सतराव्या शतकात रशिया अत्यंत मागासलेला देश होता.इंग्लंड,फ्रान्स,जर्मनी वगैरे पश्चिमेकडील देश सुसंस्कृत रानटीपणाच्या दशेला जाऊन पोहोचले होते.पण रशियाचा रानटीपणा मात्र अजूनही ओबडधोबडच होता. त्याला पॉलिश मिळाले नव्हते.रशियातील स्लाव्ह लोक मूळचे मध्य आशियातले.ते तेथून युरोपात आले.
चेंगीझखानाने त्यांना एकदा जिंकले होते. कॉन्स्टॅटिनोपलच्या मिशनऱ्यांनी त्यांना रोमन कॅथॉलिक बनविले होते.असे हे स्लाव्ह शेकडो वर्षे अज्ञानी,दुबळे व दंतकथा आणि नाना रूढी यांनी भारलेले होते.
१४६३ साली तार्तर रशियातून घालविले गेले.पण त्यामुळे रशियनांची स्थिती सुधारली असे नाही.तार्तरहुकूमशहाच्या जागी स्लाव्ह हुकूमशहा आला.मॉस्कॉव्हाचा (मॉस्को) ग्रँड ड्यूक तिसरा इव्हान आपणास रशियाचा उद्धारकर्ता म्हणवीत असे.पण रशियनांना आगीतून निघून फुफाट्यात पडल्याप्रमाणे झाले. त्याच्या नातवाने प्रथम सीझर-झार- ही पदवी घेतली.त्याचेही नाव इव्हानच होते.त्याला 'भयंकर-इव्हान दि टेरिबल' म्हणत.त्याने तर अधिकच जुलूम केला व प्रजेला केवळ गुलाम केले.तार्तरांची हुकूमत होती,तोपर्यंत शेतकऱ्यांना थोडे तरी स्वातंत्र्य होते.पण झारांच्या सुलतानशाहीत त्यांची स्थिती केवळ गुरांढोरांप्रमाणे झाली.डुकरे,गाई,बैल शेतावर असतात.
तसेच हे शेतकरीही तिथे राहत व राबत. त्यांना कशाचीही सत्ता नव्हती.रशिया आता जणू एक जंगी वसाहतच बनला.लाखो मजूर व एकच धनी.झार जमीनदारांना व सरदारांना फटके मारी,जमीनदार व सरदार शेतकऱ्यांवर कोरडे उडवी आणि सर्वांच्या वर आकाशात भीषण असा परमेश्वर होता.झारविरुद्ध बंड करणाऱ्यांना व चर्चची अवज्ञा करणाऱ्यांना गाठाळ चाबकाने फोडून काढावयाला तो परमेश्वर बसलेला होता. जणू भीषण अशी कोसॅकचीच मूर्ती !
झारांच्या अहंकाराची बरोबरी त्यांचे अज्ञानच करू शके.अहंकार भरपूर व अज्ञानही भरपूर, ते केवळ निरक्षर टोणपे होते.ते व्यसनी,व्यभिचारी,विलासी होते.ते आपल्या प्रजेसमोर आपल्या वैभवाचे प्रदर्शन करीत. राजवाड्यात डुकरे पाळीत.मोठमोठ्या मेजवान्यांच्या वेळी ते खुशाल टेबलावरील कपड्यांवर नाक शिंकरीत व आपल्या पाटलोणीस बोटे पुशीत ! ते गणवेश करीत, तेव्हा त्यावर शेकडो पदके लावीत.पण त्यांच्या शरीरांना कित्येक दिवसांत स्नान माहीत नसे.प्रवासात असत तेव्हा ते एखाद्या खाणावळीत उतरत व एखाद्या मोलकरणी
जवळ चारचौघांत गैरवर्तन करीत.ते दैवी सामर्थ्याचा आव आणीत व भुतांची भाषा वापरीत.नवीनच मिळालेल्या सत्तेने ते जणू मत्त झाले होते.ते दारू प्यायलेल्या जंगली माणसांप्रमाणे वागत.त्यांना चालरीत माहीत नसे. सद् भिरुची ठाऊक नसे.रशियाची राजधानी मॉस्को येथे होती.झारमध्ये वैभव व वेडेपणा,सत्ता व पशुता यांचे मिश्रण होते. त्याचप्रमाणे मॉस्को राजधानी सौंदर्य व चिखल यांनी युक्त होती.मॉस्कोकडे येणारे रस्ते फक्त हिवाळ्यात जरा बरे असत.कारण त्या वेळी चिखल गोटून घट्ट असे.मॉस्कोभोवती दुर्गम जंगले होती.ते दुरून अरबी भाषेतील गोष्टींमधल्या एखाद्या शहराप्रमाणे दिसे.दुरून दोन हजार घुमट व क्रॉस दिसत.ते तांब्याने मढवलेले असत व सूर्यप्रकाशात लखलखत. लाल,हिरव्या व पांढऱ्या इमारतीच्या मस्तकांवर दोन हजार घुमटांचा व क्रॉसांचा जणू काही भव्य मुकुटच आहे असे दुरून भासे.पण राजधानीत पाऊल टाकताच ही माया नष्ट होई व मॉस्को एक प्रचंड व अस्ताव्यस्त बसलेले खेडेगावच आहे असे वाटे.रस्ते रुंद होते.पण त्यावरून जाणाऱ्यांना ढोपर-ढोपर चिखलातून जावे लागे. दारुडे व भिकारी यांची सर्वत्र मुंग्याप्रमाणे गर्दी असे,बुजबुजाट असे.
सार्वजनिक स्नानगृहांपाशी दिगंबर स्त्री-पुरुषांची ही गर्दी असे.एवढेच नव्हे,गलिच्छ गोष्टी बोलत.या राजधानीतील हवा जणू गुदमरून सोडी,धूर,दारूचा वास,घाणीची दुर्गंधी, खाद्यपेयांचा घमघमाट अशा संमिश्र वासाने भरलेली हवा नाकाने हूंगणे,आत घेणे हे मोठे दिव्यच असे.भटकणारी डुकरे,झिंगलेले शिपाई रस्त्यांतून लोळताना दिसत व त्यांना जरा कोणाचा अडथळा झाला,तर ते ताबडतोब ठोसे द्यायला तयार असत.आरंभीच्या झारांच्या काळात रशियाची अशी दुर्दशा होती.पण सतराव्या शतकाच्या अखेरीस झार पीटर अलेक्झीविच याने या प्रचंडकाय रशियन राक्षसाला आपल्या मजबूत हातांनी झोपेतून जागे केले व त्याला पश्चिम युरोपच्या सुधारणेकडे किलकिल्या डोळ्यांनी पाहावयास लावले.झार फिओडोर हा पीटरचा भाऊ.तो स्पायनोझाच्या मरणानंतर पाच वर्षांनी म्हणजे १६८२ साली मरण पावला.तेव्हा पीटर दहा वर्षांचा होता.पीटरचा सोळा वर्षांचा इव्हान नावाचा एक दुबळा भाऊ होता.पीटर व इव्हान हे दोघे संयुक्त राजे निवडले गेले.पण दोघेही लहान असल्यामुळे त्यांची बहीण सोफिया राज्यकारभार पाही.ती महत्त्वाकांक्षी असल्यामुळे तिने पीटरला मॉस्कोच्या उपनगरात पाठवले व सिंहासनाचा कब्जा घेतला.तिच्या मनात त्याला आपल्या मार्गातून कायमचे दूर करायचे होते. पण तिने त्याला तूर्त तात्पुरते दूर केले.पीटर पंधरा वर्षांचा होईतो त्याला लिहा-वाचावयासही येत नव्हते व बोटे मोडूनही दहापर्यंत आकडे मोजता येत नव्हते.पण त्याला मोडतोड करण्याचा नाद फार होता.हातांनी काही तरी करीत राहण्याची व खेळातील गलबते बांधण्याची त्याला आवड होती.
बालवीर जमवून तो लुटपुटीच्या लढायाही खेळे.हेच बालवीर पुढे रशियन सैन्याचा कणा बनले.यातून रशियन सेना उभी राहिली.
आरंभीच्या झारांच्या काळात परकीयांना मॉस्कोत राहण्यास बंदी होती.त्यांना मॉस्कोच्या उपनगरात राहावे लागे.पीटरची व या परकीयांची गाठ पडे व त्यांच्याविषयी त्याला प्रेम वाटे. त्याला त्या परकीयांनी जीवनाची एक नवीनच तऱ्हा दाखवली.ती त्याला अधिक रसमय वाटल्यामुळे त्याचे मन तिच्याकडे ओढले गेले.
डच गलबते बांधणारे,साहसी इंग्रज प्रवासी, इटालियन न्हावी,स्कॉच व्यापारी,पॅरिसमधील नबाब,जर्मन पंतोजी,
डॅनिश वेश्या या सर्वांशी तो परिचय करून घेऊ लागला.
पीटर सुशिक्षित नव्हता.पण या सर्वसंग्राहक वातावरणात त्याची दृष्टी मोठी होऊ लागली.तो जणू जगाचा नागरिक बनू लागला.त्याचे जिज्ञासू मन जे जे मिळे,ते ते घेई. त्याच्याशी संबंध आलेल्या परकीय स्त्री-पुरुषांचे काही गुण व बरेचसे दुर्गुणही त्याने घेतले. पश्चिम युरोपातील मोठमोठ्या राजांविषयी अनेक कथा त्याच्या कानी आल्या व आपणही त्यांच्याप्रमाणे व्हावे, असे त्याला वाटू लागले.सतराव्या वर्षी त्याने गोष्टी केल्या.
स्वतःचे लग्न व बहीण सोफिया हिची हकालपट्टी.
एवढ्याशा वयात आपण होऊन मुले या गोष्टी करीत नाहीत.त्याचा अर्धवट भाऊ इव्हान पुढे लवकरच मेला व पीटर रशियाचा एकमेव सत्ताधीश झाला.उपनगरातील विदेशी मित्रमंडळींच्या संगतीत राहण्यास गेला,तेव्हा सरदारांनी व दरबारी लोकांनी नाके मुरडली.पीटर
धष्टपुष्ट,रानवट व दांडगट होता.त्याचे शरीर खूप विकसित झाले होते.पण मन अविकसितच राहिले.तो रंगाने काळसर असून सहा फूट साडेसहा इंच उंच होता.त्याचे ओठ जाड होते. अशा या अगडबंब व धिप्पाड माणसाची वृत्ती उत्कट होती.त्याला स्वतःचे काहीही सोडू नये असे वाटे.जीवनात त्याला काहीच गंभीर वाटत नसे.सारे जग जणू त्याचे खेळणे झाले होते.त्याला गलबते बांधण्याची फार हौस होती. तो सांगे, 'मला पीटर दि कार्पेटर म्हणा.' राजदंड हाती मिरविण्यापेक्षा घण हातात घेऊन काम करणे त्याला अधिक आवडे.
लहानपणी त्याने अल्प प्रमाणावर सैन्य उभारले होते.
आता गलबते बांधून आरमाराचाही पाया घालावा,असे त्याच्या मनात आले.त्याची बालवृत्ती जन्मभर टिकली.
आरमार बांधण्यास प्रारंभ करतेवेळी त्याच्याजवळ फार मोठ्या योजना होत्या,असे नाही.त्याची ती गलबते म्हणजे त्याची करमणूक होती.आपल्या बालवीरांना नकली बंदुका देऊन त्याने खेळातील शिपाई बनवले होते.तद्वतच हेही.पण गलबते हवी असतील,तर समुद्र हवा हे लवकरच त्याच्या लक्षात आले.लहान मुलगा मनात येईल ते करू पाहतो तद्वत पीटर लगेच काळ्या समुद्राकडे आपले बुभुक्षित डोळे फेकू लागला.दक्षिणेकडे काळा समुद्र होता व पश्चिमेकडे बाल्टिक समुद्र होता.काळ्या समुद्रात प्रवेश मिळावा म्हणून सैन्य घेऊन त्याने तुर्कोंवर स्वारी केली.पण अझोव्ह येथे त्याचा पराजय झाला.तरी मॉस्कोला परत येऊन आपण मोठा जय मिळवला अशी बढाई तो प्रजेपुढे मारू लागला. त्याने दारूकाम सोडून विजयोत्सव केला. दारूकाम त्याला फार आवडे.त्याच्या करमणुकीचे प्रकार मुलांच्या करमणुकीच्या प्रकारांसारखेच असत.बाल्टिक किनारा मिळवण्यासाठी त्याने स्वीडनच्या बाराव्या चार्लस राजाशी लढाई सुरू केली.ती बरीच वर्षे चालली.
त्याच्या आयुष्याचा बराचसा भाग त्यात गेला.पण दारूकाम सोडणे व इतर करमणुकी यांच्याआड हे युद्ध येत नव्हते आणि तिकडे रणांगणावर शिपाई मेले म्हणून त्याला त्याचे काय वाटणार होते? मरणाऱ्यांची जागा घेण्यास दुसरे भरपूर होते.पण लढाईचे काही झाले तरी, एक दिवसही दारूकाम सुटले नाही किंवा इतर करमणुकी झाल्या नाहीत,तर मात्र तो दिवस फुकट गेला असे त्याला वाटे.चार्लसशी युद्ध चालू असता त्याचे लक्ष दुसऱ्या एका गंमतीकडे गेले. आरमार व लष्कर निर्माण केल्यावर नवीन रशिया निर्माण करण्याचे त्याच्या मनाने घेतले. तो आपली निरनिराळी खेळणी घेई व पुन्हापुन्हा वेगवेगळ्या रीतींनी रची व मांडी.वस्तू असतील तशाच ठेवणे त्याला आवडत नसे.त्याने इतर खेळण्यांत फेरबदल केला तद्वत रशियालाही नवा आकार,नवे रंगरूप देण्याचे त्याच्या मनाने घेतले.मॉस्कोच्या उपनगरातील परकीयांविषयी त्याला आदर वाटे.म्हणून त्याने सारा रशिया परकीयांनी भरून टाकण्याचे ठरवले.
रशियाला युरोपच्या पातळीवर आणण्याच्या कामी पश्चिम युरोपचा अभ्यास करणे अवश्य होते.म्हणून तो हॉलंड,
फ्रान्स,जर्मनी,इंग्लंड वगैरे देशांत गेला व पश्चिमेकडील संस्कृतीचे काही कपडे घेऊन आला.नवीन कपड्यांनी भरलेले एक कपाटही त्याने बरोबर आणले.आपण आणलेल्या कपड्यांसारखेच कपडे प्रजेने वापरावेत,
आपण शिकून आलेल्या चालीरितींसारख्या चालीरीती प्रजेने सुरू कराव्यात अशा उद्योगाला तो लागला.
शिपायांना कात्र्या देऊन रस्त्यांवरून जाणाऱ्या दाढाळ शेतकऱ्यांच्या दाढ्या त्याने कापायला अगर उपटायला सांगितले.त्याने स्वतः सरदारांचे व दरबारी लोकांचे कपडे फाडून टाकले व पश्चिमेकडचे फॅशनेबल कपडे त्यांनी वापरावेत, असा अट्टाहास चालवला.झारने चालवलेल्या या सुधारणा पाहून रशियन पोप रागावला. रशियातील धर्मगुरू स्वतःला जनतेचा बाप म्हणवीत असे.त्याच्या मताप्रमाणे मानव ईश्वराची प्रतिकृती असल्यामुळे त्यांनी ईश्वराप्रमाणे लांब दाढ्या ठेवल्याच पाहिजेत व लांब चुण्यांचे झगे घातलेच पाहिजेत. रशियन धर्मगुरूने त्यामुळे असे फर्मान काढले की,सर्व धार्मिक लोकांनी राजाचा हुकूम अमान्य करून दाढ्या,निदान हनुवटीवर तरी ठेवाव्यात. नाही तर एखाद्या पेटीत तरी आपली दाढी राखून ठेवावी.म्हणजे मरताना ती आपल्याबरोबर नेता येईल.दाढीवरील या धार्मिक चर्चेला गंभीर स्वरूप आले.पीटरने पोपविरुद्ध बंड केले.व तो स्वतःच धर्माचा मुख्य झाला.पण पीटरच्या इतर सुधारणा काही इतक्या पोरकट नव्हत्या.काही
तर खरोखरच महत्त्वाच्या होत्या.त्याने सीनेट नेमले,राज्याचे आठ भाग केले,रस्ते बांधले,कालवे खणले,शाळा काढल्या,विद्यापीठे स्थापिली,दवाखाने काढले,नाटकगृहे बांधली, नवीन धंदे निर्मिले.
नाटकगृहे तयार झाली की नाटकेही निर्माण होऊ लागतील असे त्याला वाटले.ज्या नाटकात त्याची स्तुती असे त्या नाटकांसाठी ही नाट्यगृहे होती.हे सारे अंतःस्फूर्तीने त्याच्या मनात येई म्हणून तो करीत असे.
जीवनाशी त्याच्या चाललेल्या खेळातलाच तो एक भाग होता.तो जे काही करी त्यात योजना नसे,पद्धत नसे,विचार नसे,योजनेशिवाय काम करणे हीच त्याची योजना.दुसऱ्या देशात पाहिलेले जे जे त्याला आवडे ते ते तो ताबडतोब आपल्या देशात आणी.त्याचे अशिक्षित पण जिज्ञासू मन सारखे प्रयोग करीत असे.हॉलंडमध्ये एक दंतवैद्य दात काढीत आहे असे आढळले,तेव्हा पीटरने रशियात परत येताच स्वतःच दात काढण्यास सुरुवात केली.एका शस्त्रक्रियातज्ज्ञाने केलेले ऑपरेशन त्याने पाहिले व लगेच स्वतःही तसेच एक ऑपरेशन करण्याची लहर त्याला आली. अर्थातच,त्याचा रोगी मेला हे काय सांगावयास पाहिजे ? कुटुंबीयांची नुकसानभरपाई त्या रोग्याच्या प्रेतयात्रेस स्वतः हजर राहून त्याने केली.त्याला गलबतांचा नाद नित्य असल्यामुळे शेवटी त्याने बाल्टिक समुद्रकाठाच्या दलदलीच्या प्रदेशात एक शहर बसवले व त्याला सेंट पीटर्सबर्ग असे जर्मन नाव दिले.आपल्या परसात असल्याप्रमाणे येथे आरमार राहील,असे त्याला वाटले.हे शहर सुंदर करण्यासाठी त्याने चौदाव्या लुईच्या दरबारातून काही कलावंत व कारागीर मागवून घेतले.पण हे शहर बांधता बांधता एक लक्ष तीस हजार लोक मेले.
आपला देश सुसंस्कृत करण्यासाठी तो जन्मभर धडपडला.पण स्वतः मात्र रानटीच राहिला.फ्रेंच दरबरातील रीतिरिवाज रशियात सुरू करावेत असा त्याचा हट्ट होता.त्याने आपल्या गुरूजींची पाठ वेताने फोडली.तो तत्त्वज्ञानी लोकांशी चर्चा करी व शेतकऱ्यांच्या अंगावर दारू ओतून त्यांना काडी लावून देई. त्याने अनाथांसाठी अनाथालये स्थापिली;पण स्वतःचा मुलगा अलेक्सिस याला आज्ञाभंगासाठी मरेपर्यंत झोडपले.
शरीररचनाशास्त्राचा तो अभ्यासक असल्यामुळे त्याने पुढील विक्षिप्त प्रकार केला.त्याच्या एका वेश्येने झारिनाची निंदा केल्याबद्दल त्याने तिला शिरच्छेदाची शिक्षा दिली.तिचा वध झाल्यावर तिचे डोके मागून घेऊन जमलेल्या लोकांना मानेमधील स्नायू व शिरा दाखवून त्याने शरीररचनेवर एक व्याख्यान झोडले! त्याला आपल्या प्रजेच्या मुंडक्यांशी खेळण्याचे वेडच होते.एकदा त्याने एकाच वेळेस बारा हजार बंडखोर सैनिकांची धडे शिरापासून वेगळी केली.मानवजातीची कथा-हेन्री थॉमस,
सानेगुरुजी,झारीना व्याभिचारिणी आहे हे कळल्यावर त्याने तिच्या प्रियकराचे डोके कापले व ते अल्कोहोलमध्ये बुडवून तिच्या टेबलावर जणू फ्लॉवरपॉट म्हणून ठेवले.तो झारिनाचाही शिरच्छेद करणार होता.पण इतक्यात स्वतःच आजारी पडून तो त्रेपन्नाव्या वर्षी (१७२५ साली) मेला.तेव्हा रस्त्यातील लोक एकमेकांना म्हणू लागले,"मांजर मेले,आता उंदीर त्याला पुरतील." फ्रेडरिक दि ग्रेट लिहितो,'हा पीटर म्हणजे एक शौर्यधैर्यसंपन्न पिशाच्चच होते.मानवजातीचे सारे दोष त्याच्या अंगी होते पण गुण मात्र फारच थोडे होते.
शांतताकाळी दुष्ट,युद्धकाळी दुबळा,परकीयांनी प्रशंसिलेला,प्रजेने तिरस्कारिलेला हा राजा मूर्ख;पण दैवशाली होता.सम्राटाला आपली नियंत्रित सत्ता जितकी चालविता येणे शक्य होते,तितकी त्याने चालविली.' मानवजातीची त्याला पर्वा नसे.तो जे काही करी, ते स्वत:च्या सुखासाठी म्हणून करी.पण त्याने केलेल्या अनेक खेळांत प्रजा साक्षर करणे हाही एक खेळ होता व त्यामुळे न कळत का होईना त्याने स्वतःचे डेथ-वॉरंटच लिहिले! कारण,ज्ञानाचा आरंभ म्हणजेच अनियंत्रित सत्तेचा अंत.सेंटपीटर्सबर्गचा हा हडेलहप्पी हुकूमशहाच पुढील रशियन राज्यक्रांतीचा आजोबा होय.
२८ नोव्हेंबर २३ या लेखमालेतील पुढील भाग..