* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जुलै 2024

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३१/७/२४

ईस्टर आयलंड - Easter Island -

पक्षी मानवांचे बेट…


अठराव्या शतकाच्या सुरुवातीला जे पहिले युरोपियन लोक जहाजातून ईस्टर आयलंडवर उतरले ते जमिनीला खिळून, डोळे विस्फारून पाहत राहिले.

त्यांच्या नजरेला पडले ते हजारो दगडी पुतळे ! त्यातले शेकडो पुतळे निदान ३३ ते ६६ फूट उंचीचे आहेत आणि त्या प्रत्येक पुतळ्याचे वजन किमान ५० टन तरी सहज भरेल. आजही ते प्रत्येक प्रवाशाकडे तसेच त्याच्या नजरेला नजर भिडवत उभे आहेत, यंत्रमानवच जसे !


सुरुवातीला काही पुतळ्यांच्या डोक्यावर वेगवेगळ्या हॅटस् (टोप्या) ही होत्याज्या दगडातून पुतळे कोरले त्याच दगडातून पुन्हा हॅटस् कोरून काढलेल्या नाहीत.त्या दगडी हॅटस् चे वजनही प्रत्येकी १० टन तरी असेल.


पुतळ्यांच्या डोक्यावर हॅटस् घालायच्या तरी हवेतून आधी त्या उचलायला हव्यात ना? तरच त्या डोक्यावर ठेवता येणार.त्या उचलल्या कशा?


सर्व मानव संस्कृती,सर्व खंडे यांच्यापासून ईस्टर आयलंड इतके लांब आहे की तिथल्या लोकांना चन्द्र,सूर्य,तारे सुद्धा जास्ती जवळचे वाटावेत.

ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या या छोट्या खडकाळ भागात एक झाड उगवेल तर नशिबच म्हणायचे! म्हणूनच या पुतळ्यांच्या बाबतीत तरु हे दगडी पुतळे लाकडी रोलर्सवरून त्यांच्या सध्याच्या जागांवर आणले तरी स्पष्टीकरण द्यायला कुणी धजावलेले नाही.२००० हून अधिक लोक या बेटावर कधीच राहू शकणार नाहीत.


अशा या बेटावर आज त्याहूनही कमी लोक कित्येक वर्षे राहत आहेत.पुतळे बनविणाऱ्या पाथरवटांना जहाजांनी अन्नवस्त्राचा पुरवठा होत होता ही कल्पना पुराणकाळात अशक्य आहे.मग पुन्हा नेहमीचे प्रश्न आलेच.पोलादासारखा टणक दगड कोणत्या लोकांनी कोणत्या आयुधांनी लोण्यासारखा कापला? त्या दगडातून पुतळे कोणी कोरून काढले? सध्याच्या जागांपर्यंत ओढत कसे आणले?


ज्या दगडातून पुतळे कोरले आणि ज्या दगडातून त्यांच्या डोक्यावर घालण्यासाठी हॅटस् कोरल्या,ते दगड पुन्हा वेगवेगळ्या खाणींतून काढले आहेत.दगड अगदी गुळगुळीत केले कसे?पुतळे उभे केले कसे? नेहमीचेचे निरुत्तर करणारे प्रश्न.अशा प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत कधीच सापडलेली नाहीत.


राहणाऱ्या सर्व २००० लोकांनी रात्रंदिवस काम केले असे गृहीत धरले तरी त्या काळातील आयुधे वापरून हे प्रचंड पुतळे बनवण्याचे काम होणे अशक्य होते.

काही जणांना तरी थोडी फार जागा आहे तिथे शेती करणे,मासे पकडणे,कापड बनवणे या गोष्टी करणे आवश्यकच होते.


ज्वालामुखीच्या मुखातच संपूर्ण तयार असलेले,

अर्धवट संपवलेले असे किती तरी पुतळे आहेत.

जुनाट दगडी कुऱ्हाडी वापरून लाव्हाच्या भिंतीतून हे दगड काढणे अशक्य. अशा शेकडो जुनाट कुऱ्हाडी तिथे आढळतात पण त्या कशा काय? काय घडले असावे?


परग्रहांवरील अंतराळवीरांनी अत्याधुनिक साधनांचा वापर पौराणिक काळातल्या धर्मगुरुंना शिकवला असणार.त्यांनी लाव्हामधून दगड वेगळे काढले,त्यांचे पुतळे बनवले आणि एकाएकी अंतराळवीर बेट सोडून गेले.त्यांनी मागे ठेवलेली आयुधे बोथट झाली.

वापरता येईनाशी झाली.ज्यांना ती वापरता येत होती ते लोक मरण पावले असतील,बेट सोडून गेले असतील आणि अंतराळवीर नसल्याने नवीन आयुधांचा पुरवठा होणे शक्यच नव्हते.त्या त-हेची आयुधे बनविणे त्या मागासलेल्या जमातींना जमणे शक्य नव्हते.सर्व कामे अचानक थांबली आहेत हे तर स्पष्ट दिसते. 


कड्यावरच अर्धवट तयार असे दोनशेहून जास्त पुतळे दिसतात.अनेक वर्षे गेली.पुन्हा कधी तरी या जमातीमध्ये ते पुतळे पूर्ण करण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली असेल. दिवसेंदिवस त्यांनी कुऱ्हाडी वगैरे साध्या साध्या आयुधांनी ते पुतळे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असेल पण शेवटी लाव्हाच्या भिंतीवरून एक पुतळा काही त्यांना वेगळा काढता आला नाही.निराशेने आपल्या कुऱ्हाडी तिथे टाकूनच तेही निघून गेले.तिथे सापडलेली आयुधे,त्यांचा वापर करून ते पुतळे त्या मागासलेल्या जमातीनीच बनवले नाहीत असेच स्पष्टपणे दाखवतात.


मग हे पुतळे बनवले कुणी? पुन्हा सर्व पुतळे समुद्रावर नजर ठेवून बेटाच्या सर्व बाजूंनी उभे आहेत.

अंतर्भागावर त्यांची दृष्टी नाही. का?


दुर्दैवाने प्रथम उतरलेल्या युरोपियन मिशनऱ्यांनी सर्व नवीन जगात केले तेच इथे केले.बेटाचा काळा कालखंड तसाच राहील याची चोख व्यवस्था केली.


काही पुतळ्यांवर चित्रलिपी लिहिलेल्या लाकडी चौकटी सापडल्या होत्या.त्या मिशनऱ्यांनी जाळून टाकल्या.जगातले सर्व म्युझियम्स् शोधले तरी अशा डझनभर लाकडी चौकटींचा पत्ता आज लागेल असे वाटत नाही.तिथल्या चालीरीती,पूजाअर्चा या सर्वांवर त्यांनी बंदी घातली.तिथल्या लोकांवर नाना अत्याचार केले.पण तरीही या मिशनऱ्यांना एक गोष्ट साधली नाही.तिथले लोक या बेटाला 'पक्षी मानवांचे बेट' म्हणतच राहिले.सांगोवांगी चालत आलेली प्रचलित आख्यायिका सांगते की उडती माणसे या बेटावर उतरली व त्यांनी पुराणकाळात प्रथमच या बेटावर अग्नी चेतवला.या आख्यायिकेनुसार मोठ्या मोठ्या डोळ्यांच्या उडत्या प्राण्यांची चित्रेही या बेटावर आढळतात.ईस्टर आयलंडवर ज्या त-हेचे पुतळे सापडतात तसेच ते टिआहुआन्को येथे सापडतात.या संस्कृतींचा काही संबंध असेल का? एकाच त-हेचे पुतळे दोन्ही ठिकाणी का सापडावेत? 


१५३२ मध्ये टिआहुआन्कोबद्दल खोदून खोदून चौकशी केली तरी इंका लोक असेच म्हणत होते की टिआहुआन्को शहर भरभराटीत नांदताना कुणी पाहिलेलेच नाही


लोकांनी फक्त पाहिले आहेत ते विध्वंसक स्थितीतले त्या शहराचे भग्नावशेष! मानव जातीच्या अंधःकारमय काळातच ते बांधले गेले असावे.ईस्टर आयलंड टिआहुआन्कोपासून ३१२५ मैल तरी लांब आहे.अशा परिस्थितीत एका ठिकाणच्या संस्कृतीचा दुसऱ्या ठिकाणच्या संस्कृतीवर परिणाम होईल?


इंकांच्या आधीची पुराणे वीरकोचा या आदिदेवाच्या कथा सांगतात.त्यात या प्रश्नाचे उत्तर असेल का? संपूर्ण काळोख होता, सूर्यही नव्हता,तेव्हा वीरकोचाने हे जग निर्माण केले.धिप्पाड अशी मानवजमात त्याने दगडातूनच कोरून काढली.पण त्यांच्यावर रागावून त्याने महापुरात त्या सर्वांना बुडवून टाकले.मग त्याने चन्द्र आणि सूर्य उगवण्याची व्यवस्था केली आणि पृथ्वी प्रकाशमान झाली.


अपुर्ण– उर्वरित भाग पुढील भागात...!


पावसाने मनसोक्त पडावे 

अशा जमिनी किती राहिल्या ? 

नद्यांनी उरफोडून वहावे 

असे क्षेत्र किती ठेवलेय रिकामे ?

प्राण्यांनी फिरावे मुक्त - मनसोक्त 

असे जंगल किती उरलेय इथे ?

मग नदी भेटायला येते ऊरी 

घरी दारी 

जंगली जनावर खेटायला येते 

घरी दारी 

एक दोन पावसांच्याच सरी

अख्खे धरण भरून टाकतात

विराट शहरं 

अफाट खेडी

त्या आकारहीन पाण्याने मोडून पडतात

पक्षी झाले सैरभैर 

त्यालाही किती वर्षे उलटली 

सैरभैर होणं म्हणजे काय 

हे कळलं असेल कदाचित मनुष्य प्राण्याला

की तेही उरलं नाही त्यात?

की जीव तरारून आलाय त्याच्यात 

यंत्रमानवाचा?

🍂

डॉ. रवींद्र श्रावस्ती


एक विशिष्ट नोंद— राजकुमार सिद्धार्थ याला झालेल्या साक्षात्काराविषयी बरंच संशोधन झालं आहे. लिअल वॅटसन (Lyall Wastson) आपल्या 'द बायॉलॉजी ऑफ डेथ' या ग्रंथात लिहितो:


`Until about fifteen years ago, our pineal was thought to be a useless vestigial appendage, something left over from reptilian times. Then in 1959, Aaron Lerner of Yale University discovered that it produced a harmone which is called melatonin, and the pineal changed its image from degenerate body to renascent gland. Interest in pineal revived and a year later it became clear that melatonin was manufactured from serotonin, a very strange substance that occurs in the most unlikely places. It is found in dates and bananas and plums, but now where it is more common than in a species of wild figs that grow in tropics into huge sprawling trees with hanging roots that prop their branches up in beautiful shady colonnades. In Africa these banyan trees are sacred to many people and are very seldom cut. In India they are known as bo, and it is said that it was beneath one of these trees that the prince Siddharth Gautma sat (eating the figs?) when he suddenly understood the causes of human suffering. It was this enlightenment that led to his being called the Buddha.'


`सुमारे पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत,आमच्या पाइनलला एक निरुपयोगी वेस्टिजियल अपेंडेज समजले जात असे,जे सरपटणार्‍या काळापासून शिल्लक राहिलेले आहे.

त्यानंतर १९५९ मध्ये येल युनिव्हर्सिटीच्या ॲरॉन लर्नरने शोधून काढले की ते मेलाटोनिन नावाचे हार्मोन तयार करते आणि पाइनलने त्याची प्रतिमा खराब झालेल्या शरीरापासून पुनर्जागरण ग्रंथीमध्ये बदलली. पाइनलमध्ये स्वारस्य पुनरुज्जीवित झाले आणि एक वर्षानंतर हे स्पष्ट झाले की मेलाटोनिन हे सेरोटोनिनपासून तयार केले गेले होते, एक अतिशय विचित्र पदार्थ जो अत्यंत संभाव्य ठिकाणी आढळतो.हे खजूर,केळी आणि प्लममध्ये आढळते,परंतु आता हे जंगली अंजीरांच्या प्रजातींपेक्षा अधिक सामान्य आहे जे उष्ण कटिबंधात वाढतात आणि त्यांच्या फांद्या सुंदर छायादार कोलोनेड्समध्ये लटकलेल्या मुळे असलेल्या मोठ्या पसरलेल्या झाडांमध्ये वाढतात.आफ्रिकेत ही वटवृक्ष अनेक लोकांसाठी पवित्र मानली जातात आणि क्वचितच कापली जातात.भारतात त्यांना बो म्हणून ओळखले जाते आणि असे म्हटले जाते की या झाडांपैकी एका झाडाखाली राजकुमार सिद्धार्थ गौतम बसले होते. (अंजीर खात होते?) जेव्हा त्यांना अचानक मानवी दुःखाची कारणे समजली.या ज्ञानामुळेच त्यांना बुद्ध म्हटले गेले.'


'पाखरमाया' मारुती चितमपल्ली..




२९/७/२४

प्रिन्स एक बेडूक/ Prince a frog

एके वर्षी भरपूर पाऊस झाला होता. प्राणिसंग्रहालयाच्या आवारात खूप पाणी साठलं होतं.रोज रात्रीच्या वेळी बेडकांचं डरॉव डरॉव ऐकू येऊ लागलं.एकदा दिवे गेले होते.रात्रीची वेळ होती.

मी बाहेरून अर्धवट भिजत घरी परतलो,तर बंगल्याच्या पायऱ्यांवर अक्षरशःनखाएवढ्या आकाराची बेडकाची तीन पिल्लं दिसली.थंडी आणि पावसामुळे तीही बहुधा हैराण झाली होती आणि उबदार जागेच्या शोधात घराच्या पायरीपर्यंत उड्या मारत पोचली होती.दार उघडताच ती तिन्ही पिल्लं उबेसाठी घरात शिरली.आम्ही मेणबत्तीच्या प्रकाशात जेवलो आणि झोपून गेलो.ती तीन पिल्लं बहुधा उपाशीपोटीच आमच्या बाथरूममध्ये जाऊन झोपली.बाहेरच्या थंडी- पावसापासून त्यांना एकदाची सुटका मिळाली होती.त्यानंतर तीन-चार दिवस धुवांधार पाऊस सुरूच होता.पाऊस थांबला तसं बाथरूममधल्या त्या तीन पिल्लांपैकी दोन पिल्लं घराबाहेर निघून गेली.एक पिलू मात्र घरीच राहिलं. खरं तर आधी हे तिघंही बंगल्याच्या पायऱ्या उतरून गेले होते,पण दोघं हळूहळू उड्या मारत पुढे सटकले.

ते फाटकाखालून बाहेर गेले.सोलर लॅम्पच्या प्रकाशात मी त्यांना पाहत होतो.आणखी थोडं अंतर कापल्यावर दोघंही एकदमच डावीकडच्या गवतात उड्या मारून गायब झाले.मी पायऱ्यांजवळ परतलो,तर तिसरं पिल्लू अजून तिथेच होतं. 


आता ते परत बंगल्याकडे वळलं होतं. भावंडांबरोबर जाण्याचा त्याचा प्लॅन बहुधा रद्द झाला होता.

सावकाश उड्या घेत ते एकेक पायरी चढलं आणि थोडा वेळ घराच्या दारात थांबलं. मी आत शिरल्यावर माझ्या पाठोपाठ एक-दोन उड्या मारत तेदेखील आत शिरलं.


आम्ही गमतीत त्याचं नाव 'प्रिन्स' ठेवलं. त्या वेळी आमच्या बाथरूमच्या ड्रेनेजला जाळी नव्हती.त्या जागी नुसताच खड्डा होता.प्रिन्स उड्या मारत त्या खड्ड्यात जाऊन शांतपणे बसला.बाथरूमचा दिवा बंद करून आम्हीही झोपून गेलो.पुढे आठवडाभर प्रिन्स आम्हाला दिसलाच नाही.आमच्याकडे धुणी-भांडी करायला सविताबाई यायच्या.एकदा त्या अचानकच किंचाळून बाथरूमबाही आल्या. त्या कपडे धूत असताना ते पाणी प्रिन्सच्या अंगावर भस्सकन पडल्यामुळे त्याने अगदी त्यांच्यासमोरच टुणकन उडी मारली होती. त्याही घाबरून तशीच टुण्णकन उडी मारत बाथरूमबाहेर आल्या आणि 'वहिनी- वहिनी' म्हणून ओरडायला लागल्या. प्रतिभाने त्यांना शांत केलं.त्या काम करून निघून गेल्या.प्रिन्स मात्र मजेत घरभर फिरू लागला.पुढच्या काही दिवसांत प्रिन्स आमच्या घरामध्ये चांगलाच रुळला.बंगल्यात शिरलेले कीटक,डास, झुरळं, छोटे-मोठे कोळी आणि त्यांची जाळी खाऊन तो फस्त करायचा.बाथरूमच्या खड्ड्यातल्या गारठ्यात दिवसभर झोपून राहायचा.संध्याकाळी घराबाहेर पडून बंगल्याभोवतीच्या बागेत फेरफटका मारून अवतीभोवतीचे किडे-मकोडे खाऊन रात्री घराचं दार बंद होण्यापूर्वी परत बाथरुममध्ये यायचा.कधी कधी एखाद-दुसरी रात्र बाहेरही घालवायचा,पण पुन्हा घरात यायचा.


पावसाळा संपला.दिवाळी आली आणि त्यानंतर थंडी सुरू झाली.त्यामुळे आम्ही ब्लँकेट्स आणि गोधड्या काढल्या. प्रतिभाच्या शाळेची दिवाळीची सुट्टी संपली.शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी भल्या पहाटे प्रतिभा शाळेत निघाली,तर तिच्या नेहमीच्या वापराच्या बुटांपैकी एका बुटात प्रिन्स झोपला होता! मग काय ! तिला जुन्या फाटक्या चपला घालून शाळेत जावं लागलं.दुसऱ्या दिवशी परत तेच ! शेवटी प्रतिभाने स्वतःसाठी नवीन बूट आणले. कारण पुढचे अडीच-तीन महिने प्रिन्स प्रतिभाच्या त्या बुटातच राहायला आला होता.बेडूक हा एक उभयचर प्राणी आहे. तो जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकतो. 


असे प्राणी थंडीच्या दिवसांत दीर्घ झोप घेतात.

बेडकांच्या बऱ्याच जाती कायमच पाण्यात राहतात.

जमिनीवर राहणाऱ्या बेडकांना 'चामखिळे बेडूक' असंही म्हणतात. तर आमचा प्रिन्स हा एक छोटा चामखिळा बेडूक होता.हिवाळा संपल्यावर प्रिन्स अचानकच एका सकाळी बाथरूममध्ये दिसला.

झोपेच्या काळात बेडकांच्या शरीरामधल्या चरबीचा अन्नासारखा वापर होतो.त्यामुळे त्यांच्या शरीरातली ऊर्जा टिकून राहते आणि बेडूक आकाराने पूर्वीपेक्षा काहीसे छोटे दिसायला लागतात.त्यामुळे सुरुवातीला आम्ही त्यालाओळखलंच नाही. 


हा बहुधा नवाच बेडूक घरात आला असावा असंच आम्हाला आधी वाटलं;पण तो घरात सरावल्यासारखा किडे-मकोडे गट्टम करत हिंडू लागल्यामुळे तो प्रिन्सच असल्याची खात्री पटली.जमिनीवरचे किडे खाऊन झाले की तो हॉलच्या भिंतीलगत चालत चालत आतल्या खोलीत किंवा बाथरूममध्ये जायचा.

पुढच्या चार महिन्यांत तो जास्तच धिटाईने घरात कपाटाखाली,कॉटखाली, टेबलाखाली,कधी घरासमोरच्या पायऱ्यांवर दिसत असे.मी बागेतल्या झाडांना संध्याकाळी पाणी घालतानाही माझ्या मागे-पुढे उड्या मारत जमिनीवरचे किडे पकडत असे.त्याच वेळी एक दयाळ पक्षीही प्रिन्सच्या डिनर पार्टीमध्ये येत असे.एखाद्या दिवशी मी झाडांना पाणी घालायला गेलो नाही तर दोघंही बागेत माझी वाट पाहायचे आणि मग दयाळ पक्षी जवळच्या जास्वंदीच्या आपल्या घराकडे निघून जायचा आणि प्रिन्स हळूहळू पायऱ्या चढून घरात जाऊन बसायचा.


त्यानंतर पुन्हा पावसाळा आला.दरम्यान प्रिन्स बऱ्यापैकी मोठा आणि धष्टपुष्ट झाला होता.पहिला पाऊस आल्यावर तो घराबाहेर पडला.फाटक ओलांडून बाहेर गेला.पुढच्या काही दिवसांत समोरच्या तळ्यात खूप बेडूक आणि बेडक्या एकत्र भेटले.रात्रभर नर-माद्यांचा किरकिराट ऐकू यायचा. 


आम्ही अधूनमधून तिथे चक्कर मारायचो. थोड्याच दिवसांत तिथे पुष्कळ लहानशी पिल्लं दिसायला लागली. त्यांना 'टॅडपोल' म्हणतात.त्यांना सुरुवातीला माशांसारखी शेपटी असते,म्हणून त्यांना 'बेडूक मासे' म्हणतात.हे बेडूकमासे थोडे मोठे झाले की लहान बेडकांसारखे दिसायला लागतात.मग अशी पिल्लं पाण्याबाहेर येऊन स्वतंत्रपणे राहायला लागतात.

आदल्या वर्षी आमच्या घराच्या पायऱ्यांवर आलेली ती तीन पिल्लं अशीच होती.पावसाळा संपून दसरा जवळ आला.बरेच दिवस प्रिन्स दिसला नव्हता. 


एक दिवस संध्याकाळी मी बागेला पाणी देत असताना तो अचानक दिसला.त्याला येताना बघून मलाही आनंद झाला.मी त्याच्याकडे बघत होतो.तो उड्या मारत घराकडे येताना अधूनमधून मागे पाहत होता.त्याच्या पाठोपाठ आणखी एक बेडूक येत होता.ती त्याची जोडीदार होती.आम्ही तिचं नाव 'डायना' ठेवलं.(सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन)


थोड्याच दिवसांत हिवाळा सुरू झाला. आमच्याकडे तांदूळ आणि गहू ठेवण्यासाठी दोन मोठे पत्र्याचे डबे होते.त्या दोन डब्यांच्या मधल्या फटीमध्ये एका रात्री प्रिन्सने चक्क ताणून दिली.त्या वर्षीची त्याची झोप तिथे पार पडली.पुढचे अडीच-तीन महिने आम्ही मात्र दर आठवड्याला लागणारे गहू आणि तांदूळ दुकानातून थोडे थोडे आणून वापरले. 


डब्याच्या आवाजाने किंवा हालचालीने प्रिन्सची दीर्घ झोप मोडण्याची आमची इच्छा नव्हती.डायनाही कुठे दिसत नव्हती.तिनेही अशीच कुठे तरी जागा शोधली असावी असा आम्ही अंदाज बांधला.आम्ही स्वतःहून काही तिला शोधलं नाही.हिवाळा संपल्यावर परत दोघंही आपापली झोप संपवून घरामध्ये आणि अवतीभवती सापडणारे किडे,कोळी, झुरळं मटकावत खुशाल उंडारताना दिसू लागले.त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यावर दोघांनीही एकदमच घर सोडलं.त्याच पावसाळ्यात आम्हीही ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेलो. (समाप्त )


डोळस - लेखक : सुनील गोबुरे


तो अंध तरुण रोज काॅर्पोरेशनच्या त्या बसस्टाॕपवर उभा असतो.मी ज्या वारजेमाळ वाडीबसमधे चढतो,तोही त्याच बसमधे चढतो.मी वारजे जुन्या जकात नाक्याला माझ्या ऑफीसशी उतरतो अन तो अजून तसाच पुढे माळवाडीला जातो. त्याच्या पाठीवर जी सॕक सदृश्य बॕग असते त्यावर फिक्कट पुसट अक्षरे दिसतात,'जीवन प्रकाश अंध शाळा,माळवाडी.' गर्दीमुळे बऱ्याच वेळेला बसायला जागा मिळत नाही तेंव्हा काही सुजाण लोक त्याला बसायला जागा देतात,तेंव्हा तो विनम्रपणे नकार देतो. कोथरुड स्टँडच्या आसपास गाडी ब-यापैकी रिकामी होते तेंव्हा आम्हाला बसायला जागा मिळते.माझा स्टाॅप त्यानंतर लगेच असल्याने मी पुढे जाऊन बसतो व उतरुन जातो. बसबरोबर त्या तरुणाची आठवण दुस-या दिवसापर्यंत पुढे निघून जाते. 


त्या दिवशी योगायोगाने आम्ही नळस्टाॅपला एका सीटवर बसतो.ब-याच  दिवसांचे कुतुहल असल्याने मी त्याला विचारतो..

'तुम्ही रोज बसला दिसता..पुढे माळवाडीला जाता..स्टुडंट आहात का?' 

अचानक मी विचारलेल्या प्रश्नाने तो आधी चमकतो.  मग उत्तर देतो.

'सर, मी विद्यार्थी नाही, मी शिकवतो..'

'ओ अच्छा..ब्रेल वाचायला वगैरे शिकवता का मुलांना?' मी विचारतो.

तो हसतो..मग उत्तरतो, 'नाही सर. मी ज्या मुलांना शिकवतो ती मुले ब्रेल मधले मास्टर आहेत. मी त्यांना कॉम्प्यूटर ब्रेल कोड शिकवतो..आम्ही अंध व्यक्तींना उपयुक्त ब्रेल साॕफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारी कोड्स तिथल्या मुलांना शिकवतो.ही मुले पुढे ब्रेल प्रोग्रामर होतील. '


माझ्यासाठी हे नवीनच होतं..मी उत्सुकतेने त्याला विचारतो.. 'अरे वा! म्हणजे दिवसभर तुम्ही तिकडेच शिकवायला असता?'


 पुन्हा मला खोडून काढत तो म्हणतो,

'नाही मी दुपारी परत येतो..डेक्कनला आमच्या कंपनीत..तिथे आम्ही काही स्पेशल प्रोजेक्टसवर काम करतो.'


मी चिकाटीने पुन्हा त्याला विचारतो 'म्हणजे ब्रेल प्रोग्रामिंग वगैरे?'


पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवत  तो म्हणातो,'आम्ही जे करतो त्याला एथिकल हॕकींग म्हणतात..

तुम्ही त्याबद्दल ऐकले असेल.'


आता थक्क होण्याची वेळ माझ्यावर आलेली असते.

'माय गाॅड.. पण एथिकल हॅकिंग साठी लागणारे सिस्टीम्स..सर्व सुविधा…?' 

'आमच्याकडे आहेत..' तो पटकन म्हणतो, 'आता विषय निघालाय म्हणून सांगतो. आपल्या देशात ज्या  सरकारी वेबसाईट्स आहेत त्यांचे सतत हॅकिंग होत राहते..ते काम  देशविरोधी गृप्स करत राहतात. आम्ही अशा हॅकर्सना कसा प्रतिबंध करता येईल यासाठी नॅशनल इन्फाॅर्मेटीक्स सेंटर म्हणजे NIC बरोबर मिळून काम करतो. आम्ही चार अंध मित्र आहोत..आम्ही या लोकांना लोकेट करतो..आम्ही हे काम NIC बरोबर मिळून करतो, कारण NIC या सर्व सरकारी वेबसाईट्स होस्ट करते व त्यांच्या सुरक्षेची काळजी घेते.या सर्व अज्ञात शक्तींना प्रातिबंध करण्यासाठी आम्हाला आम्हा अंध लोकांमधे जन्मजात असलेले Intuition कामाला येते..' तो हसत म्हणतो. 


तो तरुण जे सांगत असतो त्याने मी अवाकच होतो.हा तरुणसवदा मुलगा जे एवढ्या सहजतेने सांगत आहे ते करणे  सोपे नसते. मी स्वतः माझी छोटीशी आय.टी  कंपनी चालवत असल्याने हे सारे किती अवघड आहे हे मला ठाउक असते.तरीही न राहवून मी त्याला शेवटचं विचारतो,

'फक्त या कामावर तुम्ही व तुमची कंपनी चालते..?'


'नाही सर..!' तो उत्तरतो, 'आम्ही ब्रेल काॅम्प्युटींग व एथिकल हॅकींगसाठी काही 'अल्गोरिधम'वर ही बरंच काम करतोय की जेणे करुन हे काम आमच्या इतर अंध बांधवापर्यंत आम्हाला पोहचवता येईल. आमचं काम प्रत्यक्ष NIC चे हेड ऑफीस हँडल करतं..काम खूप सिक्रेटीव्ह असल्याने यापेक्षा जास्त सांगता येत नाही.'


तो हसतो व म्हणतो,'बाय द वे तुमचा स्टाॅप आलाय..'

मी पाहतो तर खरोखरच माझा स्टाॅप आलेला असतो. 

'अरेच्चा..!' मी विचारतो.. 'तुम्हाला कसे कळाले माझा स्टाॅप आलाय?'

'सर तुम्ही तिकीट घेतले तेंव्हा मी तुमचा स्टाॅप ऐकला..माझ्या डोक्यातही एक प्रोग्राम देवाने आपलोड केलाय..Travelled Distance Analysis चा..पण  त्याबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन..गुड डे सर!'

तो मला हसत म्हणतो.


मी बसमधूनन उतरतो व स्तंभित होऊन ती नाहीशी होईपर्यंत फक्त पहात राहतो. 


खरे सांगू? आपल्या आंधळ्या दुनियेत आज मला एक डोळस माणूस भेटलेला असतो.. त्याच्या प्रखर प्रकाशात मी अक्षरशःदिपून जातो.


लेख माझ्यापर्यंत जसा आला जसा आहे तसा…


२७/७/२४

३.३ रक्ताभिसरण / 3.3 Circulation

२५.०७.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग


नेमक्या शब्दांमध्ये अचूकपणे आवश्यक असेल तेच मांडणं त्याला छान जमायचं. शरीरातल्या सगळ्या अवयवांविषयी माहिती सांगता यावी यासाठी तो त्याच्या प्लॅनिंगमध्येच कधी कुठल्या अवयवाविषयी माहिती सांगायची याचा आराखडा तयार करायचा आणि त्यानुसारच शिकवायचा.


सेंट बार्थोलोमेव्ज सोडल्यावर तो ऑक्सफर्डमध्ये गेला आणि तिथं त्यानं मर्टन कॉलेजात वॉर्डन (प्रमुख) म्हणूनही काम बघितलं.१६५१ साली त्यानं तिथे एक वाचनालय उभं करून त्यात चांगली पुस्तकं आणण्यासाठी मोठी देणगी दिली.तीन वर्षांनी ते वाचनालय त्याच्या नावावरून ओळखलं जायला लागलं.फॉकस्टोन या आपल्या जन्मगावीसुद्धा हार्वेनं एक शाळा उभारण्यासाठी निधीची व्यवस्था केली. त्यातून १६७४ साली तयार झालेलं हार्वे ग्रामर स्कूल आजही व्यवस्थित सुरू आहे!


१६२८ हे खूप महत्त्वाचं वर्ष होतं.त्या वर्षी हार्वेनं वैद्यकीय क्षेत्रात एक मोठीच खळबळ माजवून दिली.

सतराव्या शतकापर्यंत रक्त माणसाच्या यकृतात तयार होतं अशी सगळ्यांची समजूत होती.त्यानंतर माणसाचं हृदय ते रक्त सगळ्या अवयवांकडे नेतं,तिथे ते अवयव ते रक्त पूर्णपणे वापरून टाकतात, आणि त्यामुळे ते नष्ट होतं असं सगळेजण म्हणायचे.गेलननं लिहून ठेवलेलं होतं,की माणसाच्या शरीरात दीड आँस (म्हणजे ०.०४ लीटर) इतकं रक्त असतं.तसंच दर वेळी जेव्हा आपलं हृदय एखाद्या पाण्याच्या हापशासारखं रक्त उपसतं तेव्हा या रक्तापैकी १/८ रक्त शरीरात शोषून घेतलं जातं.त्यामुळे तेवढं रक्त सतत बदलावं लागतं असं गेलनचं म्हणणं होतं.पण हार्वेनं या सगळ्या समजुतींना धक्का दिला आणि हृदय हे एखाद्या साध्या पंपासारखं काम करतं असं विधान करून हलकल्लोळ माजवला!लॅटिन भाषेत लिहिलेल्या 'दे मोटू कोर्डिस एट सँग्विनस' (ऑन द मोशन ऑफ द हार्ट अँड ब्लड) या आपल्या ७२ पानी पुस्तकात त्यानं आपल्या सगळ्या थिअरीज मांडल्या होत्या. त्यानं हे पुस्तक हॉलंडमध्ये प्रकाशित केलं. गंमत म्हणजे त्यात खूपच टायपिंगच्या चुकाही होत्या.

त्याच्या लहानशा आकारामुळे ते लगेचच प्रसिद्ध झालं.हे सगळं छापून यायला १६२८ साल उजाडलं असलं तरी हार्वेचा याविषयीचा अभ्यास त्यापूर्वी सुमारे १२ वर्ष सुरू होता असं म्हणतात.तो कधीही निष्कर्षांपर्यंत पोहोचायची घाई करत नसे.अनेक वेळा आपली संशोधनं पुनःपुन्हा करून बघणं,ती अनेक कसोट्यांवर तोलून मापून बघणं यात तो अनेक वर्षं घालवत असे.तसंच आपल्या संशोधनानं आधीच्या निष्कर्षांना चुकीचं ठरवतानाही तो खूप घाबरत असे.म्हणूनच आपल्या म्हणण्याला वजन आणण्यासाठी त्यानं त्याविषयीची प्रात्यक्षिकं रॉयल कॉलेजात काम करत असताना अनेकांना दिली होती.आपल्या विचारांमध्ये हार्वे इतका गर्क असे की बरेचदा त्याला निद्रानाशाचा त्रास व्हायचा.अशा वेळी घरातल्याघरात एखादी चक्कर मारली की मग मात्र त्याला झोप यायची.अंधारात शांतपणे विचार करता येतो असं त्याचं मत असल्यामुळे तो कित्येकदा अंधार करून बसे.यामुळेच तो कधीकधी एकटाच कुणाला न सांगता लेण्यांमध्ये जाऊन बसत असे.त्याला सतत कॉफी प्यायला आवडे.


रक्त एकाच दिशेनं धावतं इतकंच सांगून हार्वे थांबला नाही.हार्वेचं म्हणणं होतं,की रक्त हे शरीरात सतत तयार होऊन वापरलं जात नसतं,तर अधूनमधून तयार होत असतं आणि ते तयार झालं की काळजीपूर्वक वापरून पुनःपुन्हा शुद्ध करून वापरलं जातं.हे ठरवताना त्यानं माणसाच्या हृदयातून दर मिनिटाला किती रक्त जात येत असतं हे मोजलं.ते आधीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त असल्याचं त्याच्या लक्षात आलं.


त्यानं पुढे काही गणितं केली.एका तासात हृदय किती रक्त पंप करतं हे त्यानं मोजलं तर ते आपल्या वजनाच्या तिप्पट रक्त कोणत्याही माणसाचं हृदय एका तासात पंप करतं असं हार्वेच्या गणितांनी सिद्ध होत होतं ! त्यामुळे हृदयातून निघालेलं आर्टरीज (धमन्या) मधलं रक्त व्हेन्स (शिरा) मार्गे वाहून येऊन पुन्हा हृदयात यायला हवं होतं आणि ते तसं येतही होतं.म्हणजेच जर हृदयाकडून इतर अवयवांकडे जाणारं रक्त ते अवयव शोषून घेत असतील,तर माणसाच्या शरीरात केवढं रक्त तयार करावं लागेल! किंबहुना ते करणं अशक्यच असेल! गेलनच्या सिद्धान्तांना हाही एक सुरुंगच होता.पण हार्वेला माणसाच्या शरीरातल्या धमन्या आणि शिरा या रक्तवाहिन्यांचं एकमेकांशी असलेलं नातं मात्र नक्की कसं असतं हे मात्र उमगलं नाही.रक्त माणसाच्या शरीरातून दोन वेगवेगळ्या मार्गांमधून फिरत असतं असंही हार्वेचं म्हणणं होतं.

त्यातला एक मार्ग आपल्या शरीरातल्या फुफ्फुसापासून सुरू होऊन रक्त शरीरभर नेणाऱ्या मार्गांना जोडलेला असतो,तर दुसरा मार्ग आपल्या शरीरामधलं रक्त महत्त्वाच्या अवयवांकडे नेत असतो,

असं मत त्यानं मांडलं.त्यासाठी त्यानं काही प्रात्यक्षिकंही करून दाखवली.


एकूणच हार्वेच्या मतांवर प्रचंड टीका झाली. गेलनच्या मतांना चुकीचं ठरवण्याची चूक त्यानं केलेली होती! पॅरिस विद्यापीठात शिकवणाऱ्या रिओलान नावाच्या प्राध्यापकानं हार्वेच्या संशोधनाला हास्यास्पद ठरवलं.आपल्या यकृतात सतत नवीन रक्त तयार होत असतं या गेलनच्या मतालाच तो चिकटून होता.पण हार्वेनं मात्र अनेक प्रात्यक्षिकं दाखवून त्याचं म्हणणं चुकीचं आहे हेही सिद्ध केलं.याचबरोबर रेने देकार्तसारखा गाजलेला विचारवंत आणि अनेक विषयांमधला तज्ज्ञ मात्र हार्वेला पाठिंबा देत होता.


हार्वेचं हे संशोधन सुरू असताना काही चित्रविचित्र गोष्टींचा सामनाही त्याला करावा लागे.हार्वे १६१८ साली पहिल्या जेम्स राजाचा वैयक्तिक डॉक्टर म्हणून नेमला गेला होता.पण त्या राजाचा चेटुकावर गाढा विश्वास होता.त्यानं त्याविषयी चक्क एक पुस्तकही लिहिलं होतं! त्या काळात प्रचंड राजकीय उलथापालथही चालू असे. राजाची सत्ता उलथवण्यासाठी एक गट सतत कार्यरत असे.त्यातच १६२५ साली राजा गंभीर आजारी पडला.त्याच्यावर कोणते उपचार करावेत हे लॉर्ड बकिंगहॅम नावाच्या राजाच्या मर्जीतल्या डॉक्टरनं सुचवलं आणि त्याला हार्वेनं सहमती दर्शवली.दुर्दैवानं हे उपचार केल्यावर राजाचा मृत्यू ओढवला ! शत्रूशी हातमिळवणी करून राजाचा घात केल्याच्या आरोपातून हार्वे मोठ्या नशिबानंच बचावला.या सगळ्यामुळे घाबरलेला हार्वे आपल्या सुरक्षिततेसाठी कमरेला सतत खंजीर बांधूनच फिरत असे! पण तो शांत होता.स्वतःहून तो कुणावर वार करायचा नाही.एकदा तो एका युद्धाच्या ठिकाणी गरज पडली तर जखमींवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी म्हणून गेला होता.त्या ठिकाणी तुंबळ लढाई सुरू असताना हार्वे दिवसभर तिथंच एका ठिकाणी शांतपणे एक पुस्तक वाचत बसला होता!


१६३२ साली नव्यानं राजसत्ता लाभलेल्या पहिल्या चार्ल्स राजाचा डॉक्टर म्हणून हार्वेची नेमणूक झाली.

राजाबरोबर हार्वे सगळीकडे जात असे.राजानं केलेल्या कित्येक शिकारींमध्ये मृत्युमुखी पडलेल्या हरणांचं शरीरविच्छेदन करायची आणि त्यातून त्यांच्याविषयी जाणून घ्यायची संधी हार्वेला आपोआप मिळाली.तसंच राजाच्या बागेत असलेल्या हरणांच्या मृत्यूनंतर त्यांचं शवविच्छेदन करून त्याचा अभ्यास त्यानं केला.त्यातून त्यानं चक्क प्राण्यांमधल्या बीजांडाचा शोध लावला होता.हार्वेचं वैद्यकशास्त्रातलं काम हे विज्ञानाच्या प्रगतीला बऱ्यापैकी वेग देणारं असल्यामुळे हार्वे हा जुने तात्त्विक विचार आणि नवे प्रयोगशील शोध यांच्यामधला दुवा मानला जातो.दुर्दैवानं यानंतर झालेल्या ब्रिटिश यादवी युद्धाच्या काळात राजाच्या विरोधात असलेल्या गटामधल्या काही लोकांनी हार्वेच्या घरावर हल्ला चढवला.त्यात हार्वेचं शरीरशास्त्राशी संबंधित असलेलं खूप लिखाण नष्ट झालं.त्यानं जमवलेले हरिण आणि इतर प्राण्यांचे सांगाडेही नष्ट झाले. तरीही युद्धात जखमी झालेल्यांची सेवा करणं आणि राजावर बिकट परिस्थिती ओढवलेली असताना त्याच्या मुलांचा सांभाळ करणं या कामांमध्ये हार्वेनं अजिबात कसर पडू दिली नाही.आयुष्याच्या उतारवयात आपल्या बायकोच्या मृत्यूमुळे हार्वे निराश झाला.त्याला मुलंबाळं आणि इतर फारसे नातेवाईक नसल्यामुळे त्याचा जगण्यातला उत्साहच आटला होता असं म्हटलं जायचं.मग जिवंत असलेल्या दोन भावांबरोबर तो अधूनमधून राहायचा. वाचनात तो आपला वेळ घालवायचा.खूप वेळा त्याला पुन्हा वैद्यकशास्त्राशी संबंधित कामांमध्ये गुंतवायचा काही जणांनी प्रयत्न करून बघितला.पण हार्वेनं त्यांना दाद दिली नाही.वयाच्या ८० व्या वर्षी मेंदूतल्या रक्तस्रावामुळे त्याचं निधन झालं.


एक वाचणीय नोंद …!!


जव्हारची स्वारी : मे १६७२ च्या सुमारास मोरोपंत पिंगळे दहा हजार स्वारांसह जव्हारच्या स्वारीसाठी रवाना.शिवाजी महाराज या वेळी नेमके कुठे होते हे सांगणारं विश्वसनीय साधन उपलब्ध नसलं,तरी ते मोरोपंतांना सुरतजवळ येऊन मिळतील असा एका इंग्रजी पत्रात उल्लेख (शिवकालीन पत्रसारसंग्रह क्रमांक १४७४) जयराम पिंडे यांच्या 'पर्णालपर्वत ग्रहणाख्यानामा'तही तसा उल्लेख.जव्हारचे राज्य कोळी राजा विक्रमशाह याच्या ताब्यात तर रामनगर सोमशाहच्या ताब्यात होते.हे दोघेही चौथिया राजा म्हणून ओळखले जात.दमण प्रांत या वेळी गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात होता. परंतु तेथील प्रजा मूळ हिंदू राजाला त्याने आपणाला कसलाही त्रास देऊ नये म्हणून उत्पन्नाचा चौथा हिस्सा देत असे.

म्हणून हे चौथिया राजे.१५९९ पासून हा प्रांत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला तरीही हे राजे हा चौथ वसूल करत.त्याबदल्यात या राजांनी आपल्या प्रजेचे चोर-दरोडेखोरांपासून रक्षण करावे अशी अट पोर्तुगीजांनी त्यांना घातली होती.१६७० मध्ये राजा विक्रमशाहाने सोमशाहाविरुद्ध बंड पुकारले आणि पोर्तुगीजांनी दमणची चौथाई आपणास द्यावी अशी मागणी केली.पोर्तुगीजांनी नकार देताच त्याने या मुलखातील गावं लुटली.

रामनगरच्या राजाला त्याचा बंदोबस्त करता आला नाही.त्यामुळे पोर्तुगीजांनी ही चौथाई मान्य केली.पुढं सोमशाहाने पोर्तुगीजांच्या मदतीने विक्रमशाहाविरुद्ध हत्यार उपसले.त्याची अनेक गावं लुटली तरीही त्याला विक्रमशाहाचा बीमोड करता आला नाही.डिसेंबर १६७१ मध्ये कोळीराजाच्या विरुद्धच्या या लढाईत आपणाला मदत करावी अशी विनंती पोर्तुगीजांनी शिवाजीमहाराजांना केली.याच संधीची वाट पाहात असलेल्या शिवाजीमहाराजांनी मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली फौजा रवाना केल्या. या फौजांनी ५ जून रोजी विक्रमशाहाचा पराभव केला.जव्हार स्वराज्यात आले शिवाय मोरोपंतांनी १७ लाखाचा खजिना ताब्यात घेतला.

जव्हारची सीमा नाशिकला लागूनच होती. तिथून सुरत फक्त १०० मैल.विक्रमशाह तिथून मोगलांच्या आश्रयास पळून गेला.मोरोपंत पुढे सोमशाहवर म्हणजे रामनगरवर चालून गेले.ते येत असल्याची खबर कळताच घाबरून गेलेला सोमशाह आपल्या बायका- मुलांसह गणदेवीपासून आठ मैलांवरच्या चिखली गावी पळून गेला.१६ जून ते १४ जुलैच्या दरम्यान रामनगर मराठ्यांच्या ताब्यात आलं.सुरत इथून फक्त साठ मैलांवर. शिवाजीराजा असा अगदी सीमेवर येऊन धडकल्याने सुरतेत पळापळ सुरू झाली होती.तिथल्या सुभेदारानं सुरतेचे दरवाजेही बंद करून टाकले होते.

२५/७/२४

रक्ताभिसरण / Circulation


माणसाच्या शरीरात कोणते अवयव कुठे आहेत आणि त्यांची रचना कशी आहे,हे ॲनॅटॉमीमध्ये समजल्यानंतर हे अवयव नेमके काय आणि कसं काम करतात याचं ज्ञान फिजिओलॉजी म्हणजेच शरीरक्रिया या विज्ञान शाखेमध्ये येतं.पूर्वी ग्रीकांनी यामध्ये काम करायचा प्रयत्न केला होता.पण त्यांनी काढलेले बरेचसे निष्कर्ष हे चुकीचे होते! त्यांनी हृदयाचं काम काय असतं हे पूर्णपणे चुकीचं सांगितलं होतं.हृदय हे रक्त उपसतं. पण हृदयात रक्त कुठून येतं आणि ते कुठे जातं हे ग्रीकांना समजलं नव्हतं.

शिवाय,ग्रीकांना व्हेन्स म्हणजे शिरा याच फक्त रक्तवाहिन्या असतात असं वाटत होतं.आणि आर्टरीजमध्ये (धमन्यांमध्ये) चक्क हवा भरलेली असते असं त्यांना वाटायचं.आर्टरी हा ग्रीक शब्दच मुळी हवा वाहून नेणारी नळी या अर्थाचा आहे!


मध्यंतरी अलेक्झांड्रियातल्या हिरोफिलसनं ख्रिस्तपूर्व काही काळापूर्वी आर्टरीज (धमन्या) आणि व्हेन्स (शिरा) या दोन्हींमधून रक्त वाहत असतं आणि आर्टरीज आणि व्हेन्स या दोन्हीही हृदयाला जोडलेल्या असतात,हे सांगितलं होतं.पण हृदयापासून लांब या रक्तवाहिन्या पुन्हा कुठं जोडल्या जातात हे कळायला काही मार्ग नव्हता. कारण या रक्तवाहिन्यांना त्या जसजशा हृदयापासून लांब जातील तसतसे अनेक लहान लहान फाटे फुटत जात होते आणि नंतर तर हे फाटे डोळ्यांना दिसणार नाहीत इतके लहान झाले होते आणि हा प्रश्न कितीतरी वर्षं अनुत्तरित राहिला होता.


यावर गेलननं मात्र विचार मांडला होता. हृदयाच्या स्नायूंमध्ये छिद्रं असतात आणि त्यातून रक्त पुन्हा आर्टरीज आणि व्हेन्स यांच्यात ये-जा करतं असं त्यानं सांगितलं होतं.अर्थात,ही छिद्रं कुणालाच दिसली नाहीत,पण गेलननं सांगितलं आहे म्हणून ती आहेत असं मानणाऱ्या अनेक पिढ्या आणि अनेक शतकं मध्ये गेली होती.


त्यातूनच इटालियन अनॅटॉमिस्ट हिरोनिमस फॅब्रिकस (Hieronymus Fabricius) (१५३७ ते १६१९) यानं 'दे फॉर्मेटे फिटू' या नावाचा गर्भ कसा वाढ जातो याबद्दलही एक छान पुस्तक लिहिलं.यामुळेच त्याला 'अँब्रियॉलॉजीचा जनक' म्हणतात. त्यानंच आपल्या घशातून आवाज येण्यासाठी लॅरिंग्ज कारणीभूत असतात हे सांगितलं आणि प्रकाशाच्या उपलब्धतेनुसार आपल्या डोळ्यांतली बाहुली (प्यूपिल) लहानमोठं होतं हेही सांगितलं.


फॅब्रिकसनं मोठ्या व्हेन्समध्ये (शिरांमध्ये) रक्त एकाच दिशेनं जाण्यासाठी (दूरच्या अवयवांकडून हृदयाकडे) व्हॉल्व्हज असतात असं दाखवून दिलं होतं.या व्हॉल्व्हजमुळेच रक्त लांबच्या अवयवांकडून गुरुत्वाकर्षणानं पुन्हा मागे न जाता हृदयाकडे जातं हे त्यानं दाखवून दिलं होतं. आपल्या 'दे व्हेनारम ऑस्टिओलिस' (De Venarum Ostiolis) या पुस्तकात त्यानं हे लिहिलंही होतं.पण हे तर गेलनच्या विचारांना छेद देणारं होतं. कारण गेलनच्या म्हणण्याप्रमाणे रक्त व्हेन्समधून दोन्ही दिशांनी ये-जा करत असतं.हे चुकीचं आहे हे जाणवलेलं असूनही फॅब्रिकसनं गेलनविरुद्ध मत मांडायचं धाडस केलं नाही.त्यानं फक्त व्हॉल्व्हज हे रक्त मागे जायची गती कमी करतात असं सांगितलं !


हे सांगण्याची छाती मात्र त्याच्या पुढच्या पिढीतल्या त्याच्याच विद्यार्थ्याला झाली. तसंही पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा भीड कमीच बाळगते म्हणा! इथेही तेच झालं


फॅब्रिकसच्या या शिष्यानं व्हेन्समधून रक्त एकाच दिशेनं जातं हे आपल्याच गुरूनं शिकवलेलं तत्त्व तर सांगितलंच,पण ते पुढे नेऊन रक्ताभिसरणाचं कोडं सोडवलं तो महारथी होता इंग्लिश वैज्ञानिक विल्यम हार्वे! त्याच्या या शोधामुळे खरं तर बायॉलॉजीचं विश्वच ढवळून निघालं होतं.


तो काळच फार भारावलेला होता.एकीकडे गेलनचं म्हणणं खोडून काढणारा फॅब्रिकस आणि रक्ताभिसरणाचं गूढ शोधणारा हार्वे हे गुरू-शिष्य आणि दुसरीकडे कोपर्निकसच्याही पुढे मजल मारलेला गॅलिलिओ.या मंडळींनी विज्ञानाचा चेहराच बदलायचा विडा उचलला होता जणू!


माणसाच्या शरीरात रक्त कुठे आणि कसं तयार होतं,त्यानंतर त्याच्यावर काय प्रक्रिया होतात,मग शरीरातून रक्ताचा प्रवास कसा होतो.या सगळ्या गोष्टींविषयी सगळ्यांना पूर्वीपासून कुतूहल वाटत असलं तरी सोळाव्या शतकापर्यंत त्यासंबंधी भरीव असं काम कुणी केलं नव्हतं.अंदाजानं या संदर्भातल्या अनेक गोष्टींविषयीचे निष्कर्ष काढले जायचे.विल्यम हार्वे (१५७८ ते १६५७) या ब्रिटिश डॉक्टरनं यासंबंधीच्या सगळ्या गैरसमजांवर पडदा टाकत माणसाच्या हृदयाचं एखाद्या पंपासारखं रक्त उपसायचं काम कसं चालतं याविषयी प्रथमच सखोल विवेचन केलं.किंबहुना रक्त शरीरातून फिरवायचं काम हृदय करतं हे त्यानं जेव्हा सांगितलं तेव्हा त्यावर कोणीही विश्वास ठेवेना.माणूस आणि इतर सस्तन प्राण्यांच्या बाबतीत पुरुषाच्या वीर्यातले शुक्राणू आणि स्त्रीच्या गर्भाशयातलं बीजांड यांच्या संयोगातून नवा जीव निर्माण होतो अशी संकल्पना मांडणाराही तो पहिलाच संशोधक होता.


इंग्लंडमधल्या केंट परगण्यातल्या फॉकस्टोन या गावात एका प्रतिष्ठित घराण्यात हार्वे जन्मला.त्याचे वडील त्या गावाचे महापौर होते.त्यांना एकूण ९ मुलं होती.विल्यम हा त्यांच्यापैकी सगळ्यात मोठा होता. केंटबरीच्या किंग्ज स्कूलमध्ये त्याचं प्राथमिक शिक्षण झालं.सुरुवातीला हार्वेनं लॅटिन भाषा शिकण्यावर लक्ष केंद्रित केलं.वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली.

१५९७ साली हार्वेनं केंब्रिज विद्यापीठाच्या आधिपत्याखाली असलेल्या गॉनव्हील अँड कायस कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवली.हे कॉलेज सुरू करणाऱ्यांपैकी एक असलेला जॉन कायस तिथल्या विद्यार्थ्यांना अनुभव मिळवण्यासाठी परदेशी जाऊन काम करायचा सल्ला नेहमी देई.तो वंद्य मानून हार्वे इटलीतल्या पडुआ विद्यापीठात गेला.तिथे त्याला शिकवायला हिरोनायमस फॅब्रिशियस आणि ॲरिस्टॉटलच्या विचारांना पुढे नेणारा सेसार मोंडिनी हे होते. १६०२ साली हार्वेनं आपलं शिक्षण पूर्ण केलं.इंग्लंडमध्ये परतल्यावर त्यानं आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली.लंडनमधल्या लॅन्सेलट ब्राऊन नावाच्या एका प्रख्यात डॉक्टरच्या एलिझाबेथ नावाच्या मुलीशी त्यानं लग्न केलं.त्यांना मूल मात्र झालं नाही.


सजीव- अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन


हार्वेनं आता लंडनमध्ये आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता.१६०९ ते १६४३ या काळात त्यानं सेंट बार्थोलोमेव्ज नावाच्या इस्पितळात काम केलं. तिथे त्याला वर्षाला फक्त ३३ पौंड्स इतका क्षुल्लक पगार मिळत असे.रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सचाही तो सभासद होता.हार्वेच्या शिकवण्याची काही ठळक वैशिष्ट्यं होती.त्याचा विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यावर भर असे.तो कधीही दुसऱ्या कुणावर टीका करायच्या भानगडीत पडत नसे.विद्यार्थ्यांना काहीतरी अर्धवट माहिती देणं,काहीतरी चुकीचं सांगणं,त्यांचा गोंधळ उडेल अशी भाषा वापरणं अशा गोष्टी तो टाळायचा.


शिल्लक राहिलेला भाग पुढील २७.०७.२४ या लेखामध्ये


एक वेगळी वाचणीय नोंद - १६७२ च्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरीजवळच्या एका छोट्याशा वाडीवर एक स्त्री प्रवाशांच्या राहण्याजेवण्याची सोय करत होती असा स्वतंत्र व्यवसाय करणारी त्या काळातली ती स्त्री 


दिवसभराच्या प्रवासानं आम्ही खूप थकलो होतो.ऊनही जास्तच होतं.दुपारी तीनच्या सुमारास आम्ही 'नेसरी'( कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील गाव.गडहिंग्लजच्या दक्षिणेस दहा मैलांवर.घटप्रभा नदीच्या उत्तरेस एक मैलांवर.) गावाजवळ होतो.दिवसभर खूपच दमछाक झाल्यानं तिथंच थांबलो.शहर अगदी मोकळ्या अशा ऐसपैस जागेवर वसलं होतं.संपूर्ण शहराला दगडी तटबंदी होती.इथं घोडदळाच्या काही तुकड्याही तैनात केलेल्या दिसल्या.बादशहाच्या मृत्यूच्या बातमीमुळं काही दगाफटका होऊ नये,कटकारस्थानं होऊ नये किंवा बंड होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात आली होती.मला या शहरात चार रुपयांची जकात मागितल्यानं थोडी वादावादीही झाली.अखेर ती जकात भरून आम्ही पुढचा प्रवास सुरू ठेवला अगदी सूर्य मावळेपर्यंत.रात्री आम्ही एका मोठ्या गावात पोहोचलो.या गावाचं नाव होतं 'जबरी.(नेसरी पासून आठ किलोमीटर वर असणारे ही जांभूळवाडी )


याही गावाला दगडी तटबंदी होती.रात्रीचं जेवण आणि मुक्कामासाठी माझे सेवक मला इथल्या सभ्य स्त्रीच्या घरी घेऊन गेले.तिनं माझं अगदी आपुलकीनं स्वागत केलं आणि तिच्या घरीच मुक्काम करण्याची विनंती केली.

तिला तीन मुलीही होत्या.अत्यंत देखण्या आणि नम्र.त्या मुलींनी माझी सगळी चौकशी केली.मला काय हवं नको ते पाहिलं.एका मुलीनं जेवणासाठी कोंबडी,तांदूळ,अंडी,

तेल,तूप असं सगळं सामान आणलं.या साहित्याला माझ्या नोकरांना तिनं स्पर्शही करू दिला नाही.तर दुसरीनं स्वयंपाकासाठी लाकूड,पाणी,भांडी आणि निखारे आणले.या दोघींची ही गडबड सुरू असताना तिसरी माझी झोपण्याची व्यवस्था करत होती.तिनं आमच्यासाठी गाद्या घातल्या. उशी आणि पांघरुणाची व्यवस्था केली.तीही अगदी नीटनेटकी.या छोट्याशा खेड्यात राहण्या-जेवणाची इतकी स्वच्छ आणि आटोपशीर व्यवस्था पाहून मी अचंबितच झालो होतो.अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या शहरातसुद्धा अशा सोयीसुविधा मला मिळाल्या नसत्या.विशेष म्हणजे इथं राहणारे लोक फक्त जनावरांचे कळप सांभाळतात. (बहुधा कॅरेचा मुक्काम धनगरवस्तीवर पडला असावा.)


 भारत आणि पूर्वेकडील प्रदेशातील प्रवास खंड १ (सन १६७२ ते १६७४ ) बार्थ लेमी ॲबेकॅरेअनुवाद-संपादन सदानंद कदम,दीपा माने - बोरकर,प्रकाशक-अक्षर दालन,कोल्हापूर






२३/७/२४

कटपयादी संख्येचे गूढ - The mystery of serial numbers

एक विस्तीर्ण पसरलेलं तळं आहे.त्याच्या किनाऱ्यावर एक झाड आहे.तळ्यात गोपी स्नान करताहेत आणि किनाऱ्याजवळच्या झाडावर गोपींची वस्त्रे घेतलेला कृष्ण बसलेला आहे.हे तसे अनेक चित्रांत / चित्रपटांत दिसलेले दृश्य. मात्र येथे नारद मुनींचा प्रवेश होतो.ते त्या गोपींशी संवाद साधतात.त्यांना विचारतात की कृष्ण हा लंपट,त्रास देणारा,खोड्या काढणारा वाटतो काय?


प्रत्येक गोपिकेशी वेगवेगळा संवाद साधताना नारदांना जाणवतं,ह्या गोपी कृष्णाला लंपट वगैरे मानत नाहीत,तर त्यांना कृष्ण हा अत्यंत प्रिय आहे.तो त्यांच्या जवळ आहे.अगदी जवळ. म्हणजे किती? तर प्रत्येक गोपिके

पासून समान अंतरावर आहे.मध्ये उभा असलेला कृष्ण अन् त्याच्या भोवती समान अंतरावर उभ्या असलेल्या गोपिका.अर्थात त्या सर्व गोपिका एका वर्तुळाच्या स्वरूपात उभ्या आहेत,ज्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे कृष्ण..! ह्या अशा रचनेबद्दल संस्कृतमध्ये एक श्लोक आहे.असं म्हणतात हा श्लोक महाभारताच्या काही 'हरवलेल्या' श्लोकांपैकी आहे -


गोपीभाग्यमधुव्रात-शृङ्गिशोदधिसन्धिग । खलजीवितखाताव गलहालारसंधर ।।


ह्या श्लोकाची गंमत आहे.हा श्लोक वाटतो तर श्रीकृष्णाच्या स्तुतीचा.पण त्याचबरोबर ह्या श्लोकात शंकराची स्तुती पण दडलेली आहे. पूर्वीच्या शैव-वैष्णव वादाच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं आहे.पण याहूनही महत्त्वाचं एक गूढ ह्या ग्लोकात लपलंय.श्रीकृष्ण आणि गोपींमध्ये जे केंद्र वर्तुळाचं सुरेख नातं तयार झालं आहे, त्या नात्याची गणितीय परिभाषा ह्या श्लोकात लपलेली आहे.आणि या परिभाषेतूनच (पाय) ची बिनचूक किंमत समोर येतेय..!


गोपिकांनी निर्माण केलेल्या वर्तुळाचा परीघ काढायचा असेल तर आजच्या गणितात सूत्र आहे:


परीघ = २ π ( पाय )


r म्हणजे वर्तुळाची त्रिज्या,अर्थात कृष्ण आणि गोपींमधलं समसमान अंतर.यात π (pie) ची निश्चित संख्या अनेक शतकं माहीत नव्हती.π ला 22/ 7 असंही लिहिलं जातं.

अर्थात 3.14. मात्र ह्या श्लोकात π (पाय) ची किंमत दशांशाच्या पुढे ३१ आकड्यांपर्यंत दिलेली आहे.आता श्लोकात लपलेले हे आकडे कसे बघायचे?याचं उत्तर आहे कटपयादी संख्या.


π पायची किंमत 3.141,5926535,

8979323846,2643383279502,8841971693993751


कटपयादी ही अगदी प्राचीन काळापासून एखाद्या संख्येला अथवा आकड्यांना कूटबद्ध (encrypt) करण्याची पद्धत आहे.संस्कृतच्या वर्णमालेत जी अक्षरं आहेत,त्यांना १ ते ० अशा आकड्यांबरोबर जोडलं तर कटपयादी संख्या तयार होते.


या कटपयादी संख्येतील कूट भाषा समजण्यासाठी ह्या श्लोकाची मदत होते -


का दि नव,टा दि नव

पा दि पंचक,

या दि अष्टक 

क्ष शून्यम.


याचा अर्थ असा सर्व अक्षरांना प्रत्येकी एक अंक दिला आहे.त्याचे कोष्टक पुढीलप्रमाणे:


क पासून नऊ असे क्रमाने १ ते ९: क = १,ख = २,ग = ३,घ = ४,ड़् = ५,च = ६,छ = ७,ज = ८ झ = ९,


ट पासून नऊ असे क्रमाने १ ते ९: ट = १,ठ = २,ड = ३,ढ = ४,ण = ५, त = ६,थ = ७,द = ८,ध = ९


प पासून पाच असे क्रमाने १ ते ५: प = १,फ = २,ब = ३,भ = ४, म = ५.


य पासून आठ असे क्रमाने १ ते ८: य = १,र = २,ल = ३,व = ४,श = ५,ष = ६,स = ७,ह = ८,क्ष = ०


म्हणजे आता आपल्या श्लोकाची संख्या येते-


गोपीभाग्यमधुव्रात गो ३,पी१,भा-४,ग्य (यात मूळ अक्षर 'य' आहे) १,म - ५,धु -९…. म्हणजेच ३.१४१५९... ही किंमत आहे,π ची.


अर्थात शेकडो वर्षांपूर्वी वर्तुळाचा परीघ काढण्यासाठी π(पाय) ह्या गुणोत्तराची (ratio ची) किंमत इतक्या खोलात जाऊन कशी काय काढता आली,हा प्रश्न शिल्लक राहतोच.


पृथ्वीचा परीघ,चंद्राचा परीघ यांच्या संख्या भारतीय ग्रंथांमध्ये हजारो वर्षांपूर्वीपासून आढळतात.

आजच्या अत्याधुनिकतंत्रज्ञानाद्वारे काढले गेलेले परीघ किंवा व्यास,हे वेदग्रंथांच्या विभिन्न श्लोकांमधून / सूक्तांमधून काढलेल्या संख्येच्या अगदी जवळ आहेत.उदा.आर्यभटने पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने अर्थात ३९,९६८ कि.मी.आहे हे सांगितले होते.आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा व्यास ४०,०७५ किमी. आहे,हे सिद्ध झाले आहे.


(पाय) ही संकल्पना किती जुनी आहे? इसवी सनापूर्वी साधारण अडीचशे वर्षांपूर्वी कोपर्निकसने याचा वापर केलेला आढळतो. त्याहीपूर्वी,म्हणजे इसवी सनापूर्वीच्या सहाव्या शतकात मिस्रमधे पायचा उल्लेख आढळतो. पाश्चिमात्य विज्ञानाचा बराच इतिहास जतन करून ठेवला असल्याने तेथे असे पुरावे आढळतात. आक्रमकांनी ह्या पुराव्यांना नष्ट केले नसल्याने आजही जुन्या बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत.


आपल्या भारतात मात्र असे नाही.येणाऱ्या आक्रमकांनी येथील ज्ञानाची साधनेच नष्ट केल्यामुळे जुन्या खुणा सापडणं अत्यंत कठीणआहे.तरीही (पाय) चा उल्लेख इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या शल्ब सूत्रात आढळतो.मात्र π (पाय) ह्या संकल्पनेचे अस्तित्व आणि त्याची अचूकता ही बऱ्याच पूर्वीपासून भारतीयांना माहीत असावी, असं वाटण्याला भरपूर जागा आहे.


बऱ्याच नंतर,म्हणजे पाचव्या शतकाच्या सुरुवातीला आर्यभटने π(पाय) ची किंमत दशांश चिन्हाच्या चार आकड्यापर्यंत बरोबर शोधून काढली असल्यामुळे पायच्या शुद्ध रूपातील संख्येचा मान आर्यभटकडे जातो. 


पुढे कटपयादी सूत्र वापरून केलेला श्लोक हाती आला अन् पायची किंमत दशांशानंतर ३१ आकड्यापर्यंत मिळाली.


कटपयादी संख्येचा उपयोग केवळ गणितामध्ये होतो असे नाही,तर रागदारी,खगोलशास्त्र अशा अनेक ठिकाणी कटपयादीचा वापर झालेला आहे.दाक्षिणात्य संगीतात,

विशेषतःकर्नाटक संगीतात,कटपयादीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर झाला आहे.कटपयादीच्या मदतीने वेगवेगळे राग व त्यांच्या स्वरमालिका लक्षात ठेवणे सोपे जाते.


इसवी सनाच्या पाचशे वर्षांपूर्वी झालेल्या पिंगलाचार्यांनी कटपयादी संख्येचे प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीने केले.पिंगलाचार्य हे व्याकरण महर्षी पाणिनींचे बंधू होते.


वेदांच्या वृतांमध्ये लघु-गुरु पद्धत वापरली जाते. ही काहींशी आजच्या संगणकामध्ये वापरल्या जाणाऱ्या 'बायनरी' पद्धतीसारखी आहे.मात्र यात लघु हा १ आणि गुरु हा ० या आकड्याने दर्शवला जातो.याचा वापर पिंगलाचार्यांनी तयार केलेली कटपयादी सूत्रे आहेत


म - ००० 

र - ०१०

य - ००१

भ - ०११

य - १००

स - ११०

ज - १०१

न - १११


अर्थात,कटपयादी संख्येच्या माध्यमातून आपल्या देशात हजारो वर्षांपासून गणित,खगोलशास्त्र,छंदशास्त्र,

संगीत यांचा अभ्यास होत आलेला आहे.आणि अशा ह्या संख्येच्या मदतीने π(पाय) ची किंमत दशांशाच्या ३१व्या स्थानापर्यंत काढणं आणि ती एखाद्या सकालमबिने (एम्बेड करणं) हे अद्भुताच्याच श्रेणीत येतं..!


टिप - कटप यादी संख्या मुळ पुस्तकात आपण पाहू शकता.भारतीय ज्ञानाचा खजिना,प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन