विश्वास आणि सहकार हे सामाजिक क्षमतांच्या भांडवलाचे प्रमुख घटक आहेत.विषमतेने ग्रासलेल्या समाजांत हे खालावत चालले आहेत.अमेरिकेच्या प्रभावाखाली आलेल्या देशांत हा ऱ्हास वेगाने झालेला दिसतो.विश्व बँकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून काम करताना स्टिग्लिट्झ जगभर फिरले.सोव्हिएट संघराज्याची शकले पडल्यावर त्या साऱ्या प्रदेशात सार्वजनिक मालमत्ता गिळंकृत करणाऱ्या धनिकांचा वर्ग वरचढ झाला व समाजातील परस्पर विश्वास आणि सहकार नष्टप्राय झाला.अशा उझबेकिस्तानात ग्रीन हाऊसेसमधील उत्पादन एके काळी महत्त्वाचे होते.पण आज झाडून साऱ्या ग्रीन हाऊसेसच्या काचा चोरल्या गेल्या आहेत,आणि हा उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे. स्टिग्लिट्झ सांगतात,ह्याचे दुसरे टोक आहे वेगळ्या दिशेने प्रवास करण्याचा प्रयत्न करणारे भूतान.तेथे विश्वास आणि सहकार मोठ्या प्रमाणात शाबूत आहेत आणि म्हणूनच निसर्गही सुस्थितीत आहे.
तिबेटाला चिकटून,सिक्कीम-अरुणाचलच्या बेचक्यात पहुडलेला भूतान एक अफलातून देश आहे.भूतान जाहीर करतो की त्यांचे ध्येय आहे राष्ट्राला आनंदाचे उधाण आणण्याचे ! इतर देश खुशाल ग्रॉस नॅशनल प्रॉडक्टच्या मागे लागोत,आम्हाला हवाय ग्रॉस नॅशनल हॅपिनेस् ! इथल्या राजाने वीस वर्षांपूर्वी घोषणा केली - आपण आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना जगाला,मानवांना आणि जोडीने निसर्गाला उपकारक, आनंद फैलावणारी अशी एक आदर्श समाजरचना, शासनप्रणाली,अर्थव्यवस्था उभारून दाखवू या.ह्या आनंदयात्रेचे चार आधारस्तंभ असतील : पहिला - मनापासून आपल्या सुंदर पर्यावरणाचे संरक्षण,दुसरा स्वच्छ,
कार्यक्षम प्रशासन,तिसरा - एकमेकांना प्रफुल्लित करत स्वतः
आनंदाचा आस्वाद घ्यावा ही बुद्धाची शिकवण,आणि चौथा सामाजिक ऋणानुबंध सांभाळणारी आपली संस्कृती.हळूहळू सध्याची कालबाह्य राजेशाही खालसा करू या,आणि सर्वांना एक न्याय देणारी लोकशाही प्रस्थापित करू या.मग दोन वर्षांपूर्वी कोणीही ढकलत नसताना राजाने आपल्या हातातली सारी सत्ता खुल्या निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या हातात सोपवली.स्वतःचा राजमुकुट उतरवून युवराजाच्या डोक्यावर ठेवला. भूतानच्या नव्या संविधानाप्रमाणे लोकप्रतिनिधी राज्य चालवतातच,शिवाय जरूर पडल्यास सार्वमताने निर्णय घेण्याची तरतूद आहे.पर्यावरणाचे संरक्षण हा या सरकारच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.आता जग तापू लागल्यावर भूतानच्या हिमनद्या विरघळू लागल्या आहेत,त्याची मोठी काळजी आहे.या संदर्भात त्यांनी एक आंतरराष्ट्रीय चर्चा आयोजित केली होती.
भूतानचा पर्यावरण व वन मंत्री अध्यक्ष होता.लोकसभा सदस्य मनापासून भाग घेत होते.या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर खुल्या दिलाने बोलायला मिळाले,खूप शिकायला मिळाले.भूतानातही खनिज संपत्ती आहे.भूतानातही लोभी मंडळी आहेतच. अशातले काही होते राणीच्या नात्यातले.त्यांनी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून नासाडी सुरू केली होती.राजाला हे समजताच त्याने कडक कारवाई केली. आता भूतानात जे काय खाणकाम होते,ते अतिशय काळजीपूर्वक केले जाते.
वनसंपत्तीने समृद्ध भूतानचा पंचमांश भूभाग देवरायांनी झाकलेला आहे.ह्यात बौद्ध विहारांजवळची विशाल तपोवने आहेत,शिवाय आहेत गावा-गावांतल्या मातृदेवतांची पवित्र वने.सर्व भारतखंडभर हा निसर्गरक्षणाचा परंपरांचा ठेवा आहे.पण फक्त भूतानात त्यांचा मनापासून आदर केला जातो.मला भूतानातले सेरो,गोरल,भरल यासारखे रानबोकड पाहण्याची फार उत्कंठा होती.आमचे यजमान म्हणाले,अवश्य,उद्या जाऊ या टॅगो बौद्ध विहाराला.तिथल्या तपोवनात सहज पाहायला मिळतील गोरल,भेकर,काळी अस्वलं,
ब्लड फेजन्टसारखे रानकोंबडे.उत्साहात सकाळी निघालो. दोन्ही बाजूला डोंगर,झाडी,जिकडून तिकडून 'शैलस्तनातुनि लोटता गंगारुपी दुग्धामृत' अशा नितळ,खळखळणाऱ्या,फेसाळलेल्या पाण्याने भरलेले ओढे आणि दरीत झुळझुळणारी नदी.अखेर टॅन्गो डोंगराच्या पायथ्याला पोचलो.उभाच्या उभा, सिंहगडाच्या उंचीचा कडा,आणि वर कड्याला भिडलेला बौद्ध मठाचा भला मोठा दगडी वाडा.सबंध डोंगरभर ओक,पाइनचे मिश्र अरण्य,त्यात मधूनमधून डोकावणारे होडेडेन्ड्रॉन,पक्ष्यांची अखंड किलबिल.
नागमोडी पायवाट वर-वर चढत गेली आणि अचानक रानातून बाहेर येऊन एका कड्याशी थबकली.खालच्या धारेवर खडे होते मी ज्यांची आतुरतेने वाट पाहात होतो ते दोन ठेंगणेठुसके रानबोकड - गोरल ! अगदी बिनधास्त !
घसरगुंडीवरची शर्यत…!
गेल्या दोन दशकांत संगणकाच्या माऊसच्या एक टिचकीत अब्जावधी डॉलर जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हलवता येऊ लागले आहेत.ह्याचा फायदा घेऊन भांडवलाचा मुक्त संचार सुरू झाला आहे. हे आहे जागतिकीकरण.पैशाची खुली हालचाल. मालाची नाही,माणसांची नाही.ह्या भांडवलाला एकच ध्यास आहे - सारखे फुगत राहणे.त्यासाठी बेदरकारपणे लाटा-लाट,लुटा-लूट,फसवेगिरी,फुकटबाजी करत राहायची.जो देश अशा लाटा-लाटीला,लुटा-लुटीला, फसवेगिरीला,फुकटबाजीला जास्तीत जास्त वाव देईल तिथे धावायचे.एकदा कचाट्यात सापडले की त्या देशांतून एका क्षणात आमची सारी गुंतवणूक काढून घेऊ.मग बघा तुमची अर्थव्यवस्था कशी कोलमडेल अशा भीतीची तलवार त्या देशावर टांगून ठेवायची.
त्यांना बजावायचे:पर्यावरणाचा विध्वंस होऊ द्या, श्रमिकांचे हक्क नष्ट करा.जोडीला अमेरिकेतही असे कायदे करून घेतले आहेत की परदेशात कमावलेल्या पैशावर अमेरिकेत ते पैसे परत आणले तरच कर भरावा लागतो.ह्यामुळे ह्या साऱ्या व्यवहारातून अमेरिकेतील बेरोजगारीही वाढते आहे.तिथलीही अर्थव्यवस्था बळकट होत नाही आहे.वर भारतासारख्या ज्या देशांत ही गुंतवणूक केली जाते त्यांच्यावर अतिशय वाईट दबाव असल्याने त्या देशा-देशांत कोण जास्त वेगाने घसरतो ह्याचीच चढाओढ लागली आहे.त्या देशांतील राज्यकर्ते भले सांगोत,परकीय गुंतवणुकीच्या आधारे आपण वर वर चढतोय.वास्तवात हे देश उडत नाही आहेत,चिखलात बुडताहेत.
टॉक्सिक मेमो…
भोपाळ,३ डिसेंबर १९८४ ची काळरात्र : युनियन कार्बाईडच्या कारखान्यातल्या टाकीचा सेफ्टी व्हाल्व जोरात उडून मेथिल आयसोसायनेटचे गरळ हवेत फैलावले... पुढच्या काही तासांमधे हजारो लोक मृत्युमुखी पडले,अन् लाखो लोकांना गंभीर इजा झाल्या.इतका हाहाकार झाला,तरी त्या रात्री व्यवस्थापकाने काहीच झाले नाही,असे सांगितले.आज ह्या जमखेवरची खपली पुन्हा निघाली आहे,आणि हरत-हेची चर्चा सुरू आहे.त्यातलाच एक विषय आहे, तिथली प्रदूषित भूमी.ही काही त्या रात्रीच्या अपघाताची निष्पत्ती नाही.जेव्हा १९६९ साली युनियन कार्बाइडचा कारखाना प्रथम सुरू झाला,तेव्हा त्यांना प्रदूषण काबूत आणण्याच्या प्रयत्नात आपला बक्कळ फायदा घटवण्याचे काहीच कारण दिसले नाही.त्यांचे ओतीत विखारी वातावरणी आग अगदी सुरुवातीपासून चालू होते,जहरी सांडपाणी अतिशय निष्काळजी
पणे साठवण्यात येत होते.आज ज्या टॉक्सिक वेस्टचे काय करायचे ही चर्चा सुरू आहे,ती आहे अपघातापूर्वीच्या पंधरा वर्षांतली खाशी कमाई.ह्यातून लोकांना हळूहळू विष भिनवत मारणे चालूच होते.त्याबद्दल काहीच जाणीव नव्हती,एवढेच.
लॅरी समर्स,क्लिन्टनच्या कारकिर्दीत अमेरिकेचे अर्थमंत्री होते.भोपाळ गॅस कांडानंतर भारतीयांनी लोकांच्या जिवाची किंमत कशी कवडीमोलाची ठरवली आहे,युनियन कार्बाइडला कसे वाऱ्यावर सोडून दिले आहे,हे पाहून विश्व बँकेचे प्रमुख अर्थशास्त्री म्हणून काम करत असताना ह्या धूर्त गृहस्थांनी १९९१ साली आपल्या सहकाऱ्यांसाठी एक कुविख्यात टॉक्सिक मेमो लिहिला : प्रदूषणाची किंमत मोजायची कशी ? आजाराने किंवा अकाली मृत्यूने समाजातील व्यक्तींचे सरासरी किती आर्थिक नुकसान होते यावरून.ह्या हिशोबाने,जिथे गरिबी जास्ती,
तिथे प्रदूषणापासून होणारी हानी सर्वात कमी.म्हणून समर्सनी सुचवले,की अशा देशांकडे खतरनाक प्रदूषणाचा ओघ वळवणे मोठे फायद्याचे अन् शहाणपणाचे आहे.
('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )
असे ते बेदरकारपणे का लिहू शकले ? याला आपणच जबाबदार नाही का? भोपाळची चर्चा उफाळल्यावर मला १९७३ सालचा एक अनुभव आठवला.सायन्स इन्स्टिट्यूटच्या परिसरातील कीटकनाशकांच्या प्रादुर्भावाचे अभ्यासक वसंतराजन् ह्यांच्या प्रयोगशाळेत आमच्या गप्पा चालल्या होत्या.अचानक एक सद्गृहस्थ पाण्याची बाटली हातात घेऊन धावत आले.म्हणाले, बेंगलुरूच्या पाणी पुरवठ्याच्या तलावाच्या पिछाडीच्या
ओढ्यात कीटकनाशकाची पोती नेणारा ट्रॅक्टर उलटून विष पसरले आहे.बातमी पसरते आहे;आम्हाला फोन येताहेत.ताबडतोब शहराचे पिण्याचे पाणी पूर्ण सुरक्षित आहे असे जाहीर करायलाच पाहिजे.हा पाण्याचा नमुना घे,आणि लागलीच प्रमाणपत्र दे पाण्याच्या शुद्धतेचे. वसंतराजन् म्हणाले,अहो थांबा.ह्या बाटलीतले पाणी कुठून आले,मला ठाऊक नाही.आपण अपघातस्थळी जाऊ या.तिथले,आसपासचे पाणी गोळा करू या.मग परीक्षा करू.
निकाल हाती यायला अर्धा दिवस लागेल. ते महोदय जे उसळले,
बोलायची सोय नाही.म्हणाले, आगाऊपणा बस करा.तुमचे सहकार्य नसेल,तर दुसरीकडून प्रमाणपत्र कसे मिळवायचे,हे मला नीट माहिती आहे.तुमच्या संस्थेचे नाव आहे,म्हणून इकडे आलो;पुन्हा पाय ठेवणार नाही.अशा थाटात, खऱ्या-खोट्याची चाड न बाळगता,आपल्या देशात परिसराची निगराणी चालू आहे.हे आपण मुकाट्याने, मुकी बिचारी कुणी हाका,अशी मेंढरे बनून का सहन करतो? अधूनमधून ह्याला आळा घालायचे चांगले प्रयत्न झालेही आहेत.नव्वदच्या दशकातल्या अशाच एका उपक्रमाचे नाव होते,पर्यावरण वाहिनी.भारतभर जिल्ह्या - जिल्ह्यांत अनेक जागरूक,जाणकार नागरिकांना ह्या उपक्रमाअंतर्गत सरकारी इन्स्पेक्टरांसारखे कारखान्यात जाऊन प्रदूषण नियंत्रण, वनप्रदेशात जाऊन बेकायदेशीर तोड तपासण्याचे, निरीक्षणांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांपुढे अहवाल सादर करण्याचे अधिकार दिले होते.मग जिल्हाधिकारी ह्याची पूर्ण पारदर्शकरीत्या चौकशी करवायचे.मी प्रत्यक्ष पाहिले की कर्नाटकातल्या अनेक जिल्ह्यांत ह्या देखभालीचा चांगला प्रभाव पडत होता.दुर्दैवाने,युनियन कार्बाईडचे भाईबंद असलेल्या भारतातील अगणित प्रदूषकांच्या दबावातून हा उपक्रम रद्द केला गेला.मला मनापासून वाटते की अन्डर्सन महोदयांना अवश्य पकडू या.पण आज खरी जरूर आहे,पर्यावरण वाहिनींसारखी पारदर्शक,सर्वसमावेशक देखरेखीची व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्याची.आज देशाच्या पर्यावरणाची जी हकनाक नासाडी सुरू आहे,ती आपण सर्वांनी मिळून काबूत आणण्याची !