रात्री जेवण झाल्यावर बापू ओसरीवर तक्क्याला टेकून पान खायला बसले.थोड्या वेळाने स्वैपाकघरातलं आवरून माईपण बाहेर आल्या.मंदा,मुक्ता आणि यशा आजूबाजूला घुटमळत होते.कारण जेवतानाच बापूंनी म्हटलं होतं की,'माईचं आटोपलं की,मला तुम्हा सगळ्यांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे.'
आठवीतला यशा,सहावीतली मंदा अन् चवथीतली मुक्ता ह्या सगळ्यांना आपण खूप मोठं झाल्यासारखं वाटायला लागलं.ह्या आधी कधीच बापूंनी किंवा घरी येणाऱ्या कुठल्याही पाहुण्यांनी त्यांच्याशी कधी कुठल्या विषयावर 'चर्चा' केली नव्हती. उलट घरात काही महत्त्वाची चर्चा चालू असेल तर मुलांना बाहेर पिटाळलं जायचं.त्यातल्या त्यात मंदा अन् मुक्ता ह्यांना तर नक्कीच.कारण यशा काहीतरी निमित्त काढून घरात घुटमळायचा आणि कान पाडून मोठी माणसं काय बोलतात ते ऐकायचा.आज मात्र बापूंनी माईच्या बरोबर त्या तिघांनाही चर्चा करणार असल्याचं सांगितलं.जेवण झाल्यावर मधल्या वेळेत तिघांनी ओट्यावर बसून अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला.यशा त्यांच्यात मोठा.तो म्हणाला,
"लक्ष्मी आणि पार्वतीबरोबर आणखी एखादी गाय विकत घेणार असतील."(गावगोत,माधव सावरगांवकर,प्रकाशक - संजय शिंदे - अष्टगंध प्रकाशन..)मंदाला वाटलं,
अभ्यासाबद्दल काही तरी असेल.'जास्त मार्कस मिळवायला पाहिजे' वगैरे काही तरी सांगणार असतील.
मात्र बापूंनी अनपेक्षितपणे धक्काच दिला ! बापूंना एका वर्षासाठी मुंबईच्या ऑफिसमध्ये कामासाठी जावं लागणार होतं.आजच ही गोष्ट त्यांना समजली होती.ती ऐकून माईसकट सगळ्यांनाच धक्का बसला.बापूंशिवाय घर ही कल्पनाच कुणी केली नव्हती! माईना तर काही बोलणंच सुचेना.
"अहो पण,हे कसं शक्य आहे? मी एकटी ह्या कच्चाबच्चांना घेऊन सगळं कसं सांभाळणार ? दुसरा काही मार्ग नाही का ?"
माईचंदेखील खरंच होतं.माईंचं जग उंबरठ्याच्या आतच सीमित होतं.बाहेर जाणं म्हणजे मंगळवार-शुक्रवार देवीला,शनिवारी शनिमंदिरात.एवढाच त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध यायचा.घरी सकाळपासून देवाची स्तोत्रं म्हणत,भूपाळ्या म्हणत,सडासंमार्जन,घराची झाडझूड, पार्वती-लक्ष्मी ह्या दोघींची निगा राखणं,त्यांचं चारापाणी बघणं अन् सगळ्यांच्या स्वैपाकाचं पाहणं... ही सगळी कामं माईंची.ह्या व्यतिरिक्त सगळं बापू करत किंवा करवून घेत.बापू रेव्हेन्यू खात्यात मामलेदार होते.त्यांचा दरारा होता.भाजीपाला-वाणसामान आणायला सीताराम चपराशी होता.तोच गुरांसाठी कडबा,घास, पेंड विकत आणून द्यायचा.बापू वर्षभर नसल्यावर आता घर कसं काय चालणार,घरातल्या लोकांशिवाय माईंचं बोलणं फक्त मारवाड्यांशी,रंगीशी आणि गल्लीतल्या इतर बायांशी होत असे.खरं तर,पार्वती आणि लक्ष्मी ह्यांच्याशीच ती जास्त बोलत असे. बापूही तिला म्हणत,'ह्या गायींशी काय तासन्तास बोलत असतेस ग? आणि त्याही तुझं बोलणं समजत असल्यासारखं ऐकतात.'तर सांगायचं असं की,बापू मुंबईला जाणार म्हटल्यावर माईना अन् मुलांना डोक्यावरचं छप्परच गेल्यासारखं वाटू लागलं.बहुदा बापूंना ह्याचा अंदाज आधीच होता. त्यांनी बोलायला सुरुवात केली..
"यशा काही आता लहान नाही.चांगला चौदा वर्षांचा आहे.तो बाहेरचा व्यवहार पाहील.काय हवं नको ते बाजारातून आणील.
तसा सीतारामपण मधूनमधून चक्कर मारील.पण त्याला आताच्या सारखं दररोज यायला काही जमणार नाही.पैशाचे व्यवहारपण आजपासून यशा पाहील."
बापूंनी जानव्यात बांधलेली पेटीची किल्ली यशाला दिली.यशाला आपण एकदमच मोठे झालो असं वाटलं !
"यशा,ट्रंकेत एक चंदनी पेटी आहे,त्यात पैसे आहेत. हिशेब लिहिण्याची वहीपण तुला देतो.त्यात सगळा हिशेब लिहून ठेवायचा.मागच्या महिन्यात सुखदेवने धान्य,गुळाची ढेप अन् चिंच आणून पोहचवलीय. वाणसामान मारवाड्याच्या दुकानातून आणायचं.मी मधूनमधून आल्यावर त्याचा हिशेब चुकता करत जाईन. सुखदेवची मजूरपावती नुकतीच लिहून घेतली आहे.ह्या वेळेला विश्वनाथ अन् राधू 'जमीन कसायला द्या' म्हणून मागे लागले होते.पण सुखदेवकडून मागच्या वर्षीचं धान्य यायचं बाकी होतं अन् गावच्या राजकारणात आपल्याला रस नसल्याने जमीन ह्या वर्षी सुखदेवकडेच ठेवलीय.त्यामुळे ते दोघे- विश्वनाथ अन् राधू नाराज झालेत.सुखदेवसारखीच त्यांचीही जमीन आपल्या शेताला लागून आहे.त्यामुळे त्यांना आपली जमीन कसण्यात स्वारस्य होतं.पण ते आता पुढच्या वर्षी बघू या.सुखदेव चेहऱ्यावरून गरीब वाटतो.पण तरुण असल्याने रांगडा आहे.अर्थात ह्या सगळ्याशी तुमचा काही संबंध येणार नाही.यशा घराकडे, मंदा-मुक्ताकडे नीट लक्ष दे.माईला काय हवं नको ते बघ."बापूंचं हे बोलणं ऐकून माईना हुंदकाच आला. कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली घेते तसं त्यांनी यशा-मंदा-मुक्ताला जवळ ओढून घेतलं.
"मुंबई काही लांब नाही.काहीही अडचण आली तर मला पत्र टाका,मी पाठवलेलं उत्तर तुम्हाला आठ दिवसांत मिळेल.चारसहा महिन्यांनी मी इकडे चक्कर मारीनच. काय यशा,जमेल ना तुला?" बापूंनी विचारलं.यशा फुशारून गेला होता.मोठ्या माणसासारखं म्हणाला,“बापू,तुम्ही इथली काही काळजी करू नका."
माई पहिल्या धक्क्यानंतर आता सावरल्या होत्या. यशाला असं मोठ्या माणसासारखं बोलताना पाहून त्यांना खूप बरं वाटलं.
त्याच्या केसांतून हात फिरवत त्या म्हणाल्या,"मोठं झालंय पोरगं.आणि हो,तुम्ही काही काळजी करू नका.गावात अन् गल्लीत आपल्या कुटुंबाबद्दल आदर अन् आपुलकी आहे.वेळप्रसंगाला मध्यरात्रीसुद्धा सगळे धावून येतील.अशोक जरी गाव सोडून मुंबईला गेला असला तरी त्याचे मित्र शंकर,बद्री, पुरुषोत्तम हे आहेत ना.माझी खात्री आहे,तुम्ही इथे नाही हे समजल्यावर तेदेखील अधूनमधून चक्कर मारत जातील.तुम्ही निश्चिंत मनाने जा.मी घर आणि मुलांना सांभाळीन.तुम्ही सांगता ना,तुमचे वडील गेले तेव्हा तुम्ही जेमतेम आठ वर्षांचे होतात.यशा तुमचाच मुलगा आहे. मला त्याची चांगली मदत होईल.शिवाय वरचेवर आम्ही तुम्हाला पत्र पाठवत जाऊ."
झालं.चर्चा संपली.माईच्या मनावर नाही म्हटलं तरी थोडं दडपण आलं.यशाला आपण एकदम खूप मोठं झाल्यासारखं वाटू लागलं आणि मंदा-मुक्ताला आपल्याला काय वाटतंय हे नीटसं समजलं नाही.पण बापू गेल्यावर आपणदेखील माईला कामात मदत करायची असं त्यांनी आपल्या गुप्तचर्चेत ठरवलं.
ठरल्याप्रमाणे पुढच्याच आठवड्यात बापू मुंबईला गेले. साऱ्यांचेच पहिले एकदोन दिवस खूपच अस्वस्थतेत गेले.माईंच्या भाषेत सांगायचं तर सगळ्यांना उघड्यावर पडल्यासारखं वाटायला लागलं आणि असं वाटणं स्वाभाविकच होतं.कारण तिन्ही मुलांसकट घर व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी आता एकट्या माईवर येऊन पडली होती.शिवाय पार्वती अन् लक्ष्मी ह्याही होत्याच.पार्वती गाभण होती.तिचे दिवस भरत आले होते.रात्री-बेरात्री ती अडली तर गवळीवाड्यातून पांडूला बोलवावं लागणार होतं.यशा मात्र अचानक मोठा झाल्यासारखा वागू लागला होता.घराची सगळी जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करत होता.
बाहेरची सगळी कामं करत होता.माईना त्याचं कौतुक वाटत होतं आणि कधी कधी अवेळी आलेल्या पोक्तपणाच्या त्याच्या भाषेचं त्यांना हसूदेखील यायचं.मंदा-मुक्ता मधूनमधून येऊन माईना काही मदत करू का म्हणून विचारायच्या. खरं तर,बापू इथे नसल्याने पडणाऱ्या कामांपैकी कुठलंच काम त्या करू शकणार नव्हत्या.तरीपण ह्या नव्या परिस्थितीत आपण काही तरी खारीचा वाटा उचलावा ही त्यांची भावना मात्र कौतुकास्पद होती.
एकंदरीत घर व्यवस्थित चाललं होतं.बापूंना मुंबईला जाऊन एक महिना झाला होता.त्यांचं एक पोहचल्याचं आणि नंतर खुशाली विचारणारंही पत्र येऊन गेलं. बापूंच्या पत्रांना उत्तर पाठवणं हा एक मोठा कार्यक्रम असायचा.सगळे एकत्र बसत.माई समोर बसून बापूंशी बोलताहेत अशा स्वरूपाची वाक्यं सांगत.यशा त्याच्या बालबुद्धीप्रमाणे आणि वर्गात पत्रलेखनाच्या तासाला शिकवल्याप्रमाणे त्याचं रूपांतर करी.माईच्या मजकुरात बारीकबारीक गोष्टी विस्ताराने असत.उदाहरणार्थ :
'कालच पार्वती व्यायली.गोऱ्हा झाला.चांगला लांबरुंद आहे.
पांढऱ्या रंगाचा आहे म्हणून मुली 'ढवळ्या' नाव ठेवू या म्हणत होत्या.पण यशाला 'नंद्या' नाव आवडलंय तुम्हाला काय वाटतं? पार्वतीला घुगऱ्या शिजवून घातल्या.ह्या दिवसांत चांगल्या असतात शिवाय काथबोळ पण दुकानातून आणला.तिला कणकेच्या गोळ्यातून दिलाय.काथबोळाने दूध चांगलं सुटतं म्हणतात तेवढंच गोऱ्ह्याचं पोट भरायला बरं.'
मंदा-मुक्तालादेखील आपण घरात केलेल्या मदतीबद्दल लिहावं असं वाटायचं.माईसुद्धा आठवणीने त्या तिघांचं भरपूर कौतुक करणारा भजकूर यशाला सांगत.तो ऐकत असाताना आणि लिहीत असताना त्यांचे फुलून आलेल चेहरे पाहण्यात माईना खूप समाधान वाटे. बापूंच्या उत्तरातदेखील त्या तिघांचं आठवणीने कौतुक केलेलं असे.माईच्याही कौतुकाचा आडवळणाने उल्लेख असे.यशाला त्या अर्धवट वयातही तो लक्षात येई. त्यावेळी तो माईच्या चेहऱ्याकडे पाही.माईसुद्धा कृतकोपाने यशाला म्हणत,"पुढे वाच.मध्येच का थांबलास?आणि इकडे तिकडे काय पाहतो आहेस?" तसा यशा पुढचं पत्र वाचायला लागे.
मंगळवारी गावचा आठवडेबाजार असे.खेड्यापाड्यातले लोक त्यांचं धान्य-भाजीपाला-फळं विकायला घेऊन येत.घरी जाताना वाणसामान,कधी कापडचोपड विकत घेऊन जात.एखादा प्रेमळ लेकुरवाळा पोरांसाठी रेवड्या,गुडीशेव,गुडदाणी कागदात बांधून घेई.खेळण्याच्या दुकानातून एखादी भडक रंगाची पिपाणी किंवा शिट्टी घेऊन पोरांची खूश झालेली तोंडं पाहायला उत्सुक असे.
यशाची शाळा सकाळची असे.बाजाराच्या दिवशी शाळा दोन तास लवकर सुटायची.अशाच एका मंगळवारी यशा शाळेतून घरी आला आणि पिशव्या घेऊन लगेच बाजाराला निघाला.यशाचा बाजार सोप्पा होता.मेथी, टमाटे,दुधीसारख्या स्वस्त भाज्याच तो घेई.
कारण पैसे पुरवून वापरणं ही सध्या त्याची जबाबदारी होती.खाऊ म्हणून तो फक्त केळी घेई.केळी तिथलंच उत्पादन होतं. त्यामुळे स्वस्तही असत.माईंनी सांगितलेला गवताचा भारापण घासाघीस करून घेतला.बाजारात त्याला लांब कुणाशी तरी तावातावाने बोलत असलेला सुखदेव दिसला.तो ज्याच्याशी बोलत होता,त्याला यशा ओळखत नव्हता.यशाने घरी आल्यावर पिशवी रिकामी करताना माईच्या कानावर ही गोष्ट घातली.अर्थात त्यात काही विशेष नव्हतं.पण बापूंनी तिन्ही मुलांना एक गोष्ट आवर्जून सांगितली होती की,'घरात किंवा शाळेत किंवा इतर कुठेही नेहमीपेक्षा काही वेगळी गोष्ट घडली तर ती आठवणीने येऊन माईला सांगायची.कारण तुम्ही लहान आहात.तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व कळणार नाही पण माईला ती गोष्ट महत्त्वाची वाटू शकेल.'
यशाने जेव्हा माईना सुखदेवला कुणाशी तावातावाने बोलताना पाहिल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनादेखील त्यात विशेष काही वाटलं नाही.आला असेल तो काही खरेदी करायला.घरात लहान मुलंबाळं आहेत.त्यांच्यासाठी काही कापडचोपड खाऊबिऊ घ्यायला.
कदाचित घरी परत जाण्याच्या आधी संध्याकाळी वाड्यावर चक्कर मारून जाईल.संध्याकाळी देवीच्या दर्शनाला जायच्या आधी माईनी यशाला कल्पना देऊन ठेवली अन् म्हटलं,
"बाहेर अंगणातच खेळ.मी नसताना सुखदेव आलाच तर मंदाला सांग चहा करून द्यायला."
माई देवीच्या दर्शनाला जाऊन आल्या.रात्री सगळी जेवायला बसली.तोवर सुखदेव आला नाही.माईंनी विचार केला,झाला असेल उशीर म्हणून परस्पर गेलाही असेल.जेवणं होऊन माई स्वैपाकघर आवरत असताना सुखदेव आला.माईना तो जरा अस्वस्थ वाटला.त्यांनी त्याला तसं विचारलं तर म्हणाला,"विश्वनाथ अन् राघूशी थोडी बोलणी झाली.लई वंगाळ शिव्या दिल्या.”
कथा शिल्लक राहिलेली पुढील लेखामध्ये…!