२५.०७.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग
नेमक्या शब्दांमध्ये अचूकपणे आवश्यक असेल तेच मांडणं त्याला छान जमायचं. शरीरातल्या सगळ्या अवयवांविषयी माहिती सांगता यावी यासाठी तो त्याच्या प्लॅनिंगमध्येच कधी कुठल्या अवयवाविषयी माहिती सांगायची याचा आराखडा तयार करायचा आणि त्यानुसारच शिकवायचा.
सेंट बार्थोलोमेव्ज सोडल्यावर तो ऑक्सफर्डमध्ये गेला आणि तिथं त्यानं मर्टन कॉलेजात वॉर्डन (प्रमुख) म्हणूनही काम बघितलं.१६५१ साली त्यानं तिथे एक वाचनालय उभं करून त्यात चांगली पुस्तकं आणण्यासाठी मोठी देणगी दिली.तीन वर्षांनी ते वाचनालय त्याच्या नावावरून ओळखलं जायला लागलं.फॉकस्टोन या आपल्या जन्मगावीसुद्धा हार्वेनं एक शाळा उभारण्यासाठी निधीची व्यवस्था केली. त्यातून १६७४ साली तयार झालेलं हार्वे ग्रामर स्कूल आजही व्यवस्थित सुरू आहे!
१६२८ हे खूप महत्त्वाचं वर्ष होतं.त्या वर्षी हार्वेनं वैद्यकीय क्षेत्रात एक मोठीच खळबळ माजवून दिली.
सतराव्या शतकापर्यंत रक्त माणसाच्या यकृतात तयार होतं अशी सगळ्यांची समजूत होती.त्यानंतर माणसाचं हृदय ते रक्त सगळ्या अवयवांकडे नेतं,तिथे ते अवयव ते रक्त पूर्णपणे वापरून टाकतात, आणि त्यामुळे ते नष्ट होतं असं सगळेजण म्हणायचे.गेलननं लिहून ठेवलेलं होतं,की माणसाच्या शरीरात दीड आँस (म्हणजे ०.०४ लीटर) इतकं रक्त असतं.तसंच दर वेळी जेव्हा आपलं हृदय एखाद्या पाण्याच्या हापशासारखं रक्त उपसतं तेव्हा या रक्तापैकी १/८ रक्त शरीरात शोषून घेतलं जातं.त्यामुळे तेवढं रक्त सतत बदलावं लागतं असं गेलनचं म्हणणं होतं.पण हार्वेनं या सगळ्या समजुतींना धक्का दिला आणि हृदय हे एखाद्या साध्या पंपासारखं काम करतं असं विधान करून हलकल्लोळ माजवला!लॅटिन भाषेत लिहिलेल्या 'दे मोटू कोर्डिस एट सँग्विनस' (ऑन द मोशन ऑफ द हार्ट अँड ब्लड) या आपल्या ७२ पानी पुस्तकात त्यानं आपल्या सगळ्या थिअरीज मांडल्या होत्या. त्यानं हे पुस्तक हॉलंडमध्ये प्रकाशित केलं. गंमत म्हणजे त्यात खूपच टायपिंगच्या चुकाही होत्या.
त्याच्या लहानशा आकारामुळे ते लगेचच प्रसिद्ध झालं.हे सगळं छापून यायला १६२८ साल उजाडलं असलं तरी हार्वेचा याविषयीचा अभ्यास त्यापूर्वी सुमारे १२ वर्ष सुरू होता असं म्हणतात.तो कधीही निष्कर्षांपर्यंत पोहोचायची घाई करत नसे.अनेक वेळा आपली संशोधनं पुनःपुन्हा करून बघणं,ती अनेक कसोट्यांवर तोलून मापून बघणं यात तो अनेक वर्षं घालवत असे.तसंच आपल्या संशोधनानं आधीच्या निष्कर्षांना चुकीचं ठरवतानाही तो खूप घाबरत असे.म्हणूनच आपल्या म्हणण्याला वजन आणण्यासाठी त्यानं त्याविषयीची प्रात्यक्षिकं रॉयल कॉलेजात काम करत असताना अनेकांना दिली होती.आपल्या विचारांमध्ये हार्वे इतका गर्क असे की बरेचदा त्याला निद्रानाशाचा त्रास व्हायचा.अशा वेळी घरातल्याघरात एखादी चक्कर मारली की मग मात्र त्याला झोप यायची.अंधारात शांतपणे विचार करता येतो असं त्याचं मत असल्यामुळे तो कित्येकदा अंधार करून बसे.यामुळेच तो कधीकधी एकटाच कुणाला न सांगता लेण्यांमध्ये जाऊन बसत असे.त्याला सतत कॉफी प्यायला आवडे.
रक्त एकाच दिशेनं धावतं इतकंच सांगून हार्वे थांबला नाही.हार्वेचं म्हणणं होतं,की रक्त हे शरीरात सतत तयार होऊन वापरलं जात नसतं,तर अधूनमधून तयार होत असतं आणि ते तयार झालं की काळजीपूर्वक वापरून पुनःपुन्हा शुद्ध करून वापरलं जातं.हे ठरवताना त्यानं माणसाच्या हृदयातून दर मिनिटाला किती रक्त जात येत असतं हे मोजलं.ते आधीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
त्यानं पुढे काही गणितं केली.एका तासात हृदय किती रक्त पंप करतं हे त्यानं मोजलं तर ते आपल्या वजनाच्या तिप्पट रक्त कोणत्याही माणसाचं हृदय एका तासात पंप करतं असं हार्वेच्या गणितांनी सिद्ध होत होतं ! त्यामुळे हृदयातून निघालेलं आर्टरीज (धमन्या) मधलं रक्त व्हेन्स (शिरा) मार्गे वाहून येऊन पुन्हा हृदयात यायला हवं होतं आणि ते तसं येतही होतं.म्हणजेच जर हृदयाकडून इतर अवयवांकडे जाणारं रक्त ते अवयव शोषून घेत असतील,तर माणसाच्या शरीरात केवढं रक्त तयार करावं लागेल! किंबहुना ते करणं अशक्यच असेल! गेलनच्या सिद्धान्तांना हाही एक सुरुंगच होता.पण हार्वेला माणसाच्या शरीरातल्या धमन्या आणि शिरा या रक्तवाहिन्यांचं एकमेकांशी असलेलं नातं मात्र नक्की कसं असतं हे मात्र उमगलं नाही.रक्त माणसाच्या शरीरातून दोन वेगवेगळ्या मार्गांमधून फिरत असतं असंही हार्वेचं म्हणणं होतं.
त्यातला एक मार्ग आपल्या शरीरातल्या फुफ्फुसापासून सुरू होऊन रक्त शरीरभर नेणाऱ्या मार्गांना जोडलेला असतो,तर दुसरा मार्ग आपल्या शरीरामधलं रक्त महत्त्वाच्या अवयवांकडे नेत असतो,
असं मत त्यानं मांडलं.त्यासाठी त्यानं काही प्रात्यक्षिकंही करून दाखवली.
एकूणच हार्वेच्या मतांवर प्रचंड टीका झाली. गेलनच्या मतांना चुकीचं ठरवण्याची चूक त्यानं केलेली होती! पॅरिस विद्यापीठात शिकवणाऱ्या रिओलान नावाच्या प्राध्यापकानं हार्वेच्या संशोधनाला हास्यास्पद ठरवलं.आपल्या यकृतात सतत नवीन रक्त तयार होत असतं या गेलनच्या मतालाच तो चिकटून होता.पण हार्वेनं मात्र अनेक प्रात्यक्षिकं दाखवून त्याचं म्हणणं चुकीचं आहे हेही सिद्ध केलं.याचबरोबर रेने देकार्तसारखा गाजलेला विचारवंत आणि अनेक विषयांमधला तज्ज्ञ मात्र हार्वेला पाठिंबा देत होता.
हार्वेचं हे संशोधन सुरू असताना काही चित्रविचित्र गोष्टींचा सामनाही त्याला करावा लागे.हार्वे १६१८ साली पहिल्या जेम्स राजाचा वैयक्तिक डॉक्टर म्हणून नेमला गेला होता.पण त्या राजाचा चेटुकावर गाढा विश्वास होता.त्यानं त्याविषयी चक्क एक पुस्तकही लिहिलं होतं! त्या काळात प्रचंड राजकीय उलथापालथही चालू असे. राजाची सत्ता उलथवण्यासाठी एक गट सतत कार्यरत असे.त्यातच १६२५ साली राजा गंभीर आजारी पडला.त्याच्यावर कोणते उपचार करावेत हे लॉर्ड बकिंगहॅम नावाच्या राजाच्या मर्जीतल्या डॉक्टरनं सुचवलं आणि त्याला हार्वेनं सहमती दर्शवली.दुर्दैवानं हे उपचार केल्यावर राजाचा मृत्यू ओढवला ! शत्रूशी हातमिळवणी करून राजाचा घात केल्याच्या आरोपातून हार्वे मोठ्या नशिबानंच बचावला.या सगळ्यामुळे घाबरलेला हार्वे आपल्या सुरक्षिततेसाठी कमरेला सतत खंजीर बांधूनच फिरत असे! पण तो शांत होता.स्वतःहून तो कुणावर वार करायचा नाही.एकदा तो एका युद्धाच्या ठिकाणी गरज पडली तर जखमींवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी म्हणून गेला होता.त्या ठिकाणी तुंबळ लढाई सुरू असताना हार्वे दिवसभर तिथंच एका ठिकाणी शांतपणे एक पुस्तक वाचत बसला होता!
१६३२ साली नव्यानं राजसत्ता लाभलेल्या पहिल्या चार्ल्स राजाचा डॉक्टर म्हणून हार्वेची नेमणूक झाली.
राजाबरोबर हार्वे सगळीकडे जात असे.राजानं केलेल्या कित्येक शिकारींमध्ये मृत्युमुखी पडलेल्या हरणांचं शरीरविच्छेदन करायची आणि त्यातून त्यांच्याविषयी जाणून घ्यायची संधी हार्वेला आपोआप मिळाली.तसंच राजाच्या बागेत असलेल्या हरणांच्या मृत्यूनंतर त्यांचं शवविच्छेदन करून त्याचा अभ्यास त्यानं केला.त्यातून त्यानं चक्क प्राण्यांमधल्या बीजांडाचा शोध लावला होता.हार्वेचं वैद्यकशास्त्रातलं काम हे विज्ञानाच्या प्रगतीला बऱ्यापैकी वेग देणारं असल्यामुळे हार्वे हा जुने तात्त्विक विचार आणि नवे प्रयोगशील शोध यांच्यामधला दुवा मानला जातो.दुर्दैवानं यानंतर झालेल्या ब्रिटिश यादवी युद्धाच्या काळात राजाच्या विरोधात असलेल्या गटामधल्या काही लोकांनी हार्वेच्या घरावर हल्ला चढवला.त्यात हार्वेचं शरीरशास्त्राशी संबंधित असलेलं खूप लिखाण नष्ट झालं.त्यानं जमवलेले हरिण आणि इतर प्राण्यांचे सांगाडेही नष्ट झाले. तरीही युद्धात जखमी झालेल्यांची सेवा करणं आणि राजावर बिकट परिस्थिती ओढवलेली असताना त्याच्या मुलांचा सांभाळ करणं या कामांमध्ये हार्वेनं अजिबात कसर पडू दिली नाही.आयुष्याच्या उतारवयात आपल्या बायकोच्या मृत्यूमुळे हार्वे निराश झाला.त्याला मुलंबाळं आणि इतर फारसे नातेवाईक नसल्यामुळे त्याचा जगण्यातला उत्साहच आटला होता असं म्हटलं जायचं.मग जिवंत असलेल्या दोन भावांबरोबर तो अधूनमधून राहायचा. वाचनात तो आपला वेळ घालवायचा.खूप वेळा त्याला पुन्हा वैद्यकशास्त्राशी संबंधित कामांमध्ये गुंतवायचा काही जणांनी प्रयत्न करून बघितला.पण हार्वेनं त्यांना दाद दिली नाही.वयाच्या ८० व्या वर्षी मेंदूतल्या रक्तस्रावामुळे त्याचं निधन झालं.
एक वाचणीय नोंद …!!
जव्हारची स्वारी : मे १६७२ च्या सुमारास मोरोपंत पिंगळे दहा हजार स्वारांसह जव्हारच्या स्वारीसाठी रवाना.शिवाजी महाराज या वेळी नेमके कुठे होते हे सांगणारं विश्वसनीय साधन उपलब्ध नसलं,तरी ते मोरोपंतांना सुरतजवळ येऊन मिळतील असा एका इंग्रजी पत्रात उल्लेख (शिवकालीन पत्रसारसंग्रह क्रमांक १४७४) जयराम पिंडे यांच्या 'पर्णालपर्वत ग्रहणाख्यानामा'तही तसा उल्लेख.जव्हारचे राज्य कोळी राजा विक्रमशाह याच्या ताब्यात तर रामनगर सोमशाहच्या ताब्यात होते.हे दोघेही चौथिया राजा म्हणून ओळखले जात.दमण प्रांत या वेळी गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात होता. परंतु तेथील प्रजा मूळ हिंदू राजाला त्याने आपणाला कसलाही त्रास देऊ नये म्हणून उत्पन्नाचा चौथा हिस्सा देत असे.
म्हणून हे चौथिया राजे.१५९९ पासून हा प्रांत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला तरीही हे राजे हा चौथ वसूल करत.त्याबदल्यात या राजांनी आपल्या प्रजेचे चोर-दरोडेखोरांपासून रक्षण करावे अशी अट पोर्तुगीजांनी त्यांना घातली होती.१६७० मध्ये राजा विक्रमशाहाने सोमशाहाविरुद्ध बंड पुकारले आणि पोर्तुगीजांनी दमणची चौथाई आपणास द्यावी अशी मागणी केली.पोर्तुगीजांनी नकार देताच त्याने या मुलखातील गावं लुटली.
रामनगरच्या राजाला त्याचा बंदोबस्त करता आला नाही.त्यामुळे पोर्तुगीजांनी ही चौथाई मान्य केली.पुढं सोमशाहाने पोर्तुगीजांच्या मदतीने विक्रमशाहाविरुद्ध हत्यार उपसले.त्याची अनेक गावं लुटली तरीही त्याला विक्रमशाहाचा बीमोड करता आला नाही.डिसेंबर १६७१ मध्ये कोळीराजाच्या विरुद्धच्या या लढाईत आपणाला मदत करावी अशी विनंती पोर्तुगीजांनी शिवाजीमहाराजांना केली.याच संधीची वाट पाहात असलेल्या शिवाजीमहाराजांनी मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली फौजा रवाना केल्या. या फौजांनी ५ जून रोजी विक्रमशाहाचा पराभव केला.जव्हार स्वराज्यात आले शिवाय मोरोपंतांनी १७ लाखाचा खजिना ताब्यात घेतला.
जव्हारची सीमा नाशिकला लागूनच होती. तिथून सुरत फक्त १०० मैल.विक्रमशाह तिथून मोगलांच्या आश्रयास पळून गेला.मोरोपंत पुढे सोमशाहवर म्हणजे रामनगरवर चालून गेले.ते येत असल्याची खबर कळताच घाबरून गेलेला सोमशाह आपल्या बायका- मुलांसह गणदेवीपासून आठ मैलांवरच्या चिखली गावी पळून गेला.१६ जून ते १४ जुलैच्या दरम्यान रामनगर मराठ्यांच्या ताब्यात आलं.सुरत इथून फक्त साठ मैलांवर. शिवाजीराजा असा अगदी सीमेवर येऊन धडकल्याने सुरतेत पळापळ सुरू झाली होती.तिथल्या सुभेदारानं सुरतेचे दरवाजेही बंद करून टाकले होते.