३० सप्टेंबर, १८७८ रोजी निर्णय झाला की आवाजाची दिशा…शिल्लक भाग पुढे सुरु…!
न ओळखता येईल अशा त-हेने बोलण्याचा हा फारच सुंदर प्रयोग होता म्हणून.माणसाचा आवाज कोणत्याही धातूतून काढणे ही केवळ अशक्य गोष्ट आहे.या विद्वानांना फक्त एकच गोष्ट माहिती नव्हती.अमेरिकेत या शोधाचे पेटंट १९ फेब्रुवारी १८७८ रोजीच एडिसनला देण्यात आले होते.
२६ फेब्रुवारी,१८६१ रोजी लाइपझिग येथे योहान फिलीप रीस याने टेलिफोनचे पहिले प्रात्यक्षिक दाखवले.१८६४ मध्ये फ्रैंकफुर्ट येथे शास्त्रज्ञांच्या परिषदेत त्याने त्याचा उपयोग दाखवला.त्यावेळी त्याला वाक्येच्या वाक्ये मात्र प्रक्षेपित करता आली नाहीत. तरीही हा शोध किती क्रांतीकारक ठरेल हे लक्षात यावे इतका तो निश्चितच यशस्वी झाला होता.पण त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले.
१८७२ मध्ये सर्व संशोधनांचा इतिहास म्युनिखमध्ये लिहिला गेला त्यात रीसचा उल्लेखही नव्हता. 'टेलिफोन' या त्यानेच तयार केलेल्या शब्दाचाही त्यात उल्लेख नव्हता.सर्व जण त्याचे संशोधन कायमचे विसरूनही गेले असते पण त्याच वर्षी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने टेलिफोनचे सुधारलेले उपकरण शोधले आणि 'टेलिफोनचा जनक' म्हणून जगात त्याची कायमची नोंद झाली.
रीस हा कंगाल अवस्थेत दोन वर्षांनी मरण पावला. त्याच्या शोधाचा उपयोग त्याला कधीच झाला नाही. प्रत्येक टेलिफोनमागे फक्त एक पेन्स एवढी रॉयल्टी त्याला मिळाली असती तरी तो जगातला एक श्रीमंत माणूस बनला असता.
गिलोटीनवर मरण पावलेला लव्हायझ्ये सायन्स अकॅडमीचा एक संचालक, खजिनदार व बँक मॅनेजरही होता.याशिवाय आधुनिक रसायनशास्त्राचा तो जनक समजला जातो.त्याने शेकडो वर्षे खऱ्या वाटत असलेल्या समजुती खोट्या पाडल्या.हवेचे वेगवेगळे घटक कोणते ते सांगून,पाणीसुद्धा आणखी ज्याचे घटक पाडता येत नाही असा पदार्थ (Element) नसून दोन घटकांच्या सहाय्याने बनलेला पदार्थ (Compoun) आहे असे त्याने जाहीर करून टाकले.या त्याच्या 'उद्धटपणामुळे' एका सदस्याने खवळूनच सायन्स अकॅडमीच्या सभेत सांगितले की,मूलद्रव्ये २००० वर्षांपूर्वीच शोधली गेली आहेत.प्रत्येक शतकात शास्त्रज्ञांनी त्यांची फेरतपासणी केली आहे.लव्हायझ्ये आता पाणी आणि वायू हे निरनिराळे घटक बनून झालेले पदार्थ आहेत असे सांगायला लागला तर आजपर्यंतचे सर्व संशोधन मातीमोल ठरेल.लोकांचा संधोधनावरचा विश्वासच ढळेल.
वाफेवर चालणारे पहिले इंजिन जॉर्ज स्टीफन्सन याने १८१४ मध्ये बांधले;पण या शोधाचे दूरगामी परिणाम लक्षात यायला राजकीय नेत्यांनासुद्धा ७ वर्षे लागली. पार्लमेंटमध्ये नवीन रेल्वे बांधण्याच्या प्रस्तावावर त्याला कुणी बोलूच देईना.
वाफेचे इंजिन रेल्वेमार्गावरील घरांना आगी लावील,त्या आवाजाने लोक वेडे होतील,रेल्वे मार्गावरील जमिनींची किंमत कमी होईल असे अनेक मुद्दे निर्माण करण्यात आले.
पण काही वेळा अनेक शास्त्रज्ञ आपल्या सहकाऱ्याचा एखादा शोध मातीमोल ठरवत असताना राजकीय नेते मात्र अशा शोधांनी होणारी क्रांती,होणारे परिवर्तन लक्षात घेऊ शकतात. १८२१ मध्ये पार्लमेंटने ३६ विरुद्ध ३५ मतांनी लिव्हरपूल ते मॅन्चेस्टर हा मार्ग बांधायला परवानगी दिली; तरीही आता अनर्थ माजायची वेळ आली आहे असे इतर शास्त्रज्ञ म्हणतच राहिले.
अगदी विद्वान असे सायन्स अकॅडमीचे सदस्य सुद्धा काही वेळा अगदी आश्चर्यकारक चुका करतात.ज्या रूढींचा वर्षानुवर्षे पगडा बसलेला असतो,त्यांचा त्याग तेसुद्धा करू शकत नाहीत.
क्रांतिकारक शोधांच्या जनकांना फार मोठे अपमान सहन करावे लागतात. त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांच्या शोधाचे महत्त्व जगाला समजते अशी अनंत उदाहरणे आहेत.
पण मांडलेल्या सिद्धान्तांची दृष्य फळे पाहू शकलेला व ते सिद्धांत प्रत्यक्षात उतरलेले पाहिलेला एक शास्त्रज्ञ म्हणजे 'अंतराळ युगाचा जनक' म्हणून मानला गेलेला हर्मन ओबेर्थ!
१९१७ मध्येच हर्मन ओबेर्थ याने १० टन वजन अंतराळात नेऊ शकेल अशा २५ मीटर लांबीच्या आणि ५ मीटर व्यासाच्या अग्निबाणाचा आराखडा बनवला. ऑक्सिजन आणि अल्कोहोल यांचे मिश्रण इंधन म्हणून वापरले जाईल असेही तो म्हणाला आणि तात्काळ इतर शास्त्रज्ञांच्या कुचेष्टेचा विषय ठरला.असा अग्निबाण कधीच आकाशात उडणे शक्य नाही असे टीकाकार सर्वांच्या कानीकपाळी ओरडत राहिले.
१९२३ मध्ये Rockets to Planetary Space आणि १९२९ मध्ये Ways to Spaceships' Travel's अशी अगदी भविष्यसूचक पुस्तके त्याने लिहिली.आता त्याच्यावरची टीका अगदी जहरी बनली होती.माणसाचे अस्तित्वच नष्ट होण्याची जेव्हा पाळी येईल तेव्हाच अंतराळप्रवास बहुतेक शक्य होईल असे अनेकांनी प्रतिपादन केले.ओबेर्थने मात्र कधीच कुणाची पर्वा केली नाही.आज आता अग्निबाण या विषयावर जास्त काही सांगण्याची आवश्यकताच दिसत नाही. त्याच्या सिद्धांतावर आधारलेली त्याची सर्व भविष्ये खरी ठरत आहेत.मानव जातही काही नष्ट झालेली नाही.
आता त्याच्यावर अफाट टीका करणाऱ्यांचा शब्दही ऐकू येत नाही.त्याच्या सिद्धांताचे यश बघण्याचे भाग्य ओबेर्थला लाभले ही आनंददायक घटना आहे.असे नशीब फार थोड्यांच्या वाट्याला आले आहे.
हा सर्व इतिहास लक्षात घेऊन आपल्या सिद्धांतालाही कडाक्याचा विरोध होणार याची डॅनिकेन यांना पूर्ण कल्पना आहे.प्रचलित समजुतींच्या संपूर्णतःविरोधी विचार कोणी मांडला तर जगाची उपजत प्रवृत्ती अशा विचाराला थारा न देण्याचीच असते हे त्यांनाही माहीत आहे.पण ते म्हणतात,काही काही गोष्टींबद्दलची मते मानवाला बदलायला लागली नाहीत का? पृथ्वी गोल आहे किंवा ती सूर्याभोवती फिरते असे ६०० वर्षांपूर्वी जे म्हणत होते त्यांची गणना वेडगळ लोकांतच व्हायची.वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यावरसुद्धा लिव्हरपूल ते मॅन्चेस्टर हा पहिला रेल्वेमार्ग बांधायला ७ वर्षे विरोध होत होता. टेलिफोनवरून जगातील एका भागातून दुसऱ्या भागाशी संपर्क साधता येईल या गोष्टीवर तरी किती जणांचा विश्वास होता? आणि या सर्व गोष्टींबद्दल आज काय परिस्थिती आहे?
म्हणूनच ते म्हणतात की माझा सिद्धांत चुकीचा वाटत असेल तर मी मांडलेल्या सर्व गोष्टींना पर्यायी स्पष्टीकरण द्या.दुर्लक्ष करून मी सांगितलेल्या गोष्टींचे अस्तित्व नाहीसे होणार नाही.हल्लीचे युग विज्ञानयुग आहे.तेव्हा तंत्रज्ञ लोकच मी सांगितलेल्या अनेक मुद्द्यांच्या शक्याशक्यतेची शहानिशा समर्थपणे करू शकतील. तेव्हा इतिहासकार,उत्खनन शास्त्रज्ञ या सर्वांनी सर्व शास्त्रातील तंत्रज्ञांचा सल्ला घेऊन मानवी इतिहासाकडे पुन्हा नजर टाकायला हवी आणि आवश्यक असेल तर तो इतिहास संपूर्ण बदलायला हवा.
इजिप्तच्या अगदी पुराणकालीन चित्रलिपीतील तीन कोरीव शब्दांचा अर्थ आता लागला आहे.'मला उडायचे आहे.' या भाषांतराबद्दल इजिप्तचे तज्ञ जास्त काही बोलायला तयार नाहीत.ते भाषांतर त्यांनीच केलेले असूनही!
१८९८ मध्ये सक्करजवळील एका थडग्यात एक प्रतिकृती सापडली.त्याच्यावर पक्षी अशी चिठ्ठी डकवून कैरो येथील म्युझियममध्ये ती ठेवली गेली.पुरी सत्तर वर्षे! पुराणकालीन इतर शेकडो वस्तुंमधला हा एक पक्षी.१९६९ मध्ये डॉ.खलील मेसिया यानी हा पक्षी पाहिला.त्यांची नजर खिळली ती त्याच्या सरळ पंखांवर, उंच आणि सरळ शेपटीवर.त्यानी त्या पक्षाचे नीट निरीक्षण केले.त्याच्यावर काहीतरी कोरलेले होते.त्या अक्षरांचा अर्थ होता 'अमॉनची भेट !'
अमॉन कोण होता? इजिप्तचा वायुदेव ! डॉ.खलील यांचे कुतूहल चाळवले गेले.परिणाम?
आज तो 'पक्षी नाही तर विमानाची प्रतिकृती आहे' हे सर्वमान्य आहे.
तज्ञांनी तपासणी करून अशा त-हेने बांधलेले विमान उडू शकेल याची खात्री करून घेतली आहे.
या घटनेनंतर इजिप्शियन सरकारने एक तज्ञ समिती नेमून म्युझियममधील सर्वच 'पक्ष्यांच्या' प्रतिकृतींचा नव्याने अभ्यास केला.१२ जानेवारी,१९७२ रोजी प्राचीन इजिप्तच्या विमानांच्या प्रतिकृतींचे पहिले प्रदर्शन भरविण्यात आले.त्यात १४ पक्षी आता मांडून ठेवण्यात आले आहेत.विमानांच्या प्रतिकृती म्हणून!
जोसेफ ब्लुमरिच हा हंटस्व्हिले,अलाबामा येथील अमेरिकेतील राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेचा (नासा) एक तंत्रज्ञ.
अग्निबाण तंत्राबद्दलची अनेक पेटंटस् त्याच्या नावावर आहेत.
सॅटर्न आणि अपोलो रॉकेटस्स् वरील त्याच्या असाधारण कामगिरीबद्दल खास पदक देऊन अमेरिकन सरकारने त्याचा गौरवही केला आहे.लेखकाचे पहिले पुस्तक वाचल्यावर तो खवळला पण हाडाचा तंत्रज्ञ असल्याने त्याने पुराव्यानिशी लेखकाचे म्हणणे खोडून काढायचे ठरविले.बायबल विकत घेऊन त्याने इझिकेलची प्रवास वर्णने वाचायला सुरुवात केली.ती वाचता वाचता त्यात तो इतका रंगला की त्याने त्या वर्णनांप्रमाणे आराखडे बनवले,आलेख काढले,गणिते केली आणि तो अशा निर्णयाला पोहोचला की इझिकेलची अंतराळयाने अगदी शक्य कोटीतील आहेत.फक्त विज्ञानातील तेवढा टप्पा गाठायला आपल्याला अजूनही ५०-६० वर्षे आहेत.इझिकेलने वर्णन केलेल्या अंतराळयानाचा संबंध पृथ्वीभोवती भ्रमण करणाऱ्या अंतराळयानाशी होता; असाही निष्कर्ष त्याने काढला आहे.अपोलो ११ हे मुख्य यान चंद्राभोवती फिरत होते आणि चंद्रयानातून नील आर्मस्ट्राँग आणि एडविन आल्ड्रीन चंद्रावर उतरले तसाच हा प्रकार.थक्क करणारी गोष्ट ही की २५०० वर्षांपूर्वी हे सर्व घडले होते.यानंतर ब्लुमरिच याने स्वतःच एक 'इझिकेलची अंतराळयाने' (The Space-ships of Ezekiel) नावाचे एक पुस्तक लिहिले व त्यात त्याच्या संशोधनाचे निष्कर्ष मांडले.
डॅनिकेनचे म्हणणे खोडून टाकायला निघालेल्या ब्लुमरिच याने त्याच्या म्हणण्यात खरोखरच तथ्य आहे असाच निर्वाळा द्यावा ही आश्चर्याची गोष्ट नाही? आणि हल्लीच्या युगात प्राचीन काळातील न समजणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावण्यासाठी तंत्रज्ञांची मदत घ्यावी,असे जे डॅनिकेन म्हणतात त्यालाच पुष्टी देणारी ही गोष्ट नाही का? अमेरिकन विमानतंत्रज्ञ जॉन ॲन्डरसन याच्या बाबतीत हेच घडले आहे.पालेन्क येथील शिलाचित्राचा अभ्यास करून त्याने त्याच्या प्रत्येक रेषेचा अर्थ लावून सिध्द केले आहे की,ते अंतराळयान खरोखर उडू शकेल म्हणून.डॉ.मेसन यांची मते,ब्लुमरिच,ॲन्डरसन यांचा पाठिंबा,इजिप्तमधील प्राचीन विमाने या सर्व गोष्टी डॅनिकेन यांचा सिद्धांत बरोबर आहे असेच दर्शवितात.
डॅनिकेन यांचा सिद्धान्त हा असा आहे :
अज्ञात अशा पौराणिक काळात कोणत्या तरी बुद्धिमान जमातीत अंतराळात युद्धसंग्राम झाला.पराभूत जमातीतल्या काही जणांनी अंतराळयानात बसून पळ काढला.जिंकलेली जमात कशा त-हेने विचार करील याची पूर्ण कल्पना त्यांना होती.म्हणून पळून गेल्यावर ज्या ग्रहांवर वस्ती करणे त्यांना सहज शक्य होते अशा ग्रहांवर ते उतरलेच नाही.त्यांनी पृथ्वी हा ग्रह शोधला.त्यावरची परिस्थिती त्यांच्या पूर्वीच्या ग्रहाशी मिळतीजुळती होती.या नवीन वातावरणाचा सराव होण्यासाठी ते अनेक वर्षे पृथ्वीवर गॅसचे मुखवटे घालूनच वावरले.म्हणूनच जगातल्या गुहांत मुखवटे शिरस्त्राणे आणि इतर उपकरणे असलेले 'देव' आज आपल्याला दिसतात.
त्यांचा शोध करून संपूर्ण विनाश करण्याचा प्रयत्न जेते करणारच.
या भीतीने त्यांनी प्रथम जमिनीखाली शेकडो फूट खोल राहण्या
साठी प्रचंड विवरे खणली.हजारो मैल लांबीचे रस्ते बांधले.
पाठलागावर असणाऱ्या जेत्यांना फसविण्यासाठी त्यांनी आपल्या सूर्यमालेतील पाचव्या ग्रहावर अंतराळस्थानके बांधली,ट्रान्समिटर्स उभारले.या त्यांच्या सापळ्यात जेते लोक बरोबर अडकले आणि कसलाही विचार न करता तो ग्रह त्यांनी उद्ध्वस्त करून टाकला.आज आपल्या सूर्यमालेकडे नजर टाकली तर आजच्या चौथ्या आणि पाचव्या ग्रहातील,म्हणजेच मंगळ आणि गुरू यांच्यातील ३० कोटी मैलांचे अंतर अगदी अनैसर्गिक वाटते.पण ती जागा रिकामी नाही. लाखो दगड या ठिकाणी सूर्याभोवती फिरतात आणि याला आपण म्हणतो लघुग्रहांचा पट्टा! (Planetoid Belt) अगदी प्रथमपासून आपल्या खगोलशास्त्रज्ञांना वाटत आहे की मंगळ आणि गुरू यांच्यात एक ग्रह निश्चित असायला हवा होता पण तो उद्ध्वस्त झाला कसा? तो उध्वस्त झाला नाही,केला गेला!
तो ग्रह उध्वस्त झाल्यावर पराभूत जमातीची आता नावनिशाणी शिल्लक नाही अशी जेत्यांची खात्री पटली आणि ते आपली अंतराळयाने घेऊन स्वतःच्या ग्रहावर परत गेले.आपल्या ग्रहमालेतील या पाचव्या ग्रहाच्या नाशामुळे सूर्यमालेतील सर्वच ग्रहांचा समतोल काही काळ ढळला.पृथ्वीचा आस थोडा तिरपा झाला.
सर्वत्र महापूर आले.
त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून पराभूत बुद्धिमान जमात बाहेर आली.त्यावेळच्या पृथ्वीवरील आदिमानवांवर त्यांनी प्रयोग केले;त्यांच्यासारखीच बुद्धिमान जमात निर्माण करण्याच्या हेतूने!
मानवाच्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीचा विचार केला तर मानवाच्या बुद्धीची वाढ अगदी अचानक झाली आहे.या अफाट काळाचा विचार करता तो एका रात्रीत घडलेला चमत्कार वाटतो.डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे गोरीला आणि चिम्पांझीसारख्या माकडांपासून मानवाची उत्पत्ती झाली हे मान्य केले तरी एकाएकी बुद्धी प्रगल्भ होऊन माकडाचा मानव बनण्यात या परग्रहवासियांचा हात आहे.आता याच परग्रहवासियांना पृथ्वीवरील जमाती 'देव' मानायला लागल्या.पण पृथ्वीवरील बुद्धिमान जमातींची प्रगती तशी फार हळुहळू होत होती आणि काही वेळा संतापून या देवांनी,ज्यांनी ज्यांनी घालून दिलेले नियम पाळले नाहीत त्यांचा संहार घडवून आणला.याच्यात आपण काही अनैतिक गोष्ट करीत आहोत असे 'देवांना' मुळीच वाटत नव्हते.त्यांच्याप्रमाणे बुद्धिमान जमात निर्माण करणे एवढेच ते त्यांचे कर्तव्य मानीत होते.त्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट ते निष्ठुरपणाने बाजूला सारीत होते.
पण यावेळेपर्यंत प्रथम उतरलेले अंतराळवीर शिल्लक नव्हते,तर त्यांची पुढची पिढी होती.देवपुत्रांची! आणि ते नाश करायला निघाले की पृथ्वीवरील जमाती घाबरून जात होत्या.या देवांच्या भीतीनेच पृथ्वीवरील जमातींनीही आता लपण्यासाठी जमिनी
खाली जागा शोधायला सुरुवात केली.इक्वेडोर आणि पेरू या देशातल्या सारखीच पण तितक्या उत्कृष्ट आयुधांनी न केलेली बांधकामे सॅन ऑगस्टीन (कोलंबिया) चोलुला (मेक्सिको) अशा ठिकाणी सापडली आहेत ती याचमुळे.निदान पहिले 'देव' जे उतरले त्यांची डॅनिकेनची कथा ही अशी आहे.खुलासा हा असा आहे.पण शेवटी डॅनिकेन यांचा सिद्धांत बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या ग्रहांवर आपल्याहून प्रगत संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध करायला पाहिजे,त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे आणि त्यासाठी अंतराळात पाऊल ठेवायला पाहिजे.त्या दृष्टीने पावले टाकायला आपण खरी म्हणजे कधीच सुरुवात केली आहे.
१६.०१.२५ या लेखातील शेवटचा भाग...