* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/४/२३

आपली प्राचीन खाद्य संस्कृती..

जगाला वेड लावणारा डोसा किंवा मसाला डोसा (दोसा) हा पदार्थ किती जुना आहे..? निश्चित सांगता यायचं नाही,पण सुमारे दोन हजार वर्ष तरी नक्कीच..! म्हणजे इतिहासाच्या ज्ञात साधनांचा,

कागदपत्रांचा धांडोळा घेत मागे गेलो की कळतं.

सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी अत्यंत चविष्ट असा हा डोसा दक्षिण भारतात खाल्ला जात होता.हे फार महत्त्वाचं आहे.भारतीय संस्कृतीच्या संपन्नतेमध्ये फक्त वास्तु- निर्माण शास्त्रच नव्हतं,कला आणि नाट्य क्षेत्रच नव्हतं,फक्त विज्ञान नव्हतं,फक्त अध्यात्म नव्हतं,तर संपन्न अशी खाद्य संस्कृतीही होती.अर्थात जीवनाच्या सर्व अंगांची परिपूर्णता होती.खाद्य संस्कृतीच्या बाबतीत आपल्या पूर्वजांनी खूप बारीक विचार करून ठेवलाय.

आजचे आहारशास्त्र ज्या गोष्टींना ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न करते,त्या सर्व गोष्टी भारतीय आहारशास्त्राने काही हजार वर्षांपूर्वीच मांडलेल्या आहेत.'आहाराचा आणि शरीराचा, आहाराचा आणि मनाचा,आहाराचा आणि चित्तवृत्तीचा संबंध असतो' हे आपल्या पूर्वजांनी काही हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय.हे अद्भुत आहे.त्या काळात प्रगत असलेल्या ग्रीक,इजिप्शियन किंवा चिनी संस्कृतीत असा उल्लेख दूरान्वयानंही आढळत नाही.

दुर्दैवानं आपल्या ह्या प्रगत आणि परिपूर्ण आहार

प्रणालीची आपल्याला जाणीवच नाही.

'भगवद्गीता'हा ग्रंथ किमान साडेपाच ते सहा हजार वर्षं प्राचीन असावा असा अंदाज आहे.अगदी पाश्चात्त्य विद्वानांच्या हवाल्यावरून बघितलं तरी 'गीता' ही किमान ,अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी लिहिली गेली आहे हे निश्चित.या गीतेतल्या १७ व्या अध्यायात ८,९ आणि १० हे तीन श्लोक आहेत,जे आहाराचा आपल्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल भाष्य करतात.सात्त्विक,राजसी आणि तामसी असे तीन प्रकारचे स्वभाव असलेल्या व्यक्तींमध्ये शरीरपोषण करण्यासाठी तीन प्रकारचे आहार घेण्याची प्रवृत्ती दिसून येते.आणि या तीन मानसिक वृत्तींना अनुसरून त्यांची कर्मे देखील तीन प्रकारची असतात असे दिसून येते.


वानगीदाखल आठवा श्लोक बघू या -


आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः,रस्याः

स्निग्धाः,स्थिराः,हृद्याः,आहाराः,सात्त्विकप्रियाः

॥८॥

आयुष्य,बुद्धी,बल,आरोग्य,सुख आणि प्रसन्नता यांची वृद्धी करणारे,रसयुक्त,स्निग्ध,बराच काळ राहणारे आणि मनाला प्रिय वाटणारे असे आहार सात्त्विक वृत्तीच्या लोकांना प्रिय असतात.एक परिपूर्ण, वैज्ञानिक आणि प्राचीन खाद्य संस्कृती असलेला आपला देश हा जगाच्या पाठीवर एकमात्र आहे.अगदी ऋग्वेदापासूनच्या ग्रंथांमध्ये आहार - शास्त्राचे उल्लेख सापडतात. 'यजस्वम तत्रं त्वस्वाम..'

(आपल्या शरीराचे पोषण करून त्याचा सत्कार करा)असे उल्लेख अनेक ठिकाणी आहेत.भोजनात गहू, जव,दूध यांचा समावेश असावाअसंही वर्णन येतं.

अथर्ववेदाच्या सहाव्या अध्यायातील १४०/२ या सूक्तात म्हटलंय,'तांदूळ,जव,उडीद आणि तिळापासून बनवलेले पदार्थ हा योग्य आहार आहे.' ह्या लिहिलेल्या ग्रंथांना समर्थन देणारे अनेक पुरावे मेहेरगढ,हडप्पा आणि मोहन-जो-दारोच्या उत्खननात सापडले आहेत.त्यानुसार सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी आपले पूर्वज गहू,जव,दूध इत्यादींनी बनलेल्या वस्तू खात होते हे निश्चित. विशेष म्हणजे भोजनात मसाले वापरण्याचेही पुरावे उत्खननात मिळाले आहेत.दालचिनी, काळे मिरे यांचा उपयोग भारतीय भोजनामध्ये काही हजार वर्षांपासून होतोय.मेहेरगढ हे पाकिस्तानातील,बलुचिस्तानमधील लहानसे गाव,१९७४ साली तेथे सर्वप्रथम 'जीन- फ्रान्कोइस जरीगे' ह्या फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्याने उत्खनन सुरू केले आणि त्याला इसवी सनाच्या सात हजार वर्षांपूर्वीच्या गावाचे अवशेष मिळाले. महत्त्वाचे म्हणजे,ह्या उत्खननात जगातील सर्वांत प्राचीन असे शेती करण्याचे भरभक्कम पुरावे मिळाले.अर्थात 


आज तरी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे असे ठामपणे म्हणता येते की,जगात 'शेती' ही संकल्पना सर्वप्रथम भारतीय उपमहाद्वीपात सुरू झाली.

वेगवेगळ्या डाळी (मसूर,तूर वगैरे) उगवणं,गहू पिकवणं,त्या गव्हावर प्रक्रिया करून(अर्थात गव्हाला दळून) त्याच्यापासून कणिक तयार करणं आणि त्या कणकेचे वेगवेगळे पदार्थ बनविणं,हे सारं आठ-नऊ हजार वर्षांआधीपासून होत आलंय.जागतिक खाद्य संस्कृतीत भारताचं सर्वांत मोठं योगदान कोणतं..? तर ते मसाल्यांचं..! आजपासून किमान दोन-तीन हजार वर्षांपूर्वी भारतातून मोठ्या प्रमाणात मसाले निर्यात व्हायचे,याचे प्रत्यक्ष पुरावे मिळाले आहेत.


याच पुस्तकातील 'भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाऊलखुणा १'ह्या - लेखात इजिप्तमधील बेरेनाईक या पुरातत्त्व उत्खनन प्रकल्पाचा उल्लेख आहे.या बेरनाईक बंदरात एका बंद पेटीमध्ये आठ किलो काळी मिरी सापडली.कार्बन डेटिंगप्रमाणे ती पहिल्या शतकाच्या इसवी सन ३० ते इसवी सन ७० च्या मधील निघाली.भारतातून मसाले निर्यात होत होते याचा हा खणखणीत पुरावा आहे.


काळी मिरी,दालचिनी,तमालपत्र,धणे इत्यादी मसाल्यांच्या पदार्थांचा शोध भारतीयांनी हजारो वर्षं आधीच लावला होता.नंतर ह्या मसाल्यांच्या मदतीने भारतात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशाप्रमाणे वेगवेगळे पदार्थ तयार झाले. हे पदार्थ अत्यंत चविष्ट होते.म्हणून काही हजार वर्षांपूर्वीच्या काळातही आपल्या ह्या भारतीय पदार्थांची भुरळ विदेशी यात्रेकरूंना पडली होती.

मुळात ब्रिटिश असलेले 'प्रोफेसर अंगस मेडिसन' हे हॉलंडच्या ग्रोनिंगेन विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते.त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधी एक सुरेख ग्रंथ लिहिलाय,'द वर्ल्ड इकॉनॉमी - ए मिलेनियम पस्पेंक्टीव',अनेक विद्यापीठांत हा ग्रंथ प्रमाण मानला जातो.ह्या ग्रंथात त्यांनी लिहिलंय की,आजपासून सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी भारताचा जो माल युरोपात जायचा,तो प्रामुख्यानं इटलीच्या दोन शहरांमधून जायचा-जीनोआ आणि व्हेनिस

आणि ह्या व्यापाराच्या आधाराने ही दोन्ही शहरं,त्या काळातील युरोपातील सर्वांत श्रीमंत शहरांत गणली जायची. ज्या वस्तूंमुळे ह्या शहरांना ही श्रीमंती लाभली होती,त्यांत प्रामुख्यानं होते - भारतीय मसाले..!

मात्र युरोपात भारतीय मसाले मुख्यतः वापरले जात होते ते जनावरांचे मांस शिजवून बनविण्याच्या पदार्थांमधेच,

शाकाहारी पदार्थांचे तंत्र पाश्चात्त्यांना फार काही जमलेले नव्हते. त्याची दोन कारणं होती एक तर हवामानाच्या - विषमतेमुळे तिथे वनस्पतींची पैदास तुलनेने कमी होती.तर दुसरं म्हणजे त्या लोकांना शाकाहारी पदार्थांचे वैविध्यच माहीत नव्हते.सुमारे दहा वर्षांपूर्वी मी माझ्या क्लायंटला भेटायला झुरिकला गेलो होतो.आमच्या भेटीनंतर तो मला तिथल्या भारतीय रेस्टॉरंटमधे घेऊन गेला.तिथे गप्पा मारताना तो मला म्हणाला की, काही दिवसांपूर्वी त्याने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला.अन् सुरुवात म्हणून किमान तीस दिवस पूर्णपणे शाकाहार करायचा असं ठरवलं.पण पाच-सहा दिवसांतच त्याचा कंटाळा येऊ लागला.मग पुढचे दहा-पंधरा दिवस कसेबसे काढले. शेवटी तीन आठवड्यांनंतरच आपला निश्चय मोडीत काढत त्याने मांसाहार परत सुरू केला.

मी विचारले, "असे का..?"

तर तो म्हणाला,"रोज हे असे घास-फूस खाऊन कंटाळा आला यार,रोज कच्च्या भाज्या, उकडलेल्या भाज्या अन् त्यांचे सलाद माणूस किती दिवस खाणार..?"

मी म्हटले, "अरे बाबा,नुसत्या कच्च्या अन् उकडलेल्या भाज्याच का?अक्षरशः हजारो पदार्थ आहेत आमच्या शाकाहारात,आता इथे,रेस्टॉरंट मध्ये बघ की..' - 

तो म्हणाला, "खरंय.पण हे आधी कुठं माहीत होतं..? आम्हाला वाटतं- शाकाहार म्हणजे कच्च्या किंवा उकडलेल्या भाज्याच..! त्यात मसाले वगैरे टाकून,पावाबरोबर खाता येण्यासारखे चविष्ट पदार्थ बनवता येतात,हे आम्हाला कुठे माहीत होतं..?"

मात्र भारताने अत्यंत रुचकर,चविष्ट,स्वादिष्ट आणि पोषक अशी खाद्य संस्कृती संपूर्ण जगाला दिली.आज जगाच्या पाठीवर जिथेही पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे,तिथे भारतीय रेस्टॉरंट असणारच..! चिनी आणि इटालियन खाद्य संस्कृतीप्रमाणेच,किंबहुना काही बाबतीत कांकणभर जास्तच,भारतीय खाद्य संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे. इटालियन पिझ्झा आणि पास्ता डॉमिनोज

सारख्यांनी जगभर नेला.मात्र आपले दुर्दैव हे आहे की,इडली,डोसा,वडा-पाव,छोले-भटुरे यासारख्या पदार्थांना विश्वव्यापी बनवणाऱ्या उपाहारगृहांच्या साखळ्या आपल्याला निर्माण करता आल्या नाहीत.आणि आपलं वैविध्य तरी किती..? नुसतं दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ म्हणून होत नाही.त्यात आंध्र प्रदेशाचे,तामिळनाडूचे,

कर्नाटकचे,केरळचे पदार्थ वेगवेगळे आहेत.डोसा आणि वडे हे दोन-अडीच हजार वर्षांपासून 'भारतात प्रचलित आहेत.मात्र इडली ही भारतातली नाही.भारतीयांची आहे,पण भारताबाहेरची,जावा सुमात्रा (इंडोनेशिया) च्या भारतीय राजांच्या आचाऱ्यांनी, हजार-बाराशे वर्षांपूर्वी फर्मेंटेशन पद्धतीने तयार केलेला पदार्थ म्हणजे इडली..! तो जावा-सुमात्राकडून दक्षिण भारतात आला अन् पुढे जगभरात प्रसिद्ध झाला.बेल्लारी जिल्ह्यातील 'शिवकोटीचार्यांनी' इसवी सन ९२० मधे कन्नड भाषेत लिहिलेल्या 'वड्डराधने' ह्या पुस्तकात सर्वप्रथम "इडलीगे' असा इडलीचा उल्लेख आढळतो.

'इंडियन करी' हा प्रकार जगभरात अतिप्रसिद्ध आहे.

जगातील अनेक 'सेलिब्रिटीज'ना या 'करी'ची चटक लागलेली आहे.'करी' म्हणजे भारतीय मसाल्यांनी बनलेली ग्रेव्ही.ही शाकाहारी आणि मांसाहारी,अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांत वापरता येते.या 'करी'चा इतिहास मनोरंजक आणि प्राचीन आहे.हा शब्द तामिळ भाषेच्या 'कैकारी' ह्या शब्दावरून तयार झाला आहे. कैकारी म्हणजे वेगवेगळ्या मसाल्यांबरोबर शिजवलेली भाजी.जगाच्या वेगवेगळ्या भागात भोजनापूर्वी प्रार्थना करण्याची पद्धत आहे. ख्रिश्चन,ज्यू वगैरे लोकंही विशेषत्वानं पाळतात.भारतीयांमध्ये या पद्धतीचं महत्त्व आहे.पण भोजनापूर्वीची भारतीय प्रार्थना फार परिपूर्ण आणि अर्थगर्भित आहे.अन्नाला आपण पूर्णब्रम्ह मानले आहे.'भोजन' ह्या शब्दाच्या सिद्धीसाठी पाणिनीने धातुसूत्र लिहिले आहे - 'भुज पालन अयवहारयो',याच्याच पुढे जाऊन, भोजनापूर्वी आपण जे मंत्र म्हणतो,ते आहेत-


ॐ अन्नपतेऽन्नस्य नो देह्यनमीवस्य शुष्मिणः।

प्र प्र दातारं तारिषऽऊर्जं नो धेहि द्विपदे चतुष्पदे ।।

किंवा -

ॐ ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।

ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना ।।

ॐ सहनाववतुसहनौ भुनक्तु

सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तुम मा विद्विषा वहै ॐ शांतिः शांतिः शांतिः


एकुणात काय,तर एका परिपूर्ण,वैज्ञानिक आणि पोषक अशा प्राचीन खाद्य संस्कृतीचे आपण संवाहक आहोत.या संस्कृतीचा अभिमान बाळगण्यात गैर काहीच नाही,उलट अशी ही समृद्ध खाद्य संस्कृती जगासमोर आणणे हे आवश्यक आहे..!


२५ फेब्रुवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..

१४/४/२३

गोष्ट चांगुलपणा सांगणारी..

फार जुनी गोष्ट नाहीये.ज्युलिओ डियाझ हा तरुण समाजसेवक कामावरून घरी सबवेने न्यू यॉर्कमधील ब्रॉक्स येथे चालला होता.तो दररोज एक स्थानक आधी उतरायचा आणि त्याच्या आवडत्या हॉटेलात जेवून घरी जायचा.परंतु आजची रात्र नेहमीसारखी नव्हती.

सबवेच्या निर्मनुष्य स्थानकावरून तो हॉटलकडे जाऊ लागला,तेव्हा सावल्यांत दडलेली एक व्यक्ती बाहेर आली.तो हातात चाकू घेतलेला किशोरवयीन मुलगा होता.नंतर ज्युलिओने एका पत्रकाराला सांगितलं की,मी त्याला लगेचच पाकीट देऊन टाकलं.'चोरी फत्ते झाल्यामुळे मुलगा पळून जात होता तेवढ्यात ज्युलिओनं एक अनपेक्षित गोष्ट केली.

त्याला हाक मारून तो म्हणाला,"ए,थांबरे,मुला,

तू रात्रभर लोकांना लुटत राहणार असशील तर माझा कोटही घे म्हणजे थंडी वाजणार नाही." मुलगा मागे वळून ज्युलिओकडे अविश्वासाने पाहू लागला आणि म्हणाला,"पण तुम्ही असं का करत आहात?" त्यावर ज्युलिओ म्हणाला,"काही डॉलर्ससाठी तू तुझं स्वातंत्र्य गमवायला तयार आहेस, याचा अर्थ तुला पैशांची नक्कीच फार गरज आहे.मी काय म्हणतोय की,मला आत्ता फक्त जेवायचं आहे. तुला माझ्यासोबत जेवायला यायचंय का? तर जरूर ये.'मुलगा तयार झाला.त्यानंतर काही क्षणांत ज्युलिओ आणि त्याचा हल्लेखोर असे दोघं त्या रेस्टॉरंटमधील टेबलाशी बसलेले होते. वेटर्सनी त्यांचं आपुलकीने स्वागत केलं. मॅनेजरही गप्पा मारायला थांबला.अगदी भांडी घासणाऱ्यांनीही येऊन 'हॅलो' म्हटलं.


तेव्हा मुलगा आश्चर्याने म्हणाला,"तुम्ही इथं सर्वांना ओळखता? तुमच्या मालकीच आहे का हे हॉटेल ?" 


"नाही रे बाबा,मी इथं पुष्कळ वेळा जेवतो म्हणून ओळखतात ते मला.' "पण तुम्ही त्या भांडी घासणाऱ्यांशीही किती चांगलं बोललात?" 


"पण सर्वांशी चांगलंच वागायचं असतं हे शिकवलेलं नाही का तुला कुणी ?" "शिकवलेलं तर आहे," मुलगा म्हणाला, "परंतु लोक प्रत्यक्ष तसं वागतात कुठं?"


ज्युलिओ आणि हल्लेखोरांचं खाऊन झाल्यावर बिल आलं;परंतु पाकीट नव्हतं.त्यानं मुलाला म्हटलं,"हे बघ,तुलाच हे बिल भरावं लागेल कारण माझे पैसे तुझ्याकडे आहेत.त्यामुळे मला तर हे बिल भरता येणार नाही;पण पाकीट परत दिलंस तर मी आनंदाने दोघांचं बिल देईन.' मुलाने पाकीट परत दिल,ज्युलिओने बिल भरलं आणि त्याला २० डॉलर्सही दिले.मात्र एका अटीवर,ती म्हणजे त्याने चाकू ज्युलिओला कायमचा द्यायचा.पत्रकाराने नंतर ज्युलिओला विचारल की,तू त्या चोरट्याला जेवायला का घातलस? तेव्हा किंचितही न अडखळता तो म्हणाला,

"मला वाटलं की तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल.आपण लोकांना चांगलं वागवलं तर तेही आपल्याशी चांगलेच वागतील अशी आशा धरायला काहीच हरकत नसते.या गुंतागुंतीच्या जगातली सगळ्यात सोपी गोष्ट हीच असेल."


मी ज्युलिओच्या चांगुलपणाची गोष्ट एका मित्राला सांगितली तेव्हा तो पटकन म्हणाला, "थांब जरा,मी उलटी करून येतो,एवढं सौजन्य झेपत नाही मला.' ठीक आहे,ही कहाणी वाजवीपेक्षा जास्तच गोड आहे,ती ऐकताना लहानपणी चर्चमध्ये ऐकलेल्या आणि घासून घासून गुळगुळीत झालेल्या धड्यांची आठवण येते.हे खरंय,


मॅथ्यू ५ मधील 'सर्मन ऑन माऊंट मध्ये असंच काहीसं सांगितलं आहे.'डोळ्याचा बदला डोळ्याने आणि दाताचा बदला दाताने घ्या'असं म्हटलेल तुम्ही ऐकलं असेल; परंतु मी आपणास सांगतो,दुष्टपणे वागणाऱ्यांचा बदला घेऊ नका.कुणी उजव्या गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करा.कुणी जबरदस्तीने तुमचा अंगरखा काढून घेतला तर त्याला आतली बंडीही काढून द्या.कुणी एक मैल चालायची जबरदस्ती केली तर त्याच्याबरोबर दोन मैल चाला.


तुम्हाला नक्कीच वाटेल की,येशू हे सांगतोय तरी काय?असं वागायला आपण साधुसंत आहोत की काय ? प्रश्न असा आहे की आपण सगळे माणसं आहोत आणि खऱ्या जगात दुसरा गाल पुढे करणं म्हणजे भोळसटपणाची परिसीमा गणली जाईल,हो ना?परंतु अगदी हल्लीच मला कळलं की,येशू एक अत्यंत तर्कशुद्ध तत्त्व मांडत होता.

आधुनिक मानसशास्त्रज्ञ त्या वर्तनास 'जशास तसे' छापाचं किंवा पूरक नसलेलं (नॉन कॉप्लिमेंटरी) वर्तन म्हणतात.मी अगोदर उल्लेख केल्यानुसार,माणसांच्या मनात एकमेकांच्या भावनांची प्रतिबिंबे पडत असतात.

कुणीतरी तुमचं कौतुक केलं की तुम्हीही त्याचं उलट कौतुक करता.कुणीतरी तुम्हाला वेडावाकडा टोमणा मारतं,तेव्हा तुम्हालाही त्याला खणखणीत सुनवायची इच्छा होते.आधीच्या प्रकरणांत आपण पाहिलं की, शाळांत,कंपन्यांत आणि लोकशाही व्यवस्थांत सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिसादाचे बंध किती सामर्थ्यशाली असतात.तुमच्याशी लोक प्रेमानं वागतात तेव्हा योग्य वागणं सोपं असतं; परंतु सोपं असलं तरी ते पुरेसं नसतं.येशूच्या शब्दांत सांगायचं तर जे तुमच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर तुम्हीही प्रेम केलंत तर त्याचं बक्षीस काय मिळणार ? कर गोळा करणारे लोकही तेच करतात की,तुम्ही फक्त तुमच्या भावाबहिणींचंच प्रेमानं स्वागत केलंत तर इतरांपेक्षा तुम्ही वेगळं काय वागलात ?' प्रश्न असा आहे की,आपण त्याहून एक पाऊल पुढे जाऊ शकतो का?आपण फक्त आपली मुलं,सहकर्मचारी,शेजारी यांचंच भलं न चिंतता आपल्या शत्रूचंही भलं चिंतू शकतो का? ते कठीण असतं आणि आपल्या सहजप्रेरणेच्या विरुद्धही असतं. महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्याकडे पाहा.विसाव्या शतकातले हे दोन महानायकच आहेत.समोरच्याला त्याच्याच भाषेत उत्तर न देण्याच्या बाजूने ते असले तरी ते असामान्य व्यक्ती होते हेही तितकंच खरं आहे.पण मग तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांचं काय? एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करायला आपल्याला जमणार का ?तसंच मोठ्या स्तरावर म्हणजे तुरुंगात आणि पोलीस ठाण्यांत दहशतवादी हल्ले झाल्यावर आणि युद्धकाळात तसं वागायला जमणार का? हा प्रश्नच आहे.


'एखाद्या माणसाला त्याच्या अपराधाचा दंड द्यायचा असल्यास त्याला शिक्षा करावीच लागते. त्याच्यात परिवर्तन घडवून आणायचं असल्यास त्याच्यात सुधारणा करावी लागते आणि मारून मुटकून कुणीही सुधारत नसतं.'


जॉर्ज बर्नार्ड शॉ (१८५६-१९५०)


ह्युमनकाइंड मधून..

१२/४/२३

भगवद्गीता - व्यास 

(इसपू चौथं ते पाचवं शतक)


भगवद्गीतेला सर्वसामान्य लोकांसमोर आणणारे ग्रंथकार म्हणून तसंच महाभारताचे रचेते म्हणून महर्षी व्यास यांच्याकडे बघितलं जातं. महाभारतामध्ये व्यासांचाही प्रत्यक्ष सहभाग होता.महाभारताच्या मूळ ग्रंथाचं नाव 'जय' असल्याचं मानण्यात येतं.व्यासांनी हा ग्रंथ आपला मुलगा शुक आणि आपले पाच शिष्य यांना सांगितला.पुढे 

त्याचं 'भारत' हे नामकरण झालं आणि त्यानंतर तो अनेक ऋषींनी पुढे कथन करत गेल्यानंतर त्याचं नाव 'महाभारत' झालं असंही मानण्यात येत.महर्षी व्यास यांचं 'कृष्णद्वैपायन' हेही नाव होतं,असं म्हटलं जातं. मात्र याबाबत मतमतांतरं आहेत.पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्या पोटी व्यासांचा जन्म झाला.सत्यवती ही कोळीकन्या असून ती कुमारिका असतानाच तिनं व्यासांना जन्म दिला. व्यासाच्या जन्माची कथा विलक्षण आहे.सत्यवतीच्या वडिलांचा व्यवसाय नदीपात्रातून होडीतून लोकांना एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवणं असा होता.एकदा सत्यवती पराशर ऋषींना होडीतून दुसऱ्या किनारी पोहोचवण्यासाठी निघाली असताना, तिच्या सौंदर्यावर पराशर ऋषी लुब्ध झाले त्यांनी तिच्याबरोबर समागम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि सत्यवतीनं त्यांना होकार दिला.याच समागमातून व्यासांचा जन्म झाला.पुढे सत्यवतीचं लग्न हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्याशी झालं,सत्यवती आणि शंतनू यांचा पुत्र म्हणजे भीष्म! त्या अर्थान भीष्म आणि व्यास हे सावत्र भाऊ झाले अशा रीतीनं व्यासांचा महाभारताशीदेखील प्रत्यक्ष संबंध होताच.तसंच पूर्वी एकच वेद होता.या वेदाचे चार भाग व्यासांनी केले असं मानलं जातं.तसंच व्यासांनी महाभारताची रचना करून नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र याविषयी या ग्रंथात भाष्य केल्यानं भारतीय संस्कृतीचा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो.

आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असंही संबोधल जातं आणि या दिवशी गुरूची पूजा केली जाते. यालाच व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं.

'व्यासोचिछष्टं जगत्सर्वम्' म्हणजेच व्यासांनी जगातलं सगळं ज्ञान उष्ट करून सोडलं आहे असा समज सर्वत्र आहे.याचं कारण भगवद्गीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये मानवी जीवनातल्या एकूणएक पैलूंना स्पर्श केला आहे.केवळ स्पर्शच नाही तर त्या त्या विषयांचं सखोल विवेचनही केलं आहे.

खरं तर हजारो वर्षांपासून भगवद्गीता वाचून अनेक जण प्रभावित झाले आणि वेगवेगळ्या कालखंडांत या ग्रंथानं वेगवेगळ रूप धारण केलं.

भगवद्गीतेपासून अष्टावक्रगीता,ईश्वरगीता,

कपिलगीता,गणेशगीता,पराशरगीता,

भिक्षुगीता,व्यासंगीता,रामगीता,शिवगीता,

सूर्यगीता,हंसगीता आणि यमगीता लिहिल्या गेल्या.मूळ भगवद्गीता हा ग्रंथ संस्कृतमध्ये असून संत ज्ञानेश्वरांनी हीच संस्कृतमधली भगद्गीता सुलभ भाषेत मराठीतून आणली.विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचं मराठीत ओव्यांच्या रूपात 'गीताई' या नावानं भाषांतर केलं आहे.भगवद्गीतेवर मराठीतून, हिंदीतून आणि संस्कृतसह अनेक भाषांमधून अनेक ग्रंथ लिहिले गेले.महात्मा गांधी यांनी 'अनासक्ती योग',परमहंस योगानंदांनी 'ईश्वरार्जुन संवाद',अरविंद घोष यांनी 'एसेज ऑन गीता', इस्कॉनच्या प्रभुपादस्वामी यांनी 'गीता आहे तशी´,ज.स.करंदीकर यांनी 'तत्त्वमंजरी' अर्थात 'निर्लेप कर्मशास्त्र',जयदयाल गोयंका यांनी 'गीतातत्त्व विवेचनी टीका',दासोपंत यांनी 'गीतार्णव',कृ.ह. देशपांडे यांनी 'श्रीगीतार्थबोध', आदि शंकराचार्य यांनी 'गीताभाष्य',

रामानुज यांनी 'गीताभाष्य',टिळक मंडाले इथे तुरुंगवासात असताना त्यांनी अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. नारायण वासुदेव गोखले यांनी भगवद्गीतेचा इंग्रजीतून अनुवाद केला,तसंच त्यांनी 'गीतेमध्ये काय आहे?' या ग्रंथातून भगवद्गीतेची मांडणी केली.देवदत्त पटनायक यांनी 'माझी गीता' हा ग्रंथ इंग्रजीतून लिहिला.याशिवाय अनेक अभ्यासकांनी अनेक भाषांमधून भगवद्गीता सर्वसामान्य लोकां- समोर आणली.'भगवद्गीता' हा इतका महत्त्वाचा ग्रंथ आहे,की अनेक धर्मातल्या तत्त्वज्ञांनी,विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी या ग्रंथाची प्रशंसा केली आहे. महात्मा गांधींपासून ते अल्बर्ट आईन्स्टाईनपर्यंत अनेक थोरांना भगवद्गीतेनं प्रभावित करून सोडलं.आयुष्यात येणाऱ्या संकटाच्या वेळी आणि मोहाच्या वेळी काय करावं यासाठी महात्मा गांधींनी संस्कृत शिकून भगवद्गीतेचा अभ्यास केला.

आपल्या आईची जागा या ग्रंथानं घेतली,असं महात्मा गांधींनी म्हटलंय. मला आत्मिक समाधान केवळ 'भगवद्गीता' वाचून मिळतं आणि असा ग्रंथ झाला नाही आणि पुढेही कधी होणार नाही,अशा रीतीनं महात्मा गांधींनी भगवद्गीतेचं महत्त्व सांगितलं.


 "मी जेव्हा भगवद्गीता वाचतो आणि त्याच वेळी विश्वाची निर्मिती कशी झाली याचा विचार करतो त्या वेळी मला सगळं काही निरर्थक भासतं,असं भगवद्गीतेविषयी बोलताना विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यानं म्हटलं.


'भगवद्गीता ही शाश्वत तत्त्वज्ञानाचा आणि अध्यात्माचा सगळ्यात सरळ आणि सुलभ सारांश आहे.म्हणून केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे.आहे,' असं विख्यात विचारवंत आणि साहित्यिक असलेल्या अँल्डस हक्स्ली यानं म्हटलं. 


मॅनहटन प्रकल्पाचा प्रमुख रॉबर्ट जे. ओपेनहायमर या शास्त्रज्ञावर तर भगवद्गीतेचा खूप मोठा प्रभाव होता. तो नेहमी आपल्या- जवळ भगवद्गीतेची प्रत बाळगत असे.


योगी अरविंद,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे,डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर,जर्मन विचारवंत रुडॉल्फ स्टिनर,हेन्री डेव्हिड थोरो,राल्फ वाल्डो इर्मसन, स्वामी विवेकानंद आणि भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या आयुष्यावरदेखील भगवद्गीतेनं खूप मोठा प्रभाव पाडला होता..


१९८५ साली अमेरिकेतल्या पीटर ब्रुक यानं महाभारतानं प्रभावित होऊन नऊ तासांचं नाटक 'महाभारत' याच नावानं प्रत्यक्ष सादर केलं. या नाटकाचे त्यानं चार वर्ष जगभर प्रयोग केले. त्यानंतर पीटर ब्रुकन याची लांबी कमी करून १९८९ साली दूरदर्शनसाठी सहा तासांची फिल्म बनवली.त्यानंतर डीव्हीडी ही तीन तासांची तयार केली.या फिल्मची पटकथा पीटर ब्रुकन स्वतःच लिहून ती फिल्म स्वतःच दिग्दर्शित केली होती. या फिल्मचं संगीत नोबेल पुरस्कारप्राप्त रवींद्रनाथ टागोर यांचं होतं.

'महाभारत' ही फिल्म तयार करण्यासाठी पीटर ब्रुकनं आठ वर्षं परिश्रमपूर्वक अभ्यास केला होता.या फिल्मनं अनेक पुरस्कार प्राप्त केले.इतकंच नाही तर या फिल्मन फ्रान्स,यूके,जपान,डेन्मार्क,बेल्जियम, स्वीडन,पोर्तुगाल,

नॉर्वे,नेदरलँड आणि फिनलँड इथे प्रदर्शित होऊन भरभरून यश मिळवलं. यू ट्यूबवर ही फिल्म उपलब्ध आहे.महाभारताच्या कथानकावर अनेकांनी चित्रपट काढले असले तरी शशी कपूर निर्मित 'कलयुग' हा चित्रपट खूप गाजला होता. १९८८ ते १९९० या काळात बी.आर.चोप्रा आणि त्यांचा मुलगा रवी चोप्रा दिग्दर्शित भारतात 'महाभारत' ही दूरदर्शन मालिका प्रसारित झाली.

या मालिकेवर एकूण ९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. जगातली सगळ्यात जास्त बघितली गेलेली ही मालिका होती.९४ भागांत असलेल्या मालिकेचा प्रत्येक भाग हा ४५ मिनिटांचा असून ब्रिटनमध्ये बीबीसीद्वारा याचं प्रसारण केलं तेव्हा प्रेक्षकांची संख्या ५० लाखांच्यावर गेली होती.ही मालिका सुरू असताना अघोषित संचारबंदी लागल्या प्रमाणे संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट असे. ज्यांच्याकडे टीव्ही संच नाही.असे अनेक जण शेजाऱ्यांच्या घरी विनासंकोच मालिका बघण्यासाठी जात आणि गंमत म्हणजे येणाऱ्याला कोणीही 'नाही' म्हणत नसे. भीष्माची भूमिका करणारा मुकेश खन्ना हा अभिनेता तर इतका लोकप्रिय झाला की,त्यानं आपल्या कंपनीला भीष्म हेच नाव दिलं,तर श्रीकृष्णाची भूमिका करणारा नितीश भारद्वाज या अभिनेत्याला रस्त्यावर लोकांनी बघितलं तर ते चक्क त्याच्या पाया पडत.तसंच महाभारताचं शीर्षकगीत विख्यात गायक महेंद्र कपूरच्या धीरगंभीर आवाजातलं होतं.


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।७।। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।८।।


'भगवद्गीता' अनेक भाषांत भाषांतरित झाली; आजवर तिच्या हजारो / लाखो प्रती विकल्या गेल्या; तेव्हा एकच सत्य समोर येतं आणि ते म्हणजे 'भगवद्गीता' आणि तिचा निर्माता महर्षी व्यास यांनी समस्त मानवजातीला अचंबित व्हावं असं जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान दिलं हेच खरं!


अति झोप,भीती,कमकुवत मन,आळस आणि दिरंगाई या पाच गोष्टींपासून माणसानं मुक्त झालं पाहिजे. - महर्षी व्यास


४ एप्रिल २०२३ या लेखातील शेवटचा भाग


समाप्त..

१०/४/२३

जेव्हा वेळप्रसंग येतो तेव्हा आपण एकाकीच असतो.ही सांगणारी गोष्ट.. भाग शेवटचा

तसं असेल तर मग त्या फेब्रुवारीतल्या दुपारी रुबेन,

रायनर,रिंक आणि वित्झे यांनी अँमस्टरडॅममधल्या बर्फासारख्या थंडगार कालव्यात का उडी मारली यात काहीच रहस्य नाही की! हा तर त्यांचा नैसर्गिक प्रतिसाद होता. आता प्रश्न असा आहे की,१३ मार्च १९६४च्या रात्री किटी जिनोवेजेचा खून झाला तेव्हा काय घडलं? त्या सर्वज्ञात कहाणीतलं नक्की काय काय खरं आहे?साक्षीदारांनी दाखवलेल्या बेफिकिर वृत्तीबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुरुवातीच्या लोकांमधील जोसेफ डी मे हा क्यू गार्डन येथे नव्यानं राहायला आलेला रहिवासी होता.तो नवागत इतिहासकार होता आणि किटीच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी तिथं राहायला आला होता.त्या वस्तीला बदनाम करणारी ती हत्या झाली तरी कशी असावी,याबद्दल त्याला कुतूहल वाटलं म्हणून त्याने स्वतःच शोध घ्यायचं ठरवलं.त्यासाठी तो वेगवेगळ्या माहिती संग्रहांतली माहिती शोधू लागला.पुसट झालेले फोटो,जुनी वृत्तपत्रं,पोलीस अहवाल वाचू लागला.मग सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर नक्की काय घडल होत ते चित्र त्यांच्या नजरेसमोर उमटलं.आपण पुन्हा अगदी पहिल्यापासून सुरुवात करू.या वेळेस डी मे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन केलेल्या चौकशीवर १३ मार्च,१९६४ रोजी घडलेल्या वा घटना आधारलेल्या आहेत.पहाटेचे ३.१९ - एका काळीज गोठवणाऱ्या किंकाळीनं ऑस्टीन रस्त्यावरील शांतता भंग पावली;परंतु बाहेर तर खूपच थंडी होती आणि बहुतेक रहिवाशांच्या घरांच्या खिडक्या बंद होत्या.रस्त्यावर फारसे दिवेही नव्हते.ज्या लोकांनी खिडकीबाहेर पाहिलं,त्यातील बहुतेकांना तिथं काही विचित्र होतंय असं वाटलंच नाही.

काहींना रस्त्यावरून दिव्याच्या अंधुक उजेडात एक स्त्री ओझरती दिसली;परंतु त्यांना वाटलं की ती बहुतेक दारू पिऊन झिंगली आहे.तेही काही विचित्र नव्हतं.कारण,

त्याच रस्त्यावर पुढे एक बारही होता.तरीही कमीत कमी दोन रहिवाशांनी फोन करून पोलिसांना बोलावलं.त्यातले एक होते मायकेल हॉफमनचे वडील,मायकेल हॉफमन नंतर पोलीस दलात भरती झाले.दुसरी होती हॅटी ग्रुंड.ती जवळच्याच इमारतीत राहत होती.'आम्हाला आधीच फोन आलेत,'असं पोलिसांनी म्हटल्याचं तिने काही वर्षांनी सांगितलं.पण पोलीस तर आलेच नाहीत.पोलीस का नाही आले? त्यांनी ठाण्यातून सुसाट धाव घेत जोरजोरात सायरन वाजवत खरं तर यायला हवं होतं.त्या स्थळी पोलिसांची मदत धाडणाऱ्या वरिष्ठांना वाटलं की,हा काहीतरी वैवाहिक भांडणाचा प्रकार आहे.आता पोलीस दलातून निवृत्त झालेल्या हॉफमनना वाटतं की म्हणूनच ते प्रत्यक्ष हत्येच्या ठिकाणी एवढे उशिराने पोहोचले.हेही लक्षात घेतलं पाहिजे की, त्या काळात एखादा नवरा बायकोला मारत असेल तर लोक फार लक्ष देत नसत आणि विवाहातील बलात्कारास तर गुन्हा मानण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.

पण मग या ३८ साक्षीदारांचं काय ?

हा नाठाळ आकडा आला तरी कुठून? गाण्यांतून,नाटकांतून,प्रसिद्ध चित्रपटांतून,सर्वाधिक खपाच्या पुस्तकांत सातत्यानं सांगितला.गेलेला हा आकडा पोलीस खात्यातील हेरांनी प्रश्न विचारलेल्या लोकांच्या यादीतून आला.या यादीतील बहुसंख्य लोक प्रत्यक्ष गुन्हा पाहणारे साक्षीदार नव्हते.त्यातील बहुतेकांनी 'काहीतरी'आवाज ऐकला होता आणि त्यातल्या काही जणांना तर झोपेतून जागही आली नव्हती.फक्त दोन जण त्यास अपवाद होते.त्यातला एक जण होता जोसेफ फिंक हा त्याच इमारतीतला शेजारी होता.तो विक्षिप्त,माणूसघाणा होता.तो ज्यूद्वेष्टा म्हणून लोकांना माहिती होता (स्थानिक मुलं त्याला अँडॉल्फ असं म्हणायची).जेव्हा तो प्रसंग घडला तेव्हा तो टक्क जागा होता.त्याने किटीवरला पहिला हल्ला पाहिलाही होता आणि तरीही काही केले नव्हतं.किटीला तिच्या कमनशिबावर सोडून देणारा दुसरा माणूस होता.कार्ल रॉस हा शेजारी तिचा आणि मेरी अँनचा मित्र होता. तिच्यावर जिन्यापाशी झालेला दुसया हल्ला त्यानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. (प्रत्यक्षात तिच्यावर तीन नव्हे,दोन हल्ले झाले.)परंतु तो घाबरला आणि तिथून पळूनच गेला.रॉसनेच पोलिसांना सांगितलं होतं की,मला या लफड्यात पडायचं नाही.परंतु त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की,त्याला प्रसिद्धी नको होती.त्या रात्री तो प्यायलेला होता, त्याशिवाय तो समलिंगी आहे हेही बाहेर येईल की काय अशी त्याला भीती वाटली होती.त्या काळात समलैंगिकता पूर्णपणे बेकायदेशीर होती.रॉसला पोलिसांची आणि न्यू यॉर्क टाइम्ससारख्या वृत्तपत्रांची भयंकर भीती वाटत होती.

कारण,समलैंगिकता हा धोकादायक आजार आहे.असा कलंक त्या दोघांनीही समलैंगिकतेस लावला होता.

समलैंगिक पुरुषांना पोलीस छळत असतच,त्याशिवाय समलैंगिकता हा प्लेगच आहे.असं चित्र वृत्तपत्रेही रंगवत असत (खास करून किटीचं नाव सर्वतोमुखी करणाऱ्या एब रोझेन्थाल या संपादकास समलैंगिक लोकांबद्दल तीव्र नापसंती होती.किटीच्या खुनाच्या थोडंसं अगोदर त्याने आणखी एक लेख लिहिला होता त्याचा मथळा असा होता - शहरामध्ये राजरोसपणे चाललेल्या समलैंगिकतेत वाढ झाल्यामुळे लोकांना चिंता वाटू लागली आहे).अर्थात यातल्या कुठल्याही सबबीमुळे कार्ल रॉसच्या बेजबाबदारपणावर पांघरूण घालणं शक्य नाही.जरी तो दारू प्यायलेला असला,घाबरलेला असला तरी मैत्रिणीला वाचवण्यासाठी त्याने अधिक काहीतरी पावलं उचलायला हवीच होती.तसं काही करण्याऐवजी त्याने आणखी एका मित्राला फोन केला.त्या मित्राने ताबडतोब पोलिसांना बोलवायला सांगितलं;परंतु रॉसला स्वतःच्या घरातून तो फोन करण्याचे धैर्य झालं नाही म्हणून त्याने गच्चीवर जाऊन शेजारच्या घरातील महिलेला सांगितलं,तिथं राहणान्या बाईनी तिच्या शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या महिलेला उठवलं.ती दुसरी महिला होती.सोफिया फॅरार किटी खाली जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे.हे ऐकताक्षणी ती क्षणभरही थांबली नाही. ती धावत घराबाहेर पडली तेव्हा तिचा नवरा पँट चढवत होता आणि 'थांब थांब,मी आलो,' असं तिला सांगत होता.सोफियाला जे काही कळलं होतं,

त्यानुसार कदाचित तीही थेट त्या खुन्याच्या विळख्यात सापडू शकत होती;परंतु त्यामुळेही ती थांबली नाही.तिने नंतर सांगितलं,"मी मदतीसाठी धावले.तेच करणं त्या परिस्थितीत स्वाभाविक होतं.

किटी पडली होती त्या जिन्याचा दरवाजा उघडून ती गेली तोवर खुनी पळून गेलेला होता. सोफियाने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली तेव्हा किटी तिच्या कुशीत शिरत क्षणभरासाठी विसावली.अशा प्रकारे,कॅथरिन सुसान जिनोवेजे आपल्या शेजारणीच्या मिठीतच मरणाला सामोरी गेली.ही कहाणी पुष्कळ वर्षांनी कळली तेव्हा किटीचा भाऊ बिल म्हणाला की,'किटी तिच्या मैत्रिणीच्या मिठीत असताना मृत्यू पावली हे तेव्हा कळल असतं तर आमच्या कुटुंबाला कितीतरी फरक पडला असता.'

मग सोफिया विस्मृतीत का गेली असावी ?

कुठल्याही कागदपत्रात तिचा उल्लेख का नसावा?त्यामागचं सत्य अगदीच निराश करणारं होतं.सोफियाच्या मुलाच्या म्हणण्यानुसार,'माझी आई तेव्हा एका वृत्तपत्रातील महिलेशी बोलली होती.'परंतु जेव्हा तो लेख दुसऱ्या दिवशी छापून आला तेव्हा त्यात लिहिलं होतं की,'सोफियाला त्या भानगडीत पडायचं नव्हतं.'तो भाग वाचून सोफिया खूपच भडकली होती आणि 'यानंतर कुठल्याही पत्रकाराशी आपण बोलणार नाही' अशी तिने प्रतिज्ञाच केली होती.तसं म्हणणारी सोफिया एकटीच नव्हती.खरं सांगायचं तर क्यू गार्डनच्या डझनावारी रहिवाशांनी तक्रार केली होती की,पेपरवाले लोक आमचे शब्द सोईस्करपणे आहेत.त्यातील कित्येक जण नंतर ती वस्ती सोडूनही गेले.दरम्यानच्या काळात पत्रकार मंडळी मात्र येतच राहिली.११ मार्च, १९६५ रोजी म्हणजे किटीच्या मृत्यूला होण्याच्या दोन दिवस अगोदर एका वार्ताहराला वाटलं की, आपण क्यू गार्डन परिसरात जाऊन मध्यरात्रीच्या वेळेस 'खून होतोय खून' अशी बोंब ठोकून 'विनोद' करावा,तेव्हा छायाचित्रकार आपले कॅमेरे तयार ठेवून रहिवाशांच्या प्रतिक्रिया फोटोबद्ध करण्यासाठी सज्ज होऊन उभे होते.

हा सगळा प्रकारच वेडेपणाचा होता.त्याच कालखंडात न्यू यॉर्क शहरात चळवळीचा जोर वाढू लागला होता.मार्टिन ल्युथर किंग यास नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता,त्यामुळे लाखो अमेरिकन लोक रस्त्यांवरून मोर्चे काढू लागले होते आणि न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स भागात तर २००हून अधिक सामाजिक संस्था उभारल्या गेल्या होत्या. 'बेपर्वाईची साथ' या विषयाचं वृत्तपत्रांना वेडच लागलं होतं आणि ते त्याच विषयाची रेकॉर्ड वाजवत बसले होते.डॅनी मीनान नावाचा एक पत्रकार आणि रेडिओ वार्ताहर होता.त्याला 'निष्क्रिय' बघ्यांच्या कहाणीबद्दल शंका वाटत होती.जेव्हा त्याने खऱ्या गोष्टी तपासून पाहिल्या तेव्हा कळलं की,बहुतेक साक्षीदारांना त्या रात्री वाटलं होतं की,आपण एका दारू प्यायलेल्या स्त्रीला पाहिलं आहे.मग मीनानने न्यू यॉर्क टाइम्सच्या वार्ताहराला विचारलं की,'तू ही माहिती तुझ्या बातमीत का दिली नाहीस?' त्यावर त्याने उत्तर दिलं की,'त्यामुळे माझ्या बातमीचीच वाट लागली असती.' पण मग मीनानने ती गोष्ट स्वतःकडेच का ठेवली ? स्वतःचं नुकसान होऊ नये म्हणून त्याने तसं केलं.त्या काळात एकट्या दुकट्या पत्रकाराला स्वतःची नोकरी टिकवायची असेल तर जगातील सर्वांत शक्तिमान वृत्तपत्राच्या विरोधात जाणं शक्य नव्हतं.काही वर्षांनी आणखी एका पत्रकाराने त्याविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला,तेव्हा त्याला न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्रातून एब रोझेंथालने रागारागाने फोन केला.'ही कहाणी म्हणजे अमेरिकेतील परिस्थितीचं प्रतीकच बनली आहे हे तुला माहितीय का? ती तर समाजशास्त्राचे अभ्यासक्रम,पुस्तकं आणि लेखांचे विषयही बनली आहे आणि तिच्याविरुद्ध तू टिप्पणी करतोस.?"प्रत्यक्षात त्या मूळ कथेचा किती छोटा भाग राहिला ते पाहून धक्काच बसतो.त्या दुर्दैवी रात्री सर्वसामान्य न्यू यॉर्कवासी कर्तव्याला चुकले नाहीत,तर अधिकाराच्या जागेवरील लोक कर्तव्याला चुकले.किटी एकाकी अवस्थेत मेली नाही तर आपल्या मैत्रिणीच्या मिठीत तिनं प्राण सोडला.अगदी मुळाशीच जायचं म्हटलं तर विज्ञान सांगतं तसा बघ्यांच्या उपस्थितीचा निष्क्रिय परिणाम होत नाही तर त्याच्या विरुद्धच परिणाम होतो.आपण मोठ्या शहरात,सबवेवर,गर्दीच्या रस्त्यांवर एकटे नसतो,

आपण एकमेकांना असतो.आणि किटीची कहाणी तिथेच संपत नाही.त्या कहाणीला एक शेवटचं,विचित्र वळणही आहे.किटीच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी क्वीन्स परिसरातील रहिवासी राऊल क्लिअरी याला रस्त्यावर एक अनोळखी माणूस दिसला. तो दिवसाढवळ्या एका शेजाऱ्याच्या घरातून बाहेर येत होता,त्याच्या हातात टीव्ही सेट होता. राऊलने त्याला अडवलं तेव्हा त्याने म्हटल की, मी सामान हलवणारा माणूस आहे.परंतु राऊलला शंका आली म्हणून त्याने जॅक ब्राऊन नामक शेजाऱ्याला फोन केला. "बॅनिस्टर्स घर सोडून चालेलत का?" त्याने विचारलं."छे,नाही हो,"ब्राऊनने उत्तर दिलं.मग त्या दोघांनी अजिबात वेळ दवडला नाही.जॅकने त्या माणसाच्या गाडीच्या चाकातली हवा काढली आणि राऊलने पोलिसांना फोन केला.पोलीस घरफोड्याला पकडायला आले आणि ज्या क्षणी तो माणूस पुन्हा बाहेर आला त्या क्षणी त्यांनी त्याला पकडलं.त्यानंतर काही तासांनी त्या माणसाने कबुलीजबाब दिला.

म्हणजे ते घर फोडून तो आत घुसला होताच शिवाय त्याने क्यू गार्डन परिसरात एका तरुणीचा खूनही केला होता.बरोबर! म्हणजे किटीच्या खुन्याला पकडलं होतं तर खरं तर दोन बघ्यांच्या हस्तक्षेपामुळे तो पकडला गेला होता;परंतु एकाही वृत्तपत्राने ती बातमी दिली नव्हती.किटी जिनोवेजेची ही खरी कहाणी आहे.ही कहाणी मानसशास्त्राच्या पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर पत्रकार होऊ इच्छिणाऱ्यांनीही वाचली पाहिजे.

कारण,ही कहाणी आपल्याला तीन गोष्टी शिकवते.एक म्हणजे मानवी स्वभावाबद्दल आपला दृष्टिकोन किती ठाकून ठोकून विचित्र बनवलेला आहे. दुसरी म्हणजे सनसनाटी बातम्या विकण्यासाठी पत्रकार मंडळी किती सहजगत्या अचूक बटणं कशी दाबतात आणि तिसरी पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकटाच्या वेळी आपण एकमेकांवर कसे अवलंबून राहू शकतो.आम्ही अँमस्टरडॅममध्ये पाण्याकडे पाहत होतो तेव्हा मी रुबेन अब्राहम्सला विचारलं की,पाण्यात उडी मारल्यामुळे तुला आपण 'हिरो' बनलो असं वाटलं का? त्याने खांदे उडवत म्हटलं, 


'नाही हो,त्यात विशेष काय? लोकांनी जीवनात एकमेकांची काळजी घेतलीच पाहिजे ना.'


संपली एकदाची गोष्ट

८/४/२३

जेव्हा वेळप्रसंग येतो तेव्हा आपण एकाकीच असतो.ही सांगणारी गोष्ट.. भाग २

किटी जिनोवेजेबद्दल पहिल्यांदा वाचलं तेव्हा मी विद्यार्थी होतो.माल्कम ग्लॅडवेलचं पदार्पणातील पहिलं वहिलं पुस्तक द टिपिंग पॉइंट हे लाखो लोकांप्रमाणे मी ही अधाश्यासारखं वाचून काढलं होत.त्या पुस्तकाच्या २७व्या पानावर मला त्या ३८ साक्षीदारांबद्दल कळलं.मिलग्रामचं शॉक मशिन आणि झिबार्डोच्या तुरुंग कहाणीसारखीच यादेखील कहाणीने माझ्या मनाची पकड घेतली. त्यानंतर कित्येक वर्षांनी रोझेन्थालने म्हटलं की,'अजूनही मला या कहाणीसंबंधी मेल येतात.लोकांना ही कहाणी पछाडते.ती एखाद्या जादुई रत्नासारखी आहे.तुम्ही तिच्याकडे बघत राहता आणि दर वेळेस नवनव्या गोष्टी तुम्हाला जाणवू लागतात.'१३ एप्रिल शुक्रवारचा तो दुर्दैवी दिवस नाटकं आणि गीतांचा विषय बनला.

सनफिल्ड,गर्ल्स अँड लॉ अँड ऑर्डर या मालिकेचे सगळे भाग याच विषयाला वाहिलेले होते.क्यू गार्डन येथे १९९४मध्ये केलेल्या भाषणात अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी किटीच्या हत्येच्या रक्त गोठवून टाकणाऱ्या संदेशाची आठवण जागवली.अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे उपसचिव पॉल बुल्फोवित्झ यांनी तर २००३ साली अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं,त्याचं समर्थन करताना या प्रकरणाचा उल्लेख करून सुचवलं की,या युद्धास विरोध करणारे अमेरिकन लोक हे त्या ३८ साक्षीदारांसारखे निष्क्रिय बघे आहेत.या कहाणीचं तात्पर्य स्पष्ट आहे असं मला वाटत होतं.'किटी जिनोवेजेच्या मदतीला कुणीही का गेलं नसावं ? तर लोक निष्काळजी आणि बेपर्वा होते म्हणून.'या संदेशाने गती पकडल्याने किटी जिनोवेजे हे नाव घरोघरी पोहोचलं होतं तो काळ आणि लॉर्ड ऑफ द फ्लाइज हे पुस्तक सर्वाधिक खपाचं होण्याचा काळ एकच होता.याच काळात आईकमनवर खटला दाखल झालेला होता, स्टॅन्ली मिलग्रामचे 'विजेचे झटके' जगभर पोहोचले होते आणि झिबार्डीने आपल्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली होती.परंतु मी किटीच्या मृत्यूभोवतीच्या परिस्थितीवरील संशोधन वाचू लागलो,

तेव्हा मला एका पूर्णतया वेगळ्याच कहाणीचा सुगावा लागला,पुन्हा एकदा तसं घडलं होतं.बिच तटाने आणि जॉन डालें हे दोन तरुण मानसशास्त्रज्ञ होते.

'आणीबाणीच्या प्रसंगी प्रेक्षक किटीच्या हत्येनंतर लगेचच त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं.प्रयोगातले सहभागी कसलीही आगाऊ पूर्वसूचना न दिलेले कॉलेज विद्यार्थी होते.

त्यांना एका बंद खोलीत एकटच बसून इंटरकॉमवरून सहाध्यायांशी कॉलेज जीवनाबद्दल गप्पा मारा,असं सांगण्यात आलं.फक्त तिथं पलीकडच्या बाजूला कुणीही विद्यार्थी नव्हता.संशोधकांनी त्याऐवजी एक आधीपासून ध्वनिमुद्रित केलेली टेप लावली होती. कुठल्यातरी क्षणी एक आवाज विनवणी करून म्हणत होता,"मला मदतीची गरज आहे,मला कुणीतरी मदत करा.कऽरा मऽदऽत" मग जरा घुसमटल्यासारखा आवाज काढून,"मी मरतोय रे मरतोयऽऽऽ..." त्यानंतर पुढे काय झालं? जेव्हा त्या सहभागी व्यक्तीला वाटायचं की,आपण एकट्यानेच ही मदतीची हाक ऐकली आहे तेव्हा ती धावत धावत बाहेरच्या मार्गित येत असे.एकही अपवाद न वगळता त्या सर्वांनी मार्गिकत धाव घेतली होती;परंतु ज्या मुलाना सांगितलं होतं की,जवळपासच्या खोल्यांमध्ये आणखी पाच विद्यार्थी बसलेले आहेत,त्यांच्यापैकी फक्त ६२ टक्क्यांनी प्रत्यक्ष कृती केली होती... अरेच्चा ! म्हणजे हाच होता का तो निष्क्रिय बघेपणा...

लटाने आणि डालें यांच्या शोधांनी 'सामाजिक मानसशास्त्र' विषयात दिलेलं योगदान भरीवच म्हणावं लागेल.'आणीबाणीच्या प्रसंगी बघे लोक कसं वर्तन करतात.' यावर पुढील वीस वर्षांत हजारहून अधिक लेख आणि पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.क्यू गार्डनमधील - ३८ जणांच्या निष्क्रियतेचं स्पष्टीकरणही या निष्कर्षांमुळे मिळालं आहे किटी जिनोवेजेच्या 

किंकाळ्यांनी 'संपूर्ण वस्ती जागी झाली होती'आणि तरीही किटी मेली होती या मागचं कारण 'संपूर्ण वस्ती जागी झाली होती.'हेच होतं.बाजूच्या इमारतीत राहणाऱ्या महिलेने नंतर एका वार्ताहराला सांगितलेल्या माहितीतून ही गोष्ट उदाहरणासहीत समोर उभी राहते.

तिचा नवरा पोलिसांना बोलवायला निघाला होता तेव्हा तिने त्याला अडवलं होतं,'मी त्याला म्हणाले की,त्यांना तीस बत्तीस फोन गेले असतील आत्तापर्यंत,नको करूस फोन.' याचा अर्थ किटीवरचा हल्ला एखाद्या निर्मनुष्य गल्लीत एकाच साक्षीदारासमोर घडला असता तर ती त्यातून कदाचित वाचलीही असती.

या सगळ्यामुळे किटीच्या प्रसिद्धीत भर पडली. तिच्या कहाणीला मानसशास्त्राच्या 'अव्वल दहा' पुस्तकांत जागा मिळाली.आजही पत्रकार आणि व्यासंगी विद्वान त्या कहाणीचा संदर्भ देतात. महानगरातील धोकादायक 'बिनचेहरे'पणाची ती आधुनिक बोधकथाच बनली आहे.

बरीच वर्षं मी समजत होतो की,'निष्क्रिय बघे प्रवृत्ती' ही महानगरीय जीवनाचा अटळ भाग आहे;पण त्यानंतर मी ज्या शहरात काम करत होतो, तिथंच काहीतरी घडलं,

त्यामुळे मला माझी गृहीतकं पुन्हा एकदा तपासून पाहावी लागली.९ फेब्रुवारी,२०१६चा दिवस होता तो.दुपारी पावणेचार वाजता अँमस्टरडॅममधील कालव्याला लागून असलेल्या स्लोटरकेड रस्त्यावर सॅनीने तिची पांढरी अल्फा रोमियो गाडी लावली. गाडीतून बाहेर पडून ती बाजूच्या आसनावर बसवलेल्या लहान बाळाला घ्यायला वळली. तेवढ्यात तिला जाणवलं की,गाडी तर पुढे पुढेच चालली आहे.सॅनी कशीबशी उडी मारून स्टिअरिंगमागे जाऊन बसली;परंतु ब्रेक दाबायला तोवर उशीर झाला होता त्यामुळे गाडी कालव्यात खाली पडली आणि बुडू लागली.वाईट बातमी-डझनावारी बघे ते घडताना नुसतेच बघत राहिले.तिथे आणखीही काही लोकांनी सॅनीचा आक्रोश ऐकला होता.क्यू गार्डनप्रमाणेच याही ठिकाणी संकट दिसू शकेल अशी अपार्टमेंट्स होती. हीसुद्धा एक टुमदार,उच्च मध्यमवर्गीय वस्तीच होती.परंतु नंतर काहीतरी अनपेक्षित घडलं. 

कोपऱ्यावरील इस्टेट एजन्सीचा मालक रुबेन अब्राहम्स याने नंतर स्थानिक टीव्ही वार्ताहराला सांगितलं,'ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.मोटार पाण्यात जातेय,हे काही चांगलं नाही.असा विचार मनात येऊन मी ऑफिसातल्या टूलबॉक्समधून हातोडा घेतला आणि त्या थंडगार पाण्यात उडी मारली.

तो उंच,कमावलेल्या शरीराचा,दाढीचे केस पांढरे होऊ लागलेला रुबेन जानेवारीतल्या एका थंडगार दिवशी मला भेटला.हा प्रसंग कुठे घडला ते त्यानं मला दाखवलं.'तो अगदी विचित्र योगायोगच होता,सगळ्या गोष्टी अगदी निमिषार्धात घडून आल्या.' रुबेननं कालव्यात उडी मारली तेव्हा आणखी एक प्रेक्षक रिंक केंटी यानंही पाण्यात उडी मारलेली होती आणि तो बुडत्या मोटारीकडे जात होता.

त्याशिवाय रायनर बॉश हा आणखीही एक प्रेक्षक पाण्यात शिरला होता.अगदी शेवटच्या क्षणी रायनरच्या हातात एका महिलेनं एक वीट दिली होती,काही

क्षणांनी त्या विटेचं महत्त्व कळणार होतं. त्याशिवाय बित्झे मॉल हा चौथा प्रेक्षकही आणीबाणीच्या वेळेस वापरायचा त्याच्या गाडीतला हातोडा घेऊन सर्वांत शेवटी पाण्यात गेला होता.रुबेननं सांगितलं,'आम्ही खिडक्यांवर हातोडा मारू लागलो.'रायनरनं कडेची खिडकी फोडण्याचा प्रयत्न केला;पण ते काही केल्या जमेना.

दरम्यानच्या काळात गाडी वळून इंजिनाच्या बाजूनं खाली गेली.तेव्हा रायनरनं मागच्या खिडकीवर जोरात वीट हाणली,सरतेशेवटी ती खिडकी फुटली.त्यानंतर सगळं काही विजेच्या वेगानं घडलं.आईनं तिचं बाळ मागच्या खिडकीतून माझ्या हातात दिलं.क्षणभर ते मूल अडकलं.'परंतु काही सेकंदांतच रुबेन आणि रायननं बाळाला बाहेर काढलं.रायनर बाळाला घेऊन सुरक्षित जागी गेला;पण आई अजूनही गाडीतच होती.गाडी पाण्यात पूर्णपणे बुडणार एवढ्यात रुबेन,रिंक अणि वित्झे यांनी तिला बाहेर यायला मदत केली.

त्यानंतर दोनपेक्षाही कमी सेकंदांत गाडी कालव्याच्या त्या शाईसारख्या काळ्याशार पाण्यात दिसेनाशी झाली.तोपर्यंत पाण्याच्या बाजूला प्रेक्षकांचा मोठा जमावच गोळा झाला होता.त्यांनी आई,बाळ आणि त्या चार पुरुषांना पाण्यातून बाहेर यायला मदत केली,अंगाभोवती गुंडाळायला टॉवेल दिले.ही सुटकेची कारवाई केवळ दोन मिनिटांतच घडून आली होती.या सगळ्या काळात ते चार अनोळखी पुरुष एकमेकांशी एक शब्दही बोलले नव्हते.त्यांच्यातील एकालाही हालचाल करायला एखाद्या सेकंदाचाही विलंब झाला असता तर मग काहीही उपयोग झाला नसता.त्या चौघांनी पाण्यात उडी मारली नसती तर सुटकेत अपयश येऊ शकलं असतं.त्या निनावी महिलेनं शेवटच्या क्षणी रायनरला वीट दिली नसती तर त्याला गाडीची मागची खिडकी फोडता आली नसती आणि आईला व बाळाला बाहेर काढता आलं नसतं.वेगळ्या शब्दांत सांगायचं तर सॅनी आणि तिचं बाळ पुष्कळ मोठ्या संख्येनं प्रेक्षक असूनही वाचले नव्हते,तर ते प्रेक्षक मोठ्या संख्येनं हजर होते म्हणून वाचले होते.आता तुम्ही विचार कराल की,ही अगदी हृदयस्पर्शी कहाणी आहे;पण मग हा निष्क्रिय बघ्यांच्या नियमाचा अपवाद आहे की डच संस्कृतीतच असं काहीतरी खास होतं किंवा अँमस्टरडॅममधील त्या वस्तीत किंवा अगदी त्या चार माणसांतच काहीतरी खास होतं आणि त्यामुळे हे नियम विसंगत कृत्य घडून आलं?

तर तसं काहीही झालं नव्हतं म्हणजे निष्क्रिय बघ्यांचा नियम अजूनही बऱ्याच शैक्षणिक पुस्तकात शिकवला जात असला तरी २०११ साली प्रकाशित झालेल्या एका तौलनिक विश्लेषणात (मेटा अँनेलिसिस) संकट समयी बघे लोक काय करतात,यावर नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे

तौलनिक विश्लेषण म्हणजेच मेटा अँनेलिसिस हे वेगवेगळ्या संशोधनांवर केलेलं संशोधन असतं. त्यात वेगवेगळ्या गटांनी केलेल्या अभ्यासांचा समावेश असतो.संकटकाळातील बघ्यांच्या वर्तनावर मागील ५० वर्षांत महत्त्वाचे असे १०५ अभ्यास करण्यात आले त्या सर्व अभ्यासांचा 'अभ्यास' या तौलनिक विश्लेषणात करण्यात आला होता.त्यात लटाने - डार्ले यांनी केलेल्या (खोलीतील विद्यार्थ्यांच्या) अगदी सुरुवातीच्या प्रयोगाचाही समावेश होता.त्यातून दोन महत्त्वाचे निष्कर्ष निघाले.एक निष्क्रिय बघ्यांचा परिणाम अस्तित्वात असतो. कधी कधी बघे विचार करतात की,संकट समयी आपण मध्ये पडण्याची गरज नाही,कारण दुसऱ्या कुणीतरी ती जबाबदारी घेणं अधिक उपयुक्त ठरेल.कधी कधी त्यांना भीती वाटते की, आपण काहीतरी चुकीचं करून बसू,त्यामुळे टीकेला घाबरून ते पुढे येत नाहीत.तर कधी कधी तिथं काही चुकीचं घडतंय असं त्यांना वाटत नाही.कारण,बाकीचे कुणीच पुढे येऊन कृती करताना दिसत नाहीत.आणि दुसरा निष्कर्ष ? जर संकट जीवावरचं असेल म्हणजे कुणीतरी बुडतंय अथवा कुणावर तरी हल्ला होतोय,अशा वेळेस बघे लोक एकमेकांशी संवाद साधू शकले (म्हणजे ते वेगवेगळ्या खोल्यांत एकेकटे नसले तर ते असण्याचा परिणाम बरोब्बर उलटा होतो.त्या लेखकाने लिहिलं होतं की,'जास्तीच्या संख्येने बघे असले तर कमी मदत मिळण्याऐवजी जास्तच मिळते.' हे तेवढंच नाही.रुबेननं उत्स्फूर्तपणे मदत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी त्याची मुलाखत घेतली,त्यानंतर मी डॅनिश मानसतज्ज्ञ मेरी लिंडगार्ड यांना अँमस्टरडॅममधल्या एका कॅफेत भेटलो. अंगावरील पावसाचे थेंब झटकतच त्या खुर्चीवर बसल्या आणि लॅपटॉप उघडून माझ्यासमोर कागदाचा गठ्ठा टाकून त्यांनी जवळ जवळ व्याख्यानच द्यायला सुरुवात केली.

हे सगळे उफराटे प्रयोग,प्रश्नावल्या भरून घेणं, मुलाखती वगैरे भानगडी का करायच्या असा प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या संशोधकांत लिंडगार्ड यांचं नाव आहे.त्यांचं म्हणणं होतं की,त्याऐवजी आपण खऱ्या परिस्थितीत सापडलेल्या खऱ्या लोकांचं खरं चित्रीकरणच का नाही बघत? शेवटी काय,आधुनिक शहरांत सगळीकडे कॅमेरे तर लावून ठेवलेले असतातच.'खूपच उत्तम कल्पना! परंतु आपल्याला ते चित्रीकरण मिळणारच नाही.'मेरीला सहकाऱ्यांनी उत्तर दिलं.त्यावर मेरी म्हणाली,'आपण पाहू या ते.' त्यामुळे नंतरच्या काळात मेरीकडे भरपूर माहिती

संग्रह जमला.त्यात कोपनहेगन, केपटाऊन, लंडन आणि अँमस्टरडॅम येथील हजारभर व्हिडिओ होते.त्यात हमरीतुमरीवरील भांडणं,बलात्कार,खुनाचे प्रयत्न अशा प्रकारची चित्रणं होती.त्यांनी काढलेल्या निष्कर्षांतून सामाजिक शास्त्रात एक छोटीशी क्रांतीच घडून आली.त्यांनी माझ्या दिशेनं लॅपटॉप सरकवून म्हटलं, "पाहा, उद्या आम्ही हा लेख एका आघाडीच्या मानसशास्त्रावरील नियतकालिकाकडे पाठवत आहोत.'

मी त्यावरचा कच्चा मथळा वाचला - निष्क्रिय बघ्यांच्या परिणामाबद्दल आपल्याला बरंच काही माहिती आहे,असं जे वाटतं ते सगळं चुकीचं आहे.लिंडगार्डनी कर्सर खाली सरकवला आणि एका सारणीकडे निर्देश केला,

"हे बघा,इथे तुम्हाला दिसेल की,नव्वद टक्के प्रकरणांत लोकांनी एकमेकांना मदत केलेली आहे." नव्वद टक्के.

थांबा अजून गोष्ट पुढे आहे...