सुसंस्कृत आणि सुसंवादी शब्दांमध्ये दिलेल्या 'नकारा' ची ताकद
" तुमच्या मनावर दडपण येतं,त्या वेळी तुमचं धाडस तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळ्याच प्रकारची झळाळी देतं." - अर्नेस्ट हेमिंग्वे
अशा प्रकारच्या अनेक उदाहरणांमधलं एक उदाहरण आहे रोझा पार्क यांच्या संदर्भातलं.माँटगोमेरी इथे जाणाऱ्या बसमधल्या वेगळ्या सीटस् पैकी एका सीटवर त्या बसल्या असताना त्यांना तिथून उठायला सांगण्यात आलं आणि अतिशय निश्चयी स्वरात त्यांनी उठण्यास नकार दिला,मात्र तो क्षण ऐतिहासिक ठरला.
त्यांच्या नकारानंतर तिथले अनेक लोक एकत्र आले आणि त्यांच्यातल्या एकत्रित बळाने नागरी हक्क चळवळीला चालना मिळाली.या प्रसंगाविषयी बोलताना पार्कस् म्हणाल्या," बस ड्रायव्हरने मला तिथे बसूनच राहिलेलं पाहिलं,आणि विचारलं,'तुम्ही उठून उभ्या राहणार आहात की नाही?'आणि मी शांत स्वरात त्याला म्हटलं, 'नाही,मी इथून उठणार नाहीये."
सर्वसाधारणपणे लोकांचा समज असतो त्याच्या उलट गोष्ट त्या वेळी घडली होती.त्यांच्याकडून बस ड्रायव्हरला जो नकार दिला गेला होता,त्यामागे त्यांचा खंबीर स्वभाव किंवा कणखर व्यक्तिमत्त्व नव्हतं.तशा त्या नव्हत्याच. 'माँटेगोमेरी चॅप्टर ऑफ द एन.ए.ए.सी.पी'च्या सचिवपदासाठी लोकांनी त्यांची निवड केली, त्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या,"मी तिथे एकमेव स्त्री होते आणि त्यांना सचिवपदावर कुणीतरी हवंच होतं.मी इतक्या भित्र्या स्वभावाची होते की,मला त्यांना नकार देणं जमलंच नाही."
खरं म्हणजे त्यांचा बसमधला त्या दिवशीचा निर्णय ठरला तो या निश्चयातून की त्या क्षणाला त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या उत्तराची निवड करायला हवी आहे.त्या म्हणाल्या, "बस ड्रायव्हरने मला माझ्या सीटवाड उठण्याचा हुकूम सोडला,त्या वेळी हिवाळ्यातल्या थंडगार रात्री अंगावर ऊबदार पांघरूण घ्यावं,तसं एक प्रकारचं निश्चयाचं पांघरूण माझ्या अंगावर कुणीतरी पसरून घातलंय,
अशीच भावना जागली होती माझ्या मनात." त्या वेळी त्यांना कल्पनासुद्धा नव्हती की त्यांच्या त्या एका निर्णयातून एक स्फुल्लिंग बाहेर पडणार आहे,आणि त्या वेळच्या तिथे सुरू झालेल्या चळवळीचे पडसाद जगभरात सर्वत्र उमटणार आहेत.पण त्या वेळी त्यांना एक गोष्ट मात्र पूर्णपणे माहीत होती.त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत होतं की,त्या वेळी जरी त्यांना अटक केली जात होती,तरी इथून पुढे कधीही त्यांना अशा प्रकारच्या मानहानीला सामोरं जावं लागणार नाहीये.आणि अशी मानहानी टाळण्याच्या बदल्यात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला असता,तरी त्यासाठी त्यांच्या मनाची पूर्ण तयारी झालेली होती.
आणि हे तर खरंच होतं की,त्या वेळी तुरुंगात जाण्याचा धोका पत्करणं त्यांच्यासाठी गरजेचं होतं.एक गोष्ट जरी खरी असली की,रोझा पार्क सापडल्या होत्या तशा प्रकारच्या परिस्थितीत आपण सापडण्याची शक्यता (नशिबाने) अगदीच कमी आहे. पण तरीही आपण त्यांच्यापासून स्फूर्ती तर नक्कीच घेऊ शकतो.ज्या वेळी एखाद्या गोष्टीला ठाम नकार देण्याचं धाडस दाखवण्याची वेळ आपल्यावर येईल,त्या वेळी आपण त्याचं स्मरण करायला हवं.त्यांचं निश्चयाचं बळ आठवून बघायला हवं.
एखाद्या बिनमहत्त्वाच्या गोष्टीचा स्वीकार करायची वेळ सामाजिक दबावामुळे आपल्यावर येत असेल,तर अशा वेळी आपण स्वतःच्या भूमिकेवर भक्कम पाय रोवून उभं राहताना त्यांचं उदाहरण स्वतःच्या नजरेसमोर नक्कीच ठेवू शकतो.
धाडस करा..! इसेंशियलिझम,ग्रेग मॅकेऑन,
अनुवाद - संध्या रानडे,मायमिरर पब्लिंशिंग हाऊस..
तुम्हाला जे करावंसं वाटतंय ते तुमच्या दृष्टीने योग्य आहे,पण तरीही दुसरं कुणीतरी तुम्ही काय करायला हवंय,याबाबतीत तुमच्यावर दबाव आणतंय ! अशा वेळी तुमच्या मनावर आलेला ताण तुम्ही कधी अनुभवलाय ? एखाद्या गोष्टीबाबत तुमच्या अंतर्मनाने केलेला निश्चय आणि त्याच्याविरुद्ध तुम्हाला करावी लागणार असलेली कृती,यांच्यातला संघर्ष तुम्हाला कधी जाणवलाय ?
एखाद्या गोष्टीला तुमचा ठाम नकार असतानाही केवळ संघर्ष नको,कुणाशी वाकडेपणा घ्यायला नको म्हणून तुम्ही कधी होकार देऊन मोकळे झाला आहात? कुणाला दुखवायला नको,कुणी नाराज व्हायला नको म्हणून तुमचे वरिष्ठ,सहकारी, मित्र,शेजारी,
किंवा कुटुंबीय यांनी दिलेलं निमंत्रण टाळताना तुम्ही मनातून खूप घाबरलेले असता? एक प्रकारची भीती तुमच्या मनात दडून बसलेली असते? असं काही घडलं असेल,तर अशा प्रकारे घाबरणारे तुम्ही काही एकटेच नाही आहात. मात्र अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढताना गरजेचं असतं,ते धाडस.आवश्यक असतं ते चांगुलपणाने नकार देण्याचं कौशल्य.
एक आवश्यकतावादी व्यक्ती म्हणून स्वतःला उत्तम प्रकारे घडवण्यात या गोष्टी जेवढ्या गरजेच्या आहेत, तेवढ्याच त्या कठीणही आहेत.
इथे मी खरं तर तुम्हाला 'धाडस' या विषयावर धडे द्यायला बसलो नाहीये.पण 'आवश्यकतावाद' या विषयाच्या मी जितका अधिक खोलात शिरतो आहे, तितक्याच स्पष्टपणे अनावश्यक गोष्टींना दूर सारण्याच्या प्रक्रियेत धाडसाची भूमिका किती महत्त्वाची आहे,ते मला दिसून येतंय.अंगी धाडस नसेल,तर कमीत कमी पर्यायांचा शिस्तबद्ध पाठलाग करणं ही गोष्ट फक्त तोंडच्या गप्पा म्हणूनच उरेल.ते मग केवळ एखाद्या पार्टीत एकमेकांशी झालेलं संभाषण इतपतच ठरतं.ते वरवरचं,उथळ असतं.ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करणं किती गरजेचं असतं, असं काहीतरी बोलणारे लोक खूप असतात.पण तसं जगणं फार थोड्यांना जमतं.मी हे बोलतोय,ते कुणालाही झुकतं माप न देता आणि कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता बोलतोय ! नकार देण्याची आपल्या मनात असणारी भीती अकारण नक्कीच नसते.आपण एखादी सुवर्णसंधी गमावून तर बसणार नाही,ही काळजी सदैव आपल्या मनात ठाण मांडून बसलेली असते.आपण आपला सुखाचा जीव दुःखात तर घालणार नाही ना? आपण बसू पाहणारी घडी विस्कटून तर टाकणार नाही? मागे परतण्याचे सगळे दोर आपण कापून टाकतोय का ? आपण ज्यांच्यावर प्रेम करतोय, आपल्याला जे लोक आवडतात,आपण ज्यांचा आदर करतो, त्यांना निराश करण्याचा विचारही आपण करू शकत नाही.पण खरं म्हणजे यातली एकही गोष्ट आपल्याला वाईट व्यक्ती ठरवण्यासाठी कारणीभूत होऊ शकत नाही.माणूस म्हणून आपल्या सहजप्रवृत्तीचाच तो एक भाग असतो.पण कुणाला नकार देणं ही गोष्ट कितीही कठीण असली,तरी योग्य वेळी तुम्ही ते करू शकला नाहीत,तर कदाचित आयुष्यातलं खूप काही मोठं आणि महत्त्वाचं तुम्ही गमावून बसू शकता.
सिंथिया नावाच्या एका महिलेने मला एकदा एक गोष्ट सांगितली होती.सॅन फ्रान्सिस्कोला एकदा एक रात्र सिंथियाला घेऊन तिचे वडील बाहेर जाणार होते. सिंथिया त्या वेळी बारा वर्षांची होती. तिने आणि तिच्या वडिलांनी रात्री बाहेर जाऊन ती रात्र मजेत घालवण्यासाठी काही महिने बरेच काही बेत केले होते. अगदी एकेका मिनिटापर्यंत जराही वेळ वाया न घालवता त्यांच्या या कार्यक्रमाचं वेळापत्रक त्यांनी तयार करून ठेवलं होतं.त्यांनी तयार केलेल्या या प्रवासाच्या सर्व सविस्तर कार्यक्रमाविषयी सिंथियाने व्यवस्थित जाणून घेतलं होतं.संध्याकाळी साडेचारच्या सुमाराला मागच्या बाजूच्या खोलीतून बाहेर पडून वडील तिला भेटणार होते,आणि दुसरं कोणीही त्यांना भेटायच्या आत चटकन् तिथून बाहेर पडायचं असं ठरवलं होतं त्यांनी.चायनाटाऊनला जाण्यासाठी ते एक ट्रॉलीकार पकडून,त्या दोघांच्या आवडीचं चायनीज जेवण घेणार होते.एखाद्या दुकानातून तिथली एखादी वस्तू आठवणीदाखल खरेदी करायची,आजूबाजूला बघत बघत थोडा वेळ भटकायचं,एखादा छानसा सिनेमा बघायचा,आणि हॉटेलवर परत यायचं असं ठरलं होतं त्या दोघांचं ! तिथल्या पोहण्याच्या तलावात उडी मारून थोडा वेळ पोहायचं (तिचे वडील पोहण्याचा तलाव बंद असतानाही त्यात लपून छपून पोहण्यात तरबेज होते.) आणि त्यानंतर खोलीतच गरम गरम फज संडे मागवायचं,टी.व्ही.वरचे रात्री खूप उशिरापर्यंत चालणारे कार्यक्रम बघायचे,असा सगळा भरगच्च कार्यक्रम होता त्या दोघांचा.या कार्यक्रमातल्या एकूण एका गोष्टींची त्यांनी परत परत उजळणीही केली होती. या कार्यक्रमाची ते दोघंही अगदी आतुरतेने वाट बघत होते.वडिलांना त्यांचा एक मित्र ते कन्व्हेंशन सेंटरच्या बाहेर पडत होते तेव्हाच नेमका भेटला.तोपर्यंत त्यांनी आखलेला सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडणारच होता. हा त्यांचा एक जुना मित्र त्यांच्या व्यवसायाशीही निगडित होता.दोघं एकमेकांना बरेच वर्षांत भेटलेले नव्हते.त्या दोघांनी प्रेमाने एकमेकांना घट्ट मिठी मारली, ते सिंथिया बघत होती.त्या मित्राने म्हटलं,"तू आता आमच्या कंपनीबरोबर काम करतो आहेस,याचा मला खूप आनंद वाटतोय.लुईसला आणि मला हे कळलं,त्या वेळी आम्हाला दोघांनाही बरंच वाटलं.मला तुला आणि अर्थातच सिंथियालाही माशांच्या खूप छान जेवणासाठी व्हार्फमध्ये आमंत्रित करायचं आहे." सिंथियाच्या वडिलांनी ताबडतोब ते निमंत्रण स्वीकारून टाकलं. "बॉब......" ते त्याला म्हणाले, "तुला भेटून मलाही खूपच छान वाटतंय ! आणि व्हार्फमधल्या रात्रीच्या जेवणाची तुझी कल्पनाही मला खूपच आवडलीय."
सिंथिया कमालीची निराश झाली.तिने रंगवलेली ट्रॉलीतल्या सफरीची,आणि संडे आईस्क्रिमची सारी स्वप्नं क्षणार्धात हवेत विरून गेली होती.शिवाय मासे खाणं सिंथियाला मुळीच आवडत नसे.ते तर तिला खावे लागणारच होते,पण दोन प्रौढ व्यक्तींच्या बोलण्यात तिला काय रस असणार होता? ती तर कंटाळूनच जाणार होती. पण तेवढ्यात तिच्या वडिलांनी त्यांच्या त्या मित्राला म्हटलं," पण आज नको,कारण आजच्या रात्रीचा माझा आणि सिंथियाचा कार्यक्रम खूप आधीपासूनच ठरलाय.हो ना सिंथिया ? " बोलता बोलता त्यांनी सिंथियाकडे हळूच डोळा मिचकावून बघितलं आणि तिचा हात धरून,तिला घेऊन ते घाईघाईने तिथल्या दारातून बाहेर पडले.त्या रात्रीचा त्यांचा ठरलेला सगळा कार्यक्रम सुरळीत पार पडला आणि सिंथियासाठी सॅन फ्रान्सिस्कोमधली ती रात्र संस्मरणीय ठरली.
इथे एक गोष्ट मात्र आवर्जून सांगायची आहे की, सिंथियाचे वडील स्टीफन आर.कोव्हे हे व्यवस्थापन क्षेत्रातले मोठे विचारवंत होते. (The Seven Habits of Highly Effective People या पुस्तकाचे ते लेखकही आहेत.) सिंथियाने ही गोष्ट मला सांगितली, त्याच्या काही आठवडे आधीच त्यांचं निधन झालं होतं. त्यामुळे सॅन फ्रान्सिस्कोमधल्या त्यांच्या त्या रात्रीच्या कायम स्मरणात राहणाऱ्या आठवणी तिने मला सांगितल्या,त्या वेळी ती खूपच भावूक झाली होती.ती पुढे म्हणाली, " त्यांचा तो एक अगदी साधासा निर्णय माझ्याशी त्यांना कायमचं बांधून ठेवून गेला.कारण त्यांच्यासाठी मी सगळ्यात जास्त महत्त्वाची व्यक्ती आहे हे त्याच वेळी मला कळलं होतं ".
स्टीफन आर.कोव्हे हे त्यांच्या पिढीतले वाचकप्रिय आणि सन्माननीय लेखक आणि व्यावसायिक क्षेत्रातले विचारवंत होते.याशिवाय ते आवश्यकतावादीही होतेच. 'मुख्य गोष्ट ही आहे की,मुख्य गोष्ट ही मुख्य गोष्टच ठेवायला हवी.' अशासारखी आवश्यकतावादी तत्त्वं ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा जगभरातल्या राज्यांमधल्या प्रमुखांना नियमितपणे फक्त शिकवतच नसत,तर त्या तत्त्वांसहच ते जगतही होते.आणि अशाच एका क्षणी हे महत्त्वाचं तत्त्व मुलीसहसुद्धा ते जगले आणि आयुष्यभरासाठी जपावी अशी एक सुंदर आठवण त्यांनी त्या दोघांसाठीही निर्माण केली. एका दृष्टीने पाहिले,तर त्यांचा निर्णय अगदी योग्यच होता.पण तरीही त्यांच्या जागी असलेल्या दुसऱ्या कुणीही कदाचित मित्राचं निमंत्रण सहजपणे स्वीकारलं असतं.कारण त्यांना मित्राला नकार देणं एकप्रकारे उद्धटपणाचं वाटलं असतं.
आपण उगाचच मैत्रीला न जागण्याचा कृतघ्नपणा करतोय की काय,अशी भीतीही त्यांच्या मनात उत्पन्न झाली असती.जुन्या मित्राबरोबर जेवण घेण्याची कचितच मिळणारी ही संधी हातून सुटून जाईल असंही त्यांनी वाटून घेतलं असतं.त्या एका क्षणाला महत्त्वाचं काय आहे आणि क्षुल्लक काय आहे हे ठरवण्याचं धाडस दाखवणं लोकांना इतकं जड का जातं ? याचं एक अगदी सोपं उत्तर हे आहे की, महत्त्वाचं नेमकं काय आहे,याबाबत आपल्या मनात बरेचदा संभ्रम असतो.त्यामुळे अशा गोष्टी घडतात त्या वेळी आपली प्रतिकारशक्तीच दुबळी होते.मात्र त्याऐवजी आपलं मन अगदी निःसंदिग्ध असलं, तर आपल्या अंतर्मनातच कुठेतरी आपल्याकडे सर्व दिशेने येणाऱ्या अनावश्यक गोष्टींना लांबच थोपवून धरणारी एक शक्ती जागृत होते.