंसेचे इतके भुकेले असतात की ते लबाडीला स्तुती समजून पचवून टाकतात,ज्याप्रमाणे एखादा भुकेलेला मनुष्य गवत व किडे-मुंगळे खाऊन टाकतो.
महाराणी व्हिक्टोरियालापण खोटी स्तुती आवडत असे. प्रधानमंत्री बेंजामिन डिस्त्राइलीने हे स्विकार केले होते, की ते महाराणीची खोटी स्तुती करतात.त्यांच्याच शब्दात सांगायचं तर 'ते मोठ्या चमच्याने लोणी लावत असतात.' परंतु डिस्त्राइली ब्रिटनचे सर्वांत सुसंस्कृत, योग्य व चतुर व्यक्ती होते.ते या कलेत निपुण होते.जी गोष्ट त्यांचा हेतू सफल करून गेली,ती तुमच्या आमच्यासाठी योग्य ठरेलच असे काही म्हणता येणार नाही.दीर्घ काळासाठी खोटी स्तुती करण्याने फायदा कमी अन् तोटाच जास्त होऊ शकतो.अशी खोटी स्तुती म्हणजे खोटा शिक्का आहे.जर तुम्ही त्याला खरा शिक्का म्हणून बाजारात चालवण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या अंगाशी येऊ शकते.प्रशंसा व खोटी स्तुती यात काय फरक आहे? याचे उत्तर अगदी सोपे आहे.एक खरी असते आणि दुसरी खोटी. एक हृदयातून निघते आणि एक स्वार्थातून.एक निस्वार्थी असते,तर दुसरी स्वार्थपूर्ण ! एकीची प्रत्येक ठिकाणी स्तुती होते तर दुसरीची हर ठिकाणी निंदा.
मी मेक्सिको शहरात हल्लीच चापुल्टेपेक पॅलेसमध्ये एक मेक्सिकन हिरो जनरल अल्वारो ऑब्रेगॉनची मूर्ती बघितली. त्या मूर्तीखाली जनरल ऑब्रेगॉनच्या तत्त्वज्ञानाचे बुध्दिमत्तापूर्ण शब्द लिहिले होते : "आपल्यावर हल्ला करणाऱ्या शत्रुंना घाबरू नका; उलट त्या मित्रांना घाबरून असा जे तुमची खोटी स्तुती करतात."
नाही,नाही,नाही ! मी तुम्हाला खोटी स्तुती व लबाडी करायला सांगत नाहीए.मी तर अगदी वेगळेच सांगतोय. मी तुम्हाला एक नवीन जीवन सुरू करायला सांगतोय. मला परत सांगू द्या 'मी तुम्हाला एक नवीन जीवन सुरू करायला सांगतोय.'
सम्राट पंचम जॉर्जने बकिंगहॅम राजवाड्यात आपल्या अभ्यासिकेच्या भिंतीवर सहा सूत्रे लिहून ठेवली होती. त्यातले एक सूत्र असे होते,"मला हे शिकवा की ना मी कुणाची खोटी स्तुती करेन आणि ना कुणाकडून स्वतःची खोटी स्तुती ऐकण्यासाठी उत्सुक राहीन." मी एकदा लबाडीची व्याख्या वाचली होती जी इथे पुन्हा सांगण्यासारखी आहे- "लबाडी किंवा खोटी स्तुती समोरच्याला तेच सांगते जो तो स्वतःबद्दल विचार करतो."
"तुम्ही जी वाटेल ती भाषा वापरा," राल्फ वॉल्डो इमर्सनने म्हटले होते."तुम्ही नेहमी तेच सांगाल जे तुम्ही आहात." जर आम्हाला फक्त लबाडीच करायची असेल तर सर्वांशी लबाडीने वागून आम्ही सहजपणे मानवी संबंधाचे विशेषज्ञ बनू शकतो.
जेव्हा आम्ही कुठल्याच निश्चित विषयाबद्दल विचार करीत नसतो,तेव्हा आपल्या फावल्या वेळात ९५ टक्के वेळ आम्ही स्वतःबद्दलच विचार करीत असतो.जर आम्ही स्वतःबद्दल विचार करणे थोडे कमी केले तर दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांबद्दल विचार करायला लागू, तेव्हा मग आम्हाला लबाडीची किंवा खोटी स्तुती करण्याची गरजच वाटणार नाही.खोट्या स्तुतीला पहिल्याच नजरेत,तोंडाबाहेर पडायच्या आधीच ओळखले जाऊ शकते आणि ती अगदी उथळ व खोटी असते.आजच्या जगात खरी स्तुती दुर्मिळ झाली आहे. असे काय होते कोण जाणे की चांगल्या क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या आपल्या मुलाची किंवा मुलीची स्तुती करण्याचा आम्हाला बरेचदा विसरच पडतो किंवा आम्ही आपल्या मुलाला त्यावेळी प्रोत्साहित करायला विसरून जातो,जेव्हा ते पहिल्यांदा चांगला केक यशस्वीपणे बनवतात किंवा पाखरांसाठी घरटे बनवतात.मुलांना आपल्या आई-वडिलांकडून झालेल्या स्तुतीने जो आनंद मिळतो,त्यापेक्षा जास्त आनंद अन्य कुठल्याच गोष्टीने मिळत नाही.पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही क्लबमध्ये चांगल्या भोजनाचा आनंद घ्याल,तेव्हा खानसाम्याला नक्की निरोप पाठवा की जेवण रुचकर होते आणि जेव्हा कोणी थकलेला विक्रेता तुमच्याशी सभ्यपणे वागेल तेव्हासुध्दा या गोष्टीचा उल्लेख जरूर करा. प्रत्येक पादरी,प्रत्येक भाषण देणारा आणि प्रत्येक सार्वजनिक वक्ता हे जाणतो की जर श्रोत्यांमधून एकाही व्यक्तीने टाळी वाजवली नाही तर किती वाईट वाटते आणि किती उत्साहभंग होतो. व्यावसायिकांना जे लागू होते ते ऑफिस, दुकाने, कारखान्यांमधले कर्मचारी, कुटुंबीय आणि मित्र परिवार यांना तर दुपटीने लागू होते.आमच्या संबंधात आम्हाला याचा कधी विसर पडायला नको की आमचे साथीदार अखेर मानव आहेत आणि स्तुतीचे भुकेले आहेत.हाच तो अस्सल शिक्का आहे ज्याला प्रत्येक जण पसंत करतो.
आपल्या प्रत्येक दिवसाच्या प्रवासात कृतज्ञतेच्या ठिणग्या मार्गावर पसरवण्याचा प्रयत्न करा.तुम्हाला नवल वाटेल की कशा तन्हेने या ठिणग्यांमुळे मैत्रीच्या छोट्या-छोट्या वाती उजळतील,ज्यामुळे तुमच्या भावी प्रवासात तुम्हाला ऊब मिळेल.
न्यू फेयरफिल्ड,कनेक्टिकट इथल्या पामेला डनहॅमच्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक जबाबदारी होती नवीन कर्मचाऱ्याच्या देखरेखीची,ज्याचे काम अत्यंत वाईट होते.दुसरा कर्मचारी त्याची खूप टर उडवत असे आणि तो किती वाईट काम करतो असे सांगत.ही खूपच वाईट पध्दत होती आणि दुकानातला अमूल्य वेळ वाया जात असे.पॅमने या कर्मचाऱ्याला प्रेरणा देण्याचे अनेक उपाय अंमलात आणले,पण काही लाभ झाला नाही.मग तिला असे लक्षात आले की कधी तरी तो कुठले तरी काम चांगल्या त-हेने करून घेतो.पॅमने निर्णय घेतला की जेव्हा कधी अशी संधी येईल तेव्हा ती इतरांसमोर त्याची स्तुती करेल.असे केल्यावर सर्वांना दिसून आले की दर दिवशी त्याच्या कामात सुधारणा होत गेली आणि लवकरच तो आपले काम चांगल्या त-हेने करू लागला.
आता सर्व जण त्याची स्तुती करतात आणि त्याला सन्मान देतात.खऱ्या स्तुतीने सकारात्मक परिणाम मिळाले,उलटआलोचना व टिकेने हाती काहीच आले नव्हते.लोकांना टोमणे मारून जखमी केल्याने ते कधीच बदलत नाहीत,न त्यामुळे काही सकारात्मक प्रभाव पडतो.म्हणून असे वर्तन करणे निरर्थक असते.एक जुनी म्हण आहे, जी मी माझ्या आरशावर चिकटवून ठेवली आहे. ती मी रोज वाचतो :
मी या रस्त्यावर फक्त एकदाच चालेन... म्हणून जर मी काही चांगले काम करू शकतो किंवा कुणाचे भले करू शकतो तर मी ते आत्ताच करेन. मी त्याला टाळणार नाही,दुर्लक्ष करणार नाही.कारण पुन्हा मी या रस्त्यावर परतून येणार नाही.
इमर्सनने म्हटले होते,"प्रत्येक व्यक्ती माझ्यापेक्षा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत सरस असते.मी त्याची ती गोष्ट शिकून घेतो."
जर हे इमर्सनसाठी खरे असेल तर तुमच्या माझ्या बाबतीत तर ते हजार पटीने जास्त खरे आहे.आम्ही आपल्या इच्छांबद्दल विचार करणे सोडायला हवे. आम्ही लबाडीला विसरायला हवे प्रामाणिकपणे खरी प्रशंसा करायला हवी,मनापासून स्तुती करायला व मुक्तकंठाने कौतुक करायला हवे. जर तुम्ही असे कराल तर तुम्हाला असे आढळून येईल,की लोक तुमच्या शब्दांना त्यांच्या आठवणींच्या तिजोरीत ठेवतील आणि आयुष्यभर त्यांना ते शब्द आठवत राहतील. तुम्ही जे म्हटलं ते तुम्ही विसरून जाल,पण ते मुळीच विसरणार नाहीत.
खरी स्तुती करण्याची सवय लावून घ्या.(समाप्त)