मध्ययुगाच्या शेवटी शेवटी इटलीमध्ये पुन्हा मानवी शरीराचं विच्छेदन करायला सुरुवात झाली.खरं तर ही सुरुवात भलत्याच गरजेपोटी झाली होती.त्या काळी इटलीमधली सालेर्नो आणि बोलोना ही विद्यापीठं गाजत होती.तिथे अनेकदा संशयास्पद मृत्यू झालेल्या केसेस सोडवण्यासाठी यायच्या.त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला हे कदाचित पोस्टमार्टेम केल्यानंतर योग्यप्रकारे कळू शकेल आणि त्यातून पीडित व्यक्तीला योग्य न्याय आणि गुन्हेगाराला योग्य शिक्षा मिळेल असं वाटायला लागलं.यामुळे मग कायद्याच्या या गरजेपोटी मानवी शवविच्छेदनाला (डिसेक्शनला / पोस्टमार्टेमला) परवानगी मिळाली.
अशा त-हेनं डिसेक्शनला परवानगी मिळाली तरी स्वतंत्र संशोधनाला अजूनही परवानगी नव्हती.त्या वेळची डिसेक्शन्स ही फक्त गेलन, ॲरिस्टॉटल आणि अविसेना यांनी मांडलेली तत्त्वं पुन्हा शिकण्यासाठीच केली जायची.
त्या काळचे शिक्षकही यांचीच पुस्तकं वाचून शिकलेले होते. आणि ते पुन्हा तेच शिकवण्यात धन्यता मानत होते.
त्यामुळे ज्या चुका या लोकांनी केल्या होत्या त्या न सुधारता चक्क अनेक पिढ्या तशाच चालत राहिल्या! ज्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा ब्लॅक बॉइलसारख्या ज्या गोष्टी शरीरात कुठे दिसतच नाहीत त्यावर तसाच विश्वास ठेवला गेला त्या तपासायला किंवा सुधारायला अनेक शतकं कुणी धजावलंच नाही!याला थोडासा छेद देण्याचा प्रयत्न मोंडिनो दे लुझी (१२७५-१३२६) यानं केला होता.त्यानं स्वतः डिसेक्शन करून आणि काही आधीच्या पुस्तकांतून वाचून असं स्वतःचं ॲनॅटॉमीवरचं एक पुस्तक लिहिलं.ते त्या काळी गाजलंही.त्यातून त्याला 'रिस्टोअरर ऑफ ॲनॅटॉमी'
अशी पदवीही मिळाली होती.पण त्यानंही या पुस्तकात अनेक गोष्टी आधीच्या पुस्तकांतल्याच जशाच्या तशा छापल्यामुळे आधीच्या पुस्तकांतल्या काही चुकाही तशाच त्याच्या याही पुस्तकात पुन्हा आल्या.त्यामुळेच त्यानं या चुका पूर्णपणे टाळून बायॉलॉजीला नवं रूप दिलं असं म्हणता येणार नाही.पण या वेळेपर्यंत डिसेक्शन करून मानवी शरीराचा अभ्यास सुरू झाला हेच काय कमी म्हणायचं ? मोंडिनो दे लुझी याला खरं तर मध्ययुगातल्या अंधारात दीप घेऊन उभारलेला वाट दाखवणारा मार्गदर्शकच म्हणावा लागेल.
कारण मोंडिनोच्या उल्लेखाशिवाय ॲनॅटॉमीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही.मोंडिनो हा इटलीमधला प्रसिद्ध डॉक्टर,ॲनॅटॉमिस्ट आणि बोलोना विद्यापीठात सर्जरीचा प्रोफेसर होता. त्यानं ॲनॅटॉमीचं ज्ञान पुनरुज्जीवित केलं,
असं त्याच्या समर्थकांना वाटतं.त्यामुळे त्यांनी त्याला रिस्टोअरर ऑफ ॲनॅटॉमी अशी पदवीच दिली होती.काही ठिकाणी तर 'लिओनार्दो दा विंची' याच्यावरही मोंडिनोचा प्रभाव पडला होता असा उल्लेख आहे.पण काही लोकांना मात्र मोंडिनोनं प्रत्यक्ष डिसेक्शन अगदी कमी वेळा केलं असं वाटतं.अर्थात,हे म्हणणंही योग्य वाटावं असा तो काळ होता. कारण त्या काळी माणसाचं अभ्यासासाठी डिसेक्शन करायला परवानगीच नव्हती त्याकाळी फक्त खून झालेल्या लोकांचे डिसेक्शन करायलाच परवानगी होती.त्यामुळे ॲनॅटॉमीच्या अभ्यासावर फारच मर्यादा येत होती.त्यामुळे मोंडिनोनं कमी डिसेक्शन्स केली असावीत हाही कयास योग्यच आहे.
मोंडिनोबद्दल आणखीही एक गोष्ट सांगितली जाते.जेव्हा मानवी शरीराचं डिसेक्शन करायचं असेल तेव्हा तो एक सार्वजनिकरीत्या होणारा कार्यक्रमच असायचा.तेव्हा मोंडिनो स्टेजवरच्या एका खुर्चीत हातात गेलनचं पुस्तक घेऊन बसायचा आणि गेलनच्या पुस्तकाचा काही भाग मोठ्यानं वाचायचा.त्याचा एक सहायक प्रत्यक्ष डिसेक्शन्स करायचा आणि दुसरा मोंडिनो वर्णन करत असलेला भाग हातातल्या रुळानं दाखवायचा.अशा प्रकारे गेलननं सांगितलेल्या ॲनॅटॉमीचाच पुन्हा अभ्यास करणं किंवा गेलनची शिकवण ताडून पाहणं असा हा कार्यक्रम चालायचा.यात अर्थातच मोंडिनोला गेलनच्या चुकाही दिसल्या होत्या.पण गेलनविरुद्ध बोलणं किंवा लिहिणं म्हणजे त्या काळी पाठीवर मोठा दगड घेऊन प्रवाहाच्या अगदी उलट पोहण्यासारखंच होतं.तरीही मोंडिनोनं हे धाडस केलं.मोंडिनोनं 'अनाथॉमिया' (Anathomia) हे अनॅटॉमीवरचं पुस्तक लिहिलं.पण त्यानं उघड उघड गेलन आणि त्या आधीच्या वैज्ञानिकांविरुद्ध फार जास्त लिहिलं नाही.त्यामुळे त्याच्या पुस्तकात तीन प्रकारच्या चुका झाल्या होत्या.पहिली म्हणजे गेलन आणि आधीच्या लोकांच्या चुका जशाच्या तशा त्याच्या लिखाणात उतरल्या होत्या.दुसरी प्रकार म्हणजे गेलनला जे म्हणायचंय त्याचा मोंडिनोनं अनेकदा चुकीचा अर्थ काढल्यामुळे झालेल्या चुका आणि तिसरी प्रकार म्हणजे मोंडिनोनं गेलन आणि ॲरिस्टॉटल या दोघांना जे म्हणायचं आहे त्याचा सुवर्णमध्य काढायचा प्रयत्न केला,त्यात झालेल्या गफलती! अशा प्रकारच्या चुका होऊनही मॉडिनो गाजला ते त्याच्या स्वतः डिसेक्शन करून शोधून काढायच्या प्रयत्नामुळे.मोंडिनोमुळे प्रयोगात्मक बायॉलॉजीला पुन्हा नव्यानं सुरुवात झाली ही फार महत्त्वाची पायरी होती.
आता इटलीमध्ये बायॉलॉजी या विज्ञान शाखेचा पुन्हा नव्यानं अभ्यास सुरू झाला होता याला दोन कारणं होती,एक म्हणजे युरोपियन लोक मुळातच चुळबुळ्या आणि शोधक वृत्तीचे होते आणि आता ॲरिस्टॉटल आणि गेलन अशा पूर्वी होऊन गेलेल्या वैज्ञानिकांचं काम पुन्हा हाती लागल्यामुळे बायॉलॉजीवरच्या अभ्यासानं पुन्हा वेग घ्यायला सुरुवात केली होती.फक्त बायॉलॉजीच नाही तर या काळात जवळपास सगळ्याच कला,साहित्य,संगीत आणि विज्ञान या क्षेत्रात नव्यानं प्रगती व्हायला लागली होती.या काळाला २.२ पुनरुत्थान (रेनायसान्स) म्हणतात.त्यातच गंमत म्हणजे चित्रकारही बायॉलॉजीचा अभ्यास करायला लागले होते! (या मध्ये लिओनार्दो दा विंची यांनी काढलेले रेखाटन सुद्धा आहे.) रेनायसान्समध्ये चित्रकलाही नव्यानं बहरत होती.याच काळात कलाकार दोनमितीय कागदावर तीनमितीय चित्र कसं दाखवायचं हे शिकत होते.त्यासाठी ते मानवी शरीराचा बाह्याकार आणि आतली हाडं आणि स्नायू यांची रचना अभ्यासत होते.या सगळ्याचा परिपाक म्हणजे रेनायसान्समध्ये बहरलेले लिओनादों दा विंची,मायकेल अँजेलो, बेलिनी,एल ग्रिको,राफाएल असे जगप्रसिद्ध चित्रकार!आताच्या फायटर प्लेन्सना राफाएल हे नाव याच राफाएल या चित्रकारामुळे दिलं गेलंय..!
त्यामुळे हे चित्रकारही चक्क हौशी ॲनॅटॉमिस्ट झाले होते! लिओनार्दो दा विंचीनं (१४५२ ते १५१९) अनेक डिसेक्शन्स करून मानवी शरीराचा अभ्यास केला होता.
त्यानं प्राण्यांचीही डिसेक्शन्स केली होती.यात महत्त्वाची गोष्ट अशी,की ॲनॉटॉमिस्टना कोणताही प्राणी किंवा माणूस यांच्या शरीराचं डिसेक्शन केलं,की त्यातल्या अवयवांचं ज्ञान व्हायचं,पण ते त्यांना जे दिसतंय ते इतरांना दाखवू शकायचे नाहीत. पण लिओनार्दो दा विंची किंवा इतर चित्रकारांना मात्र समोर दिसतंय त्या प्राण्याच्या किंवा माणसाच्या अंतर्गत रचनेचं हुबेहूब चित्र काढण्याचं कसब लाभलं होतं.त्यामुळे याचा फायदा चित्रकार आणि बायॉलॉजिस्ट्स या दोघांना तसेच चित्रकला आणि बायॉलॉजी या दोन्ही क्षेत्रांना झाला.
यातून लिओनार्दोनं माणसाचे डोळे आणि हात हे अवयव कसे काम करतात याचा सखोल अभ्यास केला आणि ते चक्क लिहून आणि चित्र काढून ठेवलं.शिवाय,तो विमानही तयार करायच्या खटपटीत होता.त्यामुळे यंत्र,पक्षी, पंख यांचाही त्यानं अभ्यास केला होता.
त्यानं झाडाच्या जीवनचक्राचाही अभ्यास करून त्याची रेखाटनं काढली होती.पण दुर्दैवानं या गोष्टींचा विज्ञानाला त्या काळात काहीही फायदा झाला नाही,कारण त्यानं या गोष्टी आपल्या डायऱ्यांमध्ये सांकेतिक भाषेत लिहून ठेवल्या होत्या! ही सांकेतिक भाषा आता आता आधुनिक काळात आपल्याला काही प्रमाणात उकलली आहे.
ॲनॅटॉमी विकसित होत गेली तशीच नॅचरल हिस्ट्रीही विकसित होत गेली.पंधरावं शतकच मुळी नवनव्या गोष्टींच्या शोधांचं आणि एक्स्प्लोरेशनचं होतं.या काळात युरोपियन लोकांना आफ्रिका,अमेरिका आणि भारत या देशांचा शोध लागत होता.या ठिकाणची माणसं, त्यांची संस्कृती,आचार-विचार,या ठिकाणचे आधी न पाहिलेले प्राणी-पक्षी वनस्पती या सगळ्याच गोष्टींचा नव्यानं शोध लागत होता.सोळाव्या शतकातला इटालियन बॉटनिस्ट (वनस्पतिशास्त्रज्ञ) प्रॉस्पेरो अल्पिनी (१५५३-१६१७) हा खरं तर काही काळ इटलीतल्या पडुआ विद्यापीठात डॉक्टर आणि बॉटनिकल गार्डनचा प्रमुख व्यवस्थापक होता. थोडक्यात,तो आजच्या काळात असता तर बॉटनी डिपार्टमेंटचा एचओडी असला असता. यानंतर प्रॉस्पेरो अल्पिनी हा इजिप्तमधल्या कैरोमध्ये राजदूत म्हणून चार वर्षं गेला होता. कैरोमध्ये असताना त्याला पाम आणि खजूर या झाडांचा अभ्यास करायला मिळाला.या झाडांमध्ये नर झाड आणि मादी झाड अशी दोन वेगवेगळी झाडं असतात याची त्याला पहिल्यांदाच कल्पना आली! (आपल्याकडे पपईमध्ये नर आणि मादी अशी वेगवेगळी झाडं असतात.) नर पामच्या आणि मादी पामच्या फांद्या एकमेकींमध्ये मिसळतात तेव्हाच या झाडांना फळं धरतात किंवा यांना फळं धरण्यासाठी माणसानं एका फुलाचे पराग दुसऱ्या झाडाच्या फुलावर शिंपडावे लागतात,असं त्यानं लिहून ठेवलं आहे.
याआधी थिओफ्रॉस्ट्सनं जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीच हे सांगून ठेवलं होतं.पण हे सगळं ज्ञान मधल्या काळात लुप्त झालं होतं आणि आता झाडं ही नपुंसकलिंगी असतात असंच सगळे मानत होते.
पुढे वनस्पतींचं वर्गीकरण करताना हे तत्त्व कार्ल लिनियसला फार उपयोगी पडणार होतं.त्यामुळे आल्याच्या गटातल्या वनस्पतींना त्यानं अल्पिनीच्या सन्मानार्थ 'अल्पिनिया' हे नाव दिलं.यानंतर या अल्पिनीनंच कॉफीचं झाड आणि केळी पहिल्यांदा युरोपात नेली.कॉफी आणि केळी यांचं युरोपीय भाषांत वर्णन करणारा तो पहिलाच होता.त्यानंतर तिकडेही कॉफी हे पेय आधी औषध म्हणून आणि नंतर रिफ्रेशिंग पेय म्हणून प्रसिद्ध झालं.
त्यानं 'दे प्लांटिस इजिप्ती लायबर' (De Plantis Aegypti liber) हे इजिप्तमधल्या वनस्पतींवर पुस्तक लिहिलं.त्यात त्यानं इजिप्तमध्ये सापडणाऱ्या अनेक वनस्पतींची युरोपियनांना पहिल्यांदाच ओळख करून दिली.सजीवांच्या अभ्यासानं आता जवळपास कळसच गाठला होता.स्विस निसर्ग अभ्यासक कोनार्ड फॉन जेस्नर (Konard Von Gesner) (१५१६-१५६५) यानं त्यावेळी उपलब्ध असलेल्या सजीवांची जवळपास सगळीच माहिती संकलित केली.याला तर आजच्या भाषेत 'ह्यूमन सर्च इंजिन' किंवा 'गुगल' म्हटलं तरी कमीच पडेल इतकं मोठं काम त्यानं करून ठेवलं आहे.याला 'स्विस प्लिनी' असंच म्हटलं जातं.
कोनार्डचा जन्म १५ मार्च १५१६ या दिवशी स्वित्झर्लंडमधल्या झुरिच इथं अत्यंत गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच तो फार हुशार होता.त्याची तल्लख बुद्धी त्याच्या वडिलांना आणि शिक्षकांना लक्षात आल्यावर त्यांनी कोनार्डला नातेवाइकांपैकीच एका काकांकडे पाठवलं.ते काका औषधी वनस्पतींपासून वेगवेगळी औषधं तयार करायचे.इथेच त्याला वनस्पतींबद्दल प्रेम निर्माण झालं.त्यांनी आपल्या ओळखीनं थोड्याच काळात त्याला मोठ्या विद्यापीठात
अभ्यासासाठी पाठवलं.तिथेही त्यानं लवकरच अनेक भाषा शिकून घेतल्याशिवाय थिओलॉजी आणि वैद्यकाचाही अभ्यास केला.पण त्याचा कल मात्र वेगवेगळ्या ठिकाणी फिरून वेगवेगळे प्राणी आणि कोनार्ड फॉन जेस्नर वनस्पतींचे नमुने गोळा करून त्यांची माहिती संकलित करून ठेवणं याकडे होता.तो सजीवांचं निरीक्षण आणि अभ्यास करण्यात खूप वेळ घालवायचा. शिक्षणासाठी कोनार्ड अनेक गावं आणि अनेक विद्यापीठं फिरला.जिथं जाईल तिथून तो सगळंच शिकून यायचा आणि मुख्य म्हणजे तिथली माणसं जोडून यायचा आणि नंतरही त्या लोकांशी पत्रव्यवहार आणि संपर्क ठेवून असायचा! दुर्दैवानं त्याच्या वयाच्या १७ व्या वर्षीच त्याचे वडील काफीच्या लढाईत मारले गेले.आता पुन्हा शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. तेव्हा पुन्हा त्याच्या लहानपणचे झुरिचमधले एक शिक्षक पुढे आले आणि त्यांनी कोनार्डचं पालकत्व स्वीकारलं.त्यांनी कोनार्डच्या शिक्षणासाठी मदत केली.दुसऱ्या एका शिक्षकानं त्याला राहायला जागा दिली आणि अन्नपाण्याची व्यवस्था लावून दिली.नंतर तीन वर्षांनी त्यानं स्ट्रासबर्ग विद्यापीठात प्रवेश घेतला.तिथे तो हिब्रू भाषा शिकला.वयाच्या १९ व्या वर्षी त्याचं तितक्याच गरीब घरातल्या मुलीशी लग्न झालं. दुर्दैवानं त्याचे सासरे त्याला काहीही हुंडा देऊ शकले नाहीत.या वेळेपर्यंत त्यानं आपली एक ग्रीकोलॅटिन डिक्शनरी (शब्दकोश) प्रकाशित केली होती.त्याच्या जोरावर आणि काही मित्रांच्या मदतीनं बर्नमध्ये नव्यानंच सुरू झालेल्या एका विद्यापीठात एक तुटपुंज्या पगाराची नोकरी पत्करली.दारिद्र्याचे असे दशावतार चालू असतानाच एकीकडे त्याचं वेगवेगळ्या विषयांवरचं चौफेर वाचन,अभ्यास आणि संशोधन चालूच होतं.अर्थात,(सजीव, अच्युत गोडबोले अमृता देशपांडे)
वनस्पतिशास्त्रावर तर त्याचं जिवापाड प्रेम होतं.
तीन वर्ष बर्नमध्ये शिकवल्यानंतर कोनार्ड जेस्नर ब्रसेलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेला आणि १५४१ मध्ये डॉक्टर होऊन बाहेर पडला ! त्यानंतर त्यानं पुढे आयुष्यभर पोटापाण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय केला.परिस्थिती थोडी सुधारल्यावर त्यानं पुन्हा अनेक देश आणि अनेक प्रदेश पालथे घालायला सुरुवात केली.त्यात डोंगरदऱ्या,पर्वत आणि बर्फाच्छादित प्रदेशही होते.
जमिनीवरच्या वनस्पती आणि प्राणी तर तो गोळा करून अभ्यास करायचाच,पण बर्फाच्या नद्यांखाली लपलेले प्राणी आणि वनस्पतीही त्यानं शोधून त्यांची माहिती जमा करून ठेवली.अर्थात,हे काम सोपं नव्हतंच.हे करताना त्यानं माणसाला पूर्वी माहीत नसलेल्या अनेक वनस्पती आणि प्राणी यांची माहिती जमा केली आणि ती व्यवस्थित संकलित करून प्रकाशित केली. अनेक गोष्टी पहिल्यांदाच करणारा तो भन्नाट एक्सप्लोरर होता.त्यानं तपकिरी उंदीर, प्रयोगात वापरले जाणारे गिनीपिग्ज,तुर्की कोंबडा (टर्की),'सिलसिला' या सिनेमात आपण बघतो ती ट्युलिप्सची फुलं, माणसाच्या शरीरातला लालसर रंगाचा अडिपोज टिश्यू अशा एकमेकांशी दूरवरही संबंध नसलेल्या गोष्टी पहिल्यांदाच शोधून काढल्या ! शिवाय, युरोपियनांना तंबाखूचे परिणाम सांगणारा हा पहिलाच असामी होता.खरं तर इतकं करून थांबला असता तरी आज त्याचं नाव अजरामर झालं असतं.
पण त्यानं पुढे तर अजस्र म्हणता येईल असंच काम केलं. यानंतर त्यानं 'बिब्लिओथिका'(Bibliotheca) नावाचं आतापर्यंत होऊन गेलेल्या सगळ्या लेखकांची नावं आणि त्यांची संक्षिप्त माहिती सांगणारं पुस्तक लिहिलं.१५४५ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात त्यानं जवळपास चार हजार पुस्तकं आणि शेकडो लेखकांची माहिती जमा करून लिहिली होती. यावरूनच त्याला लेखनाची,
लेखकांची आणि ज्ञानाची किती कळकळ होती ते कळतं.०४.१२.२३ या लेखातील पुढील भाग..