* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

४/५/२३

द प्रिन्स - निकोलो मॅकियावेली (१५३२)

निकोलो मॅकियावेलीच्या मृत्यूनंतर म्हणजे १५३२ साली 'द प्रिन्स' हे पुस्तक प्रसिद्ध झालं.मात्र,

तेव्हापासून आत्तापर्यंत हे पुस्तक 'बेस्ट सेलर' म्हणूनच गाजतं आहे.यातली भाषा खूप भिडणारी आहे.या पुस्तकात त्यानं जे काही सांगितलंय.ते एखाद्या राज्यकर्त्यासाठी जितकं उपयुक्त आहे,

तितकंच ते एकविसाव्या शतकातल्या प्रचंड मोठ्या कंपन्यांनाही लागू आहे.वरवर बघता डावपेच किंवा राजकारण आणि सत्तास्पर्धा या गोष्टी मॅकियावेलीच्या 'द प्रिन्स' मध्ये सापडतात;पण खोलवर बघता त्यामध्ये व्यवस्थापनासाठी चांगले धडेही आपल्याला आढळतात.!


'कॉम्पिटिंग फॉर द फ्युचर' या व्यवस्थापनावरच्या प्रसिद्ध पुस्तकाचा लेखक गॅरी हॅमेल एकदा म्हणाला होता,'नेतृत्व (लीडरशिप) आणि डावपेच (स्ट्रॅटेजी) या गोष्टींचा 'शोध' आपल्याला विसाव्या शतकात लागला,ही आपली समजूत चुकीची आहे.याची आपल्याला वारंवार आठवण करून द्यावी लागते.'खरं तर या कल्पना खूप जुन्या आहेत.या गोष्टी पूर्वी उद्योगधंद्यांपेक्षा राजेरजवाड्यांनाच जास्त गरजेच्या पडत.आजच्या ज्ञानार्थ व्यवस्थेत (नॉलेज इकॉनॉमी) कुणाला असं वाटेल की, सत्तेला किंवा त्यातल्या स्पर्धेला काहीच स्थान नाही;पण आज रेडस्टोन,जेफ बेझॉस,बिल गेट्स,रुपर्ट मरडॉक किंवा टाटा यांना विचारलं, तर ते या मताशी मुळीच सहमत होणार नाहीत.आणि यामुळेच निकोलो मॅकियावेलीची पुस्तकं ५०० वर्षांनंतरही बाजारात पटापट विकली जाताहेत.त्यानं सांगितलेल्या यशस्वी राज्यकारभारा-

विषयीच्या किंवा कुठलीही सत्ता मिळवून ती टिकवण्या- विषयीच्या तत्त्वाचं महत्त्व जगाला आज कळतं.


मॅकियावेली १४६९ ते १५२७ अशी ५८ वर्षे जगला.हा काळ रेनेसान्स म्हणजेच प्रबोधन काळ होता! रेनेसान्स १४०० सालापासून इटलीमध्ये सुरू झाला आणि पुढे युरोपभर पसरला.


शिक्षणाचा प्रसार,परमेश्वर निष्ठेपेक्षा माणसाच्या विकासावर भर,सगळ्याच कलांमध्ये आमूलाग्र बदल आणि भरभराट,व्यक्तिवाद आणि 'नफा मिळवणं चांगलं आणि त्यात काहीही वाईट नाही' या गोष्टींची रुजवणूक असं सगळं या काळात घडलं. 


हा व्यापारी वर्ग आणि चर्च यांच्यातला एक प्रकारे झगडाच होता.व्यापाऱ्यांच्या हातात या काळात बराच पैसा खुळखुळत होता.तसंच त्यांना तो आणखी वाढवायचा होता.मग यातून बरीच तत्त्वं,दृष्टिकोन बदलत गेले.याच काळात आजच्या सिंगापूरसारखंच एक एक शहर म्हणजेच एक एक राज्यच (सिटी स्टेट्स) असायचं.फ्लॉरेन्स,रोम,नेपल्स,व्हेनिस आणि मिलान वगैरे ठिकाणी अशी छोटी छोटी सिटी स्टेट्स तयार झाली.

यांच्यामध्ये लहानमोठी युद्धं, मारामाऱ्या,खून वगैरे गोष्टी बऱ्याच चालत. यामुळे प्रत्येक राज्यकर्त्याला प्रजेला सुखी ठेवतानाच राज्याचं संरक्षण करण्यासाठीची पावलंही उचलावी लागत आणि ही सगळी कसरत सांभाळण्या-

साठी त्याला चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता भासत असे.अशा वातावरणात मॅकियावेली वाढला.


या निकोलो मॅकियावेलीला ब्रिटिश इतिहासकार 'ओल्डनिक' असं संबोधायचे.इतिहासात ओल्डनिक या शब्दाचा अत्यंत तुच्छतेनं उल्लेख करण्यात येत असे.

त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी म्हणजेच १५३२ साली जेव्हा त्याचं बहुचर्चित 'प्रिन्स' हे पुस्तक प्रकाशित झालं,तेव्हा त्याचं नाव फसवणूक,कपट,संधिसाधूपणा,

स्वार्थ आणि दुष्टपणा अशा सगळ्या दुर्गुणांशी जोडलं गेलं. इतक की, 'फ्रेडरिक द ग्रेट' सारख्या कित्येक हुकूमशहांनीसुद्धा या पुस्तकावर कडाडून टीका केली होती.या सगळ्या काळात 'मॅकियावेली-निझम' ही एक शिवीच झाली होती.दोन गट किंवा दोन पक्ष एकमेकांवर या शिवीची बरसात करत. (म्हणजे तू मॅकियावेलिनिस्ट आहेस अशी.) मात्र आज व्यवस्थापनाच्या जगात याच निकोलो मॅकियावेलीचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. हा मॅकियावेली होता तरी कोण ?


निकोलो मॅकियावेलीचा जन्म १४६९ साली फ्लॉरेन्समध्ये एका कायदेपंडित सरकारी अधिकाऱ्याच्या कुटुंबात झाला.त्याच्या लहानपणाविषयी खूपच कमी माहिती उपलब्ध आहे.त्याचं वाचन दांडगं होतं,पण तो सगळ्यात जास्त शिकला ते अनुभवातूनच! इटालियन राजकारणातल्या उलथापालथींनी मॅकियावेलीच्या आयुष्यातही खळबळच माजवली.यातल्या फ्लॉरेन्स या सगळ्यात प्रबळ राज्यात 'मेडिची' या कुटुंबाचं बरंच वर्चस्व होतं. मॅकियावेलीही फ्लॉरेन्सचाच होता.त्याच्या पूर्वजांनी मेडिची कुटुंबातल्या लोकांना एके काळी विरोध केला असल्यानं मॅकियावेलीला मेडिचींच्या राज्यात कुठलीही सरकारी नोकरी मिळाली नाही.इटलीवर १४९४ साली फ्रान्सच्या आठव्या चार्ल्स राजानं आक्रमण केलं आणि पुढची पाच दशकं इटलीमध्ये प्रचंड अस्थिरता पसरली.


१४९४ सालीच मेडिचींची सत्ता जाऊन तिथे गिरोलामो सावोनारोला नावाच्या एका मठातल्या भिक्षुकाची (फ्रायर) सत्ता स्थापन झाली;पण १४९८ साली सावोनारोलाला मृत्युदंड होऊन त्याला ठार करण्यात आलं.तेव्हा मॅकियावेली फक्त २९ वर्षांचा होता. मेडिचींच्या जागी आलेल्या राज्यसत्तेत मॅकियावेलीमधले प्रशासकीय गुण ओळखून त्याला तिथे चॅन्सलरची नोकरी मिळाली.फ्लॉरेन्सच्या विदेश खात्यामधलीही जबाबदारी मॅकियावेलीवर टाकण्यात आली.


यानंतर १४ वर्ष मॅकियावेलीनं सरकारची खूप इमाने-

इतबारे नोकरी केली.या काळात त्यानं फ्रान्स,जर्मनी आणि इटली इथल्या अनेक शहरांमध्ये अनेकदा प्रवास केला.ही त्याची वर्ष खूप आनंदात गेली.अनेक प्रकारच्या वाटाघाटींमध्ये त्याला भाग घेण्याची संधी मिळाली.

युरोपमधल्या अनेक राज्यकर्त्यांना जवळून बघण्याचा योग त्याला आला.हे सगळं अनुभवल्यामुळे तो खूप काही शिकला.याच काळात त्याचे अनेक गोष्टींबद्दलचे विचारही पक्के झाले.इथे त्याचं राजकारणातलं खरं शिक्षण त्याला मिळालेल्या अनुभवातून झालं. सरकारं कशी चालतात,

तसंच ती कशी आणि का पडतात याचा तो या वयात शांतपणे अभ्यास करत होता.ही सगळी निरीक्षणं त्याच्या पुढच्या लिखाणात उपयोगी पडणार होती.


१५०२ हे वर्ष मॅकियावेलीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरलं.एक तर या वर्षी त्यानं मारिएट्टा कॉर्सिनी हिच्याशी लग्न केलं. मारिएट्टा त्याच्या मृत्यूनंतरही २६ वर्ष जगली.

याच वर्षी त्याला रोममध्ये बोर्जियाकडे दूत म्हणून पाठवलं.


याच काळात बोर्जियानं आपल्याला सोडून गेलेल्या चौघांना कपटाने लाच दाखवून कसं परत बोलावलं आणि नंतर त्यांना कसं निर्घृणपणे नरडी दाबून मारून टाकलं हे मॅकियावेलीनं स्वतः बघितलं आणि अनुभवलं, राज्य करताना कपटाचा वापर करण,खोट बोलणं,फसवणं अशा गोष्टींचं मॅकियावेलीनं आपल्या 'द प्रिन्स' मध्ये जे समर्थन केलं होत यामागे त्याचे असेच अनेक अनुभव होते.


या काळात इटलीच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी होत होत्या.पोप सहावा अलेक्झांडर याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे बोर्जियाचं वर्चस्व संपुष्टात आलं आणि मग अनेक घटना घडल्या आणि फ्रेंचांनी इटलीवर पुन्हा आक्रमण केलं.रवीना इथे झालेल्या लढाईत फ्रेंचांना पिटाळून लावण्यात यश आलं आणि इटलीत पुन्हा मेडिचीचं राज्य आलं. या घटनांचा मॅकियावेलीच्या आयुष्यावर खूपच मोठा परिणाम होणार होता.याचं कारण मेडिचींचं राज्य पुन्हा सुरू होताच मॅकियावेलीची सगळी सरकारी पदं काढून घेण्यात आली.यानंतर त्याचा खूप छळ करण्यात आला.त्याला तुरुंगातही टाकण्यात आलं.शेवटी त्याला फ्लॉरेन्समधून हद्दपार करण्यात आलं.अशा तऱ्हेनं त्याची राजकीय कारकीर्द त्याच्या वयाच्या ४३ व्या वर्षीच संपुष्टात आली.


अशा प्रतिकूल काळातही निकोलो मॅकियावेलीनं 'द प्रिन्स' हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं.खरं तर त्यानं ते पुस्तक म्हणून लिहिलंच नव्हतं.मेडिची घराण्याची मर्जी संपादन करण्याच्या खटाटोपातून हे लिहिलं गेलं होतं.तसंच हे पुस्तक त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे १५३२ साली प्रसिद्ध झालं.मात्र तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे पुस्तक 'बेस्ट सेलर' म्हणूनच गाजतं आहे.


यात खूप लहान लहान अशी २६ प्रकरणं आहेत. यातली भाषा खूप भिडणारी आहे.त्याच्या 


जिवंतपणी हे पुस्तक म्हणून बाहेर आलंच नाही. ते केवळ एक हस्तलिखित म्हणून अनेकांकडे फिरत राहिलं.


या पुस्तकात त्यानं जे काही सांगितलंय ते एखाद्या राज्यकर्त्याला जितकं उपयुक्त आहे तितकंच ते २१ व्या शतकातल्या प्रचंड मोठ्या कंपन्यांनाही लागू आहे.ते सर्वप्रथम 'अँन्थनी जे' या लेखकानं १९७० साली 'मॅनेजमेंट अँड मैकियावेली' या आपल्या पुस्तकात लिहिलं आणि मॅकियावेली हा कॉर्पोरेट जगतात एकदम हिरो बनला.! वरवर बघितलं तर अमेरिकेतल्या 'डलास' किंवा 'डायनॅस्टी' अशा टेलिव्हिजनच्या सोप सीरियल्समध्ये किंवा आपल्याकडच्या 'कॉर्पोरेट' या सिनेमात जसे दाखवतात तसेच डावपेच किंवा राजकारण आणि सत्तास्पर्धा हे आपल्याला मॅकियावेलीच्या 'द प्रिन्स' मध्ये सापडतात; पण खोलवर बघता त्यामध्ये मॅनेजमेंटसाठी चांगले धडे ही आपल्याला आढळतात!


मॅकियावेलीनं माणसाच्या स्वभावाविषयी काही निरीक्षणं करून काही विधानं केली होती. त्यावरच 'द प्रिन्स' मधली निरीक्षणं आणि विधानं प्रिन्स'मधली अवलंबून होती.ती निरीक्षणं अशी होती.


 मनुष्य हा स्वार्थी,धोकेबाज,कपटी आणि पैशांच्या मागे धावणारा आहे;स्वार्थ,अहंकार आणि कपट यातच तो अडकतो.मनुष्य एक वेळ वडिलांचा मृत्यू विसरेल,पण संपत्तीतला वाटा विसरणार नाही;संपत्ती आणि जीवन यांच्या सुरक्षिततेसाठी जनता राज्यकर्त्याचं नियंत्रण स्वीकारते;राजानं माणसाचा हा स्वभाव लक्षात घेऊन प्रेमापेक्षा भीतीनंच राज्य चालवावं; दंडशक्ती वापरली तरच माणसाच्या स्वार्थाला लगाम लागू शकतो;मनुष्य म्हणजे दुर्गुणांचा पुतळा आहे,त्याला कितीही शिकवलं तरी तो सुधारू शकत नाही.


राज्य कसं मिळवावं आणि ते कसं टिकवावं,या प्रश्नाभोवतीच 'प्रिन्स' हे पुस्तक फिरतं. राज्यकारभार करण्यासाठी कुठले मार्ग निवडावेत म्हणजे यश मिळेल हे त्यानं या पुस्तकात सांगितलंय,हे मार्ग योग्य आणि नैतिक आहेत का याचा मॅकियावेलीचा काडीमात्र संबंध नव्हता,याचं कारण


 "कुठलंही ध्येय एकदा ठरलं की ते गाठण्यासाठी कुठलाही मार्ग निवडला तरी चालतो.म्हणजेच 'द एन्ड जस्टिफाइज द मीन्स' अशी थिअरी तो मानत असे.


राज्यकर्ता कसा असला पाहिजे याचं मॅकियावेली वर्णन करतो.त्याच्या मते राज्यकर्ता सिंह आणि कोल्हा या दोघांसारखा असला पाहिजे.युद्ध करायची वेळ आली तर तो सिंहासारखा बलवान तर हवाच,पण युद्ध केव्हा करावं आणि ते करायचं नसेल तर ते कसं टाळावं हे कळण्यासाठी त्याच्याकडे कोल्ह्यासारखा धूर्तपणा,हुशारी आणि व्यवहारी स्वभाव असला पाहिजे,असं तो म्हणे.


आजकाल तर सगळा देखाव्याचा जमाना आला आहे.'आपल्याला जे वाटतं आणि भासतं तेच खरं असतं (परसेप्शन इज रिअॅलिटी)' वगैरे गोष्टींवरच भर दिला जातो.त्यामुळे प्रत्यक्ष चांगलं असण्यापेक्षा चांगलं भासणं कसं जास्त जरुरीचं आहे.हे आज महत्त्वाचं मानलं जातं;पण हेही मॅकियावेलीनं त्या वेळीच म्हणून ठेवलंय. 


त्यामुळे जर राज्यकर्त्याकडे एखादा गुण नसेल तरी तो आपल्याकडे आहे असा त्यानं दिखावा करावा,असंही चक्क मॅकियावेली या पुस्तकात म्हणतो.आश्चर्य म्हणजे राज्यकर्त्यानं सद्गुणांच्या मागे लागू नये,असाही तो स्पष्ट इशारा देतो. 'जो माणूस सतत सद्गुणानं (व्हर्च्यूअस) वागतो. त्याचाही इतिहासात अनेकदा सर्वनाश झालेला दिसतो,असं मॅकियावेलीनं म्हटलंय.थोडक्यात, मॅकियावेली नैतिकता आणि राजकारण यांच्यात पूर्णपणे फारकत घेतो.


राज्यकर्त्यानं दयाळूपणाचा बुरखा घेऊन आपलं कौर्य झाकावं,राज्यकर्त्यानं बहुरूप्याचं सोंग चांगल्या प्रकारे वठवावं,राज्यकर्त्यानं समाजातल्या रूढी आणि परंपरा यांच्यात लुडबुड करू नये;अप्रिय गोष्टी हाताखालच्यां-

कडून करून घ्याव्यात आणि जर लोक चिडले, तर त्यांच्यावरच दोष ढकलावा,शेजारच्या राष्ट्राशी मैत्री करावी;पण योग्य संधी मिळाल्यावर ते राष्ट्र गिळंकृत करावं.धार्मिकतेचं प्रदर्शन करावं, भावनेच्या आहारी जाऊ नये;राज्यकर्त्यानं संयमी आणि दृढ असावं;स्तुतीला भाळून जाऊ नये; बुद्धिमान लोकांना जवळ ठेवावं,

असा त्यानं राजाला उपदेश केला.चांगलं-वाईट,नैतिक- अनैतिक,धर्म-अधर्म,इहलोक-परलोक वगैरे विचार फक्त भित्रे लोक करतात.वेळ पडली तर राज्यकर्त्यानं छळ,पक्षपात,धोकाधडी,हत्या,बेइमानी,संधिसाधूपणा,खोटारडेपणा,फसवणूक अशापैकी कुठलाही मार्ग स्वीकारावा,असंही तो म्हणतो.राज्यकर्त्यानं लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून आपण दया,धर्म,श्रद्धा आणि प्रेम यांचंच मूर्तिमंत प्रतीक आहोत असं भासवावं,पण शेवटी आपल्या फायद्याप्रमाणेच वागावं,असं मॅकियावेलीनं म्हटलंय.


पूर्वीही अशी व्यवहारी विधान अनेकांनी केली होती,पण मॅकियावेलीच महत्त्व असं की,त्यानं हे विचार सुसूत्रपणे इतक्या प्रभावीपणे मांडले की,हे पुस्तक ५०० वर्ष झाली तरी अजूनही गाजतंय! 


अशी काही अत्यंत आक्षेपार्ह किंवा अनैतिक विधानं सोडली तरीही मॅकियावेलीची काही विधानं त्याची प्रगल्भता दाखवतात उदाहरणार्थ, राज्यकर्त्याबरोबर जी माणसं फिरत असतात, ज्यांची संगत त्याला मिळते,

त्यावरून राज्यकर्त्याची किंमत ठरते.व्यवस्थापनाच्या जगात हे खूप महत्त्वाच विधान आहे.कुठल्याही कंपनीत सीईओ जशी आपली मॅनेजमेंट टीम निवडतो आणि त्यांच्यावर काम सोपवतो (डेलिगेशन) त्यावरून त्याचं यश ठरतं आणि त्याचं मूल्यमापनही होतं.


मॅकियावेली 'द प्रिन्स' मध्ये म्हणतो,

 'जो काळाची पावलं ओळखून त्यानुसार वागतो आणि आपल्या योजना आखतो,तोच यशस्वी होतो.कालबाह्य कल्पनांना चिकटून बसणारा कधीच यशस्वी होत नाही!' 


आजकाल व्यवस्थापनात 'चेंज मॅनेजमेंट' वर जे विवेचन आहे,त्याची सुरुवात तिथे झाली होती.मॅकियावेलीनं या पुस्तकात आपल्या हाताखालचे कर्मचारी आणि सैन्य यांना कसं निवडायचं, त्यांना सुखी कसं ठेवायचं,याच विवेचन केलं आहे.आपल्याला फितूर होऊन ते शत्रूपक्षाला जाऊन मिळू नयेत.हा त्यामागचा उद्देश होता! आजकालच्या सतत आणि भराभर नोकऱ्या बदलण्याच्या जगात आणि विशेषतः सॉफ्टवेअरच्या कंपन्यांना यातून बरंच शिकण्यासारखं आहे यात शंकाच नसावी. आपला 'मार्केट शेअर' कसा टिकवावा,सगळे कर्मचारी ज्यामुळे ते प्रेरित होतील असं एक ध्येय कसं निर्माण करावे.या

विषयीही चर्चा 'द प्रिन्स' मध्ये आहे.आजच्या 'व्हिजन आणि मिशन'ची मुळ मॅकियावेलीमध्ये सापडतात.


सत्ता केंद्रित असावी की विकेंद्रित असावी याविषयीही मॅकियावेली बोलून गेलाय.आजच्या परिस्थितीत कुठलीही संघटना बांधताना ती मोठी होत चालली की हे सगळे प्रश्न पुढे ठाकतातच.इथेही मॅकियावेली मदतीला धावून येतो.


दुसरे राज्य जिंकल्यानंतर तिथल्या लोकांची मनं कशी जिंकावीत या विवेचनामध्ये आपल्याला मॅकियावेलीकडून 'मर्जर्स अँड ऑक्विझिशन्स (एम.अँड ए.)'च्या संदर्भात शिकायला मिळेल. मॅकियावेली म्हणे,


'आहे ती परिस्थिती,त्या कल्पना,समजुती बदलून नवीन काही प्रस्थापित करणं सगळ्यात कठीण काम आहे.' आजच्या 'चेंज मॅनेजमेंट'वर भाषणं देणाऱ्यांनी मॅकियावेली जरूर वाचावा.नेतृत्व (लीडरशिप) याविषयीही मॅकियावेली बरंच बोलून गेलाय. 'सर्वच माणसं चांगली नसतात.हे गृहीत धरूनच चाणाक्षपणे वागावं' किंवा 'चांगलं वागणं हे ठीक आहे,पण नेत्याला वेळप्रसंगी वाईटही वागावं लागतं' किंवा 'कुठल्याही माणसाला कायम मित्र किंवा कायम शत्रू मानू नये.

'यांसारखी विधानं पाहा.तो म्हणतो,'चांगल्या नेत्याबद्दल प्रेम आणि भीती दोन्ही वाटलं पाहिजे;पण दोन्ही एकत्र असणं तसं कठीणच.त्यामुळे प्रेमापेक्षा भीती वाटली तरी चालेल!'


राज्यकारभाराविषयी इतका सल्ला देऊनही मॅकियावेली मेडिचींची मर्जी संपादन करू शकला नाही.


त्यानं मेडिचींकडे आपल्याला सरकारमधली नोकरी आणि पद पुन्हा देण्यात यावं यासाठी या काळात असंख्य पत्रं लिहिली; पण त्यांचा काहीच उपयोग झाला नाही.यामुळे राजकारणाचा पूर्ण संन्यास घेऊन तो लिखाणाकडे वळला. त्यानं 'द डिस्कोर्सेस ऑन

द फर्स्ट टेन बुक्स ऑफ लिव्ही हे पुस्तक लिहिलं.

यामध्ये तो आपल्याला 'द प्रिन्स' पेक्षा वेगळ्या रूपात भेटतो आणि लोकसत्ताक राज्यपद्धतीविषयीही बोलतो.

त्यानं 'आर्ट ऑफ वॉर','हिस्ट्री ऑफ फ्लॉरेन्स'अशीही पुस्तकं लिहिली.मॅकियावेलीचं लिखाण फक्त राजकीय गोष्टींपुरतं मर्यादित नव्हतं.त्यानं याच काळात मान्द्रागोल नावाचं इटालियन भाषेत एक विनोदी विडंबनही लिहिल.

ते रेनेसाँसमध्ये एक मास्टरपीस म्हणून गाजलं.


तरीही राजकारणाकडे मॅकियावेलीचा ओढा होताच;पण त्याला संधी मिळत नव्हती.शेवटी १५२७ साली मेडिचींची सत्ता उलथवून टाकली गेली,तेव्हा मॅकियावेली धावतच फ्लॉरेन्सला गेला आणि त्यानं सरकारी पदासाठी पुन्हा याचना सुरू केली;पण तोपर्यंत त्याच्या 'द प्रिन्स'चं हस्तलिखित अनेकांनी वाचलं होतं आणि अनेकांना तो दुष्ट आणि कपटी वाटल्यामुळे त्याचे फ्लॉरेन्समध्ये अनेक शत्रू निर्माण झाले होते.त्यामुळे 


कौन्सिलमध्ये बहुतेकांनी त्याच्याविरुद्ध मत दिलं,पण कौन्सिलचा निकाल ऐकायला मॅकियावेली जिवंत राहिला नव्हता.एका अर्थानं त्याचा अगोदरच मृत्यू झाला हे बरंच झालं,कारण ते ऐकून त्याला कदाचित मरणापेक्षा जास्त यातना झाल्या असत्या.!


'द प्रिन्स' हे खऱ्या अर्थानं क्रांतिकारी पुस्तक होतं.एक म्हणजे यापूर्वी राज्यशास्त्रावर (पोलिटिकल सायन्स) लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा हे पुस्तक जास्त शास्त्रशुद्ध होतं.यापूर्वी सेंट थॉमस अॅक्विनास आणि जॉन ऑफ सॅलिसबरी यांच्यासारख्यांनी केलेल्या आदर्शवादी (आयडिअॅलिस्ट) विवेचनापासून, धार्मिकतेपासून आणि नैतिकतेपासून या पुस्तकात पूर्णपणे फारकत घेतली होती.


'द प्रिन्स' मधल्या मॅकियावेलीचा कडवटपणा समजावून घ्यायचा असेल,तर आपल्याला १६ व्या शतकातली इटलीतली परिस्थिती समजावून घेतली पाहिजे.त्या वेळी इटली हा एकसंध देश म्हणूनही निर्माण झाला नव्हता.

व्हेनिस,जिनोआ आणि फ्लॉरेन्स यांच्यासारखी शहरं आणि कधीकधी पोप ही त्या वेळची सत्ताकेंद्र होती.या सगळ्यांमध्ये तर सतत वाद आणि युद्ध होत असतच,पण बाहेरूनही सतत आक्रमण होत असत.यातून राजकीय व्यवस्था संपूर्णपणे अस्थिर झाली होती.यामुळे फ्लॉरेन्सवर हल्ला करणाऱ्या 'रानटी' लोकांचा काहीही करून पाडाव केला पाहिजे,अशी भावना त्या वेळी तीव्र होती.या पार्श्वभूमीवर मॅकियावेलीची मतं बनत गेली आणि त्याचा राष्ट्रवादही उफाळून आला आणि तो टोकाचा कट्टर बनला.इतका की, जर्मनीमध्ये बिस्मार्क आणि नंतर हिटलर आणि इटलीत मुसोलिनी यांच्या विचार सरणीतही तो मोठ्या प्रमाणात डोकावला.


आजच्या दिखाऊ जगात आपल्याला जे वाटतं, जे भासतं,तेच खरं असतं (पर्सेप्शन इज रिअॅलिटी) वगैरे गोष्टींवरच भर दिला जातो. यामुळे प्रत्यक्ष चांगलं असण्यापेक्षा चांगल भासणं कसं जास्त गरजेचं आहे हे आज महत्त्वाचं ठरतं आहे.हेही त्या काळात मॅकियावेलीनं म्हणून ठेवलंय हे विशेष!


कुठल्याही ग्रंथालयात स्वतःला दोन मिनिटांत सुधारण्याची सेल्फ इंप्रुव्हमेंटची असंख्य पुस्तकं आपण बघतो,तसंच डेल कार्नेगीच्या 'हाऊ टू विन फ्रेंडस अँड इन्फ्लूअन्स पीपल' या पुस्तकाचं सोळाव्या शतकातलं रूप,असंच आपल्याला 'प्रिन्स'बद्दल म्हणावं लागेल,हे मात्र नक्की.!


"जो काळाची पावलं ओळखून त्यानुसार वागतो आणि आपल्या योजना आखतो तोच यशस्वी होतो.कालबाह्य कल्पनांना चिकटून बसणारा कधीच यशस्वी होत नाही." 


●निकोलो मॅकियावेली


जग बदणारे ग्रंथ - दीपा देशमुख

मनोविकास प्रकाशन मधून क्रमशः 

२/५/२३

युटोपिया - थॉमस मोर (१५१६)

१५१६ साली थॉमस मो(अ)रचं 'युटोपिया' हे पुस्तक प्रकाशित झालं या पुस्तकात त्या वेळची आर्थिक,

सामाजिक आणि राजकीय परिस्थिती याचं चित्र मोरनं 'युटोपिया'मध्ये रंगवलं होतं. 'युटोपिया' हे दोन भागांत किंवा दोन पुस्तकांच्या रूपात विभागलं गेलं आहे.पहिला भाग 'डायलॉग ऑफ कौन्सिल' या नावानं ओळखला जातो.तर दुसऱ्या भागाला '

डिस्कोर्स ऑन युटोपिया' असं म्हटलं जातं.या   पुस्तकात गाव,प्रवास,व्यापार,वाहतूक,धर्म,लष्कर

(किंवा सैन्य) अशा अनेक गोष्टींबद्दल आणि त्यांच्या नियमांबद्दल बोललं गेलंय.


कॅथलिक चर्चचा सेंट थॉमस मोर हा एक इंग्रज कायदेतज्ज्ञ,मानवतावादी,सामाजिक तत्त्ववेत्ता आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होता.'युटोपिया' या काल्पनिक बेटावरच्या राजकीय व्यवस्थेबद्दलचं 'युटोपिया' हे त्याचं पुस्तक प्रचंड गाजलं.या पुस्तकात त्यानं जे मांडलं ते सगळं काल्पनिक होतं.तरीही या पुस्तकाला प्रचंड यश मिळालं आणि थॉमस मोरलाही!या पुस्तकाकडे एक सामाजिक-राजकीय टीकात्मक,उपहासात्मक लिखाण म्हणून बघितलं जातं.


१५१६ साली थॉमस मोरचं 'युटोपिया' हे पुस्तक प्रकाशित झालं.या पुस्तकात त्याचे विडंबनात्मक विचार काळाच्या खूप पुढे जाणारे होते.त्या वेळची आर्थिक,सामाजिक आणि राजकीय परिस्थिती याचं चित्र मोरनं युटोपिया मध्ये रंगवलं होत.लॅटिनमध्येच संवाद साधत आणि लिखाणही करत त्यामुळेच 'युटोपिया'च लिखाण लॅटिन भाषेत केलं गेलं.'युटोपिया'च्या पहिल्या आवृत्तीनंतर प्रोटेस्टंट रीफॉर्मेशनचा काळ सुरु झाला.कॅथलिक चर्च आणि सुधारक यांच्यात खडाजंगी सुरू झाली.परिणामी आगीत तेल ओतल्यासारखे होईल या भीतीन युटोपिया ची पुढची आवृत्ती काढणं पुढे ढकललं गेलं. १५५१ साली 'युटोपिया' चं इंग्रजीत भाषांतर केलं गेलं. १६८५ साली त्याचं पुन्हा एकदा इंग्रजी भाषेत भाषांतर झालं.या दोन्ही आवृत्त्यांमधली भाषा जुनाट आणि क्लिष्ट होती.त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सोप्या पद्धतीनं कळावं म्हणून 'युटोपिया'चं पुन्हा एकदा आजच्या वापरात असलेल्या सोप्या इंग्रजीत भाषांतर केले गेलं


युटोपिया म्हणजे एक प्रकार आदर्श व्यवस्था! वेबस्टरच्या शब्दकोशानुसार 'जिथे आदर्श राजकीय आणि आर्थिक समस्या आहे असं एक काल्पनिक बेट' अशी 'युटोपिया' ची व्याख्या केली होती.या पुस्तकात युटोपिया नावाचं एक काल्पनिक बेट दाखवलं आहे आणि या बेटावर राहणान्या लोकांना युटोपियन्स असं संबोधलं आहे.या पुस्तकाची गंमत म्हणजे यात लेखक थॉमस मोर हा स्वत:ही एक पात्र म्हणून सामील झाला होता. 'युटोपिया' हे दोन भागांत विभागलं गेलं आहे.पहिला भाग 'डायलॉग ऑफ कॉन्सिल या नावानं ओळखला जातो,तर दुसऱ्या भागाला 'डिस्कोर्स ऑन युटोपिया' असं म्हटलं जातं.या पुस्तकात गाव,प्रवास,व्यापार,वाहतूक, धर्म,लष्कर (किंवा सैन्य) अशा अनेक गोष्टींबद्दल आणि त्यांच्या नियमांबद्दल बोललं गेलंय.


पुस्तकाची सुरुवात अतिशय रंजक तऱ्हेनं होते. थॉमस मोर हा नेदरलँडमध्ये राहत असतो.राजा हेन्रीचा अँबॅसॅडर म्हणून त्याचं काम असतं. त्याची पीटर जायल्स नावाच्या एका व्यक्तीशी दोस्ती होते.जायल्स हा अतिशय बुद्धिमान असतो.एकदा थॉमस मोर चर्चमधून आपल्या घरी परतताना तो पीटर जायल्सच्या घराकडे वळतो,तेव्हा त्याला जायल्स एका वृद्ध माणसाबरोबर बोलत असलेला दिसतो.लांब दाढी असलेल्या या माणसाचं नाव राफाएल हायदलोडे असं असतं.तो पोर्तुगालहून आलेला असतो आणि तो एक तत्त्वज्ञही असतो.जगभर भटकंती केल्याच्या खाणाखुणा त्याच्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर पडलेल्या दिसत असतात. त्याच्याकडे बघताक्षणी तो ज्ञानी,बहुव्यासंगी असल्याचंही लक्षात येत असतं.


राफाएल हायदलोडेशी ओळख झाल्यावर थॉमस मोर,पीटर जायल्स आणि राफाएल हायदलोडे हे तिघं जण थॉमस मोरच्या घरी येऊन त्याच्या बागेत गप्पा मारत बसतात.गप्पांमधून राफाएल एक (अन्वेषक ) हिस्टॉरिकल एक्सप्लोरर असल्याचंही समजतं. तो जगातल्या अनेक ठिकाणी फिरल्यामुळे अनेक प्रकारचे लोक आणि अनेक प्रकारच्या संस्कृती यांच्याशी त्याचा जवळून संबंध आलेला असतो.याच प्रवासात त्याला युटोपियन्सबद्दल कळलेलं असतं आणि तो युटोपियातही जाऊन पोहोचतो.युटोपियाबद्दल तो थॉमस मोर आणि पीटर जायल्स यांना सांगायला लागतो तेव्हा ते दोघंही खूपच प्रभावित होतात.थॉमस मोर तर राफाएल हायदलोडेला तू राजपुत्राचा सल्लागार म्हणून काम करायला पाहिजेस,असं उत्साहाच्या भरात सांगतो.मात्र या गोष्टीवर हायदलोडे नापसंती दर्शवतो.राजपुत्राच्या हाताखाली काम करणारी यंत्रणा आणि ते लोक अहंकारी,आत्मलीन आणि भ्रष्ट असल्याचं तो सांगतो.

आपला त्यामागचा अनुभवही तो त्यांना सांगतो.

इंग्लंडमधली सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे,असं तो म्हणतो.त्याचबरोबर तिथल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावली जाते या गोष्टीकडे तो लक्ष वेधतो.


फाशी देऊन त्यांना संपवण्यापेक्षा त्यांच्यातल्या शक्तीचा कष्टप्रद कामासाठी योग्य उपयोग करून घेतला पाहिजे,असं तो म्हणतो.मात्र त्याच्या म्हणण्याकडे कोणीही त्या वेळी लक्ष दिलेलं नसतं.


युटोपिया बेटाबद्दल हायदलोडे माहिती सांगतो. या बेटाची राजधानी ॲमेरोट असते.तिथल्या लोकांचं वैयक्तिक मालकीचं काहीही नसतं. आपल्या जवळ असलेली सगळी साधनं, सगळ्या गोष्टी ते परस्परांमध्ये शेअर करत असतात.राहण्याच्या जागेपासून ते ब्रेड आणि वाइनपर्यंत सगळं काही ते एकमेकांमध्ये वाटून घेत असतात.खरं तर तिथे पैसा ही गोष्ट अस्तित्वातच नसते.तिथले लोक सोन्याचाही तिरस्कार करताना दिसतात.सोनं हा धातू कुठल्याही उपयोगाचा नाही,असं त्यांचं म्हणंन असतं.


युटोपियामधली कुटुंब मोठी असतात.प्रत्येक कुटुंबात कमीत कमी १०,तर जास्तीत जास्त १६ सदस्य असतात.

तिथली प्रत्येक व्यक्ती दिवसातले सहा तास काम करते,

तर काही व्यक्ती कामच करत नाहीत.ती सगळी माणसं फक्त खातात,पितात आणि आराम करतात पण त्यांना त्याबद्दल कोणी जाब विचारत नाही. अर्थात युटोपियामध्ये काही कायदे लागू असतात.एकदा गुन्हा केला तर तो माफ केला जातो,त्याबद्दल कुठली शिक्षा केली जात नाही. पण तोच गुन्हा पुन्हा दुसऱ्यांदा त्याच व्यक्तीकडून घडला तर मात्र त्याला शिक्षाच ठोठावली जाते.खूपच अक्षम्य गुन्हा घडल्यास तिथल्या लोकांना गुलामासारखी कामं सोपवली जातात आणि त्याना राबवून घेतलं जातं, तिथल्या मजिस्ट्रेट्सना फिलार्च म्हणतात.ते लोकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करतात, मात्र त्याच्याकडून अयोग्य वर्तन झालं तर मजिस्ट्रेससाठीदेखील कायदे लागू होतात. युटोपियामधले कायदे,तिथली धोरणं,या समाजात बोकाळणारा भ्रष्टाचार आणि अयोग्य निर्णयप्रक्रिया तिथल्या नागरिकांना वाचवतात. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांसाठी युटोपियामध्ये शहरंदेखील राखून ठेवली असतात.


युटोपियामधल्या लोकांना युद्ध आणि लढाया यांचा तिटकारा असतो.ते शांतताप्रिय असतात.त्यांना जंगली जनावरांची झुंनदेखील आवडत नाही. मात्र आत्मरक्षणाची वेळ आली तर ते शस्त्र उचलण्यासाठी सज्ज होतात.


थोडक्यात, 'युटोपिया हा कल्याणकारी,आदर्श असा देश आहे.युरोपियन देशांमधल्या समस्येचं मूळ पैसा हे असून युटोपियामध्ये पैसाच नाही. त्यामुळे तिथे फार गंभीर अशा समस्याही नाहीत,'असं हायदलोंडे म्हणतो.युटोपियन लोकांसारखं जगणं आणि तिथली शांतता हायदलोडे युरोपातल्या इतर देशांमध्ये बघू इच्छितो,पण त्याच वेळी इतर ठिकाणी ते शक्य नाही हेही त्याला ठाऊक असतं.


खरं तर थॉमस मोरचा काळच वेगळा होता. कोलंबसन अमेरिकेचा शोध लावण्याअगोदर एकच वर्ष आधी आठव्या हेन्रीचा जन्म झाला होता.हेन्रीच्या भावाचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे हेन्रीचं लग्न त्याच्या भावजयीबरोबर हेन्रीच्या वडिलांनी लावलं.त्या वेळी समाजामध्ये श्रीमंत-गरीब अशी प्रचंड दरी होती.काही अतिश्रीमंत लोक वैभवात लोळत होते,तर काही लोक अतिगरिबी आणि कर्ज यात बुडालेले होते. त्यांना कर्ज फेडता आलं नाही तर थेट तुरुंगात टाकलं जात असे.

सर्वसामान्य माणसांना न्याय मिळणं खूप कठीण झालं होतं.न्यायव्यवस्थेत खूप भ्रष्टाचार होता.त्या वेळी कॅथलिक चर्च नेहमीच श्रीमंत वर्गाची बाजू घेत असे.तसंच हे चर्च ख्रिस्ताच्या तत्त्वांचे पालन करत नसल्यामुळे ते खूप भरकटलंही होतं.तत्कालीन युद्धामुळे इंग्लंडची अर्थव्यवस्थादेखील कमकुवत झाली होती. त्यावर उपाय म्हणून सरकारनं जनतेवरचे कर वाढवले होते. त्यामुळे लोकांमधला असंतोष जास्तच वाढत चालला होता.


या वेळी प्रबोधनकाळ (रेनेसान्स) उदयाला येत होता आणि अनेक कलांविषयी लोकांमध्ये खूपच रस निर्माण झाला होता. इटलीमध्ये सुरू झालेली प्रबोधनाची ही लाट इंग्लंडबरोबरच युरोपातल्या इतर देशांतही चटकन पसरली. 


इरॅस्मस,मायकल अँजेलो,लिओनार्डो दा व्हिंची अशी अनेक माणसे आपापल्या कला क्षेत्रात भरीव कामगिरी करत होती.


अशा स्थित्यंतराच्या काळात,युटोपिया लिहिणाऱ्या थॉमस मोरचा जन्म ७ फेब्रुवारी १४७८ या दिवशी लंडनमध्ये मिल्क स्ट्रीट इथे जॉन मोर आणि अँग्नेस ग्रँजर यांच्या पोटी झाला.थॉमस मोरचे वडील सर जॉन मोर यांनी सुरुवातीला काही काळ वकिली केली आणि नंतर न्यायाधीश म्हणून काम केलं होत.सहा भावंडांपैकी थॉमसचा क्रमांक दुसरा होता.त्याचे शालेय शिक्षण सेंट अँथनी स्कूल या त्या वेळच्या सर्वोत्कृष्ट शाळेत झालं.

शालेय शिक्षण संपल्यावर मोरनं ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला.तिथे शास्त्रीय शिक्षणाबरोबरच तो लॅटिन आणि ग्रीक भाषांमध्ये पारंगत झाला.आपल्या मुलानं आपल्याप्रमाणेच कायदेतज्ज्ञ व्हावं,अशी जॉन मोरची इच्छा असल्यामुळे थॉमस मोरनं कायद्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. धर्माकडे ओढा असल्यामुळे थॉमस मोर काही काळ लंडनजवळच्या एका मठामध्ये आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहिला.याच काळात मोरनं प्लेटोचं 'रिपब्लिक' आणि सेंट ऑगस्टाईन यांचं लिखाण वाचलं आणि तो त्या लिखाणामुळे प्रभावित झाला.मोर उत्तम लिहायचा आणि बोलायचा.त्याची हुशारी, तर्कशुद्ध विचारसरणी आणि त्याचा प्रामाणिकपणा यामुळे त्याची प्रगती खूप चट्कन झाली.त्याचं गणित आणि लॅटिन भाषेचं ज्ञान आणि त्याचं कर्तृत्व यांच्यामुळे त्याची इंग्लिश पार्लमेंटमध्ये लंडन शहराचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली.याच काळात त्याच्या व्यक्तिमत्त्वानं आठवा हेन्री प्रभावित झाला आणि त्यानं १५२९ साली मोरची 'हाय चॅन्सलर' म्हणून नेमणूक केली.


खरं तर थॉमस मोर हा आठव्या हेन्रीचा एक विश्वासू सेवक आणि मित्र होता.त्यामुळे आपल्यापेक्षा बारा वर्षांनी मोठा असलेल्या मोरला राजा हेन्री अनेक गोष्टी सांगत असे.. मोरचे विचार राजाला पटायचे आणि त्यामुळेच मोरनं त्याचा सचिव आणि वैयक्तिक सल्लागार म्हणूनही काम बघितलं.कित्येकदा राजा हेन्री मोरच्या घरी जेवायलाही जात असे.मोरच्या बागेत दोघं फिरायला जात.त्या वेळी खगोलशास्त्र,कला आणि देवधर्म अशा अनेक गोष्टींवर ते बरेचदा चर्चाही करत.


काही काळानंतर थॉमस मोरनं सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगायचं ठरवलं. १५०५ साली थॉमस मोरनं

जेन कॉल्ट हिच्याशी लग्न केलं.त्यांना मार्गारेट,

एलिझाबेथ,सिसिली आणि जॉन नावाची चार मुलं झाली.मात्र काहीच काळात जेनचा मृत्यू झाला.आणि आपल्या मुलांचं संगोपन चांगलं व्हावं या दृष्टीने थॉमस मोरनं अँलिस मिडल्टन या तरुण विधवेशी दुसर लग्न केलं. लग्नाच्या वेळी अँलिसला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेली मुलगी होती आणि तिचा सांभाळही थॉमस मोरनं पिता म्हणूनच पुढे केला.राजा आठवा हेन्री आणि थॉमस मोर या दोघांची मैत्री अगदी घट्ट असली तरी राजा हेन्री अत्यंत पराकोटीचा स्वार्थी आणि आत्मकेंद्री स्वभावाचा असून तो आपल्या जवळच्या माणसाचाही कधीही घातपात करू शकतो याची मोरला खात्री होती.


एकदा सर थॉमसचा जावई त्यांच्या राजाबरोबरच्या मैत्रीचं कौतुक करायला लागला,तेव्हा थॉमस मोर त्याला म्हणाला,जर माझ डोकं उडवून राजाला एखादा किल्ला मिळणार असेल,तर तो माझा शिरच्छेदही करायला मागेपुढे पाहणार नाही.


त्याच वेळी आठव्या हेन्रीची धार्मिकताही थॉमस मोरला कळून चुकली होती.जेव्हा मोरची चॅन्सलर म्हणून नेमणूक झाली,तेव्हा हेन्रीन आपलं कॅथरीनबरोबरचं लग्न रद्दबातल करायचं ठरवलं होतं.कॅथरीन ही आठव्या हेन्रीच्याच भावाची बायको होती;पण लग्नानंतर १८ वर्ष झाली तरीही त्याला मुलगा झाला नव्हता आणि त्या वेळी इंग्लंडमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी त्याची राजवट म्हणजे वंश पुढे चालायला पाहिजे,असं हेन्रीचं मत होतं.

शिवाय त्याचं अँन बोलेन या मुलींवर प्रेम बसलं होतं. म्हणून हेन्रीला कॅथरीनपासून सुटका हवी होती.


हेन्रीनं सातवा पोप क्लेमेंट याच्याकडे लग्नाच्या रदबदलीबद्दल विनंती केली;पण हा पोप पाचव्या चार्ल्सच्या आधिपत्याखाली होता आणि हा चार्ल्स हा कॅथरीनचाच पुतण्या होता.यामुळे पोपनं कॅथरीनबरोबरचं लग्न रद्दबातल करायला नकार दिला.त्याबरोबर चिडून जाऊन हेन्रीनं स्वतःलाच चर्च ऑफ इंग्लंडचा प्रमुख म्हणून जाहीर घोषित केलं आणि रोमन चर्च पासून स्वतःला विभक्त केलं.या वेळी राजा हाच चर्चचाही सर्वोच असल्याची शपथ सगळ्यांना घ्यावी लागली.मोर तोपर्यंत इतका लोकप्रिय आणि प्रभावशाली झाला होता,की त्याची यासाठी संमती मिळवणं राजाला गरजेचं वाटलं; पण मोरला राजाचं वागणं आणि म्हणणं न पटल्यामुळे त्यानं तशी शपथ घ्यायला नकार दिला आणि १५ मे १५३२ या दिवशी त्यानं आपल्या चॅन्सलर पदाचा राजीनामा दिला.


अखेरच्या काळात आपलं उत्पन्न कमी झाल्यामुळे आपलं जीवनमानही त्याप्रमाणे बदलायचं आणि चेल्सी या आपल्या आवडत्या ठिकाणी उरलेलं आयुष्य काढायचं असं मोरनं ठरवलं होतं;पण तोपर्यंत तो इतका प्रसिद्ध झाला होता,की त्याचं शांत बसणं हेही हेन्रीला धोकादायक वाटायला लागलं. जेव्हा अँनच्या राज्याभिषेकाच्या समारंभाला मोर गैरहजर राहिला,तेव्हा राजा हेन्री खूपच चिडला होता.


थॉमस मोर हा कॅथलिक चर्चच्या बाजूने होता. प्रोटेस्टंट सुधारणावाद्यांचं बंड मोडून काढण्यात त्याचा सहभाग होता.त्याच्यावर लाचलुचपतीचे आरोप झाले.खरं तर त्यानं आपलं चॅन्सलरचं पद सोडल्यानंतर तो पूर्ण कफल्लक झाला होता. त्याच्याजवळ कुठलीही संपत्ती नव्हती.मोरनं राजाज्ञेचं पालन केलं नाही,असा आरोप मोरवर करण्यात आला.तसंच त्यानं शपथनाम्यावर स्वाक्षरी करावी म्हणून त्याच्यावर दबाव टाकण्यात आला;पण मोरनं कुठल्याच दबावाला भीक घातली नाही.


अखेर राजानं १७ एप्रिल १५३४ या दिवशी मोरला शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी टॉवरमध्ये पाठवण्यात आलं.त्याच्यावर या काळात अनेक आरोप हे झाले.मात्र आपल्यावरचे आरोप त्यानं फेटाळून लावले.'मी राजाचा आज्ञाधारक सेवक आहे,पण त्याआधी मी परमेश्वराचा सेवक आहे.'असं थॉमस मोरनं त्याला त्याची मृत्युदंडाची शिक्षा भोगण्यासाठी नेताना म्हटलं होतं. 


आठव्या हेन्री राजाला चर्चचा प्रमुख म्हणून जेव्हा नेमलं होतं.तेव्हा त्या शपथपत्रावर सही करायला नकार दिल्यामुळे थॉमस मोरला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.


थॉमस मोर स्वभावानं खूप विनोदी आणि मिश्कील होता.आपण नेहमी आनंदानं जगलं पाहिजे,अशी त्याची धारणा होती.त्याला एका टॉवरमध्ये बंदिस्त करून ठेवलं, त्याच्यावर प्रचंड शारीरिक अत्याचार करण्यात आले.त्याच्या मृत्युदंडाची वेळ जवळ येत असतानाही त्याचा आनंदी आणि विनोदी स्वभाव काही बदलला नाही. 


मृत्युदंडाच्या वेळी त्यानं जेव्हा आपलं डोकं त्या ब्लॉकवर ठेवलं,तेव्हाही त्यानं विनोद केला होता.तो म्हणाला,'तुमची कुऱ्हाड माझ्या दाढीला मात्र लावू नका;कारण तिनं काही राजद्रोह केलेला नाहीये.'त्याचे उद्गार ऐकून त्या मारेकऱ्याला हसावं की रडावं हेच कळेना!


आपल्या राजकीय कारकीर्दीत मोरचं मन सतत सतर्क होतं आणि त्यानं या काळात भरपूर लिखाण केलं.त्यानं प्रार्थना,कविता,पत्रव्यवहार आणि 'क्रॉनिकल ऑफ रिचर्ड','आपॉलॉजी' आणि 'डायलॉग्ज',असं बरंचसं लिखाणही केलं. या सगळ्यातून मोर एक प्रगल्भ मानवतावादी विचारवंत म्हणून वाचकाला भेटतो.


६ जुलै १५३५ या दिवशी थॉमस मोरचा मृत्यू झाला.जाताना आपल्या मागे आदर्श राज्याचं सुरेख स्वप्न दाखवणारं 'युटोपिया' मागे ठेवून गेला!


"युद्धाने मिळवलेल्या वैभवासारखं लज्जास्पद दुसरं काही नाही." - थॉमस मोर


पुढील भागात पाहू 'द प्रिन्स' - 

निकोलो मॅकियावेली ( १५३२ )

३०/४/२३

मुंग्यांचं बोलणं : एक झेन कथा

एक होता राजा.त्यानं त्याचं राज्य खूप न्यायानं, आदरानं सांभाळलं.त्याचं वय झालं.त्याचा मुलगा होता तरुण वयाचा.त्याला वाटलं आता वारसा हक्कानं आपल्याकडे राज्य सहज येणार;पण राजा पुत्रप्रेमानं भाळलेला नव्हता.आपल्या मुलाची पात्रता सिद्ध झाली,तरच त्याला भावी राजा म्हणून घोषित करायचं,असं त्यानं ठरवलं होतं.त्यामुळे अरण्यात राहणाऱ्या आपल्या गुरूंकडे राजानं मुलाला पाठवलं. मुलाला राजानं निघताना सांगितलं,की तू चांगला राजा होऊ शकतोस,

असं गुरुजींना वाटलं,तरच तुझ्यावर मी राज्य सोपवेन.

राजाचा मुलगा तसा स्वभावानं चांगला होता.अस्त्र-शस्त्रविद्या,ग्रंथांचं औपचारिक शिक्षण त्यानं घेतलेलं होतं.त्यामुळे आपल्या वडिलांचे जे कोणी गुरुजी आहेत,

त्यांनी आपली एखादी परीक्षा घेतली,की काम झालं, असं त्याला वाटलं.अरण्यात चार दिवस बदल म्हणून राहण्याचाही अनुभव मिळेल,असा विचार करून राजाचा मुलगा मोठ्या उत्साहानं गुरुजींच्या कुटीकडे निघाला.


दाट अरण्यात राहणाऱ्या गुरुजींनी राजाच्या मुलाचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं.आपल्याकडे परीक्षा देण्या -

आधी काही अनुभव व प्रशिक्षण घ्यावं लागेल,असं गुरुजींनी त्याला सांगितलं. दोन दिवस विश्रांती झाल्यावर गुरुजी त्याला म्हणाले,'आता तू सकाळी सर्व आवरून लगेच वनात जायचंस.संध्याकाळीच परत यायचं.तिथं काय करायचं,हे तूच ठरवायचंस.' राजाच्या मुलाला आधी यात काही विशेष वाटलं नाही.तो वनात आत चालत गेला.दमला तेव्हा एका दगडावर बसला.एक तास गेला,

दोन तास गेले. वेळ जाता जाईना.बरं,वनात काही बघायलाही नव्हतं.ना इमारती,ना कुठलं संगीत वा नृत्य,ना कुठले क्रीडा प्रकार,राजमहालात त्याला रिझवायला

( करमणूकीसाठी ) बरीच माणसं असायची,तसंही काही नाही.कसा तरी त्यानं दिवस ढकलला.उन्हं उतरायला लागल्यावर गुरूंच्या कुटीकडे परत फिरला.गुरुजींनी त्याला विचारलं, 'कसा गेला आजचा दिवस?' राजाचा मुलगा जरा चिडूनच म्हणाला,'कसा जायचाय? ढकलला एवढंच.' गुरुजी किंचितसं हसले.ते म्हणाले,'अरे,पुढचा महिनाभर तुला रोजच अरण्यात जायचंय.तुझ्या प्रशिक्षणाचा तो भाग आहे.'


हे ऐकून राजाच्या मुलाच्या पोटात खड्डा पडला;पण गुरूंच्या शिफारसीशिवाय राजगादीचा मार्गही मोकळा होणार नव्हता.त्यानंतर पुढचा आठवडाभर तो अरण्यात जात राहिला.हळूहळू रानातल्या अनवट वाटा त्याच्या ओळखीच्या होऊ लागल्या.निर्जीव भासणाऱ्या अरण्यातील पानांची सळसळ,वाळलेल्या पाचोळ्यावरून चालताना होणारा चुर्र चुर्र आवाज,

त्याच्या चाहुलीनं थबकणारे प्राणी,झाडांवर पानांमागून चिवचिवणारे पक्षी,पाण्याच्या स्रोतांच्या आवाजाचे फरक,झाडावरून गळणारं पान,प्राणी-पक्ष्यांच्या पिलांच्या चेहऱ्यावरचं कुतूहल आणि त्यांचं बिचकून जाणं,असा एक ना अनेक गोष्टी त्याच्या ध्यानात येऊ लागल्या.रिकाम्या अरण्यात किती तरी जीवांच्या ध्वनींचं संगीत भरलेलं आहे,त्यांच्या पळण्यात,थांबण्यात,मान वळवण्यात किती लय आहे,ती त्याला जाणवू लागली.सरपटणाऱ्या जीवांच्या त्वचेवरचे रंग व रचनांची मिश्रणं त्याला मोहवू लागली.


रोज संध्याकाळी कुटीत परतल्यावर गुरुजी त्याला,आज काय केलंस हा जो प्रश्न विचारायचे, त्याची अनेक पदरांची उत्तरं आता त्याच्याकडे साठू लागली होती.नंतर असं होऊ लागलं,की अरण्यातून परत आल्यावर तो स्वत:च उत्साहानं गुरुजींना तिथल्या कथा सांगू लागला.त्याच्या चेहऱ्यावरचा कंटाळा लोप पावला आणि हर क्षणी आपल्या चोहोबाजूला चैतन्य वावरत असतं,याचं भान त्याला आलं.हळूहळू महिना पूर्ण व्हायला आला होता.त्याच्या मनातून राजपदाचा विचार जणू पुसला गेला होता.

एका संध्याकाळी परतल्यावर तो गुरुजींना म्हणाला,


'गुरुजी,आज मी मुंग्यांचं बोलणं ऐकलं.त्यांनाही शब्द असतो हे मला ठाऊकच नव्हतं.'


हे ऐकताक्षणी गुरुजींच्या चेहऱ्यावर सात्विक आनंदाचा रंग पसरला.ते शांत सुरात म्हणाले, 


'बाळा,तू राजा होण्याचा पात्रतेचा बनला आहेस. तुझ्यातला अहंकार पुसला गेला आणि ज्यांच्या आवाजाकडे,भावनांकडे कोणीही कधीही लक्ष देत नाही,त्या मुंग्यांचा शब्द तू ऐकलास.समाजात उठावदार गोष्टींसाठी सगळेच काम करतात; पण जो अत्यंत दुर्लक्षित समूहाच्या कल्याणासाठी काम करतो,तोच नेता बनण्याच्या लायकीचा असतो.

आता तू राजमहालात परत गेलास तरी चालेल.


डॉ.सुरुची पांडे 


आमचे मित्र एन.के पत्रकार यांनी फार दिवसापूर्वी मला पाठविलेली कथा..