* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१०/१०/२२

...आणि देवदूत हसला...! लिओ टाॅलस्टाॅयची ही एक अतिशय प्रसिद्ध व सुरस कथा.

एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं.एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं..तो तिथे पोचला पण...थोडा संभ्रमात पडला.त्या स्त्रीची तीन लहान जुळी ( खरंतर तिळी म्हणतात त्यांना) बाळं रडत होती..त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते,आणि आता आईविना ती अनाथ होणार होती.हे सर्व बघून देवदूताला दया आली तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमदेवाकडे आला, व सर्व परिस्थिती सांगितली ती ऐकून यमराज भडकले, तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का?? प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा निसर्गनियमांमध्ये हस्तक्षेप करत नाही.मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास?त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे.मी दुसर्‍या दूताकरवी ते काम करीनच पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल,व जोपर्यंत तू स्वतः तीनवेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस तो पर्यंत तुझी सुटका होणार नाही...तू इथे परत येऊ शकणार नाहीस.(इथे मला एक महत्वाची गोष्ट  सांगाविशी वाटते की,दुसर्‍याच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस हसतो पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य लागतं..) दूत शिक्षा भोगण्यास तयार होता..यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकललं गेलं.त्याच सुमारास समोरुन एक चर्मकार येत होता.थंडीचे दिवस (व तीसुद्धा रशियातली थंडी) येऊ घातले होते,म्हणून आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेटस् खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता.त्याने या वस्त्रहीन देवदूताला बघितलं त्याला दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी ह्या माणसासाठीच कपडे,ब्लँकेट वगैरे खरेदी केलं व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं देवजाणे तो दूताला म्हणाला,"अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार आहेस?" माझ्या घरी चल काही दिवस...! माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल पण तू मनाला लावून घेऊ नकोस..काही दिवसांनी सगळं ठीक होईल.त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला ( आता मजा बघा हं!  त्या चर्मकारालाही माहीत नव्हतं,आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत ना त्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रुपात कोण आलाय ! ) त्याची ओळख करुन देत चर्मकाराने सांगितलं हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे.घरी आलेल्या आगंतुकाला बघून पत्नीचं टाळकंच सरकलं,त्याच्या समोरच म्हणाली, "इथं आपल्याला गिळायला अन्न नाहीय त्यात भरीस भर म्हणून ही ब्याद का मागे लावून घेतलीय?"

...आणि देवदूत पहिल्यांदा हसला..चांभाराला आश्चर्य वाटलं ती तुला एवढं बोलली आणि तू त्यावर हसत आहेस?? त्यावर देवदूत म्हणाला अशाप्रकारच्या अजून दोन घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यानंतर ह्याचं उत्तर देईन..! आजच्या घटनेवर दूत हसला कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पतिराजांनी ज्याला घरी आणलं आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामधे दैवी शक्ती आहे..ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसांतच त्यांचं भाग्य उजळणार आहे...मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात ना? (हम उतना ही देख लेते हैं जितना हमें ऊपरी तौर पर दिखता हैं नियती के मन में तो कुछ और ही होता हैं ) पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होतं.. जो खो गया उसे देख रही थी जो मिला हैं उसका क्या??उसका तो अंदाज ही नहीं है-मुफ्त ! घर में एक देवदूत आया है।


सात दिवसांतच देवदूत चांभाराचं सर्व कसब शिकला...व देवदूताने बनविलेले चामड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले,की जो-तो त्यांची स्तुती करु लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला.अवघ्या सहा महिन्यांत तर त्याची अशी ख्याती पसरली की ह्या चांभारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही.अन्य देशांतील राजांचेही जोड बनविण्याचे काम चांभाराकडे येऊ लागले व घरामधे अपार संपत्ती येऊ लागली.दिवस-महीने-वर्ष पुढे सरकत होती..एकदा असं झालं.. सम्राटाचा एक अधिकारी आला..चांभाराकडे  कातडं सोपवलं व म्हणाला हे खूप दुर्मीळ व महागडं कातडं आहे..तुझी कारीगरी सम्राटांना पसंत आहे म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आपले बूट बनवण्यासाठी दिलं आहे. चूक झाली झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत.लक्षात ठेव सम्राटाच्या पायाकरीता बूट बनवायचे आहेत  स्लीपर नाही..! अधिकार्‍याने स्पष्टपणे खडसावले..! (रशियामधे मृत व्यक्तीला स्लीपर  घालून स्मशानांत नेण्याची प्रथा होती) 

चांभारानेसुद्धा देवदूताला बजावलं हे बघ,सम्राटांच्या पायाकरीता या दुर्मीळ कातड्याचे बूट बनवायचे आहेत. स्लीपर नव्हे व कातडं सुद्धा बूटाच्या मापापुरतेच आहे..काही गडबड झाली तर नसती आफत ओढवेल...एवढं निक्षून सागूंनही देवदूताने स्लीपरच बनवल्या..चांभाराने त्या बघितल्यावर तो इतका क्रोधीत झाला व देवदूताला काठीने झोडपून काढले.. तू मला फासावर लटकवणार आहेस का? इतके वेळा बजावले तरी तू स्लीपर का बनवल्यास?देवदूत जोरजोरात हसू लागला...! तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व म्हणाला बूट नको स्लीपर बनव...

आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे उद्या त्यांचा अंत्यविधी आहे...

( भविष्य अज्ञात असतं व आपण गतकाळातील अनुभवांवर जगत असतो.काल सम्राट असताना बूटासाठी आटापिटा होता.... आज स्लीपर हवी आहे.)

..चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या ... अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला.. मी तुला उगाच मारले...देवदूताने शांतपणे सांगितलं अरे, ह्यात तुझा काहीही दोष नाहीय मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय.आज दुसर्‍यांदा देवदूत हसला कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत. साध्या घटनांमधेसुद्धा चिडचिड,त्रागा करत बसतो.मृत्यूघटीका समीप असताना जीवनाचे गणित बांधत रहातो व नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं..

देवदूताला जाणवू लागलं त्या तीन अनाथ मुलींचं भवितव्य काय? हा अनाठायी विचार मी करत होतो...!

काही दिवसांतच तिसरी घटना घडली....या चांभाराकडे

एका धनाढ्य घराण्यातील वृद्ध स्त्री आली व बरोबर  तीन सुंदर युवती आल्या..तीनही युवतींचे लग्न ठरलं होतं त्यांच्यासाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते.देवदूताने तीन मुलींना पाहताक्षणीच ओळखलं ह्याच त्या तीन मुली होत्या ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमधे स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता.त्या तिघीजणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या.देवदूताला उत्सुकता वाटली त्यांच्या बरोबर जी वृद्धा आली आहे ती कोण आहे? वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली.ह्या मुली माझ्या समोरच रहात होत्या.ह्यांची आई लहानपणीच देवाघरी गेली.ती अतिशय दारिद्र्यात दिवस कंठत होती. तिच्या पश्चात् ह्या मुलींचं कसं होणार? मला दया आली व ह्या तिघींना मी दत्तक घेतलं, मलाही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलींप्रमाणे ह्यांचं पालनपोषण केलं व आता सम्राटाच्या राजपुत्रांशी ह्या तिघीजणी विवाहबद्ध होणार आहेत...हे ऐकल्यावर..देवदूत तिसर्‍यांदा व शेवटचं हसला....त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली.


आज जर त्या तीन मुलींची आई जिवंत असती तर ह्या तिघीजणी दारिद्र्यात खितपत पडल्या असत्या..पण आता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली, व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व तिघीजणींनी समृद्धी उपभोगली..तसेच वृद्ध स्त्रीला संतानसुख मिळालं...!

देवदूताने सांगितलं मी चुकलो होतो..नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे.तिच्या कार्यामधे मी  हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली...आता मी तुझा निरोप घेतो.......!


एवढं बोलून तो

देवदूत पाहता-पाहता तिथून अदृश्य झाला...!


कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्याबरोबर ठेवायचा आहे...!


लेखक - अज्ञात




८/१०/२२

'जिवंतपणाची जाणीव करून देणारा अनुभव…

'एकदा आम्ही बांधवगडच्या जंगलात फिरत होतो. अचानक लंगुरने दिलेल्या कॉलवरून गाईडने जवळच वाघ-बिबळ्या असावा अशी खूण केली आणि आमच्या गाड्या थांबल्या... सर्वांचे कान कॉलच्या दिशेने टवकारले गेले. एक वाघीण डाव्या बाजूच्या बांबूच्या गचपणातून बाहेर पडली आणि रस्त्याकडे यायला लागली. मध्येच ती थांबली आणि मागे वळून बघितलं... मनाचा निर्णय न झाल्यासारखी तशीच थांबली आणि नंतर तिने हळूहळू समोरचा रस्ता ओलांडला, थोडी पुढे गेली आणि नंतर गवताच्या दाट पॅचमध्ये शिरून तिथेच रस्त्याकडे बघत मुरून बसली...एकूण वागणुकीवरून कळत होत की 'all is not well'...गाईड म्हणाला की ही बच्चेवाली वाघीण आहे.आणि गेल्या काही दिवसात तिला तिच्या बच्च्यांबरोबर बऱ्याच वेळेला या ठिकाणी बघण्यात आलंय... कदाचित तिचे बच्चे रस्त्याच्या अलीकडे असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण गाडी थोडी पुढे घेऊया... आम्ही गाडी फर्लांगभर पुढे घेतली आणि थांबलो. वाघिणीची नजर होतीच... बराच वेळ ती हलली नाही आणि मग मात्र ती गवतातून बाहेर पडली, परत रस्त्यावर आली,थांबली,आमच्या दिशेला बघत मिनिटभर उभी राहिली, आसपास काहीही धोका नाही याची खात्री पटल्यावर रस्ता ओलांडला आणि एकदा दोनदा 'आऽऽऊ, आऽऽऊ' असा दबक्या आवाजातील कॉल दिला (डरकाळी नव्हे). त्याक्षणी बांबूच्या गचपणातून दोन छावे बाहेर पडले आणि सावकाश वाघिणीपर्यंत आले. तिने त्यांचे अंग एकदा चाटले आणि मग तिच्या पावलावर पाऊल टाकून ते सर्व जण रस्ता ओलांडून गवताच्या दिशेला निघून गेले...'


काय झालं असावं ? मगाशीच या कुटुंबाचा रस्ता ओलांडण्याचा इरादा होता पण वाघीण रस्त्याच्या जवळ आली आणि आमची गाडी तिला दिसली त्यामुळे तिने पिल्लांना घेऊन रस्ता ओलांडणे रद्द केले. तिला त्यांच्या अस्तित्वाचं भांड फोडायचं नव्हत. तिने एकटीने रस्ता ओलांडला,वाट बघितली आणि आमची गाडी पुढे गेलीये आणि फारसा धोका नाहीये हे कळल्यावर ती परत रस्त्यावर आली. परत एकदा धोका नाही याची खात्री करून घेतल्यावर तिने विशिष्ट कॉल देऊन त्यांना बोलावलं. या प्रसंगात तिचा एक निराळा कॉल, वागणूक याचं निरीक्षणं अतिशय सुंदर अनुभव देणारं होतं...!


असा अनुभव आपल्याला मांजर पिलांना कशी बोलावते याचे निरीक्षण करून सुद्धा घेता येईल. कुत्रे, मांजर, पक्षी यांच्या बाबतीत देखील आपण पिल्ले आणि पालक यांच्यातील संवादाच्या वेळचे आवाजातील बदल नोंदवू शकतो.


 'अरण्यवाचन' या पुस्तकातून…विश्वास भावे


६/१०/२२

मनाला चटका लावणारी लक्ष्मी…

अंगणातल्या चिंचेखाली बांधलेली आमची लक्ष्मी दावणीला हिसका देऊन ओरडायला लागली की,मी पटकन दप्तर काढून पुस्तक हातात धरून बसायचो.माझ्यासोबत माझ्या चारही बहिणी बसायच्या,तेवढ्यात इतक्या घाईने आमची आई टीव्ही बंद करायची आणि बाहेरच्या छपरात चुलीजवळ जाऊन बसायची.एका क्षणात सुरू असलेला सगळा दंगा बंद व्हायचा आणि जणू काही या घरात सात पिढ्यापासून कसलाच आवाज नाही अशी शांतता व्हायची.ही अंगणात चिंचेखाली बांधलेली आमची लाडकी म्हैस...आणि ही दावणीला हिसका देऊन ओरडायला लागली की समजून जायचं आमचे वडील आले.वडिलांना आम्ही सगळेच घाबरायचो.त्यांनी कधी माझ्यावर हात उचलला नाही.पण भिती तेव्हा होती ती आजही आहेच.वडील आले की,बाहेरच्या हौदातलं पाणी घेऊन हात पाय तोंड धु पर्यंत लक्ष्मी अक्षरशः हंबरडा फोडून ओरडत राहायची.मग एका बादलीत पाणी भरून ते लक्ष्मी जवळ जायचे.विशेष म्हणजे त्याच बादलीत पाणी दिलं तरच लक्ष्मी पाणी प्यायची.दुसरी कुठली बादली किंवा घमेलं ठेवलं की ती लाथ मारून सांडायची आणि मान मुरडून उभी राहायची.तिचं ते रूप म्हणजे एका नव्या नवरीने लाडाने रुसावं असंच.कामावरून आल्याबरोबर वडील तिच्याजवळ जायचे.तिच्या मानेवर मान टाकून खूप वेळ तिच्याशी बोलायचे."ये लक्ष्मी,काही खाल्लं का तू.काय होतंय तुला,घे पाणी पी" असं लाडाने बोलून बादली तिच्यासमोर ठेवायचे तेव्हा लक्ष्मी आधी वडिलांचा हात जिभेने चाटायची आणि मग डोळे झाकून शांतपणे पाणी प्यायची.तिच्या पाणी पिण्याचा एक विशिष्ट आवाज यायचा तो आवाज आजही मी विसरू शकलो नाही.

आमच्या मोठ्या आत्याकडे भाऊबीज ला एकदा वडील कोल्हापूरला गेले होते तेव्हा आमच्या आत्याच्या दावणीला असणाऱ्या गर्दीत ही एक रेडी होती.काय माहीत पण वडिलांना तिचा आणि तिला वडिलांचा लळा तिथंच एका दिवसात लागला.तिथून वडील निघताना ती ओरडायला लागली.तेव्हा आमची आत्तीच म्हणली.जा घेऊन,दारात असावं जनावरं एखादं.घरात लक्ष्मी नांदते.वडिलांनी ही तिचु दावणी सोडली.गळ्यात लोढणा घालून वडिलांनी तिला सोळा तासांचा प्रवास करून चालवत आणली होती.त्या सोळा तासाच्या प्रवासातच वडिलांनी तिचं बारसं घातलं आणि ही लक्ष्मी आमच्या चिंचेखाली दावणीला आली.

लक्ष्मीला तिच्याजवळ आई,मी किंवा वडील या तिघांना सोडून जवळ कुणी गेलेलं चालत नव्हतं.तशी तिनं तीन बाळंतपणं या चिंचेखाली सुखरूप काढली होती.दुधाची कमी कधी नव्हतीच.पण धार काढायला फक्त वडीलच हवेत बाकी कुणी तिच्या कासेला हात लावायचं धाडस कधी केलं नाही.तिच्या या हट्टामुळे वडिलांना कुठे कधी जाताच आलं नाही.पण लक्ष्मी आमच्या घरातील एक महत्वाची सदस्य झाली होती.आणि आमची सर्वांची लाडकी झालेली होती.ती यासाठी की वडील आले की ती आम्हाला सावध करायची.आणि या कामात तिने कधीही खंड पडू दिला नाही.कदाचित या कारणासाठी लक्ष्मी आमची खूप लाडकी होऊन गेली होती. देशी बेंदूर म्हणून एक सण येत असतो आमच्या पश्चिम महाराष्ट्रात.या सणाला वडील आमच्या लक्ष्मीला असं काही नटवायचे की बस्स.तिची शिंगं अशी तलवारीसारखी होती.त्याला लालभडक रंग.अंगारवची केसं सुद्धा वडील अगदी स्टाईल मध्ये कातरायचे.त्या शिंगांना भारीतले असे रंगीबेरंगी गोंडे.पायाची नखे सुद्धा अगदी नेलपेंट ने रंगवावी अशी रंगवायचे.तिला अंघोळ घालताना सुद्धा अखंड एक लाईफबॉय आणि पाच सहा शांपूच्या पुड्या संपून जायच्या.तेव्हा अंगणात सगळीकडे त्या शांपू चा वास दरवळत राहायचा.आणि लक्ष्मी अशी काही थाटात अगदी शांतपणे डोळे मिचकावत उभी राहिलेली असायची.तिला सगळं नटवून झालं की मग मी घरातला आरसा घेऊन तिच्यासमोर धरायचो.तेव्हा जरा मान डावीकडे मग हळूच तशीच उजवीकडे ती आरशात बघायची आणि पाय आपटून जोरात हंबरायची.आणि मग वडील तिच्या जवळ जाऊन "लाडाची ग माझी लक्सा " असं म्हणून तिच्या दोन्ही शिंगाच्या मध्ये हळूच ओठ टेकवायचे.आणि लक्ष्मी मग वडिलांच्या गालावरून जीभ फिरवून वडिलांचा गाल पार भिजवून टाकायची.वडिलांनाच काय पण आम्हाला सुद्धा कधी त्याचं काहीच वाटलं नाही.उलट मला खूप मनातून वाटायचं की लक्ष्मीने माझा ही गाल तसाच तिच्या जिभेने ओला करावा.मी एकदा दोनदा प्रयत्न केला होता पण तिने काही तो माझा हट्ट पुरवला नव्हता.लक्ष्मीला जसं एवढ्या लाडात नटताना मी पाहिलं. तेवढं नटताना माझ्या आईला सुद्धा आम्ही कधी पाहिलं नव्हतं.

माळावर चरायला सोडलेली लक्ष्मी मला आजही आठवते.तेवढा परिसर सोडून ती कधीच कुठे जात नव्हती.कुणाच्या अंगणातल्या रोपट्याला तिने कधीच तोंड लावलं नाही.कोणतीच बाई आमचं हे खाल्लं म्हणून बोंबलत आमच्या दारात कधी आल्याचं मला आठवत नाही.वडिलांनी दोन बोटे ओठावर टेकवून जोरात शिट्टी मारली की लक्ष्मी जिथे असेल तिथून जोरात धावत यायची.तिच्या त्या धावण्यात सुद्धा एक नजाकत आणि जगातील फार सुंदर संगीत मला कायम दिसायचं.

 लक्ष्मी गाभण होती.म्हणजे गरोदर होती.लक्ष्मीला बाळ होणार म्हणून आम्ही रोज तिच्या पोटावरुन हात फिरवून बघायचो.एक दिवस बँकेचे काही लोक आले तेव्हा वडील छपरात लपून बसले आणि त्यांनी आईला वडिलांबद्दल विचारलं तेव्हा,आईने सांगितलं की वडील बाहेरगावी गेलेत दोन दिवसांनी येतील.तेव्हा त्या बँकेच्या लोकांनी तिच्या हातात कसलातरी कागद दिला आणि ते निघून गेले.आम्हाला गप्प घरात बसायला सांगितलं होतं.आणि गंमत म्हणजे लक्ष्मी सुद्धा शांतपणे हे सगळं बघत उभी होती.छपरात लपून बसलेले वडील घरात आले.त्यांनी तो कागद पाहिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळजी जाणवू लागली.आम्ही लहान होतो आम्हाला कळत नव्हतं.पण,बँकेचे घेतलेले जे कर्ज होते त्याचे हफ्ते थकलेले आहेत आणि ते जर भरले नाहीत तर काहीतरी वाईट परिणाम होणार एवढं मात्र आईच्या आणि वडिलांच्या चर्चेतून कळलं.मी हळूच दबकत जवळ जाऊन वडिलांचा हात धरून विचारलं"अण्णा काय झालंय"त्यावर त्यांनी डोळे वटारून माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले," काही नाही असल्या भानगडीत लक्ष देऊ नकोस,तुझा तू अभ्यास कर"मी तोंड बारीक करून हातात पुस्तक धरून भिंतीला टेकून बसलो.रात्रीची जेवणंसुद्धा शांततेत झाली.अण्णा पोटभर जेवले नाहीत.आणि दुसऱ्या दिवशी मंगळवार होता.मला आठवतंय तो दिवस म्हणजे आमच्या कवठेमहांकाळचा आठवडी बाजार असायचा.जनावरांचा मोठा बाजार भरतो आमच्यात,सकाळचे नऊ वाजले होते.वडील म्हणाले आज एक दिवस शाळा राहू दे.माझ्यासोबत यायचंय तुला.मी मान डोलावली.आणि गप्प झालो.आईच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं.मला काहीच कळत नव्हतं.वडिलांनी लक्ष्मीला दावणीची सोडली.अंघोळ घातली.आणि उंबऱ्याजवळ आणून उभी केली.आईने लक्ष्मीला हळदी कुंकू लावलं.आणि आई सुद्धा लक्ष्मीच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडायला लागली.वडिलांनी ही आईच्या डोक्यावरून हात फिरवत स्वतःचे डोळे टॉवेलने पुसले.आयुष्यात पहिल्यांदाच मी वडिलांना रडताना बघितलं आणि मलाही खूप रडू यायला लागलं.मी रडत रडत विचारलं, " अण्णा लक्ष्मीला कुठं घेऊन चाललाय, त्यावर वडील माझ्या जवळ आले.माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले,"लक्ष्मीला बाजारात न्यायचीय.विकायचीय तिला आज.घरात अडचण आहे.बँकेचे हफ्ते थकलेत.नाही भरले तर पोलीस मला नेतील.तुम्ही कुणी रडू नका.शांतपणे लक्ष्मीला बघा.आणि तू पण चल माझ्यासोबत तुला मिसळ चारतो आज."कायम मिसळ म्हणल्यावर उड्या मारणारा मी  पाणावलेल्या डोळ्यानी हुंदकत फक्त एकटक लक्ष्मीकडे पाहत राहिलो.वडिलांनी कधी कासऱ्याला हिसका दिला आणि लक्ष्मी च्या मागे मी कसा चालू लागलो मला काहीच कळलं नाही.बाजारात येईपर्यंत मी पाणावलेल्या डोळ्यांनी लक्ष्मीला बघत होतो.बाजारात आलो आणि बघितलं सगळीकडे जनावरंच जनावरं. पण त्या सगळ्या गर्दीत आमची लक्ष्मीच देखणी दिसत होती.एका क्षणात दलालांनी वडिलांना घेरलं.आणि ती दलालांची भाषाच वेगळी होती.मला काहीच कळत नव्हतं.अखेर एक गिऱ्हाईक आलं.आणि बघता बघता व्यवहार झाला.वडिलांच्या एका हातात पैसे देत त्या माणसाने वडिलांच्या दुसऱ्या हातातला कासरा हिसकावून घेतला.आणि लक्ष्मीने जोरात हंबरायला सुरवात केली.चार पाच लोकांनी लक्ष्मीला धरली.मागच्या दोन्ही पायाला कासऱ्याने तिढा टाकला.एकाने कासरा जोरात ओढून धरला.आणि लक्ष्मीचे डोळे पांढरे झाले.बेंदराला नटलेली लक्ष्मी मला आठवली आणि मी वडिलांच्या पोटाला गच्च मिठी मारून रडायला सुरवात केली.माझ्या डोक्यावरून हात फिरवत त्यांनी पैसे खिशात घातले.मला बाजूला केलं,अण्णांच्या डोळ्यातलं  गरम पाणी माझ्या हातावर पडलं आणि पोटातली आतडी एक झाली आणि गपकन मातीत खाली बसलो.मला तसंच सोडून अण्णा त्या दलालांनी आवळून धरलेल्या आमच्या लक्ष्मी जवळ गेले आणि तिच्या गालावर ओठ ठेवत म्हणाले,"लक्ष्मी नीट राहा गं बाई." त्यावर लक्ष्मी शांत झाली.तिने हिसके देणं थांबवलं.बहुतेक आईने लेकराची चूक पदरात घ्यावी आणि माफ करून लेकराला आवळून कुशीत घ्यावं असंच काहीसं लक्ष्मीने अण्णांचा हात जिभेने चाटायला सुरवात केली.मी तसाच मातीत बसून हुंदके देत होतो लक्ष्मीने माझ्याकडे बघितलं.हळूहळू पावलं टाकत शांतपणे ती माझ्याजवळ आली. कासरा धरलेल्या माणसाने कासरा ढिला केला.आणि लक्ष्मीने नरड्यातून तोंड वासून फूटभर जीभ बाहेर काढली आणि माझ्या डोक्यावरून,माझ्या गालावरून फिरवू लागली.एखादया आजीने एखाद्या नातवाला जसं मिठीत घेऊन गालाचं मुकं घ्यावं तसं लक्ष्मी करू लागली.पुढच्या दोन गुडघ्यावर ते जनावर बसलं.माझी लक्ष्मी बसली तिला मला मिठीत घेऊन हंबरडा फोडायचा असावा.माझ्या डोळ्यात माती चालली होती डोळ्यावर अंधारी येत होती तिचं जीभ फिरवणं चालूच राहिलं.मग वडिलांनी तिच्या पाठीवर हात फिरवला तेव्हा झटकन लक्ष्मी बाजूला झाली.आणि कुणी हिसका द्यायच्या आत ती तिच्या नव्या मालकाबरोबर हळूहळू चालू लागली.मी उभा राहिलो.वडिलांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत जवळ ओढून घेतलं.आम्ही लक्ष्मीकडे पाहत राहिलो.लक्ष्मी पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होती तसा आमच्या दोघांचाही हंबरडा वाढत राहिला.गर्दीतून लक्ष्मी नजरेच्या आड झाली.पुन्हा लक्ष्मी दिसणार नाही या भावनेने पोटातली आतडी एक झाली होती.मी वडिलांच्या खिशातला पेन हातात घेतला.आणि हुंदके देत म्हणलं "अण्णा तुमची ती फोन नंबरची डायरी द्या जरा."वडिलांनी खिशातली डायरी माझ्या हातात दिली.मी डाव्या हातात ती डायरी धरली आणि शेवटच्या कोऱ्या पानावर पेन ठेवलं आणि कवितेच्या ओळी लिहिल्या गेल्या,

        "हा कोणता बाजार भरलेला आहे

         मुक्या जनावरांचा व्यवहार आहे

         सुभाषराव तुमच्या सुखासाठी पहा

         ही लक्ष्मीसुद्धा तिच्या मुक्या भावना विकते आहे."

         दुसऱ्याच्या दावणीला ती जगेल कशी आनंदात

         सुभाषराव ती मरून जाईल तुमच्या आठवणीत

          तिला बोलता आलं असतं तर

          ती म्हणाली असती काहीतरी

          अगदी तसंच तुमची आई बोलायची

          असलंच काहीतरी"

मला पुढचं लिहिता येणं शक्य नव्हतं.मी ती डायरी सुभाषरावांच्या हातात दिली.सुभाषराव म्हणजेच माझे वडील.त्यांचं नाव लिहून मी माझा त्यांच्यावरचा राग आणि लक्ष्मीवरचं प्रेम कवितेत व्यक्त केलं.

 वडिलांनी त्या ओळी वाचल्या.मला वाटलं त्यांचं नाव अस कवितेत लिहिलेलं बघून ते मला रागावतील.पण वडील ढसाढसा रडायला लागले.माझा हात घट्ट धरला आणि म्हणले चल पळ."लक्ष्मीला जाऊ द्यायची नाही."या वाक्याने पोटातली गोळा झालेली आतडी ढिली झाली.पायात बळ आलं.आणि मीच वडिलांना ओढत ओढत पळू लागलो.या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळा बाजार पायाने तुडवत धावत होतो.लक्ष्मीला चौघेजण धरून एका टेम्पोत चढवताना दिसले.मी जोरात ओरडलो " ओ थांबा."सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे गेल्या.लक्ष्मी एकटक पाहत आमच्याकडे बघतच राहिली.धापा टाकत वडील आणि मी जवळ गेलो.कसलाही विचार न करता वडिलांनी वरच्या खिशातले सगळे पैसे काढले त्या माणसाच्या हातात दिले.आणि म्हणाले, " नाही विकायची माझी लक्ष्मी,म्हातारी होवून माझ्या दारात ती मरेपर्यंत राहूदे हा व्यवहार रद्द समजा." वडिलांचं वाक्य संपायच्या आतच मी त्या माणसाच्या हातून कासरा ओढला आणि माझ्या हातात घेतला.आणि मी चालू लागलो.वडिलांनी पैसे दिले आणि ते माझ्या आणि लक्ष्मीच्या मागून चालू लागले.लक्ष्मी एका सुरात हंबरत होती.मला तर ती कुठलं तरी आनंदाचं गाणंच गुणगुणत असल्यागत वाटत होती.वडील म्हणाले "नितीन मिसळ खाऊया का."मी म्हणलं नको अण्णा मिसळ फिसळ मला.चला घरी आई वाट बघत असेल.तेव्हा मी,लक्ष्मी आणि अण्णा उड्या मारत घराची वाट आनंदाने तुडवत राहिलो.


अशीच कधीतरी वाचलेली माणूस म्हणून विचार करायला लावणारी ही गोष्ट..


 जशी माझ्यापर्यंत आली तशी आपणास पाठवित आहे.


लेखक - अज्ञात 


४/१०/२२

आजच्या दिवसाचा शिकलेला धडा..

काही वर्षांपूर्वी त्रिशूळ पर्वताच्या पायथ्याशी मी बघितलेला एक प्रसंग मला आठवला. मी एका टेकडीवर होतो. तिथल्या जमिनीवर आडवा होऊन, माझ्याजवळ असलेल्या दुर्बिणीमधून पलीकडच्या खडकाळ डोंगरावर थार शोधत होतो. 'थार' हा हिमालयाच्या परिसरात आढळणारा जंगली बोकड आहे. या परिसरामधल्या अतिशय दुर्गम,अवघड, धोक्याच्या अशा डोंगरांवरसुद्धा हे बोकड अगदी आरामात उड्या मारत चढतात.पलीकडच्या डोंगराच्या निम्म्या उंचीवर एका तुटलेल्या कड्याचा अरुंद, सपाट भाग पुढे आला होता. तिथे थारची एक मादी आणि तिचं पिल्लू झोपलं होतं. थोड्या वेळाने ती मादी उठली आणि तिने अंग ताणून आळस घालवला. तेवढ्यात तिचं कोकरूही उठलं. त्याने तिच्या अंगाला आपलं नाक घासलं आणि दूध प्यायला सुरुवात केली. साधारण एका मिनटानंतर त्या मादी थारने पिल्लाला आपल्यापासून बाजूला केलं आणि ती त्या कड्याच्या दिशेने काही पावलं पुढे आली. उडी मारायचा पवित्रा घेऊन तोल सांभाळत उभी राहिली आणि मग तिने तिथून १५ फूट खाली असलेल्या, तशाच एका अरुंद कपारीवर उडी मारली. 'आईने खाली उडी मारली आहे आणि वरच्या बाजूला आता आपण एकटेच उभे आहोत' हे लक्षात आल्यावर ते कोकरू पळत पळत थोडं मागे जात होतं, पुन्हा पुढे येत होतं. त्या टोकापर्यंत येऊन उडी मारायच्या आधी थांबत होतं आणि खाली वाकून आईकडे बघत होतं. त्याचं असं बऱ्याच वेळा करून झालं; पण तिने मारली तशी उडी मारायचं त्याचं धाडस होत नव्हतं. साहजिकच होतं ते! कारण काही इंचांच्या त्या कपारीनंतर खाली हजारभर फूट जीव वाचवण्यासाठी दुसरं काहीच नव्हतं... थेट हजार फुटाची खोली होती ! ती तिच्या कोकराला उडी मारण्यासाठी प्रोत्साहन देत होती. त्यासाठीचं तिचं ओरडणं मला ऐकू येणार नाही, एवढ्या दूरच्या अंतरावर मी होतो; पण ती ज्या पद्धतीने डोके वर करून त्या कोकराकडे बघत होती ते पाहता, ती त्याला उडी मारण्यासाठी प्रोत्साहन देत होती, हे निश्चित ! जसजसा वेळ चालला होता, तसतसं ते कोकरू आणखीनच अस्वस्थ होत होतं. आता त्या अस्वस्थपणातून त्याने काहीतरी वेडेपणा करू नये म्हणून जिथे एक किरकोळ भेग असल्यागत वाटत होतं,अशा भिंतीसारख्या एका खडकाजवळ ती गेली आणि तिथून तो उभा,अवघड असा चढ चढून पुन्हा त्या पिल्लाजवळ गेली. वर गेल्या गेल्या ती अशा पद्धतीने आडवी झाली की, त्या कोकराला दूध पिता येऊ नये. थोडा वेळ गेल्यानंतर ती पुन्हा उभी राहिली. तिने साधारण एक मिनिटभर त्या कोकराला दूध पिऊ दिलं आणि मग पुन्हा त्या डोंगरकड्यावर जाऊन उभी राहिली. तिने पुन्हा एकदा उडी मारायचा पवित्रा घेतला आणि खाली उडी मारली. ते पिल्लू वर पुन्हा एकटंच उरलं. त्याने पुन्हा आधीसारखंच मागेपुढे पळायला सुरुवात केली. पुढच्या अर्ध्या तासात त्याच्या या पद्धतीने साताठ वेळा फेऱ्या मारून झाल्या असतील. शेवटी एकदाची त्याने हिंमत केली आणि स्वतःला हवेत झोकून दिलं. पुढच्या क्षणी ते खालच्या कातळावर,आईच्या शेजारी उभं होतं. त्याच्या या धाडसाचं बक्षीस म्हणून त्याला पोट भरेपर्यंत भरपूर दूध प्यायला मिळालं. 'ती जिकडे जाईल, तिकडे जाण्यात धोका नाही' हा त्याच्यासाठी आजच्या दिवसाचा धडा होता. प्राण्यांना काही गोष्टी उपजत येतात, पण त्याचबरोबर न कंटाळता पिल्लाला शिकवत राहण्याचा त्या आईचा असीम संयम आणि 'तिने सांगितलेली कोणतीही गोष्ट बिनतक्रार पाळायची' हा पिल्लाचा आज्ञाधारकपणा यातूनच सगळे प्राणी शिकत शिकत परिपक्व होत जातात. जंगलात वेगवेगळे प्राणी आपल्या पिल्लांना त्यांच्या जगण्यामधल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी कशा शिकवतात, याचं निरीक्षण करण्याइतकी मनोरंजक, उद्बोधक गोष्ट दुसरी कुठली नसेल. वेगवेगळ्या प्राण्यांचं आपल्या पिल्लांना जगण्याचं असं शिक्षण देणारं चित्रीकरण करण्याची मला जेव्हा संधी होती, तेव्हा माझ्याकडे तशी साधनं नव्हती, याची आज मला खरोखरच खंत वाटते.


'चुक्याचा नरभक्षक' 


'देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक - जिम कॉर्बेट'

२/१०/२२

माणुसकीचा धर्म 'असा बॉस होणे नाही...'

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इस्रोमध्ये कार्यरत असतानाची एक गोष्ट सांगितली जाते. इंडिजिनस गायडेड मिसाईल प्रोजेक्टवर तेव्हा जोरात काम चालू होतं. शास्त्रज्ञांची एक मोठी टीम या प्रोजेक्टवर काम करत होती. एके दिवशी त्या प्रोजेक्ट मध्ये काम करणारे एक शास्त्रज्ञ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की, "सर मला आज संध्याकाळी थोडं लवकर घरी जायचं आहे, चालेल का?" 

कलाम सर हसत म्हणाले, "शुअर, एनी प्रॉब्लेम?" 


"नाही सर, म्हणजे काय आहे की गावात सर्कस येऊन महिना झाला. मुलं रोज सर्कस पहायला जाऊ या म्हणतात. पण मला ऑफिसमधून घरी जायलाच उशीर होतोय, त्यामुळे ते जमलंच नाही. आता, उद्या सर्कस दुसऱ्या गावी जाणार आहे. आणि, पुन्हा वर्षभर तरी गावात सर्कस येणार नाही. तेव्हा आज लवकर घरी जाऊन मुलांना सर्कस दाखवून आणावी म्हणतोय." 


"अरे मग जा ना तुम्ही, जरुर जा. मी तर तुम्हाला आत्ताच घरी जाण्याची परवानगी देतोय. अल्वेज पुट युअर फॅमिली फर्स्ट." 


"नाही सर, मी हातातलं काम आटोपून दुपारी ४ वाजता जाईन." एवढं बोलून ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले आणि कामाला लागले. 


साडेचार वाजता कलाम साहेबांनी सहज त्या ज्युनियर सायंटिस्टच्या केबिनमध्ये पाहिलं तर ते खाली मान घालून त्यांच्या कामात व्यग्र होते. कलाम साहेब लागलीच ऑफिसच्या बाहेर आले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. ते तडक त्या सायंटिस्टच्या घरी गेले. मुलांना घेतलं. स्वतः सोबत बसून मुलांना सर्कस दाखवली आणि येताना छान हॉटेलमध्ये नेऊन मुलांना जे हवं ते खाऊ दिलं आणि नऊ वाजता मुलांना पुन्हा गाडीतून घरी सोडलं. 


इकडे साडे सात वाजता ज्यु. सायंटिस्टला आठवलं की आपल्याला साडे चारला जायचं होतं. घड्याळात पाहिलं तर साडे सात वाजून गेले होते. कामाच्या व्यापात आपण याही वर्षी मुलांना सर्कस दाखवू शकलो नाही याचं त्यांना प्रचंड वाईट वाटायला लागलं. हिरमुसल्या चेहऱ्याने त्या दिवशीचं काम आटोपून ते घरी पोहोचले तर घर एकदम शांत. पत्नी निवांतपणे टीव्ही पहात बसलेली. त्यांनी घाबरतच तिला विचारलं, "मुलं कुठे गेलीत?" 


"अहो, असं काय करता ? तुम्हाला वेळ लागणार होता म्हणून तुम्हीच नाही का तुमच्या बॉसना पाठवून दिलं आपल्या घरी ? ते येऊन मुलांना घेऊन, केव्हाच गेले सर्कस पहायला.आणि काय हो, एवढ्या मोठ्या माणसाला आपली घरगुती कामं तुम्ही कशी काय सांगू शकता ?" 


ज्यु. सायंटिस्ट काय समजायचे ते समजले. कलाम साहेबांना मनोमन धन्यवाद देत सोफ्यावर बसले. इतक्यात मुलांचा दंगा त्यांच्या कानावर आला. मागोमाग हसत, बागडत मुलं आणि कलाम साहेब घरात आले. कलाम साहेबांना पाहून ते खजिल होऊन उभे राहिले. त्यांच्या खांद्यावर मायेने हात ठेवत खाली बसण्याची खूण करत कलाम म्हणाले, "अहो, साडे चार वाजून गेले तरी तुमचं काम चालूच होतं. तुमची एकाग्रता पाहून माझ्या लक्षात आलं की तुम्ही सर्कसचा विषय पूर्णपणे विसरुन गेला आहात. मुलांची सर्कस बुडू नये म्हणून मी त्यांना घेऊन सर्कसला जाऊन आलो." 


कलाम साहेबांचे आभार मानावेत की त्यांना आपण कामाला लावलं याबद्दल सॉरी म्हणावं हे त्या सायंटिस्टना कळेना. पण स्वतःला पट्कन सावरत, हात जोडत ते म्हणाले, "थॅंक्यु व्हेरी मच सर !" 


"नो, नो,ऑन द कॉन्ट्ररी आय शुड से थॅंक्यु टू यू." असं म्हणत कलाम साहेबांनी त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि ते पुढे म्हणाले, "कित्येक वर्षांनी आज मीही तुमच्या मुलांसोबत सर्कसचा आनंद लुटला. खूप मजा आली आम्हाला. कितीतरी दिवसांनी मीही आज मुलांसोबत बागडलो." 


मुलांच्या चेहऱ्यावरुन तर आनंद ओसंडून वहात होता. कलाम सरांच्या हातातील आपले हात त्या सायंटिस्टने हळूच सोडवून घेतले आणि आपले डोळे रुमालाने पुसले. बॉस आणि ज्युनिअर मधील प्रेम पाहून बाजूला उभ्या असलेल्या मातेचे मात्र ओलावलेले डोळे आपल्या साडीच्या पदराने पुसणे कितीतरी वेळ चालूच होते. 


(ही कथा डॉ. कलाम यांच्यासोबत इस्रोमध्ये काम केलेल्या एका शास्त्रज्ञाच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलेली आहे.) 


- प्रभाकर जमखंडीकर

संचालक, स्किल क्राफ्टर्स इन्स्टिट्यूट, सोलापूर