भारतात लोकांच्या जेवणाच्या वेळा या ऋतू आणि व्यक्तीगत आवडीनिवडी यावर ठरतात.तरीही बऱ्याच भागात ठरलेल्या वेळा म्हणजे सकाळी ८ ते ९ न्याहारी, १ ते २ दुपारचं जेवण आणि ८ ते ९ रात्रीचं जेवण. रुद्रप्रयागमधल्या गेल्या काही महिन्यातल्या वास्तव्यात माझ्या जेवणाच्या वेळा अतिशय चमत्कारिक होत्या. सकाळचा नाश्ता दुपारी,दुपारचं जेवण रात्री किंवा दिवसभरात एकदाच दोन्ही वेळचं जेवण.पण
" जेवणातील घटक आणि नियमितपणा यावर आरोग्य अवलंबून असतं."
आणि ह्या समाजाला छेद देणारी गोष्ट म्हणजे या माझ्या अनियमित जेवणांमुळे माझ्यावर काहीही वाईट परिणाम झाला नाही... फक्त मी थोडासा सडसडीत मात्र राहिलो.
कालच्या ब्रेकफास्टनंतर सकाळपर्यंत मी काहीही खाल्लं नव्हतं आणि भला आजची रात्रसुद्धा बाहेर जागून काढायची असल्यामुळे मी चांगलं भरपेट खाऊन घेतलं आणि तासभर डुलकी काढून गुलाबराईला निघालो. तिथल्या पंडितला मला धोक्याची सूचना द्यायची होती की आता नरभक्षक त्याच्या गावाच्या आसपास आला आहे.पहिल्या वेळी मी रुद्रप्रयागला आलो होतो तेव्हाच माझी ह्या पंडितशी दोस्ती झाली होती आणि त्याच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय मी पुढे जायचो नाही.याची दोन कारणं होती;एक म्हणजे नरभक्षकाबद्दल आणि तिथून जाणाऱ्या-येणाऱ्या यात्रेकरूंबद्दल सांगण्यासारखे कित्येक मनोरंजक किस्से त्याच्याकडे होते आणि दुसरं म्हणजे नरभक्षकाच्या प्रत्यक्ष हल्ल्यातून बचावलेल्या दोन व्यक्तींपैकी तो एक होता.(दुसरी व्यक्ती म्हणजे हाताच्या जखमेसरशी थोडक्यात बचावलेली ती बाई) (मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे)अशीच एक गोष्ट त्याच्या माहितीतल्या आणि जवळच्याच खेड्यातल्या एका स्त्रीबद्दल होती.रुद्रप्रयाग बाजारातून घराकडे निघताना ती बाई गुलाबराई गावात जरा उशीराच पोचली.अंधार पडायच्या आत आपण आपल्या गावातपोचू शकणार नाही ह्या भीतीमुळे तिने पंडितला ती रात्र त्याच्या पिलग्रिम शेल्टरमध्ये काढू देण्याची विनंती केली.
त्यावर त्याने असं सुचवलं की यात्रेकरूंना लागणाऱ्या चीजवस्तू ठेवण्याचं त्याचं जे गुदाम होतं त्याच्या दरवाजासमोर ती झोपली तर एका बाजूने गुदामाची खोली आणि दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी झोपलेले ५० यात्रेकरू यामुळे ती सुरक्षित राहील.या झोपड्याची रस्त्याकडची बाजू उघडीच असायची,पण डोंगराकडच्या बाजूला मात्र भिंत होती. गुदामाची खोली या शेल्टर्सच्या मधोमध होती पण ती डोंगराच्या आत घुसल्याने त्याच्यापुढची जमीन सलग राह्यली होती.त्यामुळे ती बाई जेव्हा गुदामाच्या दरवाजासमोर झोपली तेव्हा तिच्या आणि रस्त्याच्या
मधोमध पन्नास यात्रेकरू होते.रात्री केव्हातरी यात्रेकरूंपैकीच एक बाई विंचू चावला म्हणून ओरडत उठली.तिथे कुठलाही दिवा नव्हता पण आगकाडीच्या प्रकाशात पाह्यलं तर त्या बाईच्या पायाला छोटा ओरखडा उठला होता.त्यातून थोडं रक्तही येत होतं.त्या बाईने छोट्या गोष्टीचा एवढा बाऊ केल्याबद्दल
कुरकूर करत आणि विंचवाच्या दंशातून तसंही रक्तबिक्त काही येत नाही.अशी काहीबाही बडबड करत सर्वजण परत झोपी गेले.
आंब्याच्या झाडाच्या वरच्या बाजूला असलेल्या आपल्या घरातून पंडित जेव्हा सकाळी तिथे आला तेव्हा त्याला त्या खेडेगावातल्या बाईची साडी शेल्टर समोरच्या रस्त्यावर पडलेली दिसली आणि त्यावर रक्त होतं.खरंतर पंडितने त्याच्या मते सर्वात सुरक्षित जागा त्या गाववाल्या बाईला दिली होती.तरीही पन्नास यात्रेकरूंच्या गर्दीतून बिबळ्याने तिलाच उचललं होतं आणि तिला तोंडात पकडून तिथून बाहेर पडताना चुकून यात्रेकरूंपैकी एकीच्या पायाला त्याचं नख लागलं होतं.पन्नास यात्रेकरूंना सोडून त्याच बाईला मारल्याबद्दल पंडितने जे स्पष्टीकरण दिलं ते असं की त्या सर्वांमध्ये तिचेच कपडे रंगीत होते. ह्या स्पष्टीकरणात तथ्य नाहीये.बिबळे वासाचा वापर करून शिकार करत नाहीत ते हे गृहीत धरूनही माझं स्पष्टीकरण असं आहे की त्या सर्व गर्दीत फक्त त्याच बाईच्या अंगाचा वास त्याला ओळखीचा वाटला असणार. आता हे फक्त तिचं दुर्दैव होतं, 'किस्मत' होती का फक्त त्या छपराखाली झोपण्यामधला धोका ओळखणारी ती एकच व्यक्ती होती आणि तिची ही भीती काहीतरी विलक्षण रीतीने बिबळ्यांपर्यंत पोचली असती व तो आकर्षित झाला असावा ?
या घटनेनंतर लगेचच पंडितची नरभक्षकाशी आमनेसामने भेट झाली.या घटनेचा अचूक दिवस काढायचा असेल तर तो रुद्रप्रयाग हॉस्पिटलच्या नोंदीमधून मिळू शकेल,पण त्याची या ठिकाणी आवश्यकता नाही.या गोष्टीच्या दृष्टीने महत्त्वाचं एकच सांगता येईल की ती उन्हाळ्याच्या दिवसात घडली.मी पंडितला भेटण्याच्या चार वर्ष आधी.. म्हणजे १९२१ मध्ये !
एकदा एका संध्याकाळी मद्रासवरून दहा यात्रेकरू तिथे आले व त्यांनी पंडितला ती रात्र त्याच्या शेल्टर्समध्ये काढू देण्याची परवानगी मागितली.गुलाबराईत आणखी एक नरबळी गेला तर त्याच्या पिलग्रिम शेल्टरचं नाव बदनाम होईल या भीतीने त्याने त्यांना तसंच पुढे दोन मैल चालत रुद्रप्रयागला जायला सांगितलं.
त्याच्या सांगण्याचा या यात्रेकरूंवर काहीही परिणाम होत नाहीये हे पाहिल्यावर मात्र त्याने त्यांना त्याच्या घरातच आश्रय दिला.मी मागे सांगितलंच आहे की हे घर यात्रामार्गावरच्या आंब्याच्या झाडापासून डोंगराच्या बाजूला पन्नास यार्डावर होतं.पंडितचं घरसुद्धा त्या भैसवाड्यातल्या घरांच्याच धर्तीवर बांधलेलं होतं, तळमजल्याच्या खोल्या सरपण व धान्य साठवण्यासाठी तर राहती घरं वरच्या मजल्यावर;अंगण,थोड्या पायऱ्या, त्यानंतर व्हरांडा आणि पायऱ्या संपताच समोरच राहात्या खोलीचं दार !
पंडित व त्याच्यावर आज लादल्या गेलेल्या दहा यात्रेकरूंचं रात्रीचं जेवण झाल्यावर त्यांनी त्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलं.या खोलीत हवा आत बाहेर जायला काही वावच नव्हता आणि हवेत अतिशय उकाडा होता.उकाडा फारच असह्य झाला तसा पंडित रात्री केव्हातरी उठला आणि दरवाजा उघडून बाहेर व्हरांड्यांत आला.तिथे जिन्याच्या दोन्ही बाजूच्या खांबांना हात देऊन उभा राहतोय आणि बाहेरची ताजी हवा छातीत भरून घेतोय तेवढ्यात त्याचा गळा चिमट्यात पकडावा तसा पकडला गेला.खांबावरची हाताची पक्कड तशीच ठेवून त्याने त्याच्या पायाचे तळवे हल्लेखोराच्या छातीवर ठेवून जीव खाऊन लाथ मारली. त्यासरशी बिबळ्याची त्याच्या गळ्यावरची पक्कड सुटली आणि तो पायऱ्यांवरून खाली धडपडत गेला.
आता आपली शुद्ध हरपणार असं वाटल्याने पंडित जरा बाजूला सरकला व त्याने जिन्याच्या रेलिंगवर आधारासाठी हात ठेवले.त्याक्षणी बिबळ्याने दुसऱ्यांदा खालून झडप मारली.
पंडितच्या डाव्या दंडात त्याची नखं रूतली.रेलिंगचा आधार घेतल्याने पंडित खाली पडला नाही पण एकीकडे रेलिंगवर रोवलेले पंडितचे हात व खालून बिबळ्याचं वजन यामुळे त्याची नखं हाताला दंडापासून ओरबाडत ओरबाडत मनगटापाशी सुटली. एव्हाना पंडितचे भीतीदायक आवाज ऐकून यात्रेकरूंनी दरवाजा उघडला होता.बिबळ्याने तिसरी झडप मारण्याच्या आत त्यांनी पंडितला चटकन घरात ओढून घेतलं आणि मागे दरवाजा घट्ट लावून घेतला.रात्रभर त्या गरम उबट हवेमध्ये पंडित गळ्याला पडलेल्या भोकांमधून श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता,बिबळ्या गुरगुरत दारावर नख्यांनी ओरखडे काढून दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत होता तर यात्रेकरू घाबरून किंचाळत होते ! दिवस उजाडल्यावर यात्रेकरूंनी पंडितला रुद्रप्रयागच्या काला कमलीवाला हॉस्पिटलमध्ये नेलं.तिथे गळ्यात नळ्या घालूनच त्याला अन्न द्यावं लागलं.सहा महिन्यानंतर तब्येतीची पार मोडतोड झालेल्या अवस्थेत पंडितला घरी आणलं गेलं.त्यानंतर पाच वर्षांनी त्याचे फोटो काढले गेले.त्याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूचे व्रण आणि डाव्या हाताच्या ओरबाडल्याच्या खुणा प्रत्यक्षात स्पष्ट दिसत असल्या तरी फोटोत मात्र अस्पष्ट दिसतात.
पंडित नेहमी माझ्याशी बोलताना बिबळ्याचा उल्लेख 'सैतानी शक्ती' म्हणून करायचा व पहिल्याच दिवशी त्याने मला विचारलं होतं की त्याला आलेल्या अनुभवाचा विचार केला तर ही 'सैतानी शक्ती' एखाद्या प्राण्याचं रूप घेऊ शकत नाही याला मी काय पुरावा देऊ शकतो? त्यानंतर गंमतीने मीही त्याच्याशी बोलताना बिबळ्याचा उल्लेख 'सैतानी शक्ती' असाच करायचो.त्या संध्याकाळी गुलाबराईत आल्यावर मी पंडितला भेटलो आणि त्याला माझ्या भैंसवाड्याच्या फसलेल्या मोहिमेबद्दल सांगितलं.
आता हा सैतान गुलाबराईच्या जवळपासच वावरत असल्याने त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या पिलग्रिम शेल्टर्समध्ये राहायला येणाऱ्या यात्रेकरूंसाठी जादा खबरदारी घ्यावी अशीही सूचना मी त्याला दिली.ती रात्र व त्यानंतरच्या तीन रात्री मी त्या यात्रामार्गावरच्या गंजीवर बसून रस्त्यावर लक्ष ठेवत घालवल्या.चौथ्या दिवशी इबॉटसन पौरीहून आला.इबॉटसन आला की मला नेहमी नव्याने उत्साह वाटायचा,कारण इतर स्थानिक लोकांप्रमाणे त्याचीही अशीच धारणा होती की नरभक्षक आज मारला गेला नाही तर कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही,आज नाही तर उद्या तो संपणारच!माझ्याकडे त्याला सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या.मी त्याला छोट्यामोठ्या घटना पत्रातून नियमितपणे कळवायचो आणि त्यातलाच काही सारांश शासनाला द्यायच्या अहवालात तो टाकत असे.पुढे तो प्रसारमाध्यमांकडेही जात असे.पण छोटे छोटे तपशील मात्र प्रत्यक्षच सांगण्यात मजा असते आणि त्यालाही ते ऐकायची उत्सुकता होतीच.अर्थात इबॉटसनकडेही मला सांगण्यासारखं खूप काही होतं;ते जास्त करून प्रसारमाध्यमांनी जो या प्रकरणाचा गाजावाजा चालवला होता त्याबद्दल होतं.देशातल्या कानाकोपऱ्यात आवाहन करून इच्छुकांना नरभक्षकाला मारण्यासाठी बोलावलं जावं असा सर्वत्र दबाब होता.या प्रसारमाध्यमांच्या मोहिमेमुळे इबॉटसनकडे फक्त एक उत्तर व एक सूचना आली होती.उत्तर एका शिकाऱ्याकडून आलं होतं व त्याच्या म्हणण्यानुसार जर त्याच्या प्रवासाची व राहण्याजेवणाची समाधानकारक सोय झाली तर तो गढवालला येण्याचा विचार करेल.सूचना करणाऱ्याने असा सल्ला दिला होता की नरभक्षकाला मारण्याचा सर्वात सोपा व खात्रीचा उपाय म्हणजे एका बोकडाच्या अंगाला विष चोपडावं,ते विष त्यानेच चाटू नये म्हणून त्याची मुसकी आहे तसंच राहू द्यावं व नंतर त्याला बिबळ्यासाठी आमिष म्हणून बांधावं,म्हणजे मग बिबळ्या त्याला मारेल आणि विषबाधा होऊन तोही मरेल.त्या दिवशी आम्ही बराच गप्पा मारत बसलो आणि माझ्या आतापर्यंतच्या अपयशाचा संपूर्ण आढावा घेतला.जेवण करताना मी त्याला रुद्रप्रयाग-गुलाबराई रस्त्यावरून साधारण दर पाच दिवसांनी जाण्याच्या बिबळ्याच्या सवयीचा उल्लेख करत आणि त्या रस्त्यावर पुढच्या दहा रात्री बसायचा माझा इरादाही सांगितला.या दहा दिवसांमध्ये एकदा तरी तो त्या रस्त्यावरून जाणार असा माझा अंदाज होता.मी अगोदरच कित्येक रात्री जागून काढल्या होत्या आणि आता आणखी दहा रात्री काढायच्या म्हणजे माझ्यावर फारच ताण येणार होता त्यामुळे इबॉटसनने या योजनेला जरा नाखुषीनेच होकार दिला.पण मी आग्रहच धरला आणि त्याला सांगितलं की जर या काळातही मला अपयश आलं तर मात्र मी नैनितालला परत जाईन व ज्या कोणाला माझी जागा घ्यायची इच्छा असेल त्याला मी रणांगण मोकळं करून देईन.संध्याकाळी इबॉटसन माझ्यासोबत गुलाबराईला आला आणि त्याने मला त्या पिलग्रिम शेल्टर्सपासून शंभर यार्डावरच्या आंब्याच्या झाडावर मचाण बांधायला मदत केली.झाडाच्या बरोबर खाली आणि रस्त्याच्या मधोमध आम्ही मजबूत लाकडी खुंट ठोकला व एका बोकडाच्या गळ्यात घंटा बांधून त्याला या खुंटाला बांधून टाकलं.
पौर्णिमेच्या आसपासचीच रात्र होती तरीही गुलाबराईच्या पूर्वेकडच्या उंच पहाडांमुळे गंगेच्या खोऱ्यात चंद्रप्रकाश फारच कमी वेळ मिळणार होता. जर उरलेल्या अंधाऱ्या काळात बिबळ्या आला तर त्या बोकडाच्या गळ्यातल्या घंटेमुळे मला समजणार होतं.सर्व जय्यत तयारी झाल्यावर इबॉटसन परत बंगल्यावर गेला.दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच तो माझ्या दोन माणसांना पाठवून देणार होता.झाडाखालच्याच एका दगडावर बसून सिगारेट ओढत रात्र पडायची वाट बघत असतानाच पंडित आला आणि माझ्या शेजारी बसला. पंडित "भक्ती" (माळकरी) होता आणि त्यामुळे धूम्रपान करत नसे.संध्याकाळी मचाण बांधताना त्याने आम्हाला पाह्यलं होतं.आता तो मला पटवू लागला की पलंगावर आरामशीर पडून राहायचं सोडून रात्रभर कशाला जागायचं? मी त्याला सांगितलं की हीच नव्हे तर पुढच्या नऊ रात्री मी तेच करणार आहे.कारण जरी मी त्या 'सैतानी शक्ती' किंवा दुष्टात्म्याला मारू शकलो नाही तरी किमान त्याच्या घराचं आणि पिलग्रिम शेल्टर्सचं संरक्षण तरी करू शकेन.त्या रात्री एकदा एका भेकरानं डोंगरावर अलार्म कॉल दिला पण त्यानंतर रात्रभर विशेष काहीच घडलं नाही.सकाळी माझी माणसं आली तसं त्यांच्या हातात माझा रग आणि रायफल देऊन मी वाटेवर पगमार्कस दिसतायत का ते वघत बघत इन्स्पेक्शन बंगल्याकडे निघालो.पुढचे नऊ दिवस माझ्या कार्यक्रमात काहीही बदल नव्हता.संध्याकाळी लवकरच मी माझ्या दोन माणसांना घेऊन बंगल्यावरून निघायचो आणि मचाणावर जागा घेतल्यावर दोन माणसांना परत पाठवायचो.
कोणत्याही परिस्थितीत उजेड नीट पडल्याशिवाय बंगल्याबाहेर पडायचं नाही ही सक्त ताकीद मात्र त्यांना असे.सकाळी नदीपलीकडच्या डोंगरामागून सूर्य उगवत असतानाच माणसं परत येत.त्यानंतर आम्ही एकत्रच बंगल्यावर जायचो.
या दहा रात्रींमध्ये पहिल्या रात्रीचा भेकराचा अलार्म कॉल सोडला तर विशेष काहीच घडलं नाही. नरभक्षकाचा वावर मात्र आसपास होता याचे सबळ पुरावे मिळत होते.दोन रात्री त्याने घराचे दरवाजे फोडून एकदा एक बोकड आणि दुसऱ्यांदा मेंढी उचलली होती. बऱ्याच धडपडीनंतर मला ही दोन भक्ष्य मिळाली कारण त्यांना बरंच लांब ओढून नेलं गेलं होतं.पण त्या एकाच रात्री भक्ष्याचा संपूर्ण फडशा पडल्यामुळे त्याच्यावर बसण्यात काहीच अर्थ नव्हता.
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!