* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: प्रिन्स एक बेडूक/ Prince a frog

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२९/७/२४

प्रिन्स एक बेडूक/ Prince a frog

एके वर्षी भरपूर पाऊस झाला होता. प्राणिसंग्रहालयाच्या आवारात खूप पाणी साठलं होतं.रोज रात्रीच्या वेळी बेडकांचं डरॉव डरॉव ऐकू येऊ लागलं.एकदा दिवे गेले होते.रात्रीची वेळ होती.

मी बाहेरून अर्धवट भिजत घरी परतलो,तर बंगल्याच्या पायऱ्यांवर अक्षरशःनखाएवढ्या आकाराची बेडकाची तीन पिल्लं दिसली.थंडी आणि पावसामुळे तीही बहुधा हैराण झाली होती आणि उबदार जागेच्या शोधात घराच्या पायरीपर्यंत उड्या मारत पोचली होती.दार उघडताच ती तिन्ही पिल्लं उबेसाठी घरात शिरली.आम्ही मेणबत्तीच्या प्रकाशात जेवलो आणि झोपून गेलो.ती तीन पिल्लं बहुधा उपाशीपोटीच आमच्या बाथरूममध्ये जाऊन झोपली.बाहेरच्या थंडी- पावसापासून त्यांना एकदाची सुटका मिळाली होती.त्यानंतर तीन-चार दिवस धुवांधार पाऊस सुरूच होता.पाऊस थांबला तसं बाथरूममधल्या त्या तीन पिल्लांपैकी दोन पिल्लं घराबाहेर निघून गेली.एक पिलू मात्र घरीच राहिलं. खरं तर आधी हे तिघंही बंगल्याच्या पायऱ्या उतरून गेले होते,पण दोघं हळूहळू उड्या मारत पुढे सटकले.

ते फाटकाखालून बाहेर गेले.सोलर लॅम्पच्या प्रकाशात मी त्यांना पाहत होतो.आणखी थोडं अंतर कापल्यावर दोघंही एकदमच डावीकडच्या गवतात उड्या मारून गायब झाले.मी पायऱ्यांजवळ परतलो,तर तिसरं पिल्लू अजून तिथेच होतं. 


आता ते परत बंगल्याकडे वळलं होतं. भावंडांबरोबर जाण्याचा त्याचा प्लॅन बहुधा रद्द झाला होता.

सावकाश उड्या घेत ते एकेक पायरी चढलं आणि थोडा वेळ घराच्या दारात थांबलं. मी आत शिरल्यावर माझ्या पाठोपाठ एक-दोन उड्या मारत तेदेखील आत शिरलं.


आम्ही गमतीत त्याचं नाव 'प्रिन्स' ठेवलं. त्या वेळी आमच्या बाथरूमच्या ड्रेनेजला जाळी नव्हती.त्या जागी नुसताच खड्डा होता.प्रिन्स उड्या मारत त्या खड्ड्यात जाऊन शांतपणे बसला.बाथरूमचा दिवा बंद करून आम्हीही झोपून गेलो.पुढे आठवडाभर प्रिन्स आम्हाला दिसलाच नाही.आमच्याकडे धुणी-भांडी करायला सविताबाई यायच्या.एकदा त्या अचानकच किंचाळून बाथरूमबाही आल्या. त्या कपडे धूत असताना ते पाणी प्रिन्सच्या अंगावर भस्सकन पडल्यामुळे त्याने अगदी त्यांच्यासमोरच टुणकन उडी मारली होती. त्याही घाबरून तशीच टुण्णकन उडी मारत बाथरूमबाहेर आल्या आणि 'वहिनी- वहिनी' म्हणून ओरडायला लागल्या. प्रतिभाने त्यांना शांत केलं.त्या काम करून निघून गेल्या.प्रिन्स मात्र मजेत घरभर फिरू लागला.पुढच्या काही दिवसांत प्रिन्स आमच्या घरामध्ये चांगलाच रुळला.बंगल्यात शिरलेले कीटक,डास, झुरळं, छोटे-मोठे कोळी आणि त्यांची जाळी खाऊन तो फस्त करायचा.बाथरूमच्या खड्ड्यातल्या गारठ्यात दिवसभर झोपून राहायचा.संध्याकाळी घराबाहेर पडून बंगल्याभोवतीच्या बागेत फेरफटका मारून अवतीभोवतीचे किडे-मकोडे खाऊन रात्री घराचं दार बंद होण्यापूर्वी परत बाथरुममध्ये यायचा.कधी कधी एखाद-दुसरी रात्र बाहेरही घालवायचा,पण पुन्हा घरात यायचा.


पावसाळा संपला.दिवाळी आली आणि त्यानंतर थंडी सुरू झाली.त्यामुळे आम्ही ब्लँकेट्स आणि गोधड्या काढल्या. प्रतिभाच्या शाळेची दिवाळीची सुट्टी संपली.शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी भल्या पहाटे प्रतिभा शाळेत निघाली,तर तिच्या नेहमीच्या वापराच्या बुटांपैकी एका बुटात प्रिन्स झोपला होता! मग काय ! तिला जुन्या फाटक्या चपला घालून शाळेत जावं लागलं.दुसऱ्या दिवशी परत तेच ! शेवटी प्रतिभाने स्वतःसाठी नवीन बूट आणले. कारण पुढचे अडीच-तीन महिने प्रिन्स प्रतिभाच्या त्या बुटातच राहायला आला होता.बेडूक हा एक उभयचर प्राणी आहे. तो जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकतो. 


असे प्राणी थंडीच्या दिवसांत दीर्घ झोप घेतात.

बेडकांच्या बऱ्याच जाती कायमच पाण्यात राहतात.

जमिनीवर राहणाऱ्या बेडकांना 'चामखिळे बेडूक' असंही म्हणतात. तर आमचा प्रिन्स हा एक छोटा चामखिळा बेडूक होता.हिवाळा संपल्यावर प्रिन्स अचानकच एका सकाळी बाथरूममध्ये दिसला.

झोपेच्या काळात बेडकांच्या शरीरामधल्या चरबीचा अन्नासारखा वापर होतो.त्यामुळे त्यांच्या शरीरातली ऊर्जा टिकून राहते आणि बेडूक आकाराने पूर्वीपेक्षा काहीसे छोटे दिसायला लागतात.त्यामुळे सुरुवातीला आम्ही त्यालाओळखलंच नाही. 


हा बहुधा नवाच बेडूक घरात आला असावा असंच आम्हाला आधी वाटलं;पण तो घरात सरावल्यासारखा किडे-मकोडे गट्टम करत हिंडू लागल्यामुळे तो प्रिन्सच असल्याची खात्री पटली.जमिनीवरचे किडे खाऊन झाले की तो हॉलच्या भिंतीलगत चालत चालत आतल्या खोलीत किंवा बाथरूममध्ये जायचा.

पुढच्या चार महिन्यांत तो जास्तच धिटाईने घरात कपाटाखाली,कॉटखाली, टेबलाखाली,कधी घरासमोरच्या पायऱ्यांवर दिसत असे.मी बागेतल्या झाडांना संध्याकाळी पाणी घालतानाही माझ्या मागे-पुढे उड्या मारत जमिनीवरचे किडे पकडत असे.त्याच वेळी एक दयाळ पक्षीही प्रिन्सच्या डिनर पार्टीमध्ये येत असे.एखाद्या दिवशी मी झाडांना पाणी घालायला गेलो नाही तर दोघंही बागेत माझी वाट पाहायचे आणि मग दयाळ पक्षी जवळच्या जास्वंदीच्या आपल्या घराकडे निघून जायचा आणि प्रिन्स हळूहळू पायऱ्या चढून घरात जाऊन बसायचा.


त्यानंतर पुन्हा पावसाळा आला.दरम्यान प्रिन्स बऱ्यापैकी मोठा आणि धष्टपुष्ट झाला होता.पहिला पाऊस आल्यावर तो घराबाहेर पडला.फाटक ओलांडून बाहेर गेला.पुढच्या काही दिवसांत समोरच्या तळ्यात खूप बेडूक आणि बेडक्या एकत्र भेटले.रात्रभर नर-माद्यांचा किरकिराट ऐकू यायचा. 


आम्ही अधूनमधून तिथे चक्कर मारायचो. थोड्याच दिवसांत तिथे पुष्कळ लहानशी पिल्लं दिसायला लागली. त्यांना 'टॅडपोल' म्हणतात.त्यांना सुरुवातीला माशांसारखी शेपटी असते,म्हणून त्यांना 'बेडूक मासे' म्हणतात.हे बेडूकमासे थोडे मोठे झाले की लहान बेडकांसारखे दिसायला लागतात.मग अशी पिल्लं पाण्याबाहेर येऊन स्वतंत्रपणे राहायला लागतात.

आदल्या वर्षी आमच्या घराच्या पायऱ्यांवर आलेली ती तीन पिल्लं अशीच होती.पावसाळा संपून दसरा जवळ आला.बरेच दिवस प्रिन्स दिसला नव्हता. 


एक दिवस संध्याकाळी मी बागेला पाणी देत असताना तो अचानक दिसला.त्याला येताना बघून मलाही आनंद झाला.मी त्याच्याकडे बघत होतो.तो उड्या मारत घराकडे येताना अधूनमधून मागे पाहत होता.त्याच्या पाठोपाठ आणखी एक बेडूक येत होता.ती त्याची जोडीदार होती.आम्ही तिचं नाव 'डायना' ठेवलं.(सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन)


थोड्याच दिवसांत हिवाळा सुरू झाला. आमच्याकडे तांदूळ आणि गहू ठेवण्यासाठी दोन मोठे पत्र्याचे डबे होते.त्या दोन डब्यांच्या मधल्या फटीमध्ये एका रात्री प्रिन्सने चक्क ताणून दिली.त्या वर्षीची त्याची झोप तिथे पार पडली.पुढचे अडीच-तीन महिने आम्ही मात्र दर आठवड्याला लागणारे गहू आणि तांदूळ दुकानातून थोडे थोडे आणून वापरले. 


डब्याच्या आवाजाने किंवा हालचालीने प्रिन्सची दीर्घ झोप मोडण्याची आमची इच्छा नव्हती.डायनाही कुठे दिसत नव्हती.तिनेही अशीच कुठे तरी जागा शोधली असावी असा आम्ही अंदाज बांधला.आम्ही स्वतःहून काही तिला शोधलं नाही.हिवाळा संपल्यावर परत दोघंही आपापली झोप संपवून घरामध्ये आणि अवतीभवती सापडणारे किडे,कोळी, झुरळं मटकावत खुशाल उंडारताना दिसू लागले.त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यावर दोघांनीही एकदमच घर सोडलं.त्याच पावसाळ्यात आम्हीही ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेलो. (समाप्त )


डोळस - लेखक : सुनील गोबुरे


तो अंध तरुण रोज काॅर्पोरेशनच्या त्या बसस्टाॕपवर उभा असतो.मी ज्या वारजेमाळ वाडीबसमधे चढतो,तोही त्याच बसमधे चढतो.मी वारजे जुन्या जकात नाक्याला माझ्या ऑफीसशी उतरतो अन तो अजून तसाच पुढे माळवाडीला जातो. त्याच्या पाठीवर जी सॕक सदृश्य बॕग असते त्यावर फिक्कट पुसट अक्षरे दिसतात,'जीवन प्रकाश अंध शाळा,माळवाडी.' गर्दीमुळे बऱ्याच वेळेला बसायला जागा मिळत नाही तेंव्हा काही सुजाण लोक त्याला बसायला जागा देतात,तेंव्हा तो विनम्रपणे नकार देतो. कोथरुड स्टँडच्या आसपास गाडी ब-यापैकी रिकामी होते तेंव्हा आम्हाला बसायला जागा मिळते.माझा स्टाॅप त्यानंतर लगेच असल्याने मी पुढे जाऊन बसतो व उतरुन जातो. बसबरोबर त्या तरुणाची आठवण दुस-या दिवसापर्यंत पुढे निघून जाते. 


त्या दिवशी योगायोगाने आम्ही नळस्टाॅपला एका सीटवर बसतो.ब-याच  दिवसांचे कुतुहल असल्याने मी त्याला विचारतो..

'तुम्ही रोज बसला दिसता..पुढे माळवाडीला जाता..स्टुडंट आहात का?' 

अचानक मी विचारलेल्या प्रश्नाने तो आधी चमकतो.  मग उत्तर देतो.

'सर, मी विद्यार्थी नाही, मी शिकवतो..'

'ओ अच्छा..ब्रेल वाचायला वगैरे शिकवता का मुलांना?' मी विचारतो.

तो हसतो..मग उत्तरतो, 'नाही सर. मी ज्या मुलांना शिकवतो ती मुले ब्रेल मधले मास्टर आहेत. मी त्यांना कॉम्प्यूटर ब्रेल कोड शिकवतो..आम्ही अंध व्यक्तींना उपयुक्त ब्रेल साॕफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारी कोड्स तिथल्या मुलांना शिकवतो.ही मुले पुढे ब्रेल प्रोग्रामर होतील. '


माझ्यासाठी हे नवीनच होतं..मी उत्सुकतेने त्याला विचारतो.. 'अरे वा! म्हणजे दिवसभर तुम्ही तिकडेच शिकवायला असता?'


 पुन्हा मला खोडून काढत तो म्हणतो,

'नाही मी दुपारी परत येतो..डेक्कनला आमच्या कंपनीत..तिथे आम्ही काही स्पेशल प्रोजेक्टसवर काम करतो.'


मी चिकाटीने पुन्हा त्याला विचारतो 'म्हणजे ब्रेल प्रोग्रामिंग वगैरे?'


पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवत  तो म्हणातो,'आम्ही जे करतो त्याला एथिकल हॕकींग म्हणतात..

तुम्ही त्याबद्दल ऐकले असेल.'


आता थक्क होण्याची वेळ माझ्यावर आलेली असते.

'माय गाॅड.. पण एथिकल हॅकिंग साठी लागणारे सिस्टीम्स..सर्व सुविधा…?' 

'आमच्याकडे आहेत..' तो पटकन म्हणतो, 'आता विषय निघालाय म्हणून सांगतो. आपल्या देशात ज्या  सरकारी वेबसाईट्स आहेत त्यांचे सतत हॅकिंग होत राहते..ते काम  देशविरोधी गृप्स करत राहतात. आम्ही अशा हॅकर्सना कसा प्रतिबंध करता येईल यासाठी नॅशनल इन्फाॅर्मेटीक्स सेंटर म्हणजे NIC बरोबर मिळून काम करतो. आम्ही चार अंध मित्र आहोत..आम्ही या लोकांना लोकेट करतो..आम्ही हे काम NIC बरोबर मिळून करतो, कारण NIC या सर्व सरकारी वेबसाईट्स होस्ट करते व त्यांच्या सुरक्षेची काळजी घेते.या सर्व अज्ञात शक्तींना प्रातिबंध करण्यासाठी आम्हाला आम्हा अंध लोकांमधे जन्मजात असलेले Intuition कामाला येते..' तो हसत म्हणतो. 


तो तरुण जे सांगत असतो त्याने मी अवाकच होतो.हा तरुणसवदा मुलगा जे एवढ्या सहजतेने सांगत आहे ते करणे  सोपे नसते. मी स्वतः माझी छोटीशी आय.टी  कंपनी चालवत असल्याने हे सारे किती अवघड आहे हे मला ठाउक असते.तरीही न राहवून मी त्याला शेवटचं विचारतो,

'फक्त या कामावर तुम्ही व तुमची कंपनी चालते..?'


'नाही सर..!' तो उत्तरतो, 'आम्ही ब्रेल काॅम्प्युटींग व एथिकल हॅकींगसाठी काही 'अल्गोरिधम'वर ही बरंच काम करतोय की जेणे करुन हे काम आमच्या इतर अंध बांधवापर्यंत आम्हाला पोहचवता येईल. आमचं काम प्रत्यक्ष NIC चे हेड ऑफीस हँडल करतं..काम खूप सिक्रेटीव्ह असल्याने यापेक्षा जास्त सांगता येत नाही.'


तो हसतो व म्हणतो,'बाय द वे तुमचा स्टाॅप आलाय..'

मी पाहतो तर खरोखरच माझा स्टाॅप आलेला असतो. 

'अरेच्चा..!' मी विचारतो.. 'तुम्हाला कसे कळाले माझा स्टाॅप आलाय?'

'सर तुम्ही तिकीट घेतले तेंव्हा मी तुमचा स्टाॅप ऐकला..माझ्या डोक्यातही एक प्रोग्राम देवाने आपलोड केलाय..Travelled Distance Analysis चा..पण  त्याबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन..गुड डे सर!'

तो मला हसत म्हणतो.


मी बसमधूनन उतरतो व स्तंभित होऊन ती नाहीशी होईपर्यंत फक्त पहात राहतो. 


खरे सांगू? आपल्या आंधळ्या दुनियेत आज मला एक डोळस माणूस भेटलेला असतो.. त्याच्या प्रखर प्रकाशात मी अक्षरशःदिपून जातो.


लेख माझ्यापर्यंत जसा आला जसा आहे तसा…