* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२१/१०/२५

एक खिडकी अचानक उघडते / A window suddenly opens

" ग्रहम ग्रीननं म्हटलं आहे की प्रत्येकाच्या बालपणात किंवा पौगंडावस्थेत एक क्षण असा येतो की एक खिडकी अचानक उघडते आणि सारा भविष्यकाळ आत येतो." - डॉ.श्रीराम लागू


शाळा म्हणजे खासगीवाल्यांचा वाडा.काळेकभिन्न कोरीव काम केलेले खांब,तुळया,कमानी आणि त्यांनी बंदिस्त केलेल्या अंधेऱ्या खोल्या.खोल्यांत काही बाकडी आणि मास्तरांची टेबल-खुर्ची.

अतिशय मारकुटे आणि परपीडनात आसुरी आनंद घेणारे मास्तर.बास. शाळेतल्या चार वर्षांत काही शिकल्याचे आठवतच नाही.परीक्षाही आठवत नाही.पण चौथीच्या परीक्षेत नापास झालो एवढे नक्की ! कारण त्यामुळेच माझी शाळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.


मी मराठी चौथीत नापास झालो तेव्हा आमच्या म्युनिसिपल शाळेच्या हेडमास्तरांनी आमच्या वडिलांना बोलावून घेऊन त्यांना सांगितले होते म्हणे की,"मुलाचे शिक्षण नीट करायचे असेल तर त्याला म्युनिसिपल शाळेतून काढून दुसऱ्या चांगल्या शाळेत घाला.मात्र मराठी चौथीचे वर्ष त्याला पुन्हा करू द्या !" वडिलांनाही ते पटले.कारण त्यांना व्यवसायामुळे माझ्या अभ्यासाची चौकशी करायलाही कधी वेळ मिळत नसे.


म्युनिसिपल शाळेतून भावे स्कूलमध्ये मला अक्षरशः अंधार

कोठडीतून स्वच्छ प्रकाशमय जगात आल्यासारखे वाटले.मोड्डी थोरली,लांबलचक तीन मजली दगडी इमारत.अर्ध्या भागात मुलांची शाळा आणि अर्ध्या भागात मुलींची शाळा.प्राथमिक शाळेच्या चार इयत्ता - प्रत्येकीच्या तीन-तीन तुकड्या.प्राथमिक शाळा मात्र मुलांमुलींची एकच होती.हायस्कूलच्या सात इयत्ता प्रत्येकीच्या तीन-तीन तुकड्या.प्रत्येक तुकडीला वेगळा वर्ग आणि वर्गावर झोकदार पाटी 'इ. ४ थी अ.' आणि प्रत्येक वर्गात प्रकाश म्हणजे किती ? अगदी डोळे दिपून जायचे.मराठी चौथीच्या वर्गात पुन्हा बसावे लागले याचे मला काहीच सोयरसुतक नव्हते । नव्या शाळेवर मी एकदमच खूश होतो.आणि त्या वेळी लक्षात आले नाही, पण पहिल्या शाळेतल्या चार वर्षांत माझा नकळत काहीतरी अभ्यास झाला असणार ! कारण म्युनिसिपल शाळेत 'ढ' समजला गेलेला मी नव्या शाळेच्या चौथीच्या वर्गात एकदम 'स्कॉलर' म्हणून ओळखला जाऊ लागलो ! मी खूश होतो ! शिकवायला बाई होत्या. छान दिसायच्या,खूप छान शिकवायच्या,पण त्यांचे कुंकू नसलेले कपाळ फार केविलवाणे वाटायचे.


मराठी चौथीची परीक्षा मी हां हां म्हणता पास झालो आणि इंग्रजी पहिलीत गेलो. (STD. IA) अशी इंग्रजीतली पाटी वर्गाच्या दारावर होती ! आमचे वर्गशिक्षक मुंडले नावाचे होते.इंग्रजी,मराठी दोन्ही छान शिकवायचे.शिकवताना छान छान गोष्टी सांगायचे. 


दिवाळीच्या सुट्टीत 'फराळाचं काय काय खाल्लं,सिनेमा कुठला पाहिला ?' असले प्रश्न विचारायचे म्हणजे अभ्यासाशी काही संबंध नसलेले - त्यामुळे अगदी घरच्यासारखे वाटायचे.


एक दिवस ते तासाला आले आणि त्यांनी एकदम घोषणा केली की,"शाळेचं गॅदरिंग जवळ आलेले आहे आणि त्यात करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला एक 'नाटिका' करायची आहे !" नाटिका म्हणजे काय हे आम्हांला कुणालाच माहीत नव्हतं.मग त्यांनी पेंडसे आणि सुखात्मे,आणि मी तिघांना उभं राहायला सांगितलं आणि म्हणाले, "तू (म्हणजे मी) गोपाळ कृष्ण गोखले व्हायचंस,तू लोकमान्य टिळक आणि तू दादाभाई नौरोजी."अशी तिघांना तीन कामं वाटून दिली आणि पुढे म्हणाले,"तुम्ही तिघांनी संवाद पाठ करायचे आणि मी सांगीन तसे एका पाठोपाठ म्हणायचे. आणखी एक 'सरोजिनी नायडू' लागेल.ती मुलींच्या शाळेतून आणू." मुलींची शाळा आमच्या शाळेला लागूनच होती.गॅदरिंगला चांगला महिनाभर अवकाश होता.मुंडले सरांनी स्वतःच ती नाटिका लिहिलेली होती. ( नापास मुलांचे प्रगतिपुस्तक,संपादन अरुण शेवले, प्रकाशक - ऋतुरंग प्रकाशन मुंबई)


आणि स्वतःच ते बसवणार होते.बसवणार म्हणजे काय तर आमच्याकडून भाषणं पाठ करून घेणार ! मला पाठांतराची सवय होती कारण घरी रोज संध्याकाळी 'शुभंकरोति', 'शांताकारम्', 'रामरक्षा', 'भीमरूपी' वगैरे देवासमोर बसून म्हणायला लागायचंच,मुंडले सर वर्गात तर नाटिका आमच्याकडून पाठ करून घ्यायचेच पण दुसऱ्या एखाद्या वर्गावर तास घेत असले आणि तास घ्यायचा कंटाळा आला की आम्हां तिघांना आमच्या वर्गातून बोलावून घ्यायचे आणि त्या वर्गातल्या मुलांसमोर उभे राहून आमच्याकडून भाषणं पाठ म्हणून घ्यायचे.आम्हांला आमचा तास चुकला (विशेषतः तो गणिताचा असला) तर मजाच वाटायची.क्वचित 'सरोजिनी नायडू' ही शेजारच्या शाळेतून बोलावली जायची.तिचं नाव मात्र आता आठवत नाही.लहानपणी पाठांतराला वेळ लागत नाही.त्यामुळे लवकरच आमची चौघांचीही ती सबंध नाटिकाच पाठ झाली !


गॅदरिंगचा दिवस उजाडला.शाळेच्या चारी बाजूंनी दगडी इमारतींच्या मध्यभागी भला थोरला चौक होता.त्याच्या एका बाजूला स्टेज बांधले होते आणि समोर चौकात प्रेक्षकांना बसायला,पुढे भारतीय बैठक आणि मागे खुर्चा अशी व्यवस्था होती.पाचएकशे प्रेक्षक मावत असत.दुपारी तीन-चारच्या सुमारास कार्यक्रम सुरू व्हायचा होता.आम्ही एक वाजल्यापासूनच हजर होतो. प्रेक्षागृह रिकामेच होते.आम्ही 'कलाकार' मंडळी स्टेजच्या मागच्या बाजूला जमलो.मास्तरांनी आम्हांला स्टेजवर नेऊन स्टेज दाखवले.लाकडाच्या फळ्यांचे स्टेज केलेले होते.वर एक सतरंजी टाकलेली होती.मागे कसल्या तरी देखाव्याचा भव्य पडदा लावलेला होता. स्टेजवर एक कोच आणि एक खुर्ची मांडलेली होती. पुढच्या बाजूला लाल रंगाचा दुपाखी पडदा होता.त्या पलीकडे प्रेक्षक बसणार होते.पण पडदा पडलेला असल्याने प्रेक्षागृह दिसत नव्हते.स्टेजच्या डाव्या-उजव्या बाजूला झाडांची चित्रे काढलेल्या विंगा होत्या. त्यांच्यामधून स्टेजवर प्रवेश करायचा किंवा बाहेर जायचे.आम्ही स्टेजवर बागडलो,कोचावर हुंडदलो, मास्तरांनी आमच्याकडून एकदा नाटिका म्हणवून घेतली.कुठे कुणी बसायचे,कुणी उभे राहायचे हे सांगितले.सगळे खेळीमेळीत चालले होते.दोन तास कसे गेले कळलेही नाही.


चारच्या सुमारास कार्यक्रम सुरू झाला.पहिलीच नाटिका आमची होती.नाटिकेच्या सुरुवातीला टिळक, दादाभाई आणि सरोजिनी स्टेजवर असतात.गोखले (म्हणजे मी) आत विंगेत उभे असतात.

पडदा वर गेला की स्टेजवर तिघांचे संभाषण सुरू होते.थोडा वेळ त्यांचे संभाषण झाले की गोखले प्रवेश करतात आणि पुढे बाकीची नाटिका होते.प्रत्यक्ष पडदा वर जाऊन नाटिका सुरू होण्याच्या वेळी मी विंगेत उभा राहून माझ्या प्रवेशाची वाट पाहत होतो. मनावर दडपण कसलंच नव्हतं.ठरावीक वाक्यानंतर प्रवेश करायचा आणि पुढचे संवाद बोलायचे.पाठांतर चोख होते.पण पडदा वर गेला मात्र आणि विंगेतून मला, समोर बसलेला प्रचंड समुदाय दिसला ! जगातली सगळी माणसे पोरे बनून तिथे कोलाहल करताहेत आणि मी दिसल्याबरोब्बर झडप घालून ती मला गिळंकृत करणार अशी दरदरून भीती मला वाटली. क्षणार्धात हातपाय गारठले,तोंड कोरडे पडले,जीभ टाळ्याला लागली.जीव वाचवण्याच्या आदिम प्रेरणेने माझा संपूर्ण कब्जा घेतला आणि मी विंगेला घट्ट धरून थरथरत उभा राहिलो.


थोड्या वेळाने लक्षात आले की स्टेजवरचे माझे सहकारी माझ्याकडे पाहून मला जोरजोराने हातवारे करून प्रवेश करण्याकरिता खुणावताहेत.समोरच्या विंगेत हातात शिट्टी घेऊन सर उभे होते.तेही जोरजोराने खुणावताहेत.माझ्या डोक्यात स्टेजवरच्या संवादाचा एक शब्दही शिरला नव्हता.डोक्यात घोंघावत होता समोर बसलेल्या प्रेक्षकांचा भयानक कोलाहल.

स्टेजवरचा संवाद थांबलाच होता कारण माझ्या प्रवेशाशिवाय नाटिका पुढे जाणे शक्यच नव्हते.समोरच्या विंगेतले सर एकदम दिसेनासे झाले.ते मागच्या पडद्याच्या मागून धावत माझ्या विंगेत आले.त्यांनी मला बकोटीला धरून विंगेपासून ओरबाडून काढले आणि एखाद्या मांजराच्या पिल्लाला फेकतात तसे एकदम स्टेजवर फेकून दिले.मी स्टेजवर धडपडत उभा राहिलो.समोर लाखो हिंस्र जनावरांचा समुदाय,त्यांच्या लसलसत्या लाल जिभा आणि भीषण गोंगाट.कोणत्या क्षणी मला फाडून मटकावून टाकतली याचा नेम नाही ! मला नाटिकेतील एक शब्द आठवेना.मी घाबरण्याच्याही पलीकडल्या अवस्थेला गेलो होतो - बधिर झालो होतो.स्टेजवर लोकमान्य टिळक,दादाभाई नौरोजी,सरोजिनी नायडू माझ्याकडे पाहून प्रचंड हातवारे,खुणा करत होते.त्यांचे ओठ हलताना दिसत होते पण ऐकू काहीच येत नव्हते. टाळ्याला चिकटलेली जीभ सुटत नव्हती.असा किती वेळ गेला कुणास ठाऊक.शंभर दोनशे वर्षं असावीत बहुधा ! नाटिका थांबून राहिली होती.पुढे जात नव्हती. मी बोलू लागल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते.


आणि मग एकदम कसे कुणास ठाऊक,मला भाषण आठवले.

टाळ्याला चिकटलेली जीभ सुटली आणि मी भडाभडा बोलायला लागलो.आणि एकदा बोलायला लागल्यावर मला थांबवण्याची कुणाची टाप होती ? मी माझे स्वतःचेच केवळ नव्हे तर इतर सगळ्यांचीही भाषणे न चुकता,धाडधाड नाटिकेच्या शेवटापर्यंत म्हणून टाकली ! टिळक,दादाभाई,सरोजिनी सगळे आ वासून बघायला लागले आणि बघतच राहिले.नाटिका संपली ! पडदा पडला.समोरच्या प्रेक्षकांना काहीच सोयर सुतक नव्हते.सर स्टेजवर आले, 'छान केलंत हं सगळ्यांनी' म्हणाले आणि पुढच्या नाटिकेच्या तयारीला लागले ! नाटिकेत काम करण्याबद्दल आम्हांला प्रत्येकाला दोन दोन लिमलेटच्या गोळ्या मिळाल्या.मला सायकलवरून कुणीतरी घरी पोचवले.मी मात्र इतका हादरलो होतो की मी मनोमन प्रतिज्ञाच करून टाकली,'पुन्हा जन्मात नाटकाच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही !'


आमच्या शाळेच्या गॅदरिंगला दर वर्षी दोन नाटके व्हायची.एक आजी विद्यार्थ्यांचे आणि एक माजी विद्यार्थ्यांचे.आमच्या शाळेतले फाटक सर आणि परचुरे सर दर वर्षी फार मेहनतीने ही नाटके बसवायचे.अगदी संगीतासकट.मी जसजसा मोठा व्हायला लागलो तसतसा ही नाटकं पाहायला लागलो.लांब कुठेतरी बसून बघायचं.

मी १९४४ साली मॅट्रिक झालो आणि फर्ग्युसन कॉलेजात गेलो.त्याचं असं झालं,मॅट्रिक झाल्यावर वडिलांनी रीतीप्रमाणे विचारलं,"आता पुढे काय करायचा विचार आहे ?" म्हणून. मी म्हटलं, "मला आर्ट स्कूलमध्ये चित्रकला शिकायला जायचंय." (मी चित्रं बरी काढायचो – आणि एकूणच मला कला विषयामध्ये स्वारस्य होतं.शास्त्रीय विषयांची काही गोडी नव्हती.)वडील क्षणभर अवाक् झाले.एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या आणि काँग्रेसच्या गांधीवादी पुढाऱ्याच्या मुलाकडून त्यांची ही अपेक्षा सुतराम् नव्हती,काही तरी शिष्टसंमत प्रतिष्ठित व्यवसायाचं मी नाव घेईन अशी त्यांची खात्री असावी.थोड्या वेळानं ते बोलते झाले, "हे पहा,पेंटर बिंटर होणं म्हणजे भिकेची लक्षणं आहेत. तुम्ही यावर काहीच विचार केलेला दिसत नाहीये. 


तर मी सांगतो,मॅट्रिक झाल्यावर पुढे कॉलेजात दोन शाखा असतात - आर्टस् आणि सायन्स.आर्टस् घेतलंत तर एक तर वकील व्हाल किंवा प्रोफसर.आजकाल वकील सगळीकडे बेकार हिंडताहेत आणि प्रोफेसर म्हणजे दीडदोनशे रुपये पगारावर आयुष्य काढावं लागेल.तेव्हा आर्ट्सचा विचार डोक्यातून काढून टाका. आता सायन्स.त्यात दोन शाखा - एंजिनिअरिंग आणि मेडिकल.

एंजिनिअरिंगला जायचं म्हणजे गणित फार पक्कं हवं – तुमचा गणितात काय उजेड आहे तो दिसतोच आहे,तेव्हा एंजिनिअरिंग रद्द.आता म्हणजे मेडिकलशिवाय पर्याय नाही.तेव्हा मेडिकलला जायचं !" त्यांच्या वक्तृत्वानं आणि तर्कशुद्ध विश्लेषणानं मी फार प्रभावित झालो आणि फर्ग्युसनला सायन्समध्ये नाव दाखल केलं.


वडील स्वतः डॉक्टर असून राजकारणात रस घेत असल्यामुळे,

आपला व्यवसाय शक्य तितक्या लवकर आपल्या थोरल्या मुलानं चालवायला घेऊन आपल्याला मुक्त करावं असं त्यांना वाटणं अगदी साहजिक होतं !


'एकच प्याला' नाटक करून त्यात मी सुधाकरची भूमिका करावी असा प्रस्ताव मी आमच्या कमिटीपुढे मांडला. (माझ्या बाथरूम-अ‍ॅक्टिंगमुळे मी स्वतःला फारच मोठा नट समजू लागलो होतो !) पण एवढं गंभीर,शोकात्म नाटक गॅदरिंगसारख्या आनंदाच्या प्रसंगी लोक - विशेषतः विद्यार्थी – पाहून घेणार नाहीत;तेव्हा काहीतरी विनोदी नाटक करावं असं कमिटीचं मत पडलं.मग मी नाटक निवडलं आचार्य अत्र्यांचं 'वंदे मातरम्'.ते विनोदी तर होतंच पण मुख्य म्हणजे त्यातलं 'त्रिभुवन' हे काम मला करायला फार छान वाटलं ! जुने,स्कूलचे जे विद्यार्थी होते त्यातले काही चांगले,हौस असलेले नट होते.त्यांतले काही आम्हा कॉलेजवाल्यांतले काही असे मिळून नटसंच तयार करण्यात फारशी अडचण आली नाही.


'नटीसंच' जमवताना मात्र फार मुलींचे पाय धरावे लागले ! माझ्या स्वभावात ही पायधरणी बसणारी नव्हती.पण आता नाटक होणे आणि त्यात मी काम करणे हा जीवनमरणाचा प्रश्न झालेला होता.तेव्हा धरले पाय आणि तीन मुली तयार केल्या.दिग्दर्शक शोधण्याचा प्रश्नच नव्हता कारण मेडिकल स्कूलची सगळी नाटकं बरीच वर्षं पुण्याचे एक वयस्क आणि नाटकाचे शौकीन डॉक्टर बसवत असत.ते स्कूलचे माजी विद्यार्थीच होते. त्यांना नुसता निरोप पाठवला की ते येत असत. कुठलंही नाटक त्यांना चालत असे.


….. उर्वरित शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये



१९/१०/२५

पामटॉप / palmtop

एकदा वन विभागाकडून आम्हाला जमिनीवर राहणाऱ्या स्टार टॉरटॉईज कासवांची जोडी मिळाली.
टणक पाठीवर सुंदर नक्षीदार चांदण्या असणारी कासवं.ही दोन्ही कासवं आकाराने आणि वयानेही लहान होती.या कासवांचं वास्तव्य गवताळ आणि रेताड प्रदेशात असतं.निवडुंग,रानफुलं, कंदमुळं आणि मेलेल्या प्राण्यांचं मांस यावर त्यांची गुजराण होते.
भारतातल्या खडकाळ आणि गवताळ प्रदेशात प्रामुख्यानं त्यांचं वास्तव्य असतं.

या कासवांना त्यांच्या नैसर्गिक परिसंस्थेमध्ये ठेवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला.त्यांच्या पिंजऱ्यामध्ये सहा-सात इंच जाडीचा वाळूचा थर टाकून सबस्ट्रेट तयार केला.वाळके ओंडके कल्पकतेने रचून त्यांच्यासाठी लपायच्या जागा तयार केल्या.
त्यातच पाण्याचं भांडं खुपसून ठेवलं. पिंजऱ्यामध्ये थोडे कॅक्टस आणून लावले.दररोज सकाळी बारीक चिरलेले टोमॅटो,गाजर,काकडी असा संमिश्र आहार आम्ही त्यांना देत असू,तर आठवड्यातून एकदा मटणाचा खिमा.पाव किलो खिमा हे दोघं तासाभरात फस्त करायचे.लवकरच त्यांचं बस्तान बसलं आणि मंडळी पार्कवासी झाली.

इतर प्राण्यांच्या तुलनेत या दोघांचा मुक्काम पूर्ण मूक होता.सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचं रूटिन शांततेत सुरू असायचं.अशी चार-पाच वर्षं गेली असतील.
दोघंही वयात आली,त्यांचं रुटिन बदलून गेलं.नर सतत मादीच्या मागे मागे फिरू लागला. त्याच्या या नव्या आगळिकीने मादी बऱ्याचदा वैतागून त्याच्यापासून दूर लपून बसायची;पण जेवायला बाहेर पडलं की पुन्हा नवरोबांचा पाठलाग सुरू,असं बरेच दिवस चालल.
हळूहळू तिला हा पाठलाग सुखद वाटू लागला असावा.पिंजऱ्यात फिरता हळूच आपली मान कवचाबाहेर वेळावून तो आपल्या मागे येतोय की नाही याची खात्री करून घेऊ लागली.त्यांचा रोमान्स चांगलाच बहरू लागला.

एकदा दुपारी असाच पाठलाग सुरू असताना कासवीण नेहमीसारखी पुढे पुढे जाण्याऐवजी अचानक थांबली.आश्चर्याने तोही थांबला. क्षणभरातच तिच्या थांबण्याचा अर्थ त्याला आणि पिंजऱ्याबाहेरून त्यांच्या प्रणयलीला पाहणाऱ्या आम्हाला कळला.
त्यांच्या मेटिंगचा क्षण आला होता.पुढचे दोन्ही पाय तिच्या अंगावर ठेवून तो घट्ट उभा राहिला.पुढचे दोन-तीन तास मधे मधे ब्रेक घेत त्यांचा समागम चालू होता.त्यानंतर चार-पाच महिने गेले असतील.आताशा पाठलाग प्रकरणही थांबलं होतं.दोघंही खाणं पिणं उरकल्यावर आपापले फिरताना दिसत होते.एका दुपारी कासवीण अधाश्यासारखी पाणी पिताना दिसली.वास्तविक जमिनीवर राहणारी,गवताळ-
रेताड प्रदेशात वावरणारी ही कासवं फारसं पाणी पीत नाहीत.अधाश्यासारखं पाणी पिण्याच्या या कृतीने मी थोडा गोंधळलो आणि सतर्कही झालो. सगळी कामं सोडून खुर्ची घेऊन तिथेच बसून राहिलो.पाणी पिऊन कासवीण एका कोपऱ्यात गेली.तिथली वाळू थोडीफार शाकारून एका जागी स्थिर बसून राहिली.
थोड्या वेळाने तिथल्या वाळूत तिने शू केली आणि ओल्या झालेल्या वाळूमध्ये आपल्या मागच्या दोन पायांनी खड्डा खणायला सुरुवात केली.त्यानंतर दोन तासांनी पुन्हा पाणी पिऊन आली आणि खड्डा खणू लागली.तिला कुणीही डिस्टर्ब करायचं नाही,अशा सूचना सर्वांना देऊन संध्याकाळी मी घरी गेलो.पुढचे दोन-तीन दिवस असेच गेले.पाणी प्यायचं,वाळूत शू करायची आणि ओल्या वाळूतला खड्डा खोल खणत न्यायचा असा उपक्रम कासवीने चालवला होता.चार दिवसांत खड्डा बऱ्यापैकी खोल झाला.पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून भल्या पहाटे मी त्यांच्या पिंजऱ्याजवळ गेलो,तेव्हा खड्डा पुन्हा वाळूने भरून गेलेला दिसला.मी काय ते समजलो. कासवीने त्यात अंडी देऊन वरून वाळू टाकली होती.त्यानंतर पुन्हा त्या दोघांचं वागणं अगदी नॉर्मल झालं.खाणंपिणंही पूर्वपदावर आलं.

चार महिने उलटले.एकदा सकाळी मी दूध आणि पेपर आणायला मेन गेटवर गेलो असता नेहमीच्या सवयीने कासवांच्या पिंजऱ्याजवळ डोकावलो आणि तिथलं दृश्य पाहून आनंदाने वेडा झालो. आमच्या कासवांच्या पिंजऱ्यामध्ये डॉलरच्या आकाराची इवली इवली चार पिल्लं मजेत फिरत होती.टोमॅटो,काकडी आणि पालकाच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर अक्षरशःतुटून पडली होती. आमच्या कासवांचा संसार फुलला होता. त्यांना बाळं झाली होती.न राहवून मी कुलूप उघडून पिंजऱ्यात गेलो.अंडी घातलेल्या घरट्यामध्ये उकरून बघितलं,तर अंड्यांची फुटलेली कवचं सापडली.थोडं टोकरल्यावर आणखी एक अंडं सापडलं.त्यातलं पिल्लू कदाचित मरून गेलं असेल असं वाटलं.पण कुतूहल स्वस्थ बसू देईना.त्या अंड्याच कवच हलकेच सोललं तर काय,माझ्या तळव्यावर एक छोटुकलं कासवाचं पिल्लू अवतरलं. त्याचं नीट निरीक्षण केलं तर त्याच्या पोटाखालच्या कवचामध्ये मला एक छोटं छिद्र दिसलं.त्यातून त्या पिल्लाची हृदयक्रियाही मला स्पष्ट दिसत होती. माझ्या तळहातावर जन्माला आलेल्या त्या पिलाचं नाव मी पामटॉप ठेवून टाकलं.
पोटातल्या छिद्रामुळे कासव कुटुंबातल्या या सर्वांत छोट्या सदस्याची थोडी जास्त काळजी घेण्याची गरज होती.त्यामुळे त्याला मी आमच्या बंगल्यावर घेऊन आलो.सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन 

पामटॉप दिसत छोटुकला असला तरी चांगलाच खादाड होता.काकडी,टोमॅटोची किंवा पेरूची फोड खायला दिल्यावर महाशय थेट फोडीवरच आरूढ घेऊन मुंडी खाली करून चरायला सुरुवात करत. बऱ्याचदा खाण्याच्या घाईत फोडीसकट तोल जाऊन तो थेट उताणा पडत असे.त्याला आपलं आपलं पुन्हा पालथं पडणं जमत नसे.त्यामुळे नुसतेच पाय हलवत वळवळ करत तो जागेवर गोल गोल फिरत राही.
आमच्यापैकी कुणाचं तरी त्याच्याकडे लक्ष गेल्यावर आम्ही त्याला सरळ करत असू.दरम्यानच्या काळात आमच्या घरी तो मस्त रुळला होता.पण शेवटी त्याला आपल्या भाईबंदांसोबत अन् नैसिर्गिक वातावरणात राहायला मिळणं गरजेचं होतं.महिन्याभराने त्याच्या पोटाचं छिद्र भरून आल्यावर त्यालाही आम्ही त्याच्या कुटुंबाबरोबर त्याच्या हक्काच्या घरी सोडलं.

…. समाप्त…


१७/१०/२५

अडचण हीच देणगी / Difficulties are gifts

विचारलं आणि मी जेव्हा सांगितलं की नाही बुवा.तेव्हा हसून ती म्हणाली,तिच्या त्या खास दिवसामध्ये मीपण वाटेकरी होऊ शकतो."मिस्टर हॅमिल्टन,उरलेला सगळा दिवस मी एमिलीबरोबर बागेत खेळण्यात घालवला.या सात वर्षाच्या मुलीला केवढातरी जास्त उत्साह आणि आनंद होता,की जेवढा इतर कुणाही माणसात असू शकेल त्यांपेक्षा जास्त.

"दिवस सरला तेव्हा ती खूप दमली.तिच्याबरोबर आलेली ती तरूण स्त्री तिला चाकाच्या खुचर्चीतून रुग्णालयात नेणार होती.जाण्याआधी एमिलीनं मला सांगितलं की ती परत गेल्यावर रुग्णालयात तिथल्या नर्सेसशी बोलणार होती आणि मलापण बागेत दिवसभर खेळायची काही व्यवस्था होते का ते बघणार होती."

जेसननं थांबून थेट माझ्याकडं पाह्यलं.त्याच्या डोळ्यात अश्रू होते.आणि माझ्या भावना आवरणं मलाही जड जात होतं.मिस् हेस्टिंग्जनं टिश्यू पेपरच्या आधारानं तो त्रास दूर केला आणि तिच्या नेहमीच्या अ‍ॅलर्जीबद्दल ती काही बोलली.आम्ही शांतपणे बसलो आणि मनात आलं,एका छोट्याशा मुलीच्या मुष्किलीमुळे आमच्यावर किती खोल परिणाम होतो !

शेवटी डोळे पुसून घसा साफ करून जेसन म्हणाला, "त्या आठवड्याच्या शेवटी मला एक प्रौढ माणूस माझ्या घरासमोरून रस्त्याच्या कडेकडेने चालतांना दिसला.मी आपल्या गाडीकडे जात होतो तेव्हा त्यानं मला बघितलं, बघून तो हसला आणि थेट माझ्याकडं आला.हात पुढे करून हस्तांदोलन करत त्याचं नाव बिल जॉन्सन असल्याचं त्यानं सांगितलं.त्यानं बघितलेल्या सगळ्या गाड्यांमध्ये माझी गाडी सगळ्यात सुंदर असल्याचं तो म्हणाला.तो जवळपासच रहात होता आणि लोकांची छोटीमोटी कामं करायचा.असली गाडी धुवायला त्याला अगदी आवडेल असं तो म्हणाला.

"तो अशी किरकोळ कामं का बरं करत होता असं मी विचारल्यावर त्यानं सांगितलं,की कंपन्यांच्या नोकरकपातीमुळे तो आणि त्याची बायको दोघं नोकरी गमावून बसले होते.घरी तीन मुलं होती.जमाखर्चाचा मेळ बसवायला तो आणि त्याची बायको मिळेल ती कामं करीत होते.त्यांची बचत सगळी संपली होती,असं दिसत होतं.आणि समोर येईल ते काम करून दिवसाचा जेमतेम मेळ घालणं चालू होतं.पुरेसे पैसे मिळाले नाहीत तर काय करणार तुम्ही ? असं मी विचारल्यावर हसून त्यानं उत्तर दिलं की मिळत होतं पुरेसं,आणि या अडचणीमुळे कुटुंबात एक मजेशीर गोष्टच घडत होती.पूर्वीपेक्षा सर्व जास्त वेळ परस्परांजवळ राहू लागलो आणि पैसा आणि काम यांच महत्त्व मुलांना कळलं.

"आधीच्या आठवड्यातच घडलेली एक घटना त्यानं गालात जरा हसून सांगितली थोड्याश्या ओटस खेरीज काही खायला नव्हतं,तो अगदी हार मानायच्या बेतात होता.तोच त्यानं त्याची बायको मुलांना काय सांगत होती ते ऐकलं त्याचं असं आहे कीअमेरिका हा देश पूर्वेकडून पश्चिमेकडे वसाहत करीत,जमीन लागवडीखाली आणत गुरांना चरण्यासाठी कुरण शोधत वाढत गेला.
पश्चिमेकडील आघाडीची तुकडी,त्याला वाईल्ड वेस्ट म्हणत,त्यातले बिनीचे लोक कित्येक दिवस एकेकदा ओटस् खाऊन राहायचे.त्यानं मला सांगितल की खूप पैसे मिळाले तरी आता पुढे त्याच्या धाकट्या दोन मुलाना ओट्सच खायला आवडणार आहेत."चपखल शब्द शोधत जेसन थोडा वेळ थांबला, आणि पुढं सांगू लागला,
"तो,त्याची बायको आणि मुलं एकत्रितपणे काही करताना,काही शिकताना काय काय मज्जा करत होते ते मला त्यानं सांगितलंत्यानं माझी गाडी धुतली,मी त्याला मागितले तितके पैसे दिले. आणि थोडे जास्त देऊ केले,पण त्यानं ते नाकारलेच.

"जाण्याआधी या त्याच्या परिस्थितीबद्दल मी हमदर्दी व्यक्त केली.तो त्याचं अद्भुत हास्य करत मला म्हणाला,तो स्वतःला अगदी नशिबवान समजतो आणि कोणी त्याच्याशी जागांची अदलाबदल करू पाहिली, तर त्याला तो तयार नव्हता." जेसन विचारात बुडून गेला आणि शेवटी बोलला,"मिस्टर हॅमिल्टन काय गंमत आहे सांगू? तो जेव्हा सांगत होता ना की कोणाशी जागांची अदलाबदल करायला तो अगदी तयार नव्हता,
तेव्हा मला स्वतःशीच वाटलं की मी खूप कारणांनी त्याच्याशी अदलाबदल करायला एका पायावर तयार आहे."

मिस् हेस्टिंग्जने पाण्याचे तीन पेले आणून ठेवले.
घोटभर पाणी पिऊन जेसननं त्याचा रिपोर्ट वाचणं पुढे चालू केलं.

"दुसऱ्या दिवशी मी एका दफनभूमिच्या प्रवेशद्वारा पुढून माझ्या गाडीनं चाललो होतो.आणि यापूर्वी कधीही पाहिली नव्हती एवढी लांब प्रेतयात्रा पाहिली.त्यावेळी मी काही त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही,पण नंतर त्याच दिवशी त्याच रस्त्यानं परत येत होतो तेव्हा मी विचार केला,जाऊन एका कामगाराला विचारावं की तो सकाळी मेलेला कोणी बडा असामी होता किंवा कसं ? 

मी दफनभूमीत गाडीतून आत शिरलो आणि बघतो तर एक खूप म्हातारा माणूस एकटाच एका थडग्याजवळ उभा होता.मी पाहिलेली प्रेतयात्रा जाऊन खूप तास होऊन गेले होते तेव्हा हा वेगळ्याच कारणानं तिथे उभा असावा,

"मी गाडीतून उतरून त्याच्याकडे गेलो.मी त्याच्याकडे चालत जात होतो,ह्याची चाहूल त्याला लागली. माझ्याकडे तो वळला.त्याच्यात व्यत्यय आणल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली.आधी कधीही पाहिली नव्हती एवढी लांब प्रेतयात्रा मी गाडीतून जाताना पाहिल्याचं त्याला सांगितलं आणि विचारलं की तो कोणी प्रसिद्ध नेता होता किंवा सिनेनट होता किंवा आणखी कोणी होता, ते."हलकसं हसून त्यानं मला सांगितलं की खरंच ती व्यक्ती प्रसिद्ध नेता आणि अभिनेता पण होती. तो म्हणाला,ही गोष्ट त्याला चांगली ठाऊक होती.कारण तिच्यासोबत तो जवळपास साठ वर्षे राहिला होता. वास्तविकतःती चाळीस वर्ष शाळेत शिक्षिका होती. आणि कित्येक विद्यार्थ्यांवर तिनं आपला ठसा उमटवला होता.खरोखर,शब्दशः देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो विद्यार्थी तिच्या मृत्युयात्रेला आले होते.म्हणून त्याला वाटतं की ती प्रसिद्ध व्यक्ती आणि तारका दोन्ही होती.

"मी त्याला म्हटलं की त्याच्या आयुष्यातल्या त्या सर्वांत दुःखाच्या दिवसाबद्दल मला फार वाईट वाटतंय.पुन्हा तो शांतपणे हसला आणि मला म्हणाला की त्याचं पुढचं जीवन निराळं होईल पण जो कोणी डोरोथी बरोबर साठ वर्षं राहिला आहे,
त्याच्या आयुष्यात वाईट दिवस येऊच शकत नाही.'डोरोथीनं माझ्यासाठी जे सर्व केलं त्याबद्दल तिचे आभार मानत मी फक्त उभा होतो.आणि मी आत्ताच तिला वचन दिलंय की मी तिला कोणत्याही प्रकारे दगा देणार नाही."

जेसननं आणखी घोटभर पाणी प्यायलं,
माझ्याकडे आणि मिस् हेस्टिंग्जकडे पाहिलं आणि पुन्हा सुरू केलं, त्या म्हाताऱ्या माणसानं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि आम्ही दोघं चालत चालत दफनभूमीच्या बाहेर पडलो.मी गाडीकडे वळत असतांना तो मला म्हणाला की "जेव्हा कधी मला त्याच्याकडून काही हवं असेल तर त्याला जरूर भेटावं."मी गाडीत बसलो आणि त्याला हळूहळू जातांना बघितलं.

या टप्प्यावर जेसननं त्याचा अहवाल संपवलायसं वाटलं.मी वाट पाहिली.पण त्यानं पुढं काही चालू ठेवलं नाही.शेवटी मी म्हणालो,"जेसन, तुला एक मूल असं सापडलं की जे फार मोठ्या कठीण समस्येला आनंदानं सामोरं जात होतं,जे समजणं मला फार जड गेलं.तुला एक प्रौढ माणूस आणि त्याचं कुटुंब आढळलं की जे आर्थिक अडचणीतही आपलं कौटुंबिक स्वास्थ्य राखून होतं आणि मानानं जगत होतं.मृत्यूमुळे येणारं दुःख झेलणारा आणि त्याचं परिवर्तन जीवनाच्या आनंद महोत्सवात करणारा तुला एक म्हातारा माणूस सापडला.पण जेसन,तू काही अडचणीत असलेला एखादा तरूण गाठणे पण अपेक्षित होते. "

जेसनन घसा साफ केला आणि शेवटी बोलायला सुरूवात केली."मला माहित आहे मिस्टर हॅमिल्टन,की मला एक तरूण पण सापडवायचा होता.महिनाभरात मला शक्यत स्वतःच्या समस्यामुळे कोणी काही शिकलेला असा एकही तरूण भेटला नाही.मी माझं जीवन असलेले बरेच तरूण भेटले.पण मला आज तुमच्याकडे कबूल करायलाच हवं की माझ्याप्रमाणे किती अडचणी असतात,याची मला जाणीवच नव्हती.


या सगळ्या गोष्टी या आधी मला स्वकेंद्रीत पद्धतीनं अगदी स्वार्थीपणानं घालवलं.वास्तविक आजुबाजुला लोकांना खरोखरी वाटायचं.एखाद्या सिनेमात नाहीतर कुठे बातमी म्हणून येतात.
नाहीतर असंच काही.

"पण तुम्ही आणि माझे आजोबा रेड यांच्यामुळे अडचणींपासून,संकटांपासून माझं रक्षण होत गेलं आणि या महिन्यात मला भेटलेले लोक जसे हे अद्भुत धडे शिकताहेत तसे मी कधीच शिकलो नाही.प्रश्नांना बगल देऊन किंवा ते सोडवणं दुसऱ्या कोणावर सोपवून आनंद लाभत नसतो.प्रश्नांवर मात करून किंवा त्यांच्यासोबतीने आनंदानं राहात गेलो तरच खरा आनंद मिळतो."

मिस हेस्टिंग्जच्या अ‍ॅलर्जीनं पुन्हा उचल खाल्ली बहुतेक,कारण तिला नाक आणि डोळे टिपत बसावं लागत होतं.

शेवटी जेसननं विचारलं,"चारांमधली एक व्यक्ती म्हणून मला धरता येईल ना ? या महिन्यात मला चारांचा हिशोब द्यायचा होता." रेड स्टीव्हन्सच्या मृत्युपत्राशी आणि कागदपत्रांशी हे तत्त्वतःआणि शब्दशःसुसंगत असल्याची ग्वाही मी जेसनला दिली.जेसननं त्याच्या घड्याळ्यात बघितलं आणि म्हणाला, "असं असेल तर मी आता सटकतो.
दुसरीकडे वेळेवर पोचायचंय." मी ठीक आहे म्हटल्यावर मिस् हेस्टिंग्ज त्याला दारापर्यंत पोचवायला गेली.तिनं विचारलं, "एवढ्या घाईनं कुठे निघाला आहेस,जेसन ?'

तो म्हणाला"बागेत झोपाळ्यासमोर एका खास मैत्रिणीला भेटायचंय,मी उद्या भेटतो तुम्हां दोघांना."

…समाप्त…


१५/१०/२५

अडचण हीच देणगी / Difficulties are gifts

नंतरच्या सोमवारी जेसन स्टीव्हन्सच्या जीवन नाट्याच्या पुढच्या भागाचा विचार केला,तेव्हा मी जरा अंदाजच करीत राहिलो होतो,हे मी कबूल करतो.माझ्या अगदी जुन्या आणि खूप प्रिय असलेल्या मित्राने त्याच्या मृत्यूनंतरही एका तरूणाच्या जीवनावर असा परिणाम करीत जावं याचे मला मोठे नवल वाटले.ठरलेल्या वेळी मिस हेस्टिंग्ज जेसनला घेऊन कॉन्फरन्स रूममध्ये आली.आणि दरमहा नियतीशी होणाऱ्या सामन्यासाठी मला घेऊन गेली.जेसन जास्त समंजस वाटला,त्याचा आत्मविश्वासही वाढलेला दिसला.

असा तो चार महिन्यांपूर्वी नव्हता. मिस् हेस्टिंग्ज आणि मला त्यानं अभिवादन केलं आणि आमच्या धाडसी सफरीच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली.


पडद्यावर रेड स्टीव्हन्सची छबी साकारली. नेहमीप्रमाणं जेसननं आजवरचे टप्पे यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्याचं अभिनंदनात्मक कौतुक केलं.कळकळीनं तो बोलायला लागला,"जेसन, आयुष्य खूपशा अंतर्विरोधांनी भरलं आहे.

जसजसं जगणं लांबतं तसतसं जीवन हा एक मोठा विरोधाभास असल्याचं जाणवतं.पण तितकंच दीर्घ जगलात आणि तेवढाच कसून शोध घेतलात तर या गोंधळात एक अघटित सुसूत्रता दिसते.


"माझ्या मृत्यूपत्रातली तुला द्यावयाची सर्वोत्तम देणगी म्हणून जी आहे तिचा भागच म्हणजे तुला एकेक धडा शिकवतोय.

सर्वसाधारणपणे माणसांना अडचणींना तोंड देतदेतच,मार्ग काढत काढत, संकटांशी सामना करत करत जगायचे असते.तसे करतांनाच ती हे धडे शिकतात.जे जे आव्हान आपण परतवून लावतो ते ते शेवटी आपल्याला ताकद देऊन जातं."माझी एक मोठी चूक झाली.तुझ्यासकट मी कित्येकांना अशा अडचणींपासून निवारा दिला.तुमच्या भल्याबद्दलच्या चुकीच्या कल्पनेमुळे मी जीवनाच्या प्रश्नांना भिडण्याचं तुमचं सामर्थ्यच हिरावून घेतलं.मी तुमच्या आजूबाजूला त्या प्रश्नांना फिरकूच दिलं नाही.


"दुदैवाने मनुष्यजात कायम एका पोकळीत राहू शकत नाही,अंड्यातून बाहेर पडायला पक्ष्याला धडपड करावी लागते.एखादा सद्हेतूने अंड फोडून देतो,आणि पिल्लासाठी वाट काढतो.त्याला वाटतं. पक्षावर मी केवढे उपकार केले ! खरं पाहता त्यानं पक्षाला दुबळ बनवून ठेवलेलं असतं.आणि परिसराशी दोन हात करायची त्याची शक्तीच नाहीशी होते.

पक्षाला मदत करण्याऐवजी त्यानं त्याची हानीच केलेली असते.आज ना उद्या परिसरातून त्याच्यावर काही आघात होणार आणि तेव्हा त्या पक्षाजवळ त्याच्याशी सामना करण्याचे सामध्ये रहाणार नाही.एरव्ही अशा अडचणीवर तो सहज मात करू शकला असता.


"लहान समस्यांना सामोरं जायला मिळालं नाही, तर जरासे मोठे प्रश्नही आपला घात करतात.हे समजलं म्हणजे आपण अडचणींना आपल्या आयुष्यात टाळत नाही.तर त्यांचा आव्हान म्हणून स्वीकार करतो आणि त्यामुळे आयुष्यात यशस्वी होतो." रेड स्टीव्हन्स थांबला आणि त्यानं थेट कॅमेऱ्याकडे बघितलं.प्रश्नांना सामोरं जात समृद्ध केलेल्या जीवनामुळे त्याच्यात जो ठाम आत्मविश्वास आला होता,तो त्याच्या त्या दृष्टीतून आम्हाला स्पष्ट दिसत होता.


रेडनं बोलणं चालू ठेवलं."जेसन,घड्याळाचे काटे मागे फिरवून भूतकाळात जाऊन ज्या ज्या तुझ्यासमोरच्या अडचणी मीच सोडवल्या त्या तू स्वतःसोडवण्याची संधी मी तुला देऊ शकत नाही. वास्तविक तू तुझ्या अडचणी सोडवाव्यात असा वाव मी तुला द्यायला हवा होता.आपणा दोघांना मी त्या काळात घेऊन जाऊ शकलो असतो,तर मी तसं केलं असतं.पण आता तो पर्याय माझ्यापुढे नाही. अडचणी,अडथळे,समस्या यांच मोल शिकवण्याचा मी प्रयत्न करतो आहे.


"तू या बाबतीत अगदी अनभिज्ञ आहेस,म्हणून तुला आता उशीर न करता,विनाविलंब शिकायचं आहे.तुझ्या पुढे जे प्रश्न आहेत,त्यांना तोंड देण्याची तुझी तयारी नाहीये.पुढील तीस दिवसांत तू ही तयारी करशील.या महिन्यात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात असलेली माणसे त्यांच्या अडचणींवर कशी मात करत आहेत,ते तू शोधायचं आहे.एक बालक,एक युवक,एक प्रौढ आणि एक वृद्ध,जो की प्रत्येकजण एका कठीण अडचणीमध्ये आहे.तू अशा चार विविध माणसांना शोधायचस.एवढ्यानं भागणार नाही,तर मिस्टर हॅमिल्टनकडे येऊन त्या त्या माणसाच्या विशिष्ट परिस्थितीत तो जसा वागतोय त्यामुळे तुला काय धडा सापडला ते सांगायचंस,


"आपण स्वतःच्या अडचणींपासून काही शिकलो म्हणजे जीवनाशी आपण दोन हात करू शकतो. जेव्हा आपण इतरांच्या अडचणींपासून काही शिकतो तेव्हा आपण एकंदर जीवनावर मात करू शकतो."मी तुला शुभेच्छा देतो.आणि पुढच्या महिन्यात पुन्हा आपण भेटू अशी मी आशा करतो."


व्हिडिओ टेप संपली तरी जेसन पडद्याकडे बघतच बसला,तो हळूच उठून दरवाजाच्या दिशेने चालू लागला.त्यानं दरवाजा उघडला आणि तो थबकला. माझ्याकडे आणि मिस रेस्टिंग्जकडे वळून म्हणाला, 


"मी कसून प्रयत्न करून तुम्हाला मग भेटतो."जातांना आपल्यामागे त्यानं दरवाजा लावून घेतला.माझ्याकडे वळून मिस् हेस्टिंग्ज म्हणाली,"हा उपक्रम यशस्वी व्हायला लागलाय.त्याच्या वागण्यात फरक पडलाय,असं वाटतंय मला. तुम्हाला काय वाटतं ?"


मी उत्तर दिलं,"मला वाटतं,तुझं बरोबर आहे अशी आशा करूया.कारण जसंजसं दूरवर जावं नं तसतसा रस्ता चढावाचा होत जातो,अशी माझी धारणा आहे."


पुन्हा एकदा मी जेसनची वाट बघू लागलो.त्यानं नीट सारं केलं असेल अशी मला आशा वाटू लागली माझ्या मुलाला शिशुवर्गात पहिल्यांदा पाठवलं त्या दिवशी मला जसं वाटलं तसं मला वाटायला लागलं.महिना संपायला तीन दिवस उरले असतांनाच जेसननं फोन करून मिस् हेस्टिंग्ज बरोबर वेळ ठरवून घेतली.दुसऱ्या दिवशी सकाळी मला मिस हेस्टिंग्ज सांगत आली,की तो फार फिकिरीत होता आणि चाचरत असल्यासारखा दिसतोय.सगळं छान झालं असावं याची आशा करण्यापलिकडे मी काही करू शकत नव्हतो.


दुसऱ्या दिवशी सकाळी जेसनला घेऊन मिस् हेस्टिंग्ज माझ्या ऑफिसमध्ये ठरलेल्या वेळी आली. जेसनला एक खुर्ची दाखवून दुसरीत ती बसली. जेसन गप्प बसला होता.मी त्याच्याकडे पाहिलं.तो मला शांत आणि समजुतदार वाटला,मी मनाशी कबूल केलं.शेवटी मी म्हटलं,"जेसन,पुन्हा तुला भेटायला आनंद होतोय मला.तुझ्या प्रगतीचा अहवाल तू आणला असशील." मान वर करून जेसनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला,"मलाही तसं वाटतंय.'


मांडीवर घडी घातलेल्या आपल्या हातांकडे त्यानं पाहिलं आणि जरा वेळ घेऊन तो म्हणाला,"काही ना काही अडचणीत असलेल्या चार वेगवेगळ्या वयाच्या लोकांना मला गाठायचं होतं हे मला ठाऊक होतं.मी मुलापासून सुरूवात केली.मला दोन आठवडे काहीच हाती लागल नाही.मी इतका वैतागलो.की एक दिवस दुपारी सरळ बागेत फिरायला गेलो.


"मला स्वतःचीच कीव आली.वाटल एव्हढं सगळं केल्यावर मला वारसा म्हणून माझ्या चुलत आजोबांनी जी सर्वोत्तम देणगी ठेवली आहे.तिला मुकावं लागतंय की काय?


"शेवटी मी एका बाकाच्या एका टोकावर बसकण मारली.

बाकाच्या दुसऱ्या टोकावर एक आई बसली होती.तिची मुलगी झोपाळ्यावर खेळत होती. तिच्याकडे ती बघत होती.ती आई म्हणाली,की ती छोटी मुलगी खरोखरच विस्मयकारक होती,असं तिला वाटत होतं.माझ्या त्या निराश अवस्थेमुळे की काय मी एरवी जसा तिला प्रतिसाद दिला असता, तसा दिला नाही.तिच्या त्या झोपाळ्यावर खेळणाऱ्या सहा-सात वर्षांच्या मुलीत मला तर काहीच विस्मयकारक दिसत नसल्यांच मी तिला सांगितलं.


"तिनं मला सांगितलं,"एकतर मी तिची आई नाही. मी असायला हवं होतं.दुसर म्हणाजे मी आयुष्यात बघितलेली सर्वात जास्त विस्मयकारक ती मुलगीच आहे.मी सेंट कॅथरिन हॉस्पिटलमध्ये स्वयंसेविका म्हणून काम करते.गंभीर दुखण्याचे बळी असलेल्या रोग्यांचे आयुष्य सुखावह करण्याचा एक उपक्रम आहे,त्यांत मी काम करते.एमिली असाध्य अशा कर्करोगाने आजारी आहे. तिच्यावर कित्येक शस्त्रकिया झाल्यात.तिचं अर्ध आयुष्य वेदनेशी झगड्यात,

रूग्णालयातच गेलंय.तिला विशेष इच्छा कसली आहे,आम्ही ती पुरी करू,असं तिला सांगितल्यावर तिनं बागेत दिवसभर खेळण्यात घालवायची तिची इच्छा असल्याचं सांगितलं. आम्ही तिला म्हटलं की "खूप मुलांना डिस्नेलँड, नाहीतर सुमद्रकिनारा नाहीतर कुठलातरी चेंडूच खेळ खेळायला जायचं असतं.त्यावर ती नुस्ती हसली आणि म्हणाली,"ते तर छानच असेल,पण मला बागेतच जाऊन दिवस घालवायचा आहे." "तिनं पुढं सांगितलं,की एमिलीनं रूग्णालयातल्या सगळ्यांच्या मनाला स्पर्श केला आहे आणि त्या सर्वांच्या आयुष्यात चांगला फरक पडला आहे. तेवढ्यात झोका थांबवून गवतावरून चालत येत एमिली आम्हां दोघांमध्ये येऊन बसली.माझ्याकडे बघत तिनं जे स्मित केलं त्याचा विसर पडणे अशक्य.तिचं नांव एमिली आहे,आणि ती दिवसभर बागेत खेळायला आली आहे असंही तिनं संगितलं.

माझापण बागेतला तिच्यासारखा खास दिवस आहे का असं तिनं…अपुरे.. 


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!!..सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल …


सारासारविवेकाचा वापर करूनच अडचणी टाळता येतात.आयुष्यातल्या अडचणींचा अनुभव घेतल्यानेच तर चांगला सारासारविवेक करता येतो.


१३/१०/२५

सैनिक राण्या / warrior queen

खरं तर पायवाट-वारूळ मरायला टेकलं होतं.एखादं वारूळ जगणं,त्यानं नव्या वारुळाला जन्म देणं,हे सगळं आकड्यांच्या खेळातून ठरत असतं.त्याबाबतचा नियम सोपाही आहे,आणि कठोरही.वाढा,नाहीतर मरा ! सततची लोकसंख्यावाढ,संगोपन दालनांमध्ये जास्त मुंग्या उत्पन्न होत राहणं,यावरच वारूळ या महाप्राण्याचा ताळेबंद ठरतो.सगळ्या मुंग्यांची सगळी वागणूक या एका बाबीवरच बेतलेली असते.कारण सोपं आहे. मोठी वारुळं जास्त वेगानं वाढतात.नव्या राजकुमारी घडवणं, नर घडवणं,हेही मोठ्या वारुळांमध्ये जास्त घडतं.अर्थातच मोठ्या वारुळांपासून नवी वारुळं घडणंही जास्त प्रमाणात होतं.वारूळ जोमदार असणं-नसणं,हे त्या वारुळातल्या राणीच्या जीन्सप्रमाणे ठरतं. 

जोमदार वारुळांपासून नवी वारुळं जास्त घडतात,तर कमी जोमदार वारुळांपासून नवी वारुळं कमी घडतात.एकूण मुंग्यांच्या प्रजातीचा विचार केला,तर तिच्या प्रजेत जोमदार वाढीचे जीन्स पिढी-दर-पिढी वाढत जातात. उलट टोकाला जोमदार वाढ न घडवणारे जीन्स कमी होत जाऊन अखेर नष्ट होतात.तर पायवाट-वारुळाच्या मुंग्यांना उमगलं,की आपली राणी मेली.आपलं वारूळ वाढणं थांबलं.पण साध्या मुंग्यांमधले फेरोमोन-संदेश चालू होतेच.अन्न सापडणं,आजार,अन्नसाठा,साऱ्यांची चर्चा होतच राहिली.रोज सकाळी उठून कामकरी मुंग्या अन्न शोधायला बाहेर पडतच राहिल्या.राणी जिवंत असतानाचा जोम,जोश मात्र संपला.राणी मरण्याच्या आधीही तिची तब्येत काही आठवडे खालावत होतीच.

('वारुळ पुराण',माधवगाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )

या अनारोग्यामुळे राणीकडून येणारे फेरोमोन-संदेशही बदलले होते.ती अंडी कमी देत होती.अंड्यांपासून होणाऱ्या अळ्यांची संख्या घटत होती.अंडी वाहन नेणाऱ्या अळ्यांचं संगोपन करणाऱ्या कामकऱ्यांना जास्तीजास्त मोकळा वेळ मिळत होता.अन्नासाठी भटकणाऱ्यांची संख्याही रोडावत होती.या सगळ्या आता कमी काम असलेल्या मुंग्याचे फेरोमोन-संदेशही बदलत होते.यांचा सर्वांत महत्त्वाचा परिणाम झाला वारुळातल्या तरुण सैनिक मुंग्यांवर,एरवी वारुळातच राहणाऱ्या,फारतर दारावर गस्त घालणाऱ्या या मुंग्या, आकारानं कामकऱ्यांपेक्षा मोठ्या.यांची डोकी स्नायूंनी लगडलेली असतात.जबड्यांच्या कडा धारदार असतात. भरपूर स्नायूमुळे जबडे कचकन चावे घेऊ शकतात, अगदी शत्रूचे तुकडे पाडण्याइतक्या जोरानं.
सगळ्या वारुळाचं रक्षण करणारा बलदंड मुंग्याचा प्रकार असतो तो.वय वाढलं की या सैनिकांना बाहेर जावं लागतं.मोठे अन्नसाठे राखण,इतर वारुळाच्या मुंग्यांना घाबरवण, मारणं,अन्नाची ने-आण करण्याच्या वाटांवर गस्त घालणं,अशी कामं करावी लागतात.
तरुणपणी मात्र त्यांना वारुळातच राहावं लागतं,राणीच्या आसपास.

आणि त्यांच्यात पाचसात गर्भाशय असतात.
त्यांच्यातून त्या अंडी देऊ शकतात.विशिष्ट फेरोमोन-संदेश या लढवय्या माद्यांना 'आई' बनवू शकतात.
राणीच्या शरीरातून येणारे फेरोमोन-संदेश मंदावले,आणि तरुण लढवय्यांना ते जाणवलं.
शिंगांमधून मंदावलेल्या राणी-संदेशांना मुंग्यांच्या मेंदूपर्यंत पोचता आलं,आणि मेंदूंनी डोक्याच्या भागातल्या एंडोक्राइन ग्रंथींना कामाला लावलं.या ग्रंथींमधून निघणाऱ्या हॉर्मोन्समुळे लढवय्यांची गर्भाशयं वाढू लागली.बारीक कणांसारख्या अंडबीजांचा गर्भाशयाबाहेर जाण्याचा प्रवास सुरू झाला.गर्भाशय सोडेपर्यंत अंड्यांची वाढही पूर्ण झाली.

ज्या तरुण लढवय्यांमध्ये हे बदल घडू लागले,त्यांची अंडी देण्याची क्षमता आजवर राणीच्या फेरोमोन-संदेशामुळे बंद पडलेली होती.आता राणी नसल्यामुळे त्या जननक्षम झाल्या व त्यांनी आपली नेहमीची राखणदारीची कामं बंद केली.त्या अंडी, अळ्या आणि कोषांच्या संगोपन दालनाजवळ जाऊन राहू लागल्या.
राणीचे शेवटचे अवशेष हटवले गेले,आणि या नव्या सैनिक-राण्या अंडी देऊ लागल्या.वारुळाला नव्यानं चालना मिळायची ही शेवटची आशा होती.

आसपासच्या कामकरी मुंग्यांनी या नव्या सैनिक-
राण्यांचा अधिकार मान्य करून त्यांची सेवा सुरू केली. ही सहनशीलता म्हणजे वारुळाच्या स्थितीतल्या प्रचंड बदलाची खूण होती.राणी जिवंत असताना इतर कोणी अंडी द्यायचा प्रयत्न केला असता,तर कामकऱ्यांनी, सैनिकांनी या पुंड नव्या राणीवर हल्ला करून तिची खांडोळी उडवली असती.मुंग्यामधला हा अगदी मूलभूत नियम आहे.की एक निरोगी राणी असताना वारुळात इतर कोणालाही अंडी देण्याची.
प्रजनन करण्याची मनाई आहे.कोण्या मुगीन अंडी देण तर दूरच,ती अंडी देऊ शकते असं जरी कळलं,तर तिचा छळ केला जातो. कामकरी मुंग्या तिला अन्न देत नाहीत,तिच्या अंगाखांद्यावर चढून तिचे पाय आणि शिंग ओढली जातात.तिला दंश करून जखमी केलं जातं किंवा मारलं जातं.तिच्यावर विषारी रसायनांचा फवारा मारला जातो. या सगळ्यांतूनही तिनं अंडी घातलीच,तर ती खाऊन टाकली जातात.पण एकदा का राणी मेली,की मग काही मूठभर सैनिक-राण्यांनी अंडी घालणं वारुळातल्या इतर मुंग्यांना चालतं !

आता सैनिक-राण्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली.सगळ्या सैनिक-राण्या संगोपन-दालनांजवळ जायला धडपडायला लागल्या,आणि तिथे पोचल्यावर अंड्यांच्या जवळ जायला धडपडायला लागल्या.
एकमेकींच्या अंगावर चढून त्या इतरांचे पाय,शिंगं पकडायला लागल्या.स्पर्धक पकडीत आली,की तिला संगोपन-दालनापासून दूर ओढत न्यायला लागल्या.

राणी मुंगीचं राज्य असताना या सैनिक-मुंग्यांना एकमेकींची ओळख पटत असे,ती फक्त "आपल्या वारुळातली आपली बहीण" एवढीच.आता त्यांना सुट्या स्पर्धक 'व्यक्ती' ओळखू यायला लागल्या.
अशी ओळख पटल्याशिवाय स्पर्धा शक्यच नसते.

हळूहळू स्पर्धक सैनिक-राण्यांमध्ये श्रेणी ठरली.ही मोठी,ती धाकटी असा क्रम ठरला.सर्वांत सबळ सैनिक-राणीच अंडी देणार,आणि इतर साऱ्या
नेहमीची सैनिकी काम करणार,असं आपोआप ठरत गेलं.एकूण अंडी देणं राणी-मुंगीच्या काळातल्या जोमानं होत नव्हतं.वारुळाची प्रजा पूर्वीइतक्या जोमाने वाढत नव्हती.पण जी वाढ होत होती,ती पद्धतशीर,शिस्तबद्ध तन्हेनं होत होती.या मुख्य सैनिक राण्यांची अंडी देण्याची क्षमता राणी-मुंगीच्या क्षमतेइतकी नव्हती. प्रत्येक सैनिक-राणीचा अंड्यांचा साठा लहानसाच होता.एकेक जण आपली सगळी अंडी द्यायची,आणि नवी सैनिक मुंगी तिची जागा घ्यायची.राणीच्या मृत्यूने ओढवलेली आपत्ती स्पर्धेतून,सैनिक-राण्यांच्यात क्रम ठरून पुढे ढकलली गेली.पायवाट वारुळाला आपली मुंग्याची जात कशी घडली, कशामुळे टिकली,याचा इतिहास माहीत नव्हता.आपली सध्याची स्थिती कशी आहे,हेही वारुळाला नेमकेपणान माहीत नव्हतं.मग आपण टिकून राहण्यासाठी काय कराव.हे तरी कसं ठरवलं जात असे? आणि हे ठरवणं महत्त्वाचं तर आहेच.त्यात चूक झाली तर वारूळच नष्ट होणार.पण पायवाट-वारूळ मूर्ख नव्हतं.त्याला, त्यातल्या सुट्या मुंग्यांना बरंच काही समजत असे.मुंग्या म्हणजे काही बारीक कणांसारखे रोबॉट्स नसतात, जमिनीवर सैरावैरा पळणारे.प्रत्येक मुंगीचा मेंदू माणसाच्या मेंदूच्या एक-दशलक्षांशच असतो.पण येवढ्याशाच बुद्धीनंही बरीच कामे करता येतात.

बुद्धिमत्ता मोजायच्या एका प्रयोगात उंदरांना चक्रव्यूहासारखा वळणावळणांचा रस्ता शिकायला किती वेळ लागतो,ते मोजतात.उंदरांचे मेंदू मुंग्यांच्या कैकपट असतात.पण मुंग्याही उंदरांसारख्या वाटा शिकू शकतात;वेळ मात्र दुप्पट लागतो.मुंग्या पाच वेगवेगळ्या जागांना जोडणारे रस्ते आठवणीत साठवू शकतात. एखादी नवी जागा शोधताना भरपूर वळणं घेत, चुकतमाकत गेलेली मुंगी ती जागा सापडल्यावर मात्र थेट सरळ रेषेत पुन्हा वारुळाकडे परत येऊ शकते, एवढी बुद्धी मुंग्यांना असते.मुंग्यांना स्वतःच्या वारुळाचा वास तर ओळखू येतोच,पण काही प्रकारच्या मुंग्यांना केवळ वासांनी रेखलेल्या वाटांपैकी एखादी वाट आपण आधी चाललो आहोत का,हे ओळखता येतं.म्हणजे वारुळाच्या वासासोबत स्वतःचाही वास ओळखू येतो.

आणि वारुळातल्या सगळ्या मुंग्यांचं सगळं ज्ञान एकत्र पाहिलं,तर कीटकांच्या विश्वात वारुळं चांगलीच ज्ञानी आणि हुषार असतात.वारुळाला बांधून ठेवणारी,एकत्र करणारी राणी मेल्यावर हे सगळं ज्ञान वापरत,सगळी हुषारी वापरत पायवाट-वारूळ पुन्हा मार्गी लागलं.

राणी-मुंगीची जागा पहिल्या सैनिक राणीनं घेतली आणि वारूळ पुन्हा सुरळीत जगू लागलं.अंडी दिली जायला लागली.नवी प्रजा घडायला लागली.संगोपन दालनं अळ्यांनी भरली.कामकरी मुंग्या नव्या सैनिक राणीचा वास ओळखून कामाला लागल्या.अन्न गोळा होऊ लागलं.वारुळाची शिस्त नव्यानं घडवली गेली.

या 'नवी घडी,नवा राज'या व्यवस्थेच्या घडवणुकीत एक कामगार-अभिजन प्रकारची मुंगी होती.एकूण कामकरी मुंग्यापैकी सहाएक टक्के मुंग्या या अभिजन मुंग्या इतर कामकऱ्यापेक्षा वेगानं हालचाल करायच्या.
त्या नवी काम करायला सुरुवात करायच्या.काम नेटानं आणि जोमानं करायच्या.काम संपेपर्यंत त्या हटायच्या नाहीत. इतर कामकरी मुंग्या अभिजनांना कामांमध्ये मदत करायच्या.वारुळाचं आयुष्य वाढवण्यात या महत्त्वाच्या असायच्या;नुसत्याच चळवळ्या नसायच्या.

नवी व्यवस्था घडवणारी मुंगी राणीच्या अखेरच्या दिवसांमध्ये तिची सेवा करणाऱ्यांपैकी होती.ती इतर अभिजन-कामकऱ्यांसारखीच उत्साही आणि जोमदार होती.नवी सैनिक-राणी अंडी द्यायला लागल्यावर ही वारुळाच्या प्रवेशद्वाराजवळ गेली.सैनिक मुंग्या राणी व्हायला धडपडत असल्यानं रक्षणव्यवस्था ढिली पडली होती.नवं अन्न शोधायला जाणाऱ्या कामकरी मुंग्या सुस्तावल्या होत्या.तर आता ही एकटीच नवं अन्न शोधायला गेली.आधी वारुळाजवळ,आणि मग दूरदूर चकरा मारत ती अन्न शोधत होती.अन्न सापडलं,की इतर कामकऱ्यांना ती कामाला लावायची.

पण राणीशिवायचं वारूळ फार काळ जगू शकतच नव्हतं.वारुळाच्या आनुवंशिकतेनं एक विचित्र गोष्ट घडवली होती.कामकरी मुंग्यांचा निःस्वार्थ परोपकार आनुवंशिक.फेरोमोन-संदेश आणि ते देण्याघेण्याची इंद्रियंही आनुवंशिक.तशीच हीपण आनुवंशिक बाब होती.इतिहासातल्या सर्व प्रकारच्या,सर्व प्रजातीच्या मुंग्यांमध्ये हा गुण होता;तसाच पायवाट वारुळातही.हा गुण असा सांगता येईल : संभोगातून फळणारी अंडीच फक्त माद्यांना जन्म देतील,मग त्या राण्या असोत, सैनिक असोत,अभिजन असोत की साध्या कामकरी मुंग्या असोत.संभोगाशिवाय घडलेली सर्व अंडी मात्र नरांनाच जन्म देतील;फक्त माद्यांशी संभोग करणाऱ्या; इतर कोणतंही काम न करता येणाऱ्या नरांनाच.आणि सैनिक राण्यांनी कधी संभोग केलेलाच नव्हता.त्यांची अंडी फक्त नरांनाच जन्म देऊ शकत होती.आणि नरांचा वारूळ चालवण्यात काडीचाही उपयोग नसतो. नरांपाशी फक्त राजकुमारी शोधायला मोठे डोळे असतात,संभोगासाठी मोठी जननेंद्रियं असतात,आणि फार कामं करायची नसल्यानं बारकासा मेंदू पुरतो. उड्डाण,राजकुमारीला शोधणं,गाठणं,फळवणं,की संपलं नराचं काम.आणि यांपैकी कोणतंच काम वारुळासाठी नसतं.ती सगळी कामं फक्त नवी वारुळं घडताना उपयोगी असतात.नरांना उड्डाणाशिवाय संभोग करता येत नाही,आणि सैनिक राण्यांना उडता येत नाही.

एखाद्या शोकान्त महाकाव्याप्रमाणे राणी मुंगीच्या मृत्यूनंतरच्या घटना घडत गेल्या.जर याच काळात हवामान अनुकूल असलं,तर संभोग उड्डाणं होतील. पायवाट-वारुळातले नर आपल्या किंवा इतर वारुळांमधल्या राजकुमारींना गाठून संभोग करतील. पायवाट वारुळाचे जीन्स इतर नव्या वारुळांमध्ये जाऊन पोचतील.एकूण मुंगी प्रजातीच्या उत्क्रांतीला यानं काही लहानशी मदतही होईल.पायवाट वारूळ मात्र स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकणार नाही.त्या महाप्राण्याचा मृत्यू काहीही करून टाळता येत नाही.मृत्यूही शांतपणे येणार नाही.एकेक सैनिक,
अभिजन, कामकरी मुंगी मेल्याशिवाय वारूळ मरणार नाही. आसपासच्या वारुळांना पायवाट-वारूळ मेल्याचं कळेल.ते या मरू घातलेल्या वारुळाची अंगांगं खायला युद्ध पुकारतील.आणि पायवाट वारुळाला हे युद्ध कधीच जिंकता येणार नाही.राणीचं नेतृत्व नसलेल्या पायवाट वारुळाला इतर वारुळं संपवून टाकतील.