मूसाच्या मृत्यूनंतर काही शतकांनी आपण जगाचे आपण दर्शन घेऊ या.संस्कृती व सुधारणांच्या दिशेने मानव-कुटुंबाने काही पावले टाकलेली आपणास दिसतील.
ते पहा फोनिशियन लोक,व्यापाराची व सत्तेची त्यांना फार हाव,मोठमोठी लांब- रूंद गलबते त्यांनी बांधली.
समुद्रावरून जाताना सुरवंटाप्रमाणे ती दिसत.भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याभोवती कितीतरी भराभराटलेली नवीन शहरे त्यांनी वसविली;गजबजलेल्या वसाहती निर्मिल्या. भूमध्य समुद्र म्हणजे बहरलेल्या बागेतील जणू एक लहानसे तळे, असे वाटू लागले,फोनिशियन लोक अती धूर्त,त्यांना प्रामाणिकपणा ठाऊक नव्हता,
सद्सद्विवेकबुद्धी त्यांना माहीत नव्हती. नफेबाजी हाच त्यांचा धर्म व भरलेली तिजोरी हे त्यांचे ध्येय.परंतु त्यांनी नवीन लिपी शोधून काढली.इजिप्शियनांची ती चित्रचिन्हालिपी किंवा सुमारियनांची ती शरलिपी-त्या साध्या नव्हत्या,फार घोटाळ्याच्या व अवजड अशा त्या लिप्या होत्या.फोनिशियन लोक व्यापारी व व्यवहारी,त्यांना सुटसुटीत व झपझप लिहिता येईल अशी लिपी हवी होती.त्यांनी लिपी सोपी केली व अक्षरे बावीसच केली.हीच लिपी थोड्याफार फरकाने आजच्या बहुतेक सुधारलेल्या देशांतून सुरू आहे.
फोनिशियन लोक दर्यावर्दी व्यापार करीत होते. आशियातील कला व हत्यारे ते युरोपात आणत होते.
आफ्रिकेतील राष्ट्रांना देत होते.त्याच वेळेस खुष्कीने व्यापार करणारे कारवानांचे तांडे चीनमधील रेशीम व चिनी मातीची भांडी आणून त्यांऐवजी मध्य आफ्रिकेतील हस्तिदंत,स्पेन व ब्रिटनमधून जस्त,तसेच इतर देशांतून लोखंड, तांबे,पितळ,सोन्या-चांदीचे नक्षीदार दागिने, मसाले,मौल्यवान हिरेमाणके वगैरे घेऊन जात.हे कारवान पर्शिया व अरबस्तान यातील वाळवंटातून प्रवास करीत येत.तो जो पहिला वानरसदृश क्षुद्र मानव,त्याचे वंशज आता मोठ्यामोठ्या शहरांतून राहायला शिकले होते.सुंदर सुंदर वस्तूंनी स्वतःची शरीरे शृंगारावीत;स्वतःची घरे शोभवावीत,आपली मंदिरे भूषवावीत असे त्यांना वाटू लागले होते. चाकांचा व रथांचा शोध लागला होता.
रानटी घोडा माणसाळविण्यात आला होता.आता आपण वाऱ्यालाही मागे टाकू,असे मानवांना वाटू लागले.
संस्कृतीची परम सीमा आपण गाठली, असे त्यांना वाटले.मिळविण्यासारखे आता जणू काही राहिले नाही.
इजिप्तमधील ज्यूंचे ते महानिर्याण,सालोमनचे मंदिर,
टोजनयुद्ध व होमराची महाकाव्ये या गोष्टी आता फार जुन्या झाल्या,असे त्यांना वाटू लागले.मध्ययुगातील ती धर्मयुद्धे जशी आज जुनी पुरानी वाटतात, तसेच त्या लोकांना त्या प्राचीन युद्धांविषयी वाटे.
इजिप्त,असीरिया व बाबिलोन यांच्यात 'ज्यूंना आधी कोण गिळंकृत करतो',याची जणू आता स्पर्धा चालली होती.आणि सिथियन,इराणी व मीडीस हे इजिप्त,
असीरिया व बाबिलोन यांना गिळंकृत करू पाहात होते,पहिला मान मिळविण्यासाठी धडपडत होते.
ख्रिस्तशकापूर्वीच्या सातव्या शतकाच्या अंती आपण उभे आहोत.पृथ्वीवरची बलाढ्य राष्ट्रे एकमेकांचा निःपात करण्यात निमग्न आहेत असे येथे दिसत आहे.आणि अशा वेळेस पॅलेस्टाईनमधील एका लहान गावात एक तरुण वाढत होता.या साऱ्या लढाया म्हणजे मूर्खपणा आहे,असे तो म्हणू लागला होता.युद्धपराङ्मुख अशा त्या नवशांतिवाद्याचे नाव काय? त्या तरुणाचे नाव जेरिमिया…!
जेरिमियाच्या जीवनकथेभोवतालच्या सर्व कल्पनारम्य कथा आपण दूर करू या.
अर्वाचीन मानसशास्त्राच्या कठोर प्रकाशात हे जीवन अभ्यासू या.या जीवनातील भव्यता तोंडात बोट घालायला लावते,हा महात्मा आजही जिवंत असता,
तर आजच्या काळाच्या हजारो वर्षे तो पुढे आहे,असे म्हणावे लागले असते.अत्याचार शांतपणे सहन करा,
असे तो सांगे.त्याचा हा धीरोदात्त संदेश आजही बधिर कानांवरच पडेल,उपड्या घड्यावर पाणी ठरेल.
आजच्या या सुधारलेल्या विसाव्या शतकातही ती शिकवण झेपणार नाही,पचणार नाही.
मग स्वत:च्या काळात तो एक वेडा मनुष्य म्हणून ठरला,यात आश्चर्य ते काय?
त्याच्या समकालीनांनी त्याला वेडा म्हणूनच वागविले.खेड्यातील एक धर्मोपाध्यायाचा तो मुलगा होता.बापाचा धंदा त्याने पुढे चालवावा या हेतूने त्याला धर्माचे शिक्षण देण्यात आले होते.लहानपणी त्याने देशभर पसरलेल्या ज्या धर्मोपदेशकां विषयी पुष्कळसे ऐकले असेल,ते ज्यू प्रेषित मोठे चमत्कारिक व जहाल मताचे असतात,असे त्याने ऐकले.भटाभिक्षुकांना त्या प्रेषितांचा उपयोग नसे.ते प्रेषित म्हणजे भिकारडे जीव.गिरिकंदरांत ते राहात;कंदमुळे खात;ते बहुतकरून गरिबीत जन्मलेले असत. शेतकऱ्यांपैकी असत.कधी कधी ते गवतसुद्धा खात.फुले,मध यांवरही जगत.ईश्वराची इच्छा काय,ते आम्हीच फक्त सांगू शकू.असे लोकांना ते ओरडून ओरडून सांगत.जेरिमियाचा पिता एक अहंकारी उपाध्याय होता.
त्याचे नाव हिल्किया. त्या ज्यू प्रेषितांचे वरीलप्रमाणे चित्र त्याने आपल्या मुलासमोर अनेकदा रंगविले असेल. सुशिक्षित पॅलेस्टाईन मनुष्य अशा भिकारड्या फकिरांना आपल्या घरी कधी बोलावील,हे शक्य नव्हते.त्या ज्यू धर्मप्रेषितांचे विचार चमत्कारिक असत.एवढेच नव्हे; तर ते विचार ज्या भाषेत व ज्या पद्धतीने ते मांडीत,ती भाषा व ती पद्धतीही मोठी चमत्कारिक असे.
त्यांची वागणूकही विचित्र असे.उदाहरणार्थ,इसैआ जेरुसलेमच्या रस्त्यांतून दिगंबर फिरे.'या शहराने जे अपरंपार पाप केले आहे त्याचे प्रायश्चित म्हणून सर्व नगरवासियांना उघडे व्हावे लागेल;त्यांच्या अंगावर चिंधीही राहणार नाही,'हे पटविण्यासाठी तो तसा नग्न होऊन हिंडे.दुसरा एक प्रेषित,स्वतःची भाकरी खाण्यापूर्वी तो ती अपवित्र करी,मलीन करी व म्हणे,ईश्वर या राष्ट्राला असेच धुळीस मिळविणार आहे.यामुळे हे असले विचित्र प्रेषित उपहासास्पद होत असत.विशेषतः प्रतिष्ठित वर्ग तर या अवलियांची खूपच टिंगल करी.परंतु जेरिमिया जसाजसा वयाने मोठा होऊ लागला,तसतशी त्याला नवीन दृष्टी आली. वेड्याप्रमाणे दिसणाऱ्या त्या ज्यू प्रेषितांकडे तो निराळ्या दृष्टीने पाहू लागला.हे प्रेषित नेहमी गरिबांची बाजू घेतात, छळकांची बाजू न घेता छळल्या जाणाऱ्यांची घेतात,ही गोष्ट जेरिमियाच्या ध्यानात आली.
त्या प्रेषितांना न्यायाची तहान होती.जगात न्याय असावा, म्हणून ते तडफडत असत.त्यांचे धैर्य असामान्य असे.
राजाच्या राजवाड्यात शिरून प्रत्यक्ष त्याच्या तोंडावर त्याच्या जुलमांविषयी ते जळजळीतपणे बोलत.त्याची कानउघाडणी करीत.भय त्यांना माहीत नसे.
मंदिरातील पूजाविधींचे पोकळ अवडंबर त्यांना मुळीच खपत नसे.या दिखाऊ अवडंबराविरुद्ध त्यांचे बंड असे.ईश्वराला तुमच्या पूजाअर्चाची,तुमच्या प्रार्थनांची व यज्ञांची जरूर नाही असे ते उद्घोषित,
तुम्ही न्यायाने वागावे व सर्वांवर प्रेम करावे,तुम्ही दयाळू व मायाळू असावे,हीच ईश्वराची इच्छा आहे;प्रभू एवढेच तुमच्यापासून अपेक्षितो,असे ते सांगत.जेरिमियाला आणखी एक गोष्ट दिसून आली ती ही,की या धर्मप्रेषितांना शांतीचा ध्यास होता.ते धर्माचे प्रेषित निःशंकपणे पुढील भविष्यवाणी बोलत."असा एक दिवस येईल,की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या तलवारी मोडून त्यांचे नांगर बनवाल;भाले मोडून त्यांचे विळे कराल;शेतीची व बगिच्यांची हत्यारे,अवजारे बनवाल."असे बोलणे म्हणजे साधी गोष्ट नव्हती. ती एक धीरोदात्त अशी गोष्ट होती.अती मंगल व गंभीर अशी ती वाणी असे.परंतु ते शांतीचे उपनिषद कोण ऐकणार? "एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध कधीही तलवार उपसू नये, कोणत्याही राष्ट्राने युद्ध कसे करावे,ते अतःपर शिकू नये."ही त्यांची शिकवण.थोर उदात्त शिकवण.पुरेत आता युद्धे;पुरेत हेवेदावे;पुरेत द्वेषमत्सर;आता हल्ले नाहीत;वेढे नाहीत; रक्तपात नकोत;दुष्काळ नकोत;दुर्भिक्ष्य नको; रोग नकोत,साथी नकोत;हे त्या धर्मप्रेषितांचे निश्चित ध्येय होते.यासाठी त्यांना जगायचे होते. यासाठी मरायचे होते.जेरिमियाला स्पष्टपणे वाटे की,हे प्रेषित खरोखर दैवी प्रेरणेने संस्फूर्त झालेले आहेत.एक दिवस स्वतः
जेरिमियाही असाच संस्फूर्त कशावरून होणार नाही ? जसजसा तो या विचारांकडे अधिकाधिक लक्ष देऊ लागला,तसतसा तो जरा वेड्यापिश्यासारखा वागू लागला.त्याला स्वप्ने पडत.त्याला नाना दृश्ये दिसत.अद्भुत साक्षात्कार घडत.ईश्वर आपणास नवीन दर्शने घडवीत आहे;नवीन दृष्टी देत आहे, असे त्याला वाटू लागले.
ईश्वराची ही इच्छा जेरुसेलमच्या रहिवाश्यांना नीट समजावून सांगितली पाहिजे,असे त्याला वाटू लागले.दैवी उन्मादाने तो जणू मस्त झाला.थोर कवी,जहाल विचारसरणीचे क्रांतिकारक लोकनायक दिव्य प्रेरणेने असेच वेडे होत असतात.जेरिमिया प्रभुमत्त व शांतिमत्त झाला.प्रथमप्रथम तो लहानसहान वाईट गोष्टींविषयी बोले.बारीकसारीक गोष्टींवर तो टीका करी.आपले देशबांधव दुसऱ्या बलाढ्य राष्ट्रांचे कौतुक करीत आहेत,
असे त्याने पाहिले.त्या बलाढ्य राष्ट्रांप्रमाणे आपले राष्ट्र बलाढ्य व्हावे,असे त्याच्या देशबांधवांना वाटत होते.
जेरिमिया त्यांना म्हणाला,"दुसऱ्यांचे अनुकरण करू नका. स्वतःशी सत्यनिष्ठ रहा."पूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांप्रमाणे तोही लोकांची,क्षुद्र गोष्टीविषयीच्या त्यांच्या आसक्तीसाठी खरडपट्टी काढी.राजाला त्याच्या जुलमाविषयी स्पष्ट शब्दांत तो सांगे. एकदा तेथील मुख्य मंदिरात महोत्सव होता. मोठमोठे अधिकारी उपस्थित होते.स्वतः राजाही तिथे हजर होता.इतक्यात एकदम तो तरुण जेरिमिया तिथे आला.त्याचे केस पिंजारलेले होते;डोळे जणू तेजाने पेटलेले होते;तो एखाद्या उन्मताप्रमाणे हातवारे करीत होता;तो एकदम तेथील समारंभात घुसला व तेथील प्रार्थनांना त्याने अडथळा आणला.समजा,आत चर्चमध्ये प्रार्थना चाललेली असावी;आणि एखाद्या समाजसत्तावादी माणसाने तिथे येऊन धर्मावर तोंडमुख घ्यावे.मग तिथे किती गडबड व प्रक्षोभ होईल,त्याची कल्पना आपण करू शकतो.तोच प्रकार जरा अधिक तीव्रतेने तिथे झाला.ते धर्मोपाध्याय रागावले.राजा संतापला,इतर भक्तगणांना सात्त्विक चीड आली.काही वेळाने सारे स्तब्ध होते.जेरिमिया त्यांच्यावर वाग्बाणांचा वर्षाव करीत होता."चोऱ्या करता,खून करता, व्यभिचार करता;आणि ही सर्व पापे करून येथे माझ्यासमोर येऊन उभे राहता? हे माझ्या नावाने स्थापिलेले मंदिर,येथे का चोरांचा मेळावा जमावा? हे मंदिर की,चोरांच्या अड्ड्यांची जागा? तुम्ही असत्यवादी,लफंगे,खुनी आहात.मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सारे पापी आहात.
पक्ष्यांचे घरटे जसे पिला-पाखरांनी गजबजलेले असते,तशी तुमची घरे पापांनी व वंचनांनी भरलेली आहेत.तुम्ही धष्टपुष्ट झाला आहात,लठ्ठ झाला आहात, धनकनकसंपन्न असे मान्यवर झाला आहात.परंतु अनाथ व पोरके तुमच्या नावाने खडे फोडीत असतात.जे गरीब आहेत,ज्यांना पदोपदी वाण आहे,असे सारे लोक तुम्ही पापात्मे आहात,
धर्ममर्यादांचे उल्लघंन करणारे आहात,याला साक्षी आहेत." "म्हणून प्रभूसमोर तुमचा नक्षा उतरवला गेलाच पाहिजे.तुमचा गर्व धुळीस मिळाला पाहिजे. वाळवंटातील एखाद्या प्रेताप्रमाणे हे तुमचे शहर होईल.उत्तरेकडून लांडगे येतील.आणि तुम्हाला फाडून खातील." (मानवजातीची कथा,हेन्री थॉमस, अनु-साने गुरुजी)
अशी ही मर्मातिक टीका व निंदा कोण कोठवर सहन करणार? ते सारे धर्मपूजक जेरिमियाच्या अंगावर धावून आले. 'ठार करा याला', असे सारे ओरडले.राजा शांत होता.त्याने जेरिमियाच्या बचावासाठी काही केले नाही.
जमावाने मन मानेल तसे वागावे असे जणू तो सुचवत होता त्यांच्या इच्छेच्या आड तो नव्हता.
इतिहासातील पहिला युद्धविरोधी वीर जेरिमिया
राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..