* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एक गोष्ट राजर्षी शाहूंची.. One thing about Rajarshi Shahu..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५/१/२४

एक गोष्ट राजर्षी शाहूंची.. One thing about Rajarshi Shahu..

आबालाल यांची कला जिवंत केली.


करवीरच्या या पावन भूमीत कला पेरण्याचे -उगविण्याचे - तिला फुलविण्याचे थोर कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केल्यामुळेच या नगरीला 'कलानगरी' असे संबोधले जाते. महाराजांच्या औदार्याने व कलाकारांच्या उत्साहाने सर्व प्रकारच्या कला बहरात येऊन त्यांनी अक्षय कीर्ती संपादन केली.नाटक,गायन, चित्रकला या इतक्या फुलल्या की या कलांनी कोल्हापुराचे नाव देशभरात पोहोचविले,तर कुस्तीने तर मुकुटच चढविला.महाराजांची नजर शोधक असल्यामुळे ते अचूक व योग्य माणसांची निवड करण्यात निष्णात होते.आबालाल रहेमान अर्थात पेंटर यांची निवड अशीच केली गेली.जन्मतःच आबालाल यांना चित्रकलेचे अल्लाने दान दिले असले तरी त्यांचे श्रेष्ठत्व पारखून,त्या कोहिनूर हिऱ्याला उजेडात आणण्याचे व मार्गी लावण्याचे काम राजर्षांनी केले म्हणूनच आबालाल रहिमान सर्वांना कळले.

आबालाल हे चित्रकलेच्या शिक्षणासाठी मुंबईला गेले होते.त्या ठिकाणी त्यांनी चित्रकलेत विशेष प्रावीण्य मिळविले. अशा या आबालाल यांच्यावर मुंबईत अन्याय झाला.चित्रकलेतील आपली सिद्धहस्तता जाणून त्यांचा विश्वास होता,की आपण परीक्षेत प्रथम येणार,पण प्रथम क्रमांक एका श्रीमंत व वशिल्याच्या मुलाला देण्यात आला व दुसरा क्रमांक आबालाल यांना देण्यात आला.या कृत्याने आबालाल यांचे मस्तक फिरले.यासाठी त्यांनी तत्कालीन परीक्षाप्रमुखांशी वादही घातला.त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही.


निराश,नाराज,घायाळ झालेले आबालाल कोल्हापूरला परतले.अन्यायाचा आबालाल यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला.ही घटना शाहू महाराजांना समजली.त्याच आबालालला आत्ताच आपण कार्यमग्न ठेवले तर कोल्हापूरचा हा चित्रकार या नगरीचे नाव लौकिकास नेईल, असा विचार करून त्याला बोलाविणे पाठविले.


"काय आबालाल, काय करतोस तरी काय?"


"जी, काही नाही."


"काही नाही म्हणून कसे चालेल ? अरे,तू उत्तम कलाकार आहेस.काहीतरी केलेच पाहिजे,मेरी बात सच है या नहीं? तुम्हारे जैसे कलाकार हमारे राज्य की शान है।"


प्रत्यक्ष छत्रपतींनी आपल्या कलेची प्रशंसा केल्याबद्दल त्यांच्यात विश्वासाचा अंकुर फुटला. नाराज चेहऱ्यावर हळूच हास्याची लकेर उमटली. त्या जाणत्या राजाने त्या लकेरीची क्षणात पहचान घेतली व जवळ जात आबालाल यांच्या पाठीवर थाप मारून आत्मविश्वास जागविण्याचा प्रयत्न केला.आत्मविश्वास हे कर्तृत्ववृक्षाचे  मूळ आहे.वृक्षाची मुळे जो-जो भूमीत खोल जातात,तो-तो वादळाशी झुंज देण्यास तो समर्थ होतो,याची जाण महाराजांना असल्यामुळे त्यांनी शाब्दिक खतपाणी घालण्याचे काम चालू ठेवले.जसा तो फुलोरा फुलला हे महाराजांच्या ध्यानी आले,त्या वेळी त्यांनी आबालाल यांना सरकारी शाळेत चित्रकलेचा शिक्षक म्हणून काम करण्यास सांगितले.महाराजांची आज्ञा त्यांनी स्वीकारली.

आबालाल हे स्वतःच्या मनाचे राजे नव्हे तर सम्राटच होते.मनाला आले तर शाळेत काम करणार,नाही तर भ्रमंती करीत फिरणार याची जाण महाराजांना इतरांनी करून दिली होती. असे इतर लोक महाराजांना आबालाल यांना नोकरीतून काढून टाकण्यासंबंधीपण सुचवीत असत.महाराज अशा हुजऱ्या- मुजऱ्या- खूशमस्कऱ्यांवर कधीही विश्वास ठेवीत नसत. प्रत्येक बाबतीत अनुभवाला ते अधिक प्राधान्य देत.

'अनुभव राहाणीविण कायसे श्रवण। गर्भअन्ध नेणे रत्नाकरण।।" (ज्ञानदेव) असे त्यांचे मत होते.

जीवनाचा साक्षात्कार स्वप्नाळू कल्पनेने कधीच होत नाही.जीवनाचे साफल्य नुसत्या गोड आभासातही होत नाही,ते कटू असलेल्या अनुभवातच होते.


एक दिवस महाराजांनी आपल्या खडखड्यातून सकाळी साधारणपणे ११ वाजता सोनतळीहून बाहेर पडून कोल्हापूरकडे प्रयाण केले.खडखड्यातून जाता जाता महाराज विचार करू लागले.आबालाल यांच्यासारखा जन्मजात कलाकार वाया जात आहे,याला काय करावयाचे?संपूर्ण जगताकडे जरी उत्तरे नसली तरी महाराजांच्याकडे प्रत्येक प्रश्नाला उत्तर होतेच.

खडखड्यातून जाताना अचानक रस्त्याच्या कडेने आपल्याच धुंदीत हा आबालाल कलाकार जात असलेला महाराजांनी पाहिला. खडखडा थांबविला.


"महाराज" आबालाल म्हणाले,


"अरेऽऽ आबालाल,कहाँ जा रहे हो? चलो, आओ,गाडी में बैठो।"


महाराजांच्या हुकमाचा धनी बनून आबालाल न बोलता खडखड्यात बसले.खडखडा आज वेगाने गाववेशीच्या बाहेर कोठेही न थांबता सुटला.महाराजांचा जाणारा खडखडा आज वेगाने कोठे चालला आहे?याचा जनतेला प्रश्न पडला.जनतेला तरी याचे उत्तर कोठून माहीत असणार? सरळ खडखडा आला तो ज्या ठिकाणी बाज,बहिरी,लगड,शिकारी पक्ष्यांना पक्षी व प्राणी यांची शिकार कशी करावयाची असते याचे ट्रेनिंग दिले जात होते या ठिकाणी येऊन खडखडा थांबला.


इथे आल्यानंतर महाराजांच्या आज्ञेवरून बहिरी या पक्ष्याला आकाशात खूप उंचीवर उडविण्यात आले.

त्या ठिकाणी तो स्थिर झाला.त्याने इतस्ततः पाहिले तर त्याला आपल्या खालून एक पक्षी जात असल्याचे दिसले.क्षणाचीही उसंत न घेता तीराप्रमाणे झेप घेऊन त्या बहिरी ससाण्याने पक्ष्याला जमिनीवर आणून लोळविले.बहिरी ससाण्याचा हा पराक्रम,ही झेप महाराजांनी अनेक वेळा पाहिली होती.


आबालाल यांना महाराज म्हणाले,"इस शिकार का तू क्या चित्र निकाल सकता है?"


क्षणात उत्तर दिले,"क्यों नहीं महाराज!"


महाराज एकदम प्रसन्न झाले.म्हणाले. "व्वा! व्वा! मला वाटलंच होतं,तू निश्चित चित्र निकालेगा! अभी निकालेगा?"


"जरूर निकाल सकता हूँ,पर मेरे पास कागज, पेन्सिल नहीं।"


"तुम बैठो यहाँ,तुला हवे ते सर्व आणून देतो."


महाराजांनी तिथे असलेल्या एका घोडेस्वाराला पाठवून हवे ते साहित्य मागवून घेतले.चित्र काढण्यासाठी आबालाल त्या ठिकाणी बसले. चित्र पूर्ण होण्यास बराच वेळ लागणार,हे जाणून त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करून महाराज निघून गेले.शाहूंच्या आठवणी,प्रा.नानासाहेब साळुंखे,वृषाली प्रकाशन,कोल्हापूर


आज आबालाल यांची अशी चित्रे जी पाहावयास मिळतात ती महाराजांनी अशा प्रकारे काढून घेतली.तसेच आबालाल यांची पंचगंगेच्या काठावरची देवळांची,

निसर्गसौंदर्याची चित्रे दिसतात तीही महाराजांनी प्रत्यक्ष नेऊन वरीलप्रमाणे काढावयास लावली.आबालाल यांच्यासारख्या महान कलाकार जो वाया चाललेला होता,त्याला त्यांनी उभा केला, फुलविला व त्यांच्या हसऱ्या कलेचे सौंदर्य पाहून आपण आजही म्हणतो,"व्वा! आबालाल,तुम कोल्हापूर की शान हो।'' पण या 'शान'च्या मागे शाहू महाराज होते ना.!