माझ्या एका चाळीस वर्षाच्या मित्राचा साखरपुडा झाला.
ज्या मुलीशी साखरपुडा झाला,तिच्या सांगण्यानुसार तो नृत्य शिकायला गेला. "देवालाच ठाऊक आहे की मला नृत्य शिकायची खूपच आवश्यकता होती,"त्याने आपली कहाणी ऐकवताना म्हटलं,"मी चाळिसाव्या वर्षीसुध्दा तसेच नृत्य करीत होतो जसे वीस वर्षांपूर्वी करत होतो,
जेव्हा मी ते शिकायला सुरुवात केली होती. म्हणजेच मला नृत्य अजिबात येत नव्हतं.मी ज्या शिक्षिकेकडे प्रथम गेलो तेव्हा बहुधा तिने खरे सांगितले होते की मला नृत्य अजिबात येत नाही. मला माझे आधीचे शिकलेले सर्व काही विसरायला हवे आणि नव्याने नृत्य शिकण्यास सुरुवात करायला हवी.पण तिचं हे म्हणणं ऐकून माझा फारच हिरमोड झाला.माझ्यात शिकण्याची इच्छाच उरली नाही.म्हणून मी शिक्षिकाच बदलली.
"दुसऱ्या शिक्षिकेनं कदाचित माझं मन राखायला मला खोटा दिलासा दिला,पण मला तिचं बोलणं आवडलं.तिने निर्विकारपणे सांगितले की माझे नृत्य जरी जरा जुन्या पध्दतीचे असले तरी माझ्यात नृत्यकलेची मूलभूत समज आहे आणि मला माझे नृत्य सुधरण्यासाठी फार कष्ट पडायचे नाहीत.पहिल्या शिक्षिकेने माझ्या दोषांवर भर दिला होता,म्हणून माझा उत्साह थंड पडला होता.दुसरीने बरोबर उलटं केलं.ती माझ्या कामाची स्तुती करायची आणि माझ्यातील दोष सौम्य करून सांगायची.ती मला नेहमी म्हणत असे,'तुम्ही एक जन्मजात नर्तक आहात, तुम्हाला उपजतच ताल अन् लयीची समज आहे.'साधा विचार केला तर मला माहीत आहे की मी चौथ्या श्रेणीचा एक बेकार नर्तक आहे आणि तसाच नेहमी राहीन;तरी पण मला हा विचार करून चांगलं वाटतं की कदाचित ती खरंही म्हणत असेल.ही गोष्ट तर पक्की आहे की तिला असे बोलायचे पैसे मिळताहेत,पण असा विचार करून काय फायदा?
"काहीही असो,मला आता हे ठाऊक आहे की मी आता एक बरा नर्तक झालोय.पण तिच्या स्तुतीशिवाय मी असा नर्तक बनलोच नसतो.माझ्यात स्वाभाविक लयीची समज आहे असं म्हटल्यामुळे माझ्यात आशा निर्माण झाली. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली.त्यामुळेच मला स्वतःला सुधारण्याची इच्छा जागृत झाली."
आपली मुले किंवा आपले कर्मचारी यांना जर तुम्ही असं सांगाल की ते मूर्ख व अज्ञानी आहेत, त्यांच्यात अजिबात प्रतिभा नाही आणि ते जे काही करताहेत,ते चूक करताहेत;तर या त-हेने तुम्ही सुधारणेची प्रत्येक शक्यता नष्ट करता.पण जर तुम्ही बरोबर याच्या उलट तंत्राचा वापर केलात,म्हणजेच तुम्हाला समोरच्या माणसाच्या क्षमतेवर विश्वास आहे,त्याच्यात कठीण काम करण्याची अविकसित योग्यता आहे असा विश्वास त्याला दिलात,तर त्याचा परिणाम हा होईल की दिवस-रात्र मेहनत करून तो उत्तम काम करेल.लॉवेल थॉमस,जे मानवीय संबंधात अतिशय निष्पात आहेत,याच तंत्राचा वापर करत होते.ते लोकांत आत्मविश्वास जागवत असत,तुम्हाला साहस व आस्थेच्या माध्यमातून प्रेरित करत.
उदाहरणार्थ,मी मिस्टर व मिसेस थॉमसबरोबर वीकेंड घालवला होता.शनिवारी रात्री त्यांनी मला शेकोटीसमोर खेळीमेळीचे ब्रिज खेळायचे आमंत्रण दिले.ब्रिज?अरे,नाही! नाही! मी नाही! मला ब्रिज थोडंसुध्दा कळत नव्हतं.हा खेळ मला नेहमीच एखाद्या गुप्त रहस्यासारखा वाटे. अशक्य!लॉवेलने उत्तर दिलं,"अरे डेल,यात काही कठीण नाही! ब्रिजमध्ये फक्त लक्षात ठेवण्याची आणि कॉमनसेन्सची गरज आहे.तुम्ही स्मरशक्तीवर खूप लेख लिहिले आहेत आणि तुमच्या बुद्धीला तर सगळेच मानतात.ब्रिज तर तुमच्या डाव्या हातचा मळ आहे.तुम्ही तो कौशल्याने खेळू शकता." आणि मला काही समजायच्या आतच मी जीवनात प्रथमच ब्रिज खेळायला बसलो होतो.यामागचं कारण एकच होतं की,लॉवेलने मला हे सांगून दिलं होतं की ब्रिज खेळणं माझ्या डाव्या हाताचा मळ आहे.
ब्रिजवरून मला एली कल्बर्टसनची आठवण येते,ज्यांच्या ब्रिजच्या पुस्तकांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.या पुस्तकाच्या १० लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. कल्बर्टसननी या खेळाला कधीच आपला व्यवसाय बनवला नसता,जर एका तरुण स्त्रीने त्यांना त्यांच्यातल्या प्रतिभेची खात्री दिली नसती.
जेव्हा ते अमेरिकेत १९२२ मध्ये आले तेव्हा त्यांनी तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्राच्या शिक्षकाची नोकरी शोधायचा प्रयत्न केला; इतकंच काय तर त्यांनी कोळसा विकायचा प्रयत्न केला व त्यातही ते अपयशी ठरले.नंतर त्यांनी कॉफी विकायचा प्रयत्न केला आणि त्यातही अपयशी ठरले.त्यांनी थोडंफार ब्रिज खेळलं होतं,पण त्यांना त्यावेळी ही जाणीव झाली नव्हती की ते एके दिवशी ते शिकवूसुद्धा शकतील.ते केवळ ब्रिजचे एक वाईट खेळाडूच नव्हते,तर खूप हटवादीसुद्धा होते.ते इतके सारे प्रश्न विचारत आणि प्रत्येक डावानंतर इतकी चिरफाड करीत की कुणीच त्यांच्यासोबत खेळायला तयार नसत.
मग ते एका सुंदर ब्रिज शिक्षिका जोसेफाइन डिलनला भेटले. दोघांमध्ये प्रेम जमलं आणि त्यांनी विवाह केला. जोसेफाइननं बघितलं की तो आपल्या पत्त्यांचं किती कसून विश्लेषण करतो आणि तिने आपल्या पतीला हा विश्वास दिला की त्याच्यात या खेळाबद्दल विशेष प्रतिभा दडलेली आहे. कल्बर्टसनं मला सांगितलं की या प्रोत्साहनामुळे आणि केवळ त्याचमुळे त्याने ब्रिज आपला व्यवसाय म्हणून निवडला.
क्लेरेंस एम.जोन्स सिनसिनाटी,ओहियोमध्ये आमच्या अभ्यासक्रमाचे शिक्षक होते.त्यांनी सांगितलं की कशा
त-हेने प्रोत्साहन दिल्याने आणि चुकांना सुधारणे सोपे करून सांगितल्याने त्यांच्या मुलाचे जीवन पूर्ण बदलून गेले."१९७० मध्ये माझा १५ वर्षीय मुलगा डेव्हिड माझ्यासह राहण्यास सिनासिनाटीमध्ये आला. त्याने जीवनात अनेक समस्यांचा सामना केला होता.१९५८ मध्ये एका कार-अपघातात त्याच्या डोक्याला इजा झाली होती.त्याच्या मस्तकावर आजही खाच आहे.१९६० मध्ये त्याच्या आईशी माझा घटस्फोट झाला.त्या नंतर डेव्हिड आपल्या आईबरोबर डल्लासमध्ये राहू लागला.
पंधरा वर्षापर्यंत त्याने आपले बहुतांश शालेय जीवन त्या शाळांमध्ये घालवलं.जिथे मंद गतीने शिकणाऱ्यांसाठी विशेष वर्गांचे आयोजन केले जाते.कदाचित डोक्यावरच्या निशाणीमुळे शाळेच्या लोकांनी हा निर्णय घेतला असावा की त्याच्या मेंदुला इजा झाली आहे आणि त्याचं डोकं सामान्य स्तरावर काम करीत नाही.तो आपल्या वयाच्या इतर मुलांपेक्षा दोन वर्षे मागे होता,म्हणून तो सातवीतच होता.पण त्याला अजूनपर्यंत पाढे पाठ झाले नव्हते.त्याला आपल्या बोटांवर मोजता येत नव्हतं आणि तो मुश्किलीने वाचू शकत होता."एक चांगली गोष्ट मात्र होती.त्याला रेडिओ आणि टीव्ही सेटवर काम करणं खूप आवडायचं.
तो टीव्ही तंत्रज्ञ बनू इच्छित होता.मी त्या क्षेत्रात त्याला प्रोत्साहित केलं आणि त्याला सांगितलं की त्याचे प्रशिक्षण सफल व्हायला त्याचं गणित चांगलं असणं आवश्यक होतं.मी निर्णय घेतला, की मी त्याला या विषयात पारंगत व्हायला त्याची मदत करेन.
आम्ही फ्लॅश कार्डाचे चार संच घेऊन आलो:गुणाकार,
भागाकार,बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी जेव्हा आम्ही कार्डाचा उपयोग करीत असू,तेव्हा आम्ही बरोबर उत्तरांना एका वेगळ्या जागी ठेवत असू.जेव्हा डेव्हिड एखाद्या कार्डाचं अचूक उत्तर देऊ शकत नसे, तेव्हा आम्ही तो पत्ता पुन्हा बाजूला ठेवायचो.ही प्रक्रिया तोपर्यंत चाले,
जोपर्यंत त्याचं उत्तर अचूक येत नसे.प्रत्येक वेळी अचूक उत्तर दिल्यावर मी त्याची खूप स्तुती करीत असे.विशेषतः तेव्हा जेव्हा तो मागील कार्डचं अचूक उत्तर देऊ शकला नसे.प्रत्येक रात्री आम्ही सगळी कार्ड संपून जाईपर्यंत हा खेळ खेळायचो.रोज रात्री आम्ही स्टॉपवॉच घेऊन या कामाची नोंद ठेवत असू.मी त्याला वचन दिलं होतं की जेव्हा तो सर्व कार्डाचं अचूक उत्तर आठ मिनिटात देईल अन् त्याचं एकही उत्तर चूक येणार नाही,तेव्हा आम्ही ते रोज रात्री करण्याचं थांबवू.हे डेव्हिडसाठी अशक्य लक्ष्य होतं.पहिल्या रात्री या प्रक्रियेला ५२ मिनिटं लागली,
दुसऱ्या रात्री ४८,मग ४५, मग ४४,४१ आणि मग ४० मिनिटं.कमी झालेल्या वेळेबद्दल आम्ही रोज सेलिब्रेशन करायचो.मी आपल्या पत्नीला फोन करून हे सांगत असे.मी आपल्या मुलाला कवटाळत असे आणि आम्ही नाचत असू.महिन्याअखेर तो सर्व कार्डाची उत्तरं आठ मिनिटांपेक्षा कमी वेळात देऊ लागला.जेव्हा त्याच्यात एखादी छोटी सुधारणा होई तेव्हा ते गणित पुन्हा सोडवण्याचा तो आग्रह धरायचा.त्यानं हा अद्भूत शोध लावला की शिकण्यात किती मजा येते आणि ते किती सोपं आहे."स्वाभाविकच त्याला गणितात खूप चांगले गुण मिळाले.हे आश्चर्यकारक आहे की जेव्हा तुम्हाला गुणाकार करता येतो तेव्हा गणित किती सोपं होऊन जाते.जेव्हा गणितात त्याला बी ग्रेड मिळाली तेव्हा तो चकित झाला.असं आजवर कधीच झालं नव्हतं.
त्याच्यात इतर बदलही अविश्वसनीय वेगाने घडून आले.त्याची अभ्यासाची गती खूप वाढली आणि तो आपल्या चित्रकलेच्या जन्मजात गुणांचा अधिक चांगल्या त-हेने प्रयोग करू लागला.
शालेय सत्राच्या शेवटच्या महिन्यांमध्ये त्याच्या विज्ञानाच्या शिक्षकाने त्याच्यावर एक मॉडेल बनवण्याची जबाबदारी सोपवली.त्याने एक जटिल मॉडेल बनवण्याची निवड केली.त्यासाठी चित्रकला व मॉडेल बनवण्याची क्षमता हवी होती आणि ॲप्लाईड मॅथ्समधील निपुणतासुद्धा हवी होती.शाळेच्या विज्ञान-मेळ्यात त्याच्या मॉडेलला प्रथम पुरस्कार मिळाला;तर पूर्ण सिनासिनाटी शहरातून तिसरा पुरस्कार मिळाला.
"यामुळे पूर्ण चित्रच पालटलं.हा तोच मुलगा होता जो दोन वर्ग मागे पडला होता,ज्याला 'डोक्याने कमी बुद्धीचा' म्हटलं जात होतं.त्याचे सहपाठी त्याला 'फ्रैंकस्टाईन' म्हणून चिडवत असत आणि म्हणत असत,डोक्यावर घाव आल्यावर त्याचा मेंदू बाहेर वाहून गेला असावा. अचानक त्याला आढळून आलं की तो खरोखर शिकू शकतो.काही करून दाखवू शकतो. परिणामी,आठवीच्या शेवटच्या सत्रात त्याला पूर्ण हायस्कूलमध्ये नेहमी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या.त्याला नॅशनल ऑनर सोसायटीसाठी निवडलं गेलं.एकदा जेव्हा त्याला आढळून आलं की शिकणं सोपं आहे, त्यानंतर त्याचं पूर्ण जीवनच बदलून गेलं.जर तुम्हाला दुसऱ्यांना सुधारण्यात मदत करायची असेल तर लक्षात ठेवा-
इतरांना प्रोत्साहित करा.त्यांना हे सांगा,की चूक सुधारणे सोपे आहे.
११.०१.२४ या लेखातील पुढील भाग..