माणूस हा परिस्थितीचे अपत्य नसून परिस्थिती माणसाचे अपत्य असते.-बेंजामिन डिझरेली
मानवी आयुष्यात काही घटना प्रसंग माणसाला परत परत विचार करायला भाग पाडतात.तो घटना आणि प्रसंग काहीतरी नवीन शिकवणारा असेल तर तो 'जिवंत' विचार रात्र दिवस माणसाचा पाठलाग करतो. त्याला काही चैनच पडत नाही.
असाच एक प्रसंग मला विचार करण्याचे काम देवून गेला.
तो २६ जानेवारी २०२४ रोजी घडला. निमित्त होते.'मॅट्रिक फेल' विजय पुस्तकांच्या विश्वात' लोकमत या वृत्तपत्रात आलेला माझा लेख (वृत्तपत्र हे ज्ञानाचे स्तोत्र असते.) दुसऱ्या दिवशी मी नियमाप्रमाणे कामावरती गेलो त्या दिवशी हा लेख वाचून 'शिवप्रसाद कात्रे' कोल्हापूर वय ७१ वर्ष यांनी मला फोन केला पण कंपनीमध्ये फोन वापरायची परवानगी नसल्या कारणाने माझा फोन आठ तास बंद अवस्थेत असतो.मग त्यांनी शोधा शोध करून हा लेख लिहिणारे 'भरत बुटाले'यांना फोन लावून विचारले की मी विजय ला फोन लावत आहे.पण त्यांचा फोन बंद लागतो आहे.आपण दोघेजण त्यांना भेटायला जाऊ लेख खूपच छान लिहिला आहे.आणि सध्याच्या या जगामध्ये अशी लोक आपल्या आसपास आहेत याचंच आश्चर्य वाटतं आहे,आपण जाऊ लवकरच…. सायंकाळी मला भरत बुटाले साहेबांचा फोन आला,व त्यांनी घडलेली घटना मला सांगितली.संध्याकाळी पाच नंतर त्यांचा तुम्हाला फोन येईल असं त्यांनी मला सांगितलं.
त्या दिवशी फोन आला नाही म्हणून मी त्यांच्याकडून त्यांचा नंबर घेतला व त्यांना फोन केला.त्यांनी मला मी टोप मध्ये कुठे राहतो,कुठे काम करतो ही विचारपुस केली.व भेटू असे म्हणाले.२६ जानेवारी दिवशी सुट्टी होती.
त्यांचा मला फोन आला मी भेटायला येतो म्हणून मी म्हणालो हो,यावेळी मी पुरुषोत्तम अग्रवाल यांचे कबीर कबीर पुस्तक वाचत होतो.वाट पाहत होतो त्यांच्या येण्याची आणि त्यांचा फोन आला. त्यांना मी सामोरा गेलो.त्यांना पाहिल्यानंतर
खलील जिब्रान यांनी द प्रॉफेट या पुस्तकांत म्हटलेलं वाक्य आठवलं झाडाचं एक जरी पान सुकून पिवळं झालं तरी त्यामागे समग्र वृक्षाचं मौन जाणतेपण उभं असतं."
मानवी जीवनातील सुखदुःखाच्या खाच खळग्यांनी भरलेलं तरीही समृद्ध आयुष्य जगलेले व्यक्तिमत्व माझ्यासमोर उभं होत.घरी घेऊन आलो आणि आमच्यात सुरू झाला एक जिता जागता संवाद …!
त्यांना वर्षाकाठी काही ठराविक रक्कम मिळते त्यामध्ये संपूर्ण वर्षं ते काटकसरीने जगतात. त्यामध्ये मोबाईल रिचार्ज,चार चाकी गाडीचा पेट्रोल खर्च,महिन्याचे किराणा व इतर संसारिक खर्च महिन्यासाठी आठ ते नऊ हजार रुपये एवढीच मर्यादा आहे.मग त्यांनी सांगितला आपला जीवनक्रम जगण्याचा,माझ्याकडे चार चाकी गाडी आहे.
म्हणून मला सर्वजण हा 'मोठा' माणूस आहे,याला काय कमी आहे,असं म्हणतात.हो माझ्याकडे मोठी गाडी आहे.
पण मी फक्त महिन्याला २०० किलोमीटर प्रवास करू शकतो.त्याच्यावर एक किलोमीटर सुद्धा नाही.
'ना'ईलाजाची चौकट आहे.मनात फार असणं आणि ते प्रत्यक्षात होणं यात खूप अंतर असतं.जर मला एखाद्या महिन्यात जास्त किलोमीटर प्रवास करायचा असेल तर मी अगोदरच्या महिन्यात कमी प्रवास करून ते पेट्रोल वाचवतो.व ते शिल्लक राहिलेले पेट्रोल पुढच्या महिन्यातील जास्तीच्या प्रवासासाठी वापरतो.पण तरीही मी मनमौजी आयुष्य जगतो.कमी पण जास्तीच ते व्यक्तीत्व मला खूपच आशावादी आणि आनंदी वाटले. नाईलाजाची चौकट असून सुद्धा आनंदी व समृद्धी आयुष्य जगता येतं हे मी शिकत होतो.
व्हाट्सअपचा आपण विचार न करता करत असणारा वापर आलेला कोणताही लेख अथवा संदेश न वाचता न समजून घेता फक्त पाठवण्याची स्पर्धा लागलेल्या स्पर्धेतील आपण एक स्पर्धक आहोत हेही आपल्याला कळेना झालं आहे.एका महत्वपूर्ण गंभीर असणाऱ्या संदेशामध्ये आपण इमोजी चा वापर करतो. जास्तीत जास्त इमोजी चा वापर करावाच असा काही लिखित नियम नाही.या इमोजी मुळे काय होतं,कळत न कळत आपल्याकडून चुकीची इमोजी त्या ठिकाणी टाकली जाते.
त्यामुळे त्या संदेशातील महत्त्वाचा गाभा व गर्भित अर्थ नष्ट होतो आणि त्याचं रूपांतर एका विनोदात होतं हे आपल्या गावीही नसतं. किती सरळ साधं तत्वज्ञान आहे की माणसांनी कसं काटेकोरपणे जगायला हवं.हे सर्व मी मन लावून श्रवण करत होतो.एक पुस्तक स्वतःहून मला पुस्तक समजावून सांगत आहे असं वाटत होतं.हे सांगत असताना त्यांनी एक घडलेला जिवंत प्रसंग सांगितला आणि माझ्या अंगावर सरर्कन काटा आला.तर तो घडलेला प्रसंग असा होता.जो त्यांना त्यांच्या कोल्हापुरातील काही मित्रांनी सांगितलेला होता.
एक हरीण आपल्या पाडसासोबत खेळत होतं त्यांच खेळणं म्हणजे निसर्ग समजून घेणं,जीवन जगताना कोणते नियम पाळणं याचं ज्ञान घेणं.खेळता खेळता हे पिल्ल एका कड्यावरून दहा-पंधरा फुट खाली पडलं,
तिथून काही अंतरावरच वाहनांची वर्दळ होती.त्यामुळे त्या आईला काहीच करता येत नव्हतं त्यामुळे आपल्या जीवाचं काहीतरी बर वाईट होईल.एखादं वाहन आपल्याला धडकेल यामुळे ती आई थोड्या दूर अंतरावर एका झाडाजवळ उभी होती,व कोणी तरी मदत करेल या आशेने डोळ्यात प्राण आणून ती वाट पाहत होती.बराच वेळ निघून गेला आणि संवेदनशील असणाऱ्या एका माणसाला ही आई दिसली.आणि त्याने गाडीतून उतरून आसपास बघितले.आणि त्याला हरीण का थांबले आहे?याचे उत्तर मिळालं तिच पिल्लू काही अंतरावर सुरक्षित होतं.थोडसं खरचटलं होतं.त्याला वर काढण्यासाठी दोरीची आवश्यकता होती पण त्याच्याजवळ दोरी नव्हती.त्याने मनापासून मदत करायचे ठरवल्यामुळे,त्याने मदतीसाठी हात केला आणि दोरी गाडीत असणाऱ्या एका दुसऱ्या गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि त्या दोघांनी मिळून दोरी टाकून त्या पाडसाला वरती काढलं. हे सर्व ती हरीण आई पाहत होती.पिल्लाला वर काढल्यानंतर ते हरिण जवळ आले तिने पिल्लाकडे बघितलं त्या पिल्लानं आणि त्या हरिण असणाऱ्या आईने त्या दोघा उपकार करत्या लोकांच्या पायावरती डोकं ठेवून त्यांचे मनापासून आभार मानले.त्याचं ते हे अलौकिक कृत्य पाहून त्या दोघा लोकांच्या डोळ्यातही अश्रू आले.एका गाडीत त्या दोघांना घेऊन काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका घरवजा दवाखाना असणाऱ्या घरात त्या पाडसाच्या जखमेवरती औषध उपचार करून त्या दोघांना परत त्यांच्या मुळ ठिकाणी आणून सोडलं.ही घटना घडून बरेच दिवस झाले.काही कालावधी निघून गेल्यानंतर विसरण्याच्या सवयी नुसार ही घटना त्या उपचार करणाऱ्या माणसाकडून विसरली गेली.पण दुसऱ्या बाजूला ही घटना विसरली गेली नव्हती.बऱ्याच दिवसानंतर सकाळी त्या माणसाच्या दारावरती टकटक झाली.ती झालेली टकटक ही विचार करायला लावणारी होती.त्या व्यक्तीने दरवाजा उघडला आणि समोर पाहतो तर काय त्या माणसाचा विश्वास बसेना कारण त्याच्या अंगणामध्ये दहा ते पंधरा हरणांचा कळप उभा होता आणि त्या कळपाच्या पुढे खरचटलं म्हणून उपचार केलेले पाडस आणि त्याची आई होती. जणू काही ती सर्व सांगत होती की तुम्ही आमच्यावर जी दया दाखवली,आमच्यावर प्रेम केलं.व आमच्यावर वेळीच उपचार केले त्याबद्दल आम्ही आमच्या संपूर्ण कळपाच्या वतीने आपले व आपल्या माणुसकीचे आभार व धन्यवाद द्यायला एकत्रित आलेलो आहोत.हे पाहून त्या व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू अखंडपणे वाहत होते.गोष्ट अजून संपलेले नाही.थोडं थांबा दोन मिनिटे डोळे बंद करा.आणि वर घडलेली घटना बंद डोळ्यासमोर पहा,तुम्हाला जो अनुभव येईल जी संवेदना येईल ती संवेदना,तो अनुभव म्हणजेच जगणं असतं.सर्वच माणसांनी जर ठरवून थोडं थोडं चांगलं वागलं तर एक दिवस संपूर्ण मानव जात चांगली बनेल.
युव्हाल नोआ हरारी यांनी सेपियन्स या पुस्तकात नोंद केली आहे.ती पुढीलप्रमाणे विज्ञानाच्या इतिवृत्तामध्ये सगळ्यांत प्राणघातक जात जर कोणती असेल तर ती आहे 'माणूस' ही नोंद त्या हरणांनी वाचलेली नाही.पण त्या हरणांच्या मदतीने आपण ती नोंद हळूहळू पुसू शकतो.निसर्ग,प्राणी पक्षी यांच्यासोबत जर आपण जात राहिलो. यांना जर समजून घेत गेलो.त्यांच्या संवेदना समजून त्यांना जर आपण दयाळूपणे वागवले.तर
कधीतरी भविष्यातील एखाद्या पुस्तकांमध्ये एक नोंद असेल ती पुढील प्रमाणे विज्ञानाच्या इतिवृत्तामध्ये सगळ्यात प्रेमळ जात कोणती असेल तर ती 'माणूस' यासाठी या क्षणापासून आपल्याला चांगला माणूस म्हणून जगायचं आहे.आता प्रश्न असा पडतो की खरचटलेलं पाडस आणि त्याच्यासोबत गेलेली आई ही गाडीतून गेले होते.मग तो हरणाचा कळप अचूकपणे कसा काय त्या उपचार करणाऱ्या उपकार करत्या माणसाच्या घरासमोर गेला.चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात,पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात.- सेंट ऑगस्टाइन ( ३५४ - ४३०) धर्मशास्त्र अभ्यासक आणि कॅथोलिक बिशप धर्मोपदेशक यांनी म्हटलेलं आहे.त्यांनी सांगितलेली गोष्ट संपली.
आणि इथूनच पुढे सुरू झाला माझा विचार करण्याचा प्रवास सुरू..! 'शिवप्रसाद कात्रे' हे त्या दिवशी आपल्या ८६ वर्षाच्या मित्राला भेटायला पेठवडगावंला गेले होते.
येताना मला भेटले यांच्या भेटीमुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणखी निकोप झाला.त्यांचे आभार व धन्यवाद…! शेवटी निसर्गामध्ये झाडाच्या फांदी वरती आपल्या घरट्यात पक्षी जे गाणं गातो.ते गाणं आनंदाचं गाणं असतं,तर दुसरीकडे सिमेंटच्या घरामध्ये पिंजऱ्यात असणारा पक्षी जे गाणं गातो ते गाणं असतं 'ना'ईलाजाचं..हिप्पोक्रेट्स यांनी फार अगोदरच सांगितले आहे."दोन गोष्टींची सवय लावा,
मदत करण्याची किंवा किमान,कोणतीही हानी न करण्याची…!"
मला 'मॅट्रिक फेल' विजय पुस्तकांच्या विश्वात' या लेखापर्यंत घेवून जाण्यासाठी प्रयत्न करणारे डॉ.दिपक शेटे,माझी धर्मपत्नी सौ.मेघा गायकवाड,त्याचबरोबर माधव गव्हाणे (सॉक्रेटिस) यांचे आभार व धन्यवाद.