* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जानेवारी 2025

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३१/१/२५

लोकांना काय हवं आहे?What do people want?

मिसेस टॅफ्ट आणि माझे सगळ्यात आधी याच पती-पत्नीने अभिनंदन केले,खरं तर ही पत्नी आत्ताच गंभीररीत्या आजारी होऊन अंथरुणात होती.जिम मैग्नम ओक्लाहामाच्या टुलसा मे लिफ्ट मेंटेनन्स कंपनीचे प्रतिनिधी होते.त्यांच्या जवळ टुलसाच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये लिफ्टच्या मॅनेजमेंटचे कॉन्ट्रॅक्ट होते. हॉटेलचा मॅनेजर दोन तासांपेक्षा जास्त लिफ्ट बंद करून हॉटेलच्या ग्राहकांना त्रास देऊ इच्छित नव्हता.दुरुस्ती करण्याकरता कमीत कमी आठ तासांचा वेळ हवा होता आणि मेंटेनन्स कंपनीमध्ये एक विशेष रूपाने प्रशिक्षित व्यक्ती नेहमी हॉटेलच्या सुविधेनुसार हजर राहत नव्हता.


मिस्टर मैग्नमने या कामाकरता आपल्या सगळ्यात चांगल्या मेकॅनिकची वेळ ठरवून टाकली.मग त्यांनी हॉटेल मॅनेजरला फोन केला आणि त्याला आपल्या आवडीची वेळ मिळवण्याकरता त्याच्याशी संवाद साधला."रिक मी जाणतो की,तुमचं हॉटेल खूपच व्यस्त असतं आणि तुम्ही लिफ्टला जास्त वेळपर्यंत बंद ठेवून आपल्या ग्राहकांना त्रास देऊ इच्छित नाही.आम्ही तुमच्या समस्येला समजतो आणि आम्ही तुमच्या मनाप्रमाणे करण्याचा आटोकाट प्रयत्न करू;पण आम्हाला वाटतं की,आम्ही आत्ता दुरुस्ती नाही केली तर लिफ्टचं गंभीर नुकसान होऊ शकतं आणि नंतर तिच्या दुरुस्तीला खूपच जास्त वेळ लागू शकेल.मी जाणतो की,तुम्हाला असं नाही वाटणार की तुमच्या ग्राहकांना अनेक दिवस लिफ्ट बंदचा त्रास व्हावा." मॅनेजरला मानावं लागलं की,अनेक दिवस लिफ्ट बंद राहण्यापेक्षा काही तास लिफ्ट बंद राहणं जास्त चांगलंय.ग्राहकांना खूश ठेवण्याच्या मॅनेजरच्या इच्छेबरोबर सहानुभूती प्रगट करून मिस्टर मॅग्नमने हॉटेलच्या मॅनेजरला आपली गोष्ट पटवली आणि कोणत्याही प्रकारची कटूता न आणता.


जॉयस नॉरिस मिसुरीच्या सेंट लुईमध्ये पियानो टीचर होती.तिने सांगितले की,कोणत्या त-हेने त्यांनी एक अशा समस्येला सोडवलं,जी पियानो टीचरला किशारवयींबरोबर नेहमी येते.त्यांच्या वर्गात एक मुलगी होती बॅबेट.तिची नखं असाधारण लांब होती.

जर कोणाला पियानो वाजवण्याचे उचित प्रशिक्षण घ्यायचं आहे तर लांब नखांची खूपच मोठी बाधा येऊ शकते.


मिसेस नॉरिस सांगते,"मी जाणते की तिची लांब नखं तिच्या चांगल्या पियानो वाजवण्यात बाधक ठरतील. पियानो शिकण्याच्या आधी माझ्या बरोबर तिची जी चर्चा झाली,त्यात मी तिच्या नखांबद्दल काहीच बोलले नाही.मला नव्हतं वाटत की,पियानो शिकायच्या आधीच तिने निराश व्हावे आणि मला हे पण माहीत होतं की, ती आपली नखं कापणं पसंत करणार नाही,त्यांना तिने इतकी काळजीने वाढवलं आहे आणि ज्याच्या सुंदरतेवर तिला इतका गर्व होता."


पहिल्या धड्यानंतर जेव्हा मला वाटलं की,वेळ बरोबर आहे तेव्हा मी तिला म्हटलं,"बॅबेट,तुझे हात खूप आकर्षक मेहनती आहेत आणि तुझी नखंपण खूप सुंदर आहेत.पण जर ही नखं थोडी छोटी असती तर तू जास्त छान पियानो वाजवू शकली असतीस.

याबाबतीत विचार कर,ठीक आहे?" तिच्या चेहऱ्यावर नकारात्मक भाव सरळ दिसत होते.मी याबाबतीत तिच्या आईबरोबरपण बोलले आणि मी हेही सांगितलं की,तिची नखं खूप सुंदर आहेत.

मला एक आणखीन नकारात्मक प्रतिक्रिया बघायला मिळाली.हे स्पष्ट होतं की,बॅबेटची सुंदर लांब नखं तिच्या करता खूपच महत्त्वपूर्ण होती.


पुढच्या आठवड्यात बॅबेट आपल्या दुसऱ्या धड्याकरता क्लासमध्ये आली.मी चकित झाले.तिने आपली नखं कापली होती.मी तिची या गोष्टीसाठी तारीफ केली आणि म्हटलं की,इतकी मोठी,सुंदर नखं कापणं तिच्या करता त्यागाहून कमी नव्हतं.मी तिच्या आईलापण धन्यवाद दिले की, त्यांनी तिला नखं कापण्याकरता प्रोत्साहित केलं.आईचं उत्तर होतं की,अरे नाही मी काही नाही केलं.बॅबेटने स्वतःच हा निर्णय घेतला आणि हे पहिल्यांदाच घडले की,कोणाच्या सांगण्यावरून तिने आपली नखं छोटी केलीत.


काय मिसेस नॉरिसने बॅबेटला धमकावलं ? काय त्यांनी असं म्हटलं की,लांब नखं असणाऱ्या विद्यार्थ्यांना संगीत नाही शिकवणार? नाही... त्यांनी असं काही केलं नाही. त्यांनी बॅबेटला केवळ हे सांगितलं की,तिची नखं खूप सुंदर आहेत आणि ते कापणं म्हणजे बलिदानापेक्षा कमी नाही.त्यांचा अर्थ होता मला तुझ्याविषयी सहानुभूती आहे-मी जाणते की हे सोपं नाही पण यामुळे तुला संगीत शिकायला सोपे जाईल.


सॉल हूरॉक बहुतेक अमेरिकेचे नंबर वन इम्प्रेसेरियो होते.

जवळपास अर्ध आयुष्य त्यांचा संबंध कलाकारांबरोबर आला,

ज्यामध्ये चालियापस इसाडोरा डंकन व पालोवा सारखे विश्वप्रसिद्ध कलाकार होते.मिस्टर हूरॉकनी मला सांगितलं की आपल्या मूडी कलाकारांबरोबर व्यवहार करताना जी पहिली गोष्ट त्यांनी शिकली ती ही होती की,त्यांना सहानुभूतीची गरज होती.


तीन वर्षांपर्यंत ते पयोदर चालियापिनचे इम्प्रेसेरियो होते, ज्यांनी आपल्या संगीत प्रतिभेने सगळ्या जगाला रोमांचित केले होते; पण चालियापिन स्वतःच स्वतःकरता एक मोठी समस्या होते.ते नाठाळ छोट्या मुलासारखे व्यवहार करायचे.मिस्टर हूरॉकच्या शब्दांत ते हर त-हेने कोणत्याही वादळापेक्षा कमी नव्हते.


उदाहरणार्थ,चालियापिन मिस्टर हूरॉकला संगीताच्या कार्यक्रमाच्या दुपारी बोलावून सांगायचे,"माझी तब्येत ठीक नाही आहे.माझा गळा तर कच्चा हँबर्गरच्याप्रमाणे वाटतोय.आजच्या रात्री गाणं माझ्याकरता असंभव आहे." काय मिस्टर हूरॉक त्यांच्या बरोबर वाद घालत होते? बिलकूल नाही.ते जाणत होते की,कोणताच मॅनेजर आपल्या कलाकाराबरोबर या प्रकारे व्यवहार करत नाही.यामुळे ते चालियापिनच्या हॉटेलमध्ये पळत पळत जायचे आणि चेहऱ्यावर सहानुभूती आणून आत जात.ते खेद करत म्हणायचे की,किती खेदाची गोष्ट आहे! "किती खेदाची गोष्ट आहे की,तुम्ही आज गाऊ नाही शकत.मी हा कार्यक्रम लगेच रद्द करून टाकतो. यात तुम्हाला दोन हजार डॉलर्सचं नुकसान तर होईल; पण तुमच्या प्रतिष्ठेच्या तुलनेत हे काहीच नाही आहे." यावर चालियापिन उसासा भरून म्हणायचे की,तरी तुम्ही संध्याकाळपर्यंत वाट बघा.पाच वाजता या आणि बघा.तोपर्यंत होऊ शकते की मी काही सुधरू शकेन.


पाच वाजता परत एकदा मिस्टर हरॉक हॉटेलमध्ये पळत पळत पोहचायचे आणि सहानुभूती त्यांच्या चेहऱ्यावर साफ झळकायची.

एकवेळ परत ते कार्यक्रम कॅन्सल करण्यावर जोर द्यायचे आणि एक वेळ परत चालियापिन उसासा भरून म्हणायचे,बहुतेक तुम्ही आणखीन उशिरा येऊन बघा.बहुतेक तोपर्यंत माझी हालत सुधारेल.साडेसात वाजता हे महान गायक गाण्याकरता तयार होत असत;परंतु या शर्तीवर की, मिस्टर हूरॉक कार्यक्रमाच्या मंचावर ही घोषणा देतील की,चालियापिनला खूप सर्दी आहे,याकरता त्यांचा गळा खराब आहे.मिस्टर हूरॉक खोटं बोलायचे की,ते असं जरूर करतील.कारण ते जाणत होते की,या गायकाला मंचावर आणण्याचा हाच एकमात्र मार्ग आहे.


डॉ.आर्थर आय. गेट्सने आपल्या शानदार पुस्तक 'एज्युकेशनल साइकॉलॉजी'मध्ये लिहिलं आहे, "पूर्ण मानव जातीला सहानुभूती हवी असते.मूल आपल्याला लागलेलं दाखवतं आणि काही वेळा तर जाणूनबुजून लावूनही घेतं म्हणजे त्याला सहानुभूती मिळू शकेल. याच कारणांनी वयस्क लोकपण आपल्या जखमा दाखवतात,आपल्या दुर्घटनांच्या गोष्टी ऐकवतात, आपल्या दुखण्याच्या वेदना सांगतात,खास करून आपल्या ऑपरेशनबद्दल आपल्या वास्तविक किंवा काल्पनिक दुर्भाग्याकरता 'आत्म-दया' दाखवणे काही हद्दीपर्यंत पूर्ण मानव जातीच्या स्वभावात आहे."


जर तुम्ही लोकांकडून आपली गोष्ट मनवायला बघता आहात,तर या गोष्टी अमलात आणा.समोरच्या व्यक्तीचे विचार आणि इच्छांप्रती सहानुभूती दाखवा.

२९/१/२५

लोकांना काय हवं आहे?What do people want?

तुम्ही कोणत्या अशा जादूच्या वाक्याचा शोध घेताय जो वाद तो संपवेल,वाईट भावना संपवेल,सद्भाव कायम करेल आणि समोरच्या व्यक्तीला तुमची गोष्ट लक्षपूर्वक ऐकायला लावेल ?


हं,तर मग हे आहे वाक्य : मी तुम्हाला अजिबात दोष देत नाही.जर मी तुमच्या जागी असतो,तर यात काही शंका नाही की,मीही तुमच्या सारखाच विचार केला असता.


या प्रकारच्या गोष्टीनी मोठ्यात मोठा टीकाकारही मऊ पडेल आणि जेव्हा तुम्ही हे सांगता,तर तुम्हीसुद्धा शंभर टक्के बरोबर असता.कारण जर तुम्ही त्या व्यक्तीच्या जागेवर असता तर निश्चितपणे तुम्हीपण तेच करत असाल जे तो करतो आहे.अल केपोनचं उदाहरण घ्या. असं समजा,जर तुमच्या जवळ त्याच्या सारखं शरीर, स्वभाव आणि बुद्धी असती,जर तुम्हाला तेच वातावरण मिळालं असतं,जर तुम्हाला तसाच अनुभव मिळाला असता,तर तुम्ही पण अगदी त्याच्या सारखेच असता-जसा तो होता कारण तो याच सगळ्या गोष्टींकरता अल केपोन बनला होता.

उदाहरणार्थ,जर तुम्ही साप नाही आहात,तर याचं कारण फक्त इतकंस आहे की तुमचे आई-वडील साप नाही आहेत.


तुम्ही जे आहात,त्याचं खूप कमी श्रेय तुम्हाला जातं – आणि लक्षात ठेवा,जर लोक चिडचिड,अतार्किक किंवा पूर्वाग्रहानी ग्रस्त आहेत,तर यात त्यांचा दोषपण खूप कमी आहे.त्या दुर्भाग्यशाली व्यक्तींकरता दुःख करा, त्यांच्या करता सहानुभूती ठेवा.स्वतःला सांगा,जर ईश्वराची कृपा नसती,तर मी याच्या जागी असू शकलो असतो.तुम्ही ज्या लोकांशी भेटता,त्यांच्यातले तीन चतुर्थांश सहानुभूतीचे भुकेले असतात,तुम्ही जर त्यांना सहनुभूती द्याल,तर ते तुमच्यावर प्रेम करतील.


मी एकदा लिटिल विमेनच्या लेखिका लुइसा एम. अलकॉटवर एक रेडिओ वार्ता दिली होती.मला माहीत होतंकी,मॅसाच्युसेट्स च्या कॉन्कार्डमध्ये त्या राहत होत्या आणि त्यांनी तिथंच आपली पुस्तकं लिहिली होती;पण मी विचार न करता,न समजता हे सांगितलं की,मी त्यांना न्यू हॅम्पशायरच्या कॉन्कॉर्डमध्ये भेटलो.जर मी न्यू हॅम्पशायरचा उल्लेख फक्त एकदाच केला असता,तर मला माफ केलं जाऊ शकत होतं;पण मी हीच चूक दोनदा केली होती.

माझ्याकडे पत्रांचे आणि तारांचे ढीग लागले,ज्यात माझ्या चुकीबद्दल मला खूप भलं-बुरं म्हटलं होतं.काही पत्रं तर खूपच रागानी लिहिली गेली होती आणि काही तर अपमानकारक होती.कॉलोनियल डेम नावाची एक महिला जी कॉन्कॉर्डमध्ये मोठी झाली होती आणि जी आता फिलाडेल्फियाला राहत होती,तिने माझ्यावर पूर्ण राग दर्शवला.जर मी हे म्हटलं असतं की,मिस अलकॉट न्यू गिनीची नरभक्षी आहे तरीपण ती यापेक्षा अधिक अपमान करू शकत नव्हती.तिचं पत्र वाचल्यानंतर मी स्वतःला म्हटलं की,माझं नशीब चांगलं आहे की,माझे या महिलेबरोबर लग्न झालं नाही.मी तिला हे सांगू इच्छित होतो की,मी भूगोलाच्या संबंधित एक चूक जरूर केली होती;पण तिने मानवी संबंधांशी संबंधित सामान्य शिष्टाचाराची माझ्याहूनही मोठी चूक केली होती.हे माझं पहिलं वाक्य होतं.मग मी आपल्या बाह्या चढवून तिला सांगू इच्छित होतो की, तिच्या बाबतीत माझे काय विचार होते;पण मी असं नाही केलं.मी स्वतःवर ताबा ठेवला.मी अनुभवलं की कोणीपण मूर्ख असं करू शकला असता आणि जास्त करून मूर्ख हेच करतात.


मी मूर्खाच्या श्रेणीतून वर चढायचं म्हणत होतो.याकरता मी तिचं शत्रुत्व मित्रत्वामध्ये बदलण्याचा निश्चय केला.हे एक आव्हान होतं,एक प्रकारचा खेळ होता जो मी खेळत होतो. मी स्वतःला विचारलं, "जर मी तुझ्या जागेवर असतो,तर बहुतेक मी पण याच प्रकारचं पत्र लिहिलं असतं." यामुळे मी तिच्या दृष्टिकोनाप्रति सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन ठेवला.पुढच्या वेळी जेव्हा मी फिलाडेल्फियाला गेलो,तेव्हा मी तिला फोन केला आणि आमची चर्चा या प्रकाराने झाली.


मी : श्रीमती अमुक अमुक,तुम्ही काही आठवडे आधी मला पत्र लिहिलं होत.मी तुम्हाला धन्यवाद देऊ शकतो.


ती : (सभ्य, सुसंस्कृत स्वरात) कोण बोलतं आहे?


मी : मी तुमच्याकरिता अनोळखी आहे.माझं नांव डेल कार्नेगी आहे.तुम्ही काही दिवसांपूर्वी लुईसा एम. अलकॉटवर माझी रेडिओ वार्ता ऐकली होती.मी हे सांगण्याचा अक्षम्य अपराध केला होता की,लुईसा एम. अलकॉट न्यू हॅम्पशायरच्या कॉन्कॉर्डमध्ये राहत होती.ही खूपच मूर्खतापूर्ण चूक होती आणि मी याकरता माफी मागतो आहे.मला खूप चांगलं वाटलं की,तुम्ही माझी चूक दाखवायला वेळ काढलात.


ती : मी एवढं कडक पत्र लिहिल्याबद्दल खेद व्यक्त करते,मिस्टर कार्नेगी.मी आपला स्वतःचा तोल घालवला होता.मी माफी मागते आहे.


मी : नाही,नाही.तुम्हाला नाही तर मलाच माफी मागायला पाहिजे आहे.शाळेत जाणाऱ्या कोणत्याही मुलाला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान असायला पाहिजे.मी पुढच्या रविवारी रेडिओवर माफी मागितली होती आणि मी आता व्यक्तिगत रूपाने तुमची माफी मागतो आहे.


ती : मी मॅसेच्युसेट्सच्या कॉन्कॉर्डमध्ये जन्मले.माझा परिवार दोन तपांपासून तिथला महत्त्वपूर्ण परिवार आहे आणि मला माझ्या जन्मस्थानाचा,राज्याचा खूप अभिमान आहे आणि कारणामुळे खरं तर मी हे ऐकून दुःखी झाले होते की,मिस अलकॉट हॅम्पशायरमध्ये राहत होती.आता मी माझ्या लिहिलेल्या पत्रावर दिलगीर आहे.


मी : मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की,तुम्ही जितक्या दिलगीर नसाल तितका की मी आहे.माझ्या चुकीमुळे मॅसेच्युसेट्सला तितकं दुःख नाही झालं जितकं की मला होतंय.खूपच कमी वेळा असं होतं की, तुमच्यासारखे सुसंस्कृत लोक रेडिओवर बोलणाऱ्यांना पत्र पाठवायला वेळ काढतात आणि मला आशा आहे की,भविष्यात पण तुम्ही माझ्या चुका सांगण्याकरता वेळ काढाल.


ती : तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःवर टीका केली आहे,ती पद्धत मला खूप आवडली.तुम्ही खूप भला माणूस आहात.


मी तुम्हाला भेटू इच्छिते.


मी माफी मागितली होती आणि तिच्या दृष्टिकोनातून सहानुभूती प्रगट केली होती, याकरता तिनेही माफी मागितली आणि माझ्या दृष्टिकोनाच्या प्रति सहानुभूती दाखवली.मला आपल्या रागावर नियंत्रण ठेवल्याचं समाधान तर मिळालंच;पण अपमानाच्या बदल्यात दयाळूपणा देण्याचं सुख मिळालं.तिला इयूल्किल नदीमध्ये उडी मारण्याचा सल्ला देण्याऐवजी आपला प्रशंसक बनवण्यात मला जास्त आनंद मिळाला.


व्हाइट हाउसमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रेसिडेंटसमोर मानवीय संबंधांच्या कष्टकारी समस्या जवळपास रोज येतात.प्रेसिडेंट टॅप्ट पण याला अपवाद नव्हते. ते आपल्या अनुभवाने शिकले की,

आम्हाला सहानुभूतीच्या रसायनाने कोणत्या प्रकारे बदलले जाऊ शकते.आपलं पुस्तक ईथिक्स इन सर्व्हिसमध्ये टॅफ्ट सांगतात की, त्यांनी कोणत्या प्रकारे एका निराश आणि महत्त्वाकांक्षी आईच्या रागाला थंड केलं.


टॅफ्ट लिहितात;वॉशिंग्टनची एक महिला,जिच्या नवऱ्याचा काही राजनैतिक प्रभाव होता.ती माझ्यापाशी आली आणि सहा आठवड्यांपर्यंत मला हे सांगत राहिली की,मी तिच्या मुलाला एका पदावर नियुक्त करावं.तिने खूप मोठ्या प्रमाणात सीनेटर्स आणि संसद सदस्यांची मदतपण घेतली आणि त्यांच्या बरोबर येऊन हे सुनिश्चित केलं की,ते पण पूर्ण शक्तीनुसार तिच्या बाजूने समर्थन करतील.या पदाकरता तांत्रिक योग्यतेची गरज होती आणि ब्यूरो प्रमुखाची शिफारशीचे पालन करून मी कोणत्या तरी दुसऱ्याच व्यक्तीला त्या पदावर नियुक्त केलं.याच्यानंतर मला त्या आईचं एक पत्र मिळालं ज्यात तिनं लिहिलं होतं की,मी खूपच कृतघ्न होतो.कारण की मी तिला आनंद मिळू दिला नव्हता,जो माझ्या हातात होता.तिने हीपण तक्रार केली की तिने आपल्या स्टेट डेलिगेशनच्या बरोबर मेहनत करून एक प्रशासकीय विधेयकाकरता ती सारी मतं गोळा केली होती,ज्यात माझी विशेष रुची होती आणि याच्या बदल्यात मी तिला हे बक्षीस दिलं होतं.


मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,मंजुल पब्लिंशिंग हाऊस,अनुवाद-कृपा कुलकर्णी


जेव्हा या प्रकारचं पत्र तुम्हाला मिळतं,तेव्हा तुमच्या मनात पहिली गोष्ट येते की,तुम्ही अशा व्यक्ती बरोबर कसा व्यवहार कराल जिने तुमच्या बरोबर गैर वागणूक केली आहे किंवा काही मर्यादपर्यंत असभ्यतेचा परिचय दिला आहे.मग तुम्ही त्याला उत्तर द्यायला बसता,मग जर तुम्ही समजदार आहात,तर तुम्ही त्या पत्राला ड्रॉवरमध्ये ठेवून देता आणि ड्रॉवरला कुलूप लावता. त्याला दोन दिवसांनंतर बाहेर काढा अशा प्रकारच्या पत्राला उत्तर देण्याकरता नेहमी दोन दिवसांचा वेळ घेतला गेला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही ते इतक्या वेळानंतर बाहेर काढता,तेव्हा त्याला उत्तर तुम्ही पाठवणार नाही.हाच रस्ता मी निवडला.यानंतर मी बसलो आणि खूप विनम्र भावानी पत्र लिहिलं.मी तिला सांगितलं की,या परिस्थितीत एका आईचं हृदय किती दुःखी असेल,हे मी समजू शकतो;परंतु खरंतर या नियुक्तीमध्ये माझ्या व्यक्तिगत भावनेला कुठलंच स्थान नव्हतं.मला तांत्रिक योग्यतेच्या व्यक्तीला निवडायचे होते आणि या कारणामुळे मला ब्यूरो प्रमुखाच्या शिफारशीचं पालन करावं लागलं.मी आशा व्यक्त केली की,तिचा मुलगा आपल्या आत्ताच्या पदावर राहूनपण मोठं यश मिळवू शकेल.यामुळे तिचा राग निघून गेला आणि तिनं मला दुसरे पत्र लिहिले,ज्यात तिने म्हटलं की,तिला आपल्या लिहिलेल्या पत्राबद्दल लाज वाटली.


परंतु मी जी नियुक्ती केली होती,त्याला संसदेची मंजुरी मिळायला थोडा वेळ लागला.काही काळानंतर मला एक आणखीन पत्र मिळालं,जे तिच्या पतीच्या नावाने लिहिलं गेलं होतं,खरंतर त्यातली अक्षरं पण त्या स्त्रीने लिहिलेल्या पत्रासारखीच होती.या पत्रात मला सांगितलं गेलं की,त्या महिलेला इतकं निराशेनी घेरलं होतं की ती अत्यंत आजारी होती.तिने अंथरुण पकडलं होतं आणि तिला आमाशयाचा गंभीर कॅन्सर झाला होता.काय मी तिच्या मुलाला नियुक्ती देऊन त्या महिलेला पुन्हा ठीक नाही का करू शकणार! मला एक आणखीन पत्र लिहावं लागलं.या वेळी तिच्या पतीला ज्यात मी लिहिलं की,टेस्टच्या नंतर तिचं कॅन्सरचं निदान चुकीचं निघू दे. मी सहानुभूती व्यक्त केली की,त्याच्या पत्नीच्या गंभीर आजाराला घेऊन मी त्याच्या दुःखाला समजू शकतो; पण तुम्ही सुचवलेल्या नावाला परत घेणे माझ्याकरता असंभव आहे.संसदेने मी सुचवलेल्या नावाला मंजुरी दिली आणि ते पत्र मिळाल्याच्या दोन दिवसांनंतर आम्ही व्हाइट हाउसमध्ये एका संगीत समारोहाचे आयोजन केले.



२७/१/२५

‘भूतान’अफलातून देश Bhutan' is a vast country

विश्वास आणि सहकार हे सामाजिक क्षमतांच्या भांडवलाचे प्रमुख घटक आहेत.विषमतेने ग्रासलेल्या समाजांत हे खालावत चालले आहेत.अमेरिकेच्या प्रभावाखाली आलेल्या देशांत हा ऱ्हास वेगाने झालेला दिसतो.विश्व बँकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून काम करताना स्टिग्लिट्झ जगभर फिरले.सोव्हिएट संघराज्याची शकले पडल्यावर त्या साऱ्या प्रदेशात सार्वजनिक मालमत्ता गिळंकृत करणाऱ्या धनिकांचा वर्ग वरचढ झाला व समाजातील परस्पर विश्वास आणि सहकार नष्टप्राय झाला.अशा उझबेकिस्तानात ग्रीन हाऊसेसमधील उत्पादन एके काळी महत्त्वाचे होते.पण आज झाडून साऱ्या ग्रीन हाऊसेसच्या काचा चोरल्या गेल्या आहेत,आणि हा उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे. स्टिग्लिट्झ सांगतात,ह्याचे दुसरे टोक आहे वेगळ्या दिशेने प्रवास करण्याचा प्रयत्न करणारे भूतान.तेथे विश्वास आणि सहकार मोठ्या प्रमाणात शाबूत आहेत आणि म्हणूनच निसर्गही सुस्थितीत आहे.


तिबेटाला चिकटून,सिक्कीम-अरुणाचलच्या बेचक्यात पहुडलेला भूतान एक अफलातून देश आहे.भूतान जाहीर करतो की त्यांचे ध्येय आहे राष्ट्राला आनंदाचे उधाण आणण्याचे ! इतर देश खुशाल ग्रॉस नॅशनल प्रॉडक्टच्या मागे लागोत,आम्हाला हवाय ग्रॉस नॅशनल हॅपिनेस् ! इथल्या राजाने वीस वर्षांपूर्वी घोषणा केली - आपण आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना जगाला,मानवांना आणि जोडीने निसर्गाला उपकारक, आनंद फैलावणारी अशी एक आदर्श समाजरचना, शासनप्रणाली,अर्थव्यवस्था उभारून दाखवू या.ह्या आनंदयात्रेचे चार आधारस्तंभ असतील : पहिला - मनापासून आपल्या सुंदर पर्यावरणाचे संरक्षण,दुसरा स्वच्छ,

कार्यक्षम प्रशासन,तिसरा - एकमेकांना प्रफुल्लित करत स्वतः

आनंदाचा आस्वाद घ्यावा ही बुद्धाची शिकवण,आणि चौथा सामाजिक ऋणानुबंध सांभाळणारी आपली संस्कृती.हळूहळू सध्याची कालबाह्य राजेशाही खालसा करू या,आणि सर्वांना एक न्याय देणारी लोकशाही प्रस्थापित करू या.मग दोन वर्षांपूर्वी कोणीही ढकलत नसताना राजाने आपल्या हातातली सारी सत्ता खुल्या निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या हातात सोपवली.स्वतःचा राजमुकुट उतरवून युवराजाच्या डोक्यावर ठेवला. भूतानच्या नव्या संविधानाप्रमाणे लोकप्रतिनिधी राज्य चालवतातच,शिवाय जरूर पडल्यास सार्वमताने निर्णय घेण्याची तरतूद आहे.पर्यावरणाचे संरक्षण हा या सरकारच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.आता जग तापू लागल्यावर भूतानच्या हिमनद्या विरघळू लागल्या आहेत,त्याची मोठी काळजी आहे.या संदर्भात त्यांनी एक आंतरराष्ट्रीय चर्चा आयोजित केली होती.


भूतानचा पर्यावरण व वन मंत्री अध्यक्ष होता.लोकसभा सदस्य मनापासून भाग घेत होते.या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर खुल्या दिलाने बोलायला मिळाले,खूप शिकायला मिळाले.भूतानातही खनिज संपत्ती आहे.भूतानातही लोभी मंडळी आहेतच. अशातले काही होते राणीच्या नात्यातले.त्यांनी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून नासाडी सुरू केली होती.राजाला हे समजताच त्याने कडक कारवाई केली. आता भूतानात जे काय खाणकाम होते,ते अतिशय काळजीपूर्वक केले जाते.


वनसंपत्तीने समृद्ध भूतानचा पंचमांश भूभाग देवरायांनी झाकलेला आहे.ह्यात बौद्ध विहारांजवळची विशाल तपोवने आहेत,शिवाय आहेत गावा-गावांतल्या मातृदेवतांची पवित्र वने.सर्व भारतखंडभर हा निसर्गरक्षणाचा परंपरांचा ठेवा आहे.पण फक्त भूतानात त्यांचा मनापासून आदर केला जातो.मला भूतानातले सेरो,गोरल,भरल यासारखे रानबोकड पाहण्याची फार उत्कंठा होती.आमचे यजमान म्हणाले,अवश्य,उद्या जाऊ या टॅगो बौद्ध विहाराला.तिथल्या तपोवनात सहज पाहायला मिळतील गोरल,भेकर,काळी अस्वलं,

ब्लड फेजन्टसारखे रानकोंबडे.उत्साहात सकाळी निघालो. दोन्ही बाजूला डोंगर,झाडी,जिकडून तिकडून 'शैलस्तनातुनि लोटता गंगारुपी दुग्धामृत' अशा नितळ,खळखळणाऱ्या,फेसाळलेल्या पाण्याने भरलेले ओढे आणि दरीत झुळझुळणारी नदी.अखेर टॅन्गो डोंगराच्या पायथ्याला पोचलो.उभाच्या उभा, सिंहगडाच्या उंचीचा कडा,आणि वर कड्याला भिडलेला बौद्ध मठाचा भला मोठा दगडी वाडा.सबंध डोंगरभर ओक,पाइनचे मिश्र अरण्य,त्यात मधूनमधून डोकावणारे होडेडेन्ड्रॉन,पक्ष्यांची अखंड किलबिल.

नागमोडी पायवाट वर-वर चढत गेली आणि अचानक रानातून बाहेर येऊन एका कड्याशी थबकली.खालच्या धारेवर खडे होते मी ज्यांची आतुरतेने वाट पाहात होतो ते दोन ठेंगणेठुसके रानबोकड - गोरल ! अगदी बिनधास्त !


घसरगुंडीवरची शर्यत…!


गेल्या दोन दशकांत संगणकाच्या माऊसच्या एक टिचकीत अब्जावधी डॉलर जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हलवता येऊ लागले आहेत.ह्याचा फायदा घेऊन भांडवलाचा मुक्त संचार सुरू झाला आहे. हे आहे जागतिकीकरण.पैशाची खुली हालचाल. मालाची नाही,माणसांची नाही.ह्या भांडवलाला एकच ध्यास आहे - सारखे फुगत राहणे.त्यासाठी बेदरकारपणे लाटा-लाट,लुटा-लूट,फसवेगिरी,फुकटबाजी करत राहायची.जो देश अशा लाटा-लाटीला,लुटा-लुटीला, फसवेगिरीला,फुकटबाजीला जास्तीत जास्त वाव देईल तिथे धावायचे.एकदा कचाट्यात सापडले की त्या देशांतून एका क्षणात आमची सारी गुंतवणूक काढून घेऊ.मग बघा तुमची अर्थव्यवस्था कशी कोलमडेल अशा भीतीची तलवार त्या देशावर टांगून ठेवायची. 


त्यांना बजावायचे:पर्यावरणाचा विध्वंस होऊ द्या, श्रमिकांचे हक्क नष्ट करा.जोडीला अमेरिकेतही असे कायदे करून घेतले आहेत की परदेशात कमावलेल्या पैशावर अमेरिकेत ते पैसे परत आणले तरच कर भरावा लागतो.ह्यामुळे ह्या साऱ्या व्यवहारातून अमेरिकेतील बेरोजगारीही वाढते आहे.तिथलीही अर्थव्यवस्था बळकट होत नाही आहे.वर भारतासारख्या ज्या देशांत ही गुंतवणूक केली जाते त्यांच्यावर अतिशय वाईट दबाव असल्याने त्या देशा-देशांत कोण जास्त वेगाने घसरतो ह्याचीच चढाओढ लागली आहे.त्या देशांतील राज्यकर्ते भले सांगोत,परकीय गुंतवणुकीच्या आधारे आपण वर वर चढतोय.वास्तवात हे देश उडत नाही आहेत,चिखलात बुडताहेत.


टॉक्सिक मेमो…


भोपाळ,३ डिसेंबर १९८४ ची काळरात्र : युनियन कार्बाईडच्या कारखान्यातल्या टाकीचा सेफ्टी व्हाल्व जोरात उडून मेथिल आयसोसायनेटचे गरळ हवेत फैलावले... पुढच्या काही तासांमधे हजारो लोक मृत्युमुखी पडले,अन् लाखो लोकांना गंभीर इजा झाल्या.इतका हाहाकार झाला,तरी त्या रात्री व्यवस्थापकाने काहीच झाले नाही,असे सांगितले.आज ह्या जमखेवरची खपली पुन्हा निघाली आहे,आणि हरत-हेची चर्चा सुरू आहे.त्यातलाच एक विषय आहे, तिथली प्रदूषित भूमी.ही काही त्या रात्रीच्या अपघाताची निष्पत्ती नाही.जेव्हा १९६९ साली युनियन कार्बाइडचा कारखाना प्रथम सुरू झाला,तेव्हा त्यांना प्रदूषण काबूत आणण्याच्या प्रयत्नात आपला बक्कळ फायदा घटवण्याचे काहीच कारण दिसले नाही.त्यांचे ओतीत विखारी वातावरणी आग अगदी सुरुवातीपासून चालू होते,जहरी सांडपाणी अतिशय निष्काळजी

पणे साठवण्यात येत होते.आज ज्या टॉक्सिक वेस्टचे काय करायचे ही चर्चा सुरू आहे,ती आहे अपघातापूर्वीच्या पंधरा वर्षांतली खाशी कमाई.ह्यातून लोकांना हळूहळू विष भिनवत मारणे चालूच होते.त्याबद्दल काहीच जाणीव नव्हती,एवढेच.


लॅरी समर्स,क्लिन्टनच्या कारकिर्दीत अमेरिकेचे अर्थमंत्री होते.भोपाळ गॅस कांडानंतर भारतीयांनी लोकांच्या जिवाची किंमत कशी कवडीमोलाची ठरवली आहे,युनियन कार्बाइडला कसे वाऱ्यावर सोडून दिले आहे,हे पाहून विश्व बँकेचे प्रमुख अर्थशास्त्री म्हणून काम करत असताना ह्या धूर्त गृहस्थांनी १९९१ साली आपल्या सहकाऱ्यांसाठी एक कुविख्यात टॉक्सिक मेमो लिहिला : प्रदूषणाची किंमत मोजायची कशी ? आजाराने किंवा अकाली मृत्यूने समाजातील व्यक्तींचे सरासरी किती आर्थिक नुकसान होते यावरून.ह्या हिशोबाने,जिथे गरिबी जास्ती,

तिथे प्रदूषणापासून होणारी हानी सर्वात कमी.म्हणून समर्सनी सुचवले,की अशा देशांकडे खतरनाक प्रदूषणाचा ओघ वळवणे मोठे फायद्याचे अन् शहाणपणाचे आहे.


('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


असे ते बेदरकारपणे का लिहू शकले ? याला आपणच जबाबदार नाही का? भोपाळची चर्चा उफाळल्यावर मला १९७३ सालचा एक अनुभव आठवला.सायन्स इन्स्टिट्यूटच्या परिसरातील कीटकनाशकांच्या प्रादुर्भावाचे अभ्यासक वसंतराजन् ह्यांच्या प्रयोगशाळेत आमच्या गप्पा चालल्या होत्या.अचानक एक सद्गृहस्थ पाण्याची बाटली हातात घेऊन धावत आले.म्हणाले, बेंगलुरूच्या पाणी पुरवठ्याच्या तलावाच्या पिछाडीच्या

ओढ्यात कीटकनाशकाची पोती नेणारा ट्रॅक्टर उलटून विष पसरले आहे.बातमी पसरते आहे;आम्हाला फोन येताहेत.ताबडतोब शहराचे पिण्याचे पाणी पूर्ण सुरक्षित आहे असे जाहीर करायलाच पाहिजे.हा पाण्याचा नमुना घे,आणि लागलीच प्रमाणपत्र दे पाण्याच्या शुद्धतेचे. वसंतराजन् म्हणाले,अहो थांबा.ह्या बाटलीतले पाणी कुठून आले,मला ठाऊक नाही.आपण अपघातस्थळी जाऊ या.तिथले,आसपासचे पाणी गोळा करू या.मग परीक्षा करू.

निकाल हाती यायला अर्धा दिवस लागेल. ते महोदय जे उसळले,

बोलायची सोय नाही.म्हणाले, आगाऊपणा बस करा.तुमचे सहकार्य नसेल,तर दुसरीकडून प्रमाणपत्र कसे मिळवायचे,हे मला नीट माहिती आहे.तुमच्या संस्थेचे नाव आहे,म्हणून इकडे आलो;पुन्हा पाय ठेवणार नाही.अशा थाटात, खऱ्या-खोट्याची चाड न बाळगता,आपल्या देशात परिसराची निगराणी चालू आहे.हे आपण मुकाट्याने, मुकी बिचारी कुणी हाका,अशी मेंढरे बनून का सहन करतो? अधूनमधून ह्याला आळा घालायचे चांगले प्रयत्न झालेही आहेत.नव्वदच्या दशकातल्या अशाच एका उपक्रमाचे नाव होते,पर्यावरण वाहिनी.भारतभर जिल्ह्या - जिल्ह्यांत अनेक जागरूक,जाणकार नागरिकांना ह्या उपक्रमाअंतर्गत सरकारी इन्स्पेक्टरांसारखे कारखान्यात जाऊन प्रदूषण नियंत्रण, वनप्रदेशात जाऊन बेकायदेशीर तोड तपासण्याचे, निरीक्षणांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांपुढे अहवाल सादर करण्याचे अधिकार दिले होते.मग जिल्हाधिकारी ह्याची पूर्ण पारदर्शकरीत्या चौकशी करवायचे.मी प्रत्यक्ष पाहिले की कर्नाटकातल्या अनेक जिल्ह्यांत ह्या देखभालीचा चांगला प्रभाव पडत होता.दुर्दैवाने,युनियन कार्बाईडचे भाईबंद असलेल्या भारतातील अगणित प्रदूषकांच्या दबावातून हा उपक्रम रद्द केला गेला.मला मनापासून वाटते की अन्डर्सन महोदयांना अवश्य पकडू या.पण आज खरी जरूर आहे,पर्यावरण वाहिनींसारखी पारदर्शक,सर्वसमावेशक देखरेखीची व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्याची.आज देशाच्या पर्यावरणाची जी हकनाक नासाडी सुरू आहे,ती आपण सर्वांनी मिळून काबूत आणण्याची !

२५/१/२५

खरचं धाडस करा.Be really brave.


सुसंस्कृत आणि सुसंवादी शब्दांमध्ये दिलेल्या 'नकारा' ची ताकद


" तुमच्या मनावर दडपण येतं,त्या वेळी तुमचं धाडस तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळ्याच प्रकारची झळाळी देतं." - अर्नेस्ट हेमिंग्वे


अशा प्रकारच्या अनेक उदाहरणांमधलं एक उदाहरण आहे रोझा पार्क यांच्या संदर्भातलं.माँटगोमेरी इथे जाणाऱ्या बसमधल्या वेगळ्या सीटस् पैकी एका सीटवर त्या बसल्या असताना त्यांना तिथून उठायला सांगण्यात आलं आणि अतिशय निश्चयी स्वरात त्यांनी उठण्यास नकार दिला,मात्र तो क्षण ऐतिहासिक ठरला.

त्यांच्या नकारानंतर तिथले अनेक लोक एकत्र आले आणि त्यांच्यातल्या एकत्रित बळाने नागरी हक्क चळवळीला चालना मिळाली.या प्रसंगाविषयी बोलताना पार्कस् म्हणाल्या," बस ड्रायव्हरने मला तिथे बसूनच राहिलेलं पाहिलं,आणि विचारलं,'तुम्ही उठून उभ्या राहणार आहात की नाही?'आणि मी शांत स्वरात त्याला म्हटलं, 'नाही,मी इथून उठणार नाहीये."


सर्वसाधारणपणे लोकांचा समज असतो त्याच्या उलट गोष्ट त्या वेळी घडली होती.त्यांच्याकडून बस ड्रायव्हरला जो नकार दिला गेला होता,त्यामागे त्यांचा खंबीर स्वभाव किंवा कणखर व्यक्तिमत्त्व नव्हतं.तशा त्या नव्हत्याच. 'माँटेगोमेरी चॅप्टर ऑफ द एन.ए.ए.सी.पी'च्या सचिवपदासाठी लोकांनी त्यांची निवड केली, त्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या,"मी तिथे एकमेव स्त्री होते आणि त्यांना सचिवपदावर कुणीतरी हवंच होतं.मी इतक्या भित्र्या स्वभावाची होते की,मला त्यांना नकार देणं जमलंच नाही."


खरं म्हणजे त्यांचा बसमधला त्या दिवशीचा निर्णय ठरला तो या निश्चयातून की त्या क्षणाला त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या उत्तराची निवड करायला हवी आहे.त्या म्हणाल्या, "बस ड्रायव्हरने मला माझ्या सीटवाड उठण्याचा हुकूम सोडला,त्या वेळी हिवाळ्यातल्या थंडगार रात्री अंगावर ऊबदार पांघरूण घ्यावं,तसं एक प्रकारचं निश्चयाचं पांघरूण माझ्या अंगावर कुणीतरी पसरून घातलंय,

अशीच भावना जागली होती माझ्या मनात." त्या वेळी त्यांना कल्पनासुद्धा नव्हती की त्यांच्या त्या एका निर्णयातून एक स्फुल्लिंग बाहेर पडणार आहे,आणि त्या वेळच्या तिथे सुरू झालेल्या चळवळीचे पडसाद जगभरात सर्वत्र उमटणार आहेत.पण त्या वेळी त्यांना एक गोष्ट मात्र पूर्णपणे माहीत होती.त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत होतं की,त्या वेळी जरी त्यांना अटक केली जात होती,तरी इथून पुढे कधीही त्यांना अशा प्रकारच्या मानहानीला सामोरं जावं लागणार नाहीये.आणि अशी मानहानी टाळण्याच्या बदल्यात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला असता,तरी त्यासाठी त्यांच्या मनाची पूर्ण तयारी झालेली होती.

आणि हे तर खरंच होतं की,त्या वेळी तुरुंगात जाण्याचा धोका पत्करणं त्यांच्यासाठी गरजेचं होतं.एक गोष्ट जरी खरी असली की,रोझा पार्क सापडल्या होत्या तशा प्रकारच्या परिस्थितीत आपण सापडण्याची शक्यता (नशिबाने) अगदीच कमी आहे. पण तरीही आपण त्यांच्यापासून स्फूर्ती तर नक्कीच घेऊ शकतो.ज्या वेळी एखाद्या गोष्टीला ठाम नकार देण्याचं धाडस दाखवण्याची वेळ आपल्यावर येईल,त्या वेळी आपण त्याचं स्मरण करायला हवं.त्यांचं निश्चयाचं बळ आठवून बघायला हवं.


एखाद्या बिनमहत्त्वाच्या गोष्टीचा स्वीकार करायची वेळ सामाजिक दबावामुळे आपल्यावर येत असेल,तर अशा वेळी आपण स्वतःच्या भूमिकेवर भक्कम पाय रोवून उभं राहताना त्यांचं उदाहरण स्वतःच्या नजरेसमोर नक्कीच ठेवू शकतो.


धाडस करा..! इसेंशियलिझम,ग्रेग मॅकेऑन,

अनुवाद - संध्या रानडे,मायमिरर पब्लिंशिंग हाऊस..


तुम्हाला जे करावंसं वाटतंय ते तुमच्या दृष्टीने योग्य आहे,पण तरीही दुसरं कुणीतरी तुम्ही काय करायला हवंय,याबाबतीत तुमच्यावर दबाव आणतंय ! अशा वेळी तुमच्या मनावर आलेला ताण तुम्ही कधी अनुभवलाय ? एखाद्या गोष्टीबाबत तुमच्या अंतर्मनाने केलेला निश्चय आणि त्याच्याविरुद्ध तुम्हाला करावी लागणार असलेली कृती,यांच्यातला संघर्ष तुम्हाला कधी जाणवलाय ? 


एखाद्या गोष्टीला तुमचा ठाम नकार असतानाही केवळ संघर्ष नको,कुणाशी वाकडेपणा घ्यायला नको म्हणून तुम्ही कधी होकार देऊन मोकळे झाला आहात? कुणाला दुखवायला नको,कुणी नाराज व्हायला नको म्हणून तुमचे वरिष्ठ,सहकारी, मित्र,शेजारी,

किंवा कुटुंबीय यांनी दिलेलं निमंत्रण टाळताना तुम्ही मनातून खूप घाबरलेले असता? एक प्रकारची भीती तुमच्या मनात दडून बसलेली असते? असं काही घडलं असेल,तर अशा प्रकारे घाबरणारे तुम्ही काही एकटेच नाही आहात. मात्र अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढताना गरजेचं असतं,ते धाडस.आवश्यक असतं ते चांगुलपणाने नकार देण्याचं कौशल्य.


एक आवश्यकतावादी व्यक्ती म्हणून स्वतःला उत्तम प्रकारे घडवण्यात या गोष्टी जेवढ्या गरजेच्या आहेत, तेवढ्याच त्या कठीणही आहेत.


इथे मी खरं तर तुम्हाला 'धाडस' या विषयावर धडे द्यायला बसलो नाहीये.पण 'आवश्यकतावाद' या विषयाच्या मी जितका अधिक खोलात शिरतो आहे, तितक्याच स्पष्टपणे अनावश्यक गोष्टींना दूर सारण्याच्या प्रक्रियेत धाडसाची भूमिका किती महत्त्वाची आहे,ते मला दिसून येतंय.अंगी धाडस नसेल,तर कमीत कमी पर्यायांचा शिस्तबद्ध पाठलाग करणं ही गोष्ट फक्त तोंडच्या गप्पा म्हणूनच उरेल.ते मग केवळ एखाद्या पार्टीत एकमेकांशी झालेलं संभाषण इतपतच ठरतं.ते वरवरचं,उथळ असतं.ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करणं किती गरजेचं असतं, असं काहीतरी बोलणारे लोक खूप असतात.पण तसं जगणं फार थोड्यांना जमतं.मी हे बोलतोय,ते कुणालाही झुकतं माप न देता आणि कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता बोलतोय ! नकार देण्याची आपल्या मनात असणारी भीती अकारण नक्कीच नसते.आपण एखादी सुवर्णसंधी गमावून तर बसणार नाही,ही काळजी सदैव आपल्या मनात ठाण मांडून बसलेली असते.आपण आपला सुखाचा जीव दुःखात तर घालणार नाही ना? आपण बसू पाहणारी घडी विस्कटून तर टाकणार नाही? मागे परतण्याचे सगळे दोर आपण कापून टाकतोय का ? आपण ज्यांच्यावर प्रेम करतोय, आपल्याला जे लोक आवडतात,आपण ज्यांचा आदर करतो, त्यांना निराश करण्याचा विचारही आपण करू शकत नाही.पण खरं म्हणजे यातली एकही गोष्ट आपल्याला वाईट व्यक्ती ठरवण्यासाठी कारणीभूत होऊ शकत नाही.माणूस म्हणून आपल्या सहजप्रवृत्तीचाच तो एक भाग असतो.पण कुणाला नकार देणं ही गोष्ट कितीही कठीण असली,तरी योग्य वेळी तुम्ही ते करू शकला नाहीत,तर कदाचित आयुष्यातलं खूप काही मोठं आणि महत्त्वाचं तुम्ही गमावून बसू शकता.


सिंथिया नावाच्या एका महिलेने मला एकदा एक गोष्ट सांगितली होती.सॅन फ्रान्सिस्कोला एकदा एक रात्र सिंथियाला घेऊन तिचे वडील बाहेर जाणार होते. सिंथिया त्या वेळी बारा वर्षांची होती. तिने आणि तिच्या वडिलांनी रात्री बाहेर जाऊन ती रात्र मजेत घालवण्यासाठी काही महिने बरेच काही बेत केले होते. अगदी एकेका मिनिटापर्यंत जराही वेळ वाया न घालवता त्यांच्या या कार्यक्रमाचं वेळापत्रक त्यांनी तयार करून ठेवलं होतं.त्यांनी तयार केलेल्या या प्रवासाच्या सर्व सविस्तर कार्यक्रमाविषयी सिंथियाने व्यवस्थित जाणून घेतलं होतं.संध्याकाळी साडेचारच्या सुमाराला मागच्या बाजूच्या खोलीतून बाहेर पडून वडील तिला भेटणार होते,आणि दुसरं कोणीही त्यांना भेटायच्या आत चटकन् तिथून बाहेर पडायचं असं ठरवलं होतं त्यांनी.चायनाटाऊनला जाण्यासाठी ते एक ट्रॉलीकार पकडून,त्या दोघांच्या आवडीचं चायनीज जेवण घेणार होते.एखाद्या दुकानातून तिथली एखादी वस्तू आठवणीदाखल खरेदी करायची,आजूबाजूला बघत बघत थोडा वेळ भटकायचं,एखादा छानसा सिनेमा बघायचा,आणि हॉटेलवर परत यायचं असं ठरलं होतं त्या दोघांचं ! तिथल्या पोहण्याच्या तलावात उडी मारून थोडा वेळ पोहायचं (तिचे वडील पोहण्याचा तलाव बंद असतानाही त्यात लपून छपून पोहण्यात तरबेज होते.) आणि त्यानंतर खोलीतच गरम गरम फज संडे मागवायचं,टी.व्ही.वरचे रात्री खूप उशिरापर्यंत चालणारे कार्यक्रम बघायचे,असा सगळा भरगच्च कार्यक्रम होता त्या दोघांचा.या कार्यक्रमातल्या एकूण एका गोष्टींची त्यांनी परत परत उजळणीही केली होती. या कार्यक्रमाची ते दोघंही अगदी आतुरतेने वाट बघत होते.वडिलांना त्यांचा एक मित्र ते कन्व्हेंशन सेंटरच्या बाहेर पडत होते तेव्हाच नेमका भेटला.तोपर्यंत त्यांनी आखलेला सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडणारच होता. हा त्यांचा एक जुना मित्र त्यांच्या व्यवसायाशीही निगडित होता.दोघं एकमेकांना बरेच वर्षांत भेटलेले नव्हते.त्या दोघांनी प्रेमाने एकमेकांना घट्ट मिठी मारली, ते सिंथिया बघत होती.त्या मित्राने म्हटलं,"तू आता आमच्या कंपनीबरोबर काम करतो आहेस,याचा मला खूप आनंद वाटतोय.लुईसला आणि मला हे कळलं,त्या वेळी आम्हाला दोघांनाही बरंच वाटलं.मला तुला आणि अर्थातच सिंथियालाही माशांच्या खूप छान जेवणासाठी व्हार्फमध्ये आमंत्रित करायचं आहे." सिंथियाच्या वडिलांनी ताबडतोब ते निमंत्रण स्वीकारून टाकलं. "बॉब......" ते त्याला म्हणाले, "तुला भेटून मलाही खूपच छान वाटतंय ! आणि व्हार्फमधल्या रात्रीच्या जेवणाची तुझी कल्पनाही मला खूपच आवडलीय."


सिंथिया कमालीची निराश झाली.तिने रंगवलेली ट्रॉलीतल्या सफरीची,आणि संडे आईस्क्रिमची सारी स्वप्नं क्षणार्धात हवेत विरून गेली होती.शिवाय मासे खाणं सिंथियाला मुळीच आवडत नसे.ते तर तिला खावे लागणारच होते,पण दोन प्रौढ व्यक्तींच्या बोलण्यात तिला काय रस असणार होता? ती तर कंटाळूनच जाणार होती. पण तेवढ्यात तिच्या वडिलांनी त्यांच्या त्या मित्राला म्हटलं," पण आज नको,कारण आजच्या रात्रीचा माझा आणि सिंथियाचा कार्यक्रम खूप आधीपासूनच ठरलाय.हो ना सिंथिया ? " बोलता बोलता त्यांनी सिंथियाकडे हळूच डोळा मिचकावून बघितलं आणि तिचा हात धरून,तिला घेऊन ते घाईघाईने तिथल्या दारातून बाहेर पडले.त्या रात्रीचा त्यांचा ठरलेला सगळा कार्यक्रम सुरळीत पार पडला आणि सिंथियासाठी सॅन फ्रान्सिस्कोमधली ती रात्र संस्मरणीय ठरली.


इथे एक गोष्ट मात्र आवर्जून सांगायची आहे की, सिंथियाचे वडील स्टीफन आर.कोव्हे हे व्यवस्थापन क्षेत्रातले मोठे विचारवंत होते. (The Seven Habits of Highly Effective People या पुस्तकाचे ते लेखकही आहेत.) सिंथियाने ही गोष्ट मला सांगितली, त्याच्या काही आठवडे आधीच त्यांचं निधन झालं होतं. त्यामुळे सॅन फ्रान्सिस्कोमधल्या त्यांच्या त्या रात्रीच्या कायम स्मरणात राहणाऱ्या आठवणी तिने मला सांगितल्या,त्या वेळी ती खूपच भावूक झाली होती.ती पुढे म्हणाली, " त्यांचा तो एक अगदी साधासा निर्णय माझ्याशी त्यांना कायमचं बांधून ठेवून गेला.कारण त्यांच्यासाठी मी सगळ्यात जास्त महत्त्वाची व्यक्ती आहे हे त्याच वेळी मला कळलं होतं ".


स्टीफन आर.कोव्हे हे त्यांच्या पिढीतले वाचकप्रिय आणि सन्माननीय लेखक आणि व्यावसायिक क्षेत्रातले विचारवंत होते.याशिवाय ते आवश्यकतावादीही होतेच. 'मुख्य गोष्ट ही आहे की,मुख्य गोष्ट ही मुख्य गोष्टच ठेवायला हवी.' अशासारखी आवश्यकतावादी तत्त्वं ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा जगभरातल्या राज्यांमधल्या प्रमुखांना नियमितपणे फक्त शिकवतच नसत,तर त्या तत्त्वांसहच ते जगतही होते.आणि अशाच एका क्षणी हे महत्त्वाचं तत्त्व मुलीसहसुद्धा ते जगले आणि आयुष्यभरासाठी जपावी अशी एक सुंदर आठवण त्यांनी त्या दोघांसाठीही निर्माण केली. एका दृष्टीने पाहिले,तर त्यांचा निर्णय अगदी योग्यच होता.पण तरीही त्यांच्या जागी असलेल्या दुसऱ्या कुणीही कदाचित मित्राचं निमंत्रण सहजपणे स्वीकारलं असतं.कारण त्यांना मित्राला नकार देणं एकप्रकारे उद्धटपणाचं वाटलं असतं.

आपण उगाचच मैत्रीला न जागण्याचा कृतघ्नपणा करतोय की काय,अशी भीतीही त्यांच्या मनात उत्पन्न झाली असती.जुन्या मित्राबरोबर जेवण घेण्याची कचितच मिळणारी ही संधी हातून सुटून जाईल असंही त्यांनी वाटून घेतलं असतं.त्या एका क्षणाला महत्त्वाचं काय आहे आणि क्षुल्लक काय आहे हे ठरवण्याचं धाडस दाखवणं लोकांना इतकं जड का जातं ? याचं एक अगदी सोपं उत्तर हे आहे की, महत्त्वाचं नेमकं काय आहे,याबाबत आपल्या मनात बरेचदा संभ्रम असतो.त्यामुळे अशा गोष्टी घडतात त्या वेळी आपली प्रतिकारशक्तीच दुबळी होते.मात्र त्याऐवजी आपलं मन अगदी निःसंदिग्ध असलं, तर आपल्या अंतर्मनातच कुठेतरी आपल्याकडे सर्व दिशेने येणाऱ्या अनावश्यक गोष्टींना लांबच थोपवून धरणारी एक शक्ती जागृत होते.



२३/१/२५

देव होणारा मनुष्य / Man Who Becomes God

सीझरही वेळ न गमावता इजिप्तकडे निघाला.तिथे पोहोचताच त्याला दिसलेली पहिली वस्तू म्हणजे भाल्याच्या टोकांवर असलेले पॉपचे शीर! इजिप्तमधील त्याच्या मित्रांनी त्याचा त्रास वाचविला.

जावयाला ठार मारण्याची त्याची चिंता संपली.जावयाच्या शिराची भेट इजिप्तमधील त्याच्या मित्रांनी त्याला दिली।


पॉपे मेला.पण त्यामुळे यादवी संपली असे मात्र नव्हे, जगाच्या नाना भागांत त्याचे अनेक मित्र,नाना प्रकारची कृष्णकृत्ये करीत होते;बंडाची भाषा बोलत होते.पण त्यांची खोड मोडण्यापूर्वी तो इजिप्तमध्येच टॉलेमीचे राजघराणे नीट व्यवस्थित करण्यासाठी थोडा थांबला. टॉलेमी वारला,तेव्हा त्याच्यामागे त्याच्याच नावाचा एक मुलगा होता व आर्सिनी आणि क्लिओपाट्रा नावाच्या दोन मुली होत्या.ही तिन्ही मुले सिंहासनासाठी झगडत होती.


क्लिओपाट्रा हिने सीझरची मदत मागितली.त्या वेळी सीझर चौपन्न वर्षांचा होता.त्याला टक्कल पडले होते व मधूनमधून फिट्सही येत असत.क्लिओपाट्रा तारुण्याच्या ऐन भरात होती! तिचे वय अवघे एकवीस वर्षांचे होते.सीझरने तिची विनंती एकदम मान्य केली व तिला इजिप्तची निःशत्रू राणी केले.


सीझर हा रोममधला अत्यंत हुशार व पाताळयंत्री मुत्सद्दी होता.पण तो जगातील अत्यंत हुशार अशा एका नारीच्या हातातील बाहुले बनला। रोमला परतून तेथील आपसातील यादवी बंद करण्याऐवजी तो इजिप्तमध्येच कित्येक महिने रेंगाळत राहिला.

क्लिओपाट्रा हिचे कोमल बंधन तोडणे,तिच्या मंत्रमुग्धतेतून मुक्त होणे, त्याला जड जात होते.आयुष्याच्या सायंकाळी आरंभिलेल्या त्या अनंगरंगात तो दंग आला! तिने त्याला नील नदीत नौकाविहार करण्यास चला,म्हणून विनविताच तो कबूल झाला.राजशाही नौका सिद्ध झाली.ती जणू तरता राजवाडाच होती! तिच्यावर नारिंगी व शेंदरी पडदे सोडण्यात आले होते नौकेचा नाळ सोन्याचा होता,

वल्ही चांदीची होती,पन्नास वल्हेवाले डुबुकडुबुक करीत वल्ही मारीत,तेव्हा त्यांची चांदीची टीके कशी चमकत ! पूर्वी कोणत्याही मर्त्य मनुष्याने अनुभविले नसेल अशा साम्राज्याच्या स्वप्नात तो स्वतःला विसरून गेला! तो मनात म्हणत होता,मी आता इटलीत जाईन,काल्पूर्नियाशी काडीमोड करीन, क्लिओपाट्रा हिला आणीन व मग देवाच्या दयेने आम्ही उभयता रोम,इजिप्त व सारी पृथ्वी यांचे स्वामी होऊ.मी पूर्वी धर्माचार्य असता केलेली देवाची सेवा देव थोडेच विसरतील? ते माझे स्वप्न पुरे करतीलच."


सीझर क्लिओपाट्रा हिच्या चाहुपाशात स्वप्नसृष्टीत रमला;

इजिप्तमधील सुंदरीच्या हातातल्या बांसऱ्यांवरील गीतवादन तो ऐकत होता.पण तिकडे पॉपचे मित्र काही स्वस्थ बसले नव्हते.

त्यांनी निरनिराळ्या रोमन प्रांतांत बंडाळ्या उभ्या केल्या.खुद्द रोम शहरही बंड करून उठले.सीझर वेळीच न उठल्यास व त्याने तिकडे लक्ष न दिल्यास त्याचेही डोके पॉपेच्या डोक्याप्रमाणेच भाल्याच्या टोकावर नाचविण्यात येण्याचा संभव दिसू लागला.

म्हणून त्याने मोठ्या नाखुशीने इजिप्तमधील मेजवान्या, सुखोपभोग व विलास आणि उंची वस्त्रे टाकून देऊन रणवेश (चिलखत व शिरस्त्राण) धारण केला.क्लिओपाट्रा हिच्या पोटात गर्भ वाढत होता. निघताना त्याने तिला 'बाळ जन्माला येताच मी तुला घेऊन जाईन'असे अभिवचन दिले.


सीझर एकदम रोमला गेला नाही.आपण इजिप्तमधील सुखोपभोगात रंगलो,दंग झालो याबद्दल त्याला लाज वाटत होती.त्याच्या मित्रांची व चाहत्यांची तो इजिप्तमधील रणांगणावर मोठमोठे विजय मिळवील अशी अपेक्षा होती.पण त्याने केवळ एकच विजय मिळविला.आणि तोही कोठे? तर इजिप्तच्या राणीच्या विलासमंदिरात ! क्लिओपाट्रा हिच्या सदिच्छांहून अधिक भरीव असे काहीतरी रोमला घेऊन जावे अशी त्याची मनीषा होती.म्हणून आशियामायनरमधील एका बंडखोर प्रांतावर पॉन्टवर त्याने स्वारी केली व फारशी तकलीफ न पडता तेथील बंडाचा मोड केला.नंतर आपण पूर्वीचेच प्रतापी सीझर आहोत हे रोमन जनतेला पटविण्यासाठी आपल्या विजयाचे वर्णन 'मी आलो,मी पाहिले आणि मी विजय मिळविला!' या तीन सुप्रसिद्ध गर्विष्ठ व अहंमन्यतापूर्ण वाक्यांत पाठविले.जणू मर्त्यांशी दोन शब्द बोलण्याची कृपा करणाऱ्या एखाद्या देवदूताचेच ते शब्द होते! तो रोमला यावयास सिद्ध झाला.त्याच्या आशियातील विजयाची वार्ता आधीच पोहोचली होती.ती ऐकून रोमन जनता वेडी झाली.तिने त्याचे भव्य स्वागत केले.आणखी दहा वर्षे आपणच हुकूमशहा राहणार असे घोषवून त्याने क्लिओपाट्रा हिला आणण्यासाठी लवाजमा व लष्कर पाठवून दिले. ती आपल्या बाळाला घेऊन आली.तिने त्याचे नाव 'सीरियन' म्हणजे 'छोटा सीझर' असे ठेवले होते. तिजबरोबर तिची बहीण आर्सिनो हीही आली होती; पण पाहुणी म्हणून नव्हे तर कैदी म्हणून.सीझरने आपल्या विजयी मिरवणुकीत त्या अभागिनीला शृंखला घालून रोमन लोकांसमोर मिरविले व मग ठार केले. क्लिओपाट्रा हिच्या मर्जीसाठी म्हणून त्याने हे नीचतम कृत्य केले.काल्पूर्विया हिच्याशी काडीमोड करण्याचे धैर्य त्याला झाले नाही.क्लिओपाटा हिच्यासाठी त्याने टायचर नदीच्या पैलतीरी भव्य प्रासाद बांधला व आपणास केवळ रोमची राजा-राणी म्हणून नव्हे; तर देवदेवता मानून जनतेने भजावे,पूजावे यासाठी दोघे कारस्थाने करू लागली.


सीझरने स्वतःचे एक मंदिर बांधिविले व त्यात आपले दोन पुतळे उभे केले.त्याची पूजाअर्चा करण्यासाठी व तिथे यज्ञयाग करण्यासाठी त्याने पुजारी नेमले व सीझरच्या नावे घेतलेले शपथ 'जोव्ह' देवाच्या नावे घेतलेल्या शपथेइतकीच पवित्र,असे फर्मान काढले. खेळाच्या निरनिराळ्या मिरवणुकी निघत,त्यात इतर देवदेवतांच्या चित्रांप्रमाणे आपलेही चित्र पाहिजे,असे त्याने आज्ञापिले.आणि हे जे आपले अमर मानसन्मान तो करून घेत असे,त्यात क्लिओपाट्राही सहभागी असे. 


'अजिंक्य देव,ज्यूपिटर ज्यूलियस' याच्या चित्राशेजारी किंवा पुतळ्याशेजारी 'व्हीनस देवतेची दिव्य बहीण क्लिओपाट्रा' हिला 'प्रेमदेवता व्हीनस हिची बहीण' म्हणून संबोधी.


देवत्वाचा मान स्वतःकडे घेण्याची सीझरची वृत्ती पृष्कळ रोमनांना आवडली नाही,त्यांना या गोष्टीचा राग आला. पण सीझरने देवत्व घेतल्याबद्दल त्यांना जितका राग आला,त्यापेक्षा जास्त राग तो रोमचा राजा होऊ पाहत होता,याबद्दलच त्यांना आला.त्याने आपल्यासाठी एक सुवर्णसिंहासन तयार करण्याची आज्ञा दिली व मुकुट धारण करण्यासाठी योग्य संधीची तो वाट पाहात बसला.ही संधी एका रोमन सणाच्या वेळी आली,असे त्याला वाटले.लोकांची नाडीपरीक्षा करण्यासाठी अर्धवट गमतीने व अर्धवट गंभीरपणे त्याने त्या दिवशीच्या उत्सवात मार्क ॲन्टोनी याला खेळात राजा करावे असे सुचविले.तद्नुसार ॲन्टोनी राजा झाला.खेळातलाच राजा;पण आजूबाजूच्या जनतेला राजाचा खेळ आवडला नाही.

सीझर दुरून सर्व पाहत होता.त्याने जाणले की,मुकुट धारण करण्याची वेळ अजून आली नाही.म्हणून त्याने तो बेत पुढे ढकलला व रोमन रिपब्लिकचे अनियंत्रित राजशाही रोमन साम्राज्यात परिवर्तन करण्याला परिपक्व वेळ अजून आली नाही,हे ओळखून वाट पाहण्याचे ठरविले.


दरम्यान स्पेनमध्ये पाँपेच्या इनायस व सेक्स्टस नामक दोघा मुलांनी रोमविरुद्ध म्हणजेच सीझरविरुद्ध बंड केले व ते दिवसेंदिवस वाढणार असे दिसू लागले.उपेक्षा करून चालण्यासारखे नव्हते,म्हणून सीझरला पुन्हा एकदा सैन्याचे आधिपत्य घेणे भाग पडले.त्याने स्पेनमधील पुंडावा मोडला व पाँपेच्या दोन्ही मुलांना ठार केले.सीझरने रोमला परत येताच आमरण हुकूमशाही जाहीर केली.त्याने याप्रसंगी अत्यंत भयंकर चूक केली. पॉपेच्या मुलांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ होणाऱ्या सार्वजनिक उत्सावांत तो स्वतःचा सत्कार करून घेणार होता.

त्याचा हा अहंकार अक्षम्य होता.क्षुद्रतेचे प्रदर्शन असह्य होते.रोमन लोकांनी आतापर्यंत खूप सहन केले. पण आपसांतील यादवीमुळे झालेल्या रोमनांच्याच कत्तलीप्रीत्यर्थ होणारा सत्कार समारंभ त्यांना असह्य वाटला.आपल्याच बांधवांचे रक्त सांडल्याबद्दल व शिरकाण केल्याबद्दल ऐट मारणे हे त्यांच्या मते माणुसकीला काळिमा फासणारे होते.


देव कधी चुकत नाही या विश्वासाने सीझर सत्कार समारंभाची योजना पुरी करण्याच्या खटाटोपास लागला.ख्रि. पू. ४४ सालच्या मार्चच्या पंधरा या तारखेस तो सिनेट हाऊसमध्ये आला तेव्हा तो अत्यंत आंनदी दिसत होता.कारण,रोमबाहेरील सर्व रोमन प्रांतांचा रोमन सम्राट म्हणून त्याची नेमणूक त्या दिवशी सिनेटरांकडून होणार होती.त्यानंतर खुद्द रोमचा सम्राट म्हणून त्याच्या नावाने द्वाही फिरण्यास कितीसा अवकाश होता? पण...!


हातांत मुकुट घेऊन सिनेटर आपल्या स्वागतार्थ पुढे येतील अशा आशेने सिनेटहाऊसमध्ये पाऊल टाकणाऱ्या सीझरला मुकुट प्रदानाऐवजी खंजिरांच्या तेवीस प्रहारांची सलामी मिळाली!


सीझरवर प्राणांतिक प्रहार करणाऱ्यांत त्याचे पुष्कळ जिव्हाळ्याचे स्नेहीही होते.त्यांतील एक प्रमुख कटवाला ब्रूटस हा आपलाच अनौरस पुत्र आहे असे सीझरला वाटण्यास भरपूर पुरावा होता.


इतिहासाच्या ग्रंथांमध्ये सीडारचे वर्णन 'एक थोर व मोठा मुत्सद्दी असे करण्यात येत असते.पण इतिहासकारांनी वाहिलेली स्तुतिसुमनांजली दूर करून सीझरचे खरे स्वरूप पाहिल्यास काय दिसेल? तो पक्का गुंड व खुनी, बुद्धिमान खुनी होता.तो प्रचंड प्रमाणावर कत्तली करण्याच्या योजना आखणारा कर्दनकाळ होता.तो वेडा पीर होता.त्याच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी एकट्या रोम शहराला एक लक्ष साठ हजार लोकांना मुकावे लागले!त्याचे जीवन म्हणजे रोमन लोकांना खरोखर शापच होता.पण तो मेला तरीही रोमन लोकांना हायसे वाटले नाही.सीझरचा खून होताच त्याची जागा बळकावण्यासाठी अनेक गुंड पुढे आले.रोमची मालकी मिळविण्यासाठी आपल्याच बांधवांच्या कत्तली करीत राहणे,पुष्कळ प्रमुख रोमन पुढाऱ्यांचा अनेक वर्षेपर्यंत एकच धंदा होता.


२१.०१.२५ या लेखातील शेवटचा भाग…!