* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/२/२४

काम आनंदाने असे कराल. Do the work with pleasure.

१९१५ मध्ये अमेरिकेमध्ये दहशतीचं वातावरण होतं.

विश्वयुद्ध एक वर्षापेक्षा अधिक काळ सुरु होतं.युरोपातले देश एकमेकांना निष्ठुरपणे मारत होते.मानवाच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंसा कधी झाली नव्हती.शांततेचं वातावरण पुन्हा स्थापन होऊ शकणार होतं का? कुणाला ठाऊक नव्हतं.परंतु वुडरो विल्सनने एकदा प्रयत्न करून पाहायचं ठरवलं.त्यांनी युरोपच्या शासकांकडे व सेनापतींकडे शांती-संदेश घेऊन एक व्यक्तिगत प्रतिनिधी,एक शांतिदूत पाठवण्याचा निर्णय घेतला.विल्यम जेनिंग्ज ब्रायन,जे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते,ते शांतीदूत बनून जायला तयार होते.त्यांना मानवतेची सेवा करायची इच्छा होती व त्यामुळे आपलं नाव इतिहासात अमर व्हावं असं त्यांना वाटत होतं.परंतु विल्सनने आपला जिगरी दोस्त आणि सल्लागार कर्नल एडवर्ड एम हाउस याला शांतिदूत बनवून पाठवून दिलं.ही बातमी ब्रायनला ऐकवण्याची जबाबदारीही कर्नल हाउसवर सोपवली गेली,ज्यामुळे त्यांना वाईट वाटू नये.

कर्नल हाउसने आपल्या रोजनिशीत लिहिलं आहे,"जेव्हा ब्रायनने ऐकले की मला शांतिदूत बनवून युरोपला पाठवले जातेयतेव्हा ते उघडपणे निराश झाले.ते म्हणाले की,'हे काम मी स्वतः करू इच्छित होतो." यावर मी उत्तर दिलं-'राष्ट्रपतींना असं वाटत होतं की शांतिदूताच्या रुपात जर आपण गेला असता तर सगळ्या जगाचे लक्ष या गोष्टीकडे आकर्षित झाले असते आणि लोकांना नवल वाटले असते की आपणे तिथे का गेलात?'तुम्हाला इशारा समजला? हाउसने ब्रायनला एका तन्हेने हे सांगितले,ते काम इतकं महत्त्वपूर्ण नव्हतं की त्यांच्यावर सोपवले जावे.ब्रायनचं समाधान झालं.कर्नल हाउसपाशी दुनियादारीची समज होती,अनुभव होता आणि कूटनीतीचे ज्ञानही होते.


त्यांना हा अमूल्य नियम माहीत होता.समोरच्या व्यक्तीवर कुठलेही काम अशा तऱ्हेने सोपवा,की तो खुश होऊन तुम्ही सांगितलेले काम करेल.


वुडरो विल्सनने जेव्हा विलियम गिब्ज मॅकाडूला आपला कॅबिनेट सदस्य बनवले,तेव्हा त्यांनीही हीच नीती वापरली.हा तो सर्वोच्च सन्मान होता, जो ते कुणालाही देऊ शकले असते.पण विल्सनने हा प्रस्ताव अशा तऱ्हेने मांडला की ज्यामुळे मॅकाडूला दुप्पट महत्त्व मिळेल. मॅकाडूच्या स्वतःच्या शब्दातच ही कहाणी ऐका.


" त्यांनी (विल्सननी) म्हटलं की ते आपली कॅबिनेट बनवताहेत आणि जर मी वित्तमंत्री बनलो तर त्यांना खूप आनंद होईल.त्यांची बोलण्याची तन्हा खूप सुखद होती.त्यांनी असं दाखवलं की त्यांचा प्रस्ताव स्वीकार करून मी त्यांच्यावर उपकार करतोय."


दुर्भाग्याने विल्सन नेहमी अशा व्यवहारकुशलतेने वागले नाही.जर त्यांनी असं केलं असतं तर आज इतिहास काही वेगळाच झाला असता. उदाहरणार्थ,अमेरिकेला लीग ऑफ नेशन्समध्ये सामील करण्याचाच मामला घ्या.

विल्सनने सीनेट व रिपब्लिकन पार्टीला या प्रकरणात खुश ठेवले नाही.एलिहू रूट वा चार्ल्स इव्हान्स ह्यूज किंवा हेन्री कॅबॉट लॉज यांना आपल्या बरोबर घेऊन गेले नाही.त्याऐवजी त्यांनी आपल्या पार्टीच्या अनोळखी सदस्यांना शांती-वॉनॅनला बरोबर नेलं.त्यांनी रिपब्लिकन्सला अपमानित केलं आणि त्यांना ही गोष्ट जाणवून दिली की लीगचा विचार रिपब्लिकन पार्टीचा नसून खुद्द विल्सनचा आहे.विल्सनने त्यांना स्पर्शसुध्दा करू दिला नाही.मानवी संबंधांना इतक्या वेगळ्या प्रकारे हाताळल्यामुळे त्यांनी आपल्या कारकिर्दीचा सत्यानाश केला,आपली तब्येत बिघडवून घेतली,आपलं आयुष्य कमी करून घेतलं.यामुळेच अमेरिकेला लीगच्या बाहेर राहावं लागलं आणि विश्वाचा इतिहास बदलला.


समोरच्या व्यक्तीवर कार्य अशा त-हेने सोपवा की ती खुश होऊन तुमच्या म्हणण्याप्रमाणे काम करेल.ही नीती केवळ राजनेते किंवा कूटनीतीज्ञच वापरत नाहीत.फोर्ट वेन, इंडियानाचे डेल ओ.फेरियरने आम्हाला सांगितले की त्यांनी कसे आपल्या छोट्या मुलाकडून आनंदाने सोपवलेले काम करून घेतले.


" जेफवर झाडावरून पडलेल्या पिअर्स गोळा करण्याचे काम सोपवले गेले होते,जेणेकरून हिरवळ कापायला आलेल्या माणसाला थांबून त्या उचलाव्या लागू नयेत.

त्याला हे काम पसंत नव्हतं आणि बहुतेक वेळा हे काम होतंच नसे किंवा द्याल तर इतक्या वाईट त-हेने व्हायचे की हिरवळ कापणाऱ्याला अनेकदा थांबून थांबून खाली पडलेल्या पिअर्स गोळा कराव्या लागत. सरळ रागावण्याऐवजी मी एक दिवस त्याला म्हटलं,"जेफ, मी तुझ्याशी एक तडजोड करीन म्हणतो.पिअर्सने भरलेली एक टोपली उचलण्यासाठी मी तुला एक डॉलर देईन.पण तुझं काम संपल्यावर मला एकही फळ जमिनीवर दिसलं तर मी प्रत्येक पिअर्समागे एक डॉलर तुझ्याकडून परत घेईन.बोल,सौदा मंजूर आहे? तुमच्या लक्षात आलंच असेल की त्यानंतर एकसुध्दा पिअर्स जमिनीवर पडलेली आढळली नाही.तो केवळ जमिनीवर पडलेल्या सर्व पिअर्स वेचून घेत नसे तर मला त्याच्यावर नजर ठेवावी लागत असे की कुठे तो झाडावरची फळं तोडून आपली टोपली भरत तर नाही ना!"


मी अशा एका व्यक्तीला जाणतो जी भाषणाचा आग्रह,

मित्रांची आमंत्रणं अशा प्रकारे अस्वीकार करायची की लोक नाराज होत नसत.त्याची पध्दत काय होती ? तो आपण खूप व्यग्र आहोत अन् त्याला हे काम करायचं,ते काम करायचं असं न सांगता,आधी तर तो आमंत्रणासाठी धन्यवाद देत असे.मग ते आमंत्रण स्वीकार करायला तो कसा असमर्थ आहे हे सांगून दुसऱ्या एखाद्या वक्त्याचं नावही सुचवत असे. दुसऱ्या शब्दात,तो समोरच्या व्यक्तीला आपल्या अस्वीकृतीबद्दल अप्रसन्न होण्याची संधीच देत नसे.तो ताबडतोड समोरच्या व्यक्तीच्या विचारप्रवाहाला कुणा अन्य वक्त्याकडे वळवून देत असे,

जो त्याचं आमंत्रण स्वीकार करण्याच्या स्थितीत असे.

गुंटुर स्किमित्झ पश्चिम जर्मनीत आमच्या अभ्यासक्रमात भाग घेतला.त्यांनी आपल्या फूड स्टोरमधील एका कर्मचाऱ्याचे प्रकरण सांगितले.ही कर्मचारी जिथे वस्तु दर्शनी फळ्यांवर ठेवलेल्या असतात,त्यांना किंमतीचे लेबल लावण्याच्या कामात निष्काळजीपणा करीत होती.

यामुळे समस्या निर्माण व्हायची आणि ग्राहक तक्रार करायचे.वारंवार समजावून, फटकारून आणि वाद घालूनसुध्दा फारसा फायदा झाला नाही.शेवटी स्किमित्झने तिला आपल्या ऑफिसात बोलावले आणि म्हणाले, 'मी तुझी दुकानात लेबल लावायच्या कामावर सुपरवायझर म्हणून नेमणूक करतोय.भविष्यात तुला ह्यावर लक्ष ठेवावे लागेल की सगळ्या वस्तूंना लेबलं लावली आहेत की नाही.' या नव्या जबाबदारीने वक्षबदललेल्या पदनावामुळे तिचा व्यवहार पूर्णपणे बदलून गेला आणि त्यानंतर ती आपले काम व्यवस्थित करू लागली.काय म्हणता? हा पोरकटपणा आहे? कदाचित असेलही.पण जेव्हा नेपोलियनने 'लिजन ऑफ ऑनर'च्या सन्मानार्थ आपल्या शिपायांना १५,००० क्रॉस वाटले,आपल्या अठरा अधिकाऱ्यांना 'मार्शल ऑफ फ्रान्स'चे सन्मान दिले आणि आपल्या सेनेला 'ग्रँड आर्मी' असे संबोधित केले,तेव्हा त्यालाही पोरकट समजण्यात आले होते.नेपोलियनची यावरून निंदा केली गेली.

युद्धाच्या आगीत होरपळलेल्या सैनिकांच्या हातात त्याने खेळणी किंवा खुळखुळे दिल्याची टिका करण्यात आली.यावर नेपोलियनने उत्तर दिले," मानवावर खेळण्यांनीच शासन केले जाऊ शकते." 


पदवी देऊन नेपोलियनला उपयोग झाला होता, हे तुमच्याही उपयोगी पडू शकेल.उदाहरणार्थ,स्कार्सडेल,न्यू यॉर्कमध्ये राहणारी माझी एक मैत्रीण अर्नेस्ट जेंट या गोष्टीने त्रस्त होती की काही मुले तिच्या हिरवळीवर धावून ती खराब करतात.

तिने मुलांना धमकावले,लालूच दाखवली,पण काही फरक पडला नाही.मग तिने त्या टोळीच्या पुढाऱ्याला बोलावले आणि त्याला एक पदवी बहाल करून त्याला महत्त्वपूर्ण होण्याचा अनुभव दिला.तिने त्याला आपला 'हेर' म्हणून नेमलं.तिने आपल्या 'हेराला' सांगितले की तो हिरवळीचं रक्षण करेल अन् अनधिकृत लोकांना तिथे घुसण्याची परवानगी देणार नाही. यामुळे तिची समस्या सुटली. तिच्या 'हेराने' मागच्या अंगणात एक शेकोटी पेटवली. तो लॉनवर येणाऱ्या मुलांना भाजून राख करण्याची धमकी देत असे.


जेव्हा तुम्ही आग्रह कराल तेव्हा समोरच्याला अशा त-हेने सांगा की ते त्याच्या किती फायद्याचे असेल.आपण कटू आदेश देऊ शकतो,"जॉन, उद्या ग्राहक येणार आहेत आणि मला स्टॉकरूम स्वच्छ हवी.म्हणून व्यवस्थित केर काढ,स्टॉक नीट फळीवर लावून ठेव आणि काऊंटर स्वच्छ पुसून घे." किंवा आपण याच विचारांना अशा त-हेने व्यक्त करू शकतो,की जॉनला त्याचे फायदे समजून येतील,जे त्याला हे काम करण्यामुळे प्राप्त होतील.


" जॉन,आपल्याकडे एक काम आहे,ते ताबडतोब करायला हवंय. जर ते लगेच केलं तर आपल्याला नंतर कठीण जाणार नाही.मी उद्या काही ग्राहकांना आपला माल दाखवायला आणणार आहे.मी त्यांना स्टॉकरूम दाखवू इच्छितो,पण त्याची अवस्था फार चांगली नाहीये.जर तू ती रूम झाडून घेशील,माल फळीवर रचून,काऊंटर स्वच्छ करशील तर सर्वकाही व्यवस्थित दिसेल आणि कंपनीची प्रतिमा उंचावण्यात तुझे महत्त्वाचे योगदान राहील."


तुम्ही सुचवलेली कामं पूर्ण करून जॉन खूश होईल का? कदाचित फार नाही खुश होणार, पण आताची सांगण्याची पद्धत ऐकून नक्कीच खूश होईल. तेव्हा तुम्ही त्याला फायदे सांगितले नव्हते.आम्ही जर असं धरून चाललो की जॉनला आपल्या स्टॉकरूमच्या प्रतिमेचा अभिमान वाटतो,आणि तो कंपनीची चांगली प्रतिमा बनवण्यात योगदान देण्यास इच्छुक आहे तर त्याची काम करायची भूमिका अधिक सहयोगपूर्ण असेल याची शक्यता जास्त आहे. जॉनला हेसुद्धा सांगायला हवं की,ते काम आता नाही तरी नंतर करायचेच आहे. काम आत्ताच उरकले तर नंतर करावे लागणार नाही.



एक महत्वाची सुचना …!


भारताचे नौकानयन शास्त्र..Navigation of India.. हा दिनांक १४.०२.२३ रोजी लिहिलेल्या लेखामध्ये एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा,त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला.हे वाक्य एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा,( वास्को डी गामा ) त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला.असे वाचावे.



१४/२/२४

भारताचे नौकानयन शास्त्र.. Navigation of India..

एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा,त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला. 'चंदन' नावाचा तो भारतीय व्यापारी अत्यंत साध्या वेषात खाटेवर बसला होता.जेव्हा वास्को-डी-गामाने भारतात येण्याची इच्छा दाखविली,तेव्हा सहजपणे त्या भारतीय व्यापाऱ्याने सांगितले,'मी उद्या भारतात परत चाललोय.तू माझ्या मागोमाग ये...' आणि अशा रीतीने वास्को-डी-गामा भारताच्या किनाऱ्याला लागला..!!


दुर्दैवाने आजही शाळेत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकांत 'वास्को-डी- गामाने भारताचा 'शोध' लावला असा उल्लेख असतो..!!'


मार्को पोलो (१२५४ - १३२४) हा साहसी दर्यावर्दी समजला जातो. इटलीच्या ह्या व्यापाऱ्याने भारतमार्गे चीनपर्यंत प्रवास केला होता.हा तेराव्या शतकात भारतात आला. मार्को पोलोने त्याच्या प्रवासातील अनुभवांवर एक पुस्तक लिहिलंय - 'मार्व्हल्स ऑफ द वर्ल्ड'. याचा अनुवाद इंग्रजीमधेही उपलब्ध आहे. या पुस्तकात त्याने भारतीय जहाजांचं सुरेख वर्णन केलेलं आहे.त्यानं लिहिलंय की,भारतात विशाल जहाजं तयार होतात.

लाकडांचे दोन थर जोडून त्याला लोखंडी खिळ्यांनी पक्के केले जाते. आणि नंतर त्या सर्व लहान- मोठ्या छिद्रांमधून विशेष पद्धतीचा डिंक टाकला जातो,ज्यामुळे पाण्याचा प्रवेश पूर्णपणे निषिद्ध होतो.


मार्को पोलोने भारतात तीनशे नावाड्यांची जहाजं बघितली होती.त्यानं लिहिलंय,एका एका जहाजात तीन ते चार हजार पोती सामान मावतं आणि त्याच्या वर राहण्याच्या खोल्या असतात. खालच्या लाकडाचा तळ खराब होऊ लागला की त्याच्यावर दुसऱ्या लाकडाचा थर लावला जातो.जहाजांचा वेग चांगला असतो. इराणपासून कोचीनपर्यंतचा प्रवास भारतीय जहाजांमधून आठ दिवसांत होतो.पुढे निकोली कांटी हा दर्यावर्दी पंधराव्या शतकात भारतात आला.याने भारतीय जहाजांच्या भव्यतेबद्दल बरंच लिहिलंय.डॉ. राधा कुमुद मुखर्जी यांनी आपल्या 'इंडियन शिपिंग' या पुस्तकात भारतीय जहाजांचं सप्रमाण सविस्तर वर्णन केलंय.पण हे झालं खूप नंतरचं.म्हणजे भारतावर इस्लामी आक्रमण सुरू झाल्या- नंतरचं.याच काळात युरोपातही साहसी दर्यावर्दीचं पेव फुटलं होतं.युरोपियन खलाशी आणि व्यापारी जग जिंकायला निघालेले होते. अजून अमेरिकेची वसाहत व्हायची होती.हाच कालखंड युरोपातील रेनेसाँचा आहे.त्यामुळे सर्व प्रकारच्या इतिहासलेखनामधे,

विकीपिडियासारख्या माध्यमांमध्ये युरोपियन नौकानयन शास्त्राबद्दलच भरभरून लिहिलं जातं.पण त्याच्याही दीड-दोन हजार वर्षांपूर्वीचे भारतीय नौकानयनाच्या प्रगतीचे पुरावे मिळाले आहेत.


आपल्याकडे उत्तरेत इस्लामी आक्रमण सुरू होण्याच्या काळात,म्हणजे अकराव्या शतकात, माळव्याचा राजा भोज याने ज्ञान-विज्ञानासंबंधी अनेक ग्रंथ लिहिले किंवा लिहून घेतले.त्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे 'युक्ती कल्पतरू.' हा ग्रंथ जहाजबांधणीच्या संदर्भातला आहे. जवळच्या आणि लांबच्या प्रवासासाठी लहान - मोठी,

वेगवेगळ्या क्षमतेची जहाजं कशी बनवली जावीत याच सविस्तर वर्णन ह्या ग्रंथात आहे. जहाजबांधणीच्या बाबतीत हा ग्रंथ प्रमाण मानला जातो.वेगवेगळ्या जहाजांसाठी वेगवेगळं लाकूड कसं निवडावं यापासून तर विशिष्ट क्षमतेचं जहाज,त्याची डोलकाठी यांचं निर्माण कसं करावं ह्याचं गणितही ह्या ग्रंथात मिळतं.


पण ह्या ग्रंथाच्या पूर्वीही,हजार - दोन हजार वर्षं तरी,भारतीय जहाजं जगभर संचार करीत होतीच.म्हणजे हा 'युक्ती कल्पतरू' ग्रंथ,नवीन काही शोधून काढत नाही,तर आधीच्या ज्ञानाला 'लेखबद्ध' करतोय.कारण भारतीयांजवळ नौकाशास्त्राचं ज्ञान फार पुरातन काळापासून होतं.चंद्रगुप्त मौर्यच्या काळात भारताची जहाजं जगप्रसिद्ध होती.ह्या जहाजांद्वारे जगभर भारताचा व्यापार चालायचा. यासंबंधीची ताम्रपत्रं आणि शिलालेख मिळालेले आहेत. बौद्ध प्रभावाच्या काळात,बंगालमधे सिंहबाहू राजाच्या शासनकाळात सातशे यात्रेकरू श्रीलंकेला एकाच जहाजाने गेल्याचा उल्लेख आढळतो.कुशाण काळ आणि हर्षवर्धनच्या काळातही समृद्ध सागरी व्यापाराचे उल्लेख सापडतात.इस्लामी आक्रमकांना भारतीय नाविक तंत्रज्ञान काही विशेष मेहनत न घेता मिळून गेले.त्यामुळे अकबराच्या काळात नौकानयन विभाग इतका समृद्ध झाला होता की जहाजांच्या डागडुजीसाठी आणि करवसुलीसाठी त्याला वेगळा विभाग बनवावा लागला.


पण अकराव्या शतकापर्यंत चरम सीमेवर असणारं भारतीय नौकानयन शास्त्र पुढे उतरंडीला लागलं.

मोगलांनी आयत्या मिळालेल्या जहाजांना नीट ठेवलं इतकंच,पण त्यात वाढ केली नाही.दोनशे वर्षांचं विजयनगर साम्राज्य तेवढं अपवाद.त्यांनी जहाजबांधणीचे कारखाने पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही तटांवर सुरू केले आणि ८० पेक्षा जास्त बंदरांना ऊर्जितावस्थेत आणलं.पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं आरमार उभारलं आणि नंतर आंग्र्यांनी त्याला बळकट केलं.


पण अकराव्या शतकाच्या आधीचे वैभव भारताच्या जहाजबांधणी उद्योगाला पुढे आलेच नाही.त्याच काळात स्पेन आणि पोर्तुगाल यांनी जहाजबांधणीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली अन् भारत मागे पडला.पण तरीही,इंग्रज येईपर्यंत भारतात जहाजं बांधण्याची प्राचीन विद्या जिवंत होती.सतराव्या शतकापर्यंत युरोपियन राष्ट्रांची क्षमता अधिकतम सहाशे टनांचं जहाज बांधण्याची होती.

पण त्याच सुमारास त्यांनी भारताचे 'गोधा' (कदाचित 'गोदा' असावे. स्पॅनिश अपभ्रंशाने गोधा झाले असावे) नावाचे जहाज बघितले,जे १,५०० टनांपेक्षाही मोठे होते.भारतात आपल्या वखारी उघडलेल्या युरोपियन कंपन्या-म्हणजे डच, पोर्तुगीज,

इंग्रज,फ्रेंच इत्यादी - भारतीय जहाजं वापरू लागली आणि भारतीय खलाशांना नोकरीवर ठेवू लागली. 


सन १८११ मधे ब्रिटिश अधिकारी कर्नल वॉकर लिहितो की,'ब्रिटिश जहाजांची दर दहा / बारा वर्षांनी मोठी डागडुजी करावी लागते.पण सागवानी लाकडापासून बनलेली भारतीय जहाजं गेल्या पन्नास वर्षांपासून डागडुजीशिवाय उत्तम काम करताहेत.

'भारतीय जहाजांची ही गुणवत्ता बघून 'ईस्ट इंडिया कंपनी' ने 'दरिया दौलत' नावाचे एक भारतीय जहाज विकत घेतले होते,जे ८७ वर्षं,डागडुजी न करता व्यवस्थित काम करत राहिले.ब्रिटिशांनी मराठ्यांकडून भारतावरील राज्य हिसकावून घेण्याच्या काही वर्ष आधीच,म्हणजे १८११ मधे एक फ्रांसीसी यात्री वाल्तजर साल्विन्सने 'ले हिंदू' नावाचे एक पुस्तक लिहिले.त्यात तो लिहितो,'प्राचीन काळात नौकानयनाच्या क्षेत्रात हिंदू सर्वांत अघाडीवर होते आणि आजही (१८११) ते या क्षेत्रात आमच्या युरोपियन देशांना शिकवू शकतात.'


इंग्रजांनीच दिलेल्या आकड्यांप्रमाणे १७३३ ते १८६३ मधे एकट्या मुंबईतल्या कारखान्यात ३०० भारतीय जहाजं तयार झाली,ज्यांतील अधिकांश जहाजं ब्रिटनच्या राणीच्या 'शाही नौदलात' सामिल करण्यात आली.यातील 'एशिया' नावाचे जहाज २,२८९ टनांचे होते आणि त्यावर ८४ तोफा बसविलेल्या होत्या. बंगालमधे चितगाव,हुगळी (कोलकाता),सिलहट आणि ढाकामधे जहाजं बनविण्याचे कारखाने होते.१७८१ ते १८८१ ह्या शंभर वर्षात एकट्या हुगळीच्या कारखान्यात २७२ लहान-मोठी जहाजं तयार झाली.अर्थात भारतीय जहाज-बाधणीच्या पडत्या काळात जर ही परिस्थिती असेल तर अकराव्या शतकापूर्वी भारताच्या जहाजबांधणी उद्योगाची स्थिती किती समृद्धशाली असेल,याचा अंदाज येऊ शकतो. मात्र अशा दर्जेदार गुणवत्तेची जहाजं बघून इंग्लंडमधील इंग्रज,ईस्ट इंडिया कंपनीला,ही जहाजं न घेण्यासाठी दबाव टाकू लागले.सन १८११मध्ये कर्नल वॉकरने आकडे देऊन हे सिद्ध केले की,'भारतीय जहाजांना फारशी डागडुजी लागत नाही.आणि त्यांच्या 'मेंटेनन्स'ला अत्यल्प खर्च येतो.तरीही ते जबरदस्त मजबूत असतात.' (ही सर्व कागदपत्रं ब्रिटिश संग्रहालयात, ईस्ट इंडिया कंपनीच्या अभिलेखागारात [आर्काईव्हल मध्ये सुरक्षित आहेत.) मात्र इंग्लंडच्या जहाज बनविणाऱ्या व्यापाऱ्यांना हे फार झोंबलं. इंग्लंडचे डॉ.टेलर लिहितात की,भारतीय मालाने लादलेलं भारतीय जहाज जेव्हा इंग्लंडच्या किनाऱ्याला लागलं,तेव्हा इंग्रजी व्यापाऱ्यांमध्ये अशी गडबड उडाली की,जणू शत्रूनेच आक्रमण केले आहे.लंडनच्या गोदीतील (बंदरातील) जहाज बांधणाऱ्या कारागिरांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाला लिहिलं की,जर भारतीय बांधणीची जहाजं तुम्ही वापरायला लागाल तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, आमची अन्नान्न दशा होईल..!


ईस्ट इंडिया कंपनीने त्या वेळी हे फार मनावर घेतलं नाही.

कारण भारतीय जहाजं वापरण्यात त्यांचा व्यापारिक फायदा होता.मात्र १८५७ च्या क्रांती-युद्धानंतर भारतातले शासन सरळ इंग्लंडच्या राणीच्या हातात आले.आणि राणीने विशेष अध्यादेश काढून भारतीय जहाजांच्या निर्मितीवर बंदी घातली.१८६३ पासून ही बंदी अमलात आली आणि एका वैभवशाली,समृद्ध आणि तांत्रिक दृष्ट्या पुढारलेल्या भारतीय नौकानयन शास्त्राचा मृत्यू झाला !


 सर विलियम डिग्वीने या संदर्भात लिहिलेय की,'पाश्चिमात्य जगाच्या सामर्थ्यशाली राणीने,प्राच्य सागराच्या वैभवशाली राणीचा खून केला.आणि जगाला 'नेव्हिगेशन' हा शब्द देण्यापासून तर प्रगत नौकानयन शास्त्र शिकवणाऱ्या भारतीय नाविक शास्त्राचा,प्रगत जहाजबांधणी उद्योगाचा अंत झाला..!


१२.०२.२४ या लेखातील शेवटचा भाग..


अष्टगंध प्रकाशनाचं नवं पुस्तक....


पातीवरल्या बाया : सचिन शिंदे


बाई सुपारीचं खांड,दोहो बाजूंनी चेंदते बाई अंतरीचा धागा,मना मनाला सांधते


ठाव लागेना मनाचा,बाई कालिंदीचा तळ उठणाऱ्या वेदनेची,बाई दाबतेय कळ


वेदनेची गाणी गाते,बाई कंठातला सूर ढगफुटी तिच्या जगी,बाई आसवांचा पूर


दोन काठांना जोडते,बाई तरंगती नाव सुखासीन नांदणारं,बाई मायाळू गं गाव


बाई कोवळ्या मनाची,डुलणारी मऊ वेल जणू टणक देहाची,बाई बाभळीची साल


संथ भरलेला सदा,बाई नदीचा गं डोह तप्त ग्रीष्माच्या झळाचा,बाई पोळणारा दाह


बाई राबणारे कर,सदा सृजनाचा मळा कापे सरसर दुःख,बाई धारदार विळा


आमचे परममित्र कवी सचिन शिंदे यांची कलाकृती लवकरच हाती येईल.उत्सुकता वाचण्याची..!!

१२/२/२४

भारताचे प्रगत नौकानयन शास्त्र.. Advanced Navigation of India..

जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बँकॉकच्या प्रशस्त विमानतळाचे नाव आहे -सुवर्णभूमी विमानतळ.या विमानतळात प्रवेश केल्यावर सर्व प्रवाशांचे लक्ष आकृष्ट करते ती एक भली मोठी कलाकृती आपल्या पुराणात वर्णन केलेल्या समुद्रमंथनाची..! या कलाकृतीभोवती फोटो आणि सेल्फी घेणाऱ्यांची एकाच झुंबड उडालेली असते.याच सुवर्णभूमी विमानतळावर,थोडं पुढं गेलं की एक भला मोठा नकाशा लावलेला आहे. साधारण हजार,

दीड हजार वर्षांपूर्वीचा हा नकाशा आहे.'पेशावर' पासून तर 'पापुआ न्यू गिनी 'पर्यंत पसरलेल्या ह्या नकाशाच्या मध्यभागी ठसठशीत अक्षरात लिहिलंय इंडिया.!आणि याचं नकाशात सयाम (थायलंड) ला ठळक स्वरूपात दाखवलंय.अर्थात हा नकाशा उच्च स्वरात सांगतोय 'अरे,कोणे एके काळी ह्या विशाल पसरलेल्या भारतीय संस्कृतीचा सयाम (थायलंड) हा एक हिस्सा होता आणि आम्हाला त्याचा प्रचंड अभिमान आहे !!'


जवळजवळ साऱ्याच दक्षिण पूर्व आशियामधे ही भावना आढळते.आपल्या राष्ट्रध्वजात हिंदू मंदिराचे चिन्ह अभिमानाने बाळगणारा कंबोडिया तर आहेच.पण गंमत म्हणजे या भागातला एकमात्र इस्लामी देश आहे - ब्रुनेइ दारुस्सलाम. ह्या देशाच्या राजधानीचं नाव आहे - बंदर श्री भगवान.हे नाव 'बंदर श्री 'भगवान' ह्या संस्कृत नावाचा अपभ्रंश आहे.पण इस्लामी राष्ट्राच्या राजधानीच्या नावात 'श्री भगवान' येणं हे त्यांना खटकत तर नाहीच, उलट त्याचा अभिमान वाटतो.जावा,सुमात्रा,मलय,

सिंहपूर,सयाम, यवद्वीप इत्यादी सर्व भाग, जे आज इंडोनेशिया, मलेशिया,सिंगापूर,थायलंड,कंबोडिया,

विएतनाम वगैरे म्हणवले जातात, त्या सर्व देशांवर हिंदू संस्कृतीची जबरदस्त छाप आजही दिसते. 


दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी दक्षिण भारतातले हिंदू राजे ह्या प्रदेशात गेले.त्यांनी फारसे कुठे युद्ध केल्याचे पुरावे सापडत नाहीत.उलट शांततापूर्ण मार्गांनी,पण समृद्ध अशा संस्कृतीच्या जोरावर संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया हा हिंदू विचारांना मानू लागला.


आता इतक्या मोठ्या प्रमाणावर जर हिंदू राजे, त्यांचे सैनिक,सामान्य नागरिक दक्षिण-पूर्व आशियात गेले असतील तर ते कसे गेले असतील..? अर्थातच समुद्री मार्गाने.म्हणजेच त्या काळात भारतामधे नौकानयन शास्त्र अत्यंत प्रगत अवस्थेत असेल.त्या काळातील भारतीय नौकांची आणि नावाड्यांची अनेक चित्रं,शिल्पं कंबोडिया,

जावा,सुमात्रा,बालीमधे मिळतात. पाचशेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जाणाऱ्या नौका त्या काळात भारतात तयार व्हायच्या. एकूण समुद्रप्रवासाची स्थिती बघता,

त्या काळात भारतीयांजवळ बऱ्यापैकी चांगले दिशाज्ञान आणि समुद्री वातावरणाचा अंदाज असला पाहिजे.अन्यथा त्या खवळलेल्या समुद्रातून, आजच्यासारखा हवामानाचा अंदाज आणि दळणवळणाची साधनं नसतानाही इतका दूरचा पल्ला गाठायचा,त्या देशांशी संबंध ठेवायचे, व्यापार करायचा,भारताचे 'एक्स्टेन्शन' असल्यासारखा संपर्क ठेवायचा... म्हणजेच भारतीयांचं नौकानयन शास्त्र अत्यंत प्रगत असलंच पाहिजे.


१९५५ आणि १९६१ मधे गुजराथच्या 'लोथल'मधे पुरातत्त्व खात्याद्वारे उत्खनन करण्यात आले.लोथल अगदी समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं नाही,तर समुद्राची एक चिंचोळी पट्टी लोथलपर्यंत आलेली आहे.मात्र उत्खननात हे दिसले की सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी लोथल हे अत्यंत वैभवशाली बंदर होते.तेथे अत्यंत प्रगत आणि नीट नेटकी नगररचना वसलेली आढळली.पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोथलमधे जहाजबांधणीचा कारखाना होता, असे अवशेष सापडले.लोथलहून अरब देशांमधे, इजिप्तमधे मोठ्या प्रमाणावर व्यापार चालायचा याचे पुरावे मिळाले.साधारण १९५५ पर्यंत लोथल किंवा पश्चिम भारतातील नौकानयन शास्त्राबद्दल फारसे पुरावे आपल्याजवळ नव्हते. लोथलच्या उत्खननाने या ज्ञानाची कवाडं उघडली गेली.पण यावरून असं जाणवलं की, अगदी समुद्रकिनाऱ्यावर नसणारं लोथल जर इतकं समृद्ध असेल आणि तिथे नौकानयनाच्या बाबतीत इतक्या गोष्टी घडत असतील तर गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या पश्चिम भारताच्या किनाऱ्यावरील बंदरांमधे याहीपेक्षा सरस आणि समृद्ध संरचना असेल.


आज ज्याला आपण नालासोपारा म्हणतो, तिथे हजार / दीड हजार वर्षांपूर्वीपर्यंत 'शुर्पारक' नावाचे वैभवशाली बंदर होते.तिथे भारताच्या जहाजांबरोबर अनेक देशांची जहाजं व्यापारासाठी यायची. तसंच दाभोळ,तसंच सुरत.

पुढे विजयनगर साम्राज्य स्थापन झाल्यावर त्या राज्याने दक्षिणेतील अनेक बंदरं परत वैभवशाली अवस्थेत उभी केली आणि पूर्व व पश्चिम अशा दोन्ही दिशांमध्ये व्यापार सुरू केला.मेक्सिकोच्या उत्तर पश्चिम टोकाला,म्हणजेच 'दक्षिण अमेरिकेच्या' उत्तर टोकाला जिथे समुद्र मिळतो,तिथे मेक्सिकोचा युकाटान प्रांत आहे. या प्रांतात त्यांच्या पुरातन 'माया' संस्कृतीचे अनेक अवशेष आजही मोठ्या प्रमाणावर जपून ठेवलेले आहेत.याच युकाटान प्रांतात जवाकेतू नावाच्या जागी एक अति प्राचीन सूर्यमंदिर अवशेषांच्या रूपात आजही उभे आहे.या सूर्य मंदिरात एक संस्कृतचा शिलालेख सापडला,

ज्यात शक संवत ८८५ मधे 'भारतीय महानाविक' वूसुलीन येऊन गेल्याची नोंद आहे.!


 रॉबर्ट बेरोन वोन हेन गेल्डर्न (१८८५ - १९६८) या लांबलचक नावाचा नामांकित ऑस्ट्रियन एंथ्रोपोलोजिस्ट होऊन गेला.हा विएन्ना विद्यापीठात शिकला.पुढे १९१० मध्ये भारत आणि ब्रह्मदेशाच्या दौऱ्यावर आला. 


भारतीयांच्या प्रगत ज्ञानाविषयी प्रचंड कुतूहल वाटले म्हणून त्याने अभ्यास सुरू केला. 


त्याने दक्षिण-पूर्व देशांबद्दल प्रचंड संशोधन केले.आणि त्याच्या पूर्ण अभ्यासाअंती त्याने ठामपणे असे मांडले की,भारतीय जहाजे,कोलंबसच्या कितीतरी आधी मेक्सिको आणि पेरूमधे जात होती!भारतीय नौकांचा प्रवास विश्वव्यापी होत होता.याचा यापेक्षा दुसरा कुठला स्पष्ट पुरावा हवा आहे..? आणि तरीही आम्ही म्हणत राहणार की अमेरिकेला कोलंबसने शोधलं आणि भारताचा 'शोध' वास्को-डी-गामा ने लावला.!! (भारतीय ज्ञानाचा खजिना - प्रशांत पोळ) मुळात वास्को-डी-गामा हाच भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला.

हरिभाऊ (विष्णू श्रीधर) वाकणकर हे उज्जैनचे प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ता.भारतातील सर्वांत प्राचीन वसाहतीचा पुरावा म्हणून ज्या 'भीमबेटका' गुहांचा उल्लेख होतो,त्या डॉ.वाकणकरांनीच शोधून काढलेल्या आहेत.


डॉ.वाकणकर त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात इंग्लंडला गेले होते.तिथे एका संग्रहालयात त्यांना वास्को-डी-गामाची दैनंदिनी ठेवलेली दिसली.ती त्यांनी बघितली आणि त्याचा अनुवाद वाचला.त्यात वास्को-डी-गामाने तो भारतात कसा पोहोचला याचे वर्णन केले आहे.वास्को-डी-गामाचे जहाज जेव्हा आफ्रिकेतील जान्जीबारला आले,तेव्हा त्याने तिथे त्याच्या जहाजाच्या तिप्पट आकाराचे मोठे जहाज बघितले.


उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..

१०/२/२४

गॅलिलिओ गॅलिली - डॉयलॉग.. Galileo Galilei - Dialogue..

गॅलिलिओला आपल्या वडिलांमुळे संगीताची गोडी लागली.ल्यूट वाद्य शिकून त्यावर त्यानं अनेक संगीत रचना केल्या.होमर,दान्ते आणि व्हर्जिल यांची काव्यं गॅलिलिओला तोंडपाठ होती.आपल्या वडिलांचं कलासक्त मन, झपाटलेपण,बंडखोर वृत्ती,पुरोगामी विचारांची कास,प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता या गोष्टींचा प्रचंड मोठा प्रभाव गॅलिलिओवर पडला.


पिसामधल्या चर्चमध्ये जायला गॅलिलिओला खूप आवडायचं.एका दंत कथेप्रमाणे १५८३ साली गॅलिलिओ फक्त १७ वर्षांचा असताना


एका रविवारी धर्मगुरूंचं पिसामधल्या कॅथिड्रलमध्ये कंटाळवाणं प्रवचन सुरू असताना त्यानं छतावर लटकणारा एक नक्षीदार दिवा बघितला.वाऱ्याच्या झोताबरोबर तो दिवाही झोके घेत होता.त्या झोक्याचं लयबद्ध मागेपुढे होणं गॅलिलिओला अचंबित करून गेलं;पण ते बघत असतानाच त्याला एकदम एक ब्रेन वेव्ह आली आणि तो नाचतच घरी आला आणि त्यानं लगेचच प्रयोगाला सुरुवात केली.त्यानं दोन वेगवेगळ्या वजनाच्या वस्तू घेतल्या.झोका लहान असो वा मोठा किंवा लंबकाचं (पेंड्युलमचं) वजन कमी असो वा जास्त,जोपर्यंत लंबकाच्या दोरीची लांबी तेवढीच राहते,तोपर्यंत त्याच्या आंदोलनाला तेवढाच वेळ लागतो असा निष्कर्ष गॅलिलिओनं प्रयोगांनंतर निरीक्षणं करून काढला.दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनासाठी लागणारा वेळ बदलतो हेही त्याला समजलं.या सगळ्या प्रयोगांसाठी त्या काळी घड्याळ नसल्यानं वेळ मोजण्यासाठी त्यानं हाताची नाडी वापरली.याच पेंड्युलमचा वापर नंतर

गॅलिलिओनं त्याचे 'गतीचे नियम' मांडण्यासाठी केला आणि याच पेंड्युलमचा वापर करून ह्यूजेन्सनं पहिलं घड्याळ बनवलं. त्या कॅथेड्रलमध्ये अजूनही एक दिवा जतन करून ठेवला आहे.तो 'गॅलिलिओचा दिवा' म्हणून आजही ओळखला जातो.


गॅलिलिओला आकिर्मिडीज आवडायचा. आकिर्मिडीजची 'युरेका युरेका' ही गॅलिलिओच्याच सुपीक डोक्यातून निघालेली दंतकथा असावी,असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे.गॅलिलिओनं आकिर्मिडीजच्या सिद्धान्ताप्रमाणे एक छोट्या आकाराचा वैज्ञानिक तराजू बनवला.गॅलिलिओनं बनवलेला हा खास तराजू (हायड्रोस्टॅटिक बॅलन्स) सर्वसामान्य तराजूपेक्षा खूपच वेगळा होता.याची खासियत म्हणजे या तराजूचा वापर करून कुणीही एखाद्या संमिश्र धातूमधल्या दोन धातूंचं नेमकं प्रमाण शोधू शकायचा.


याच वेळी ॲरिस्टॉटलला देव मानून त्याचा शब्द प्रमाण मानणाऱ्या लोकांचा गॅलिलिओला राग यायला लागला.'जड वस्तू ही हलक्या वस्तूपेक्षा जमिनीवर आधी पडते.'असं ॲरिस्टॉटलनं दीड हजार वर्षांपूर्वी मांडलेलं म्हणणं त्याला पटत नव्हतं.

ॲरिस्टॉटलच्या शब्दांची शहानिशा न करता झापडबंद समाज आणि विद्वान यांनीही ते मान्यही केलं होतं.गॅलिलिओचं म्हणणं नेमकं याच्या उलट होतं.भिन्न वजनाच्या दोन वस्तू पडताना एकाच वेळी खाली पडतात,असं त्याला म्हणायचं होतं.सत्य काय आहे हे प्रयोगानं बघायलाच पाहिजे,असं त्याच्या मनान घेतलं.अखेर त्यानं एके दिवशी याची खात्री करून घ्यायचं ठरवलं आणि दुसऱ्याच दिवशी पिसाच्या मनोऱ्यावरून जड आणि हलकी वस्तू खाली टाकून बघायचं ठरवलं. ११७४ साली बांधलेला पिसाचा मनोरा आज तर लंबरेषेपासून १७ फुट झुकलेला आहे. या मनोऱ्यापाशी गॅलिलिओनं प्रयोग बघायला बऱ्याच लोकांना बोलावलं होतं.गर्दीतून वाट काढत गॅलिलिओ स्वतः मनोऱ्याच्या दगडी भिंतीच्या आतल्या,

उभा चढ असलेल्या गोलाकार जिन्याच्या शेकडो पायऱ्या चढून वर गेला.१७९ फूट उंचीवर त्यानं एक ५० किलोचा,तर दुसरा १ किलोचा असे तोफेतले दोन गोळे ठेवले होते.गॅलिलिओनं काहीच क्षणात एकाच वेळी ते गोळे खाली सोडले. काहीच क्षणात दोन्ही तोफेचे गोळे जमिनीवर येऊन पडले;पण ते अचूकरीत्या एकाच क्षणी खाली पडले नाहीत.जेव्हा जड गोळा जमिनीवर आदळला,तेव्हा हलका गोळा जमिनीपासून २ इंचावर होता इतकंच.हा फरक हवेच्या खालून मिळणाऱ्या रेट्यामुळे आहे,असं गॅलिलिओनं सांगितलं;पण हा फरक खूपच नगण्य होता.गॅलिलिओनं १५९१ च्या सुमारास प्रयोगाच्या साहाय्यानं जड आणि हलकी वस्तू एकाच वेळी खाली पडतात,हे दाखवून दिलं आणि ॲरिस्टॉटलच्या मतांना तडा दिला.


ज्या वेळी गॅलिलिओ पडुआ विद्यापीठात प्रोफेसर होता,त्या वेळी त्याची पाओलो सार्पी, जिओव्हानी पिनेली आणि सॅग्रॅडो यांच्याबरोबर घनिष्ठ मैत्री झाली.पिनेलीच्या वैयक्तिक ग्रंथालयात ८० हजारांहून जास्त ग्रंथ होते.पिनेलीबरोबरच्या मैत्रीमुळेच गॅलिलिओला त्याच्या ग्रंथालयाचा हवा तसा उपयोग करता आला.

पिनेलीमुळे गॅलिलिओला व्हेनिसच्या शस्त्रागाराचा सल्लागार म्हणूनही काम मिळालं. अशी कामं करायला गॅलिलिओला खूप आनंद मिळत असे. त्यानं लिहिलेल्या 'डायलॉग' या पुस्तकात त्यानं याविषयी लिहिलंय.इथे असताना त्यानं किल्ल्यांची तटबंदी या विषयावर एक प्रबंध लिहिला.तसंच १५९४ मध्ये त्यानं शेतीला पाणीपुरवठा करणारं एक यंत्र बनवलं आणि व्हेनिसमध्ये त्याचं चक्क पेटंटही घेतलं पेटंट कायद्याच्या इतिहासात पेटंट मागणाऱ्या पहिल्या काही संशोधकांमध्ये गॅलिलिओ मोडतो.इतकंच काय,पण गॅलिलिओनं जहाजबांधणीतले अनेक प्रश्न भौतिकशास्त्राच्या मदतीनं सोडवले,लष्कराच्या कामातही त्यानं आपल्या बुद्धीचा प्रत्यय दाखवला.तोफेच्या गोळ्याचा अचूक मारा करण्यासाठी तोफ किती अंशाच्या कोनात ठेवायला हवी हे त्यानं गणिताच्या मदतीनं शोधून काढलं.गॅलिलिओचा मित्र संग्रॅडो खूप श्रीमंत असल्यामुळे गॅलिलिओला पैशांची चणचण भासायला लागली की तो त्याची प्रतिष्ठा वापरून त्याचा पगार वाढवण्याचं काम करत असे,जेव्हा गॅलिलिओनं 'डायलॉग' आणि 'डिसकोर्सेस' हे दोन ग्रंथ लिहिले त्यात आपल्या या जिज्ञासू आणि बुद्धिमान मित्राची आठवण म्हणून त्याच्याच नावाचं पात्र निर्माणकरून त्याला साहित्यविश्वात अजरामर केलं.


 १५९३ साली गॅलिलिओनं भौतिक- शास्त्रातलं अत्यंत उपयोगी असं तापमापक ( थर्मामीटर) हे साधन पाण्याचा वापर करून बनवलं.त्यानंतर काही वर्षांनतर गॅलिलिओनं पाण्याऐवजी वाइनचा वापर केला;पण नंतर १६७० मध्ये पाऱ्याचा वापर करण्यात आला; पण थर्मामीटरच्या कल्पनेचा जनक म्हणून गॅलिलिओचंच नाव घ्यावं लागेल.या काळात त्यानं गोलभूमिती,तरफ,पुली,

स्क्रू या विषयांवर निबंध लिहिले.गॅलिलिओनं वेग (व्हेलॅसिटी) याची कल्पना वैज्ञानिक परिभाषेत मांडली. गॅलिलिओनं बल किंवा जोर (फोर्स) याचीही कल्पना मांडली.कुठलाही पदार्थ जोपर्यंत आपण त्यावर बाहेरून कुठलाही जोर लावत नाही तोपर्यंत त्याच वेगानं प्रवास करत राहतो. ही त्याची नैसर्गिक प्रवृत्तीच असते,असं गॅलिलिओनं मांडलं. यानंतर कुठलीही वस्तू आपल्या जागेवरून हलायला जो प्रतिकार करते त्याला गॅलिलिओ 'जडत्व (इनर्शिया)' असं म्हणे.गॅलिलिओच्या या विचारांवर आणि नियमांवरच पुढे न्यूटननं त्याचे गतीचे नियम विकसित केले.गॅलिलिओनं उच्चतम प्रतीचा एक कंपास बनवला होता.तो समुद्री यात्रा करणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरला.त्यानं आपल्या हयातीत सूक्ष्मदर्शक,पेंड्युलमचं घड्याळ,खूप कमी वजन मोजण्यासाठी केलेला तराजू आणि पंप अशा अनेक गोष्टींचे शोध लावले.


१६०९ साली गॅलिलिओनं दुर्बीण (टेलिस्कोप) बनवली आणि मग त्यानं अशा दुर्बिणी (टेलिस्कोप्स) विकायला सुरुवात केली.मग हे टेलिस्कोप्स इतके लोकप्रिय झाले की,ते घरोघरी दिसायला लागले आणि प्रतिष्ठेचा भागही बनले. याच दुर्बिणीतून गॅलिलिओच्या जागी दुसरा कोणी असता तर त्यानं लांबवरून येणारं जहाज बघितलं असतं;पण त्याऐवजी त्यानं आपली दुर्बीण फक्त आकाशाकडे वळवली आणि त्या क्षणापासून संपूर्ण विज्ञानाचा आणि खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला! या दुर्बिणीतून गॅलिलिओनं चंद्रावरचे डोंगर, दऱ्या,विवरं अशा अनेक गोष्टी न्याहाळल्या. चंद्रावर दिसणारे डाग हे डाग नसून तिथल्या डोंगराच्या पडणाऱ्या सावल्या आहेत हे गॅलिलिओला जाणवलं.या सगळ्या शोधांवर मग गॅलिलिओनं 'द स्टारी मेसेंजर' नावाचं पुस्तकही लिहिलं.१६१० साली गॅलिलिओनं गुरुच निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे उपग्रह आणि चंद्र शोधून काढले.गुरूला आणखी उपग्रह आहेत ही गोष्ट त्या काळी कोणालाच ठाऊक नव्हती;पण गॅलिलिओनं आपल्या दुर्बिणीतून गुरूच्या भोवती फिरत असलेले चार चंद्र शोधले. गुरूभोवतीचे चंद्र बघून,चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीयेत,त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचं कारण नाही, हे कोपर्निकसचं म्हणणं बरोबर असलं पाहिजे,'असं त्याचं ठाम मत झालं. या पुस्तकामुळे गॅलिलिओ रातोरात चक्क हिरो बनला;पण पृथ्वीला केंद्रस्थानी मानणाऱ्या चर्चला गॅलिलिओचं म्हणणं पटणंच शक्य नव्हतं. त्यामुळे 'चंद्रावरचे पर्वत,डाग आणि दुर्बिणीतून दिसणाऱ्या इतरही गोष्टी खऱ्या नसून त्या दिशाभूल करणाऱ्या आहेत,'असंच चर्च म्हणायला लागलं.


८ जानेवारी १६४२ रोजी गॅलिलिओ मृत्युमुखी पडला.खेदाची गोष्ट ही की,पोप रागावेल म्हणून १७३७ सालापर्यंत म्हणजे शंभरएक वर्षं गॅलिलिओचं स्मारकसुद्धा उभं राहिलं नाही. विसाव्या शतकातला प्रसिद्ध जर्मन नाटककार बॉल्ड ब्रेख्त याच्या लेखणीतून साकारलेलं 'द लाइफ ऑफ गॅलिलिओ' हे नाटक गॅलिलिओच्या आयुष्याच्या दुसऱ्या कालखंडावर भाष्य करतं. पुढे १९७५ मध्ये याच नाटकावर आधारित 'गॅलिलिओ' नावाचा चित्रपटही निघाला.


एखाद्या पदार्थांचे गुणधर्म प्रयोगाच्या आधारानं मांडताना गॅलिलिओनं गणिताचा आधार घेतला आणि या विषयाचं महत्त्व अधोरेखित केलं. आपलं कुतूहल फक्त 'का?' विचारून थांबायला नको,तर 'कसं?' असा प्रश्नही आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि त्या दिशेनं शोध घेतला पाहिजे,अस तो म्हणे.


कोणतीही गोष्ट प्रयोगानं सिध्द केल्याशिवाय त्यानं खरी मानली नाही. त्यामुळेच गॅलिलिओला पहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल.


गॅलिलिओच्या मृत्यूनंतर तब्बल ३४० वर्षांनी म्हणजे १९८२ साली 'सूर्य आणि पृथ्वी यांच्यापैकी कोण कुणाभोवती फिरतो याविषयीची जुनीच केस पुन्हा चर्चमध्ये उभी राहिली.मग त्यावर १० वर्षं विचार आणि उलटसुलट वाद-प्रतिवाद झाले.शेवटी सगळे पुरावे बघून १९९२ साली एकदा कुठे पोप पॉल दुसरे यांनी 'गॅलिलिओला चांगली वागणूक मिळाली नाही आणि पृथ्वीच (सूर्याभोवती) फिरते' हे कबूल केलं. तेव्हा ही बातमी 'न्यू यॉर्क टाइम्स'च्या मथळ्यावर झळकली

होती!त्याअगोदर तीन वर्ष म्हणजे १९८९ साली झेप घेतलेलं 'गॅलिलिओं' नावाचं अंतराळयान १९९५ साली जेव्हा गुरूपर्यंत पोहोचलं तेव्हा विसाव्या शतकानं गॅलिलिओला केलेला तो सलामच होता! गॅलिलिओच्याच दुर्बिणीनं याच गुरूभोवती फिरणारे चार चंद्र बरोबर ३८५ वर्षांपूर्वी टिपले होते!गॅलिलिओ,

त्याचं विपुल लेखन आणि विशेष म्हणजे त्याचा 'डायलॉग' हा ग्रंथ याचे ऋण जगातला कुठलाही माणूस कधीच विसरू शकणार नाही, हे मात्र खरं!


'का?' असं विचारून थांबायला नको,तर 'कसं?' असा प्रश्नही स्वतःला विचारला पाहिजे आणि त्या दिशेनं शोध घेतला पाहिजे.कोणतीही गोष्ट प्रयोगानं सिद्ध केल्याशिवाय खरी मानू नका.


०६.०२.२४ या लेखातील शेवटचा भाग…


तळटिप - हूशार माकड गब्बरसिंग हा 

०६.०२.२४ रोजी लिहिलेला लेख सोयरे वनचरे-अनिल खैर मधून घेतला होता.

Clever Monkey Gabbarsingh ..|


८/२/२४

हूशार माकड गब्बरसिंग / Clever Monkey Gabbarsingh ..|

२००० सालची गोष्ट असेल.एका बुधवारी आम्ही माझ्या ऑफिसमध्ये आठवडाभराच्या कामांचं नियोजन करत होतो.तेवढ्यात भोसरीच्या एम.एस.ई.बी.ऑफिसमधून माकडाचा कॉल आला.माकडाचा कॉल म्हणजे माकडाने केलेला कॉल नव्हे,तर वस्तीत शिरलेल्या माकडाच्या बंदोबस्तासाठी नागरिकांनी केलेला कॉल! त्या दिवशी आम्ही सगळेच बिझी होतो.त्यामुळे त्या कॉलवर एकट्या नेवाळेला पाठवलं;पण नेवाळे माकडाला बरोबर न घेता फक्त परिस्थितीचा अंदाज घेऊन परतला. तेव्हाच लक्षात आलं की प्रकरण वेगळं आहे.भोसरीत फिरणारं हे माकड आमच्या मंकी हिलच्या माकडांसारखं बॉनेट जातीचं माकड नव्हतं.ते होतं लाल तोंडाचं हिसस जातीचं माकड.प्हिसस माकडांचं वास्तव्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये असतं.या माकडांची शेपूट आखूड असते.त्याचं तोंड आणि ढुंगण लालसर असतं.बॉनेट माकडापेक्षा ते स्वभावाने आक्रमक असतं.त्यामुळे त्याला पकडणं सोपं काम नव्हतं.दुपारी माकड पकडण्याचं सामान घेऊन आम्ही तयारीनिशी भोसरीला गेलो.


तेव्हा महाराजांना झाडावर चांगलीच डुलकी लागली होती.त्यांची वामकुक्षी पूर्ण होईपर्यंत तिथेच बसून राहिलो.

झोप झाल्यावर माकड झाडावरून खाली उतरलं.त्याचा अंदाज घेण्यासाठी आम्ही एका ओट्यावर थोडी फळं ठेवली.त्या फळांकडे साफ दुर्लक्ष करून ते तीन पायांवर उड्या मारत कुठे तरी पसार झालं. त्याच्या गळ्याला बांधलेली साखळी त्याने पुढच्या उजव्या हाताला गुंडाळून घेतली होती. साखळी कुठे अडकू नये किंवा तिला धरून कुणी आपल्याला पकडू नये म्हणून त्या हुशार माकडाने ही युक्ती शोधून काढली होती.


थोड्या वेळाने पाहिलं,तर हातात साखळी गुंडाळलेल्या अवस्थेत ते माकड हायटेन्शन वायरच्या खांबावर चढताना दिसलं.त्यामुळे आमचंही टेन्शन वाढलं.इलेक्ट्रिकचा शॉक बसून मेलेली माकडं मी खूप वेळा पाहिली होती.आता या माकडाचा प्रवास त्याच दिशेने सुरू होता.त्याला हुसकावण्याचाही काही उपयोग होत नव्हता. खांबावर वरपर्यंत चढून ते थोडा वेळ थांबलं.

आम्हाला वाटलं,आता उतरेल खाली;पण उलट त्याने हवेत उंच झेप घेऊन थेट ट्रान्सफॉर्ममरवरच उडी मारली.हे सगळं उजव्या हातातला साखळीचा गोळा सांभाळत.त्या महाकाय ट्रान्सफॉर्ममरमधून आजूबाजूच्या कारखान्यांना वीजपुरवठा करणाऱ्या अजस्त्र वायरी जोडलेल्या होत्या. त्यातल्या एका जरी केबलला त्याचा किंवा त्याच्या हातातल्या साखळीचा स्पर्श झाला असता तर? कल्पनाच करवत नाही.खाली जमलेल्या शे-दीडशे बघ्यांबरोबर आमचीही भीतीने गाळण उडाली.


पण माकड मात्र अत्यंत शांत होतं.एखाद्या ज्ञानी योग्याप्रमाणे ते आत्मविश्वासाने फिरत होतं.नशिबाने थोड्या वेळाने ट्रान्सफॉर्मरचा नाद सोडून ते पुन्हा झाडावर येऊन विसावलं.खाली जमलेले बघे हळूहळू पांगू लागले.अंधार झाला आणि आम्हीही माघारी फिरलो.


दुसऱ्या दिवशी गुरुवार होता.भोसरी परिसरातल्या कारखान्यांच्या सुटीचा वार. गुरुवारी अनेकदा वीजपुरवठाही दिवसभर खंडित केला जातो.वीज- तारांजवळ वाढणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्याचं काम केलं जातं. त्यामुळे आज माकडाला धोका थोडा कमी होता. पार्कवरचं काम उरकून आम्ही दुपारी पुन्हा भोसरीला गेलो.काल ओट्यावर ठेवलेली फळं गायब झाली होती.ती माकडाने खाल्ली की आणखी कुणी लंपास केली कळायला मार्ग नव्हता.आज पुन्हा केळी आणि सफरचंद ठेवून आम्ही माकडावर लक्ष ठेवून लपून बसलो. मोठ्या रुबाबात गळ्यातली साखळी सांभाळत दोनच मिनिटांत ते माकड झाडावरून खाली उतरलं.

केळ्यांचा घड घेऊन ते पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्मरवर जाऊन बसलं.तीन-चार केळी त्याने सोलून खाल्ली,उरलेली फेकून दिली आणि खाली येऊन सफरचंद घेऊन झाडावरच्या त्याच्या मुक्कामी जाऊन बसलं.

संध्याकाळपर्यंत खाली आलंच नाही.आम्ही पुन्हा एकदा माघारी निघालो.दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा भोसरी गाठलं.आज त्या माकडाला पकडायचं असं ठरवून आम्ही पिंजरा घेऊन गेलो होतो.आम्ही गेलो तेव्हा ते नेहमीप्रमाणे ट्रान्सफॉर्मरवरून उड्या मारत फिरत होतं.आम्ही तत्परतेने पिंजरा लावला.आमिष म्हणून त्यात सफरचंद लावलं. चांगली तीन वेळा ट्रायल घेतली.तीनही वेळा ट्रायल अयशस्वी झाली.माकड पकडण्यासाठी हा विशिष्टप्रकारचा पिंजरा आम्हीच विकसित केलेला होता.हा पिंजरा दीड फूट रुंद,दोन फूट उंच आणि तीन फूट लांब असतो.त्याच्या झडपेची उघडझाप वरच्या बाजूने होते. पिंजऱ्याच्या वरच्या बाजूला एक सरकती सळई असते.लोखंडी पिंजऱ्याच्या आतमध्ये जाणारा एक हुक तिच्या एका टोकाला जोडलेला असतो. त्यावर एखादं फळ घट्ट दाबून अडकवायचं. सळईच्या दुसऱ्या टोकाशी झडप जोडलेली असते.झडपेला एका स्प्रिंगने ताणून सळईच्या दुसऱ्या टोकाच्या तोंडाशी अलगद उघडून लॉक करायचं असतं.फळाच्या आमिषाने माकड आत घुसून फळ ओढू लागतं,तेव्हा सळईच्या दुसऱ्या टोकामधून झडप मोकळी होऊन स्प्रिंगच्या ताकदीने मिटली जाते आणि बंद होते. पिंजऱ्याच्या आकारात आणि आमिषाच्या प्रकारात थोडेफार बदल करून अशाप्रकारे प्राणी पकडता येतात.तो पिंजरा लावला आणि आम्ही परत पार्कवर आलो.माकड अडकलं की आम्हाला फोन करा,असं आसपासच्या लोकांना बजावून ठेवलं.दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत भोसरीतून फोन आला नाही म्हणून तिथे गेलो,तर पिंजरा रिकामाच होता. 


दरम्यान,माकडाने जवळच्या वस्तीत आणि शाळेत धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. मुलांच्या डब्यांतील खाऊ पळवणं,मुलींच्या वेण्या ओढणं,

बोचकारणं असे उद्योग सुरू होते.त्यानंतर चार दिवस झाले तरी माकड काही त्या पिंजऱ्याकडे फिरकलं नाही.अनेक आमिषं बदलून पाहिली;माकड काही केल्या पिंजऱ्यात येईना.चार-पाच दिवस असेच गेले.मर्कटलीला वाढू लागल्या.शेवटी त्याला भुलीचं इंजेक्शन देऊन पकडण्याशिवाय पर्याय उरला नाही.हे इंजेक्शन पंचवीस-तीस फुटांवरून देता येतं. यासाठी विशिष्ट प्रकारची फुंकनळी वापरली जाते.तिला ब्लो-पाइप म्हणतात.

त्यामुळे औषधासहित अख्खी सिरींज प्राण्यापर्यंत पोहोचते आणि टोकदार पोकळ सुईतून भुलीचं औषध हवेच्या दाबाने प्राण्याच्या शरीरात टोचलं जातं.एकदा ठरल्यावर सगळी तयारी करून भोसरी गाठलं.माकड त्याच्या नेहमीच्या झाडावर बसलं होतं.पशुवैद्यांच्या सूचनेनुसार भुलीचं औषध भरून मी सिरींज ब्लो-पाइपमध्ये लोड केली.माकड बेसावध आहे,असं बघून नेम धरून फुंकली;पण तेवढ्या वेळात काही तरी वेगळं घडतंय हे त्या चलाख माकडाला कळलं.सिरींज फुंकताना मी त्याच्या खांद्याचा नेमका वेध घेतला होता;पण सिरींज खांद्यापर्यंत पोहोचण्याआधी माकडाने अत्यंत चपळाईने खाली उडी मारली. सिरींज खांद्याला लागण्याऐवजी झाडात शिरली. आम्हाला हुलकावणी देण्यात माकड पुन्हा एकदा यशस्वी झालं.पिंजरा आणि भुलीचं इंजेक्शन हे दोन्ही प्रयत्न माकडाने हाणून पाडले होते.आजवर मी अनेक माकडं पकडली,पण याच्याएवढं हुशार माकड कधी भेटलं नव्हतं.ते आम्हाला आता चांगलंच ओळखू लागलं होतं. आमची गाडी दूरवर दिसली तरी ते आम्ही पोहोचू शकणार नाही एवढ्या उंचीवर जाऊन आमची गंमत बघत असे.दरम्यान,आता या माकडाच्या कारवाया शहरभर समजू लागल्या होत्या.वन विभागाबरोबरच आयुक्तांकडेही तक्रारी होऊ लागल्या होत्या.पालिकेच्या जनरल बॉडीमध्येही हा विषय निघाला आणि एक साधं माकड पकडू शकत नसल्याबद्दल आमच्यावर खूप टीकाही झाली.आम्ही तर पूर्णच हताश झालो होतो.

अशातच एक आशेचा किरण दिसला.मिरजेमध्ये शेख आडनावाचे काही मुस्लिम बांधव माकड पकडण्यात तरबेज असल्याचं समजलं.त्यांच्यापैकी शब्बीर हनीफ शेख यांच्याशी फोनवर चर्चा झाली.


थोडीफार घासाघीस करून माकड पकडण्यासाठी ते तयार झाले.वरिष्ठांच्या आणि वन विभागाच्या परवानगीने मी त्यांच्यावर हे काम सोपवलं.शब्बीर शेख यांच्याकडे माकड पकडण्याची कला कुठून आली ही एक वेगळीच गोष्ट.थोडं विषयांतर करून थोडक्यात सांगतो.नाथ संप्रदायातील एक योगी काही काळ मिरजेत मुक्कामी होते.गाव सोडून निघताना त्यांना अवगत विद्या त्यांनी गावकऱ्यांना शिकवल्या. माकड पकडण्याची विद्या शिकायला कोणीही हिंदू बांधव पुढे आला नाही.शेख कुटुंबीयांनी मात्र ती शिकण्याची तयारी दर्शवली,असं शब्बीर शेख यांच्याकडून कळलं.


शब्बीरभाईंनी आल्यावर माकडाची सगळी चौकशी केली.आम्हीही छोटे छोटे तपशील त्यांना सविस्तर सांगितले. ते म्हणाले, "हे नक्कीच अतिशय हुशार माकड आहे.त्यामुळे तुमच्यापैकी कुणीही त्याला माझ्यासोबत दिसता कामा नये. काय करायचं ते मी करेन." म्हटलं,

मान्य.दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना घेऊन भोसरी गाठली. मुक्कामाच्या बरीच अलीकडे गाडी थांबवली. भरभर चालत शब्बीरभाई पुढे निघाले.त्यांनी आम्हालाही थोडं लांबून त्यांच्या मागे येत राहण्याची खूण केली.

आम्हाला पाहून माकड इकडे-तिकडे उड्या मारू लागलं.पण शब्बीरभाई आमच्यासोबत आहेत हे मात्र त्याला कळलं नाही.शब्बीरभाईंनी बऱ्याच वेळ त्या माकडाचं निरीक्षण केलं आणि आम्ही पार्कवर परतलो. परतल्यावर पुन्हा चर्चा सुरू.शब्बीरभाई म्हणाले, "माकड चालाक आहे.एकदा का माझा प्रयत्न फेल गेला,तर नंतर ते माकड कोणाच्या बापालाबी हाती लागणार न्हाई.तेव्हा एक-दोन दिवस मी फक्त वॉच ठेवतो आणि बराबर टायमाला पकडतो." त्यांच्या प्लॅनला हो म्हणण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता.


शब्बीरभाईंनी पार्कवरच मुक्काम केला. भोसरीला ते बसने जात-येत.आम्ही आमिषासाठी त्यांना फळं,काजू,

बदाम,पिस्ते वगैरे देऊ केलं;पण त्यांनी हसून ते सगळं बाजूला ठेवलं.तिसऱ्या दिवशी त्यांनी लाकडी फळ्या एकमेकांना जोडून छोटासा तात्पुरता पिंजरा तयार केला आणि भाड्याचा टेम्पो घेऊन माकडाकडे गेले.आम्ही खूप लांबवरच गाडी थांबवून ते काय करतात पाहत होतो.

त्यांच्या हातात एक मक्याचं कणीस होतं.कणीस पुढे करत ते थेट माकडासमोरच जाऊन उभे राहिले. त्यांनी तयार केलेला पिंजरा तिथेच बाजूला ठेवला होता;पण ते नटखट माकड पळून जाण्याऐवजी आज्ञाधारक मुलासारखं त्यांच्यासमोर आलं.माकडाशी ते काही तरी बोलत होते.माकडाने एकदाच बावरून इकडे-तिकडे पाहिलं आणि ते शब्बीरभाईंच्या आणखी जवळ आलं.

त्यांनी माकडाला पिंजऱ्यात जाण्याची खूण केली.

कदाचित तोंडानेही काही बोलत असावेत.माकड पटकन पिंजऱ्यात शिरलं.बक्षीस म्हणून त्यांनी हातातलं कणीस त्याला दिलं आणि पिंजऱ्याचं फळकुट बंद केलं.

आमच्याकडे पाहून ते हसले आणि म्हणाले, 'गब्बरसिंग मिल गया!' पुढे त्याचं नाव गब्बरसिंगच पडलं.आमच्या पार्कवरचं ते पहिलं 'न्हिसस' माकड! शब्बीरभाईंनी त्याच्यावर कोणती जादू केली ते आम्हाला कळलं नाही. 


त्यांच्या गुरूने शिकवलेल्या विद्येचं गुपित ते आम्हाला सांगणार नाहीत,हे उघडच होतं. कदाचित देहबोली आणि थेट संवाद यातून त्या माकडाला काही संदेश गेला असावा. कोण जाणे!