दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीला विशिष्ट मुखवटा देणाऱ्या, तांत्रिक पायावर उभारलेल्या अशा कित्येक कारखान्यांचा उद्भव झाला.कोळसा उद्योग,गिरण्या, लोहमार्ग,
पोलाद,स्वयंचलित यंत्र व वाहने यांची निर्मिती, अॅल्युमिनियम,रसायने,उपकरणे यांच्या कारखान्यांची उभारणी,त्याबरोबरच मोठ्या औद्योगिक शहरांचाही जन्म झाला उदा.गिरण्यांसाठी मॅचेस्टर,मोटारीसाठी डेट्रॉइट.अशी शेकडो उदाहरणे आहेत.आणि या औद्योगिक केंद्रातून एकसारख्या अशा लाखो उत्पादित वस्तूंचा वर्षाव सुरु झाला ! उदा- शर्ट,बूट,वाहने,घड्याळे,खेळणी ,साबण,शांपू,
कॅमेरा,मशिन गन्स व चलन यंत्रे (मोटर्स) नव्या इंधन पद्धतीचा आधार मिळालेल्या नव्या तंत्रज्ञानाने अतिशय मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्पादनाचे द्वार खुले केले.
व्हर्मिल्यन पॅगोडा
तथापि ह्या ढीगभर उत्पादनाला जर वितरणपद्धतीत योग्यवेळी केल्या गेलेल्या योग्य त्या बदलाची साथ मिळाली नसती तर व्यर्थ ठरले असते.पहिली लाट-संस्कृती अस्तित्वात असताना वस्तु हस्तकला पद्धतीने गि-हाइकांच्या आश्रयानुसार उत्पादन केली जात असे.वितरणाची पद्धतही त्यानुसारच होती.
आता ही गोष्ट खरी आहे,की पश्चिमेकडे मोठ्या आणि त्या त्या काळी आधुनिक ठरतील अशा व्यापारी संस्था, जुन्या सरंजामी व्यवस्थांमधील फटी रुंदावत, व्यापा-यांनी उभारलेल्या होत्या.या संस्थांनी जगभर नवे व्यापारी मार्ग सुरु केले,जहाजांच्या काफिल्यांची रचना व व्यवस्था केली,व उंटांच्या तांड्यांचीही योजना केली. त्यांनी काचेच्या वस्तु,कागद,रेशीम,चहा,जायफळे,दारु, लोकर,नीळ,जायपत्री अशा वस्तूंचा वापर केला.
तथापि यातील बहुतेक सर्व वस्तू ग्राहकांना छोट्या दुकानातून किंवा खेडोपाडी भटकत जाणाऱ्या फिरस्त्या व्यापाऱ्याच्या पेटाऱ्यातून मिळत असत.दळणवळण अगदीच 'दरिद्री' होते;आणि दळणवळणाचे मार्ग अगदी प्राचीन व रद्दी होते.
त्यामुळे वस्तूंच्या व्यापारावर खूपच मर्यादा पडल्या होत्या.हे छोटे दुकानदार आणि फिरते फेरीवाले ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तूंपैकी फारच थोड्या वस्तु पुरवू शकत होते.आणि पुष्कळ वेळा असे व्हावयाचे की ही किंवा ती वस्तू ग्राहकाला हवी असताना देखील महिनोगणती, वर्षानुवर्षे देखील या विक्रेत्यांनाच उपलब्ध झालेली नसायची !
दुसऱ्या लाटेने या ओझ्याने वाकलेल्या,करकरणाऱ्या वितरणपद्धतीत एका अर्थी आमूलाग्र ठरतील असे बदल,उत्पादनात अधिक प्रसिद्ध सुधारणा होत असताना घडवून आणले.लोहमार्ग,हमरस्ते,कालवे ज्या त्या पार्श्वभूमीनुसार तयार करण्यात आले.'व्यापाराचे प्रासाद' औद्योगिकीकरणासहित अस्तित्वात आले-पहिली डिपार्टमेंटल स्टोअर्स ! शेअर दलाल, घाऊक व्यापारी,कमिशन एजंट, उत्पादकांचे प्रतिनिधी यांची अक्षरश जाळी तयार झाली. इ. स. १८७१ मध्ये जॉर्ज हंर्टिग्टन हर्टफोर्ड याचे असले पहिले दुकान न्यूयॉर्कमध्ये उघडले.हे दुकान व्हर्र्मिलन लाल भडक रंगात रंगवलेले होते आणि याच्या रोख पैसे देण्याघेण्याचे व्यवहार करणाऱ्या कारकूनाचा कॅशियरचा पिजरा एखाद्या चिनी पॅगोडाच्या आकाराचा होता ह्या हर्टफोर्डनंतर हेन्री फोर्ड याने आपल्या कारखान्याच्या मालाच्या वितरणासाठी जे करणे शक्य होते ते सर्व केले ! त्याने या दुकानाची भरभराट करून त्याला अशा स्थितीत आणले,की ते जगातील पहिले साखळी पद्धतीचे विशाल दुकान ठरले.दि ग्रेट अटलांटिक अँड पँसिफिक टी कंपनी.
ह्या प्रकारच्या वितरणाने व्यापार देखील इतक्या मोठ्या प्रमाणात चालला आणि वाढला,की तो यंत्रांप्रमाणेच औद्योगिक समाजाचे केंद्र बनला आणि सुपरिचित होऊन राहिला.
ज्याला आपण तंत्रज्ञानाचे क्षेत्र म्हणतो,त्याच्यात संपूर्ण परिवर्तन ह्या बदलांनी घडवून आणले.समाज मागास आदिवासी असोत की शेतीप्रधान असोत की उद्योगप्रधान असोत,ते ऊर्जा वापरतातच;
वस्तूंची निर्मिती करतात आणि त्यांचे वितरणही करतात.सर्व समाजात ऊर्जा संस्था,उत्पादन संस्था आणि वितरण संस्था ह्या खुद्द त्यांच्याहून काही तरी मोठ्या अशा संकल्पनेचे,एकमेकींशी संबंधित असलेले विभाग असतात.ही त्यांच्याहून मोठी असलेली संस्था म्हणजे समाजाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर विशिष्ट स्वरुप धारण करत रहाणारे तंत्रज्ञान क्षेत्र होय.
जसजशी दुसरी लाट जगभर पसरत गेली,तसतसे शेतीविषयक तांत्रिक क्षेत्र बाजूला सरत गेले आणि त्याची जागा औद्योगिक तांत्रिक क्षेत्राने घेतली;पुन्हा भरून न येणाऱ्या प्रकारातील ऊर्जा फार मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाला थेट जोडल्या,आणि त्या जागी,अतिशय प्रगत अशा मोठ्या वितरण व्यवस्थेत वस्तूंचा जणू वर्षांव केला गेला.
अत्याधुनिक कुटुंब
ह्या,दुसन्या लाटेच्या तंत्रविज्ञान क्षेत्राला सामावून घ्यावयाला तितक्या क्रांतीकारक सामाजिक क्षेत्राची आवश्यकता होती;आमूलाग्र नवीन असणाऱ्या समाज संस्थेची आवश्यकता होती.याबाबत उदाहरण देऊन बोलावयाचे म्हटल्यास, औद्योगिक क्रांतीपूर्वी कुटुंबरचना ठिकठिकाणी वेगवेगळया पद्धतीची होती.परंतु शेतीने वर्चस्व राखलेले असल्याने,लोकांचा कल मोठ्या थोरल्या,अनेक पिढ्यांना एकत्र सामावून घेणाऱ्या घरात रहाण्याचा होता.या घरात काका असायचे,काक्या असायच्या,सासू सासरे असायचे,आजी आजोबा,चुलत मालत भावंडे असायची.सगळी एका छपराखाली एकवटलेली असायची.आर्थिक उत्पादन करणाऱ्या एखाद्या गटाप्रमाणे सर्वजण एकत्र काम करीत असत.
या प्रकारात हिंदुस्थानातील एकत्र कुटुंब,बाल्कन्स मधील जाद्रुगा' आणि पश्चिम युरोपातील 'विस्तृत कुटुंब' यांचा समावेश करता येईल.कुटुंब जणू काही जमिनीत पुरल्याप्रमाणे अचल होऊन राही.
ज्यावेळी पहिल्या लाटेला ओलांडत दुसरी लाट पुढेपुढे पसरत निघाली होती.त्यावेळी विविध समाज,कुटुंबे यांच्यावर बदलाचा ताण पडला.प्रत्येक कुटुंबात दोन लाटांच्या पाठीराख्यांचे झगडे उठत राहिले;पितृसत्ताक अधिकार रचनेवरही आघात झाले,मुले व त्यांचे मातापिता यांचे संबंध बदलले.मालमत्तेबद्दलच्या नव्या कल्पना उदयाला आल्या.जेव्हा आर्थिक उत्पादन शेतीकडून कारखान्याकडे गेले,तेव्हा कुटुंबातील सर्वांनी एकत्र,एखाद्या उत्पादक गटाप्रमाणे,काम करणे सोडून दिले.कामे करणाऱ्यांना कारखान्यात काम करण्यासाठी मोकळे रहाता यावे म्हणून कुटुंबाची प्रमुख कामे नव्या तज्ञ संस्थांकडे सोपवण्यात आली.मुलांचे शिक्षण शाळांकडे सोपवण्यात आले.वृद्धांची काळजी घेण्याचे काम आश्रयगृहांवर किंवा शुश्रूषागृहांवर सोपविण्यात आले या सर्वांपेक्षा विशेष गोष्ट म्हणजे नव्या समाजाला इकडून तिकडे हालण्याची आवश्यकता होती त्यासाठी जे आपल्या उद्योगानुसार एक जागा सोडून दुसरीकडे जायला तयार होतील असेच कामगार हवे होते.
वयस्कर नातेवाईकांच्या मुळे,आजाऱ्यांमुळे,अपंगांमुळे आणि पुष्कळ मोठ्या प्रमाणात मुलेबाळे असल्यामुळे व एकूण सर्व जबाबदाऱ्यांमुळे विस्तृत कुटुंबाने जागा सोडणे अशक्यच होते,म्हणून हळूहळू परंतु दुःख सावरत कुटुंबाची रचना बदलायला सुरुवात झाली. शहरांमध्ये जाऊन रहावे लागल्यामुळे,फाटाफूट होऊन, आर्थिक वादळांनी उध्वस्त होऊन,कुटुंबांनी नको असणाऱ्या नातेवाइकांना दूर करून छोटा आकार घेतला.नव्या तांत्रिक क्षेत्राला सुयोग्य ठरतील अशा त-हेने त्यांची रचना झाली.आणि ती हलती रहाण्यास बदलीला अधिक सोयीची ठरली.आई,बाप आणि त्यांचीच व तीही थोडीच मुले याशिवाय इतर कोणत्याही जवळच्या वा लांबच्या नातेवाईकांचा ज्यात समावेश नाही;अशी केंद्र कुटुंबपद्धती रुढ झाली आणि समाजानेही तिला मान्यता दिली.समाजवादी असो की भांडवलशाही असो,सर्व उद्योगप्रधान समाजात आढळणारा हा कुटुंबाचा 'आधुनिक' नमुना ! जेथे आपल्या पूर्वजांची पूजा होत असल्याने वडिलधाऱ्यांना अगदी अपवादात्मक ठरावी अशी महत्त्वपूर्ण भूमिका दिली जाई;मोठी,अगदी जिव्हाळ्याने एकत्र रहाणारी, अनेक पिढ्यांचा अगत्याने समावेश होई,अशी जपानमधील कुटुंबे देखील दुसरी लाट आल्यावर मोडून जाऊ लागली.आणि दिवसेदिवस अधिकाधिक केंद्र-कुटुंबे अस्तित्वात येऊ लागली.
थोडक्यात,दुसऱ्या लाटेच्या समाजांची अशी न्यूक्लिअर,एकेरी कुटुंबे, व्यवच्छेदक लक्षण बनून राहिली.त्यामुळे पहिल्या लाटेच्या समाजाहून तीही भूगर्भ इंधने,पोलाद गिरण्या, किंवा साखळी दुकाने यांच्या प्रमाणेच तिच्या भिन्नतेमुळे वेगळी उठून दिसू लागली.
प्रच्छन्न अभ्यासक्रम
जसजशी कामाची जागा शेत व घर सोडून कारखान्यात एकवटली,तसतसे मुलांनी कारखान्यातील जीवनासाठी सज्ज होणे आवश्यक झाले.
अॅण्ड्रयू उर याने इ. स. १८३५ मध्ये म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या खाणी,गिरण्या व कारखाने यांच्या मालकांना असे आढळून आले,की "ज्यांनी आपल्या वयाची कोवळीक ओलांडली आहे अशा माणसांना मग ती ग्रामीण जीवनातून आलेली असोत,की हस्तोद्योगाच्या व्यवसायातून आलेली असोत कुशल कारखाना कामगार म्हणून तयार करणे जवळजवळ अशक्यच होते." तरुण वयातच औद्योगिक जीवनपद्धतीनुसार व्यक्तींची घडण घडलेली असेल,तर औद्योगिक शिस्तींचे नंतर निर्माण होणारे प्रश्न अगदी सुलभतेने सुटतील. अशा विचारांतून दुसरी लाट संस्कृतीचे दुसरे एक महत्त्वपूर्ण अंग जन्माला आले-सामुदायिक शिक्षण.कारखान्यांच्या धर्तीवर सामुदायिक शिक्षण योजना पायाभूत वाचन,लेखन,अंकगणित,थोडा इतिहास आणि इतर विषयांचे ज्ञात देऊ लागल्या.हा उघड दिसू शकणारा अभ्यासक्रम होय.परंतु याच्याही मागे याहूनही खूपच अधिक पायाभूत असणारा प्रच्छत किवा अदृश्य अभ्यासक्रम अस्तित्वात होता.पूर्वी आणि आताही बहुतेक सर्व औद्योगिक देशांमध्ये अस्तित्वात असलेल्या या अभ्यासक्रमात तीन क्रम आवश्यकतेने अंतर्भूत असतात.एक म्हणजे वक्तशीरपणा,दुसरी गोष्ट म्हणजे आज्ञाधारकपणा आणि तिसरी गोष्ट पाठांतर किंवा एखादी गोष्ट पुनः पुन्हा करणे कारखान्यातल्या कामात कामगारांनी विशेषतः प्रत्यक्ष यंत्रचालकांनी वेळेवर हजर होणे ही आवश्यक गोष्ट होती.आणि कामगारांनी,
आपल्या वरिष्ठांकडून आज्ञा घेणे आणि कसलाही प्रश्न किवा विचार न करता त्या अंमलात आणीत काम करीत रहाणे आवश्यक होते.कामगार पुरुष असोत की स्त्रिया,त्यांनी यंत्रांशी किवा कचेरीत तेच तेच काम करीत रहाणे व त्यायोगे यंत्रवत् आचरण करणे ही गोष्ठ अपरिहार्य अशी ठरली.
याप्रमाणे एकोणीसाव्या शतकाचे मध्यंतर उलटल्यावर, दुसरी लाट वेगाने देशोदेशी जाऊन तिने तेथील कब्जा घेतल्यानंतर,शिक्षणाचा एकप्रकारे निष्ठुर क्रम अंमलात येऊ लागला.मुले लहान लहान वयातच शाळेत जाऊ लागली.अभ्यासाची वर्ष वाढली,आणि दिवसेदिवस शिक्षणाचा कालावधी मोठा मोठा होऊ लागला.
सार्वजनिक शिक्षण ही सुसंस्कृत होण्याच्या प्रगतीतली प्रमुख पायरी ठरली.न्यूयॉर्क शहरातील तंत्रकुशल व कामगार यांच्या एका गटाने इ. स. १८२९ मध्ये असे जाहीरपणे म्हटले की,"जीवन आणि स्वातंत्र्य यांच्या खालोखाल शिक्षण हे मानवी जीवनाला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे,असे आम्ही मानतो." तरीही आपण असे म्हणू शकतो की या दुसऱ्या लाटेतील शाळांनी पिडीमागून पिढी यंत्रवत् केली आणि यंत्रतंत्र ज्ञानाला योग्य असे आणि यंत्राशी यंत्रवत् आचरण करू शकणारे असे सहज वळवता येईल असे,पण कडक शिस्त आचरणारे असे कामगार दल तयार केले.एकूण औद्योगिक समाजाला योग्य असे तरुण तयार करण्याच्या दृष्टीने जी एकसूत्री पद्धत तयार झाली,तिचे न्युक्लीअर कुटुंबे आणि कारखाना पद्धतीचे शिक्षण हे प्रमुख भाग ठरले.या बाबतीत ही दुसरी लाट समाज, मग ते कोणत्याही देशातील असोत,एक सारखे ठरले.
अमर अस्तित्व
दुसऱ्या लादेतील या समाजांमध्ये पहिल्या दोन्हींवर सामाजिक ताबा ठेवू टाकणारी तिसरी संस्था उदयाला आली ती संस्था म्हणजे संघटित संस्था कॉरिशन ह्या काळापर्यंत उद्योग क्षेत्रातील ही विशिष्ट योजना व्यक्ती किंवा कुटुंब किंवा भागीदार यांच्या मालकीची असायची, कॉर्पोरेशन्स होत्या,परंतु त्या क्वचित् कुठेतरी अशा होत्या.औद्योगिक इतिहासाचे अभ्यासक ऑर्थर ज्युडंग यांच्या मते अमेरिकन क्रांतीपर्यंत कोणालाच असे वाटले नव्हते,की भागीदारी किंवा वैयक्तिक मालकी यांच्या ऐवजी प्रशासक अशी प्रमुख संघटना कधी अस्तित्वात येईल.
मोठया प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यानंतर सर्व बदलले. दुसऱ्या लाटेतील तंत्रज्ञानाचा एखादी व्यक्ती किंवा एखादा छोटा गट पुरवू शकेल यापेक्षा कितीतरी अधिक भांडवलाची-भांडवलाच्या प्रचंड साठ्याची आवश्यकता होती.प्रत्येक वेळी भांडवल गुंतवताना हे मालक किवा भागीदार आपले सर्वस्व पणाला लावीत,परंतु अतिविशाल आणि अनिश्चित भविष्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवायला ते का कू करत असत.त्यांना याबाबतीत प्रोत्साहित करण्यासाठी लिमिटेड कंपन्यांची कल्पना पुढे आली.त्या योजनेनुसार जर संस्था कोसळली,तर ज्यांनी त्यांनी गुंतवलेली रक्कमच तेवढी बुडायची. अधिक धोका नव्हता.या नवीन संशोधित कल्पनेमुळे गुंतवणूक अक्षरशः लोंढा फुटून होऊ लागली.
शिवाय कोर्टानी कॉर्पोरेशन हे 'अमर' किंवा चिरंतन अशा प्रकारचे अस्तित्व असल्याचे गृहीत धरल्यानेही असा स्पष्ट अर्थ झाला,की मूळ संस्थापक घटकांपैकी कोणीही गळाले,तरी मूळ संस्था चालूच रहाणार, त्यामुळे एक झाले,की अशी संघटित संस्था अधिक कालावधींच्या,मोठ्या पल्ल्याच्या योजना आखू शकत होती आणि पूर्वी कधी घेतले गेले नसतील इतके प्रचंड मोठे काम हाती घेऊ शकत होती.
कॉर्पोरेशन हा सर्व उद्योगप्रधान देशांच्या आर्थिक जीवनातील अंगभूत भाग बनून राहिला देश समाजवादी असो की.भांडवलशाही तेथे कॉर्पोरेशन्स फार तर बाह्य स्वरुपात थोड्या फार भिन्न असतील,पण मूळ संघटन कल्पना सर्वत्र एकच होती.
दुसऱ्या लाटेचा अंगिकार करणाऱ्या समाजातील सामाजिक संस्थांत न्युक्लिअर कुटुंबे,कारखानावत् शाळा आणि प्रचंड कॉर्पोरेशन्स ह्या तीन गोष्टी प्रमुख लक्षणे ठरून गेल्या.
दुसऱ्या लाटेने व्यापलेल्या संपूर्ण जगात जपान, स्वित्झर्लंड,ब्रिटन,पोलंड,अमेरिका,रशिया- बहुतांश देशांतील लोकांनी एका ठराविक जीवनमार्गाचा अवलंव केला.त्यांची कुटुंबे अतिकेंद्रित झाली,कारखानावत् शाळा चालवून शिक्षण प्रशिक्षण यांचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला,आणि खाजगी असोत की,सार्वजनिक स्वरुपाच्या असोत,मोठ्या कॉर्पोरेशन्समधील नोकऱ्यांचा स्वीकार केला.आणि संपूर्ण जीवनावर या दुसरी लाट जीवनपद्धतीचा पगडा बसला.
संगीताचा कारखाना
आणि जीवनपध्दतीच्या याच गाभ्याभोवती इतर अनेक संघटना उद्भवल्या.सरकारी मंत्रिमंडळे,क्रीडा संघ,चर्च, व्यापारी संस्था,ट्रेड यूनियन्स,व्यावसायिक संस्था, राजकीय पक्ष,वाचनालये,मनोरंजन करणारे गट,मानव वंशासंबंधीच्या संस्था अशा हजारो संस्था दुसऱ्या लाटेच्या आवेगाबरोबर अस्तित्वात आल्या.आणि यातून असे गुंतागुंतीचे रचनात्मक संबंध निर्माण झाले,की यातला प्रत्येक गठ एकमेकांशी सेवेच्या,सहकार्याच्या एकमेकांच्या तोलाच्या संदर्भात एकमेकांशी संबंधित बनून राहिला.परस्परावलंबन,काही अंशी तरी,निर्माण झाले.वरवर पहाता हे विविध प्रकारचे गट किंवा या संघटना गोंधळ आणि निरूद्देश्यता प्रकट करतात.परंतु नीट पाहिले असताना आपल्याला त्यात एक धाटणी किंवा सुसूत्रता आढळून येते.दुसऱ्या लाटेखाली आलेल्या देशांत समाजसंशोधकांना कारखाने हा सर्वात प्रगत आणि कार्यक्षम प्रतिनिधी वाटला.त्यामुळे कारखान्याच्या कार्यप्रणालीत महत्त्वाची ठरणारी तत्त्वे त्यांनी जीवनातील इतर कार्यसंस्थांनाही लागू करण्याचा प्रयत्न केला.शाळा,इस्पितळे,तुरूंग,राजकीय नोकरशाह्या आणि इतर संस्थांनी त्यामुळे कारखान्याची वैशिष्टये उचलली.तेथील कामाची विभागणी,तेथील ज्येष्ठताक्रम,तेथील कठोर अलिप्तता या व अशा इतर काही गोष्टी.कलेच्या क्षेत्रात देखील आपल्याला कारखान्यातील काही तत्त्वें आढळून येतात.
तीन लेखातील दुसरा भाग…१६.०६.२६ रोजी पहिला भाग प्रकाशित.