* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: राणी मेली ! The queen is dead !

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२७/१२/२५

राणी मेली ! The queen is dead !

एक कामकरी मुंगी मेली,फार कशाला,हजार कामकरी मुंग्या मेल्या तरी वारूळ जिवंत राहील,स्वतःला दुरुस्त करत राहील,म्हणूनच तर वारुळाला महाप्राणी म्हणायचं.राणीचं अंडी देणं थांबलं,तर मात्र ते पुन्हा मार्गी लावावं लागतंच,नाहीतर वारूळ मरतं.


आणि आता वीस वर्षांनंतर ती वेळ आली होती. वारुळाच्या आयुष्यातली सर्वांत मोठी आपत्ती होती, राणीचा मृत्यू.पण राणी मेली आहे याची खात्री होईपर्यंत कामकरी मुंग्या काही करू शकत नव्हत्या.काहीतरी बिनसलं आहे,हे त्यांना कळत होतं.पण बिघाडाच्या खुणा अजून पुसट होत्या.त्यांना प्रश्न किती मोठा, मूलभूत आहे,ते कळत नव्हतं.वारूळ नेहमीच्या गडबडीनं,

नेमकेपणानं वागत राहिलं.आपलं तारू भरकटून किनाऱ्यावरच्या खडकांकडे जात आहे,हे त्यांना उमगलं नव्हतं.गडबडीची वागणूक सुरूच राहण्याचं मूळ होत मुंग्यांच्या एकमेकींना संदेश

देण्याच्या पद्धतीत.त्या बहतांश आयुष्य जमिनीखालच्या अंधारात काढायच्या,त्यामुळे डोळ्यांनी पाहणं त्यांना दुय्यम महत्त्वाचं होतं.त्या एकमेकींशी आवाजानं तोंडानं बोलू शकत नव्हत्या.

आपण माणस दृष्टीने दाखवलेल्या चित्रांचा विचार करतो;कानांनी ऐकलेल्या आवाजांचा विचार करतो.मुग्या मुख्यतः वास आणि चवींमुळे विचार करतात.त्यांना वास येतात,चवी समजतात.चित्र 'दिसत' नाहीत,आवाज ऐकू येत नाहीत.त्यांच्या मेंदूना मुख्यतः फेरोमोन्स नावाच्या रसायनांनीच माहिती मिळते. त्या रसायनांच्या वासांमधून,चवींमधून मुंग्यांच्या मनांमध्ये कोणती चित्रं बनतात,त्या चित्रांचा अर्थ मुंग्या कशा लावतात,हे सगळं आपल्याला समजू शकत नाही. आपल्याला त्यांची संदेश घेण्यादेण्याची कल्पना नीटपणे करता येतच नाही.कसं सांगतात त्या,"तिकडे अन्न आहे, चला घेऊन येऊ या."असं? रसायनांच्या कोणत्या मिश्र-वासाने,मिश्र चवीनं,"घाई करा, शत्रू येतो आहे!" असं सांगतात त्या? आपल्याला ही वास-चवींची ज्ञानेंद्रियं नाहीत.आपल्याला मुंग्यांची धावपळ,

लगबग सगळी शांत,निःशब्द वाटते.प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात वास-चवींच्या संदेशांचा गोंगाट सुरू असतो,आपल्या आकलनापलीकडचा.डझनभर फेरोमोन्सच्या मिश्रणांमधून ही 'बोलाचाली' सुरू असते.राणीच्या शरीरातून निघणाऱ्या फेरोमोन्सचा मुंग्यांच्या भाषेत अर्थ असतो,


"इकडे या.माझ्यापाशी या. मला स्वच्छ ठेवा.मला जेवू घाला.माझ्या शरीरातनं जी द्रव्यं मिळतील,ती तुमच्या बहिणींशी वाटून घ्या." आणि कामकरी मुंग्यांनी ही आज्ञा ऐकली.त्या आपल्या जिभांनी राणीला चाटत राहिल्या.त्या चाटण्याचे अंश इतर मुंग्यांमध्ये वाटत राहिल्या.


प्रत्येक मुंगीच्या पोटाच्या पुढच्या भागात हे आज्ञा देणारे फेरोमोन्स गेले.त्यांच्या अन्नात ते आज्ञा-फेरोमोन्स मिसळले गेले.प्रत्येक मुंगी तिला भेटणाऱ्या मुंग्यांचे वास घेत असते.तिची शिंगं म्हणजे आपलं नाक,समजा. एका मुंगीनं दुसऱ्या मुंगीला शिंगांनी चाचपलं,की दुसरीचा वास पहिलीला कळतो.भरपूर जेवलेल्या,पोट भरलेल्या मुंगीचा वास सांगतो,"हा वास घे.उपाशी असशील,तुला भूक लागली असेल,तर हे खा."आणि जर पुढ्यातल्या मुंगीनं जीभ बाहेर काढली,तर पोट भरलेली मुंगी त्या भुकेलीच्या जिभेवर थोडंसं अन्न ओकते.पक्षी आपल्या पिल्लांना असेच घास भरवतात.


याच प्रकारान इतर माहितीचीही देवाणघेवाण वारुळातल्या मुंग्यांमध्ये सुरू असते.माणसांच्या शरीराचे अवयवही एकमेकांशी अशा हॉर्मोन नावाच्या रसायनांनी 'बोलत'असतात.एकूण वारूळ हा एक महाप्राणी सर्व मुंग्या या त्या महाप्राण्याचे अवयव.ते अवयव फेरोमोन्स वापरून 'बोलतात', मुंग्यांच्या मेंदूना ती रासायनिक भाषा समजते.सूचना, विनंत्या,आज्ञा,सगळं रसायनांमधून वाहत जाते.


पायवाट-वारुळाजवळ एकदा एका पक्ष्यानं एक नाकतोडा पकडला.पक्षी नाकतोडा चोचीत धरून घरट्याकडे जात असताना त्याचे काही तुकडे खाली जमिनीवर पडले.मिनीटभरात एका कामकरी मुंगीला ते नाकतोड्याचे तुकडे सापडले.ती नाहीतरी असलं अन्न शोधतच फिरत होती.अन्न मिळाल्याबरोबर पूर्वीपासून घडत आलेली एक घटनांची साखळी घडू लागली. मुंगीनं नाकतोड्याची चव घेतली,आणि ती वारुळाच्या दाराकडे पळत सुटली.रस्ताभर ती अधूनमधून आपलं पोट जमिनीवर टेकवायची.

यातून जमिनीला थोडंसं रसायन लागायचं,आणि अन्नापासून वारुळापर्यंतची वाट रेखली जायची.वारुळात शिरल्यावर मुंगी घाईघाईनं इतर मुंग्यांना भेटायला लागली,तोंडाजवळ तोंड न्यायला लागली.तिनं असं केलं,की नव्या मुंगीला नाकतोड्याचा वासही मिळायचा,आणि त्याच्यापर्यंत पोचायच्या वाटेचाही वास मिळायचा.सूचना असायची,"अन्न आहे, मला सापडलेलं.चला,मी रेखलेल्या वाटेनं जा,आणि अन्न कमावून आणा!"


लवकरच मूळ मुंगीची सूचना मिळालेल्या मुंग्यांचा घोळका नाकतोड्याकडे धावत सुटायचा.नाकतोड्याचा एखादा कण उचलून त्या माघारी वारुळाकडे धावल्या. त्याही पोट जमिनीला टेकवत होत्या,आणि अन्नाची वाट जास्त स्पष्ट करत सांगत होत्या,"मदतीला या.भरपूर अन्न आहे,या वाटेवर!" मुंग्यांचा एक घोळका नाकतोड्याचा एक पाय वारुळाकडे ओढायला लागला, सगळ्या मिळून काम करत होत्या.एक चिमणी काय गडबड चालली आहे ते पाहायला आली.तिनं नाकतोड्याच्या पायाला टोच मारली.सगळ्या मुंग्या विखुरल्या.आता त्यांच्या जबड्याजवळच्या एका ग्रंथीतून वेगळंच रसायन हवेत पसरलं,"धोका! मोठा धोका! पळा ! इथून दूर जा!" पायवाट-वारुळातले सगळे संवाद असे चालायचे,आणि त्या संवादांमधून कामं व्हायची. कधीकधी फेरोमोन्सच्या गंध-चवींसोबत स्पर्शातूनही संदेश दिले-घेतले जायचे.रसायनांची प्रमाणं, रसायनांची मिश्रणं यांमधून शब्द,वाक्यं घडायची. रसायन कुठे सोडलं जातं आहे,कोण सोडतं आहे, यालाही अर्थ असायचा.असं शब्दभांडार वाढत जायचं. वारुळाची भाषा समृद्ध व्हायची.


"ये, मी तुला चाटून स्वच्छ करते."


"कामाला लाग,त्या इतरांसारखी."


"मी या प्रकारची आहे,या स्थितीत आहे."


"चला,इथे रसायन पसरू या,आणि इतरांना सांगू या, की हा आमचा प्रांत आहे."


"सैनिक कमी पडताहेत.जरा बालगृहात जास्त सैनिक वाढवा."


"सैनिक फार होताहेत.जरा बालगृहात सैनिक कमी करा."


"नवी राणी व्हायला कोण धडपडतं आहे?"


सर्व मुंग्या फेरोमोन्सच्या ढगांमध्ये,प्रवाहांमध्ये वावरत असायच्या,आणि त्यातून संदेश घेत असताना स्वतःही त्यात संदेश सोडत असायच्या.काही संदेश फार दूरही जात नसत,आणि फार वेळही टिकत नसत.उदाहरण म्हणून "धोका!" हा संदेश घ्या.

एखाद्या जागी धोका असला तरी सगळ्या वारुळाला न घाबरवता,

फार वेळ जवळपासच्यांना न घाबरवता तो संदेश विरून जायचा. उलट्या टोकाला कामकरी मुंग्यांनी राणीशी कसं वागावं याबाबतचे संदेश सावकाशपणे दूरवर पसरायचे आणि जवळपास कायम टिकून राहायचे.राणी मेल्यानंतरही कामकरी मुंग्यांना ते जाणवायला वेळ लागला,कारण राणीचं प्रेतही राणीबाबतचे संदेश देतच राहिलं.राणीचं अस्तित्व पायवाट वारुळाच्या फेरोमोन्समध्ये सर्वत्र विणलं गेलं होतं.सगळ्या मुंग्यांच्या शरीरांमध्ये राणीचे फेरोमोन्स होते.ती वारुळाची खूणच होती म्हणा. मुंग्यांच्या शरीरांवर पातळसा मेणचट थर असायचा, राणीच्या फेरोमोन्सनी भरलेला.एखादी भेटणारी मुंगी आपल्या वारुळातली की बाहेरची,हे त्या वासानं तत्काळ कळायचं.दोन मुंग्या भेटल्या रे भेटल्या,की झपाट्यानं एकमेकींच्या अंगांवरून शिंगं फिरवायच्या. माणसांच्या डोळ्यांना दिसायचंही नाही,इतक्या वेगानं हे चाचपणं घडायचं,आणि उत्तर यायचं, "आपली" किंवा "परकी".भेटलेली मुंगी आपली असेल,तर सुखानं आपल्या कामाला लागायचं,किंवा तिला कुरवाळून दोस्ती दाखवायची.पण जर वेगळ्या वारुळातली मुंगी असेल,तर पळ तरी काढायचा,नाहीतर मारामारी तरी करायची.

बोलणं नाही,चालचलणुकीत वैशिष्ट्यं नाहीत. त्याची गरज नाही.वास पुरेसा आहे,


आपलं-परकं ठरवायला.वारुळाला सांधून ठेवणार, महाप्राणी बनवणार,ते राणीचे फेरोमोन्सचे वास.सगळी ओळख शुद्ध रासायनिक,ती जर हरवली,तर वारूळ विस्कटणार.आपसात भांडणं होणार,बाहेरच्यांना हल्ले करायला वाव मिळणार,शत्रू येऊन सहज एकेक मुंगीला खाऊन टाकणार.राणीच्या प्रेतातून बाहेर पडणारे फेरोमोन्स कमी होत गेले.तिचा वास मंदावत गेला. तिच्या शरीरातले काही भाग खाल्ले गेले इतर भाग वारुळाच्या प्रेतागारात नेले गेले.


राणी मेल्याच्या तिसऱ्या दिवशी तिच्यातून उमटणारी वारुळाची ओळख पटेनाशी झाली.नेहमीच्या वासांसोबत एक कुजण्याचा वास यायला लागला. राणीची स्तब्धता,हालचाल थांबणं,काहीच महत्त्वाचं नव्हतं.ती पाठीवर झोपून पाय हवेत असते तरी कामकरी मुंग्यांना फरक पडला नसता.तिचा रंग बदलून लाल,निळा,चंदेरी,सोनेरी झाल्यानंही फरक पडला नसता.मृत्यूचा वासच राणीच्या मृत्यूची बातमी कामकऱ्यांना देऊ शकत होता, इतर काही नाही.मृत्यूचा वास


माणसाच्या विष्ठेचा वास,सडक्या मासळीचा दुर्गंध,हे सगळे मुंग्यांच्या ओळखीचे असतात.इतरही विषारी पदार्थांचे वास मुंग्या ओळखतात,आणि ते ज्या जागी भेटतात तिथून त्या दूर पळतात.

मृत्यूचा वास मात्र फक्त चरबीचं विघटन होताना येणारं ओलेइक आम्ल आणि त्याचे क्षार यांच्याशी मुंग्यांच्या मनांत जोडलेला असतो. माणसांना हे वास बिनमहत्त्वाचे वाटतात. मुंग्यांना मात्र ते वास सांगतात,"मृत!" आणि जर मेलेली मुंगी आपल्या वारुळातली असेल तर मुंग्या त्या प्रेताची विल्हेवाट लावतात.


राणीच्या मृत्यूनंतर आठवड्याभरानं हा मृत्यूचा वास मुंग्यांना जाणवू लागला.त्यांच्या राणीचं प्रेत चाटण्यानं प्रेताचे तुकडे पडू लागले.एकेक करून ओलेइक आम्लाच्या,त्याच्या क्षारांच्या वासानं लदबदलेले तुकडे कामकरी मुंग्या राणी-दालनाबाहेर नेऊ लागल्या. काहीही क्रियाकर्म नाही.विधी नाहीत.पूजा नाहीत. शोकसभा नाहीत. केवळ ओलेइक वासांचे तुकडे घेऊन प्रेतागाराकडे जाणाऱ्या मुंग्यांमुळे वारूळभर बातमी पसरली,"राणी मेली!" प्रेतागार काही विशेष नव्हतं. अगदी राणीसाठीसुद्धा खास काही सोय नव्हती.मुख्य वारुळाच्या कडेनं एक दालन.


जिथे वाटेल त्या गोष्टी टाकल्या जात,येवढंच.अळ्यांचे कोष,अन्नातला न खाण्यासारखा भाग,अगदी राणीचेही अंश.प्रेतागार म्हणजे उकिरडा.


तर राणीचे अवशेष वाहून नेणाऱ्या मुंग्यांनी या प्रेतागाराजवळ जाऊन तिथल्या खास कामकरी मुंग्यांना ते अवशेष दिले.

प्रेतागारातल्या मुंग्या सतत तिथल्या वस्तू रचत असायच्या.उपयुक्त गोष्टी खायच्या,आणि इतर सारं नीट रचून ठेवायच्या.वारुळातल्या इतर मुंग्या त्यांच्याशी फार संबंध ठेवत नसत.


वारुळातली सगळी कामं अशा श्रमविभागणीवर उभारली जायची.यातून परोपकार आपोआपच उपजायचा.प्रत्येक मुंगी वारुळासाठी काहीतरी त्यागायची.काहीतरी सोय स्वतःला नाकारून वारुळाचं भलं करायची.यातला सगळ्यांत मोठा त्याग म्हणजे कोणत्याच मुंगीला पिल्लं देता येत नसत;विशेषतः राणी जिवंत आणि निरोगी असेपर्यंत.त्या सगळ्या विशिष्ट कामं करायच्या,ओझी वाहणं,शत्रूशी लढणं,एक ना दोन.काही कामं तर धोकादायक असायची.ती करणाऱ्या मुंग्या लवकरच मरणार,याची खात्री असायची.तरीही मुंग्या तसली कामं करायच्या. व्यक्तींना,

सुट्या मुंग्यांना महत्त्वच नसे.फक्त वारूळ महत्त्वाचं.तो महाप्राणी जगत राहणंच महत्त्वाचं;हे प्रत्येक मुंगीच्या मेंदूच्या रचनेतच ठसलेलं असायचं. एखादी मुंगी मेल्यानं वारूळ जरासं कमकुवत व्हायचं, हे खरं.पण हे नुकसान भरून काढणं सोपं असायचं. एका नव्या कोषातून एक नवी मुंगी बाहेर पडली,की झालं काम.पण एखादी मुंगी स्वार्थीपणानं वागली, तर? तिनं आपल्या कामापेक्षा आपल्या खाण्यापिण्याला महत्त्व दिलं,तर? तर संपूर्ण वारुळाची रचना बिघडून वारुळाचं जगणंच कठीण व्हायचं.त्यापेक्षा त्या मुंगीनं सभ्यपणे,मुकाट्यानं वारुळासाठी मरणं जास्त चांगलं.


सगळ्या मुंग्यांच्या सगळ्या वागणुकीचा हा पाया होता. आपण क्षीण झालो,दुबळे झालो,अपंग झालो,तर वारुळावर ओझं न टाकता दूर जाणे,प्रसंगी मरून जाणं! या स्वार्थ

त्यागामुळेच पायवाट वारूळ यशस्वी ठरलं होतं.सगळ्या मुंग्या सदासर्वदा कामांत असणं, आजारी,जखमी

मुंग्यांनी सेवेची अपेक्षा न ठेवता वारुळाच्या परिघावरच्या दालनांमध्ये जाऊन बसणं, सगळी नेहमीची वागणूक.

जखमींमध्ये खूपदा सर्वांत शूर सैनिक मुंग्या असायच्या.

कामकरी मुंग्या तर आजारी पडल्या,की वारूळच सोडून जात,की आपल्यामुळे इतरांमध्ये काही संसर्गजन्य रोग पसरू नये.म्हाताऱ्या मुंग्याही निरोगी असल्या तरी वारुळाच्या कडेला जायच्या,की आपलं आयुष्य संपत आलं आहे. त्या अन्न शोधत दूरवर भटकायच्या.हे एरवी धोकादायक काम त्या सहज करायच्या.वारुळाच्या रक्षणासाठी लढाईची वेळ आली,तर वयस्क सैनिक जास्त जोमानं पुढे व्हायचे,की आपण मेलो तरी वारूळ सुरक्षित राहील.माणसं आणि मुंग्यांमधला हा मोठा फरक आहे. माणसं तरुण पुरुषांना लढायला पाठवतात,तर मुंग्यांमध्ये म्हाताऱ्या 'बाया' लढायला जातात !


पण वारुळाचं जननेंद्रिय फक्त राणी मुंगी हेच होतं. वारुळातल्या सगळ्या मुंग्या,नवी वारुळं घडवू शकणाऱ्या नर-माद्या; सगळी एकट्या राणीची प्रजा होती.तिनं जगावं,पिल्लं देत राहावं,यासाठीच वारुळातल्या सर्व कामकरी मुंग्या,सैनिक मुंग्या स्वार्थत्याग करत होत्या.यापुढे पायवाट वारुळाचं जगणं-मरणं एकाच गोष्टीवर अवलंबून होतं.राणी मुंगीची जागा घेईल अशी नवी राणी मिळून स्थिरावेपर्यंत बसून राहणं.नवे जन्म सुरू होईपर्यंत टिकण्यासाठी सगळी कौशल्यं,सगळी ताकद,सगळ्या क्षमता वापरून काहीतरी जमणं आवश्यक होतं. (समाप्त )