▶ एके दिवशी अचानक पुण्याचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांचा फोन आला."वाघोली गावाजवळ बिबट्याची दोन पिल्लं आईपासून दुरावली आहेत आणि त्यांना आपल्या मदतीची गरज आहे.लवकरात लवकर ऑफिसला ये." तसाच तडक गणेश खिंडीतल्या वन विभागाच्या कार्यालयात गेलो.सहाय्यक वनसंरक्षक मधुकर तेलंग माझीच वाट पाहत होते.सत्यजितने माझ्यासाठी छानसा लेमन टी मागवला.तो स्वादिष्ट चहा पिऊन मी आणि तेलंगसाहेब त्यांच्या शासकीय सुमोने मोहिमेवर निघालो. पुणे-नगर रोडवर नेहमीप्रमाणेच प्रचंड ट्रॅफिक होतं.त्यामुळे वाघोलीला पोचायला आम्हाला खूप वेळ लागला.तिथून केसनंद फाट्यावर उजवीकडे वळून न्हावी सांडस नावाच्या छोट्या गावात पोहोचलो.
जागोजागी प्रचंड प्रमाणात उसाची शेती दिसत होती.
गेल्या अनेक वर्षांमध्ये इथल्या शेतकऱ्यांनी ज्वारी-बाजरीची पारंपरिक शेती सोडून पैशांच्या आशेने उसाची लागवड केली होती.उसाचं उत्पन्नही चांगलं येत होतं.पण अलीकडच्या काळात जुन्नर आणि भीमाशंकरच्या जंगलांतल्या बिबट्यांनी इथल्या उसाच्या शेतांमध्ये बस्तान बसवायला सुरुवात केली होती.त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना नवाच घोर लागला होता.दुपारच्या सुमारास आम्ही घटनास्थळी पोहोचलो.झालं असं होतं,की ऊसतोडणी कामगारांनी पन्नासएक फूट रुंदीचा लांबलचक पट्टा कापून टाकला होता.ज्या लाइनवरून त्यांनी पट्टा कापायला घेतला तिथून तीन-चार फुटांतच दाट उसामध्ये बिबट्याची मादी दोन पिल्लांसह विश्रांती घेत होती. कोयत्याने ऊस छाटतानाचे सपासप आवाज, कामगारांचा गलका आणि ट्रॅक्टरच्या घरघराटामुळे तिला पिल्लांसहित पळून जाता आलं नाही.त्यामुळे पिल्लं तिथेच सोडून ती पसार झाली.सूर्य थोडा वर आल्यावर मात्र तिच्या पिल्लांना भूक लागली आणि आईची आठवण आली. त्यांनी आपल्या आईला आवाज द्यायला सुरुवात केल्यावर लोकांना त्यांचं अस्तित्व लक्षात आलं आणि त्यांनी ताबडतोब वनविभागाला कळवलं.
वास्तविक काही शेतकऱ्यांनी या मादीला काही दिवसांपूर्वीच पाहिलं होतं.आदल्या दिवशी तिथे बिबट्याला पकडायचा पिंजराही आणून ठेवला होता;पण त्यात ती सापडली नव्हती.आईपासून दुरावलेल्या या पिल्लांना वन विभागाच्या लोकांनी पिंजऱ्याजवळ आणून ठेवलं होतं.ही पिल्लं सावलीसाठी पिंजऱ्याच्या खाली असलेल्या जागेमध्ये जाऊन बसली होती. त्यामुळे कुणालाच सहजी दिसत नव्हती,मात्र अधूनमधून त्यांच्या आईला ती हाक मात्र देत होती.हलकेच पिंजऱ्याखाली हात घालून एकेकाला बाहेर काढलं आणि मांडीवर घेतलं. दोन्ही पिल्लं छान गुबगुबीत होती.त्यांचे घारोळे डोळे उघडलेले होते.साधारण अर्धा किलो वजनाची ती पिल्लं दोन आठवड्यांची दिवसांची असावीत.असं मला वाटलं.
मायेचा हात मिळाल्याने ती काहीशी आश्वस्त झाली.
तिथेच मला दोन वाट्या दिसल्या आणि मला हसू आवरेना.पुण्याहून निघताना इथल्या कर्मचाऱ्यांना दूध आणि कोमट पाणी समप्रमाणात घेऊन पिल्लांना पाजावं,असा निरोप द्यायला मी सत्यजितला सांगितलं होतं. पण माझी ही सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचताना काही तरी गडबड झाली असावी.तिथल्या कर्मचाऱ्यांनी पिल्लांसमोर एका वाटीत दूध आणि दुसऱ्या वाटीत कोमट पाणी ठेवलेलं दिसत होतं.ते एकत्र केलेलं नव्हतं.शिवाय या तान्ह्या पिल्लांना वाटीतून पाणी पिणं कसं कळावं? त्यामुळे आम्ही पोहोचलो तेव्हा ती चांगलीच भुकेजलेली होती.सुदैवाने जवळच्या एका घरात बाळाची दूध पिण्याची बाटली मिळाली.एका शेळीचं दूध काढलं आणि त्यात पाणी टाकून बाटलीत भरलं.बाटली त्यांच्या तोंडासमोर धरली;पण प्रतिसाद शून्य ! त्यांना भूक तर प्रचंड लागलेली दिसत होती.कारण एव्हाना त्यांच्या ओरडण्याचा व्हॉल्युम वाढलेला होता.मग मी माझी जुनी आयडिया वापरली. सॅकमधला टर्किश नॅपकिन कोमट पाण्यात भिजवून पिळून काढला.
एका पिल्लाला मांडीवर घेतलं.त्याच्या तोंडात बाटलीचं बूच सारलं आणि ओलसर खरखरीत नॅपकिन त्याच्या डोक्यावरून हलकेच फिरवला.
माझ्या मांडीला आईची कूस आणि टर्किशच्या स्पर्शाला जीभ मानून त्याने पचक पचक करत बाटलीतलं दूध प्यायला सुरुवात केली.
दहा मिनिटांत दोघांचीही पोटं भरली आणि ती पुन्हा शहाण्यासारखी पिंजऱ्याखालच्या सावलीत जाऊन झोपली.दुपारचे दोन वाजले होते. आम्हीही जवळच्या टपरीवजा हॉटेलमध्ये भेळ खाऊन पेटपूजा आटोपली आणि पुढच्या कामाला लागलो.परतल्यावर आम्ही परिसराची पाहणी केली.उसासाठी पाणी धरलेल्या शेतात ओलसर जमिनीवर बाळांच्या आईच्या पाऊलखुणा आम्हाला काही ठिकाणी दिसून आल्या;परंतु त्यांच्या तुटक अस्तित्वामुळे तिच्या चालण्याची दिशा समजणं अवघड होते.संपूर्ण क्षेत्राचा सर्व्हे करून आम्ही परत आलो.एव्हाना पिल्लांना पुन्हा भूक लागली होती.त्यामुळे ती मोठमोठ्याने माँव माँव करू लागली होती. आम्ही लगोलग त्यांचं दुसरं फीडिंग उरकून घेतलं.आता आम्ही त्या कामात तरबेज झालो होतो.दूध पिऊन झाल्यावर पिल्लं पुन्हा पिंजऱ्याखाली जाऊन झोपली.त्यानंतर आम्ही स्थानिकांशी चर्चा केली.संध्याकाळी कुणीही एकट्या- दुकट्याने फिरू नये,शक्यतो घरीच थांबावं,असं फर्मान तिथल्या तरुण सरपंचाने काढलं.त्यानुसार सगळे इमानदारीने आपापल्या घरात टीव्ही बघत बसले.काही जवान मंडळी मात्र बिडीकाडी ओढत,तंबाखू चघळत गावाच्या वेशीवर गप्पाटप्पा करत बसली.
संध्याकाळचे सहा वाजले होते.ऊसतोडणीचं कामही थांबलं होतं.पिल्लांना शेवटचं फीडिंग करावं म्हणून मी एका पिल्लाला मांडीवर घेतलं. पिंजऱ्यापाशी मी,
तेलंगसाहेब आणि वन विभागाच्या सेवेत रुजू झालेल्या दोन तरुण मुली होत्या.आमची सुमो साधारण १०० मीटरवर उभी होती.तिथे काही कर्मचारी आणि गावातली पुढारी मंडळी थांबली होती.अख्खा परिसर निर्मनुष्य होता.मी एका पिल्लाचं फीडिंग संपवून दुसऱ्याला मांडीवर घेतलं.तेवढ्यात सुमोपाशी थांबलेल्या लोकांना आमच्या दिशेने हातवारे करायला सुरुवात केली.ते आम्हाला मागे वळून बघायला सांगत होते.आम्ही मागे वळून पाहिलं, तर पिल्लांची आई स्वतःच त्यांना न्यायला आली होती.तिच्या बाळांना आम्ही नक्की काय करतोय हे ती पाहत होती.
आमच्यापासून ती फक्त पन्नास मीटरवर असेल. बिबटीण एवढ्या जवळ आलेल्या पाहून दोन तरुण मुली घाबरल्या.
परिस्थिती अवघड झाली होती.या मुलींनी पळापळ केली असती तर त्या मादीने त्यांना मुळीच सोडलं नसतं.आणि माझ्या हातात तर तिची पिल्लं होती.तो क्षण आम्हा सर्वांच्याच जीवनमरणाचा होता.पण वन विभागात २५-३० वर्ष काम केलेल्या अनुभवी आणि धाडसी तेलंगसाहेबांनी ही सिच्युएशन अतिशय जबाबदारीने हाताळली.तिथेच पडलेला लांबलचक ऊस त्यांनी मुलींच्या हाती सोपवला आणि त्यांना सुमोच्या दिशेने जायला सांगितलं.उसाचं दांडकं स्वतःच्या शरीराभोवती गरागरा फिरवत त्या दोघी शांतपणे सुमोपर्यंत सोयरे वनचरे,अनिल खैरे,समकालीन प्रकाशन,
पुणे..पोहोचल्या.आता मी,तेलंगसाहेब आणि बिबट्यांचे दोन बछडे एवढेच तिथे उरलो. स्थानिकांकडून पैदा केलेल्या एका बास्केटमध्ये त्या दोन्ही पिल्लांना व्यवस्थित ठेवलं आणि आम्हीही सुमो गाठली.सर्वांना सावकाश तिथून रफा दफा होण्याचा संदेश दिला.कारण आम्ही तिथेच थांबलो असतो तर कदाचित ती बिबटीण पिल्लांना न घेताच निघून जाण्याची शक्यता होती.त्यामुळे बिलकूल आवाज न करता आम्ही तिथून निघालो.सर्व लोक आपापल्या घरी परतले.आम्हीही पुण्याला परत आलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता फोन आला.
बिबट्याच्या पिल्लांची आई पिल्लांना सुखरुप घेऊन गेल्याचा निरोप मिळाला.या निरोपामुळे आम्हाला खूपच आनंद झाला. यापूर्वी आईपासून दुरावलेल्या दहा-बारा बिबट्यांच्या पिल्लांना जगवण्याचं अवघड काम आम्ही कात्रजच्या वन्यजीव अनाथालयाला मोठ्या हिकमतीने केलं होतं.पण पिल्लांचं बालपण आईशिवाय जाणं चुकीचंच.त्यामुळे मातेपासून बिछडलेल्या बछड्यांचं पुनर्मिलन झाल्याचा आनंद और होता!