काही वेळा काही लोकांच्या आयुष्यात हे असं का घडलं असावं ? याचं खूप डोकेफोड करून सुद्धा उत्तर मिळत नाही... ! एखादा ढाण्या वाघ पिंजऱ्यात बंद असतो...
या वाघात धम्मक असते,तरीही बंदिस्त पिंजऱ्यात त्याला जेरबंद केलं जातं... तो अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत असतो...! आणि कोणीही चिडूक मीडुक मग बाहेरून त्याला खडे मारत किंवा काठीने ढोसत असतं....
एखाद्या गरुडाला पिंजऱ्यात बंद करून ठेवतात... आकाशातला राजा हा .... पिंजऱ्यात बंद असतो आणि पिंजऱ्या बाहेरून मग कावळे सुद्धा याच्यावर शिरजोर होतात... ! कोणत्या परिस्थितीमुळे किंवा चुकीमुळे,त्यांची अशी ही अवस्था झाली असेल काही कळत नाही...! जे सध्या पिंजऱ्यात बंद आहेत,असे अनेक वाघ आणि गरुड मला या महिन्यात रस्त्यावर भेटले... !
काही जणांसाठी हा पिंजरा म्हणजे 'परिस्थिती'
असते..काहींसाठी 'त्यांच्या घरातलेच लोक'आणि काहींसाठी मात्र त्यांच्याच हातून'नकळत झालेल्या चुका "..!
अशाच पिंजऱ्यात अडकलेले हे तीन जण...
यापैकी एक आहे महाराष्ट्राबाहेरचा,याचं बऱ्यापैकी शिक्षण झालंय,अतिशय उत्तम इंग्लिश बोलतो... इतर दोघे महाराष्ट्रातले...
उद्भवलेल्या परिस्थितीमुळे म्हणा,घरातल्या लोकांमुळे म्हणा किंवा स्वतःच्या चुकांमुळे म्हणा... परंतु आज हे रस्त्याकडेला जीवन जगत आहेत दुसऱ्यांच्या दयेवर...!
यांपैकी दोघांच्या पायाला अति गंभीर जखमा आहेत,एकाला तर पाय कापायचा सल्ला मिळाला... !
थोडफार जे उरलंय ते हि कापुन टाका,हा सल्ला पचवायला त्याच्याच जन्माला जायला हवं...!
ट्रीटमेण्ट घ्यायला पैसे नाहीत,आणि सहनही होत नाही,अशा अवस्थेत रस्त्याबाजुला थंडीत मुकाट पडून राहायचं...!
वेदनेचा आणि असहाय्यतेचा कळस आहे हा...
कळस नेहमी मंदिरावरच शोभून दिसतो... परंतु वेदनेचा कळस,माणसाच्या डोक्यावर बसला की तो माणूस भेसुर दिसतो...!
तिसऱ्याची कहाणी थोड्याफार फरकाने अशीच...
वाघाच्या डोळ्यात वेदनेचं पाणी पाहिलंय का कुणी ?
आई दुखतंय गं ... म्हणून जमिनीवर गडाबडा लोळणारा वाघ पाहिलाय का कुणी ?
पंख तुटलेला गरुड सरपटत आपल्याजवळ केविलवाणे पणे येताना पाहिलाय का कोणी ?
हे पाहणं सुद्धा खूप वेदनादायी असतं... !!!
वेगवेगळ्या वेळी,वेगवेगळ्या स्थळी,माझी या तिघांशी भेट झाली... तिघांचेही पिंजरे उघडून;आधी जखमांवर फुंकर मारली,त्यानंतर मलमपट्टी केली... मनाला उभारी येईल असं बोलत गेलो…कुणी असो नसो,मी आहे तुमच्यासोबत हे त्यांच्या मनावर बिंबवत गेलो....! शेवटी स्वतःच्या पायावर तिघांना आत्मविश्वासाने उभं रहायला आज जानेवारी २०२४ उजाडावा लागला...!
मारलेल्या फुंकरीने तीन विझणारे निखारे पुन्हा उजळले...!
इथं,मला माझी चुलीवर स्वयंपाक करणारी आजी आठवते...
चुल विझली विझली,म्हणता म्हणता,
जिवाचा आकांत करून म्हातारी,इकडून तिकडून लुगडं सावरत,फुंकर मारायची,चुलीतल्या विझणाऱ्या लाकडांना ती इकडे तिकडे अशी हलवायची, जणू त्यांना जागं करण्याचा प्रयत्न करायची…!
फुंकर मारताना धूर व्हायचा,हा धुर तिच्या नाका तोंडात जायचा,तिला ठसका लागायचा, आजूबाजूची राख डोळ्यात जायची,एका हाताने पदर घेऊन ती डोळे पुसत राहायची,पण फुंकर मारणं थांबवायची नाही..... लाकडं पेटेपर्यंत म्हातारी मागं हटायची नाही....
एकदा का मात्र चुल पुन्हा ढाण ढाण पेटली,की पदराने डोळे पुसत,गालातल्या गालात ती विजयी वीराप्रमाणे हसायची... यावेळी चेहऱ्यावरची प्रत्येक सुरकुती न सुरकुती उल्हसित व्हायची.... !
चूल पेटली... त्यात एवढा कसला आनंद ???
हे त्यावेळी मला न उलगडलेलं कोडं...
आज कळतंय,ते समाधान चूल पेटवण्याचं नव्हतं.हे समाधान होतं;विझणाऱ्या कुणाला
तरी पुन्हा पेटून उठताना पाहण्याचं...!!!
आज हे तिघेही वैद्यकीय दृष्ट्या पायावर उभे आहेत...
पण नुसतंच पायावर उभं राहणं महत्त्वाचं नसतं... महत्त्वाचं असतं ते पुन्हा चालायला सुरुवात करणं...आणि आपण चालताना,वाटेत पडलेल्या दुसऱ्या कुणालातरी उभं राहायला मदत करून,सगळ्यांनी मिळून एकत्र धावणं....!
आयुष्याची हिच तर खरी वारी... !
दुसऱ्याला उठवून पळायचे,म्हणजे स्वतःच्या पायात धमक हवी...मनगटात जोर हवा...
या तिघांनाही आता स्वतंत्र व्यवसाय टाकून दिले आहेत.
एकाला इमिटेशन ज्वेलरी घेऊन दिली आहे, वजन काटा घेऊन दिला आहे,ज्या रस्त्यावर, जिथे तो निपचीत पडला होता,तिथेच तो आता ज्वेलरी विकतो...वजन काट्यावर लोक वजन करून त्याला पैसे देतात....माझ्यासाठी तो स्वतःच आता एक दागिना झाला आहे...!
चर्मकारीचे सामान घेऊन,दुसरा आता पुढील आठवड्यात,बूट पॉलिश करून,चपलांबरोबर स्वतःच्या फाटलेल्या आयुष्याला सुद्धा टाके घालून फाटकं आयुष्य सावरेल.
तिसऱ्याला आज २२ जानेवारी २०२४ रोजी एक हात गाडी घेऊन दिली आहे.भंगार गोळा करून, विक्री करण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला आहे.समाजातील कित्येक जण अडगळीत पडलेल्या आपल्या आईबापांना,भंगार समजून उकिरड्यावर फेकतात…
आम्ही ते उचलतो.या अर्थाने मी ही एक भंगारवालाच की...!
माझ्या या मुलाला भंगार गोळा करताना,असे कोणाचे आई-वडील सापडू नयेत इतकीच माझी प्रार्थना... ! परवा त्यांच्या बोलण्यात आलं,'आम्हाला उठवून कुणीतरी उभं केलं, आयुष्यात इथून पुढे आमच्या परीने आम्ही सुद्धा कोणालातरी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू'.माझ्यासाठी हा आनंदाचा परमोच्च क्षण होता... !!!
दिवा पेटवणे हि झाली प्रकृती.... परंतु दिव्याने दिवा पेटवणे हि झाली संस्कृती...!
आज २२ जानेवारी २०२४ उजाडला...
सकाळपासूनच मंगलमय वाद्यांचे सूर कानावर पडत होते... तिकडे एक नगरी सजली होती, इकडेही एक नगर सजले होते... तिकडे हर्ष आणि उल्हास होता,
तसाच इकडेही हर्ष आणि उल्हास होता... तिकडे प्राणप्रतिष्ठापना होत होती आणि इकडेही वेगळ्या पद्धतीने आमची प्राणप्रतिष्ठापना झाली होती...!
दिनांक २२ जानेवारी २०२४
डॉ.अभिजीत सोनवणे,डॉक्टर फॉर बेगर्स
भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर..!